✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धंदा -भाग -३

र
रामदास यांनी
Wed, 05/04/2011 - 20:13  ·  लेख
लेख
पहाटे जाग आली . घशात गरम खंगर अडकल्यासारखं वाटत होतं पोटात आगीचा डोंब उसळला होता. अंगात कणकण वाटत होती.लघवीला जावसं वाटत होतं पण अंग उचलून बसण्याची इच्छा पण होत नव्हती.माझ्या पायाशी चुळबुळ झाली.भाया उकीडवा बसून डोकं दोन्ही हातात धरून झोपेतच झुलत होता. माझ्या घशातून खाकरल्यासारखा आवाज आला आणि भाया जागा झाला. "केम दादा? " मी काहीच बोललो नाही पण माझ्या तब्येतीचा अंदाज त्याला आला असावा. "तमे काच्ची पिधी हती ?" मी मान डोलावली. पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला. कच्ची दारु पूर्णपणे सूड उगवत होती. पायात अडकवण्यासाठी स्लिपर शोधायला वाकलो आणि डोक्यात खिळे मारल्यासारखं वाटायला लागलं. बहुतेक पाच सव्वा पाच वाजले असतील. हँगओवर नेहेमीच असायचा पण आजचा काही वेगळाच होता. "दादा ,मुतरवा जऊ सं?" मी मान डोलावली. भाया खाटल्यावरून खाली उतरला.आम्ही दोघंही चालायला लागलो पण पहीली दहा पावलं डळमळीत होती. पोटात ढवळून आंबट पाणी घशाशी आलं . लघवी करायला झोपड्याच्या मागून रेल्वेच्या पटरीवर जायला लागायचं .अंधारात काहीच दिसत नव्हतं पण हा रस्ता रोजचाच होता. एलफीन्स्टन्च्या चार लायनी आणि परेलच्या चार लायनींना क्रॉस मारणारी एक लाईन आहे तिथेच सगळे लघवीला जायचे. लायनीच्या बाजूला पावसाळी गटार होतं. हे सगळं डोक्यात इतकं पाठ झालं होतं की अंधारात पण आम्ही दोघं जागच्याजागी झुलत उभे राह्यलो. रात्रीच्या थंडीमुळे पोट टाईट फुगलं होतं .दोन मिनीटं न बोलता आम्ही धोधाण मुतत होतो. पोटातली आग कमी झाली नव्हती पण आता जरा बरं वाटत होतं.पण पापण्या जड झाल्यानी डोळे उघडे ठेवणं कठीण वाटत होतं. कधी एकदा कधी खाटल्यावर पडतो असं झालं होतं . चार लायनी क्रॉस मारल्यावर भाया उभाच राहीला. हलेना जागचा. हाक मारणं पण कठीण होतं इतकी जीभ कोरडी पडली होती. धडपडत भाया पुढे आला . "दादा, एक पुछुं ?" काही बोलायचा मूड नव्हता पण मी मान डोलावली . "रेलवे का गटर चार फूट तो निचे रहेगा ना ?" मी नुसतंच हं हं असा आवाज काढला. एक लाईन पार केल्यावर भाय म्हणला " दादा , आपडे काच्ची पिधी हती ना ? मी काहीच बोललो नाही. समोर खाटलं दिसत होतं .मी आडवा पडलो. आडवं पडल्यावर डोकं जरा हलकं झालं .भाया माझ्या पायाशी आडवा झाला. त्यानी पुन्हा एकदा हाक मारली .कंटाळा आला होता. मी डोळे मिटूनच त्याला "हवे जराक हुवा दे" म्हटलं पण तो काही गप्प बसायला तयार नव्हता. "दादा, काच्ची पिवाथी ओछू सांमळाय क्यारेक ?" मी म्हटलं "ना रे ना " "तो मने कहो आपडे पाच मिनीटं मुतरता हता तो आवाज केम नही आवी ?" झोपण्यापूर्वी झालेल्या गचाळ कॉमेंट्रीच्या आठवणीनी मी वैतागलोच होतो .पण आता माझ्याही डोक्यात तोच प्रश्न आला .भाया म्हणत होता ते खरंच होतं .आम्ही चार फुटावरून धार मारत होतो खाली गटार होतं पण धारेचा आवाज काही ऐकू येत नव्हता. रात्रीच्या शेवटच्या गाडीनी येणारे दारुवाले काही वेळा फुगे गटारात टाकून जायचे . कदाचीत खाली तेच असतील असं बोलून मी झोपायचा प्रयत्न केला. पोटाचा ताण कमी झाल्यामुळे दोन मिनीटात गाडी उलाल झाली. ************************************************************** बरगडीत बोटं टोचल्यासारखं वाटलं आणि मी जागा झालो. सात साडेसात वाजले असतील . प्रचंड कष्टानी मी डोळे उघडून बघीतलं .रेल्वे पोलीसचा साखरे हवालदार उभा होता. तुम्हाला मास्तरानी बोलावलं आहे असं म्हणून निघून गेला. उजाडल्यावर धंद्यावर शांत शांत बघायची सवय नव्हती. आज सगळेच झोपलेले.गाडीतून येणारे वर्कशॉपवाले धंदा बंद बघून निघून जात होते. मी एकदा डोकं गदागदा हलवलं. भायाला हाक मारली .भाया दिसेना. आत गेलो .बालटीतून पाणी घेऊन चुळा टाकल्या. डोळे धुतले.जरा बरं वाटलं .इतक्यात भाया आला. मी काही विचारलं नाही पण त्यानीच सांगीतलं "दूध लेवा गयो हतो. "ग्लासात कच्चंच दूध भरून माझ्यासमोर ठेवलं. थंडं कच्चं दूध पोटात गेल्यावर सगळी दुनीया जागच्या जागी आली. "मास्टरके ऑफीस मे जा. हवालदार आया था."असा हुकुम करत मी बाकीच्या पोरांना उठवायाला लागलो. पाच मिनीटात शटर वर गेलं .काही पोरं घरी गेली.बाकीची काड्या चावत दातूण करत बसली. भाया परत आला. मी फक्ता इशार्‍यानीच विचारलं ."लाईनपे मुर्दा मिला है . पंचनामा लिखनेको बुलाया है." एकाएकी जाम कंटाळा आला. रात्र धकाधकीत गेली होती आणि आता सकाळी अ‍ॅक्सीडेनच्या पंचनामा. तोपर्यंत भायाच्या पाठी गांगुर्डे हवालदार पण आला होता. "चला हो शेठ लवकर चला.साहेब म्हणतात जागेवर आधी पंचनामा करा." रेल्वेअ‍ॅक्सीडेनचे पंचनामे जागेवर कधीच करत नाही.मुडदा स्ट्रेचरवर टाकून -झाकून स्टेशन मास्तरच्या ऑफीसासमोर ठेवतात. हवालदार तोंड झाकून एकदाच मांजरपाट काढतो.चेहेरेपट्टी बघायची आणि सह्या करायच्या. काही वेळा फक्त तीस चाळीस किलो मटनाची थप्पी फक्त बघायला मिळते आणि आख्खा दिवस बेकार जातो. "अ‍ॅक्सीडेन नाही .पन मुर्दा आपल्या गटारात हाये." नाईलाजानी मी आणि भाया चालायला लागलो.स्ट्रेचर हमाल पुढे. दोन हवालदार आणि मास्तर .सगळी लाईन मुतरीच्या पायवाटेनी जायला लागली. ओव्हरहेडवर कावळे कुठेच दिसत नव्हते. म्हणजे अ‍ॅस्क्सीडेन नव्हता. गटाराजवळ मात्र गर्दी दिसत होती. पोलीस दिसल्यावर लायनी पार करणारे नोकरीवाले पळाले. ज्यांनी मुडद्याची वर्दी दिली ते दोन चरसी उकीडवे बसले होते. मुडदा दिसला की चरसी पहील्यांदा धावत येतात. दिवसभराची तरतूद होते. आधी मास्तरांनी आणि त्यानंतर मी आणि भायानी वाकून बघीतलं .गटारात एक माणूस मरून पालथा पडला होता. कोण होता कळायला मार्ग नव्हता. पोलीसांनी चरसींना ला खूण केली . दोघंही गटारात उतरले.मुडद्याचं तोंड वर केलं. संपूर्ण बॉडीला मुंग्या लागल्या होत्या.चेहेरा दिसतच नव्हता. माझ्या खांद्यावर भायानी हात ठेवला.मी मागे वळून बघीतलं. भाया कुत्र्यासारखा थरथरत होता.आधी मला काही कळेना. मग दहा सेकंदात मी पण थरथरायला लागलो. सकाळी आम्ही इथेच मुतायला उभे होतो. आता कळलं की आवाज का नाही आला. मी आणि भायानी प्रेतावर लघवी केली होती. एका चरसीच्या हाताला एक पाण्याची बाटली लागली. पाणी चेहेर्‍यावर ओतल्यावर मुंग्या सैरावरा पळायला लागल्या. बॉडीचा चेहेरा दिसायला लागला. जाड्या उघड्या डोळ्यानी वटारून आमच्याकडे बघत होता. एकाएकी रडल्याचा आवाज आला. भाया धाय मोलून रडत होता. हवालदार टवकारून बघायला लागले. "तेरा सगेवाला हय क्या ?" भायानी नकारार्थी मान डोलावली. "फिर कायकू रोता है. इसका पहीले मुर्दा देखा नही क्या. ?" आता मात्र काहीतरी करायलाच हवं होतं .मी भायाला बाजूला घेतलं. दोन्ही हात घट्ट धरून गप्प बसायला सांगीतलं . त्याला सांगीतलं पण माझीच फाटून आता दिल्ली दरवाजा व्हायची वेळ आली होती. आम्ही दोघं पुढे होतो असं सांगून आम्ही स्टेशनवर आलो. आमच्यापाठोपाठ स्ट्रेचर आलं . पाच मिनीटानी कागदावर सह्या मारून आम्ही धंद्यावर आलो आणि भायाला आकडी आली.पोरं गोळा झाली .गलका झाला. भयाणीच्या दुकानातून कोणीतरी कांदा आणला. चप्पल हुंगवली. सोडा मारला. थोड्या वेळानी भायानी डोळे उघडले आणि बडबडायला सुरुवात केली. मी एका पोराला जमनाबेनला ,भायाच्या आईला बोलवायला पाठवलं.ती तरातरा चालत धंद्यावर आली आणि तिनी भाया मेल्यासारखं भोकाड पसरलं.दुकानाच्या दरवाज्यात पपलीक गोळा झालं.मी शेठला फोन लावला.शेठनी येतो म्हटल्यावर खुर्चीत गांड आदळून जो बसलो तो मला ऊठवेचना. पाय थरथरायला लागले.मळमळून उलटी होईल का काय असं वाटायला लागलं .डोळ्यासमोर जाड्याचा चेहेरा . आदल्या रात्रीची फिलीम डोळ्यासमोर फिरायला लागली. एका अनोळखी माणसाची आपल्या हातून झालेली विटंबना आठवून आठवून स्वतःचाच संताप यायला लागला होता. अपूर्ण.

Book traversal links for धंदा -भाग -३

  • ‹ धंदा -भाग २
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
29306 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

मेंदूचे धागे उसवणारी शैली आणि

नगरीनिरंजन
Wed, 05/04/2011 - 20:21 नवीन
मेंदूचे धागे उसवणारी शैली आणि वर्णन आहे. नकळत सगळं डोळ्यासमोर उभं राहून शहारायला झालं. वाचवतही नाही आणि सोडवतही नाही.
  • Log in or register to post comments

__/\__

असुर
Wed, 05/04/2011 - 20:41 नवीन
__/\__ काय ब्येक्कार भारी लिहीता हो रामदास काका... धूर आला वाचून!! --असुर
  • Log in or register to post comments

छान

गणेशा
Wed, 05/04/2011 - 20:59 नवीन
असेच लिहित रहा ... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

वाचवत नाही. चौथ्या भागापासून

रेवती
Wed, 05/04/2011 - 21:36 नवीन
वाचवत नाही. चौथ्या भागापासून मी वाचणार नाही.
  • Log in or register to post comments

अगदि हेच म्हणतो...

मिसळपाव
Wed, 05/04/2011 - 22:22 नवीन
नेहेमी सुरेल गाणार्या एखाद्या गायकाने 'मला हेहि येतं बरं का' म्हणून acid rock किंवा तत्सम काहितरी अर्वाच्य प्रकार सुरू करावा तद्वत वाटतंय. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१ टु मिसळपाव, लिखाण उत्तम

५० फक्त
Fri, 05/06/2011 - 20:17 नवीन
+१ टु मिसळपाव, लिखाण उत्तम आहे पण विषयच असा आहे, की हे असंच नागडं उघडं लिहावं लागतं, त्यामुळं काही करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

नागव्या, भळभळत्या जगण्याच्या इतक्या

चतुरंग
Wed, 05/04/2011 - 22:33 नवीन
जवळ फक्त वाचनातून सुद्धा जायची जबरदस्त भीती वाटते. वाचताना डोक्याच्या आत कोणीतरी ओरखडे काढल्यासारखे वाटले. शब्दसामर्थ्य आणि वातावरण निर्मिती याबाबतीत केवळ <=०()8=< -(बीभत्सरसअवगुंठित्)रंगा
  • Log in or register to post comments

शब्द

सन्जोप राव
Wed, 05/04/2011 - 22:41 नवीन
शब्द बापुडे केवळ वारा.... काय लिहिणार? कच्ची दारु नरड्यातून जळत जावी तसे वाटले.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
गुरुवार, 05/05/2011 - 00:01 नवीन
ओव्हरहेडवर कावळे कुठेच दिसत नव्हते. म्हणजे अ‍ॅस्क्सीडेन नव्हता खास रामदासी निरीक्षण! कथामाला नेहेमीप्रमाणेच उत्तम पण मागील भागांचे दुवे सुरुवातीस द्यावेत ही विनंती!
  • Log in or register to post comments

+१

विसुनाना
गुरुवार, 05/05/2011 - 16:56 नवीन
हेच म्हणतो आहे. कथा आवडते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नेहमीसारखी जबरदस्त

टुकुल
गुरुवार, 05/05/2011 - 01:11 नवीन
नेहमीसारखी जबरदस्त लेखनशैली.. __/\__ वाचत आहे, येवुद्या अजुन तुमच्या पोतडीतुन. --टुकुल
  • Log in or register to post comments

जहबहराहा!

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/05/2011 - 02:19 नवीन
काही वेळा फक्त तीस चाळीस किलो मटनाची थप्पी फक्त बघायला मिळते आणि आख्खा दिवस बेकार जातो. हां, ज्यांनी रेलवेआक्शिडन पघितला आसंल तेनला बराब्बर समजंल काय बोलताय तुमी ते!!! आमाला तर येकडाव १०-१२ किलोची कवळी थप्पी पघावी लागली व्हती!!!:( लई वंगाळ, तिच्यायला!! स्वामी, तुमच्या वर्णनशैलीबद्द्ल आणि वातावरणनिर्मितीबद्दल तर काही प्रश्नच नाही, आपला सलाम! पण तीन भाग झाले, कथानक अंमळ खोळंबल्यासारखं वाटतंय हो!!! जरा धक्का द्या ना गाडीला प्लीज...:) नाय म्हणजे असल्या वातावरणाची आम्हां भटाबामणांना, सॉरी सॉरी, पांढरपेशांना, माहिती व्हावी म्हणूनच हा प्रपंच असेल तर गोष्ट वेगळी... (तसं असेल तर आता पुढल्या भेटीला हे आमाला तडक आंटीच्या गुत्त्यावर घेऊन जातंय बहुतेक! देवा तुकां काळजी!) :)
  • Log in or register to post comments

गरगरतय वाचुन, कावळे तर अश्या

स्पंदना
गुरुवार, 05/05/2011 - 07:35 नवीन
गरगरतय वाचुन, कावळे तर अश्या ठिकाणी वापरलेत की हजार शब्द सांगुन जातात.
  • Log in or register to post comments

भयाण

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2011 - 10:17 नवीन
_/\__ वास्तव परिस्थितीचे अगदी भयाण वर्णन रामदासकाका.
  • Log in or register to post comments

भयाण परिस्थितीचे अगदी वास्तव

गवि
गुरुवार, 05/05/2011 - 10:23 नवीन
भयाण परिस्थितीचे अगदी वास्तव वर्णन रामदासकाका.. असं म्हणायचं असावं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तं. थरारक.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 05/05/2011 - 12:13 नवीन
मस्तं. थरारक.
  • Log in or register to post comments

हं...

श्रावण मोडक
गुरुवार, 05/05/2011 - 16:19 नवीन
हं... लेखन पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया उमटेल इतकी व्यवस्था केली आहे तुम्ही. आता पुढची वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. बधीर डोक्याने तेवढंच होऊ शकतं.
  • Log in or register to post comments

सुन्न...

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/05/2011 - 16:33 नवीन
सुन्न...
  • Log in or register to post comments

तिन्ही भाग एकदम वाचले.

प्यारे१
गुरुवार, 05/05/2011 - 17:30 नवीन
तिन्ही भाग एकदम वाचले. बधीर...!!!
  • Log in or register to post comments

जबर. आधीच्या भागांचे दुवे

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 05/05/2011 - 20:07 नवीन
जबर. आधीच्या भागांचे दुवे द्या प्लीज.
  • Log in or register to post comments

काका,पुढचा भाग??

प्रभो
गुरुवार, 05/05/2011 - 20:11 नवीन
काका,पुढचा भाग??
  • Log in or register to post comments

वाचतोय

आनंदयात्री
गुरुवार, 05/05/2011 - 20:40 नवीन
वाचतोय. अनुभव मोठा टोचणी लावणारा आहे, बरेच दिवस लागले असतील डायल्युट व्हायला.
  • Log in or register to post comments

आयच्चा घोव !

ज्ञानेश...
गुरुवार, 05/05/2011 - 21:37 नवीन
(सॉरी, हेच शब्द आले मनात, वाचून झाल्यानंतर.) येऊ द्या पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

मस्त ! जबरदस्त ! पहिले दोन

लिखाळ
गुरुवार, 05/05/2011 - 22:51 नवीन
मस्त ! जबरदस्त ! पहिले दोन भाग जास्त आवडले. पुढचा भाग वाचायला उत्सुक.
  • Log in or register to post comments

समर्थ लेखन....

प्रभाकर पेठकर
Mon, 05/09/2011 - 13:16 नवीन
बारीक निरिक्षण, विलक्षण शब्दसामर्थ्य आणि विषयावरील जबरदस्त पकड ह्या त्रयीतून जी कथा उलगडत जाते आहे त्याला 'अप्रतिम' हे विशेषणही तोकडे पडावे. आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येण्याचा योग आला आणि कथेचे तिन्ही भाग एका बैठकीत वाचून काढले. पुढील भागांची उत्कंठापुर्वक वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

ग्याप पडली.

गवि
Mon, 05/09/2011 - 13:29 नवीन
ग्याप खूप मोठी झाली. उत्सुकता फार आहे. लवकर येऊ द्यात आता. :)
  • Log in or register to post comments

*डफाड...

चिगो
Mon, 05/09/2011 - 14:25 नवीन
खतरा लिहीताय काका.. जबरदस्त.. काटा येतो अंगावर..
  • Log in or register to post comments

अ

श्रावण मोडक
Tue, 05/24/2011 - 17:34 नवीन
अ जंटल रिमायंडर सर! :)
  • Log in or register to post comments

पुढचा..??

गवि
Fri, 05/04/2012 - 11:14 नवीन
याचा पुढचा भाग आला आहे का? धन्यवाद..
  • Log in or register to post comments

धन्स गवि आठवण करून

सुहास झेले
Fri, 05/04/2012 - 11:34 नवीन
धन्स गवि आठवण करून दिल्याबद्दल.... रामदास काका, लिवा की पुढला भाग :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुढचा भाग टंका की ओ

निनाद मुक्काम …
Sat, 05/05/2012 - 00:03 नवीन
पुढचा भाग टंका की ओ काका गंदा हे पर धंदा हे ये किंवा तुम्हे धंदे की कसम
  • Log in or register to post comments

>>>>अपूर्ण.

प्यारे१
गुरुवार, 03/28/2013 - 21:15 नवीन
>>>>अपूर्ण. :( अवांतरः डॉक्टरांच्या नौदल धाग्यावर काकांनी लिहीलेल्या या कथेचा उल्लेख केला होता.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग टंका की ओ काका

Rahul D
Sun, 03/27/2016 - 13:50 नवीन
पुढचा भाग टंका की ओ काका
  • Log in or register to post comments

काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी

गवि
Sun, 03/17/2019 - 01:39 नवीन
काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी सह्यांची मोहीम आवश्यक आहे असं वाटतं. लेखकाने ही लेखमाला पुढे लिहीपर्यंत हा धागा खाली जाऊ न देता प्रतिसाद द्यावेत.
  • Log in or register to post comments

या मालिकेला मात्र नाही माझी सही :-(

मिसळपाव
गुरुवार, 03/21/2019 - 16:45 नवीन
या मालिकेला मात्र नाही माझी सही :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुढचा भाग येउद्या...

amit_m
Mon, 03/18/2019 - 03:44 नवीन
पुढचा भाग येउद्या...
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

विजुभाऊ
Mon, 03/18/2019 - 11:16 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments

पुढच ा भाग येऊ द्या लवकर 

सुचिता१
Sat, 03/23/2019 - 22:49 नवीन
पुढच ा भाग येऊ द्या लवकर 
  • Log in or register to post comments

पुढच ा भाग येऊ द्या लवकर 

सुचिता१
Sat, 03/23/2019 - 22:49 नवीन
पुढच ा भाग येऊ द्या लवकर 
  • Log in or register to post comments

पुढचा भाग येउद्या...

diggi12
Mon, 12/14/2020 - 01:24 नवीन
पुढचा भाग येउद्या...
  • Log in or register to post comments

रामदास काका,

NAKSHATRA
Sun, 01/24/2021 - 19:07 नवीन
रामदास काका, लिवा की पुढला भाग :) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा