वजनाचा काटा -८
वजनाचा काटा -८
गरोदरपण -- बऱ्याच मुलिंचं लग्न झालं कि वजन वाढायला सुरुवात होते. याची काही कारणे अशी आहेत. लग्न ठरेपर्यंत मुली आपल्या एकंदर रूपाबद्दल आणि वजनाबद्दल जास्त जागरूक असतात.
त्याच बरोबर लग्नामुळे आयुष्यात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल मुलीला जशी उत्सुकता असते तसाच एक तणाव ही असतो. नवरा कसा मिळेल? सासर कसे मिळेल? या गोष्टींमुळे खाल्लेले "अंगी" लागत नाही.
हा परिस्थिती लग्न ठरले कि बदलू लागते. भावी नवऱ्याबरोबर फिरायला जाणे आणि बाहेर खाणे किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर सुग्रास अन्न मिळणें हे सहजी होऊ लागते. शिवाय आत्तापर्यंत असलेला तणाव कमी होऊ लागतो. त्यामुळे खाल्लेले "अंगी" पण लागू लागते
साखरपुडा, लग्न, मधुचंद्र या पायऱ्या चढता चढता मग वजनाच काटा जो डावीकडे असतो तो मध्यभागाकडे झुकू लागतो. आजकाल बऱ्याच वेळेस करियर सासरी स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ हवा इ कारणांमुळे पहिले मूल लांबणीवर टाकले जाते त्यामुळे बऱ्याच मुलींचा काटा अगोदरच उजवीकडे झुकू लागलेला किंवा झुकलेला असतो. कारण लग्न समारंभासाठी घेतलेले ब्लाउज होईनासे होतात.अशा मुली आता वजन कमी करायला हवं आहे असे म्हणू लागतात. पण त्यात फारसा जोर नसतो. बऱ्याच वेळेस जनाचे आणि मनाचे समाधान करण्यासाठी" डाएटिंग" सुरु होते
अशा मोरपंखी दिवसात नवीन बाळाची चाहूल लागते आणि दुधात साखर पडल्याचा आनंद होतो. मग पहिला हल्ला घरच्यांकडून होतो. " आता तुझा डाएटिंग वगैरे बंद कर".
त्यातून आपल्या मराठी किंवा हिंदी धारावाहिक मध्ये मुलगी गरोदर झाली म्हणजे जगावर उपकार केल्यासारखे असते.
जरा म्हणून कुठे वाकली, पटकन उठली कि आई किंवा सासू "अगं अगं अशी पटकन उठू नकोस या दिवसात तुला जपायला पाहिजे" याचा मोठा परिणाम आया /सासवांवर होत असतो. मग काय वजनाचा काटा फारच पटकन उजवीकडे झुकू लागतो.
ज्यांना पहिल्या दोन तीन महिन्यात उलट्यांचा फार त्रास होतो. त्यांना उलट्या बंद झाल्या कि दुप्पट खाण्यासाठी जबरदस्ती केली जाते.
याचा परिणाम काय? तर बहुसंख्य बायका पहिल्या बाळंतपणानंतर सुदृढ होऊन बसतात आणि मग ते वजन हटता हटत नाही. नवरे सुद्धा विचार करतात चवळीच्या शेंगेसारखी असलेली आपली बायको सुरणाचा गड्डा कशी झाली?
मूळ आपले वजन "प्रमाणात" असावे यासाठी हल्ली मुलींना जास्त कष्ट करावे लागतात.
शाळेत रोज जाताना मज विघ्ने येति नाना यासारखे चहुबाजूनी सुग्रास खमंग पदार्थांची रेलचेल असताना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे हा सदा सर्वकाळ असणारा प्रश्न आहे.
परंतु ज्या मुलींनी गरोदर होण्याचे योजलेले आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच वजन नियंत्रणात आणायला सुरुवात केली पाहिजे तसेच लोह कॅल्शियम इतर खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी भरपूर असा आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे म्हणजे गरोदरपणात या तत्वांची कमतरता भासणार नाही.
गरोदरपणाच्या नऊ महिन्यात स्त्रीचे एकंदर १२-१३ किलोने (सरासरी) वजन वाढते.
यापैकी
३ किलो वजन बाळाचे
३ किलो वजन गर्भाशय(२ किलो) आणि स्तनाचे (१ किलो)
३ किलो वजन गर्भजल आणि वार ( प्लॅसेंटा)
आणि
३-४ किलो आईच्या शरीराचे (यात २ किलो रक्तद्रव आणि दोन किलो शरीरद्रव) येतात.
याचा साधा सरळ अर्थ असा आहे कि १२-१३ किलोपेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईचे वजन असते. ( त्यात बहुतांशी चरबीच असते)
जुन्या काळात (म्हणजे फार जुना नाही) पण ६०-७० वर्षांपूर्वी मुलींचे १६-१७ व्या वर्षीच लग्न होत असे आणि १८ व्य वर्षी पहिले बाळंतपण येत असे. त्यामुळे मुलीकडे स्वतःची वाढ पूर्ण होण्याच्या अगोदरच बाळंतपण नशिबी येत असे. यामुळे तुला आता दोन जीवांसाठी खायचे आहे सारखे वाक्प्रचार ऐकायला मिळत.
तेंव्हा आजच्या सारखी अन्नाची रेलचेल नसे. अन्नधान्याचे दर आजमितीस पूर्वीपेक्षा कितीतरी कमी आहेत. किमान वेतन रोज १६० रुपये आहे. यामुळे शहरात अगदी झोपडीत राहणारी मुले सुद्धा कुरकुरे मॅग्गी सारखे प्रक्रिया युक्त पदार्थ खाताना दिसतात.
"तुला आता दोन जीवांसाठी खायचे आहे" असे वाक्प्रचार रूढार्थाने वापरले जातात पण त्याचा संदर्भ बदलला आहे. आता ९५% टक्के मुली (निदान शहरात) २२-२३ वयानंतर पहिल्या बाळंतपणासाठी येताना दिसतात. वाढ पूर्ण झालेली आणि सुदृढ अशी मुलगी जेंव्हा गरोदर असते तेंव्हा हा वाक्प्रचार कसा उलट लागू पडतो ते पहा. पहिल्या २० आठवड्या पर्यंत बाळाचे वजन फक्त २५०-३०० ग्रॅम असते. म्हणजे ६० किलो वजनाच्या आईच्या फक्त ०.५ % वजन.
आता १००.५ साठी जर आपण २००% अन्न खाल्ले तर काय होईल?
२० आठवड्यानंतर मुलाचे वजन भरभर वाढते पण तरीही जन्माचे वेळेस मुलाचे वजन ३ किलो(७ पौंड) च्या आसपासच असते म्हणजे परत आईच्या वजनाच्या ५% पेक्षा कमी(आईचे वजन वाढून आता ७० झालेले असते).म्हणजे १०५ साठी २०० टक्के खाल्ले कि उरलेले वजन "अंगावरच" चढते.
पुढचे सहा महिने आई बाळाला दूध पाजत असते. जन्मास आलेल्या बाळाला एका वेळेस फक्त ३० मिली दूध लागते. ( मुलाच्या जठराची क्षमता तितकीच असते) दिवसात सहा वेळेस दूध पाजले तरीही ते १८० मिली च होईल. याचा अर्थ बाळासाठी लागणारे अन्न किती कमी आहे ते लक्षात घ्या. सहा महिन्याच्या मुलाचे वजन साधारण दुप्पट पेक्षा थोडे जास्त असते.( पाच महिन्याला बाळाचे वजन जन्माच्या वेळच्या वजनाच्या दुप्पट आणि एक वर्षाला तिप्पट असायला हवे) म्हणजेच बाळाचे वजन सात किलो च्या आसपास असते. म्हणजेच बाळाचे वजन सहा महिन्यात ४ किलोने (किंवा ६६६ ग्रॅम महिन्याला) वाढते.
पूर्वी दर दीड दोन वर्षात पाळणा हलत असे आणि तेंव्हा आज सारख्या सोयी सुविधा नसत.बऱ्याच वेळेस मुलीबरोबर तिची आई सुद्धा बाळन्तीण असे. तेंव्हा आई कडून कोड कौतुक करून घेणे जरा कठीणच असे. बायकांना पाट्या वरवंट्यावर कामे करावी लागत. पाणी भरावे लगे, आडातून पाणी काढून कपडे धुवून वाळत घालावे लागत, झाडणे, पुसणे/ सारवणे करावे लागे. भांडी घासावी लागत. एवढ्या सगळ्या कष्टासाठी त्यांना अर्थात खाणे जास्त लागत असे.
आता नळ सोडला कि पाणी येते. मिक्सर वर दोन मिनिटात चटणी वाटणे सारखी कामे होतात. झाडणे, पुसणे भांडी घासायला बहुतांश मध्यमवर्गीय स्त्रियांकडे मोलकरणी असतात. चार पावले चालण्यापेक्षा आज काल मुली रिक्षा करताना दिसतात.
पण निसर्ग आपले काम करतच असतो त्यामुळे गरोदर झाल्यावर भूक तेवढीच लागते. शिवाय मुलाला दूध पाजत असताना स्त्रियांना भूकही चांगली लागते.
त्यातून सुग्रास अन्न सहज सदा सर्वत्र आणि तेंव्हा पेक्षा जास्त स्वस्त असे उपलब्ध आहे. मग वजनाचा काटा ० ते १०० तीन सेकंदात जातोच.
