Skip to main content

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

लेखक विकास यांनी बुधवार, 19/08/2015 20:22 या दिवशी प्रकाशित केले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

Purandare Maharashtra Bhushan आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले. शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते... अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात. रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे. मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच. जर पुरंदर्‍यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे.

वाचने 41488
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याने त्या पुरस्काराची शान वाढली आहे. संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवरायांबद्दलच्या अभ्यासाला संपूर्ण आयुष्यच समर्पित करणार्‍या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला त्यांच्या हयातीत व उत्तम प्रकृती असताना हा सन्मान दिला गेला त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. अवांतरः या लेखात डिसकव्हरी ऑफ इंडीया बाबतचा नकारात्मक उल्लेख टाळला असता तर बरे झाले असते.

In reply to by विकास

माझे म्हणणे असे आहे की एखाद्याच्या आयुष्यभराचा कार्याचा गौरव राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने झालेला असताना त्याविषयी आनंद व समाधान व्यक्त करताना नकारात्मक संदर्भ टाळावेत. ते पुस्तक मी वाचलेले नसल्याने मला काही कल्पना नाही. काल परवा कुणीतरी फेसबुकवर लिहिले होते की डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकातील शिवाजी महाराजांचा लुटारू असल्याचा उल्लेख आहे असे म्हणणे हे चुकीचे भाषांतर करून केलेला दावा आहे. आम्हाला महाराष्ट्र पापुमंच्या इयत्ता ४थीच्या पुस्तका जी प्रस्तावना होती ती पंडीत नेहरूंनी लिहिली होती (बहुधा डिस्कवरी ऑफ इंडिया मधून घेतली असावी). त्यात त्यांनी महाराजांच्या विविध क्षेत्रातील कामगिर्‍यांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

In reply to by विकास

उपक्रमवरील चर्चेत या मुद्द्यावर बरेच जणांनी भाष्य केले आहे. त्यापैकी एकाने असे लिहिले आहे की नेहरूंनी १९३४ साली महाराजांबाबत नकारात्मक उद्गार काढले होते परंतु १९४६ सालच्या डिस्कवरी ऑफ इंडिया च्या प्रथमावृत्तीत महाराजांबाबत नकारात्मक असे काही नव्हते. अन मी अगोदरच्या प्रतिसादात कुणीतरी फेसबुकवर जे म्हंटले आहे त्याचा संदर्भ दिला होता. त्यात गुरिल्ला या शब्दाचा वापर नेहरूंनी महाराजांच्या गनिमी काव्याने लढाया लढण्याचा उल्लेख केला होता. त्याचे चुकीचे भाषांतर लुटारू असे करून वाद निर्माण करण्यात आला होता असे लिहिले होते. चुभूदेघे.

In reply to by श्रीरंग_जोशी

येथे म्हणल्याप्रमाणे, पुस्तकाचे नाव मूळ लेखात बदलले आहे. बाकी बरेच काही त्या प्रतिसादात आहे. आता तुमच्या मूळ मुद्द्याबद्दल - तुम्हाला फक्त नेहरूंचा उल्लेख काढावासा वाटला. मग तसा विनोद मेहतांचा पण काढायला हवा असे वाटले नाही का? मी ते देण्यात नेहरूंना कमी करणे वगैरे उद्देश खरच नव्हता. पण ज्यांच्याकडून आपण आपले विचार तयार करू शकतो अशांमधे नेहरू देखील होते आणि विनोद मेहता देखील म्हणून तशी वरकरणी टोकाची वाटणारी उदाहरणे दिली. आणि अशा सगळ्या influential लोकांच्या मधे, स्वतःच्या शाहीरीने जनसामान्यांमधे निकोप शिवप्रेम तयार केले म्हणून बाबासाहेबांचे महत्व अधिक आहे असे माझे म्हणणे होते आणि आहे. केवळ त्या संदर्भात हे लिहीणे मला महत्वाचे वाटले. असो.

In reply to by विकास

तेव्हा मी संपूर्ण लेख वाचला नव्हता. या अभिनंदनपर लेखात कुठलेही नकारात्मक संदर्भ टाळले असते तर बरे झाले असते असे माझे मत आहे. बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची ओळख आजच्यापेक्षा खूप वेगळी होती असे आजवर तरी कुणाकडून ऐकले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची ओळख आजच्यापेक्षा खूप वेगळी होती असे आजवर तरी कुणाकडून ऐकले नाही. ती नक्कीच झाली असती असे माझे म्हणणे आहे. कारण शिवाजीबद्दल लिहीले गेलेले तथाकथीत बुद्धीवंतांचे लेखन. अथवा नेहरूंसारख्यांचे लेखन जे स्थानिक बखरी, पत्रव्यवहारांपेक्षा ब्रिटीशांच्या लेखनाच्या संदर्भाने लिहीले गेले होते. शेवटी असले लेखन हे संदर्भ बनतात आणि त्या संदर्भावर अजून पुढचे संदर्भ तयार केले जातात.

In reply to by विकास

मला पडलेला प्रश्न त्यापूर्वी (बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी) ती (शिवाजी महाराजांची) ओळख नकारात्मक होती का असा आहे? टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरु केल्याचे वाचले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले मिपाकर कदाचित मला पडलेल्या प्रश्नावर भाष्य करू शकतील. बाकी नेहरुंनी स्वतःची चुक मान्य करून दुरुस्ती केली होती हे मला अधिक शोध घेताना मिळाले. याचा संदर्भ मी खालच्या प्रतिसादात दिला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्या माहिती प्रमाणे टिळकांच्या काळात ती ओळख नकारात्मक बनत होती. कारण, ईंग्रजी अभ्यासक्रम ! टिळकांनी शिवाजी महाराज उत्सव आणि आपल्या शाळा सुरु करताना हेच उद्देश समोर ठेवलं होतं. त्या काळात लोकांचा आत्मसन्मान पणाला लागला होता. आपल्या मातीत जन्माला आलेली आदर्श व्यक्तिमत्वं "लुटारु" म्हणुन संबोधली जात होती. या आत्मसन्माना ला चेतवण्यासाठी लोकमान्यांनी मोठ्या हुशारीने या सोहळ्यांचा उपयोग करुन घेतला. जनमानसात गणपती आणि शिवाजी महाराज हे अनुक्रमे बुद्धीचे आणि शौर्याचे प्रतिक एके काळी होते , त्याला उभारी दिली गेली. गणेशोत्सवा मध्ये पण समाजातले सग्ळे जातिघटक एकत्र आले. कुणा एका जातीचा सण अशी गणपतीची ओळख कधीच नव्हती त्यामुळे या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेशी पण लोकं लगेच संलग्न झाले.

In reply to by स्रुजा

हे सर्व मला प्रथमच कळतय. महाराजांबद्दल कुणी काही उल्लेख केला असेल तरी महाराज हे आपले होते, आपल्या मातीतले होते. त्यांच्याबद्द्ल आपलीच माणसे असा विचार का करतील. मी खाली दिलेल्या दुव्यानुसार १९३४ साली ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी प्रकाशित झाल्यानंतर आपल्या लोकांनी आक्षेप घेतले जे देवगिरीकरांनी नेहरुंपर्यंत पोचवले अन नेहरुंनी चुक मान्य करून पुढच्या आवृत्तीत दुरुस्ती केली.

पुरस्काराची शान वाढली आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्काराचं अभिनन्दन! वंदनीय बाबासाहेब पुरन्दरे यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना!

In reply to by प्यारे१

पुरस्कारातले फ़क्त १० पैसे घेऊन स्वत:चे पंधरा लाख टाकून २५ लाखांचा निधी हॉस्पिटलला दान केला. _/\_

आता उल्लेख केलाच आहात तर नेहरुनी त्यांच्या डिस्कवरी ओफ इंडियात शिवाजीबद्दल नेमके काय 'वाटेल ते' लिहिले आहे ते अस्सल पुराव्यान्चा आधार देऊन कृपया सांगूनच टाका. बाकी कुरुंदकरांचा शिवाजी दूर दूर वर बाबासाहेबांचया शिवाजीशी मेळ खात नाही. तेव्हा पुरन्दारेन्ना एकाएक कुरुंदकरांचया तोडीस नेऊन बस्वलयाचे खूप आश्चर्य वाटले. (क्विलपॅड चा फारसा सराव नसल्याने कृपया शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष करावे, अशी विनंती.)

In reply to by दीपक साळुंके

नेहरूंच्या पुस्तकाचे नाव Glimpses of World History हे होते. अनावधानाने डिसकव्हरी ऑफ इंडीया लिहीले. (श्रीरंग जोशींना चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद). आता तुम्ही विचारलेतच म्हणून येथे उत्तर देतो. आपले त्यावरचे विचार सांगितलेत तर बरे होईल... जालावर असलेल्या आवृत्तीतले एक वाक्यः "... When only a boy of nineteen he started on his predatory career..." यातील "predatory" शब्द आपल्याला योग्य वाटत असेल आणि त्यातून जनतेला योग्य संदेश दिला गेला असे वाटत असेल तर तसे अवश्य सांगावेत. त्या व्यतिरीक्त, "The book on trial: fundamentalism and censorship in India" या पुस्तकात या संदर्भात म्हणजे नेहरूंच्या १९३४ सालच्या Glimpses of World History पुस्तकात शिवाजीबद्दल: "With his enemies, he was prepared to adopt any means, good or bad, provided he gained his end. He killed a general sent against him by Bijapur by treachery" असे एक वाक्य संदर्भ म्हणून दिले आहे. शिवाय दोन परीच्छेदात शिवचरीत्र (असली वाक्ये वापरून) उरकल्यावर शेवटी म्हणायचे, " In 1674 Shivaji had himself crowned with great ceremony at Raigarh. His victories continued to his death in 1680." म्हणजे वाचणार्‍याचे आणि त्यातून समजून घेणार्‍याचे शिवाजीबद्दलचे नक्की काय मत होणार ते तुम्ही बघा. आता तुम्हाला शिवाजीने अफझलखानाला विश्वासघाताने मारले आणि हवे ते मिळवण्यासाठी शिवाजी काहीही करायचा ही वाक्ये योग्य वाटत असली तर तो तुमचा मुद्दा. मला ती पटत नाहीत आणि इतर अनेकांना ती पटली नाहीत. बरं औरंगजेबाच्या हिंदूंवरील अत्याचारांबद्दल लिहीताना काय लिहीणार तर, "But this religious Hindu nationalism of a kind had its roots even earlier than Aurangzeb's reign and it may be that it was partly because of this that Aurangzeb became so bitter and intolerant." म्हणजे कस्सा माझा औरंग्या गुणी होता, उगाच ते "प्रिडेटर", "ट्रेचरस" शिवाजी (आणि वरती शिख) हिंदू नॅशनॅलिस्ट आले आणि बिचारा त्यांच्यामुळे बिघडून bitter and intolerant झाला. असे त्यांचे म्हणणे आहे. (आणि हो, मी पुस्तकबंदीच्या, कलाबंदीच्या विरुद्ध आहे. पण जर काही खोटे अथवा चुकीचे लिहीले गेले आहे असे सिद्ध झाले असले तर ते बदलायला हवे असे नक्की म्हणेन. या बाबतीत नेहरूंनी तसे बदल अंशतः केले असे म्हणावे लागेल.) --- तेव्हा पुरन्दारेन्ना एकाएक कुरुंदकरांचया तोडीस नेऊन बस्वलयाचे खूप आश्चर्य वाटले. माझ्या कुठल्या वाक्यात मी त्यांना एका तोडीचे म्हणलेले आहे असे वाटले ते सांगाल का? म्हणजे नक्की आपण विश्लेषण कसे करतात ते तरी कळेल. धन्यवाद.

बाबासाहेबांचे अभिनंदन!!!!!!!!! बाकी त्या लेखाचे शीर्षक निव्वळ संतापजनक आहे. महाराजांबद्दल असे शब्द आजवर फक्त इंग्रज आणि डच यांनीच काढलेले आहेत, मुघलांनीही नाही. फ्रायर नामक इंग्रज आणि हॅवार्ट नामक डच या दोघांनीही लिहिलेल्या समकालीन पुस्तकांत तसा उल्लेख आलेला आहे. तोच उल्लेख जाणूनबुजून करणे म्हणजे अजूनही वसाहतवादी मानसिकतेचे गुलाम असणे होय.

खरं आहे, अत्यंत लायक व्यक्तीला हा पुरस्कार लाभाल्याने त्या पुरस्काराची शान वाढली. मानाचा मुजरा शिव शाहिरांना.

नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता.
जालावर शोधले असता हा दुवा मिळाला. यात लिहिल्याप्रमाणे Glimpses of world history ची प्रथमावृत्ती प्रकाशित झाल्यानंतर तत्कालिन कॉंग्रेस नेते श्री देवगिरीकर यांनी महाराजांचा असा उल्लेख केल्याबद्दल नेहरूंना इतिहास संशोधकांचा आक्षेप कळवला. त्यानंतार नेहरुंनी याबाबत त्यांची झालेली चुक मान्य केली व पुढील आवृत्तीतून तसा उल्लेख वगळला.

In reply to by श्रीरंग_जोशी

या वर्णनाला शिवाजी महाराजांचा अपमान समजणे हा अडाणीपणा आहे

In reply to by आबा

अपमान आहे की नाही माहीत नाही, पण सन्मान नक्कीच नाही. नेहरूंनी याबद्दल फीडबॅक मिळाल्यावर बदल करणे व दिलगिरी व्यक्त करणे हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे. पण त्यांची इतर पुस्तके बघितल्यावर शिवरायांबद्दल फ्रेंच व इतर इतिहासकारांनी जे लिहीले आहे त्या कोनातून बघण्याची टेण्डन्सी दिसली होती. आग्र्याहून सुटके बद्दल त्यांना औरंगजेबानेच जाउ दिले असेही कोठेतरी (बहुतेक डिस्कवरी ऑफ इण्डिया) म्हंटलेले आहे. एकूण त्यांची अनेक संस्कृतींबद्दलची मते (अमेरिकन्स ही आले त्यात) त्यांच्या 'ब्रिटिश कंडिशनिंग' मुळे झालेली होती त्याचा प्रभाव त्यांच्या विचारात दिसतो. पण तो बदलायची फ्लेक्झिबिलिटीही त्यांनी येथे दाखवली.

In reply to by फारएन्ड

मी नेहरूंची तळी ऊचलायची म्हणून तसं लिहीलं नाही फारएन्ड. मराठ्यांच्या इतिहासाबद्दलच्या अनेक दृष्टीकोनामधला त्यांचाही एक दृष्टीकोन, एवढंच. आता कोणताही इतिहास ऑब्जेक्टिव्हली कसा काय सांगता येईल? बाबा साहेबांच पुस्तक मला त्यांच्या शैली मुळे कंटाळवाणं वाटतं, इतिहासामुळे नाही.

In reply to by आबा

आपलं म्हणणं कितीही योग्य असलं तरी या धाग्यापुरतं अस्थानी आणि अवेळी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. असो! मत व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो.

महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे यात शंका नाही. वादविवादाचे गालबोट या सगळ्या प्रसंगाला लागण्याने त्यांच्या कार्याला दृष्ट लागू नये याची सोय या लोकांनी आधीच करुन ठेवली असे वाटते! :) काही आठवणी - बाबासाहेबांचे शिवचरित्राख्यान मी नगरला शाळेत असताना ऐकले आहे (१९७८-१९८० चा सुमार असेल..). सात दिवसांची मालिका होती. रोज संध्याकाळी सहा वाजता भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मोने कलामंदिरात व्याख्यान असे. बरोब्बर ६ वाजता दरवाजे बंद करुन घ्यायची त्यांची सूचना होती. पहिल्या दिवशी उशीरा आलेल्या लोकांना प्रवेश मिळाला नाही. दुसर्‍यादिवशी ५.५० ला एकूणेक जागा भरलेली होती आणी लोक चिडीचूप बसून व्याख्यान सुरु होण्याची वाट बघत होते! शिवजन्माच्या आधीपासूनचा इतिहास कथन करत करत, शिवजन्म, मग राजांचे मोठे होणे, अनेक लढाया, अफझलखान वध, आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग कथन करताना त्यांची वाणी अशी काही तळपत होती की ज्याचं नाव ते. तारीख वार, सनावळ्या, मराठी महिना, तिथीसकट उल्लेख एका दमात ते करत तेव्हा ऐकणारे चाट पडत. बाजीप्रभू देशपांड्यांच्या पावनखिंड लढाईचा प्रसंग तर त्यांनी असा काही सांगितला होता की ऐकणारा प्रत्येक माणूस डोळे पुसत होता! जिताजागता इतिहास डोळ्यांसमोर उभा करणे खायचे काम नाही. हृदयात ओतप्रोत शिवप्रेम भरलेले असल्याखेरीज हे शक्य नाही. ती ओजस्वी व्याख्याने आता सगळी आठवत नसली तरी त्यावेळचे भारलेपण आणि हा माणूस काही वेगळाच आहे हे जाणवणे अजूनही ताजे आहे. त्यांची दुसरी भेट ही आमच्या घरी झाली हे माझे अहोभाग्य. बहुदा नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या काही कामानिमित्त ते आले होते त्यावेळी माझ्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. जवळपास एक तास आमच्याकडे असावेत. त्यांच्या लहानपणातल्या शाळेपासूनच्या काही गमती, किस्से ऐकवून त्यांनी आम्हाला खळखळून हसवले होते. निगर्वी व्यक्तिमत्त्व, अतिशय सूक्ष्म विनोदबुद्धी आणि प्रत्येक विषयाच्या खोलात जाण्याचा जिज्ञासायुक्त स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये लक्षात राहिली आहेत. त्यांनी चुकूनही स्वतःचा मोठेपणा वगैरे सांगितलेला आठवत नाही. तिसरी भेट मिरजेला झाली. ते व्याख्यानासाठी आलेले होते. बहुतेक काशीकर मंगलकार्यालयाचा हॉल होता. पाऊल ठेवायला जागा नव्हती. व्याख्यानाचा विषय आठवत नाही. परंतु बोलण्याच्या ओघात इंग्लिश खाडी पार करुन जाणारी पहिली भारतीय महिला कोण असा प्रश्न आला. संपूर्ण सभागृहात चिडीचूप शांतता. बाबासाहेब गरजले "अरे ह्या मिरजेत उत्तर माहीत असणारा एकही माईचा लाल असू नये? लांछनास्पद आहे!" ताबडतोब एकाने "आरती साहा" हे उत्तर दिल्याबरोब्बर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी त्या मुलाचे तोंडभरुन कौतुक केले! तुमचा इतिहास विसरु नका त्यातून प्रेरणा घ्या, शिकत राहा हा संदेश त्यांनी दिला!

In reply to by चतुरंग

किती भाग्यवान आहात!! मला कधीच त्यांना प्रत्यक्षात भेटता आले नाही. पण शिवछत्रपती पुस्तक वाचताना अगदी मंत्रमुग्ध झाले होते. एखाद्याच्या संपुर्ण आयुष्याला एकाच विचाराने झपाटले म्हणजे काय होते हे तेव्हा कळालं होतं. माझी आई त्यांच्या व्याख्यानाला गेली होती तेव्हा म्हणे त्या भाषणात त्यांनी अनेकदा एकच वाक्य म्हणले की माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाचे वाईट केले नाही तऋ माझ्या वर काळी शाई टाकली.. (मला नक्की माहित नाहीये हा प्रसंग त्यामुळे शब्द मागे पुढे होऊ शकतात) त्यांना फारच खंत लागलेली दिसली. वाईट वाटलं खुप ते ऐकुन... असो.. मुर्खांना जगात कमतरता नाही. बाबासाहेब पुरंदरेंना हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन!! आज त्यांचा वाढदिवसही आहे म्हणे.. त्यासाठी सुद्धा मनःपुर्वक शुभेच्छा!

In reply to by पिलीयन रायडर

या ब्रिगेडी मनोवृत्तीच्या लोकांनी प्रत्यक्ष महाराजांनाही मनस्ताप दिला होता. महाराज त्यांच्या बरोबरीचे नाहीतच (भोसले कूळ हे जाधव, मोरे, सावंत आदींच्या बरोबरीचे नाहीच) अशा मनोवृत्तीतून महाराजांना त्यांनी सशस्त्र विरोध केला होता. जिथे महाराजांना सोडलं नाही तिथे पुरंदरे कोण?

In reply to by चतुरंग

तुम्ही खुप भाग्यवान आहात. बाबासाहेब पुरंदरे प्रत्यक्ष तुमच्या घरी आले. तुम्ही लिहलेले वाचूनच मी भारावलो, तुमची काय अवस्था झाली असेल. त्याचबरोबर शाळेत मित्रांसमोर भाव वाढला असणार.

नरहर कुरंदकरांची एक सुन्दर प्रस्तावना वाचल्याचे आठवते...कदाचित श्रीमान योगी साठी असेल...कुठल्याही अभिनिवेशा शिवाय लिहिलेली एक छान प्रस्तावना आहे.

"पुरस्काराच्या स्वरुपात आपण मला १० लक्ष रुपये दिले. हे पैसे महाराष्ट्राचे आहेत, शाहीरांचे आहेत, कवींचे आहेत, लेखकांचे आहेत, इतिहासकारांचे आहेत, कलाकारांचे आहेत! ह्या पैश्यांवर माझा जरादेखील अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल यांचा आणि समस्त महाराष्ट्राचा मान राखायचा म्हणून, मी यांतले १० पैसे तेवढे घेतो. आणि त्या १० लक्ष रुपयांत माझ्याकडचे १५ लक्ष रुपये घालून, पैश्यांअभावी कॅन्सरवर उपचार करवू न शकणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एकूण २५ लक्ष रुपये देऊन टाकतो!" — 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.

बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन! ज्या काळात पुस्तके लिहिणे, ती छापून आणणे आणि खपवणे हे जिकिरीचे काम होते त्या काळात बाबासाहेबांनी इतिहासावर पुस्तके लिहिली आणि विक्रमी संख्येने त्यांचा खप झाला. जाणता राजा उभे करण्यासाठी त्यांनी काय कष्ट केले असतील आणि पैसे कसे गोळा केले असतील तेच जाणोत. ऐतिहासिक संदर्भ, रुमाल, तलवारी बघण्यासाठी त्यांची आणि गोनिदांची जी काय धावपळ आणि पायपीट चालायची आणि स्पर्धाही, त्याबद्दल गोनिदांनी छंद माझे वेगळे पुस्तकात फार सुरेख शब्दात लिहिलेले आठवते. पुरस्काराचे राजकारण करणार्‍यांना देव क्षमा करो. ते काय करत आहेत हे त्यांनाही कळत नाही. मात्र या पुरस्काराची रक्कम त्यात स्वतःची भर घालून कॅन्सर रुग्णांसाठी देणार्‍या बाबासाहेबांनी आपण काय आहोत आणि हे कोल्हेकुई करणारे काय आहेत हे या लुच्च्या लफंग्यांना दाखवून दिले. शाळकरी वयात रत्नागिरीला बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली होती. त्यानंतर मुले शाळकरी असताना जाणता राजाचा प्रयोग पाहिला. दोन्ही वेळी भारलेले वातावरण तेच, तसेच. ८० व्या वर्षी औरंगझेबाची भूमिका बाबासाहेबांना हौसेने करताना पाहिले. सुई पडली तरी आवाज येईल अशा शांततेने लोक तासंतास इतिहासाबद्दल व्याख्याने ऐकत आहेत असे बाबासाहेबांपूर्वी कधी झाले नसावे. महाराष्ट्रात अनेक इतिहास संशोधक अभ्यासक झाले, आहेत. पण ते असे लोकांपर्यंत पोचले नाहीत. इतिहासाचार्य राजवाड्यांना तर विपन्नावस्थेत दिवस काढावे लागले. बाबासाहेबांनी इतिहास अभ्यासकाला एक प्रकारचे ग्लॅमर नक्कीच मिळवून दिले. शिवसेनेच्या स्थापनेत बाबासाहेबांचा महत्त्वाचा वाटा होता असे कुठेतरी वाचले होते. हे अस्सल शिवभक्त नंतरच्या काळात सेनेत सक्रीय राहिले नाहीत. राजकारणात न जाता ते आपली शाहिरी करत राहिले हे आपले नशीब. नाहीतर शिवाजी महाराज हा चौथीच्या अभ्यासाचा विषय राहिला असता आणि आता परीक्षा नसल्यामुळे मुलांनी तेवढाही अभ्यास केला नसता. लहान मुलांना इतिहासाची गोडी लावण्याचे काम राजा शिवछत्रपती या पुस्तकाने चोख केले. संस्कार व्हायच्या वयात राजा शिवछत्रपती पुस्तकाचे खंड घरात होते हे माझे मोठे नशीब! बाबासाहेबांना आता कोणता पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय, आमच्यासारख्यांना काही फरक पडत नाही. तसा स्वत: बाबासाहेबांनाही पडणार नाही. मात्र हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने पुरस्काराची शोभा वाढवली आहे. असेच शाहिरी करत बाबासाहेब शंभरावा वाढदिवस बघू देत ही आमची सामान्य माणसांची शुभेच्छा!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महारष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. छत्रपती शिवरायांचे चरित्र जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अनन्य आहे !

पैसा यांनी जाणता राजाचा उल्लेख केला म्हणून आवर्जून सांगते. एक दोन महिने आधी इथे लंडन मधे जाणता राजा चा प्रयोग होता, त्याला मुलांना घेऊन गेलो होतो. असे बरेच लोक आपल्या मुलांना मुद्दाम घेऊन आले होते. तो प्रयोग आणि शेवटचा राज्याभिषेकाचा देखावा ही मुले डोळे मोठाले करून पहात होती. त्यांचा तो आ वसलेला, त्यांच्या टाळ्या आणि त्यांच्या तोंडून शिवाजी महाराज was soooo awesome....हे जेव्हा ऐकलं तेव्हा अक्षरश: जग जिंकल्यासारखं वाटलं होतं. परदेशात जन्मलेल्या, वाढत असलेल्या आमच्या मुलांपर्यंत महाराजांच्या चरित्राला पोहोचविणार्या बाबासाहेबांचे शतश: आभार.

In reply to by पद्मावति

येथे झालेल्या जाणता राजाच्या प्रयोगात माझा लंडनवासी मित्र प्रदीप नेहे आणि त्याच्या मुलाने काम केले होते. त्याचे मस्त फोटोही पाठविले होते मला. बाबासाहेब पुरंदर्‍यांचे हार्दीक अभिनंदन. त्या पुरस्काराच्या पैशात स्वतः कडची भर घालुन त्याचे जे दान केले त्यामुळे टिकाकारान्च्या सणकुन थोबाडीत बसली असेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बाबासाहेब पुरंदर्‍यांचे हार्दीक अभिनंदन. त्या पुरस्काराच्या पैशात स्वतः कडची भर घालुन त्याचे जे दान केले त्यामुळे टिकाकारान्च्या सणकुन थोबाडीत बसली असेल

राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं असेच मत श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक या पुस्तकांविषयी सुद्धा आहे

In reply to by आबा

वाह !

In reply to by आबा

बाकी जाँन्र सारखाच
राजाशिवछत्रपती आणि हरी पोटर ची तुलना??? तुम्हीतर तारे तोडण्यात पप्पू वर मात केलीत आबा

In reply to by कहर

राजा शिवछ्त्रपती न आवडणार्‍याला हॅरी पॉटर वाचण्याचा सल्ला देऊन आपण साक्षी महाराजांवर मात केलीत त्याचं काय ?

In reply to by प्यारे१

त्यामुळे विषय बदलेल, बाबासाहेबांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल कौतुक आहे, परंतू राजा शिवछत्रपती मला काही आवडलं नव्हतं

In reply to by आबा

आबा फक्त राजाशिवछत्रपती नाही
श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक
सुद्धा मराठीतील प्रसिद्ध पुस्तके आंतरजालावर शोधली तर पहिल्या दहात हि सारी पुस्तके येतात. मराठीत वाचण्यासारखे भरपूर आहे मान्य आहे पण आपली "ही" (ना)आवड पाहून बाकीच्या पुस्तकांवर दया दाखवून हरी पोटर सुचवले ओ … असे लोक देखील महाराष्ट्रात आहेत हे कळल्यानंतर जीतुभैय्या बद्दल सहानभूती वाटणारा कहर

In reply to by कहर

खुप आहेत हो असे लोक, आणि त्यातल्या सर्वांनाच जीतुभैय्या बद्दल सहानुभुती वगैरे वाटत नाही आणि मराठी मध्ये वाचण्यासारखे भरपूर आहे हे म्हणालात त्याबद्दल धन्यवाद

In reply to by आबा

महाराजांच्या कार्याबद्दल तरी अभिमान वाटतो कि तेही विशेष नाही सहज उत्सुकतेपोटी विचारली. मनात एक नि इथे सांगायला एक असे उत्तर दिले तरी चालेल

In reply to by कहर

एक फक्त सांगतो, की राजा शिवछत्रपती वाचण्याचा कदाचित मलाही कंटाळा येईल, कारण ते भावनात्मक जास्त आहे आणि बुद्धीला खाद्य देणारं कमी आहे. किंवा असंही असेल की महाराजांचं सर्व आयुष्य पाठ झाल्यामुळे (आणि पूर्वी एकदा ते वाचूनही झाल्यामुळे) त्यात नावीन्य वाटणार नाही. पुरंदरेंची व्याख्यानं बर्‍याचदा ऐकल्यामुळेही असं होवू शकेल.

In reply to by आबा

मृत्युंजय वगैरे वाचायचा मलाही कंटाळा आला. मात्र राजा शिवछत्रपती चे मॅजिक वेगळेच आहे. ते वाचले पण आवडले नाही म्हणणारे तुम्ही पहिलेच माझ्या माहितीत. पण समाजाने डोक्यावर घेतलेल्या काही गोष्टी बोअर वाटणारे काही मित्र आहेत, मलाही असे एक दोन कलाकृतींबद्दल वाटते. त्यामुळे याचे आश्चर्य वाटले नाही.

In reply to by आबा

अत्यंत बोर नाहि पण बराचसा भाग पल्हाळ वाटतो राजा शिवछत्रपतीचा. श्रीमान योगी पण काहि अंशी तसं आहे (या कादंबरीवर कुरुंदकरांच्या प्रस्तावनेची अनेक पारायणं केली आहेत ) . मृत्युंजय देखील अपवाद नाहि. राधेय मी वाचलं नाहि. महानायक मात्र अवडलं होतं... पण त्याला आता फार वर्षे झाली. या यादीत 'छावा' पण यायला हवा असं वाटतं :)

In reply to by अर्धवटराव

पाल्हाळाबद्दल सहमत. त्यामुळेच एका मर्यादेनंतर त्याऐवजी मेहेंदळ्यांचे शिवचरित्रच बरे वाटते. यात 'एका मर्यादेनंतर' हा भाग कळीचा आहे. त्या विषयाची गोडी लागायला मात्र राजा शिवछत्रपतीच पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

खरय. नाहिपेक्षा 'राजे तुम्ही नाटकातच का नाहि राहिलात' अशी पु. लं. सारखी आर्त साद घालावी लागली असती.

In reply to by अर्धवटराव

"श्रीमान योगी" ची प्रस्तावना मला सुद्धा आवडली होती. छावा सगळा वाचला नाही म्हणून त्याविषयी बोललो नाही.

In reply to by आबा

आबा, तुम्ही अगदीच कामातुन गेलेले वाटत नाही तुमच्या लिहीण्याच्या शैलीवरुन.. म्हणुन एक प्रश्न..
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं
आवर्जुन ह्याच धाग्यावर हे का सांगावसं वाटलं?

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या आवडत्या पुस्तकांमध्ये कदाचित हे पुस्तक येणार नाही. पण ती चर्चा करण्याचा हा धागा नक्कीच नाही. आणि मला बोअर वाटलं असं sweeping generalized statement (इंग्रजीबद्दल आधीच क्षमस्व) करण्याचाही नाही. तुम्हाला ही पुस्तकं नसतील आवडली. सहज शक्य आहे. प्रसिद्ध पुस्तकं प्रत्येकाला आवडलीच पाहिजेत असा काही नियम नाही आणि त्यावरून कोणाची अभिरुची ठरू नये. मला वैयक्तिक रित्या कुरुंदकरांनी मांडलेले शिवाजी महाराज फार जबरदस्त वाटतात. कारण त्यामागचा सखोल विचार. तरीही लहानपणी महाराजांच्या बद्दल गोडी, आदर, अस्मिता निर्माण झाली ती पुरंदरे यांनी लिहिलेल्या "महाराज" या पुस्तकामुळे. ते राजा शिवछत्रपती प्रमाणे कादंबरीवजा नाही आणि त्यात संवाद नाही. काही प्रमाणात सनावळ्यांनी भरलेलं चरित्र आहे. पण माहिती आणि दीनानाथ दलाल यांची चित्रं अप्रतिम आहेत. आता आउट ऑफ प्रिंट असावं.

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही अगदीच कामातून गेलेले वाटत नाही ... अशी वाक्ये मी काँन्व्हरसेशन स्टार्टर म्हणून वापरत नाही, म्हणजे माझं डोकं तरी ठिकाणावरच असावं असा अंदाज आहे

In reply to by आबा

ओके.. प्रश्न शिताफीने टाळला आहे पण तरी ठिके..

राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं असेच मत श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक या पुस्तकांविषयी सुद्धा आहे>>> धन्य आहात मग कसली पुस्तकं विंटरेष्टिंग वाटतात तुम्हाला ? राधेय आणि महानायक नै वाचलं बाकीची सगळी पुस्तकं उत्तम . श्रीमान योगी तर लाजवाब . माझ्यात इतिहासाची गोडी निर्माण करण्याला हे पुस्तक कारणीभूत आहे बाबासाहेब पुरंदरेंच अभिनंदन

शिवशाहीर बाबासाहेबांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल विनम्र अभिवादन.

बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्यासारखा आयुष्य पणाला लावून शिवचरित्राचा अभ्यास करणारा इतिहासकार उभ्या महाराष्ट्रात झाला नाही आणि होणारही नाही. आणि देवेंद्र फडणविस आणि महाराष्ट्र शासनाचेदेखील अभिनंदन! कुठल्याही दडपणाला बळी न पडता हा सोहळा दिमाखात पार पाडून दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावयास हवे. राष्ट्रवादी, आव्हाड, ब्रिगेड, आणि इतर उपद्रवी घटकांनी जो तमाशा केला तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे हे नक्की. कित्येक महत्वाचे प्रश्न असतांना एका पुरस्काराच्या सुयोग्य निवडीवरून आकांड-तांडव घालून राष्ट्रवादी पक्षाने नेमके काय साधले त्यांनाच माहित. पवारांचे सगळे फासे उलटे पडत आहेत हे बहुधा त्यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये. ब्राह्मण - मराठा द्वेष याखेरीज बाबासाहेबांना विरोध करण्याचे कुठलेही कारण नव्हते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे. राष्ट्रवादीने गेली १५ वर्षे हेच विघातक आणि समाज तोडण्याचेच राजकारण केलेले आहे. २०-२५ वर्षांपूर्वी जातीय तेढ इतकी नव्हती; राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीय अराजकतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. शिवाय बेसुमार भ्रष्टाचार आणि गुंडगिरी प्रचंड फोफावली हे सांगणे न लगे. नेमाडे सध्या काहीही बरळत आहेत. त्यांना ज्ञानपीठ कसा मिळाला हेच मला न उलगडलेले कोडे आहे. त्यांच्यातही ब्राह्मण द्वेष ठासून भरलेला आहेच. उलट-सुलट विधाने करणे, कुणावरही कशीही टीका करणे, पुरस्कार स्वीकारतांना मात्र मूग गिळून स्वीकारणे असले आचरट प्रकार नेमाड्यांनी चालवलेले आहेत. असो. बाबासाहेबांचे पुन:श्च अभिनंदन!

In reply to by समीरसूर

बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! "राजा शिवछ्त्रपती" ची मी पारायणे केली आहेत आणि जाणता राजा हे महानाट्य पण पाहिले आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य छ्त्रपती शिवाजी महाराज या दैवताला अर्पण केले, त्या कॄषितुल्य व्यक्तिमत्वाच्या वाटयाला आयुष्याच्या उत्तरार्धात अवहेलना यावी यासारखे दुर्दैव नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात असे व्हायला नको होते.

कुरुंदकरांच्या शिवाजी महाराज या विषयावरील व्याख्यानाच्या लिंक्स. यातील दुसर्या भागात ब्राह्मण -ब्राह्मणेतर वाद, दादोजी- रामदास - गागाभट्ट-शिवाजी, वैदिक राजाभिषेक, गोब्राह्मण प्रतीपालंकत्व वगैरेंवर विस्तृत विवेचन आहे. अन हि मांडणी बाबासाहेबांनी केलेल्या मांडणीपेक्षा फार वेगळी आहे असा मला वाटत नाही.

लोक्स एक लक्षात घ्या. बाबासाहेबांचे कार्य सुरू कधी झाले? चरित्र कधी लिहिले? १९५५-६० सालच्या आसपास. त्याच्या अगोदर कोणी इतिहासकार नव्हते? लेखकांनी काही कथाकादंबर्‍या लिहिल्या नव्हत्या? कुठल्याही युरोपियन भाषेतले पहिले शिवचरित्र म्हणजे १६८८ साली एका फ्रेंचाने लिहिलेले होय. त्यानंतर १६९५ साली पोर्तुगीज भाषेत कॉस्मा द ग्वार्दा याने लिहिलेले शिवचरित्र आहे. त्यानंतर अनेक पुस्तकांत शिवरायांचा उल्लेख आलेला आहे. मराठी बखरी-कागदपत्रे सोडून द्या, मुघलांचे फारसी भाषेतील इतिहास ग्रंथ, उदा. खाफीखानाचा मुन्तखब-उल-लुबाब किंवा भीमसेन सक्सेना याचा तारीख-ए-दिल्कुशा, आदिलशाहीचा इतिहास बसातीन-उस-सलातीन, हफ्त अंजुमन, वगैरे अनेक फारसी ग्रंथ आहेत. इतकेच कशाला, आसाम प्रांतातील आहोम राजसत्तेच्या बखरींमध्येही दोनेक ओळींचा का होईना उल्लेख आहे. आणि या सर्वांनी महाराजांची फक्त निंदाच केलीय असे आजिबात नाही. पुढे मराठ्यांचा सर्वांत पहिला इतिहास लिहिला तो कीर नामक इंग्रज इतिहासकाराने, १७८२ साली. इंग्रजी सत्ता आल्यावरचा पहिला इतिहास म्हणजे ग्रँट डफचा, तो लिहिला गेला १८२१ साली. त्यातील काही चुका काढणारे पहिले गृहस्थ म्हणजे नीळकंठराव कीर्तने. त्यांच्या त्या निबंधाचे प्रकाशनवर्ष आहे १८६७. तिथून पुढे १९०० सालापर्यंत इतिहासाचार्य राजवाडे, द.बा.पारसनीस, वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई अशी इतिहासकारांची सलग लड लागल्यासारखी होती. इतकेच नव्हे तर अनेक कादंबरीकार, नाटककार हे शिवकाल-पेशवेकालविषयक कादंबर्‍या लिहीतच होते पूर्ण १९व्या शतकभर. महात्मा फुल्यांनी शिवजयंतीचा उत्सव प्रथम सुरू केला, त्याला लोकमान्यांनी मोठे स्वरूप दिले व १९०६ साली शिवसमाधी नव्याने बांधून घेतली. हडप नामक कादंबरीकारांनी पूर्ण मराठा इतिहास कव्हर करणार्‍या पन्नासेक कादंबर्‍या लिहिल्या. काव्येतिहाससंग्रह नामक मासिकातून १८७०-८० पासून जुन्या मराठी बखरी, पोवाडे वगैरे एकदम भसाभस बाहेर पडत होते. संशोधक जुनी कागदपत्रे तपासायचे आणि प्रकाशित करायचे. अनेक मेळे, समारंभ, इ. च्या माध्यमातून नाटके सादर व्हायची. वासुदेवशास्त्री खरे आणि इतर अनेकांनी तशी कैक नाटके लिहिलेली आहेत. गड आला पण सिंह गेला, कांचनगडची मोहना वगैरे कादंबर्‍या याच काळाच्या आसपासच्या. त्यातून शिवाजीमहाराजांची एक विशिष्ट इमेज महाराष्ट्रावर हळू हळू दृढपणे ठसत गेली. स्वराज्यासाठी लढणार्‍या या वीराची कीर्ती इंग्रजी अंमलाच्या काळात पूर्ण भारतभर पसरली. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी 'जयतु शिवाजी' ही कविता लिहिली, त्या प्रांतात शिवाजीउत्सवही साजरा होऊ लागला. (सखाराम गणेश देऊस्कर या गृहस्थांच्या पुढाकाराने) महाराष्ट्राबाहेर अनेक प्रांतांत या काळात (१९०० च्या पुढे, १९३०-५० पर्यंत) शिवचरित्रे लिहिली जाऊ लागली. तेव्हाच कोल्हापूरला १९३० साली बाळकृष्ण या पंजाबी गृहस्थांनी एक चार खंडी शिवचरित्र लिहिले 'शिवाजी द ग्रेट' या नावाने. ते राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांचे शिवचरित्र त्या काळचे सर्वांत अद्ययावत चरित्र म्हटल्यास हरकत नाही. त्याचा वापर अनेकांनी पुढे केला पण बाळकृष्णांचे नाव फारसे कुणालाच माहिती नाही. [इंग्रजांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा नेहमीच लुटारू, बंडखोर अशी रंगवलेली नाही हेही जाता जाता सांगतो.] पुढे रियासतकार सरदेसायांनी बरेच कष्ट घेऊन मराठ्यांचा पूर्ण इतिहास एकटाकी लिहून काढला, जदुनाथ सरकारांनीही एक शिवचरित्र लिहिले. पुढे सुरेंद्रनाथ सेनांनी जे काम केले त्यामुळे पॅन-इंडियन लेव्हलवर मराठ्यांची इमेज पुन्हा एकदा सुधारण्यास मदत झाली, नायतर "शिवाजी चांगला होता पण मराठे लुटारू होते" छाप इमेज खूप रूढ होती. शिवाय मोडीसाठी राजवाडे, खरे, आणि अजूनही अनेक, फारसीसाठी सेतुमाधवराव पगडी व ग ह खरे, पोर्तुगीजसाठी पांडुरंग पिसुर्लेकर, इंग्रजीसाठी बी जी परांजपे, फ्रेंचसाठी हतळकर व सेन, डचसाठी बाळकृष्ण व वाडेकर, एका पर्स्पेक्टिव्हकरिता त्र्यंबक शंकर शेजवलकर वगैरे असे अनेक संशोधक उदयाला आले. मी खरे तर अजून अनेकांची नावे वगळली आहेत. मेन उद्देश हाच होता की जणू बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, आणि नेहरूंचा उल्लेख हाच काय तो भारतभर आणि जगभर प्रमाण मानला जायचा, त्यांच्या चुकीच्या इतिहासात सुधारणा करणारे फक्त बाबासाहेबच काय ते अशा भ्रामक समजुतीत कोणीही राहू नये. बाबासाहेबांच्या मागे किमान शंभरदीडशे वर्षांची संशोधनपरंपरा आहे. पैलवानाने कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत जाऊन कुस्तीचे धडे घ्यावेत त्याप्रमाणे त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन इतिहासाचे अध्ययन केलेले आहे. त्यांच्या मागे या शेकडो संशोधकांच्या अफाट परिश्रमाची प्रचंड मोठी पुण्याई आहे. बाबासाहेबांच्या स्तुतीपायी पूर्वी ज्यांनी हाडाची काडे करून इतिहास वाचवला, वाण्याच्या दुकानातल्या रद्दी कागदांना खरेदी करुन, बंबाचे सर्पण म्हणून वापरल्या जाणारे कागद वाचवून, माळ्यावर पडलेल्या, उंदराच्या लेंड्या पडलेल्या आणि वाळवीने खाल्लेल्या पोथ्यांतून जमेल तेवढा इतिहास वाचवणार्‍या आणि आपल्यापुढे आणणार्‍या बाकी संशोधकांनाही विसरू नका असे या निमित्ताने कळकळीचे आवाहन आहे.