✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नराधम

स
सुबोध खरे यांनी
Sat, 07/01/2023 - 20:50  ·  लेख
लेख
नराधम आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२. त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता. या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती. मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे. असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा. मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही. एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे. एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या. मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही. अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती. या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
28437 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

नराधमच नसून मूर्खही

अगम्य
Mon, 10/27/2025 - 13:51 नवीन
आज दोन वर्षांनी हा धागा कसा पाहण्यात आला ठाऊक नाही. पण तो नवरा नराधमच नसून मूर्खही आहे. स्वतःचे मूल असणे हा त्याचा उद्देश असेल तर तो साध्य होण्याच्या दृष्टीने काहीच प्रगती होत नाहीये. त्याच्या बायकोला मूल होऊ शकत नाही असेही नाही. ती केवळ मूल आपल्या पोटात वाढवू शकत नाही. तिचा जीव वाचवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रकिया आणि इतर कॅन्सरचे उपचार हे पहिले तात्काळ पाऊल. त्यासाठी खूप खर्च आहे असेही नाही. त्यांनी आधीच त्यापेक्षा जास्त खर्च इतर गोष्टींवर केला आहे. त्यांनतर तिच्या बीजांडाचे त्याच्या शुक्राणूंसह IVF फलन करून इतर कुठल्या सरोगेट स्त्रीच्या पोटात गर्भ वाढवून तो नवरा व त्याची बायको ह्या दोघांचेही स्वतःचे जैविक मूल प्राप्त करून घेणे ह्यात त्याला काय प्रॉब्लेम आहे? २०२३ मध्ये सरोगसीची प्रोसेस फार कठिण नसावी. दुसरे लग्न, दत्तक वगैरे भानगडींची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा