शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांचे अभिनंदन!
आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले.
शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते...
अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात.
रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे.
मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच.
जर पुरंदर्यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे. प्रतिक्रिया
थँक यू
माझ्या माहितीतला मी एकमेव नाही
अत्यंत बोर नाहि पण बराचसा भाग पल्हाळ वाटतो राजा शिवछत्रपतीचा. श्रीमान योगी पण काहि अंशी तसं आहे (या कादंबरीवर कुरुंदकरांच्या प्रस्तावनेची अनेक पारायणं केली आहेत ) . मृत्युंजय देखील अपवाद नाहि. राधेय मी वाचलं नाहि. महानायक मात्र अवडलं होतं... पण त्याला आता फार वर्षे झाली.
या यादीत 'छावा' पण यायला हवा असं वाटतं :)
पाल्हाळाबद्दल सहमत. त्यामुळेच एका मर्यादेनंतर त्याऐवजी मेहेंदळ्यांचे शिवचरित्रच बरे वाटते. यात 'एका मर्यादेनंतर' हा भाग कळीचा आहे. त्या विषयाची गोडी लागायला मात्र राजा शिवछत्रपतीच पाहिजे.
खरय. नाहिपेक्षा 'राजे तुम्ही नाटकातच का नाहि राहिलात' अशी पु. लं. सारखी आर्त साद घालावी लागली असती.
"श्रीमान योगी" ची प्रस्तावना मला सुद्धा आवडली होती.
छावा सगळा वाचला नाही म्हणून त्याविषयी बोललो नाही.
आबा, छावा जरूर वाचून पुर्ण करा. आवडेल तुम्हाला...
आबा, तुम्ही अगदीच कामातुन गेलेले वाटत नाही तुमच्या लिहीण्याच्या शैलीवरुन.. म्हणुन एक प्रश्न..
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतंआवर्जुन ह्याच धाग्यावर हे का सांगावसं वाटलं?
माझ्या आवडत्या पुस्तकांमध्ये कदाचित हे पुस्तक येणार नाही.
पण ती चर्चा करण्याचा हा धागा नक्कीच नाही. आणि मला बोअर वाटलं असं sweeping generalized statement (इंग्रजीबद्दल आधीच क्षमस्व) करण्याचाही नाही.
तुम्हाला ही पुस्तकं नसतील आवडली. सहज शक्य आहे. प्रसिद्ध पुस्तकं प्रत्येकाला आवडलीच पाहिजेत असा काही नियम नाही आणि त्यावरून कोणाची अभिरुची ठरू नये.
मला वैयक्तिक रित्या कुरुंदकरांनी मांडलेले शिवाजी महाराज फार जबरदस्त वाटतात. कारण त्यामागचा सखोल विचार.
तरीही लहानपणी महाराजांच्या बद्दल गोडी, आदर, अस्मिता निर्माण झाली ती पुरंदरे यांनी लिहिलेल्या "महाराज" या पुस्तकामुळे. ते राजा शिवछत्रपती प्रमाणे कादंबरीवजा नाही आणि त्यात संवाद नाही. काही प्रमाणात सनावळ्यांनी भरलेलं चरित्र आहे. पण माहिती आणि दीनानाथ दलाल यांची चित्रं अप्रतिम आहेत. आता आउट ऑफ प्रिंट असावं.
तुम्ही अगदीच कामातून गेलेले वाटत नाही
... अशी वाक्ये मी काँन्व्हरसेशन स्टार्टर म्हणून वापरत नाही, म्हणजे माझं डोकं तरी ठिकाणावरच असावं असा अंदाज आहे
ओके..
प्रश्न शिताफीने टाळला आहे पण तरी ठिके..
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं
असेच मत श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक या पुस्तकांविषयी सुद्धा आहे>>>
धन्य आहात मग कसली पुस्तकं विंटरेष्टिंग वाटतात तुम्हाला ? राधेय आणि महानायक नै वाचलं बाकीची सगळी पुस्तकं उत्तम . श्रीमान योगी तर लाजवाब .
माझ्यात इतिहासाची गोडी निर्माण करण्याला हे पुस्तक कारणीभूत आहे
बाबासाहेब पुरंदरेंच अभिनंदन
शांत व्हा तुडतुडी :)
मला बोअर झालं, तुम्हाला आवडलं विषय संपला
शिवशाहीर बाबासाहेबांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल विनम्र अभिवादन.
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्यासारखा आयुष्य पणाला लावून शिवचरित्राचा अभ्यास करणारा इतिहासकार उभ्या महाराष्ट्रात झाला नाही आणि होणारही नाही.
आणि देवेंद्र फडणविस आणि महाराष्ट्र शासनाचेदेखील अभिनंदन! कुठल्याही दडपणाला बळी न पडता हा सोहळा दिमाखात पार पाडून दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावयास हवे. राष्ट्रवादी, आव्हाड, ब्रिगेड, आणि इतर उपद्रवी घटकांनी जो तमाशा केला तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे हे नक्की. कित्येक महत्वाचे प्रश्न असतांना एका पुरस्काराच्या सुयोग्य निवडीवरून आकांड-तांडव घालून राष्ट्रवादी पक्षाने नेमके काय साधले त्यांनाच माहित. पवारांचे सगळे फासे उलटे पडत आहेत हे बहुधा त्यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये. ब्राह्मण - मराठा द्वेष याखेरीज बाबासाहेबांना विरोध करण्याचे कुठलेही कारण नव्हते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे. राष्ट्रवादीने गेली १५ वर्षे हेच विघातक आणि समाज तोडण्याचेच राजकारण केलेले आहे. २०-२५ वर्षांपूर्वी जातीय तेढ इतकी नव्हती; राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीय अराजकतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. शिवाय बेसुमार भ्रष्टाचार आणि गुंडगिरी प्रचंड फोफावली हे सांगणे न लगे.
नेमाडे सध्या काहीही बरळत आहेत. त्यांना ज्ञानपीठ कसा मिळाला हेच मला न उलगडलेले कोडे आहे. त्यांच्यातही ब्राह्मण द्वेष ठासून भरलेला आहेच. उलट-सुलट विधाने करणे, कुणावरही कशीही टीका करणे, पुरस्कार स्वीकारतांना मात्र मूग गिळून स्वीकारणे असले आचरट प्रकार नेमाड्यांनी चालवलेले आहेत. असो.
बाबासाहेबांचे पुन:श्च अभिनंदन!
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन!
"राजा शिवछ्त्रपती" ची मी पारायणे केली आहेत आणि जाणता राजा हे महानाट्य पण पाहिले आहे.
ज्यांनी संपूर्ण आयुष्य छ्त्रपती शिवाजी महाराज या दैवताला अर्पण केले, त्या कॄषितुल्य व्यक्तिमत्वाच्या वाटयाला आयुष्याच्या उत्तरार्धात अवहेलना यावी यासारखे दुर्दैव नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात असे व्हायला नको होते.
https://www.youtube.com/watch?v=GtVmIfIgMsc
https://www.youtube.com/watch?v=kSPPAdQjqXU
https://www.youtube.com/watch?v=HKBGoqbmcJs
लोक्स एक लक्षात घ्या.
बाबासाहेबांचे कार्य सुरू कधी झाले? चरित्र कधी लिहिले? १९५५-६० सालच्या आसपास. त्याच्या अगोदर कोणी इतिहासकार नव्हते? लेखकांनी काही कथाकादंबर्या लिहिल्या नव्हत्या?
कुठल्याही युरोपियन भाषेतले पहिले शिवचरित्र म्हणजे १६८८ साली एका फ्रेंचाने लिहिलेले होय. त्यानंतर १६९५ साली पोर्तुगीज भाषेत कॉस्मा द ग्वार्दा याने लिहिलेले शिवचरित्र आहे. त्यानंतर अनेक पुस्तकांत शिवरायांचा उल्लेख आलेला आहे. मराठी बखरी-कागदपत्रे सोडून द्या, मुघलांचे फारसी भाषेतील इतिहास ग्रंथ, उदा. खाफीखानाचा मुन्तखब-उल-लुबाब किंवा भीमसेन सक्सेना याचा तारीख-ए-दिल्कुशा, आदिलशाहीचा इतिहास बसातीन-उस-सलातीन, हफ्त अंजुमन, वगैरे अनेक फारसी ग्रंथ आहेत. इतकेच कशाला, आसाम प्रांतातील आहोम राजसत्तेच्या बखरींमध्येही दोनेक ओळींचा का होईना उल्लेख आहे. आणि या सर्वांनी महाराजांची फक्त निंदाच केलीय असे आजिबात नाही.
पुढे मराठ्यांचा सर्वांत पहिला इतिहास लिहिला तो कीर नामक इंग्रज इतिहासकाराने, १७८२ साली. इंग्रजी सत्ता आल्यावरचा पहिला इतिहास म्हणजे ग्रँट डफचा, तो लिहिला गेला १८२१ साली. त्यातील काही चुका काढणारे पहिले गृहस्थ म्हणजे नीळकंठराव कीर्तने. त्यांच्या त्या निबंधाचे प्रकाशनवर्ष आहे १८६७. तिथून पुढे १९०० सालापर्यंत इतिहासाचार्य राजवाडे, द.बा.पारसनीस, वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई अशी इतिहासकारांची सलग लड लागल्यासारखी होती.
इतकेच नव्हे तर अनेक कादंबरीकार, नाटककार हे शिवकाल-पेशवेकालविषयक कादंबर्या लिहीतच होते पूर्ण १९व्या शतकभर. महात्मा फुल्यांनी शिवजयंतीचा उत्सव प्रथम सुरू केला, त्याला लोकमान्यांनी मोठे स्वरूप दिले व १९०६ साली शिवसमाधी नव्याने बांधून घेतली. हडप नामक कादंबरीकारांनी पूर्ण मराठा इतिहास कव्हर करणार्या पन्नासेक कादंबर्या लिहिल्या. काव्येतिहाससंग्रह नामक मासिकातून १८७०-८० पासून जुन्या मराठी बखरी, पोवाडे वगैरे एकदम भसाभस बाहेर पडत होते. संशोधक जुनी कागदपत्रे तपासायचे आणि प्रकाशित करायचे. अनेक मेळे, समारंभ, इ. च्या माध्यमातून नाटके सादर व्हायची. वासुदेवशास्त्री खरे आणि इतर अनेकांनी तशी कैक नाटके लिहिलेली आहेत. गड आला पण सिंह गेला, कांचनगडची मोहना वगैरे कादंबर्या याच काळाच्या आसपासच्या. त्यातून शिवाजीमहाराजांची एक विशिष्ट इमेज महाराष्ट्रावर हळू हळू दृढपणे ठसत गेली. स्वराज्यासाठी लढणार्या या वीराची कीर्ती इंग्रजी अंमलाच्या काळात पूर्ण भारतभर पसरली. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी 'जयतु शिवाजी' ही कविता लिहिली, त्या प्रांतात शिवाजीउत्सवही साजरा होऊ लागला. (सखाराम गणेश देऊस्कर या गृहस्थांच्या पुढाकाराने) महाराष्ट्राबाहेर अनेक प्रांतांत या काळात (१९०० च्या पुढे, १९३०-५० पर्यंत) शिवचरित्रे लिहिली जाऊ लागली.
तेव्हाच कोल्हापूरला १९३० साली बाळकृष्ण या पंजाबी गृहस्थांनी एक चार खंडी शिवचरित्र लिहिले 'शिवाजी द ग्रेट' या नावाने. ते राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांचे शिवचरित्र त्या काळचे सर्वांत अद्ययावत चरित्र म्हटल्यास हरकत नाही. त्याचा वापर अनेकांनी पुढे केला पण बाळकृष्णांचे नाव फारसे कुणालाच माहिती नाही.
[इंग्रजांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा नेहमीच लुटारू, बंडखोर अशी रंगवलेली नाही हेही जाता जाता सांगतो.]
पुढे रियासतकार सरदेसायांनी बरेच कष्ट घेऊन मराठ्यांचा पूर्ण इतिहास एकटाकी लिहून काढला, जदुनाथ सरकारांनीही एक शिवचरित्र लिहिले. पुढे सुरेंद्रनाथ सेनांनी जे काम केले त्यामुळे पॅन-इंडियन लेव्हलवर मराठ्यांची इमेज पुन्हा एकदा सुधारण्यास मदत झाली, नायतर "शिवाजी चांगला होता पण मराठे लुटारू होते" छाप इमेज खूप रूढ होती.
शिवाय मोडीसाठी राजवाडे, खरे, आणि अजूनही अनेक, फारसीसाठी सेतुमाधवराव पगडी व ग ह खरे, पोर्तुगीजसाठी पांडुरंग पिसुर्लेकर, इंग्रजीसाठी बी जी परांजपे, फ्रेंचसाठी हतळकर व सेन, डचसाठी बाळकृष्ण व वाडेकर, एका पर्स्पेक्टिव्हकरिता त्र्यंबक शंकर शेजवलकर वगैरे असे अनेक संशोधक उदयाला आले.
मी खरे तर अजून अनेकांची नावे वगळली आहेत. मेन उद्देश हाच होता की जणू बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, आणि नेहरूंचा उल्लेख हाच काय तो भारतभर आणि जगभर प्रमाण मानला जायचा, त्यांच्या चुकीच्या इतिहासात सुधारणा करणारे फक्त बाबासाहेबच काय ते अशा भ्रामक समजुतीत कोणीही राहू नये. बाबासाहेबांच्या मागे किमान शंभरदीडशे वर्षांची संशोधनपरंपरा आहे. पैलवानाने कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत जाऊन कुस्तीचे धडे घ्यावेत त्याप्रमाणे त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन इतिहासाचे अध्ययन केलेले आहे. त्यांच्या मागे या शेकडो संशोधकांच्या अफाट परिश्रमाची प्रचंड मोठी पुण्याई आहे.
बाबासाहेबांच्या स्तुतीपायी पूर्वी ज्यांनी हाडाची काडे करून इतिहास वाचवला, वाण्याच्या दुकानातल्या रद्दी कागदांना खरेदी करुन, बंबाचे सर्पण म्हणून वापरल्या जाणारे कागद वाचवून, माळ्यावर पडलेल्या, उंदराच्या लेंड्या पडलेल्या आणि वाळवीने खाल्लेल्या पोथ्यांतून जमेल तेवढा इतिहास वाचवणार्या आणि आपल्यापुढे आणणार्या बाकी संशोधकांनाही विसरू नका असे या निमित्ताने कळकळीचे आवाहन आहे.
अभ्यासपूर्ण अन माहितीपूर्ण प्रतिसाद रे बॅट्या.
तुझ्याएवढा अभ्यास दूरदूरपर्यंत नसला तरी आजवरच्या निरिक्षणांतून माझेही मत तुझ्यासारखेच होते व आहे.
आजवरच्या निरिक्षणांतून माझेही मत तुझ्यासारखेच होते व आहे.धन्यवाद सरजी. लोकांची अतिशयोक्ती पाहून वाईट वाटते. बाबासाहेबांचे कार्य मोठे आहे, पण त्यापायी अगोदरच्यांचा अपमान होता कामा नये. आणि यात फक्त संशोधकच नाहीत तर अनेक लेखक-कवी-नाटककार लोकांचाही तितकाच हातभार लागलेला आहे.
ऑनलाईन दंडवत महाराज :)
(दोघांना - महाराजांना आणि त्यांच्या बद्दल तुमच्या ज्ञानाला)
मस्तं प्रतिसाद!
समतोल आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद !
उलटसुलट मते देणार्यांनी जरूर वाचावा असा !
हे खरेच कुणीतरी सांगायला हवे होते. एका प्रतिसादातच सगळी इतिहासकारांची फळी आपण सांगितलीत. राजवाडे, खरे, सरदेसाई, हडप, पगडी ही नावे, जदुनाथ सरकार आदी प्रभूती ऐकून माहिती होते. त्यांनी केलेल्या अफाट परिश्रमांना खरच तोड नाही.
ह्यांची किमान पाच पुस्तके तरी प्रत्येक इतिहासप्रेमींनी वाचायला हवीत :)
आणि हो, बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, असे नाही; पण जे वातावरण गढूळण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे पुरस्काराचा उदो जास्त झाला असे वाटते.
सहीच रे ब्याट्या.
प्रतिसाद फार आवडला. तुकड्या तुकड्यांमध्ये ही माहिती होती पण एक सलग एवढी तपशीलात जाऊन आज प्रथम च वाचली. धन्यवाद.
'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले.
सर्वसामान्य लोकांना इतर इतिहास संशोधनाबद्दल फारशी माहिती नसते. 'लोकप्रिय पुस्तकाचा लेखकच महान' असे सरस्कटीकरण सहज होते. ते होऊ नये यासाठी हा प्रतिसाद आवडला.
बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या पुरस्काराच्या भाषणात पूर्वसूरींचा उल्लेख केलाच आहे, संशोधनाचे श्रेय त्यांना दिले आहे.
त्यांच्या चरित्र लिहिण्यामागच्या भूमिकेचा उहापोह केला आहे.
वयोमानाने भाषण थोडे विस्कळित आणि किंचित पाल्हाळयुक्त वाटते परंतु आशय समजून घेणे महत्त्वाचे! :)संपूर्ण भाषण इथे ऐकू शकाल.
http://goo.gl/kb2P1H
सहमत, बाबासाहेबांनी कधीही पूर्वसूरींचे ऋण नाकारले नाही.
बाबासाहेबांच्या आधीही अनेक शिवकालविषयक कादंबर्या आणि नाटके तुफान फेमस होती, पण बाबासाहेबांनी ग्रंथ आणि नाट्य अशा दोन्ही स्वरूपात एकहाती जे प्रचारकार्य केले त्याला तोड नाही. त्यामुळे जनतेला त्यांच्या कार्याची महती जास्त भावली. आणि वैसेभी गावस्कर किंवा रणजी हे दोघेही महान असले तरी सध्याच्या पिढीला तेंडुलकर जसा जास्त भावतो तोच न्याय काहीसा इथेही लागू होईलसं वाटतं.
बाकी भाषणाच्या दुव्याकरिता धन्यवाद! नक्की ऐकतो.
+१
'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले.
+१००
इतिहास लालित्यपूर्ण भाषेत पोहोचवणे हे फार कमी इतिहास संशोधकांना जमते (जसे आधुनिक विज्ञान लोकांना समजेल असे सांगणारे वैज्ञानिक-संशोधक विरळा आहेत तसेच हे पण). इतिहास तोच असला तरी तो सद्यकालात लोकाभिमुख करण्याचे ... आणि मुख्य म्हणजे ते काम आपल्या हितसंबंधांना सोईस्कर अशी त्याची मोडतोड न करता करण्याचे.... श्रेय पुरंदरेंना नक्कीच देता येईल.माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्यातील माझ्या मूळ वक्तव्यावर केलेल्या टिपण्णी बाबत लिहीणे (प्रतिसाद माहितीपूर्ण आणि समतोल असल्याने) मी महत्वाचे समजतो...
सर्वप्रथम एक प्रश्न - शिवाजीबद्दल चांगले लिहीणारेच एतद्देशीय आहेत का? तसे असते तर जदुनाथ सरकार ना शिवाजी अँड हिज टाईम या पुस्तकात, अफझलखान वधावरून (शिवाजीचे समर्थन करण्यासाठी) एक परिशिष्ठ का लिहावे लागले असते? त्यात ते शिवाजीचे समर्थन करणार्या अधुनिक सुशिक्षितांचा उल्लेख हा 20th century apologists of the national hero असा करतात... इतकी वेळ का आली असावी? असो.
मी खरे तर अजून अनेकांची नावे वगळली आहेत. मेन उद्देश हाच होता की जणू बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, आणि नेहरूंचा उल्लेख हाच काय तो भारतभर आणि जगभर प्रमाण मानला जायचा, त्यांच्या चुकीच्या इतिहासात सुधारणा करणारे फक्त बाबासाहेबच काय ते अशा भ्रामक समजुतीत कोणीही राहू नये.
बाबासाहेबांना मी इतिहासकार म्हणलेले नाही, त्यांनी सुधारणा केल्या असे देखील म्हणलेले नाही. माझ्या लेखनात आधीच म्हणल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी "गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला.".
त्यावेळचे वातावरण म्हणजे त्यांनी सुरवात केली त्यावेळी १९५५-६० साली जे काही वातावरण होते ते महाराष्ट्र-फ्रेंडली होते असे नव्हे. गांधीहत्येमुळे पश्चिम महाराष्ट्रात होरपळ झाली (आणि हो याबद्दल तुम्हाला हवी असल्यास व्यनिने अधिक लिहीन) नंतर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच जातीयवाद फोफावला होता (त्याचेच एक रूप आत्ता देखील दुर्दैवाने बघावे लागत आहे). त्यात भर म्हणजे नेहरूंचा संयुक्त महाराष्ट्रास विरोध होता. इतका की त्यामुळे सी.डी. देशमुखाने त्या कारणावरून अर्थमंत्रीपदाचा राजीनामा संसदेत दिला... नेहरूभक्त स.का. पाटलांसारखे तर "यावच्चंद्रदिवकरौ" मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार नाही असे म्हणत होते. तरी देखील बाकी इतर अनेक सन्मान्य कारणांमुळे नेहरू हे जनसामान्यांमधे प्रिय होते. ही त्याची पूर्वपिठीका...
तुम्हीच बघत आहात, जी काही नावे तुम्ही वरील प्रतिसादात दिली, ती इतर कुणालाच माहीत नाहीत हे त्यावर आलेल्या प्रतिसादातून समजते - टिळक, काही अंशी महात्मा फुले यांचा अपवाद सोडल्यास... रियासतकार हे अधिक मराठ्यांच्या इतिहासाबद्दल माहीत असतात. बरं जे इतिहासकार असतात त्यांची जनसामान्यांत जाणारी पोच ही मर्यादीत असते. जसे मी आधी कुरंदकरांच्या बाबतीत बोललो. त्यात त्यांचा दोष नसतो पण ती केवळ मर्यादाच असते.
अशा वेळेस माहीत काय असते तर ज्यांना माध्यमांनी ज्यांना मोठे केलेले असते अशी व्यक्तीमत्वे आणि माध्यमांमधील म्होरक्यांना जे काय चांगले - वाईट दाखवून जनमत तयार करायचे असते ती माहिती... "जे जे आचरीतो श्रेष्ठ, ते ते ची दुसरे जन, तो मान्य करतो ते ते, लोकं चालवितात ते" या उक्तीप्रमाणे त्यात नेहरू येतात...
दुसर्या टोकाला विनोद मेहता तसेच त्यांच्याच आउटलूक मध्ये जेम्स लेन्स प्रकरणी आणि त्यावरून तत्कालीन राजकारणावर २००४ साली लिहीताना शिर्षकातच शिवाजीचा उल्लेख "To Chase A Moutain Rat " असा करणार्या स्मृती कोप्पिकर या देखील येतात. गोष्टी बर्याच वेळेस अत्यंत subtle पद्धतीने बिंबवल्या जातात. कधी कधी त्यात अंतस्थ हेतू असतात, जे मी मेहता-कोप्पिकर आणि तत्सम डाव्यांच्या बाबतीत म्हणेन तर कधी कधी इतरांच्या, मग ते कोणिही असोत, लेखनाने / विचाराने influence झालेल्यांचा ज्यात नेहरूंसारखे येतात. नेहरूंनी "Glimpses of world history" मधे केलेले उल्लेख (इतर प्रतिसादात दिले आहेतच) नंतर काढले - भावना दुखावल्या म्हणून नाही तर factually incorrect होते म्हणून. त्यात त्यांचा प्रामाणिकपणाच दिसतो. पण "Discovery of India" मधे तरी देखील "Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism.." असे म्हणलेले आहेच. आता "Hindu Nationalism" हा शब्द अधुनिक काळासाठी नेहरूंमुळे रुढ झाला का हा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल... पण मला सांगा इथे किती जणांना असे म्हणायचे आहे की पुरंदर्यांच्या भाषेत महाराजांनी जो तीन तपे हलकल्लो़ळ केला तो "Hindu nationalism" म्हणून केला?
थोडक्यात, स्वत:च्या इतिहासातील पराक्रमी व्यक्तींचा अभिमान ठेवण्यापासून जनतेला लांब ठेवले तर उत्तम असे काहीसे विचार, भले त्यामागील कारणे प्रामाणिक आणि उद्दात्त असोत, अनेकदा असतात. हे केवळ भारतातच असते असे म्हणायचे नाही. पण असते हे वास्तव असते. त्यातूनच वर जदुनाथांनी वर्णन केलेले apologists तयार होतात.
या संदर्भात तुम्ही आणि इतर कुणाला काय वाटते ते वाटू देत. मला विशेष करून तुमच्या वाटण्याबद्दल आदरच आहे कारण तो इन्फॉर्म्ड विचारातून आलेला आहे. पण माझ्या लेखी, बाबासाहेबांनी जे शाहीरीचे काम केले त्यामुळे अधुनिक महाराष्ट्राला शिवाजी परत एकदा समजला असे म्हणायचे होते, म्हणले आणि अजूनही तेच म्हणेन.
राजा शिवछत्रपती लहान वयात वाचलं नसतं तर इतिहासातल्या इतर व्यक्तींबद्दल जितपत माहिती आणि प्रेम वाटतं तितकंच शिवाजी महाराजांबद्दल वाटलं असतं हे निर्विवाद! आणि माझ्यासारखे अगणित लोक महाराष्ट्रात सापडतील की या पुस्तकांमुळे त्यांच्यासाठी शिवाजी महाराज हा निव्वळ चौथीत अभ्यास करायचा धडा राहिला नाही. तर जिवंत माणसांचा इतिहास बनला. अन्यथा गोव्यात पोर्तुगीजांनी बिचोलीतला संभाजी राजांचा वाडासुद्धा जाळून टाकला, शिवाजी आणि संभाजी राजांच्या विजयांची वर्णने पराभव म्हणून लोकांच्या माथी मारली. महाराष्ट्रात तितके नाही, पण काही प्रमाणात तरी झाले असते.
शिवसेनेची स्थापना होण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते, हा निव्वळ योगायोग नाही.
सर्वप्रथम एक प्रश्न - शिवाजीबद्दल चांगले लिहीणारेच एतद्देशीय आहेत का? तसे असते तर जदुनाथ सरकार ना शिवाजी अँड हिज टाईम या पुस्तकात, अफझलखान वधावरून (शिवाजीचे समर्थन करण्यासाठी) एक परिशिष्ठ का लिहावे लागले असते? त्यात ते शिवाजीचे समर्थन करणार्या अधुनिक सुशिक्षितांचा उल्लेख हा 20th century apologists of the national hero असा करतात... इतकी वेळ का आली असावी? असो.आजिबात नाही. चांगले उल्लेख समकालीन मुघल, इंग्रज आणि पोर्तुगीज साधनांमधूनही आढळतात, उदा. शिवाजी हा अलेक्झांडर + सीझर या दोघांना तुल्यबळ आहे असे एका इंग्रजी पत्रात वाक्य आहे. मुघल इतिहासकार खाफीखान, जो महाराजांची एक काफर म्हणून संभावना करतो तोच असेही लिहितो की शिवाजीने कुरानची प्रत युद्धात कधी हाती लागल्यास सन्मानाने नेहमीच मौलवीकडे सोपवलेली आहे, बायकांचीही विटंबना कधी केली नाही. कॉस्मा द ग्वार्दाच्या चरित्रातही स्तुतिपर वाक्ये आढळतात. हे झाले समकालीन पर्सेप्शनबद्दल. नंतरचे काय? नंतर ग्रँट डफचा इतिहास मुख्यतः शिकवला गेला. त्यातही त्याने महाराजांना फक्त शिव्याच घातलेल्या नाहीत. त्याला मराठ्यांबद्दल साधारणपणे आत्मीयताच होती. पण असे असले तरी मुघलांविरुद्धचा बंडखोर- भले मग तो यशस्वी आणि पर्सनल करिष्मेवाला असला तरी चालेल- ही प्रतिमा बर्यापैकी दृढमूल होती. ओव्हरऑल इतिहासाचा थ्रस्ट असा होता की अगोदर मुघल होते, मग नंतर बर्याच प्रादेशिक सत्ता आल्या आणि प्लासी वगैरे होऊन इंग्रज आले. मराठा इतिहासाला कव्हरेज असायचा पण तितकाही जास्त नाही. शिक्षणाचा प्रसार हळू हळू होत होता आणि अनेक सुशिक्षित लोक हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. हे जास्त काळ खपण्यापैकी नव्हतंच. त्यात अजून एक घटना घडली ती या सर्व गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वाची आहे आणि जिचा उल्लेख कुठेच फारसा मिळत नाही. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावल्यानंतर इंग्रजांनी तिथले सगळे कागदपत्र हलवले ते आज पुणे कँपमधील वास्वानी चौक येथे 'पूना आर्काईव्हज' किंवा 'पेशवे दफ्तर' इथे. जवळपास साडेतीन हजार बैलगाड्या भरून ऐवज हलवला असे वर्णन आहे. आज जवळपास तीन ते चार कोटी मोडी लिपीतील कागदपत्र तिथे आहेत. इतिहासाचा अभ्यास करणार्यांसाठी ही साहजिकच पर्वणी होती. पण 'पूना ब्रॅह्मिन्स' वर खार खाऊन असलेल्या सरकारने ते सर्व आर्काईव्ह देशी संशोधकांना मोस्टलि बॅन केले. राजवाड्यांसारख्यांनाही ते बॅन होते. त्यामुळे त्यांची किती जळाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी गावोगाव हिंडून कागदपत्रे गोळा करण्याचा सपाटा लावला आणि सरकारच्या नावावर टिच्चून भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. [त्यामुळे जदुनाथ सरकार- जे मोठ्या पोझिशनवर होते आणि त्यांच्या सोबत रियासतकार या दोघांना तिथे अॅक्सेस मिळाल्यावर बाकी पुणेकरांची खूप जळाली, त्यामुळे बरीच भांडणे वगैरे झाली पण तो भाग अलाहिदा.] हां तर मूळ मुद्दा असा की असे पेटून मराठ्यांच्या इतिहासाचे अध्ययन करणारा वर्ग जो होता त्यात मुख्यत्वेकरून इंग्रजद्वेष्ट्या ब्राह्मणांचा भरणा होता आणि साहजिकच हिंदू पारंपरिक विचारांचा पगडा त्यांवर जास्त होता. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरले नव्हते, इनफॅक्ट पेशवाई जाऊन पुरती शंभर वर्षेही झाली नव्हती. त्याच्या आठवणी आणि सद्यकालीन दैन्य आणि त्याबद्दलचा राग या सर्व गोष्टींचे मिश्रण त्यांच्या प्रेरणेत दिसते. यांपैकी क्वचितच कोणी युनिव्हर्सिटी प्रोफेसर ऑफ इतिहास होते. बहुतेकजण काहीतरी कामधंदा सांभाळून राष्ट्रकार्य कम छंद म्हणून हे काम करायचे. तस्मात या लोकांचे आणि युनिव्हर्सिटी सिस्टिममध्ये तयार झालेल्या, सरकार-फ्रेंडलि लोकांशी जमणे तसे अवघडच होते. त्यामुळे तसे उद्गार आले असावेत. ब्रिटिश सरकारी विचारधारेत हिंदू नॅशनॅलिझम वगैरेंना स्थान असणे अशक्य होते.
बाबासाहेबांना मी इतिहासकार म्हणलेले नाही, त्यांनी सुधारणा केल्या असे देखील म्हणलेले नाही. माझ्या लेखनात आधीच म्हणल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी "गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला.".माझ्या प्रतिसादात मी हार्डकोअर इतिहासकारांसोबत अनेक कादंबरीकार व नाटककारांचाही उल्लेख केलेला आहे. शिवचरित्र पॉप्युलर करणे हे त्या लोकांनी तसेच अनेक वक्त्यांनी कायम काम सुरूच ठेवले होते. अर्थात सध्याच्या पिढीला बाबासाहेबच दिसतात हेही सत्यच कारण शिवचरित्राशी पहिली ओळखच 'राजा शिवछत्रपती' च्या द्वारे होते अनेकांना. त्यामुळे सध्याच्या पिढीसाठीचा हा सर्वांत मोठा शाहीर आहे यात आजिबात शंका नाही. पण बाबासाहेब 'एकमेव' वगैरे नक्कीच नाहीत. काही प्रतिसादांतून तसे दिसले म्हणून लिहिले, असो. जसे शिवचरित्राचे स्मरण केले जाते तसेच चरित्रकारांचेही स्मरण केले जावे असे वाटते, कारण अनेक प्रतिकूल परिस्थितींमधून या चरित्राची साधने गोळा केलेली आहेत. इनफॅक्ट शिवचरित्राची सर्व साधने कशी अन कुठल्या परिस्थितीत गोळा करून प्रकाशित करण्यात आली याची कथाही शिवचरित्रासारखीच रंजक आहे (त्या त्या क्षेत्रातल्याप्रमाणे).
या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादात शिवरायांबद्दल लिहिले गेलेले नकारात्मक उल्लेख अभिनंदनपर धागा असल्याने टाळायला हवे होते अशी भावना मी व्यक्त केली.
परंतु तसे उल्लेख नसते तर तुझे इतके माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळाले नसते. दुसर्या प्रतिसादातली बरीच माहिती तर प्रथमच वाचायला मिळाली.
शक्य असल्यास शिवकालिन इतिहास संशोधन कसे होत गेले या विषयावर एक लेखमालिका लिहिण्याचे करावे.
वटवाघुळ असं डिट्टेलवार लिहिणार असेल तर त्याच्या प्रत्येक वाक्याला उगीचच विरोध करायला मी तयार आहे. मग निदान आम्हाला असलं काही तरी नवीन वाचायला तरी मिळेल.
अर्थात सध्याच्या पिढीला बाबासाहेबच दिसतात हेही सत्यच कारण शिवचरित्राशी पहिली ओळखच 'राजा शिवछत्रपती' च्या द्वारे होते अनेकांना.
सध्याच्याच कशाला हो, सध्याच्या पिढ्यांच्या बापजाद्यांना पण अशीच ओळख झाली. किंबहूना राजा शिवछत्रपतीच्या वाचण्याआधी देखील बाबासाहेबांची ३ अथवा ७ दिवसांची भाषणे ऐकणे पण अनेकांनी केले त्यातून ओळख झाली. दुसरी ओळख झाली कारण श्रीमानयोगी सारख्या कादंबर्या. पण ते परत वाचनावर भर झाला. मग कधीकधी एखादा सिनेमा, नाटक, बाबासाहेबांच्या कॅसेट्स अथवा शिवाजीच्या गाण्यात आणि त्यात मधे असलेले बाबासाहेबांनी केलेले प्रसंगांचे वर्णन... थोडक्यात सामान्य माणूस इतिहासकाराचा इतिहास वाचू शकत नाही. अगदी रामायण-महाभारत देखील कितीजणांनी वाल्मिकी-व्यासांनी लिहीलेले (अथवा त्याची सगळ्यात अधिकृत प्रत मानले गेलेले खंड) वाचलेले असतात? त्याही पुढे, हॅरी पॉटर हे किती जणांनी वाचले आहे आणि कितीजणांनी नुसते चित्रपट पाहीले आहेत? ;) त्यातलाच हा भाग. गैर नाही, हे वास्तव आहे इतकेच.
त्यामुळे सध्याच्या पिढीसाठीचा हा सर्वांत मोठा शाहीर आहे यात आजिबात शंका नाही. पण बाबासाहेब 'एकमेव' वगैरे नक्कीच नाहीत. काही प्रतिसादांतून तसे दिसले म्हणून लिहिले, असो.
"एकमेव नाहीत" याच्याशी देखील पूर्ण सहमत. माझे देखील तसे म्हणणे नाही. मी काही सद्याच्या संज्ञांमधे, बाबासाहेबभक्त अथवा बाबासाहेबटार्ड नाही... तरी देखील त्यांना मिळालेला सन्मान योग्य वाटला हे नक्की... बाबासाहेबांचे कालचे भाषण ऐकले तर लक्षात येईल की त्यांनी देखील त्याचे भान ठेवत ऐकणार्यांना परत परत त्याची जाणीव करून दिली आहे, की ते एकटेच नाहीत. असो.
सध्याच्याच कशाला हो, सध्याच्या पिढ्यांच्या बापजाद्यांना पण अशीच ओळख झाली. किंबहूना राजा शिवछत्रपतीच्या वाचण्याआधी देखील बाबासाहेबांची ३ अथवा ७ दिवसांची भाषणे ऐकणे पण अनेकांनी केले त्यातून ओळख झाली. दुसरी ओळख झाली कारण श्रीमानयोगी सारख्या कादंबर्या. पण ते परत वाचनावर भर झाला. मग कधीकधी एखादा सिनेमा, नाटक, बाबासाहेबांच्या कॅसेट्स अथवा शिवाजीच्या गाण्यात आणि त्यात मधे असलेले बाबासाहेबांनी केलेले प्रसंगांचे वर्णन... थोडक्यात सामान्य माणूस इतिहासकाराचा इतिहास वाचू शकत नाही. अगदी रामायण-महाभारत देखील कितीजणांनी वाल्मिकी-व्यासांनी लिहीलेले (अथवा त्याची सगळ्यात अधिकृत प्रत मानले गेलेले खंड) वाचलेले असतात? त्याही पुढे, हॅरी पॉटर हे किती जणांनी वाचले आहे आणि कितीजणांनी नुसते चित्रपट पाहीले आहेत? ;) त्यातलाच हा भाग. गैर नाही, हे वास्तव आहे इतकेच.हां हेही आहेच म्हणा. गेल्या दोनेक पिढ्या तरी बाबासाहेब एकदम छा गये हैं. सवालच नाही.
तरी देखील त्यांना मिळालेला सन्मान योग्य वाटला हे नक्की... बाबासाहेबांचे कालचे भाषण ऐकले तर लक्षात येईल की त्यांनी देखील त्याचे भान ठेवत ऐकणार्यांना परत परत त्याची जाणीव करून दिली आहे, की ते एकटेच नाहीत. असो.कमॉन, त्यांना हा पुरस्कार मिळणे हे अगदी उचितच झाले असेच माझेही मत आहे. खुद्द बाबासाहेब पूर्वसूरींचे ऋण कायमच मान्य करतात, फक्त कधी कधी लोक तेच एकमेव असल्याच्या थाटात बोलू लागतो तेव्हा राहावत नाही. आदतसे मजबूर, दुसरे काय? असो.
आत्ता आहेत का? की अजूनही Natives ना बंदी?
नै आता कै बंदी वगैरे नसते. जर तसे कै असते तर लै मोठी न्यूज़ झाली असती. =))
बॅटमॅन साहेब,
बाबासाहेब श्रीकृष्ण नसतील परंतु श्री ज्ञानदेव नक्कीच आहेत.
भगवद्गीता हा मूळ ग्रंथ अपौरुषेय असा आहे( असे माझ्या अल्पमतीप्रमाणे वाटते) परंतु तो सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आणण्याचे अफाट काम श्री ज्ञानेश्वर माउलीनि केले. आता ज्ञानेश्वरी "पाल्हाळीक" आहे "बोअर" आहे असे अनेक लोकांचे मत असू शकते परंतु ज्यांना क्लिष्ट भाषेतील विद्वत्ताप्रचुर ग्रंथ समजत नाहीत अशा आमच्यासारख्या पामरांना समजेल अशा भाषेत आणण्याचे श्रेय श्री ज्ञानेश्वर माउली यांनी केले.
याच धर्तीवर मी म्हणेन मोठे मोठे इतिहासकार होते, आहेत, असतील परंतु छत्रपतींचे चरित्र सोप्या आणी रसाळ भाषेत लिहिणे किंवा व्याख्याने देऊन लोकांची शिवभक्ती जागृत करण्याचे महान काम त्यांनी केले. त्यामुळे अगोदर कोणी आणी किती विद्वत्तापूर्ण काम केले याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही .
(बहुत नृपती ते आले गेले
परी मनाला यदुवर झाला
झाला मंत्र महान याच धर्तीवर )
डॉक्टरसाहेब, पुन्हा एकदा तोच मुद्दा मी कितीवेळा सांगू?
इतिहासकार सगळे सोडून दिले तरी खंडीभर कादंबरीकार, नाटककार आणि कवी व फुटकळ लेखांचे लेखक दाखवता येतील प्री-बाबासाहेब काळात. त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यकृतीही त्या त्या काळात खूप पॉप्युलर होत्या. त्यामुळे लोकांची शिवभक्ती जागृत करण्याचे काम हे बाबासाहेबांच्या अगोदरही खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
अभ्यासपुर्ण माहिती, मान गये बॅटमॅन (उस्ताद) तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक आहात का?
आधीच्या सर्व इतिहासकारांच्या मेहनतीचे कौतुक आहेच. पण कित्येकांची फक्त नांवेच ऐकली होती, पुस्तके वाचनात आली नाहीत (हा माझाही दोष असू शकतो) तर कित्येकांची नांवेही आज तुमच्या लेखातून समजली.
बाबासाहेबांचे असे नाही. शिवजयंतीनिमित्त त्यांची व्याखाने ऐकण्याची, पाहण्याची संधी लाभली आणि शिवाजी महाराज हे, त्या वयातही, आमच्या मनांत 'हिरो' बनून राहिले. आमची बालमने घडविण्याचे, तिन शाह्यांमधून 'महाराष्ट्र राज्य' कोरुन काढणार्या विस्मयकारक शिवाजी महारा़जांबद्दल आदर, अभिमान रुजविण्याचे कार्य, पुस्तके वाचणार्या/ न वाचणार्या प्रत्येक मराठी मुलापर्यंत, तरूणांपर्यंत शिवाजी महाराजांना पोहोचविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. हे आधीच्या सर्व लेखकांपेक्षा 'वेगळे' आहे. त्यामुळे आधीच्या लेखकांचे कार्य कुठेही कमी होत नसले तरी बाबासाहेबांचे कार्य हे त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.
बाबासाहेबांच्या मनांत शिवाजी महाराजांचे स्थान कदाचित देवाच्याच्याही वरचे आहे. 'जाणताराजा'च्या एका कार्यक्रमाप्रसंगी मी त्यांना स्टेजच्या मागे जाऊन भेटलो होतो. त्या वेळी त्यांच्या भोवती, 'मला ह्या विषयावर एकदा तुमच्याशी बोलायचे आहे' प्रकारची माणसे बसली होती. त्या गराड्यातील एकाने 'जाणता राजा' राज्याभिषेकप्रसंगावरच संपविला ह्या बद्दल नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर विशेषत: शेवटच्या कालखंडावर आणि त्यांच्या मृत्यूवर प्रकाश पाडीत नाही ह्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर त्याला उत्तर देताना बाबासाहेबांचे डोळे भरून आल्यासारखे झाले. ते म्हणाले, 'महाराजांचा मृत्यू ही घटनाच मला सहन होत नाही.' हे त्यांचे वाक्य आणि एकूणच 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातील भाव हा एखाद्या आरती संग्रहासारखा आहे. (तरीपण ती कादंबरी मला खुप आवडते). एक लेखक म्हणून लेखनाची, वाचकच्या डोळ्यांसमोर प्रसंग 'उभा' करण्याची, हातोटी विलक्षण आहे. सनावळ्या, तिथी, वार, वेळ ह्यासकट त्या काळची सामाजिक, राजकिय परिस्थिती ह्याचे वर्णन. करूणा, आवेश, तडफ, भिती, आनंद वगैरे वगैरे अनेक भावभावनांचे संमिश्रण ह्याने ओतप्रोत भरलेले 'राजा शिवछत्रपती' हे त्यांचे शिवचरीत्र वाचकाला खिळवून ठेवते. ते इतिहास संशोधक नसतील, त्यांच्या कादंबरीतून 'भाटगिरी' दिसून येत असेल पण त्यांनी आमच्या बाल आणि तरूण मनांत 'शिवाजी महाराज' रुजविले हे नाकारता येणार नाही. आधीच्या समस्त महान लेखकवर्गाने ते केले असे मला वाटत नाही. म्हणूनच मी बाबासाहेबांना 'वेगळे' मानतो.
गेल्यावर्षी, लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशनाप्रसंगी मी हजर राहण्याचे भाग्य मला लाभले. (त्या पर्यटन सहलीचा एक सदस्य होतो) तेंव्हा सलग पांच दिवस बाबासाहेबांचा सहवाल लाभला. त्यांच्याशी व्यक्तीशः भेटण्याचे, बोलण्याचे भाग्य लाभले. वयाच्या ९२व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह, वाणी, स्मरणशक्ती आणि तेज वाखाणण्याजोगे होते. मस्कत मध्ये त्यांचा शिवचरीत्र कथनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून मी अनेक वर्षे प्रयत्न करतो आहे. प्रथम इथल्या महाराष्ट्र मंडळात मी हा प्रस्ताव मांडला तेंव्हा (१९९५) 'हल्ली ते प्रकृती अस्वास्थामुळे असे कार्यक्रम करीत नाहीत' असे तत्कालीन उपाध्यक्षाने सांगून तो प्रस्ताव फेटाळाला. पुढे जाणता राजाच्या निमित्ताने २००२ साली मी भेटून हा माझा विचार मी त्यांना बोलून दाखविला तेंव्हा ते आनंदाने तयार झाले. त्यावर त्यांच्या 'प्रकृती अस्वास्थाचा' मुद्दा काढल्यावर ते म्हणाले, 'अहो, कोणी न कोणी हितशत्रू अशा अफवा उठवत असतात. पण माझी प्रकृती ठणठणीत आहे. मी येईन.' खरं पाहता, महाराष्ट्र मंडळात माझा प्रस्ताव नाकारला जाण्यात इथलंच अंतर्गत राजकारण होतं हे मला नंतर कळलं. असो. आत्ता गेल्यावर्षी पुन्हा प्रत्यक्ष भेटीत मी हा विषय काढल्यावर तो ९२ वर्षीय शिवभक्त पुन्हा चटकन तयार झाला. मस्कतात येऊन मी हा प्रस्ताव पुन्हा एकदा महाराष्ट्र मंडळाकडे माझ्या मित्राकरवी पाठविला (आता मी मंडळाचा सभासद नाहीये) बाबासाहेबांच्या सेक्रेटरीचे नांव पत्ता सर्व दिले मंडळाचा सेक्रेटरी त्यांना जाऊन भेटला १ मे रोजी कार्यक्रम ठरला सुद्धा. अशंतः स्पॉन्सरशिपसुद्धा मी स्वतःहून देऊ केली. पण पुन्हा कुठेतरी माशी शिंकली आणि कार्यक्रम बारगळला. असे का झाले, असे माझ्या मित्राला विचारल्यावर त्यालाही उत्तर देता येईना. वरून नाही म्हंटले आहे एव्हढेच तो सांगू शकला. म्हणजे पुन्हा स्थानिक 'राजकारण' आड आले.
माझ्या प्रतिसादातील उत्तरार्ध मुळ विषयाला सोडून आहे पण अजूनही मराठी माणसे शिवाजी महाराजांबद्दल, इतिहासाबद्दल किती उदासीन आहेत आणि वर्तमानातही 'मी' ला चिकटून आहेत हे दिसून येते. असो.
[इंग्रजांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा नेहमीच लुटारू, बंडखोर अशी रंगवलेली नाही हेही जाता जाता सांगतो.]
ही नवीन माहीती मिळाली
या वाद प्रतिवादांमधून छान माहिती मिळत आहे.
वाईट एवढंच की हे सगळं अभिनंदनपर धाग्यामध्ये नको होतं. यासाठी एक छानसा धागा काढता आला असता. असंही बरेच माहितीपूर्ण प्रतिसाद कुठंतरी धाग्याच्या आत दडपले जातात.
अर्थात धागाकर्त्यानं आपल्या हिंदुत्ववादी आणि गौरवशाली इतिहासाची परंपरा असल्याचं कोंदण लावून धागा काढल्यानं हे असं होणं थोडंसं स्वाभाविक आहे. ;)
बाबासाहेब पुरंदर्यांच्या जीवनकार्याचा गौरव झालेला बघुन खुप आनंद झाला.
बाकी जळजळ ब्रिगेड, इथे अत्यंत टाकाउ दर्जाचे जातीयवादी लिखाण करणार्यांकडे एक एक जहाज इनो पाठवण्यात यावे हि महाराष्ट्र सरकारला विनंती. तसचं त्यांच्या वेडकर, दरिद्री भोकाटे वगैरे खुनशी लोकांना विचारठणठणपाळभुषण पुरस्कार देण्यात यावाचं.
मृत्युंजय वगैरे