✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 08/20/2017 - 16:22  ·  लेख
लेख
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
227718 वाचन

💬 प्रतिसाद (589)

प्रतिक्रिया

लिहित राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/21/2017 - 12:23 नवीन
चांगलं लेखन आहे, पण अजून इंट्रेंष्टींग किस्से टाकून लेखन रंगवावे असे वाटले. पुन्हा पुन्हा तेच उतारे वाचतोय का असे वाटून जाते. तुमची प्रेयसी सुंदर आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद, दिलिप.

हेमंतकुमार
Mon, 08/21/2017 - 12:57 नवीन
धन्यवाद, दिलिप.
  • Log in or register to post comments

आजआजच्या सकाळ मधली बातमी : 'रेल्वेतील बायो- टॉयलेट' तुंबली !

हेमंतकुमार
Wed, 12/20/2017 - 14:26 नवीन
आजच्या सकाळ मधली बातमी : 'रेल्वेतील बायो- टॉयलेट' तुंबली ! http://www.esakal.com/desh/marathi-news-marathi-websites-indian-railway-...
  • Log in or register to post comments

निर्वात शौचालयांचा' प्रयोग ५०० रेल्वे डब्यांमध्ये

हेमंतकुमार
Fri, 02/23/2018 - 22:22 नवीन
तुंबलेल्या बायो टॉयलेटसच्या अनेक तक्रारी नंतर आता रेल्वे प्रशासन 'निर्वात शौचालयांचा' प्रयोग ५०० डब्यांमध्ये करणार आहे. हे शौचालय विमानाच्या धर्तीवर असेल आणि त्याचा पाणीवापर पूर्वी पेक्षा अवघा एक सप्तमांश असेल. हा प्रयोग यशस्वी होवो ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments

खाजगीकरण आणि भरपाई !

हेमंतकुमार
Mon, 10/21/2019 - 11:52 नवीन
तेजस’ला उशीर, प्रवाशांना पहिल्यांदाच मिळणार ‘इतकी’ भरपाई: (https://www.loksatta.com/desh-videsh-news/tejas-express-runs-late-in-a-first-railways-to-pay-compensation-sas-89-1997947/) आयआरसीटीसीनुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तासांहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास 250 रुपये भरपाई मिळेल. देशात पहिल्यांदाच एखाद्या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना भरपाई मिळणार आहे.
  • Log in or register to post comments

मला एकदम

जेम्स वांड
Mon, 10/21/2019 - 12:30 नवीन
नव्वदीतल्या लाल लिव्हरी मधल्या रेल्वेज आठवल्या. हल्ली मात्र प्रचंड बदल झालेले असून रेल्वेज वेळेवर पळायचे प्रमाण पण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते. खासकरून खालील चित्र फारच मोहक वाटते Image removed. तिचाच हा एक व्हिडिओ
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Mon, 10/21/2019 - 12:34 नवीन
"लाल लिव्हरी " म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

लिव्हरी म्हणजे

जेम्स वांड
Mon, 10/21/2019 - 16:53 नवीन
डबे इंजिन इत्यादींचा रंग, वाहतूक क्षेत्रात माझ्या माहितीनुसार विमाने अन रेल्वेज ह्यांचे रंग सांगताना "in a painted livery of XYZ color" असे लिहायची पद्धत आहे असे वाटते. आगबोटी बद्दल कल्पना नाही. वाहतूक क्षेत्रासोबत एकंदरीत नॉन मिलिटरी युनिफॉर्म कलर्स, डेझीगनेटेड कलर्स दर्शवायला लिव्हरी शब्द वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

लिव्हरी !

हेमंतकुमार
Tue, 10/22/2019 - 08:34 नवीन
उत्सुकता म्हणून 'livery' शब्दाचे उत्खनन केले. उगम असा. मध्ययुगीन सरदारांनी त्यांच्या नोकरांना ओळख म्हणून ठराविक रंगाचे कपडे द्यायला सुरुवात केली. >>> सरकारी वाहने, विशिष्ट गटाच्या वस्तू यांना एकाच प्रकारचा रंग देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

मी केलेला रेल्वे प्रवास

Rajesh188
Mon, 10/21/2019 - 12:35 नवीन
मी आता पर्यंतच्या आयुष्यात दोनदाच रेल्वे नी प्रवास केला . एकदा मुंबई ते पंढरपूर आरक्षित कक्षा मधून. पण स्लीपर क्लास मधून . आरक्षित बोगी मध्ये फक्त आरक्षित तिकीट असलेले चे प्रवेश करतात असा काही नियम रेल way ला मान्य नाही वेटींग वाले सुद्धा प्रवेश करतात . त्या मुळे बोगि च्या क्षमते पेक्षा जास्त प्रवासी असतात. प्रवास ठीक वाटला. दुसऱ्या वेळेस मुंबई पुणे हा प्रवास जनरल bogi मधून केला . सीएसटी ला ट्रेन पकडली खाली होती. जागा मिळाली. नंतर अशी गर्दी झाली की जागेवरून उठून टॉयलेट सुद्धा जायला जागा नव्हती. टॉयलेट मध्ये सुधा प्रवासी बसले होते . होरीबल प्रवास
  • Log in or register to post comments

+1

जालिम लोशन
Mon, 10/21/2019 - 15:35 नवीन
आता रेल्वे मधे लक्षणीय बदल झालाय.
  • Log in or register to post comments

बायो टॉइलट : - रुळात,

कंजूस
Mon, 10/21/2019 - 17:04 नवीन
बायो टॉइलट : - रुळात, स्टेशनात घाण होत नाही पण संपूर्ण गाडीत सतत दुर्गंधी राहाते आहे. ते डिजाइन बदलावे लागेल किंवा शंभर शंभर किमि अंतरावर टाक्या रिकाम्या करायची व्यवस्था करावी लागेल.
  • Log in or register to post comments

* जेम्स, उपयुक्त माहिती.

हेमंतकुमार
Mon, 10/21/2019 - 17:11 नवीन
* जेम्स, उपयुक्त माहिती. धन्यवाद. * कंजूस, अगदी बरोबर. संडासातील त्या दृश्याने शिसारी येते. म्हणूनच आता काही वरच्या दर्जाच्या गाड्यांत निर्वात शौचालयांचा' प्रयोग करणार आहेत. यथावकाश तो लाभ सर्वच गाड्यांना मिळावा ही इच्छा.
  • Log in or register to post comments

रेल आणि मी

चौकटराजा
Tue, 10/22/2019 - 09:59 नवीन
मला सुदैवाने भारतीय व युरोपीय रेल मधून प्रवास करायला मिळाला पैकी भारतीय रेल मधून मी उधमपूर ते कन्याकुमारी व जेसलमेर ते भुवनेश्वर अशा सीमा गाठल्या आहेत . डॉ कुमार यांचे प्रमाणे च मी व माझे आख्खे कुटुंब रेलवे च्य प्रेमात आहोत. लवंडायला मिळते. धक्के नाहीत , ओकार्या नाहीत, चकंकर मारता येते, दात घासता येतात , संडास ला जाता येते ( गाडी हालत असल्याने कसरत करीत कार्यभाग उरकण्याची जबाबदारी घेऊन ). हे आतील फायदे तर आहेतच पण विक्रेते येतात , फलाटावर काही खायला प्यायला मिळते ! सर्वात मस्त म्हणजे फार धक्के ,ब्रेक ई त्रास नसल्याने बाहेरचे दृश्य बघताना डोळ्यांना त्रास होत नाही ! स्टेशन आले की त्या विविध पाट्या , " उपरी उपस्कर डिपो " " कर्षण उपस्थानक " असली भाषान्तरे , रेल्वे कर्मचारी आंदोलंनाचे बोर्ड , ई ई पाहात पुढे जाणे यात एक मजा आहे ! गाड़ी एखाद्या वळणावर गोलाकार वळते, बोगद्यात घुसते हे पहाणे देखील मला एक अनुभव देऊन जाते. बाकी रिटायरिंग रूम , आंघोळीची सोया, क्लोक रूम , ब्रेक जर्नी , टेलॅस्कीपिक स्वस्त तिकीट ई सोयीची रेलचेल पाहता हा अवाढव्य कारभार एक सरकारी यंत्रणा कशी हाकत असेल याचा विस्मय वाटत राहातो.
  • Log in or register to post comments

