✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाचता वाचता वाढे.....

प
पुस्तकमित्र यांनी
Mon, 06/30/2014 - 21:15  ·  लेख
लेख
a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
231776 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

मला वाटते काल्पनिकतेवर

विकास
गुरुवार, 07/03/2014 - 21:20 नवीन
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद.

प्रचेतस
गुरुवार, 07/03/2014 - 21:49 नवीन
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ययाति केवळ कादंबरी म्हणून

कवितानागेश
गुरुवार, 07/03/2014 - 22:19 नवीन
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी !

सस्नेह
गुरुवार, 07/03/2014 - 22:31 नवीन
१०१ टक्के सहमत ! मूळ संहिता अधिक रोचक अन नाट्यमय वाटते या कादंबरीकरणापेक्षा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाचतेय प्रतिसाद.

कवितानागेश
गुरुवार, 07/03/2014 - 18:51 नवीन
पुढे एक-एक थीम लॉर्ड ऑफ द रिन्ग्ज आणि हॅरी पॉटरवरही घेता येइल. :)
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/03/2014 - 19:08 नवीन
शुभेच्छा. जमेल तसेल लिहिनच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाचन वारसा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/03/2014 - 20:01 नवीन
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला काका.

प्रचेतस
गुरुवार, 07/03/2014 - 20:29 नवीन
प्रतिसाद आवडला काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मर्मभेद

सस्नेह
गुरुवार, 07/03/2014 - 22:07 नवीन
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.
  • Log in or register to post comments

मर्मभेद वाचले आहे. तुम्ही

प्रसाद१९७१
Fri, 07/04/2014 - 10:47 नवीन
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

शशी भागवत

कपिलमुनी
Fri, 07/04/2014 - 20:41 नवीन
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

प्रकाश नारायण संत माझे अत्यंत

अजया
गुरुवार, 07/03/2014 - 22:12 नवीन
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Fri, 07/04/2014 - 00:17 नवीन
लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं!
तंतोतंत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

+२८३०

प्यारे१
Sat, 07/05/2014 - 16:05 नवीन
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

राजा शिवछत्रपती.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/04/2014 - 01:53 नवीन
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.
  • Log in or register to post comments

+१

सखी
Fri, 07/04/2014 - 03:05 नवीन
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/04/2014 - 10:27 नवीन
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

पेठकरकाका,

सौंदाळा
Fri, 07/04/2014 - 12:22 नवीन
पेठकरकाका, तुमच्याकडुन बाबासाहेबांच्या मस्कत भाषणाच्या लेखाची / दौर्‍याची आतुरतेने वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मस्त पोस्ट.

यशोधरा
Fri, 07/04/2014 - 10:32 नवीन
मस्त पोस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

राजा शिवछत्रपती मध्ये काही

एसमाळी
Fri, 07/04/2014 - 17:09 नवीन
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उदा?

आदूबाळ
Fri, 07/04/2014 - 17:21 नवीन
उदा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एसमाळी

प्रत्यक्ष शिवकालासंबंधी

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 17:44 नवीन
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

राँग, फादर.

आदूबाळ
Fri, 07/04/2014 - 18:36 नवीन
राँग, फादर. एसमाळी यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऊप्स माय ब्याड. स्वारी.

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 18:41 नवीन
ऊप्स माय ब्याड. स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

"गौरी देशपांडे" च्या मुलीचे

प्रसाद१९७१
Fri, 07/04/2014 - 10:45 नवीन
"गौरी देशपांडे" च्या मुलीचे पुस्तक वाचले. मराठी अनुवादाचे नाव "खोटे सांगेन" असा होता. कोणाला आवडले आहे का? मला तर भीषण वाटले.
  • Log in or register to post comments

रंग सुखाचे

धन्या
Fri, 07/04/2014 - 11:00 नवीन
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.
  • Log in or register to post comments

वाचनीय पुस्तके

स्नेहल महेश
Fri, 07/04/2014 - 11:52 नवीन
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची
  • Log in or register to post comments

रारंग ढांग

मनिष
Fri, 07/04/2014 - 12:33 नवीन
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे! रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7
  • Log in or register to post comments

+१

एस
Fri, 07/04/2014 - 15:39 नवीन
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

रारंग ढांग

सखी
गुरुवार, 07/10/2014 - 15:25 नवीन
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

रारंग ढांगं नंतर

सखी
Sun, 07/13/2014 - 08:22 नवीन
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

उपक्रम

मनिष
Fri, 07/04/2014 - 12:36 नवीन
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P
  • Log in or register to post comments

द रोड

स्पा
Fri, 07/04/2014 - 13:07 नवीन
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय
  • Log in or register to post comments

हे वाचावे लागेल..धन्यवाद स्पा

मनिष
Fri, 07/04/2014 - 14:45 नवीन
हे वाचावे लागेल..धन्यवाद स्पा. बुकगंगा वर झलक वाचली, पण भाषांतर थोडे जड जातेय. मुळ कादंबरी मिळते का कुठे शोधली पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बहुत धन्यवाद.

आदूबाळ
Fri, 07/04/2014 - 17:25 नवीन
बहुत धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

"पर्व"

स्पा
Fri, 07/04/2014 - 13:08 नवीन
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही
  • Log in or register to post comments

वाचावी लागेल...!!!

Gayatri Muley
Fri, 07/04/2014 - 14:37 नवीन
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मनिष, स्पा मस्त पोस्ट्स!

यशोधरा
Fri, 07/04/2014 - 13:50 नवीन
मनिष, स्पा मस्त पोस्ट्स! :)
  • Log in or register to post comments

प्रदीप लोखंडे, पुणे १३

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 15:37 नवीन
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.
  • Log in or register to post comments

शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 15:41 नवीन
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.
  • Log in or register to post comments

तराळ अंतराळ - शंकरराव खरात

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 15:46 नवीन
तराळ अंतराळ - शंकरराव खरात आत्मचरित्र - त्यावेळच्या समाजस्थिचे भेदक चित्रण
  • Log in or register to post comments

झाडाझडती - विश्वास पाटील

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 15:53 नवीन
झाडाझडती - विश्वास पाटील खिळवून ठेवणारी कादंबरी. धरणे, त्याभोवतीचे राजकारण, अभागी धरणग्रस्त - पानीपतकारांनी इथे पण कमाल केली आहे. चुकवू नये अशी कादंबरी.
  • Log in or register to post comments

आमदार सौभाग्यवती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/04/2014 - 16:49 नवीन
कादंब-या वाचन अनेक झालं पण बरेच विसरल्याही जाते. मला शिकत असतांना आणि शिकवायलाही ब-याच कादंब-या असतात. ग्रामीण दलित असं तर बरच साहित्य. व्यंकटेश माडगुळकर. शंकर पाटील, रणजीत देसाई, उद्धव शेळके, ना.धो. महानोर आनंद यादव अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, भालचंद्र नेमाडे, असे बरेच..स्त्री-पुरुष आत्मकथने असं बर्रच आठवतं. बनगरवाडी एक मास्तराची कथा तर केवळ सुंदर, उद्धव शेळक्यांची धग, महानोरांची गांधारी, असे कितीतरी आठवतं. रा.रं.बोराड्यांच्या चारापाणी, सावट्, आमदार सौभाग्यवती. गांधारी. गांधारी ही निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतर खेड्याने कसे नवे रुप धारण केले, हे महानोरांनी गांधारीत अतिशय सुरेख टीपलं आहे. वाचता वाचता वाढे... साठी. मी घेतलाय रा.रं.बोराड्यांची 'आमदार सौभाग्यवती'ही कादंबरी. याच कादंबरीवर पुढे अनेक नाटकांचे प्रयोग झालेत. राजकारणात स्त्रीला संधी मिळाली तर ती निश्चितपणे जनतेल न्याय देऊ शकते. 'आमदार सौभाग्यवती मधील सुमित्रा हे सिद्ध करुन दाखवते. दोन मुलं, एक दीपक एक मुलगी दीपा आणि राजकारणी नवरा, असं हे कुटुंब. चिमणरावांचं आमदारकीचं तिकिट मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणारा नेता म्हणुन चर्चा होत असते आणि विद्यमान मुख्यमंत्र्याकडून त्यांचं तिकिट कापल्या जातं. मुलाला किंवा पत्नीला तिकिट देऊ असे धोरण पक्षश्रेष्टी घेते आणि मग मुलाला राजकारणात काही इंट्रेष्ट असत नाही. सुमित्रा मग पुढे येते. समाजात पुरुष म्हणुन स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी आणि स्त्री घराबाहेर पडली की पुरुषांचे आडवे येणारे अहंकार. घ्ररातुनच सुमित्राचे चारित्र्यहनन होते, तिच्या बाहेर फिरण्याच्या कारणावरुन तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात. राजकारणात सुमित्रा आमदार होते आणि तिला घर सोडावं लागतं, अशी एक सुंदर कादंबरी. पत्नी निवडून आली तर हव तेव्हा तिचा राजीनामा घेता येईल असा विचार करणा-या चिमणरावांना निवडणुकीत सुमित्रा जेव्हा निवडून येते. तिचा मान सन्मन पाहता चिमणरावांची इर्षा वाढत जाते. मुख्यमंत्र्यांनी चहा पाण्याला सुमित्राला जेव्हा बोलावलं तेव्हा चिमणराव तिला जाऊ देत नाही, कारण या निमित्तानं तिला मंत्रीपद मिळालं आणि तिने स्वीकारलं तर आपली राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल असे त्यांना वाटतं. आणि आपण आमदार आहोत आणि आपण जर चिमणरावांची पत्नी म्हणून समोर येत असू तर हे चांगलं नाही, ही सुमित्राची भावना प्रबळ होतांना या कांदबरीत दिसते. मतदार संघातील दौरे, भेटी गाठी, बैठका, सभा यामुळे सुमित्राचा वेळ अधिक घराबाहेर जातो. परिणामी घरातील जीवन विस्कळीत व्हायला लागते. तिच्या भेटीगाठींचा गैर अर्थ काढला जातो. विरोधीपक्षातील टीका हिन दर्जाची असते. मुलगाही या गैरसमजाच्या वातावरणात वाहून जातो. नेहमी आईची बाजू घेणारा दीपक तिला पाहुन थुंकतो. ''खाली थुंकायच्या ऐवजी तिच्या तोंडावर थुंक जोपर्यंत ती राजीनामा देत नाही, असे चिमणराव बोलतात. तिच्याबद्दल पुढे गैरसमज, मतदार संघात बेअदबी, मोर्चे, निदर्शने, घेराव असे विरोधी गटातले नेते करतात आणि ती राजीनामा द्यायच्या ऐवजी घर सोडायचा निर्णय घेते. दुसरी कादंबरी, नामदार श्रीमती' हा खरं तर त्या कादंबरीचा दुसरा भाग म्हणावं लागेल. याच सुमित्राची यशस्वी अशी कारकिर्द या कादंबरीत रेखाटली आहे, समाज काय विचार करतो त्याच्याशी हिला अजिबात घेणं नाही. कुणी काही म्हणो एकदा पुढे पाऊल टाकलं की परत मागे नाही. पुरुषांच्या अहंकाराचा विचार न करता निर्धाराने पुढे जाणारी सुमित्रा 'नामदार श्रीमती' मधे उत्तम उतरली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पोस्ट आवडली.

यशोधरा
Fri, 07/04/2014 - 17:30 नवीन
पोस्ट आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अकरा कोटी गॅलन पाणी

विकास
Fri, 07/04/2014 - 16:54 नवीन
आता मूळ संदर्भ पटकन आठवत नाही, अनिल बर्वे यांची "अकरा कोटी गॅलन पाणी" ही मला वाटते बिहार मध्ये वास्तवात झालेल्या एका खाणीतील अपघातावरील कादंबरी आहे. राजकारण्यांचे प्रेशर आणि खाण मालकांची नालायकी या मुळे (मला वाटते) तिथल्या एका सनदी अथवा तत्सम अधिकारी व्यक्तीकडे दुर्लक्ष करून खाणकाम चालूच ठेवले जाते आणि शेवटी अचानक ११ कोटी गॅलन पाणी खाणीत शिरते आणि अनेक जण मृत्यूमुखी पडतात. शेवटी त्यासर्वाला त्या अधिकार्‍यालाच जबाबदार धरले जाते. या कादंबरीचा किती उपयोग केला गेला माहीत नाही, पण अमिताभचा "काला पत्थर " याच घटनेवर आधारीत आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम धागा

विटेकर
Fri, 07/04/2014 - 18:10 नवीन
नेमक्या कोणत्या पुस्तकाबद्दल लिहावे याचा निर्णय घेता येत नाही . अफाट वाचन केले , आधाश्यासारखे मिळेल ते वाचले. पन गेल्या ८-१० वर्षात जरा सिलेक्टिव झालो आहे. पुनः पुन्हा वाचतो ती पुस्तके पुढे देत आहे . ही पुस्तके मी कोणत्याही पानापसून सुरुवात करतो - १. कुण्या एकाची भ्रमण गाथा - गोनीदा २. स्मरण गाथा- गोनीदा ३. पैस - दुर्गा भागवत ४. दुर्दम्य - ५.राजा शिवछत्रपती ६.पुलं चे कोणतेही ७. राष्ट्राय स्वाहा ८. नर्मदा परिक्रमा - भारती ठाकूर ९. दास डोंगरी राहतो -गोनीदा ही पुस्तके माझी अत्यंत आवडती आहेत . नवीन वाचून फारसे पदरात पड्त नाही म्हणून जुनेच पुन्हा पुन्हा वाचतो.
  • Log in or register to post comments

ह्या पुस्तकांमधले तुम्हांला

यशोधरा
Fri, 07/04/2014 - 18:22 नवीन
ह्या पुस्तकांमधले तुम्हांला काय आवडले हेच लिहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

काय आवडते?

विटेकर
Mon, 07/07/2014 - 12:16 नवीन
यशोताई , परवा लिहायला बसलो तेव्हा नावे पटापट आठवता येत नव्हती .. पन तसे मला गोनीदांचे लेखन फार फार आवडते. त्यांची शैली अप्रतिम आहे. समोर बसून सांगताहेत असे वाटते. त्यात प्रामाणिकपणा शिगोशिग असतो. भपका अजिबात नाही ! सारे काही प्रचितीचे लिहिणे. अत्यंत प्रासादिक आणि ओघवते, मनाला भिडणारे , चांगुलपणावर श्रद्धा बळकट करणारे लेखन ! खरे तर मला आप्पांच्या व्यक्तित्वाबद्दलच नितांत आदर आणि कुतुहल होते , ते जे मनस्वी आणि स्व्च्छंदी आयुष्य जगले त्याचेच सुप्त आकर्षण माझ्या मनात होते. दुर्दैवाने मी त्यांना भेटलो तेव्हा ते फार म्हनजे फारच थकले होते , फारसे बोलणे झाले नाही .. ते आकर्षण आज ही कायम आहे ! आणि म्हणूनच मैय्याच्या किनारी मला इतका आनंद वाटला .. ज्याक्षणी मी लौकिकाचे लक्तरे उतरुन तिच्या कुशीत शिरलो.. तो क्षण पुनरनुभुती साठी माझ्या आनंदमय कोषात जपून ठेवला आहे. तो जन्म- जन्मांतरासाठी तसाच राहील. त्या क्षणासाठी मी गोनिंदांचा र्‍।ऊणी आहे ! शेवटी ज्याला " अ "क्षर म्हणतात , ते असेच असायला हवे ना ! पुल का आवडतात - याचे उत्तर देणे आवश्यक नाही ! बाकी अन्य पुस्तके माझ्या आदर्शांच्याबद्दल असल्याने ती माझी वैयक्तिक आवड असू शकते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाचतोय आणि एक सुचवतो .सर्व

कंजूस
Fri, 07/04/2014 - 18:30 नवीन
वाचतोय आणि एक सुचवतो .सर्व प्रतिसाद महणण्यापेक्षा चांगले वाचन -अनुभव यात लिहिले गेले आहेत .ते थोडक्यात आवरावे लागले आहेत . एक छानसे दोन दिवसांचे शिबिर ठेवले तर खूपच मजा येईल ऐकायला .यासाठी एक चांगली जागा आहे .युसूफ मेहेरली सेँटर ,कर्नाळा किल्याजवळ ,पनवेल .इथे शांतिनिकेतनसारखे वातावरण आहे .पनवेल पेण रस्त्यावरच आहे ,
  • Log in or register to post comments

इंडियन फिलोसॉफी

कपिलमुनी
Fri, 07/04/2014 - 20:59 नवीन
Indian Philosophy (Volume -1) , Indian Philosophy (Volume - 2) डॉ. राधाकृष्णन यांनी लिहिलेली नितांत सुंदर पुस्तके.. भारतीय तत्वज्ञानावर खुप सुंदर भाष्य केला आहे ..वेदांपासुन ते आजच्या धर्मांमधील तत्वज्ञान ! इंग्लिश कठीण आहे आणि रेफर्न्स टाईप असल्याने सुरुवातीला बोअर होता,,पण २-३ प्रकरणानंतर "माताय , असा डावं हाये व्हय ;) " असे वाटून इंटरेस्ट वाढत जातो फ्लिपकार्ट वर आहेतभाग १ भाग २
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा