Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 01/07/2013 - 13:44
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो. मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं बुद्ध बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे. बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात. बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये. _______________________________ तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला? बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला. त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’ सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’. बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'. बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला. तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही. _______________________________ दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं? बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता. त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा. पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही. ____________________________ तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये? बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे. सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार? जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे. आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त? तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं? तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही. श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही. असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे. ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे. _________________________________ एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!
  • Log in or register to post comments
  • 27175 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Mon, 01/07/2013 - 13:48

Permalink

वाह मस्तच लिहिलंय आवडलं

वाह मस्तच लिहिलंय आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 01/07/2013 - 13:49

Permalink

बुध्दप्रतिमा भारी आहे.

बुध्दप्रतिमा भारी आहे.. बुध्दप्रतिमा आवडली..
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Mon, 01/07/2013 - 14:52

In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक

Permalink

+१ बाकी तेच.

+१ बाकी तेच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 01/08/2013 - 17:08

In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक

Permalink

+१

बुध्दप्रतिमा भारी आहे.. बुध्दप्रतिमा आवडली.. पहिल्यांदाच अशी बुद्धप्रतिमा पाहतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 01/09/2013 - 13:28

In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक

Permalink

+१

अप्रतिम भावमुद्रा! (बादवे, याच मुद्रेत मी हापिसातून घरी परत जाताना पादत्राणे काढून बसच्या शेवटच्या रांगेतल्या कोपर्‍यातल्या सीटवर बसून डुलकी घेतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 01/07/2013 - 13:51

Permalink

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही. हे किडे करून पाहिलेले होते , पण वैताग यायला लागला मग मोबिल काढला आणि फेसबुक वर आलो ... तिथे खरी शांती मिळाली :) जोक्स अपार्ट यात इंटरेस्ट कसा निर्माण करावा?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 01/07/2013 - 14:07

In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा

Permalink

अगदी हेच...

१०-१२ दिवस इगतपुरीला जाउन "आर्यमौन" घेतलं... मग आईची आठ्वण येते म्हणुन भरपुर रडुन घेतलं.. मग मगच्या डोंगराकडे बघत बसुन इथुन कसं पळुन जायचं ह्याचे प्लान बनवले.. १दाच मिळणार्‍या पण भयंकर चविष्ट जेवणाची वाट बघत बसले.. बागेत खुप चालुन चालुन वजन कमी होतय का ते पाहिलं.. आजुबाजुला दिसणार्‍या बायकांची मनातल्या मनात टोपण नावं ठेवली.. रात्री गोयंकाची सुंदर प्रवचनं ऐकली..टीचर सोबत "का पण आनंद आणि दु:ख मानायचं नाही?? मग काय करयचं जगुन" अशी भांडन करुन तेवढच बोलुन घेतलं.. आणि "तु फारच लहान वयात आलीस इथे (१८!)" असा शेरा घेउन परतही आले... रात्री ९ - १२ झोप येत नाही म्हणुन चडफडत बेड वर लोळले... ...आणि ह्यातुन एकदाच गप बसुन ध्यान केलं... खुप छान वाटलं.... मग मी घरी आले...आणि आईला बघुन सगळी विरक्ती विसरले... परत कधीही माझ्याच्यानी विपश्यना झाली नाही.. आता वाटतं..करायला हवी होती...
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 01/07/2013 - 14:50

In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा

Permalink

यात इंटरेस्ट कसा निर्माण

यात इंटरेस्ट कसा निर्माण करावा?
...सगळे भोग यथेच्छ भोगा. आता जी विरक्ती येते तोच हा इंटरेस्ट ! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर जो संसारतापे पोळला तोच अध्यात्मसुखा अधिकारी झाला..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/07/2013 - 15:58

In reply to यात इंटरेस्ट कसा निर्माण by सस्नेह

Permalink

म्हणजे करून करून भागली अन

म्हणजे करून करून भागली अन देवपूजेला लागली पैकीच केस झाली ना ही? नै म्हंजे ही म्हण माझ्या समजुतीप्रमाणे तरी चांगल्या अर्थाने वापरली जात नाही असे वाटते, चूभूदेघे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 01/07/2013 - 16:16

In reply to म्हणजे करून करून भागली अन by बॅटमॅन

Permalink

माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून

माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून करून भागले अन देवपूजेला लागले ' अशी आहे. तुमच्य लिहिण्यात चूक आहे का माझ्या वाचण्यात ?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/07/2013 - 16:22

In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह

Permalink

छे, मला तर हे के.के. भागले

छे, मला तर हे के.के. भागले आणि डी.पी.लागले यांचा लाँगफॉर्म वाटत होता.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/07/2013 - 18:17

In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह

Permalink

दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत.

दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत. लिंगभेद सोडा अन कंटेंटकडे पहा हो :)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 01/08/2013 - 11:08

In reply to दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत. by बॅटमॅन

Permalink

हम्म..

कंटेंट्मध्ये तथ्य आहे.. एकदाचा जीव भागल्याशिवाय स्वस्थ अन स्थिर होणं कठीणच... पण म्हण नेहमी काही वाईट अर्थानेच वापरली जाते असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 01/08/2013 - 11:35

In reply to हम्म.. by सस्नेह

Permalink

म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला

म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला अभ्यास वाढवावा लागेल कदाचित. बाकी अर्ग्युमेंटशी सहमत आहे पण कुठेतरी विरोधाचा एक पिनप्रिक जाणवतोय, तो पकडता येत नाहीये. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Wed, 01/09/2013 - 14:47

In reply to म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला by बॅटमॅन

Permalink

..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता

..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता जी विरक्ती येते तोच हा इंटरेस्ट !
पन लफडा काय हाये म्हायतिये काय...ती विरक्ती एकदम शोर्ट टायमासाठी येते....आनी परत ती विरक्ती आनायला परत "सगळे भोग यथेच्छ भोगा" कडे वळावा लागतं !
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/09/2013 - 23:53

In reply to ..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता by मालोजीराव

Permalink

हांगाश्शी!!!!!!!! आत्ता आठवलं

हांगाश्शी!!!!!!!! आत्ता आठवलं. हेच्च म्हणायचं होतं मला. धन्यवाद मालोजीराव :) यावरून आठवलं, ययाती कादंबरीच्या शेवटी खांडेकरांनी एक मनोगत लिहिलंय त्यात त्यांनी हा श्लोक उद्धृत केलाय- न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति | हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते || काम, म्हणजेच भोगेच्छा ही उपभोगाने कधीच संपत नाही, तर यज्ञकुंडात तुपाच्या धारेने अग्नी पुन्हा प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे पुन्हा भडकते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 01/07/2013 - 14:34

Permalink

जबरदस्त..........!

जबरदस्त..........! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 01/07/2013 - 14:43

Permalink

आवडले!

आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 01/07/2013 - 14:51

Permalink

खूप छान लिहिलंय.

खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 01/07/2013 - 15:54

Permalink

थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या

थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या वडीलांनी जर गौतमाला लहाणपणापासुन जरा-मरण-दु:खाची ओळख करुन दिली असती तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला नसता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे बुद्ध! बाकी विपश्यना एकदा करावी म्हणतेय. माझ्या आई करुन आलेत. फरक असा काहीही वाटत नाही मला त्यांच्यात पण एक वेगळा अनुभव असावा असे वाटतय. माझी एक आतेबहीणही या सगळ्या अध्यात्मात बरीच गरगरत असते. ती या विपश्यना केंद्रात गेली होती, अर्थात तिचे अनुभव काही ऐकले नाहीत किंवा आठवत नाहीत. लेखन कळले नाही, म्हणजे नक्की कुठे चाललय ते नाही कळल, पण बुद्धाचा फोटो आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Mon, 01/07/2013 - 16:12

In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना

Permalink

जरुर स्वतः करा आनी ठरवा.

माउचे मिपावरचे लेख वाचा. खरोखरच जिज्ञासा असेल तर ला व्यनी करा. मी दोन वर्षापासुन विपश्यना करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 01/07/2013 - 16:33

In reply to जरुर स्वतः करा आनी ठरवा. by विलासराव

Permalink

मला तुमची भिती वाटते.

मला तुमची भिती वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 01/07/2013 - 17:21

In reply to मला तुमची भिती वाटते. by स्पंदना

Permalink

?

?
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Mon, 01/07/2013 - 20:22

In reply to मला तुमची भिती वाटते. by स्पंदना

Permalink

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. तुम्हाला घाबरवल्याबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 01/07/2013 - 19:01

In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना

Permalink

थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या

थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या वडीलांनी जर गौतमाला लहाणपणापासुन जरा-मरण-दु:खाची ओळख करुन दिली असती तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला नसता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे बुद्ध!
प्रतिसादातल्या ह्या भागाशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 01/08/2013 - 08:39

In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by गणपा

Permalink

एगझॅक्टली हेच म्हणायचं होतं.

एगझॅक्टली हेच म्हणायचं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 01/08/2013 - 00:44

In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना

Permalink

अपर्णा, बुद्धाचं जीवन अपवादात्मक नाही,

त्याचा प्रसंगाकडे पाहण्याचा नजरीया अपवादात्मक आहे. इट इज रेअर. मृत्यूची कल्पना त्याला दिली नव्हती हे विषेश नाही. त्यानं सारथ्याला विचारलेला प्रश्न महत्त्वाचाय : ‘मला देखील मृत्यू आहे?’ आपण देखील मृत्यू बघतो, हळहळतो आणि मग ती घटना विसरतो किंवा लवकरात लवकर विस्मरणात नेण्याचा प्रयत्न करतो. ती घटना आपल्याला जागं करत नाही. आपण पुन्हा रोजच्यासारखे जगायला लागतो. बुद्धाकडे साधक यायचे त्यांना तो चितेवर ध्यान करायला सांगायचा. जस्ट वॉचींग द बर्निंग पायर. आपल्याला वाटतं कसली अभद्र साधना! पण जस्ट सी, ही इज टेकींग यू टू द लास्ट पेज ऑफ द नॉव्हेल. याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या. हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे. एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 01/09/2013 - 09:02

In reply to अपर्णा, बुद्धाचं जीवन अपवादात्मक नाही, by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्हाला समजल नाही संजय साहेब

तुम्हाला समजल नाही संजय साहेब. त्याला जरा-मरणवा दु:ख दैन्य याची साधी झुळुकही नव्हती. अन मग अचानक अस समोर आल्यावर तो विचारतो, मलासुद्धा मरण आहे. जे वैश्विक सत्य, की जन्माला आलेला मरणारच याचीच जाणिव त्याला नव्हती, व्हाईल समाजात रहाणारं दोन वर्शांच मुल सुद्धा, आजोबा देवाघरी गेले? हा प्रश्न निदान दोन महिने तरी विचारत. हा फरक असल्याने बुद्ध या गोष्टीबद्द्ल अनैसर्गिक दृष्टीकोणातुन पाहु लागला.
बुद्धाकडे साधक यायचे त्यांना तो चितेवर ध्यान करायला सांगायचा. जस्ट वॉचींग द बर्निंग पायर. आपल्याला वाटतं कसली अभद्र साधना! पण जस्ट सी, ही इज टेकींग यू टू द लास्ट पेज ऑफ द नॉव्हेल. याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या. हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे. एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.
या बद्दल खरतर नो कमेंटस. चघळायचीच म्हंटल तर अमाप चघळता येइल अशी चर्चा.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 01/09/2013 - 11:51

In reply to तुम्हाला समजल नाही संजय साहेब by स्पंदना

Permalink

अपर्णा, अँगल वेगळा आहे, समजतोय का पाहा

जे वैश्विक सत्य, की जन्माला आलेला मरणारच याचीच जाणिव त्याला नव्हती
बुद्धाच्या आणि इतरांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक असणार कारण तो राजपुत्र होता. इतकंच काय कोणत्याही दोन व्यक्तींच्या जीवनशैलीत संपूर्ण साधर्म्य सापडणार नाही. अर्जुन आणि बुद्ध दोघं राजपुत्र आहेत पण त्यांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टीकोन भिन्न आहेत. युद्ध आप्तजनात नसतं तर अर्जुनाला संहार करतांना विषाद झाला नसता. बुद्धाला अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूनं विषाद झाला. मृत्यूच्या गांभिर्याकडे विषय नेण्याचा किंवा कुणाला विषाद व्हावा असा हेतू नाही. कारण विषादातून कुणी सत्याच्या शोधात निघेल तर कुणी मानसिक गर्तेत जाईल. सो दॅट कांट बी द डिरेक्शन. आणि लेखन वाचताना याच सदैव स्मरण असू द्या. अध्यात्मकडे छंद म्हणून पाहा. आतापर्यंत ते विषादातून निर्माण होतं असा समज आहे तो सोडून द्या. इट इज अ फन. इट इज अ‍ॅन ऑप्शन ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी. आणि आता हे वाचून पाहा :
याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या. हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे. एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.
बुद्धाची प्रतिमा `फोटो चांगला आहे' इतकंच दर्शवत नाही. ती जी निवांत चित्तदशा दर्शवते ती तुम्हाला लाभावी हा हेतू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/07/2013 - 16:27

Permalink

छे छे !

अध्यात्म वैग्रे कशाला पाहिजे ? सर्व सुखे उपभोगा. फक्त सुखाने तुम्हाला उपभोगु नये ह्याची काळजी घ्या म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 01/07/2013 - 16:31

In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा? टास्मानिया जळतय बाबा. तू

परा? टास्मानिया जळतयं बाबा. तू ठिक आहेस ना? नाही तर या चिमणीचं घर शेजारधर्म म्हणुन उघडं आहे हो तूला. मला तर वाटतयं ह्यो परा तिकंड गेल्यामुळच वणवा लागला असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 01/07/2013 - 17:22

In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

simple and superb

simple and superb
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 01/10/2013 - 21:04

In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

म्हणजे आपण संकेतस्थळांवर पडिक

म्हणजे आपण संकेतस्थळांवर पडिक असाव ; त्यानी आपल्यावर पडिक असु नये असे म्हणायचे आहे का तुम्हाला
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 01/07/2013 - 16:56

Permalink

... "क्या बात है"

"क्या बात है" ...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/07/2013 - 18:24

Permalink

रोचक लिखाण. लेखात सांगितलेली

रोचक लिखाण. लेखात सांगितलेली साधना स्वतःदेखील कधी थोडीफार करून पहावी असे वाटायला लावणारे.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 01/07/2013 - 23:41

Permalink

विपश्यना दीर्घकालीन आणि कष्टप्रद साधना नाही

विपश्यना घरी देखील करता येते. मनावर वेळेचं दडपण नसलं आणि शांत वेळ असली की झालं. `चालू असलेल्य श्वासाची जाणीव होणं' (ज्याची क्वचितच दखल घेतली जाते) महत्त्वाचं. या जाणीवेवर फक्त काही क्षण स्थिर राहिलो तर इतक्या सहज बेदखल केलेल्या पण आपोआप चाललेल्या क्रियेविषयी विस्मय वाटतो. रोजच्या जीवनात आपण इतके गुंतागुंतीचे विचार, धावपळ आणि प्लॅन्स करतो पण हा आपोआप चालणारा श्वास जणू गृहितच धरलेला असतो. बहुदा अगदि शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्षातच येत नसावं की या एका प्रक्रियेवर सगळं अवलंबून होतं. विपश्यना म्हणजे जाणीवेचा रोख बदलणं. अत्यंत सोप्या शब्दात : इतक्या अगणित गोष्टींकडे केंद्रित झालेलं आपलं लक्ष श्वासाकडे वळवणं. काही कालासाठी त्याची दखल घेणं. दॅट इज ऑल! जस्ट ट्राय, या चालू श्वासाच्या नुसत्या जाणीवेनं आपण शांत होतो. ती इतकी विलोभनीय गोष्ट आहे की आपोआप सार्‍या जगाचा विसर पडतो. त्यासाठी इतर काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही अस्तित्वाप्रती इतके कृतज्ञ होता की तुमची संवेदनाशीलता आपोआप वाढते. ती साधना रहात नाही, रिकाम्या वेळेचा छंद होतो. एखाद्या निवांत क्षणी तुमची जाणीव श्वासावरून सरळ स्वत:प्रत येते आणि तुम्हाला निराकाराचा बोध होतो. अर्थात, जाणीवेचा रोख श्वासाकडून स्वत:कडे येणं लगोलग घडलं नाही आणि त्यातला सर्व अध्यात्मिक भाग सोडला तरी एक साधा पासटाईम म्हणून विपश्यनेसारखा नजाकतदार छंद दुर्मिळ आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/08/2013 - 00:48

Permalink

गोजीरं

कसला सुरेख फोटो आहे बुद्धाचा. चेहेर्‍यावर यशोदेच्या मांडीवर सुखाने पहुडलेल्या बाळकृष्णाचे भाव... हातांनी अलगद आईला मिठी मारलेली, आणि बैठक यशोदामय्या जैसी... वाह... दिल खुष झाला. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/08/2013 - 01:48

Permalink

अपर्णा, गणपाभौ,

लहानपणी कुठल्या तरी इयत्तेत एक धडा होता. बहुतेक पु. भा. भाव्यांचा. त्यात मोठा अद्भूत प्लॉट आहे. राजपुत्र गौतम प्रथमच शारीरीक व्याधी, मृत्यु इ. दु:ख बघतोय. जीवनातल्या क्षणभंगूरतेच्या जाणीवेने त्याचं मन सैरभैर झालय. ही क्षणभंगूरता त्याला अस्वस्थ करतेय. हे सगळं तो एका शरीरव्याधीने ग्रस्त माणसाशी बोलतोय. खरं तर इथेच त्याचं मुमुक्षत्व सुरु व्हायचं... पण प्रसंगाला एकदम कलाटणी मीळते... तो व्याधीग्रस्त माणुस अश्वत्थामा असतो. जीवनातल्या क्षणभंगूरतेला घाबरुन जाण्यापेक्षा ति क्षणाभंगूरताच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करुन देते असं उफराटं तत्वज्ञान अश्वत्थामा त्याला ऐकवतो. कुठलिही स्थिती कायम नसते, आणि तिचा शेवटच तिला महत्व प्राप्त करुन देतो असा अश्वत्थाम्याचा संदेश असतो. असं म्हणतात कि बुद्धाला अंतीम अवस्थेत मूलकणांचं अवीरत प्रकटन आणि विघटन अशी विश्वाची प्रक्रीया दिसली. अश्वत्थाम्याचा संदेश याच वळणावर संपूर्ण मॅच्युअर होतो. बुद्धाला त्याच्या वडीलांनी जर अगोदरच दु:खाची कल्पना दिली असती, किंवा खरच त्याला असा अश्वत्थामा भेटला असता तर बुद्ध संन्यासी न होता कदाचीत श्रीकृष्णासारखा श्रीमानयोगी झाला असता. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Tue, 01/08/2013 - 02:00

In reply to अपर्णा, गणपाभौ, by अर्धवटराव

Permalink

भेट

तुम्हाला हे म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/08/2013 - 02:04

In reply to भेट by दादा कोंडके

Permalink

थँक यु :)

हो... हिच ती कथा. जी. ए. साहेबांची आहे होय... मला नाव आठवत नव्हते. फार वर्षापूर्वी शाळेत असतना वाचलं होतं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 01/08/2013 - 09:46

Permalink

सत्य : न बदलणारा वर्तमान. भूतकाळ : संपलेला विषय

असं म्हणतात कि बुद्धाला अंतीम अवस्थेत मूलकणांचं अवीरत प्रकटन आणि विघटन अशी विश्वाची प्रक्रीया दिसली. अश्वत्थाम्याचा संदेश याच वळणावर संपूर्ण मॅच्युअर होतो.
सत्य ही प्रक्रिया नाही, स्थिती आहे. इट इज नॉट अ प्रोसेस, इट इज अ काँस्टंट स्टेट. आणि स्थिती इतकी मूलभूत आहे की असून नसल्यासारखी आहे. म्हणून उपनिषदं तिला पूर्ण म्हणतात तर बुद्ध शून्य. ती इतकी उघड आहे की आता डोळ्यासमोर आहे आणि सत्य शोधण्यात लोकांनी आयुष्य घालावून त्यांच्या हाती काही लागलेलं नाही. ती सर्व अस्तित्वाचा आधार आहे आणि तरी सुद्धा आपण तिची दखल न घेता संपूर्ण आयुष्य जगू शकतो. इट इज अ‍ॅन अन-इनवायटींग इनवीटेशन. आणि, द मोस्ट सर्प्रायजींग थींग इज, आपण त्या स्थितीशी कायम संलग्नच आहोत. मुळात आपण सत्यच आहोत पण ते लक्षात येत नाही.
बुद्धाला त्याच्या वडीलांनी जर अगोदरच दु:खाची कल्पना दिली असती, किंवा खरच त्याला असा अश्वत्थामा भेटला असता तर बुद्ध संन्यासी न होता कदाचीत श्रीकृष्णासारखा श्रीमानयोगी झाला असता.
यावर चर्चा होऊ शकेल आणि अनेक शक्यता असू शकतील पण घडलेल्या घटनेविषयी काहीही करता येत नाही. आणि मुद्दा आपल्याला सत्य गवसायचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/08/2013 - 10:58

Permalink

स्थिती आणि प्रक्रिया

सत्य अशी ति स्थिती आणि प्रक्रिया या अविछिन्न आहेत, परस्पर पुरक आहेत. किंबहुना प्रक्रिया हि स्थितीचच एक्स्टेन्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. तसं नसेल तर स्थिती सत्य असु शकणार नाहि. कदाचीत म्हणुनच स्थितीची दखल न घेता आयुष्य जगता येतं, जीवंतपणा अनुभवता येतो. अन्यथा स्थिती एक सत्य आणि प्रक्रिया दुसरं सत्य असं काहिसं होईल. प्रक्रियेला वगळुन निव्वळ स्थिती पांगळी आहे. सत्य निव्वळ स्थिती नाहि तर प्रक्रियेत रुपांतरीत होणारी स्थिती आहे, किंवा सत्य स्थितीक्षम प्रकिया आहे. झालेल्या घटनेला रिव्हर्ट करता येत नाहि हे खरय. दु:खातुन सुटका करुन घेणार सन्यस्त आत्मभान अन्यथा सुख दु:खा समेकृत्वा म्हणत कर्मयोगी आत्मभान झालं असतं हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/08/2013 - 11:21

Permalink

बुद्धाचा फटु तेवढा आवडला..

बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. बाकी शुन्यच आहे त्यावर काय लिहिणार?
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 01/08/2013 - 12:35

In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश

Permalink

अंतिम सत्य

अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण ते कधी कोणाला सापडलेच नाही. पण ते शोधताना त्यांना शब्दांचे रंगीत बुडबुडे मात्र सापडले. त्याचेच खेळ आजवर चालू आहेत आणि यापुढेही चालतच रहातील. आमेन.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 01/08/2013 - 12:38

In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश

Permalink

+१

++ १००० शून्य ऐवजी महाशून्य म्हणावे .. तेवढेच आपण ही पुढे गेलोय असे लोकाना वाटेल !
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/08/2013 - 12:59

In reply to +१ by विटेकर

Permalink

0/0

0/0 शून्य गुणिले शून्य = शून्य = अभाव शून्य गुणिले काहीही = शून्य = अभाव शून्य भागिले काहीही = शून्य = अभाव शून्य भागिले शून्य = अनंत = निरर्थक काहीही भागिले शून्य = अनंत = निरर्थक जगणं = गंडणं ही साधीसोपी गोष्ट आहे. गंडण्यातली मजा जिवंत असेपर्यंत घ्यायची. आहे ते, आहे तसं, दिसेल तसं, दिसेल तेव्हा, भासेल तसं स्वीकारत आणि भोगत जावं.. असं आपलं व्यक्तिगत मत. नंतर आहेच सत्य, किंवा तेव्हाही नाहीच..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 01/08/2013 - 13:05

In reply to 0/0 by गवि

Permalink

ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात्

ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात् शून्यमुदच्यते | शून्यस्य शून्यमादाय शून्यमेवावशिष्यते || ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/08/2013 - 13:13

In reply to ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात् by बॅटमॅन

Permalink

हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी

हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी हातचा का होईना पण "१" धरुन सुरुवात केली, की पॉझिटिव्ह आपोआप होतं. शिवाय गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी, अतएव लाईफ सुरु करता येते..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 01/08/2013 - 15:33

In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि

Permalink

इंडीड......

इंडीड...... आणि लाईफ सुरू झाली की बाकीच्या भानगडी येतातच ;) एक लाईफ बारा भानगडी =))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 01/08/2013 - 15:51

In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि

Permalink

गवि : डू यू डिनाय द स्पेस?

बुद्धाच्या शून्यचा अर्थ गणितातलं शून्य नाही. इट इज द स्पेस. आता या क्षणी समोरचा स्क्रिन आणि तुमचे डोळे यात स्पेस आहे. इथे लिहिलेल्या दोन शब्दात स्पेस आहे. आपण स्पेसमधेच वावरतो. सारे ग्रह, तारे, सूर्यमालिका स्पेसमधेच तर आहेत. या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. म्हणून तर त्यानं म्हटलय `बात तो आंखोके सामने थी और मैं कहांकहां ढूंढता फिरा' (ओशो : धम्मपद) सत्य हा शब्द नाही, वस्तुस्थिती आहे. इतकी उघड गोष्ट कशी नाकारता येईल? सत्य समजणं सोपंय कारण तिथे विवाद होऊच शकत नाही. इंग्रजीत सत्याला पर्यायी शब्द ट्रूथ नाही, अ‍ॅबसल्यूट आहे. समथींग दॅट कांट बी चेंज्ड. सत्य काय आहे ते समजू शकतं. पण बुद्ध म्हणतो `आपण सत्य आहोत' (त्याचा शब्दात शून्य आहोत)... अँड दॅट इज द ब्यूटी!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com