सांगण्याचा अर्थ एवढाच आहे कि पूर्वीसारखे खाणे पिणे चालू असले तरी पूर्वीसारखे शारीरिक कष्ट आता नाहीत त्यामुळे अंगावर चरबी चढणे हि गोष्ट सर्व(सा)मान्य झाली आहे.
आज तुम्ही ( निसर्गनियमाने)एकामागोमाग एक होणारी मुले संततिनियमनाने थांबवली आहेत मग त्या अनुषंगाने वाढणारे वजन थांबवायला हवे.
संततिनियमना सारखी वजन "कंट्रोल" करणारी गोळी नाही का म्हणजे जोवर तुम्ही गोळी खाता तोवर "काहीही" खाल्लेले चालेल असे मला एका सुदृढ महिलेने विचारले. मी हसून अर्थात नकार दिला.
दुर्दैवाने नवऱ्याने वजन वाढले आहे सांगितले कि रुसवे फुगवे होतात तुम्हाला काय माहिती मुलाला जन्म द्यायचा दूध पाजायचे म्हणजे किती कष्ट होतात अशी संभाषणे होतात. सासूने काही बोलले तर "तुम्ही" माझे खाणे काढू नका म्हणून "प्रेमळ" संवाद होतात.
याला उपाय काय? आपले वजन गरोदरपणा पूर्वी किती आहे याची प्रथम नोंद ठेवणे आवश्यक आहे. तेच मुळात जास्त असेल तर वजन कमी करण्याची सुरुवात आहारतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्याने करावी. त्याच प्रमाणे केवळ भूक लागते म्हणून सदा सर्वकाळ "चरणे" बंद करावे.
माझ्याकडे येणाऱ्या सदृढ गरोदर महिलांची काही उदाहरणे अशी आहेत. यात डोहाळे लागले, नवरे/आई वडील "कौतुक" करतात याचा अंतर्भाव आहे.
१) मला रोज एक "कॅडबरीचा" बार लागतोच. ,
२) मला सारखी शेवपुरी पाणीपुरी खाविशी वाटते. नवरा म्हणाला तीन प्लेट तरी एका वेळेस खाते. ( हे रात्रीच्या जेवणाच्या पूर्वी)
३) मला रोज "मागचा पुढचा" भात लागतोच. यात प्रमाण किती ते विचारायचे नाही.
आता गरोदरपणात वाढलेले वजन पुढे बाळाला "दूध पाजते" म्हणून कमी होण्याचे नाव घेत नाही. मग वर्ष दोन वर्ष अशी गेली कि पुढे ते कमी करण्यासाठी कोणतीही प्रेरणा राहत नाही. मुद्दाम एखाद्या नर्सरी/ प्ले ग्रुप शाळेशी जाऊन पहा. अडीच तीन वर्षाची गोंडस मुले आणि त्यांच्या गुटगुटीत आया हे सहज दिसणारे दृश्य झालेले आहे.
मागे लिहिल्याप्रमाणे एका ताईंनी मुलाच्या मागे पळण्यात किती व्यायाम होतो त्यामुळे इतर व्यायामाची गरजच नाही असे ठासून सांगितले होते.
गैरसमज, थोडीशी दुराग्रही वृत्ती, मी "जशी आहे तशी" लोकांनी स्वीकारली पाहिजे हा आग्रह आणि बहुतांशी आळस आणि कष्ट करण्याच्या तयारीचा आणि प्रेरणेचा अभाव यामुळे हि समस्या जातील पण गंभीर होत चालली आहे हि मात्र वस्तुस्थिती आहे.
Book traversal links for वजनाचा काटा -८
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा. छान माहिती. बादवे,
तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय.
पि रा ताई
लेखन आवडले.
dr ने आताच्या लाइफस्टाइलवर
कोणत्या चालीरीती ? .. जरा
"जशी आहे तशी" लोकांनी
लॅप्रोसक्शन का काय ते करुन
आजच रुजुता आणि करिनाने
जबरदस्त
नातेवाईकांकडे गेल्यावर
साहेब,
आयला खरंच की!!!
याबरोबरच या गोंडस मुलांचे
असे लोक उरा-उरी भेटण्याच्या ऐवजी उदरा-उदरी भेटतात :) (:
डॉक्टर साहेब , ही लेखमाला
प्रत्येक व्यक्तीने आहार
धन्यवाद , उपयुक्त संकलन !
चांगली मालिका आहे.
एक शंका
झोपडीतील माता स्वतः सुदृढ
उत्कृष्ट प्रतिसाद !!!
डॉ.अतिशय सुंदर लेख आहे.माझ्या
तसेच विनाकारण वजन वाढू नये
वर सुचवल्याप्रमाणे गरोदरपणात
माफ करा डॉ.हा प्रश्न इथे
कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर
आपली प्रसूतीची तारीख ४
धन्यवाद् डॉक्टर