रमजानी लाईफ ...

Primary tabs

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
25 May 2019 - 11:07 am

यंदा ७ मे पासून ‘रमजान महिन्याला प्रारंभ झाला. भारतात मुस्लिम वस्ती नसलेल्या भागात रहात असल्यास
आपल्याला ‘रमजान’ बद्दल फारशी माहिती नसते. वर्तमानपत्रात मुस्लिम भागातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
आणि राजकीय नेत्यांच्या इफ्तार पार्ट्यांचे फोटो अधून-मधून येतात त्यामुळे निदान रमजान चालू आहे ते
तरी समजायचं. नाहीतर रमजान ईद ची सुट्टी आल्याशिवाय असला काही प्रकार महिनाभर चालू आहे
ह्याचा पत्ता देखील नसायचा. रमजान म्हणजे दिवसभर रोजे (कडक उपास) आणि संध्याकाळी चिकन-
मटण हाणत इफ्तार इतकीच मर्यादित माहिती मला होती.

काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त मस्कतला (ओमान देशाची राजधानी) आलो. मुस्लिम आखाती देशांत रमजान चं
सोवळं-ओवळं एकदम कडक असतं. काहींनी तर रोजे चालू असताना तुम्ही जेवण पार्सल जरी घेऊन जाताना
पोलिसाने पाहिलं तर जेलमध्ये टाकतात इथपर्यंत वाट्टेल ते सांगितलं होतं. थोड्याच दिवसांत रमजान चे आगमन
होणार होते. त्यामुळे बरीचशी उत्सुकता (आणि थोडी भीती) होती. पुढच्या काही दिवसांत ऐकावे ते नवलच अश्या
अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या.रमदान ह्या नावापासूनच वेगळेपण जाणवलं. सगळीकडे रमदान करीम
(रमजान महिन्याच्या शुभेच्छा ) चे मोठे बोर्ड्स लागले. अरेबिक भाषेत ज अक्षर नसल्याने रमदान असा
उच्चार करत असतील असं सुरुवातीला वाटलं. नंतर समजलं कि मूळ शब्द रमदान हाच आहे. रमजान
हा अपभ्रंश आहे!

हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही कॅलेंडर चंद्रावर आधारित आहें. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा (इंग्रजी कॅलेंडर) १०-
११ दिवसांनी कमी आहे. त्यामुळे इंग्रजी महिन्यांशी जुळवून घेण्यासाठी हिंदू धर्मात दर तीन वर्षांनी
अधिक मास येतो. असला (जुळवून घेण्याचा) प्रकार मुस्लिमात नाही. त्यामुळे इस्लामिक कॅलेंडर दर वर्षी
दहा दिवसांनी अलीकडे सरकते. यंदा रमजान मे च्या उन्हाळ्यात सुरु झालाय; तो अजून काही वर्षांनी
जानेवारीच्या थंडीत येईल!

जसं अधिक महिन्यात केलेली धर्मकृत्ये, दान, जप इत्यादी अधिक पुण्यप्रद आहेत अगदी तसेच रमजान
बद्दल देखील आहे. अधिक महिन्यात केलेल्या दानाचे एरवीपेक्षा दसपट पुण्य लाभते; तर रमजान मध्ये
सत्तरपट जास्त! त्यामुळे खरंतर रमदान हेच नाव जास्त योग्य वाटतं. अधिक महिन्यात जावयाला
भेटवस्तू देतात. मुस्लिम मात्र रमदान मध्ये असलं काही करत नसावेत. असं असतं तर ज्यांच्या दोन-तीन
बायका आहेत त्यांची तर दिवाळीच!

1. Food Pack

सर्व मॉल्स मध्ये अन्नदानासाठी सोईस्कर असे फूड पॅक्स बनवलेले असतात
सूर्योदय ते सूर्यास्त (सुहूर ते इफ्तार) असे सुमारे १२-१४ तास पाणीदेखील प्यायचे नाही. इतकंच काय तर
थुंकी जरी गिळली तरी कडक उपासावर पाणी पडते!

आखाती देशांत नेहेमीच्या साडेआठ तासांऐवजी मुस्लिम लोकांना केवळ सहा तास काम करावे लागते. सर्व कचेरीच्या कामाच्या वेळा बदलून जातात.
केवळ मुस्लिम लोकांचाच नाही तर सर्वांचाच दिनक्रम बदलतो.
रोजे सुरु असण्याच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणी खाण्या-पिण्यावर बंदी असते. रमदान सुरु होण्याच्या
आदल्या दिवशी आमच्या ऑफिस बॉयने सर्व वॉटर डिस्पेन्सर्स ना कव्हर घालून बंद करून टाकले!
टेबलावर लोकांना दिसेल अशा प्रकारे पाण्याची बाटली देखील ठेवलेली चालत नाही. कोणाला न दिसेल
अश्या ठिकाणी बाटली ठेऊन अगदीच तहान लागल्यास कोणी बघत नाही ह्याची खात्री करून एक-दोन
घोट सुमडीत प्यावे लागते. दुष्काळग्रस्तांसाठी जशी तात्पुरती चारा-छावणी केंद्रे उभारतात तसं मुस्लिमेतर
लोकांसाठी एका आडबाजूच्या छोट्या खोलीत बंद दारामागे चहा-पाण्याची सोय केली जाते.

2. Water

सर्व वॉटर डिस्पेन्सर्स महिनाभर बुरख्याआड

आपल्या इथे जशी दसऱ्याला नवीन वस्तू (विशेषतः वाहन) खरेदी करायला झुंबड उडते तशी इकडे पवित्र
रमजान मध्ये खरेदीसाठी गर्दी होते. मुस्लिम लोकं साधारण सकाळी ८ ते दुपारी २ असं सहा तास काम
करून घरी जातात. दुपारची विश्रांती वगैरे घेऊन संध्याकाळी सहाच्या सुमारास मशिदीत नमाज (मगरीब)
साठी जमतात. त्यानंतर खजूर, ज्यूस वगैरे घेऊन उपास सोडतात. साधारण आठ वाजता अजून एक
नमाज (इशा). मग सुरु होतो ‘इफ्तार’. हे सगळं आटपायला रात्रीचे नऊ वाजतात. त्यानंतर खरेदीसाठी
सहकुटुंब बाहेर पडतात. त्यामुळे रात्री १० ते १२ सगळे मॉल्स गर्दीने तुडुंब भरून जातात. शॉपिंग मॉल्स
विशेषतः ऑटोमोबाईल शोरूम्स लायटिंग ने झगमगत असतात.

3. Tent

माझ्या ऑफिसमध्ये रमदान निमित्त उभारलेला शामियाना. ग्राहकांना इकडे आरामात बसून ओमानी कॉफी आणि खजूर चा आस्वाद घेता येतो

खाणं-पिणं रात्री १२-१ पर्यंत चालू असतं. पुन्हा पहाटे तीनला उठून सुहूर च्या आधी खायचं कारण पुढे
संध्याकाळी ७ पर्यंत कडक उपास! हे असं महिनाभर करणं म्हणजे काही खायचं काम नाही हं! दिवसभर
चालू असणारी हेअर कटिंग सलून्स रमदान मध्ये दुपारनंतर चालू होतात रात्री उशिरापर्यंत पर्यंत सुरु
असतात. दुपारी फारशी गर्दी नसतेच... बहुतेक रोजे चालू असताना बिनपाण्याने करत असावेत!

4. Barber

हेअर कटिंग सलून्स दुपारी १ ते रात्री १ पर्यंत चालू. नमाज आणि इफ्तारसाठी संध्याकाळी बंद

अर्थात लहान मुलं, आजारी आणि म्हातारी लोकं, गर्भवती स्त्रिया इ. ना रोजे करणे बंधनकारक नाही.
केवळ दिवसा उपाशी राहणे म्हणजेच रोजे करणे असा अर्थ नसून ह्या महिन्यात खोटे बोलणे, शिवीगाळ /
मारामारी करणे देखील चालत नाही. ह्या काळात बायका मेकअप देखील करीत नाहीत (त्यामुळे अनेक
बायका रंग उडालेल्या मूर्तीप्रमाणे दिसतात आणि पटकन ओळखू येत नाहीत).

5. Nasal_Drops

चुकून नाक चोंदलं आणि नाकात ड्रॉप्स घातले तरी रोजा खल्लास

रोजे केल्याने अनेकांचे महिन्याभरात चार-पाच किलो वजन कमी होते. त्याचप्रमाणे एकादशी दुप्पट खाशी
असे प्रकारही घडतात. रात्री उशिरापर्यंत गोड आणि तेलकट खाणे, रात्रीची अपुरी झोप; त्यामुळे होणारे
अपचन झाल्याने उपास करूनही अनेकांच्या अंगावर अधिक मांस येते. अधूनमधून उपास करण्यामुळे
शरीराच्या अनेक अवयवांना आराम मिळतो आणि प्रकृती उत्तम राहायला मदत होते. हिंदू धर्मात देखील श्रावणी
सोमवार, चतुर्थी, निर्जला एकादशी, नवरात्र, हरतालीका, करवा-चौथ इत्यादी वर्षातील अनेक दिवस वेगवेगळ्या
प्रकारचे उपवास करायला सांगितले आहे. परंतु हिंदूंमध्ये दुर्दैवाने एकी नसल्याने आणि कुठल्याच गोष्टीचे
कंपल्शन नसल्याने फारसे कोणी हे करताना दिसत नाहीत. ह्या उलट मुस्लिम धर्मीय सर्वच लोक रमजान पाळत
असल्याने एकत्र उपास तर करतातच; शिवाय नमाज च्या निमित्ताने दिवसातून ३-४ वेळा मशिदीत भेटतात.
ह्यामुळे धर्माबद्दलचा आदर आणि परस्परांतील बंधुभाव वाढतो. बऱ्याचदा वाटतं कि हिंदू धर्मात देखील काही
गोष्टी कंपलसरी केल्या पाहिजेत.

आपल्या पंचांगात पुढील अनेक वर्षांचे चंद्रोदय, ग्रहण इत्यादी सर्व माहिती तपशीलवार दिलेली असते. महत्वाचं
म्हणजे दिलेल्या तारीख-वेळेनुसार बिचारा चंद्र देखील मुकाट्याने उगवतो आणि मावळतो. मुस्लिम लोकांची
पद्धत जरा वेगळी आहे. आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले असूनही जगभरात Moon Sighting कमिट्या
आहेत! महिना २९ दिवसांचा आहे का ३० दिवसांचा हे प्रतिपदेची चंद्रकोर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसल्यावरच
ठरवले जाते. मगच रमदान सुरु झाल्याची घोषणा केली जाते. दुबई आणि मस्कत शहरे बऱ्यापैकी जवळ
असूनही दुबईवाल्याना ६ मे ला चंद्र दिसला पण इकडे मस्कत मध्ये मात्र चंद्रदर्शन नाही झालं! त्यामुळे
ह्या वर्षी ओमानमध्ये रमदान एक दिवस उशीरा चालू झाला.

6. Moon_sighting

कमिटी सोबत चंद्र आहे साक्षीला

एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या क्लायमॅक्सला लाजवेल तितकी उत्कंठा आणि चर्चा ईद ची सुट्टी कधीपासून?
ह्यावर दरवर्षी असते. कालनिर्णय मध्ये ईद कधी आहे, सौदी अरेबियाने कधी सुट्टी दिलीये इथपासून ते आतल्या
गोटातून खबर काढण्यापर्यंत अनेक उद्योग दरवर्षी केले जातात. वीकएंड धरून पाच दिवस सुट्टी असते. सर्वांना
सुट्टीचे प्लॅनिंग करायचे असल्याने विमान तिकिटांचे दर वाढण्यापूर्वी बुकिंग करण्यासाठी ही सगळी धडपड.
पूर्वी कमिटीला चंद्र दिसल्यानंतरच सुट्टीची घोषणा व्हायची. गेल्या काही वर्षांपासून मात्र ईदच्या चार-पाच दिवस
आधीच सुट्टी जाहीर करून टाकतात. रोजे कधीपर्यंत चालू ठेवायचे ते मात्र Moon Sighting कमिटी ने दिसला गं
बाई दिसला म्हणल्यावरच ठरवले जाते.

बदलत्या काळानुसार ओमान मध्ये देखील मुस्लिमेतर लोकांसाठी गेल्या काही वर्षात स्वागतार्ह बदल केले आहेत.
पूर्वी दिवसा बाहेर अजिबातच जेवण मिळायचं नाही. आता सर्व मॉल्समध्ये फूड-काउंटरवर पार्सल मिळते. पूर्वी
हॉटेल्सच्या मागल्या दाराने काळ्या पिशवीत जेवण मिळायचे. आता मात्र रीतसर Ramadan Take Away
timings चे बोर्ड्स आहेत. सिनेमाचे शोज देखील रात्री ९ ऐवजी दुपारी २ नंतर चालू केले आहेत. ह्या सर्व बदलांमुळे
पूर्वीपेक्षा परिस्थिती खूपच सुसह्य झाली आहे.

7. Take_Away

मुस्लिमेतर लोकांसाठी पार्सलची सुविधा दुपारी उपलब्ध

सुरुवातीला रमजान महिना म्हणजे जाच वाटायचा. सार्वजनिक ठिकाणी दिवसभर साधं पाणी प्यायची
देखील चोरी. आख्खा महिना सर्व हॉटेल्स दिवसा पूर्णपणे बंद. काही ठिकाणी जेवणाचे पार्सल मिळते; ते
देखील मागच्या दाराने गुपचूप चालू असते. सिनेमाचा शो देखील एकच आणि तो फक्त रात्री ९ नंतर.
ऑफिसमध्ये चहा टेबलवर येत नाही, दुपारी दोन वाजता रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक अश्या अनेक गोष्टींमुळे
गैरसोय. मात्र कालांतराने ह्याची सवय होत गेली. लवकरच रमदान महिन्याचे फायदे जाणवू लागले.
रोजच्या रुटीनमध्ये हा एक महिना हवाहवासा बदल घडवतो. ऑफिसच्या वेळा बदलतात. दुपारी दोन नंतर
ऑफिसमध्ये एकदम शांतता असल्याने निवांतपणे काम करता येते. एरवी जागेवर बसूनच काम करता
करता चहा प्यावा लागतो. ह्या महिन्यात सहकाऱ्यांशी गप्पा मारत उभ्या-उभ्या (आडोशाच्या खोलीत)
चाय पे चर्चा’ रंगते. संध्याकाळी सहा ते आठ कर्फ्यू लागावा तशी सामसूम. दीक्षित डाएट सुरु करण्यास
हा महिना आदर्श! दिवसभर हॉटेल्स बंद. तुमच्यासमोर कोणीच खात-पीत नसल्याने आपल्याला सुद्धा
भूक सहन करणे सोपं जातं.

पुलं म्हणतात तसं शेजारच्यांचा रेडिओ ठणाणा करत असला कि ती गाणी माझ्याचसाठीच लागली आहेत
असं समजून मी ऐकायला लागतो. वैताग कमी होतो आपला. महिनाभर दिवसा साधं पाणी पिण्यावर
सुद्धा निर्बंध असा विचार करण्याऐवजी; नेहेमीच्या रुटीन मधून एक छान बदल असा दृष्टीकोन
ठेवल्यास आपली देखील रमजानी लाईफ होते.

सरनौबत

Ramjan

संस्कृती

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

25 May 2019 - 11:19 am | महासंग्राम

भारी लिहिलंय. तुमच्या लिखाणानुसार भारतात आणि सौदीतल्या रमदान मध्ये बराच फरक आहे असं वाटते विशेषतः इफ्तारी च्या बाबतीत. कालच पुण्यातल्या कौसर बागेत खादाडी साठी जाणं झालं त्यामुळे जे जाणवलं. पुलेशु.

बाकी फोटो दिसत नाहीयेत त्याच बघा काहीतरी.

भारतात असतात तसे इकडे पण इफ्तारच्या वेळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात. बहुसंख्य कॉफी शॉप्स केरळी लोकांची असल्यामुळे डाळ वडा, मलबारी छोटे सामोसे, उडीद वडे, मिरची भजी असले प्रकार मिळतात. परंतु हे सर्व एरवी देखील मिळत असल्याने आवर्जून जाऊन खावं असं विशेष काही नाही.

सरनौबत साहेब सौदी नव्हे मस्कत (ओमान) येथे वास्तव्यास दिसतात. कट्टरतेच्या बाबतीत (खास करुन इतर धर्मीयांच्या बाबतीत) ओमानी पंथीय विशेषत: स्वतः सुल्तान बरेच मवाळ आहेत हे लेखक महोदयांनी नोंदवलेले नाही.

(मी मस्कतात चार-सहा दिवस त्यांचा सरकारी (चांगल्या अर्थाने) मेहमान असताना मुस्लिमेतर असल्याने दारु उपलब्ध होती सरकारी होस्ट त्याला स्वतःला घेण्याची परवानगी नसताना मला घेण्यासाठी आग्रह करत असे आणि मला एकट्याने घेण्याची हौस नसल्याने मला महोदयांचा आग्रह नाईलाजाने मोडून पाडावा लागला होता असे आठवते)

यशोधरा's picture

25 May 2019 - 12:14 pm | यशोधरा

छान लिहिलंय. आवडलं.
दिसतायत की फोटो.

महासंग्राम's picture

25 May 2019 - 12:43 pm | महासंग्राम

तै आमच्याकडे फोटो इल्ले ब्राऊजर चा मॅटर असणार बहुदा

कुमार१'s picture

25 May 2019 - 12:59 pm | कुमार१

आवडले. 'रमादान करीम' वातावरणाचा अनुभव घेतलाय !

सरनौबत's picture

25 May 2019 - 2:11 pm | सरनौबत

धन्यवाद! दुबई मध्ये रमदान फारसा जाणवत नाही. तिकडे जास्तीचे पैसे भरून हॉटेल्स भर दुपारी देखील चालू ठेवता येतात. काही वर्षात ओमानमध्ये देखील हळूहळू असं चालू करतील बहुदा

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 4:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौदी अरेबियातही, दुपारच्या नाही, पण रात्रीच्या जेवणाच्या वेळी, प्रार्थनेची बांग झाली की रेस्तराँ दरवाजे बंद करतात आणि सर्व खिडक्यांवर पडदे ओढून घेतात. आधीपासून आत असलेले लोक आपले जेवण निर्वेध चालू ठेऊ शकतात. मात्र, सर्व दुकाने आणि सुपरमार्केट्स कडेकोट बंद असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिलंय.

जुन्या आठवणी ताज्या झाल्या ! :)

सगळे फोटो नीट दिसत आहेत.

पद्मावति's picture

25 May 2019 - 1:36 pm | पद्मावति

खुप मस्तं लिहिलंय.

जालिम लोशन's picture

25 May 2019 - 2:44 pm | जालिम लोशन

सांगण्याची हातोटी सुरेख .

शेखरमोघे's picture

26 May 2019 - 3:42 am | शेखरमोघे

छान माहितीपूर्ण लिखाण. सुयोग्य चित्रान्मुळे आणखीनच रन्जक.

माझा इन्डोनेशियातील अनुभव - रमादानच्या आधीपासून "selamat menunaikan ibada puasa" (आपण उपवासाच्या रूपात करत असलेल्या प्रार्थनेकरता शुभेच्छा - इन्डोनेशियात जरी "बहासा इन्डोनेशिया" बोलली जात असली तरी ती रोमन लिपीत लिहिली जाते) असे प्रचन्ड मोठमोठे रन्गीबेरन्गी फलक सगळीकडे लागतात. Iftar (म्हणजे इन्डोनेशियातील buka puasa) करता प्रथम "उपास सोडण्याकरता" बर्‍याच वेळा केळी वगैरे गराची फळे, फळान्चाआणि काकडी इत्यादीन्चा रस असे चविष्ट आणि गोडसर पातळ पेय बनवले जाते, त्यानन्तर नमाज आणि मग समारम्भाने मोठ्या प्रमाणावरचे जेवण.

"उपास सोडण्या"करता भारताबाहेर इतरत्रही फक्त खजूराच्या काही बिया किन्वा फळान्चे काही तुकडे असे काहीतरी थोडेच खाऊन, पाणी पिऊन मग नमाजानन्तर मोठे जेवण हा प्रघात पाहिला. भारतात मात्र रस्त्यातच उपवास सोडणारे सर्रास काहीही तळलेले, तिखट आणि एकूणच काहीही अरबट चरबट खायला तयार वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2019 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा

तिकडे अत्तर , सूरम्या चे स्टोल नै लागत का हो रमदान मधे?

टवाळ कार्टा's picture

27 May 2019 - 4:12 am | टवाळ कार्टा

उत्तम जमलेला लेख आहे

बऱ्याचदा वाटतं कि हिंदू धर्मात देखील काही गोष्टी कंपलसरी केल्या पाहिजेत.

हे तुमचे वैयक्तिक मत आहे असे धरुन चालतो पण हे वाक्य म्हणजे उत्तम जमलेल्या शिर्यात उंदीर सापडावा तसे आहे

मराठी_माणूस's picture

27 May 2019 - 11:23 am | मराठी_माणूस

मलाही खालील वाक्य खटकले

परंतु हिंदूंमध्ये दुर्दैवाने एकी नसल्याने आणि कुठल्याच गोष्टीचे
कंपल्शन नसल्याने फारसे कोणी हे करताना दिसत नाहीत.

असल्या गोष्टी साठी जबरदस्ती नसणे हे चांगले का वाइट ?

सरनौबत's picture

28 May 2019 - 12:33 pm | सरनौबत

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लेखाचा एकंदर (हलका-फुलका) मूड बघता (मध्येच) हिंदू धर्माबद्दल लिहिलेलं थोडं वेगळं वाटणं साहजिक आहे. परंतु रमदान बद्दल लिहिताना; हिंदू आणि मुस्लिम धर्मातील उपवास ह्या प्रकारावर विचार करताना जे मला वाटलं ते लिहिलं. हा विषय देखील खूप खोल आहे आणि लेखाचं ते प्रयोजन देखील नाही. बाकी लेख आवडल्याबद्दल धन्यवाद :-)

समीरसूर's picture

27 May 2019 - 11:36 am | समीरसूर

लेख सुंदरच आहे पण हा इतका कट्टरपणा (कुठल्याही धर्मातला) खरोखर आवश्यक आहे का असा विचार नेहमी मनात येतो. औषध घेऊनही उपवास मोडत असेल तर मग कठीण आहे. या उपवासांचा रिझल्ट काय असेल हे ही कुठेतरी लिहून ठेवले असेलच. त्याची अभिलाषा ठेवून उपवास करणे म्हणजे परत मोहात अडकणेच झाले...असो. हे सगळ्याच धर्मात आहे आणि घट्ट रुजले आहे. जोपर्यंत मनुष्यजात आहे तोपर्यंत कर्मकांडे असणारच आहेत हे आपण स्वीकारायलाच हवे.

उपेक्षित's picture

27 May 2019 - 1:28 pm | उपेक्षित

सहमत...

बाकी लेख उत्तम आणि नवीन माहिती मिळाली.

नावातकायआहे's picture

27 May 2019 - 7:00 pm | नावातकायआहे

"पीयर प्रेशर" (मराठी शब्द?) हे हि एक कारण आहे!

सरनौबत's picture

28 May 2019 - 12:44 pm | सरनौबत

मी देखील (लेखानिमित्त) ह्याबद्दल अजून माहिती काढायचा प्रयत्न केला. ह्या प्रकारच्या उपवासाने म्हणे पहिल्या दोन दिवसात ब्लड शुगर कमी होते, नंतर पुढचे १३ दिवस दिवसभर आतड्यांना आराम मिळत असल्याने हानिकारक टॉक्सिन्स (कॅन्सर च्या पेशीसकट) ह्यात बाहेर पडतात / जळतात. परंतु हे दिवसाच का करायचं, पाणी प्यायलं तर ह्यात अडथळा येतो का ह्याची समाधानकारक उत्तरं नाही मिळाली.

माहितगार's picture

29 May 2019 - 1:51 pm | माहितगार

सरनौबत साहेब लेख आवडला. माहितीवरील शांतताप्रीय धर्मीय नरेटीव्हचा प्रभाव असणे समजण्यासारखे आहे, खासकरून अंतस्थ गोटातील माहिती कळण्यास पुरेसे मार्ग उपलब्ध नसताना.

आपण म्हणता तसे टेक्निकली खुपसे बंधन न घातलेले अधून मधूनचे हिंदू उपवास एका अटीवर बरे असू शकतात; जर त्यातून कार्बोहायड्रेड आणि तुपाचा प्रभाव नसलेले पदार्थ वगळले व जसे फळे दूध आरोग्यकारक पदार्थ वापरले तर.

हिंदू निरहाली उपवासात सहसा नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ उपवासाच्या दिवशी न खाता, नेहमी न खाल्ले जाणारे पदार्थ खाल्ले जातात हे पहाता हिंदूंनी प्रोटीन्सच्या दृष्टीने दाळींचा समावेश उपवासाच्या पदार्थात केल्यास उपकारक ठरू शकेल असे माझे व्यक्तिगत मत आहे.

शांतताप्रीय धर्मीय रमादानच्या उपवासाबद्दलची खरी हकीकत आताशा धर्मत्याग करून नास्तिक बनलेल्या पुर्वाश्रमीच्या प्रभृयींकडून सोशल मिडीयावर बर्‍या पैकी उपलब्ध होताना दिसते आहे. एकुण सणाचे वातावरण खरेदी संध्याकाळची आस्वादक जेवणे आप्तस्वकीयांना भेटणे या स्वाभाविकपणे यातील सकारात्मक बाबी आहेत नाही असे नाही.

पण नाण्याची दुसरी बाजू आपण अप्रत्यक्षपणे वरील प्रतिसादात नोंदवल्याप्रमाणे खाण्याचे चक्र दिवसा एवजी रात्री राबवले जाते . प्रथम दर्शनी तेवढाच काय तो फरक दिसतो.

यात उपवासा दरम्यान पाण्याचा थेंबही न पिणे हे अगदी सुदृढ व्यक्तीच्या आरोग्यासही हितकारक नाही हे लक्षात घेणे महत्वाचे असावे. एअर कूल्ड वातावरण शारीरीक श्रम नसलेले काम किंवा दिवसा आराम करत असल्यास पाणि न पिण्याने होणारे डिहायड्रेशनचा त्रास होतच असतो पण कमी जाणवतो. अर्थात यांच्यातील श्रमीक वर्गास विशेषतः जिथे ज्यांना एअर कूल्ड वातावरण आणि आराम विषयक मुभा उपलब्ध नाहीत अशांसाठी पाणि न पिण्याची अट हानीकारक असते. आजारी माणसांसाठी धार्मिक मुभा असली तरी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी पाणी अनुपलब्ध केले जाते तेव्हा ते अधिक तापमानाच्या देशातील श्रमिकांकासाठी जीवघेणे सुद्धा ठरू शकते.

आपण म्हणता तसे लहान मुलांनाही या उपवासातून वगळले जाते म्हणताना केवळ वयात न आलेल्या मुलांमुलींना वगळले जाते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. खासकरून मुली सहसा लौकर वयात येतात आणि त्यांच्या शरीराच्या वाढीला सक्तीच्या उपवासाची अंधश्रद्ध पद्धत आरोग्यदायक ठरत नाही हे लक्षात घेणे महत्वाचे असावे..

या त्यांच्यातील उपवासी प्रथा बर्‍यापैकी अंधश्रद्धा परस्परांवर लादली जाते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पाळी चालू असलेल्या दिवशी उपवासाचे बंधन नसते, पण अगदी युरोपात रहाणार्‍या आयांकडून आपल्या मुलींचे पॅड्स पाळी खरोखर चालू आहे ना हे पहाण्यासाठी तपासली जातात ह्याची माहिती सोशल मिडियामुळे कानोकानी नव्हे तर ज्यांच्यावर असे प्रसंग आले अशा मुलींनी वर्णन केलेली दिसतात.

माझ्या मनावर नियंत्रण ठेवणे मला कठीण जाते म्हणून मी इतरांच्या खाण्या पिण्यावर बंधन आणतो यात मनावर नियंत्रण आणण्याच्या हेतुचा मुदलातच र्‍हास झालेला असतो. स्वतःच्या उपवासामुळे इतराम्च्या खाण्यावर बंधनांच्या जबरदस्तीस त्यांच्यातील नास्तिकच जोरदार विरोध नोंदवताना मागील काही वर्षांपासून दिसतात.

आपण या महिनाभराच्या उपवास कालावधीत काही जणांचे वजन कमी होण्याचा फायदा नोंदवला असला तरीही धर्मत्याग केलेल्या नास्तिकांकडुन येत असलेल्या माहिती नुसार आपण एकादशी दुप्प्ट खाशी म्हणतो ती मंडळी उपवासाच्या महिन्यात तीप्प्ट ते चौपट खातात हे एक्झॅगरेशन नव्हे तर या परिवार समुदाय देशातून अन्न खरेदी कैक पटीने या कालावधीत वाढते. यात बर्‍यापैकी अन्नदानाचा समावेश असलातरीही बहुतांश मंडळीनी स्वतःचे वजन महिना अखेर वाढवलेलेच असते. कारण या काळात नाही म्हटले तरी आरामाचे प्रमाणही अंशतःतरी वाढलेलेच असते.

दिवसभराच्या आणि प्रदिर्घ उपवासाचा आणखी एक विचीत्र परिणाम मनःशांती हा उपवासाचा प्रसिद्धीस दिलेला उद्देश बाजूस राहून बर्‍याचदा व्यक्तिगत आणि काही वेळा सामुहीक पातळिवरील कलह मारामार्‍या होतात याकडेही बरीचशी नास्तिक मंडळी लक्षही वेधतात आणि त्याची उदाहरणे असलेले व्हिडीओअही हल्ली समोर येताना दिसतात..

असो.

अभ्या..'s picture

27 May 2019 - 1:40 pm | अभ्या..

मस्त माहिती,
असंच ईदच्या सेलिब्रेशनला काहितरी जंगी होत असेल तर अवश्य लिहा.

स्मिता श्रीपाद's picture

27 May 2019 - 3:10 pm | स्मिता श्रीपाद

छान लेख.
मीना प्रभुंच्या ईजिप्तायान मद्धे पण रमादान चे छान वर्णन आहे त्याची आठवण झाली.

अवांतर -
हिंदूंमध्ये दुर्दैवाने एकी नसल्याने आणि कुठल्याच गोष्टीचे
कंपल्शन नसल्याने फारसे कोणी हे करताना दिसत नाहीत. ह्या उलट मुस्लिम धर्मीय सर्वच लोक रमजान पाळत
असल्याने एकत्र उपास तर करतातच; शिवाय नमाज च्या निमित्ताने दिवसातून ३-४ वेळा मशिदीत भेटतात.
ह्यामुळे धर्माबद्दलचा आदर आणि परस्परांतील बंधुभाव वाढतो. बऱ्याचदा वाटतं कि हिंदू धर्मात देखील काही
गोष्टी कंपलसरी केल्या पाहिजेत.

ही असली वाक्य टाकायचे प्रयोजन समजले नाही :-)

टी आर पी वाढवताय का लेखाचा ;-)

रमजान निमित्त मुस्लिम लोकं एकत्र येतात. नुकत्याच संपलेल्या ईस्टर च्या वेळी (आमच्या ऑफिसमधील झाडून सगळी) ख्रिश्चन लोकं चर्च मध्ये गेली होती. ह्याउलट गणपती, दिवाळी ला हिंदू धर्मियांत तसं जाणवत नाही. हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असल्याने नकळत लेखात हा विचार मांडला गेला असावा. जे मला वाटलं ते प्रामाणिकपणे लिहिलंय. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

असा विचार मांडल्याने TRP वाढण्याऐवजी उलट कमीच होईल ;-)

लेख आवडला पण "हिंदू धर्मात देखील काही
गोष्टी कंपलसरी केल्या पाहिजेत" हे मात्र खटकलं. एवढ्या चांगल्या लेखात याची काय आवश्यकता होती कळलं नाही! लेखाकडे बघण्याचा दृष्टिकोन एका फटक्यात बदलला.
इथे काही कंपलशन नाही हीच किती मोठी गोष्ट आहे!

सरनौबत's picture

28 May 2019 - 12:49 pm | सरनौबत

रमजान निमित्त मुस्लिम लोकं एकत्र येतात. नुकत्याच संपलेल्या ईस्टर च्या वेळी (आमच्या ऑफिसमधील झाडून सगळी) ख्रिश्चन लोकं चर्च मध्ये गेली होती. ह्याउलट गणपती, दिवाळी ला हिंदू धर्मियांत तसं जाणवत नाही. हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असल्याने नकळत लेखात हा विचार मांडला गेला असावा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भंकस बाबा's picture

27 May 2019 - 11:12 pm | भंकस बाबा

पण सर्व मुस्लिम रोजे पाळतात हे वाचून आश्चर्य वाटले. मी मुस्लिमबहुल भागात रहातो. इथे फिरण्याचे काम करणारे मुस्लिम सर्रास रोजे पाळत नाहीत. खुलेआम नाही पण गुपचुप काहीतरी खानपान केले जाते.

भंकस बाबा's picture

27 May 2019 - 11:12 pm | भंकस बाबा

पण सर्व मुस्लिम रोजे पाळतात हे वाचून आश्चर्य वाटले. मी मुस्लिमबहुल भागात रहातो. इथे फिरण्याचे काम करणारे मुस्लिम सर्रास रोजे पाळत नाहीत. खुलेआम नाही पण गुपचुप काहीतरी खानपान केले जाते.

माहितगार's picture

29 May 2019 - 2:27 pm | माहितगार

वस्तुतः आजारी, लहान मुले, रजःस्वला आणि वृद्धांना उपवासाची सक्ती नसते तरीही अंधश्रद्धेपोटी तेही केले जाते. दुसरीकडे १० ते १५ % लिबरल सर्व समाजात असतात तसे त्यांच्यातही असतात आणि संशी मिळाल्यास नियम कमी अधिक प्रमाणात बाजूस सारतात. भारतासारख्या देशात असे करणे अधिक सहज जमते (अर्थात कुटूंब सहसा क्ट्टर असल्यामुळे काही अपवाद वगळता उघडपणे उपवास मोडणे कठीणच जाते असे त्यांच्यातील नास्तिकांकडुन आजकाल माहित होते) त्यांच्या कट्टर देशात आजारी, लहान मुले, रजःस्वला आणि वृद्धांना लक्षात घेऊन सार्वजनिक उपवासाची सक्ती करणे वस्तुतः गैरधार्मीक ठरावयास हवे कारण ज्या गोष्टीची सक्ती पुस्तकाम्नी सांगितली नाही त्याची सक्ती करणे हराम असावे पण कोणतेही धर्मांध स्वतःचा धर्मही व्यवस्थित समजून घेऊन पाळत असतात असे नव्हे तसे त्यांच्या धर्मांध देशातून सार्वजनिक ठिकाणी अन्न पाण्यावर मोठा मज्जाव येताना दिसून येतो.. आखातातील काही देश जराशी उदारता दाखवत असले तरी कट्टरपरिवा आणि देशातून अशी उदारता अद्याप दाखविली जात नसावी.

ह्याच बरं आहे स्वतःच्या देशात हम करे सो कायदा आणि इतर देशात ह्याच्यासाठी कायदा बदलावा लागतो.

मित्रहो's picture

27 May 2019 - 11:29 pm | मित्रहो

किंवा रमझान, हैदराबाद आणि हलीम यांचे फार जुने नाते आहे. हैदराबाद हलीममय असतं

किल्लेदार's picture

29 May 2019 - 8:48 am | किल्लेदार

"हिंदू धर्मात देखील काही गोष्टी कंपलसरी केल्या पाहिजेत"
सहमत...
उपवास आणि उपहास दोन्ही आवडले. बऱ्याच मिपाकरांना हा उपहास कट्टरपणा वाटलेला दिसतोय!

माहितगार's picture

29 May 2019 - 2:29 pm | माहितगार

:))

माहितगार's picture

30 May 2019 - 4:41 pm | माहितगार

खालील चर्चा सर्वसाधारण अभ्यास प्रबंधाची माहिती घेण्यासाठी आहे. व्यक्तिगत वैद्यकीय सल्ला संबंधीत तज्ञांकडून कडुन घ्यावा. उत्तरदायित्वास नकार लागू
सध्या डॉ. पायल तडवी यांच्या खेदजनक मृत्यूचीही चर्चा चालू आहे. त्यामुळे मी रमजान काळा दरम्यानच्या मृत्यूंमध्ये काही फरक पडतो का या बद्दल संशोधन प्रबंध गूगलल्यावर एक प्रबंध मिळाला.

तुर्कस्थान या विषयावरील डेटा अधिक व्यवस्थीत मेंटेन करते त्यामुळे संशोधकांची भिस्त मुख्यत्वे तुर्कस्थानी रिपोर्टस्वर आहे असे दिसते.

सम्शोधन प्रबंधाचे थोडक्यात निश्कर्ष खालील प्रमाणे दिसतात

१) वेळा पत्रकातील बदलांच्या परिणामी जे विड्रॉवल सिम्प्टम येतात त्यामुळे irritability and anxiety वाढल्याचे दिसून येते त्याच वेळी मित्र परिवार सेलिब्रेशन मूड आणि आत्महत्या धर्मात पाप समजले गेल्यामुळे या काळात आत्महत्यांचे प्रमाण कमी होते.

२) या काळात दारू वापर कमी झाल्याने अती दारू सेवन प्रभावाखाली होणार्‍या मृत्यू आणि गुन्ह्यांची संख्या कमी होते.

३) coronary heart disease असतानाही उपवास करून औषधी न घेणे, संध्याकाळच्या अन्नसेवना नंतर शरीराला झेपत नसताना प्रार्थना, अती पहाटेच्या थंड वार्‍यात प्रार्थनेसाठी बाहेर पडणे अशा काही कारणांनी या काळात आजारी लोकांच्या नैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण वाढलेले दिसून येते. The regimen of patients with diabetes is also
negatively affected by unfamiliar diet and restrictions on drug
use during fasting and so on

४) physical fatigue associated with fasting lowers one’s
sense of well-being and results in impairment of cognitive
function यामुळे अपघाती मृत्यूंचेप्रमाण मात्र बर्‍यापैकी वाढते या आधीच्या काही रिपोर्टस मधील निष्कर्षास संदर्भ घेतलेला संशोधन प्रबंधही दुजोरा देताना दिसतो. रमजानच्या काळातील मृत्यूंचे मुख्य कारण अपघात म्हणजे ७५ % पर्यंत या अभ्यासात आढळले असे दिसते.

.
सध्या डॉ. पायल तडवी यांच्या खेदजनक मृत्यूचीही चर्चा चालू आहे. त्यामुळे मी रमजान काळा दरम्यानच्या मृत्यूंमध्ये काही फरक पडतो का या बद्दल संशोधन प्रबंध गूगलल्यावर एक प्रबंध मिळाला.

तुर्कस्थान या विषयावरील डेटा अधिक व्यवस्थीत मेंटेन करते त्यामुळे संशोधकांची भिस्त मुख्यत्वे तुर्कस्थानी रिपोर्टस्वर आहे असे दिसते.

सम्शोधन प्रबंधाचे थोडक्यात निश्कर्ष खालील प्रमाणे दिसतात

१) वेळा पत्रकातील बदलांच्या परिणामी जे विड्रॉवल सिम्प्टम येतात त्यामुळे irritability and anxiety वाढल्याचे दिसून येते त्याच वेळी मित्र परिवार सेलिब्रेशन मूड आणि आत्महत्या धर्मात पाप समजले गेल्यामुळे या काळात आत्महत्यांचे प्रमाण कमी होते.

२) या काळात दारू वापर कमी झाल्याने अती दारू सेवन प्रभावाखाली होणार्‍या मृत्यू आणि गुन्ह्यांची संख्या कमी होते.

३) coronary heart disease असतानाही उपवास करून औषधी न घेणे, संध्याकाळच्या अन्नसेवना नंतर शरीराला झेपत नसताना प्रार्थना, अती पहाटेच्या थंड वार्‍यात प्रार्थनेसाठी बाहेर पडणे अशा काही कारणांनी या काळात आजारी लोकांच्या नैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण वाढलेले दिसून येते. The regimen of patients with diabetes is also
negatively affected by unfamiliar diet and restrictions on drug
use during fasting and so on

४) physical fatigue associated with fasting lowers one’s
sense of well-being and results in impairment of cognitive
function यामुळे अपघाती मृत्यूंचेप्रमाण मात्र बर्‍यापैकी वाढते या आधीच्या काही रिपोर्टस मधील निष्कर्षास संदर्भ घेतलेला संशोधन प्रबंधही दुजोरा देताना दिसतो. रमजानच्या काळातील मृत्यूंचे मुख्य कारण अपघात म्हणजे ७५ % पर्यंत या अभ्यासात आढळले असे दिसते.

५) अधिक नेमक्या निश्कर्षांसाठी आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या तौलनिक अभ्यासाची गरज असावी.

संदर्भ

* Evaluation of Forensic Deaths During the Month of Ramadan in Konya, Turkey, Between 2000 and 2009 - Kamil Hakan Dogan

सस्नेह's picture

30 May 2019 - 5:08 pm | सस्नेह

छान माहितीपूर्ण लेख !