दिवाळी अंक २०२३ - होल्डाॅल
काही शब्द खूप दिवस वापरले गेले नाहीत की धूळ जमल्यासारखे हरवूनच जातात. काही दिवसापूर्वी मी "चहाचं 'आधण' ठेवलंय" म्हटल्यावर माझ्या भावाने म्हटलं "अगं, किती दिवसांनी ऐकला हा शब्द! आजी वापरायची!" खरंच काही शब्द, वस्तू इतिहासजमा झाल्यात.. आणि मला अचानक आठवला तो आमच्या घरचा होल्डाॅल!!
अनेक वस्तू, कपडे बसवायला खूप लहान-मोठे कप्पे असणारा असल्याने त्यात खूप गोष्टी एकत्रित समाविष्ट व्हायच्या, म्हणून खरं नाव 'होल्ड ऑल' आणि अर्थात घरचं.. म्हणायचं नाव 'होल्डाॅल'. रेल्वेत, फलाटावर, बसमध्ये बसायला जागा नसेल तर चक्क ठिय्या मारून ह्या होल्डाॅलवरच बसता यायचं. आत कपडे, पांघरुणं असल्याने होल्डाॅल चांगला गब्दुल्ला असायचा. मिलिटरी ग्रीन रंगाचा कपडा असलेला आणि त्याच रंगाच्या कापडी पट्ट्यांनी आवळून बंद करता येणारा होल्डाॅल ही त्या काळी मला विशेष चैनीची वस्तूच वाटायची. त्या वेळी सैनिकांकडे पत्र्याच्या जड ट्रंक किंवा मोठा होल्डाॅल असायचा त्यामुळेही असेल, मला आमच्या घरचा 'बेबी होल्डाॅल' घेऊन प्रवासाला जाताना आपण 'देशप्रेमाचं' काम करतोय अशी भावना यायची. लहानपणी प्रवासात लहानांचं तिकीट काढलं जायचं, पण रिझर्व्ह बर्थ नसायचा. स्वतंत्र, राखीव बर्थ नसताना या होल्डाॅलवर मी लहानपणी रेल्वे प्रवासात अनेकदा छान झोपले आहे.. आणि त्याच्या आतही काही कपडेच भरलेले असल्याने मला रेल्वेत गादी मिळाल्याचा थाट वाटायचा. तेव्हा इतर सहप्रवासी वर्तमानपत्र किंवा एखादं जुनं पांघरूण अंथरून झोपायचे, त्यामुळे तर आपण तुलनेने जास्तच सधन असल्याची भावना माझ्यात डोकवायची. त्या काळी ट्रेनने-बसने प्रवास करायला आई-बाबा नेताहेत हेच अप्रूप वाटायचं, कारण माझ्या इतर मैत्रिणी केवळ हातातल्या पिशव्यांमधून सामान न्यायच्या आणि बसप्रवास परवडेल इतक्याच जवळच्या नातेवाइकांकडे जायच्या. त्यामुळे बालपणीच्या काळात होल्डाॅल माझा विशेष लाडका होता. आमच्या आईला प्रवासात घरातल्या इतक्या तमाम वस्तू का न्यायच्या असायच्या माहीत नाही, पण बहुतेक वेळा सर्व प्रवासी बॅगा नववा महिना पूर्ण झालेल्या बाईसारख्या अगदी 'अवघडलेल्या' असायच्या. चेन लावताना एका व्यक्तीने त्यात ठासून भरलेल्या कपड्यांना चेपटवून दोन्ही कडांना 'समीप' आणायचं काम करावं लागे.. तुडुंब भरणं म्हणजे काय, हे त्या वेळी अगदी चांगलंच कळायचं. चेनची दया यायची आणि बॅगच्या शिवणीतर अगदी असहकार चळवळीत सामील होण्याच्या तयारीत असायच्या. या बॅगा घरातून निघताना मोजणं, बस किंवा रेल्वेपर्यंत नेणं, त्यांच्यासाठी जागा पटकावणं आणि त्यांना सांभाळत इच्छित स्थळी पोहोचल्यावर उतरवणं हे खास जोखमीचं काम असे. 'किती डाग झाले?' असा कुणीतरी प्रश्न विचारायचे, तेव्हा मी नकळत माझ्या बुडाखालच्या होल्डॉलवरच्या असंख्य डागांकडे दयाळू दृष्टीने पहात, त्यावर पडलेले छोटे-मोठे डाग मोजेपर्यंत कुणीतरी हक्काने, ठणकावून, संपूर्ण आत्मविश्वासाने उत्तर द्यायचे 'सात डाग!' तेव्हा कळायचं, या प्रवासी सामानाच्या पिशव्या/बॅगांना 'डाग' म्हणतात. हा होल्डाॅल बसप्रवासात इतरांना त्रासदायक वाटायचा, कारण एस.टी.मध्ये प्रवासी बॅगांसाठीच्या जागेत तो बसायचा नाही, एसटीमधील सीटखाली तो घुसायचा नाही.. पर्यायने येण्याजाण्याच्या वाटेत त्याला ठेवावं लागायचं. येणाऱ्या जाणाऱ्याला तो अडथळा वाटल्याने आवडायचा नाही आणि इतरांची नाराजी, लाथा झेलत तो 'नावडता' ठरायचा. उभ्याने प्रवास करणाऱ्या कुणाला अथवा त्यांच्या लेकराला याच होल्डाॅलवर थोडा वेळ टेकायला मिळालं, तर मात्र दोन-चार जणांचा तो 'आवडता' व्हायचा. 'स्वीकारा अथवा नाकारा, स्थितप्रज्ञ राहून नेमलेले कार्य करणारा, तो मात्र सगळ्यांना नावाप्रमाणे 'होल्ड ऑल' म्हणत सगळ्यांच्या पायाशी राहून होल्ड ठेवायचा.. माझा तो लाडका होल्डाॅल!!
वाचने
6554
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
नॉस्टॅल्जिया जागवणारा लेख.
जुन्या आठवणी
होल्ड ऑल चे महत्त्व सैनिकांपेक्षा जास्त कुणाला माहीत...
In reply to होल्ड ऑल चे महत्त्व सैनिकांपेक्षा जास्त कुणाला माहीत... by कर्नलतपस्वी
आणि तशीच पोत्यासारखीच पण
आपल्या सर्वांच्या
लेख आवडला
जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
यात्रेचा होल्डॉल
In reply to यात्रेचा होल्डॉल by नठ्यारा
जननीचा डोंगर
In reply to जननीचा डोंगर by सतिश गावडे
अवांतर : स्थानिक दिसताय
लेख आवडला!
सगळा मिपा अंकच होल्डॉल झाला
छान लिहिलंय
स्मरणरंजन आवडले
होल्डाॅल वर्णन
In reply to होल्डाॅल वर्णन by सतिश गावडे
छान झाले आहे स्मरण रंजन !!!
छान आठवणी आहेत होल्डॉलच्या.
छान