मेल/एक्सप्रेसच्या फर्स्ट

मनो
Tue, 10/22/2019 - 10:00 नवीन
मेल/एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लासच्या अनेक सुखद आठवणी आहेत. माझे आजोबा रेल्वेचे 'स्टाफ'. माझ्या जन्माच्या आधी तुम्ही सांगता तशी पुठ्ठ्याची तिकिटे देण्याची खिडकी नाहीतर रेल्वे पार्सल विभाग ही त्यांची कामाची ठिकाणं होती असं आई सांगे. मी त्यांना पाहिलं ते निवृत्त झाल्यावर. तेंव्हा त्यांना दर वर्षी हिरवा पास मिळे, त्यात आजोबा, आजी आणि एक अटेंडेंट फुकट पहिल्या वर्गाने जाऊ शकत असे. प्रत्यक्षात तो पास कुणी पाहत नसे, स्टाफची पास दाखवण्याची एक खूण आणि लकब असे, ती दिसली की प्रत्यक्ष कागद कुणी तपासत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री आजोबा गजर लावून झोपत, लगेच एक वाजता उठून मग रेल्वेचा १८१ नंबर मग त्या काळात दुर्मिळ अश्या काळया फोनवर लावत - एकच प्रश्न विचारला जाई, तो खास रेल्वेच्या भाषेत - ८४ अप कशी आहे? कधी कधी ८५ डाऊनची पण चौकशी जाता जाता होई (त्या काळातली कोल्हापूर नागपूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ८४/८५ नंब रखाली धावे). बिफोर टाईम हे उत्तर कधीही येत नसे, नेहमी कमीत कमी १-२ तास गाडी लेटच असे. मग आधी ठरवलेल्या रिक्षेतून स्टेशन गाठणे, तिथे ASM हापिसात बसून तो गोल चावीवाला फोन चावी फिरवत ऐकणे, तिथल्या अगम्य यंत्रातून पडणारे लोखंडी गोळे मास्तर शिताफीनं पकडून दुसरीकडे घालताना पाहणे हे सोपस्कार झाल्यावर गाडीने आधीचे अकोळनेर स्टेशन पार केल्यावर रेल्वेच्या खास टांगलेल्या रुळावर गजर होत असे. WDM-२ पुणे डिझेलच्या मागे आळसावलेली गाडी मग रांगत रांगत हजर होई. केंव्हा अंग टाकतो अशी झोप लागलेली असल्याने त्या वेळी काही खास वाटत नसे, पण पहाटे सूर्य नुकताच क्षितिजावर उगवला की, दूरवर अंकाई टांकाईचे जोडकिल्ले दिसू लागत, शेतातून धुके पसरलेले असे, औरंगाबाद कडून येणारी लहान मीटर गेज लाईन हलकेच सोबत देऊ लागे आणि एक स्वतंत्र आणि प्रशस्त खोलीतून म्हणजे पहिल्या वर्गाच्या केबिन मधून दिसणारे ते दृश्य मोठे अपूर्व असे. मग त्यापुढे ऐन उन्हाळ्यातही दिवसभराचा रखडत केलेला विना एसी चा नागपूरचा प्रवास इतका वाईट वाटत नसे. पुढे अनेक प्रवासांचे योग आले, पण फर्स्ट क्लास ची सर दुसऱ्या कुणाला नाही.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Tue, 10/22/2019 - 10:24 नवीन
चौरा व मनो , छान अनुभव ! रेल्वेचे पारंपरिक संडास होते तेव्हा 'गाडी स्थानकात थांबली असताना शौच करू नये', या सूचनेला महत्व होते. आता जैविक सुधारणेमुळे ती सूचना लवकरच कालबाह्य होईल.
  • Log in or register to post comments

आगगाडीचे "अप" आणि "डाऊन" कसे

सतिश गावडे
Tue, 10/22/2019 - 12:09 नवीन
आगगाडीचे "अप" आणि "डाऊन" कसे ठरवतात?
  • Log in or register to post comments

सतीश, चांगला प्रश्न

हेमंतकुमार
Tue, 10/22/2019 - 12:34 नवीन
मध्य रेल्वेचे उदा घेतो. तिचे मुख्यालय मुंबई. त्यामुळे तिथून सुटणारी गाडी 'डाऊन' आणि नेहमी विषम क्रमांकाची. आता तीच गाडी जेव्हा परतीचा प्रवास करेल तेव्हा झाली 'अप' आणि सम क्रमांकाची.
  • Log in or register to post comments

आपातकालीन खिडकी

सुमो
Tue, 10/22/2019 - 15:36 नवीन
मिळाली होती आज एका पॅसेंजर ट्रेनमध्ये .. तिथून घेतलेली छायाचित्रे Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

कुमारजी असाच प्रवासाचा कधी मूड आला तर बोला

जॉनविक्क
Tue, 10/22/2019 - 16:52 नवीन
भारतभर रेल्वेतुन विनाकारन अथवा सकारण कधीही कुठेही भटकुयात, बाकी फर्स्ट क्लास पेक्षा विमान प्रवास परवडतो त्यामुळे...
  • Log in or register to post comments

अहाहा,

हेमंतकुमार
Tue, 10/22/2019 - 17:02 नवीन
सुमो, कडक फोटू ! जॉन, नक्कीच ! सकारण नेहमीच होते, आपण अकारण जाऊ ☺️
  • Log in or register to post comments

गोवा बेळगांव ........

सुधीर कांदळकर
Tue, 10/22/2019 - 20:56 नवीन
प्रवास रेलवेने केला आहे कां कधी? फारच सुंदर प्रवास आहे. दूधसागर धबधब्यासमोर गाडी चक्क निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मस्त पाचदहा इनिटे थांबवतात. आपण उतरून फोटो काढून पुन्हा गाडी पकडू शकतो. मला कोणताही प्रवास आवडतो. पण गर्दी असल्यास खाद्यपदार्थ विकणार्‍यांचा प्रवाशांना फार त्रास होतो. कर्जतला बटाटेवड्यांचा मस्त घमघमाट येतो. पण तद्दन भिक्कार असतात. रत्नागिरी स्थानकात मात्र छान वडे मिळतात. कर्जत लोणावळ्यात अंजीर, काकड्या, करवंदे, बोरे, पेरू वगैरे रानमेवा छान मिळतो. एकदा प्रवासात सिकंदराबाद स्थानक आले. दुपारी साडेअकराचा सुमार म्हणजे जवळजवळ जेवणाची वेळ. आम्ही चौघे बिर्याणी अर्थातच व्हेज घेणार होतो. एक म्हणाला हैदराबाद जवळच आहे आत्ता येईल तिथे घेऊ. आणि गाडी हैदराबादला न जाताच पुढे आली आणि सारे उपाशी राहिलो. पाच वाजता कुठेतरी वडापाव मिळाला. आता माझ्या कपाळी गाडीतून उतरल्याबरोब्बर फोन येतो. सरळ आयव्हीआरवर जातो. स्वच्छता कंपनीकडून दर्जाविचारणा करणारा आणि १ ते ५ किंवा १ ते १० रेटिंग द्यायला. लेख वाचायला मजा आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

होय !

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 03:55 नवीन
सुधीर, अगदी ! ५ वर्षांपूर्वी आम्ही एका गटाने गोवा एक्स्प्रेसच्या स्लीपरने गेलो होतो. धबधबे आणि निसर्गसौंदर्य केवळ अप्रतिम !
  • Log in or register to post comments

जाम "मामा"

चौकस२१२
Wed, 10/23/2019 - 08:40 नवीन
रेल्वे मध्ये एकदा जाम "मामा" झाल्याचे आठवते मुंबई हुन पुण्याला जायचे होते ( एक्सप्रेसवे च्या आधीची गोष्ट) ) संध्याकाळी काम उशिरा संपल्यावर आणि जरी एशियाड घेता अली असती ती तशी आड वेळी पोचली असती विचार केला कि मस्त आरामात कसे जात येईल , रात्री ११ च्या सुमारास दादर वरून एक पॅसेंजर होती आणि ती मस्त सकाळी ६ ला पोचणारी .. म्हणजे झोप होईल , तिच्यात दुसऱ्या वर्गात खाली बसण्याचे आरक्षण आणि वरती गादी असलेली बर्थ अशी "मिश्र बोगी" होती म्हणजे सर्व बोगी आरक्षित आणि साधारण इथे ६ जन असतात तिथे ८ बसण्याचे आणि २ झोपण्याचे असे आरक्षण असायचे मी एक बर्थ चे आरक्षण केले दादर ला मस्त खाणे पिणे करून ११ च्या आधी येऊन बसलो एक गाडी अली त्यात तोबा गर्दी ,, प्यासेंजर दर्जाची पण कळले कि आपली नव्हे ,,, पुढची आहे ती आपली , आणि विचार केला कि व्यवस्थित आरक्षण आहे त्यामुळे काळजी नसावी.. कसला काय प्यासेंजर दर्जाच्या गाडीत "आरक्षणाला काह्ही अर्थ नसतो " हे त्या रात्री समजले, आरक्षित बोगीत कसा बसा शिरलो , अर्ध्या तासाने माझ्य बर्थ पर्यंत पोचलो ,, खाली बसायला तर जागा नव्हती ,, बर्थ वर कमीत कमी ४ जण बसलेले...त्यांना उठा म्हणून आपण एकट्याने तिथे झोपणे केवळ अशक्य होते ,, सेवटीं एकाला दया येऊन त्याने " या बिचार्याने आरक्षण केले आहे तर निदान त्याला बसायला तरी जागा द्या " अशी माझ्यातर्फे विंनती केली आणि रात्रभर मान मोडून बर्थ वर बसायला दाटीवाटीने जागा मिळाली ... असो एक रेल्वे प्रवास मनात नक्की करायचा आहे सिंगापोर ते कलकत्ता ? सिंगापोर ते बँगकॉक कसे जायचे ते सोपे आहे पण पुढे मियांमार मधून बांगलादेशातून भारतात कसे यायचे ते काही कळत नाहीये इजिप्त चे वर्णन करणाऱ्या लेखिकेने दिलेल्या दुव्यावर पण काही माहिती मिळू शकली नाहीय बघू शोधात राहू
  • Log in or register to post comments

आंतरराष्ट्रीय रेल्वे

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 10:02 नवीन
असो एक रेल्वे प्रवास मनात नक्की करायचा आहे सिंगापोर ते कलकत्ता ?
ढाका ते लंडन अशा रेल्वेमार्गाचे बांधकाम दीर्घकाळ चालू आहे !
  • Log in or register to post comments

रेल्वे हा तर माझ्या

सुबोध खरे
Wed, 10/23/2019 - 10:19 नवीन
रेल्वे हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजूनही हॉर्न वाजवत आलेले इंजिन आणि त्यामागून धाड धाड आवाज करत जाणारी गाडी पाहिली कि काळजात एक गोडशी कळ उठते. गाडीच्या इंजिनपासून गार्डच्या डब्यातून आणि वातानुकूलित प्रथम वर्गापासून मुंबई पुणे सवारी गाडी मध्ये रात्री अनारक्षित डब्यात रेनकोट घालून खालच्या बर्थच्या खाली झोपून प्रवास केलेला आहे. मीटर गेज YDM ४, नॅरो गेज NDM १ च्या इंजिन पासून WCM ५ लोकमान्य अशा अनेक इंजिनातून प्रवास करण्याचं भाग्य मिळालं आहे. आता सवय गेल्यामुळे अनारक्षित डब्यातून प्रवास करायचे टाळतो. परंतु पहाटे पहाटे एखाद्या लहानशा स्टेशन वर गाडी थांबली आहे बाहेर छान थंडी आहे आणि आपण खाली उतरून वाफाळता चहा पितो आहे अशी दिवास्वप्ने मला कायम पडत असतात. मला कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करताना कोकण रेल्वेची सकाळी येणारी सगळी स्थानके रत्नागिरी(सकाळी ६) पासून गोव्यापर्यंत (मडगाव १०. ४५) पाहायला फार आवडे. सुदैवाने साडेचार वर्षे गोव्यात पोस्टिंग असल्यामुळे हा प्रवास मी फार एन्जॉय केला.
  • Log in or register to post comments

मी शक्य असेल तिथे गाडीचा प्रवास टाळतो.

रविकिरण फडके
Wed, 10/23/2019 - 11:03 नवीन
ते सृष्टी सौंदर्य वगैरे ठीक आहे. पण, फलाटावरील घाण, गाडीत चढ़तानाची धक्काबुक्की, माझ्या आसनावर कुणीतरी बसलेला असणं आणि त्याने मलाच 'मेरेकु घुटनेकी तक्लिफ है, आप उपर जावं ना' किंवा तत्सम काहीतरी सांगणे आणि प्रवासाची सुरुवातच कडू होणे, गाडीतली आणि प्रवाशांची अस्वच्छता, काही वेळेस बाजूच्या प्रवाशांनी गाडी सुरु होते ना होते आपले डबे उघडून बकाबका खायला सुरुवात करणे, प्रवासाला अजून ७-८ तास असताना टॉयलेटमधील पाणीच जाणे, अज्ञात ठिकाणी अवेळी पोहोचत असाल तर आपलं स्टेशन कधी येईल/ येऊन जाणार नाही ना ह्याचा ताण, ह्या गोष्टी मला तरी हजम होत नाहीत.
  • Log in or register to post comments

मी शक्य असेल तिथे गाडीचा प्रवास टाळतो.

रविकिरण फडके
Wed, 10/23/2019 - 11:04 नवीन
ते सृष्टी सौंदर्य वगैरे ठीक आहे. पण, फलाटावरील घाण, गाडीत चढ़तानाची धक्काबुक्की, माझ्या आसनावर कुणीतरी बसलेला असणं आणि त्याने मलाच 'मेरेकु घुटनेकी तक्लिफ है, आप उपर जावं ना' किंवा तत्सम काहीतरी सांगणे आणि प्रवासाची सुरुवातच कडू होणे, गाडीतली आणि प्रवाशांची अस्वच्छता, काही वेळेस बाजूच्या प्रवाशांनी गाडी सुरु होते ना होते आपले डबे उघडून बकाबका खायला सुरुवात करणे, प्रवासाला अजून ७-८ तास असताना टॉयलेटमधील पाणीच जाणे, अज्ञात ठिकाणी अवेळी पोहोचत असाल तर आपलं स्टेशन कधी येईल/ येऊन जाणार नाही ना ह्याचा ताण, ह्या गोष्टी मला तरी हजम होत नाहीत.
  • Log in or register to post comments

स्वच्छतेचा एक (कळीचा) मुद्दा

अनिंद्य
Wed, 10/23/2019 - 11:12 नवीन
स्वच्छतेचा एक (कळीचा) मुद्दा सोडला तर रेल्वेसारखा प्रवास नाही. निवांत, आरामात ! सदासर्वदा आठवणारे काही रेल्वे प्रवास:- १. राजकोट ते वेरावल - नॅरो गेज रेल्वे - जुन्या कोरीव लाकडी डब्यातून केलेला प्रवास. वाटेत येणारी गोंडलसारखी रेल्वे स्थानकेसुद्धा महाल वाटावीत अशी नटवलेली. २. मुंबई ते मंगलोर - कोकण रेल्वे - प्रचंड पाऊस आणि गाडी १२ तास उशिरा धावत असल्याने तळकोकण आणि गोव्याचे सचैल सौंदर्य बघत पण भुकेल्यापोटी केलेला प्रवास. ३. दोनेक वर्षाच्या कन्येसह केलेला मुंबई-तिरुपती वातानुकूलित कूपे प्रवास (माझ्या आग्रहास्तव वाटेत थोडावेळ रेल्वेइंजिनात चालकासह बसायला मिळाले. अविस्मरणीय) ४. जर्मनीत बर्लिन ते ड्रेसडेन - रक्तवारुणीच्या साक्षीने यूरोपीय सौंदर्य टिपत केलेला एकल प्रवास. ५. सिकंदराबाद-अजमेर (नॅरोगेज असतांना) अनारक्षित तिकिटावर पोस्टखात्याच्या छोट्या खुराड्यातून केलेला खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, मंदसौर, चितोडगढ, नासिराबाद, अजमेर असा पहिलाच दीर्घ प्रवास. काय नमुने भेटलेत माणसांचे, प्रत्येकावर एक एक कथा लिहावी :-) आता निकट भविष्यात श्रीलंकेत 'सागर'किनारी रेल्वेने, तुर्कीत 'पहाडी' रेल्वेने, चीनमध्ये बेजिंग-ल्हासा 'तिबेट' रेल्वेने आणि रशियात मास्को-वॅलेडिवोस्तोक 'ट्रान्स सायबेरियन' रेल्वेने असे थोडकेच रेल्वे प्रवास केले की सुखाने देह ठेवीन म्हणतो :-))) लेख आवडलाच.
  • Log in or register to post comments

माझ्या पण शुभेच्छा ...

चौकटराजा
Wed, 10/23/2019 - 14:00 नवीन
ट्रान्स सायबेरियन साठी माझ्या देखील फार फार शुभेच्छा . त्यापूर्वी एक प्रवास काहीसा कंटाळवाणा( काही कारणाने ) पण नेत्रसुख देणारा .. कालका सिमला प्रवास. ९६ किमी मध्ये २० स्थानके, १०३ बोगदे ९१२ वळणे आणि ९६९ पूल . करून पहा ! मी हा व युरोपमधील तिरानो ते लूसर्न व्हाया बर्निना पास केला आहे. दोन्ही बेस्ट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

कालका सिमला प्रवास !

अनिंद्य
Wed, 10/23/2019 - 16:01 नवीन
कालका सिमला प्रवास ! ह्या मार्गावरचा एकमेव प्रवास मला विसरता येणार नाही. ५ जानेवारी १९८९. सिमला स्थानकावर पाय ठेवल्याक्षणी ताबडतोब दिल्लीला परतायचा घरच्यांचा आदेश मिळाला. त्याच मध्यरात्री इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी देणार होते (ते नंतर समजले) त्यामुळे सगळीकडे प्रचंड तणाव आणि बंदोबस्त होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 11:32 नवीन
* आता सवय गेल्यामुळे अनारक्षित डब्यातून प्रवास करायचे टाळतो. >>>> + ११ फारच खतरा झालाय तो. * फलाटावरील घाण, गाडीत चढ़तानाची धक्काबुक्की,>>> +११ उन्हाळी सुटीत काही स्थानकांवर जनरल डब्यात चढण्यासाठी पोलीस लोकांना रांगेतून सोडतात. आरक्षित डब्यांत सटीसामाशी एखादा पोलीस गावतो ! * ट्रान्स सायबेरियन' रेल्वेने असे थोडकेच रेल्वे प्रवास केले की सुखाने देह ठेवीन म्हणतो :-)))>>>> नक्की कराल हे मस्त प्रवास, शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मुंबई दिल्ली राजधानी

सुबोध खरे
Wed, 10/23/2019 - 12:03 नवीन
मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस ने किंवा मुंबई अहमदाबाद / दिल्ली आग्रा शताब्दीने प्रवास करा. गडबड गर्दी, घाण, काहीही नाही. स्वच्छ डबे, उत्तम खाद्यपदार्थ, आरामदायक प्रवास. उत्तम अनुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

माहिती

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 12:34 नवीन
थोडे सामान्यज्ञान: * तिकीट तपासनीसाला बहुतेक सगळे "टी सी" म्हणतात. पण हे तपासनीस 2 प्रकारचे असतात: १. प्रत्यक्ष गाडीत जे तिकीट पाहतात ते TTE (ट्रेन टिकेट एक्झामिनर) . २. गाडीतून उतरून बाहेर जाताना जे तिकीट मागतात ते TC ( टिकेट कलेक्टर). आता इ-तिकिटे वाढताहेत तसे 'कलेक्शन' कमी होत आहे. * 'इंजिन ड्रायव्हर' हा चुकीचा शब्द आहे. कारण ट्रेनला 'ड्राईव्ह' करायचे नसतेच ! योग्य शब्द आहे 'लोको पायलट'. फक्त लोकल ट्रेन चालकाला 'मोटरमन' म्हणतात.
  • Log in or register to post comments

रेल्वे व स्वच्छता

चौकटराजा
Wed, 10/23/2019 - 14:03 नवीन
रेलेवे म्हण्जे घाण हे समीकरंण मोदी आप्ल्यापासून बिघडत चालले आहे. खास करून दख्क्क्न मधील रेल्वे स्थानके फार उत्तम ठेवली जात आहेत. पुणे मुम्बई भाग मात्र घाण असू शकेल . उत्तर भारतीयान्च्या एकूण स्वच्छतेच्या कल्पनाबद्द्ल न बोललेले बरे !
  • Log in or register to post comments

चालकाचे जीवन

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 16:14 नवीन
काही वर्षांपूर्वी गणेश ल कुलकर्णी या लोको पायलट गृहस्थांचे अनुभवकथन 'अंतरनाद' मध्ये आले होते. त्यातले काही: १. इंजिनात शू करण्याची सोय नसते. तिथल्या उष्णतेने लघवी शरीरातच आटून जाते. २. लांब पल्ल्याच्या कामास निघाले की त्यांना स्वतःचा शिधा बरोबर न्यावा लागतो. जिथे मुक्काम पडेल तिथे तो देऊन अन्न शिजवून मिळते. चव वगैरे विसरावी लागते. ३. अत्यंत कोलाहल असलेल्या खोलीत झोपावे लागते. ४. गाडी वेगात असताना जनावरे आडवी येऊन मरतात तो प्रसंग वेदनादायी असतो. अशी जर म्हैस मेली तर नंतरचे सफाईचे काम भयाण असते. ५. कित्येक वर्षे या चालकांना दिवाळी आणि अन्य सण घराबाहेर काढावे लागतात. नातेवाईक, लग्ने हे तर विस्मरणात जाते.
  • Log in or register to post comments

रेल्वे चालकांची विश्रांती...

हेमंतकुमार
Sat, 04/25/2020 - 10:37 नवीन
भविष्यातील वेगासाठी आज विश्रांती! (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/railway-diary/articleshow/75360659.cms) उपनगरी रेल्वे चालकांचे भाव विश्व उलगडणारे एक छान स्फुट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान

फारएन्ड
गुरुवार, 10/24/2019 - 09:17 नवीन
छान लिहीले आहे. मी पण रेल्वे फॅन आहे.
  • Log in or register to post comments

"हसवणूक" मधला पुलंचा "काही अप

मराठी_माणूस
गुरुवार, 10/24/2019 - 11:03 नवीन
"हसवणूक" मधला पुलंचा "काही अप काही डाउन" लेख आठवला.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
गुरुवार, 10/24/2019 - 12:21 नवीन
फारएन्ड, धन्यवाद. म मा, * पुलंचा "काही अप काही डाउन" लेख आठवला. >>> नाही आठवत त्याबद्दल. थोडक्यात लिहिता का ? धन्यवाद
  • Log in or register to post comments

काही अप्स मधील ..

चौकटराजा
Fri, 10/25/2019 - 11:20 नवीन
त्या लेखातील एक आठवतेय ते म्हणजे " सगळ्या गाड्या आपल्या गाडीला पास करून पुढे जातात , आपली अगदी कशी कोण्याही गाडीला पास करून जात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

भूतगाडी अर्थात घोस्ट ट्रेन

गामा पैलवान
गुरुवार, 10/24/2019 - 18:54 नवीन
कुमारेक, आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद! मलाही रेल्वेचा प्रवास आवडतो. पण मुंबईचा जीवघेणा लोकल प्रवास नकोसा वाटतो. इथे इंग्लंडमध्ये एखादी प्रवासी रेल्वे सेवामार्ग बंद करायचा झाला तर बरीच कायदेशीर कटकट करावी लागते. त्यापेक्षा रेल्वे अस्थापन अशी सेवा किमान पातळीवर आणून सोडतात. म्हणजे दिवसाला किंवा आठवड्याला फक्त १ अशा फेऱ्या ठेवतात. त्याही अडनिड्या वेळेस असतात. अशा गाड्यांना घोस्ट ट्रेन किंवा पार्लमेंटरी ट्रेन म्हणतात. पार्लमेंटरी म्हणजे संसदेच्या कायद्याने चालू ठेवावी लागलेली असा अर्थ आहे. काही चाहते मुद्दाम अशा भूतगाड्यांनी प्रवास करतात व छंद म्हणून तिकिटं गोळा करून जपून ठेवतात. अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Parliamentary_train आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

भर ...

हेमंतकुमार
गुरुवार, 10/24/2019 - 19:25 नवीन
गा पै, सुंदर माहिती, धन्यवाद. प्रवासादरम्यान रेल्वेच्या लोकांकडून कळलेली अजून काही माहिती: १. प्रत्येक ट्रेन जेव्हा पुलावरून जाते त्यांनतर त्याचे आधारस्तंभ नटबोल्टस तपासले जातात. २. ट्रेन स्थानकात शिरताना प्रत्येक डब्याचे प्रत्येक चाक गोल फिरतंय ना हे पाहतात. ३. खुद्द चालकाने सांगितले: त्यांच्या ८ तासाच्या प्रवासात जर त्यांना २ स्थानकांचे दरम्यान 'घाईची' संडास लागली तर एकदाच २० मिनिटे गाडी थांबवण्याची परवानगी आहे !
  • Log in or register to post comments

खुद्द चालकाने सांगितले:

जॉनविक्क
गुरुवार, 10/24/2019 - 20:09 नवीन
खुद्द चालकाने सांगितले: त्यांच्या ८ तासाच्या प्रवासात जर त्यांना २ स्थानकांचे दरम्यान 'घाईची' संडास लागली तर एकदाच २० मिनिटे गाडी थांबवण्याची परवानगी आहे !
अहो ते तर चालत्या गाडीत पण करू शकतील की, त्यासाठी रेल्वे का थांबवायची 20 मिनिटे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

'घाईची'

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2019 - 20:11 नवीन
'घाईची'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

जॉन,

हेमंतकुमार
गुरुवार, 10/24/2019 - 20:36 नवीन
इंजिनमध्ये सोय नसते हे वर लिहिले आहेच. मग ते उतरून प्रवासी डब्यात येतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

करेक्ट

गामा पैलवान
Fri, 10/25/2019 - 12:35 नवीन
कुमारेक, अगदी बरोबर. आतील माणसाच्या दृष्टीने रेल्वे इंजिन ही एक अत्यंत दाटीवाटीची एक चिमुकली खोली असते. त्या छोट्याश्या खोलीत शीशू केली तर बघायलाच नको! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ओह! फार मोठी गैरसोय आहे ही.

जॉनविक्क
गुरुवार, 11/07/2019 - 20:31 नवीन
कदाचित यामुळे ते वेळच्यावेळी जेवणखाण व पथ्यपाणी संभाळत असावेत. मी बाकी ही हक्काची वीस मिनिटे नक्कीच रोज वापरली असती जर रेकॉर्ड खराब होत नसेल तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हेहेहे

अभ्या..
Fri, 04/17/2020 - 14:47 नवीन
कदाचित यामुळे ते वेळच्यावेळी जेवणखाण व पथ्यपाणी संभाळत असावेत.
मोबाइल नव्हते तेंव्हा ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफला ड्युटी रिमाइंडर द्यायला बुक म्हणून एक पोर्टर यायचा. त्या इसमाचे तेवढेच काम असायचे. रेल्वेत ड्रायव्हर्सचा बॅकप काटेकोरपणे सांभाळला जातो. त्यांना मायलेज (रनिंगनुसार पेमेंट मधे भत्ता) मिळतो असे ऐकलेले. रेल्वे इंजिनांची दिशा बदलण्यासाठी (रिव्हर्स असायची पण केबिन तशा नसल्याने दोन्ही बाजुने पळणारी नसायची) जुन्या काळी त्रॅक लूप असायचे. Image removed. टर्न टेबल Image removed. ह्याकामासाठीच टर्न टेबल हेही एक इंटरेस्टिंग उपकरण वापरत. त्यावर इंजिन आणून रुळाचा तेवढाच तुकडा टेबलवर फिरत असे तो गिअर्सने फिरवून इंजिनाची दिशा बदलली जाई. हे मोहोळजवळ पाकणी डेपोला परवापरवापर्यंत होते. आता दुपदरीकरणात उडवले असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

भारीच की..

हेमंतकुमार
Fri, 04/17/2020 - 15:27 नवीन
अभ्या, एकदम कडक फोटू , आवडलेच ! नुसते बघून ती प्रक्रिया नीट नाही कळली. प्रात्यक्षिक बघायला हवे होते असे वाटून राहिले खरे. बाकी पाकणी गेले की सोलापूर ढांगेवर आल्यागत वाटते. मधले ‘बाळे’ कसे पटकन निसटून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा