मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

चांदणे संदीप · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली. कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले! भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू! नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली. अचानक पलिकडे एक बैल मरून पडलेला दिसला तसं दचकून तिनं मागं पाहिलं! "कवर इचका खायचा?" सासूच्या शब्दांनी तिचा थरकाप उडाला! तिला मख्ख बघून धाकलीच्या पाठीत गुद्दा बसला आणि दुसरा विळा मटणाच्या कालवणाकडे धडपडत निघाला! (सत्यघटनेवर आधारित!) - संदीप चांदणे

वाचने 12500 वाचनखूण प्रतिक्रिया 42

एस Wed, 09/30/2015 - 12:33
शंकरराव खरात यांचं आत्मचरित्र 'तराळ-अंतराळ' आठवलं. त्यातला 'मासकांड' हा शब्द अजूनही काळजाला घरे पाडत जातो...!

In reply to by खटपट्या

चांदणे संदीप Wed, 09/30/2015 - 13:01
एक प्रकारच खुरट, कुठेही उगवणार गवत असत ते. फारच जाड रबरासारखी पाती असतात याची. बहुधा दुष्काळी भागातच जास्त येत असावं. त्याची भाजी करून खातात. :(

In reply to by तुडतुडी

चांदणे संदीप Wed, 09/30/2015 - 16:27
विचक्याचा अर्थ वर मी प्रतिसादात सांगितला आहे. 'धाकली' म्हणजे धाकली सून! १०० शब्दांत कथा बसविण्यात मर्यादा असतात हे 'शतशब्दकथा' वाचकांना चांगलच माहिती आहे. असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :) Sandy

याॅर्कर Wed, 09/30/2015 - 16:15
जेव्हा भयंकर दुष्काळ पडतो तेव्हा अशीच स्थिती असते. त्यावेळेस माणसं एकमेकांना कापून खातील अशी परिस्थीती असते(?) 1630 चा भीषण दुष्काळ तुकारामांच्या काळातला, त्यानंतर 1972 चा दुष्काळ आणि आता....... ?माहित नाही. अर्थात दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात जास्त असतात.

In reply to by विश्वजित रामदास जाधव

चांदणे संदीप Wed, 09/30/2015 - 20:19
मित्रा माफ कर! :( खूप विचार केला मी शीर्षकावर, पण दुष्काळ आणि तत्सम काही शीर्षके काही केल्या समर्पक वाटेना. त्यात (दुर्दैवाने ही खरी घडलेली कथा असल्याने) त्या मेलेल्या बैलात त्या सासूला जे दिसले (होते) त्यात मला या कथेचे शीर्षक दिसले! कथा वाचलीस आणि प्रतिसाद लिहिलास याबद्दल आभारी आहे! ही कथा लिहून कुणालाही दु:खी करण्याचा हेतू नव्हता. पण जमलेच तर दुष्काळाची परिस्थिती कशी असते हे या एका छोट्या कथेतून लिहिण्याचा प्रयत्न केला तसेच कल्पनेपेक्षाही भयानक/वाईट प्रत्यक्षात घडू शकते/घडते हेही दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व वाचकांचेही आभार! Sandy

In reply to by बोका-ए-आझम

चांदणे संदीप Wed, 09/30/2015 - 23:26
भयानक आहे खरी! दुष्काळाच्या काळातल्या गोष्टी घरातल्या मोठ्यांकडून ब-याचदा कानावर पडल्यात! जसे की धान्य पुरवून पुरवून वापरावे लागत असल्याने १ किं ज्वारीत ३ हुलगे (हेही बहुधा दुष्काळी भागातलच धान्य, कारण पुण्या-मुंबैत जास्त लोकांना माहिती नाहिये) टाकून दळावे लागत होते पिठासाठी! हेही परवडले एक वेळेस पण मेलेला प्राणी (मग तो कुठलाही का असेना), तो कधी मेलाय माहित नाही, त्याची सडण्याची प्रक्रिया सुरू झाली का नाही माहित नाही, असा कुठूनतरी कापून आणून घरी शिजवणे आणि खाणे, भयानकच वाटते! माझ्या सुदैवाने मी तरी अजून स्वत: अशी भीषण दुष्काळाची परिस्थिती ना पाहिली आहे ना अनुभवली आहे आणि पाहण्याची इच्छाही नाहीए! बोका-ए-आजम कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

नाखु गुरुवार, 10/01/2015 - 10:32
अंगावर येणारी कथा. दाहक आणि थेट भाजणारे "चांदणे" आहे हे !!! पुलेशु

In reply to by नाखु

चांदणे संदीप गुरुवार, 10/01/2015 - 11:55
धन्यवाद नाखुकाका! दाहक ही कथा नक्कीच आहे पण "चांदणे" नाहीत! माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास दोन ओळींत मी असे सांगतो: रात्रीच्या ओठावर फुलते मुक्त आमुचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही 'चांदणे!'

आयुष्यात इंटरनेट कुठेच नीट मिळेना झालंय गेले काही दिवस! माफी काय मागता.. मला म्हणायचं होतं की तोंडाला पाणी नाही सुटलं पण डोळे ओलावले.. आणि तुम्ही वरती प्रतिक्रियेत सांगितलेले तुमच्या कथेचे एकुणेक हेतू पूर्ण झालेत :) शीर्षक तर खरच बेष्ट आहे या कथेसाठी ते!

चांदणे संदीप Sat, 10/03/2015 - 14:22
अजूनही इथे वाचून प्रतिक्रिया येत आहेत हे पाहून बरे वाटले! यावर्षी जर आजिबातच पाऊस झाला नसता तर परिस्थिती झाली असती याचा विचारच नाही करवत. उशीरा का होईना रिमझिम का होईना पाऊस सुरू आहे! रातराणी, स्रुजातै प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!

चित्रगुप्त Wed, 09/06/2023 - 19:55
२०१५ मधली ही शशक वाचून दचकायला तर झालंच, पण असंही वाटून गेलं की या मधल्या काळात अनेक रक्तरंजित सिनेमे, सिरीयली, क्राईम पॅट्रोल सारखे कार्यक्रम, बातम्या वगैरे बघून वाचकांचं मन आता जरा निब्बर, निर्ढावलेलं तर झालेलं नसेल ? 'बायपास' हा नवाजुद्दीन-इरफानचा लघुपट आठवला. (कदाचित 'कोयत्या'मुळे) बघितला नसेल त्यांनी अवश्य बघावा. https://www.youtube.com/watch?v=nq-I0aVPRcw

nutanm गुरुवार, 09/07/2023 - 23:02
शहरात 1972 चा पाणी व कडक उन्हाचा दुष्काळ अनुभवलाय. शाळेतून‌. येताना पोटात भूक , शिकून. त्या रणरणत्या उन्हात थकलेलो 14/15 वया वर्षांची आम्ही मुले घरी येताना नको नको होई व घरी येऊन आयते केलेले‌जेवणही जात नसे फक्त आयते असून घरच्याच परिस्थितीने. अतिशय पिळपिळीत बेचव जेवण असे व तेच तेच खावे लागे. तेही हाताने घेऊन व मुली म्हणून मागेचेही आवरावे लागे व्यवस्थित. जेअतिशय कंटाळवाणे होई आई कधीच वाढत नसे ती व तिची झोप व वाचन चांले.

In reply to by nutanm

चांदणे संदीप Fri, 09/08/2023 - 16:27
१९७२ च्या दुर्दैवी दुष्काळातलाच हा प्रसंग आहे. असं काही सांगायला नको वाटतं पण अशा कितीक दु:खद, दुर्दैवी, वाईट-विचित्र प्रसंगांबद्दल ऐकलेलं आहे की एक जाडजूड पुस्तक तयार होईल. पण वाचकांना दु:खी का करावं? असा विचार मनात येतो. वडील आधी होते, आता सध्या बहीण पोलिसात असल्यामुळे, त्यांच्याकडूनही असे काही किस्से समजतात की आपण नक्की एकविसाव्या शतकात आहोत का असा प्रश्न पडतो. असो, शतशब्दकथा हा प्रकार मिपावर आतिवासताईंनी आणला. मला तो विशेष आवडला म्हणून तेव्हा असं काहीबाही लिहिलं गेलं. आता नाही लिहवत. सं - दी - प

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त Sat, 09/09/2023 - 18:41
१९७२ साली मी २१ वर्षांचा होतो. वास्तव्य इंदुरात होते. तिकडे दुष्काळ वगैरे काही जाणवले नव्हते. कोणकोणत्या प्रांतात होता दुष्काळ ? थोडेसे आठवते आहे की महाराष्ट्रातून बरेच लोक त्याकाळी आले होते.

In reply to by चित्रगुप्त

तुषार काळभोर Sun, 09/10/2023 - 13:10
१९७२-७३ याच काळात पुण्यात सर्वाधिक स्थलांतर झाले. हडपसरमध्ये नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील, बीड, इंदापूर, करमाळा, सोलापूर, भिगवन, पंढरपूर, लातूर, उस्मानाबाद पट्ट्यातील हजारो कुटुंबे त्या काळात आली आणि स्थायिक झाली. आताही गुलटेकडीच्या मार्केटयार्डात काम करणारे निम्म्याहून अधिक हमाल आणि कर्मचाऱ्यांचे मूळ गाव पुणे सोलापूर मार्गावर आहे. सांगली आणि साताऱ्याच्या दुष्काळी पट्ट्यातील कुटुंबे कात्रज-बिबवेवाडी-धनकवडी परिसरात स्थायिक झाली. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव, मंचर, जुन्नर आणि पुरंदर भागातील कुटुंबे मुंबईला गेली. त्याशिवाय पुरंदर मधील लोकांनी रसवंतीगृहे महाराष्ट्रभर सुरू केली. आंबेगाव मंचर, जुन्नर भागातील कुटुंबे भोसरी परिसरात आली.