✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दहा रूपयांची सत्ता

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 11/13/2014 - 18:10  ·  लेख
लेख
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास? उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता. इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य! असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं. मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं. स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला. मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल? बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत मॅडम." स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है". मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती. मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही. चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला. मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती. पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी! * अन्यत्र पूर्वप्रकाशित
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
16561 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

आपल्या लेखातून आपण जे काम

असंका
Fri, 11/14/2014 - 12:30 नवीन
आपल्या लेखातून आपण जे काम करतो त्याची जाहिरात होऊ नये हा आपला हेतू आहे हे आपणच मागे एकदा स्पष्ट केले होते. पण त्यामुळे, आपले लेख वाचताना एक प्रकारचे अधांतरीपण येते. ज्याला इंग्रजीत premise म्हणतात ते अजिबातच कळत नाही. म्हणजे आपल्याला हा हा अनुभव आला हे ठिक आहे, पण मुळात अशा आडबाजूला आपण का गेला होतात हे न कळल्यामुळे सतत एक 'ब्लँक' दिसत रहातो. मात्र आपण म्हणता तशी गोष्ट मलाही अनुभवायला आली होती. मीही एकदा एकट्यासाठी सर्व प्रवाशांचं भाडं भरून जीप सोडायला लावली होती. (त्या आडबाजूच्या गावात पोचायलाच मला ३ वाजले होते आणि मला ऑफीसची वेळ गाठायची घाई होती.) जीप सुटते म्ह्णल्यावर लोक भराभर जमा झाले. जीप जवळजवळ भरलीपण. तरीही मी ठरल्याप्रमाणे आठ लोकांचं भाडं त्याला दिलं. शेवटी मी एक्ष्ट्रा पैसे देत अस्ल्याने त्याला त्याचा नेहेमीचा शेवटचा थांबा सोडून पार मला हव्या असलेल्या दारात जायला लावले. त्यानेही आनंदाने नेले. शिवाय बसताना आपण म्हणता तसं बहुतेक मी एकटाच होतो पुढच्या सीटवर. सत्ता, म्हणण्यापेक्षा किती सहजपणे हे सगळं झालं, एवढेच मला जाणवले होते त्यावेळी. त्याला सत्ता म्हणता येइल का, हे सांगणे तसे अवघड आहे. शेवटी तो व्यवहार होता.
  • Log in or register to post comments

मुळात अशा आडबाजूला मी का जाते

आतिवास
Mon, 11/17/2014 - 15:01 नवीन
मुळात अशा आडबाजूला मी का जाते? तर कामासाठी! पण त्या कामाबद्दल मला पुरेसं लिहावं लागतं - तोही कामाचा एक भाग असतो. तेच पुन्हा इथं लिहायचं तर मला कंटाळा येईल, म्हणून लिहीत नाही. कधीतरी माझ्या कार्यक्षेत्रातली एखादी घटना सविस्तर लिहीन इथं 'मिपा'वरही. पण ते पुरेसं कंटाळवाणं वाटेल वाचकांना याची मला खात्री आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सुरेख लेख

पैसा
Fri, 11/14/2014 - 12:43 नवीन
पुन्हा वाचतानाही तेवढाच आवडला. दर वेळी आपल्या नकळत अशी सत्तेची भावना येत असेल का? मला तसे वाटत नाही. अनेक कारणे असू शकतात. पण हीसुद्धा एक शक्यता मोठ्या प्रमाणात असावी याच्याशी सहमत आहे. पैशाम्ची किंमत प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. रोजचा खर्च हजारांत असणारेही असतात तसे एक हजार रुपयात महिनाभर संसार चालवणारेही असतात. उत्तर भारतात आणि बंगालात रेल्वेमधे चहा पिऊन जे कुल्हड आपण फेकून देतो, तेच इकडे फॅन्सी वस्तू म्हणून अवाच्या सवा किंमत देऊन विकत घेतो. हॉटेलमधे जेवणाचे बिल ५ हजार करताना काही वाटत नाही, पण एखाद्या संस्थेला मदत करताना तीच ५ हजाराची रक्कम मोठी वाटते. आणखी कोणाला तीच रक्कम जीव वाचवणारीही ठरू शकते. सगळं व्यक्तीसापेक्ष आहे शेवट.
  • Log in or register to post comments

छान लेख.

मराठी_माणूस
Fri, 11/14/2014 - 13:06 नवीन
छान लेख. लेखात तुम्ही खालील प्रश्न विचारला आहे
सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?
त्याचे उत्तर तुमच्याच लेखात दडलेले आहे, ते म्हणजे
आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.
ह्याची जाणीव प्रत्येकाने सदैव ठेवली तर सत्तेची उर्मी टाळता येईल
  • Log in or register to post comments

हं!

आतिवास
Fri, 11/14/2014 - 17:28 नवीन
ह्याची जाणीव प्रत्येकाने सदैव ठेवली तर सत्तेची उर्मी टाळता येईल
पण हेच तर अवघड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

लेख सुरेख आहे.

मृत्युन्जय
Fri, 11/14/2014 - 13:06 नवीन
लेख सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

असे अनुभव...

माधुरी विनायक
Fri, 11/14/2014 - 14:44 नवीन
असे अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. निव्वळ पोपटपंची किंवा शब्दबंबाळ भाषणबाजीपेक्षा असे प्रत्यक्ष अनुभव खूप काही शिकवून आणि एखाद्या गोष्टीकडे, प्रसंगाकडे बघायची नवी दृष्टी देऊन जातात...
  • Log in or register to post comments

माझाही अनुभव

धर्मराजमुटके
Fri, 11/14/2014 - 15:03 नवीन
मी ही असेच एकदा पैसे देऊन प्रवासाचे सुख विकत घेण्याचे ठरविले आणी त्याप्रमाणे जीपवाल्याला तीन सीटचे पैसे जादा देण्याची ऑफर दिली तर जीपवाला मला म्हणाला तुमचे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. एकडे लोकांना एक गाडी सुटली की पुढची गाडी १ तासाने येईल की २ तासाने ते माहित नसतं. त्यांचा वेळ हा वेळ नाही काय ? मी रस्त्याने जोपण हात करेन त्याला घेऊनच जाणार. तुम्हाला बसायचं तर बसा. तेव्हापासून मी असे विकतचे सुख विकत घेण्याचा विचार करत नाही.
  • Log in or register to post comments

काही ठिकाणं अशी आहेत की तिथं

आतिवास
Fri, 11/14/2014 - 17:24 नवीन
काही ठिकाणं अशी आहेत की तिथं खाजगी वाहनांची वारंवारिता कमी असते. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो अनुभव मीही घेतलाय. शिवाय एकाच शहरात प्रवास करणं आणि एका गावातून दुस-या गावात प्रवास करणं - अशाही वेळी वाहनचालकांची वागणूक वेगळी असते असा अनुभव आहे. शिवाय एखाद्या परक्या व्यक्तीसाठी स्थानिकांना न दुखावणे यात व्यावहारिक शहाणपण जास्त आहे. अशा वेळी आपल्याला काही पर्यायच नसतो आहे त्या व्यवस्थेला शरण जाण्याविना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पर्यायच नसतो आहे त्या व्यवस्थेला शरण जाण्याविना!

धर्मराजमुटके
Sat, 11/15/2014 - 00:18 नवीन
थोडीसी दुरुस्ती. मी तर म्हणेन अशा व्यवस्थेत स्वतःला आनंदाने गुंफून घ्यावे. बर्‍याचदा आपण समजतो तितकी ती परिस्थीती कठीण नसते. मात्र काही वेळा फक्त स्त्रियांना अनुभवायास येणार्‍या दु:खांबद्दल मला व्यक्तीशः दिलगीरी वाटते. तेव्हा वाटेल॑ ती किंमत मोजून आपली सुरक्षीतता विकत घ्यावी याबाबत दुमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

+१

आतिवास
Sat, 11/15/2014 - 15:52 नवीन
सहमत आहे. कदाचित फक्त स्त्रियांची गर्दी असलेल्या वाहनातून प्रवास करताना मी काही 'अधिक' विकत घेण्याचा प्रयत्न करणार नाही. मुंबईची लोकल, दिल्लीची मेट्रो, लाल एसटीत दोन जागांवर तिसरीला सामावून घेणं - या गोष्टी सहजतेने होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आपला अनुभव वाचल्यावर शराबी

श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 23:56 नवीन
आपला अनुभव वाचल्यावर शराबी चित्रपटातील जयाप्रदाच्या नृत्यासाठी संपूर्ण सभागृह एकट्यासाठी आरक्षित करणार्‍या अमिताभची आठवण आली. बाकी अनुभव सुंदर!
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी

गजानन५९
Sat, 11/15/2014 - 17:09 नवीन
खूप दिवसांनी असा निवांत आणि डोक्यात घुसणारा लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. अवांतर - माई मोड ओन ‘ अरे गुरुजी लेखाचा विषय काय आणि तू उदाहरण काय देतोस’ मी मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सुरेख!

सुधीर
Sat, 11/15/2014 - 10:26 नवीन
लेख आवडला. साचेबद्ध आयुष्य जगणार्‍या माझ्यासारख्या माणसाला तुमच्या वेगवेगळ्या अनुभव समृद्धीच्या खजिन्याचा हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. म्हणूनच मालकीहक्क

प्यारे१
Sat, 11/15/2014 - 13:06 नवीन
लेख आवडला. म्हणूनच मालकीहक्क दाखवण्यापेक्षा विश्वस्त ही भूमिका जास्त वठवण्यासाठी महत्त्वाची वाटते.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती.

प्यारे१
Sat, 11/15/2014 - 13:06 नवीन
म्हणूनच मालकीहक्क दाखवण्यापेक्षा विश्वस्त ही भूमिका वठवण्यासाठी जास्त महत्त्वाची वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लेख

तिमा
Sat, 11/15/2014 - 13:18 नवीन
लेख नेहमीप्रमाणेच आवडला. पण लेख वाचल्यावर एक आठवण झाली. मुंबई-पुणे प्रवासात असेच एक्स्ट्रॉ रिझर्व्हेशन करुन आरामशीर प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. पण अप-डाऊन करणार्‍यांच्या दादागिरीपुढे काही चालले नाही, उलट खास 'पुणेरी मुक्ताफळे' ऐकावी लागली.
  • Log in or register to post comments

पैसे मिळवताना सत्तेची ही

मारवा
Sat, 11/15/2014 - 21:57 नवीन
पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?
  • Log in or register to post comments

सत्तेची उर्मी आपल्याला टाळता येईल का ? हाच मोठा प्रश्न आहे

मारवा
Sat, 11/15/2014 - 22:05 नवीन
हा प्रश्न मोठा मार्मिक आहे पैसा पद आदि चा पाठलाग हा मुळात सत्ताकांक्षे ची च प्रेरणा आहे यात फार तथ्य आहे. गंमत अध्यात्मिक पारलौकिक क्षेत्रातहि अशीच सत्तेची आकांक्षा दिसते. ती मोठ ग्लोरीफाय होउन येते सटल असते मात्र असते तीच सत्तेची ओढ बाहेरच्या जगाचा पुर्ण त्याग केलेले आंतरीक जगातली पदे मिळवण्याच्या मागे लागतात. गुरु च्या अधिक जवळचे, समाधी च्या अ‍ॅडव्हान्स टप्प्यावरचे, विशेष कृपा झालेले, चोजन फ्यु इ.इ. जो माणुस बाहेर एक एक पद चढु पाहण्याची धडपड करतो तीच धडपड परत इथे सुरु फक्त दिशा स्वरुप बदललेल शॅलो एम्प्टी माइंड परत परत तेच तेच फक्त दिशा व स्वरुप बदलते. स्वामी विवेकानंदाच्या पत्रांमध्ये बघा कायम पैसा जमविण्याची सतत व्याकुळ धडपड मिशन च्या कामासाठी, प्रचारासाठी, महान भारतीय संस्कृती साठी. गुरुसाठी सगळ ठिकच आहे पण परत परत तेच ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

हे जरा व्यवस्थित मांडता येईल

प्यारे१
Sat, 11/15/2014 - 22:15 नवीन
हे जरा व्यवस्थित मांडता येईल काय? नक्की काय म्हणायचंय ते समजलं नाही म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

+१ आणि -१

आतिवास
Sun, 11/16/2014 - 14:45 नवीन
तथाकथित अध्यात्म क्षेत्रातही सत्तेचा हा 'सूक्ष्म' खेळ पाहायला मिळतो - कधीकधी तो उबग आणण्याइतपत उघड असतो याच्याशी सहमत. पण विवेकानंदांची ४०० पानांची पत्रं वाचून तुम्हाला जे वाटलं त्याच्याशी मात्र मी असहमत आहे. अर्थात लेखाचा विषय 'विवेकानंद' नसल्याने अवांतर नको म्हणून थांबते. तुम्ही वेगळा धागा काढा या विषयावर, मग कदाचित लिहीन. पण हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न असतो त्यामुळे त्यावर काथ्या कुटण्यात मला फारसं स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मला मारवा ह्यांच्या

प्यारे१
Sun, 11/16/2014 - 14:59 नवीन
मला मारवा ह्यांच्या प्रतिसादातून जे समजलं त्यानुसार सत्तेचा खेळ हा बाह्य नसून अंतरंगातला आहे. आखाड्याचे महाराज सत्तेसाठी उघड उघड स्पर्धा करणं हे तर आहेच आणि त्याचा उबगही येणं साहजिकच आहे. योगी, महाराज, साधू, साध्वी म्हणवणारे आमदार खासदार मंत्री असलेले पाहताना त्यातला विरोध चीडच आणतो पण मारवा ह्यांचा प्रतिसाद काहीसा वेगळा वाटतोय. म्हणूनच त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते विचारलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

खुप छान लिहिलेत

vikramaditya
Sat, 11/15/2014 - 22:12 नवीन
बहुतेक वेळा पैसा स्वःताबरोबर अनेक वाइट गोष्टी आणतो. विषय फार गहन आहे. प्रतिक्रिया पण चांगल्या आल्या.
  • Log in or register to post comments

व्वा!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/16/2014 - 11:57 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Mon, 11/17/2014 - 15:02 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

'सत्ता' नव्हे 'सोय'.

प्रभाकर पेठकर
Tue, 11/18/2014 - 10:24 नवीन
लेखात वापरलेला 'सत्ता' हा, नकारात्मक छटा असणारा, शब्द अयोग्य वाटतो. इथे 'सोय', स्त्रियांच्या बाबतीत 'सुरक्षितता' हे शब्द जास्त योग्य आहेत. मुंबई सारख्या शहरातही गाड्यांना प्रथमवर्ग, द्वितीयवर्ग, वातानुकुलीत वर्ग असे चढत्या क्रमाचे वर्ग तुमच्या सोयीसाठी असतात. रस्त्यातूनही साधी बस, वातानुकुलीत बस, टॅक्सी, रिक्क्षा आणि पायी प्रवास असे अनेक प्रकार आपण रोजच्या आयुष्यात शहरातही अनुभवत असतो. आपल्या सोयी नुसार ह्या सुखांचा वापर केला जातो. कमी गर्दी, स्वच्छता, आसनव्यवस्था आणि आपला वेळ ह्या गोष्टी आपली 'खरेदीक्षमता' जोखून आपण वापरत असतो. दोन ठिकाणांमध्ये करावयाच्या प्रवासाचा वेळ ही सोय, उभे राहून की बसून प्रवास करायचा ही शारीरिक क्षमते संबंधी सोय, उकाड्यातली गर्दीतली घुसमट टाळण्याची सोय आदी सोयी आपण आपल्या ताकदीनुसार पाहात असतो. त्यात 'सत्ता' हा विचार नसतो. जिथून बस सुटते तिथून प्रवास सुरु होणार असेल आणि माझ्या जवळ भरपूर वेळ असेल तर मी टॅक्सीने जात नाही. बसनेच प्रवास करतो. कारण माझी सोय भागत असते. रिकामी बस सोडून मी टॅक्सीने प्रवास केला तर तीथे सत्तेची भावना प्रबळ आहे असे म्हणता येईल. रोजच्या घर ते कचेरीच्या अंतरात सायकल आणि मोटरसायकल दोन्हीचा वापर शक्य असू शकतो. पण सायकलचालविताना होणारे शारीरिक श्रम, घामाघूम अवस्था कचेरीत पोहोचल्यावर माझ्यात त्राण उरणार नसतील तर मोटरसायकलच मला जास्त 'सोयी'ची आहे. समाजात (जगात कुठेही) वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोकं राहात असतात. जी एखाद्याची चैन असते तीच दुसर्‍याची मूलभूत गरज असू शकते. सर्वांना एकाच पातळीवर आणणं शक्य आहे का? प्रत्येक जण शिक्षण, उच्च शिक्षण, व्यवसायभिमुख शिक्षण घेत असतो. का? आपला आर्थिक स्तर वाढावा आणि जास्त सुखासीन आयुष्य जगता यावं. ह्या अवस्थेसाठी कोणी बौद्धीक (शिक्षण) क्षमता वापरतो तर कोणी शारीरिक (श्रमाची कामे) क्षमता वापरतो. एकाचे काम दूसर्‍यासाठी अवघड असते. सायकल रिक्षा किंवा ताकदीने ओढलेली रिक्षा ह्यात बसताना अपराधी वाटतं ही गोष्ट खरी आहे. कारण आपण पैशांकडे 'सत्ता', 'माज' अशा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहात नसतो. आपल्या स्वभावात ते नसतं. आपण संवेदनशील असतो. दुसर्‍याने आपल्या प्रवासाच्या सोयीसाठी घेतलेल्या श्रमांची आपल्याला जाणीव असते. म्हणूनच ती एक 'सोय' असते. सत्तेचा माज असता तर असे विचार आपल्या मनांत येणार नाहीत.
  • Log in or register to post comments

हेही योग्यच आहे.

एस
Tue, 11/18/2014 - 19:09 नवीन
हाही दृष्टिकोन पटण्यासारखा आहे. त्याच गोष्टीकडे पाहण्याची प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी किंवा सापेक्ष असू शकते. पण डोळे फिरतील एवढा विरोधाभास मात्र नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सत्ता या शब्दाबाबत आपल्यापैकी

आतिवास
Wed, 11/19/2014 - 01:32 नवीन
सत्ता या शब्दाबाबत आपल्यापैकी अनेकांचा अनुभव बराच नकारात्मक असतो, पण सत्ता तशी सर्वत्र असते (फक्त राजकीय नाही). अनेकदा आपल्याला ती नको असली तरी आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी जास्त असल्याने ती सत्ता मिळते. मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले असं म्हटलं आहे मी, पण त्याचा परिणाम म्हणून इतरांपेक्षा विशेष सोय मला मिळवता आली - तीही एका अर्थी सत्ता आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मुलभुत प्रश्न

मराठी_माणूस
Wed, 11/19/2014 - 15:55 नवीन
एक मुलभुत प्रश्नः जिथे पैसे देउन रांग न लावता झटकन दर्शन घेता येते तेथे खरच देव असतो का ?
  • Log in or register to post comments

देव असतो का

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 17:32 नवीन
खरच देव असतो का
हा मुलभूत प्रश्न आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

त्याचं उत्तर आम्हांला समजलेलं

बॅटमॅन
Wed, 11/19/2014 - 17:48 नवीन
त्याचं उत्तर आम्हांला समजलेलं नाही, परंतु होकारार्थी उत्तर देणारे संशोधन एका गणितज्ञाने प्रसिद्ध केलेय बॉ. पाश्चिमात्य असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर कुणी संशयही घेत नाही. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

झीट

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 18:58 नवीन
बॅटमुनी , त्या इक्वेशन पाहून झीट येउन पडलो आणि गुमानपणे देव हाये म्हणला .. २-४ पोरांना दाखवल्याबरोबर त्यांनी पण वाद न घालता देव आहे हे मान्य केलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुलभुत प्रश्नानिमित्त मुलभुत

प्यारे१
Wed, 11/19/2014 - 19:22 नवीन
मुलभुत प्रश्नानिमित्त मुलभुत प्रश्नः देव नक्की कुणाला म्हणायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा