✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तीर्थरुपांच्या काही आठवणी!

आ
आदित्य कोरडे यांनी
Sun, 10/23/2016 - 21:35  ·  लेख
लेख
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत. माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे. आम्हा मुलांची जेवणं आधीच झाली होती आणि उरलेलं पुरण टेबलावर वाटीत तसच होतं आत्याला वाटल ते उरलच आहे, ती म्हणाली हे पुरण जर वाया जाणार असेल तर ते मी घेते, या वर एका क्षणाचा विलंब न लावता देशपांडे म्हणाले, “म्हणजे वायाच कि!” देशपांडे आणि त्यांचा बँकेतला एक मित्र देवधर म्हणून होता. त्या दोघांनी एकदा कसली तरी बँकेतली परीक्षा दिली होती आणि ती ते दोघही पास झाले. म्हणून त्या देवधरच्या सांगण्याप्रमाणे देशपांड्यांनी एका रविवारी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आमच्या घरी मेजवानीलं बोलावले.त्याप्रमाणे ते देवधर काका, देवधरिणबाई आणि त्यांची मुलगी आरती आणि मुलगा सुजय एका रविवारी घरी आले. आता तो देवधर, पक्का कोकणस्थ त्यामुळे जेवायला मटण रस्सा, सुकं मटण, त्यांच्या पोरांना नळी फोडायला जमेल न जमेल शिवाय देवधर काकू मटण खात नाहीत( का? ह्या प्रश्नच उत्तर मला अजून मिळालेलं नाही) म्हणून चिकन, वर आणि तोंडी लावायला कोलंबी फ्राय( हो! त्यात काटे नसतात म्हणून) भाकरी, पुलाव वगैरे बेत होता. आता आम्ही जातीने वडलांकडून ब्राह्मण पण आई जातिवंत पठारे प्रभू – तिला मटण आणि मासे एकदम प्रिय. देशपांडे नास्तिक असण्याचा फायदा तिला सगळ्यात जास्त झाला.(आता माझ्या बायकोला होतो...आम्ही कोरडे- देशपांडे असेच, स्वतःच्या बायकोला फायदा मिळावा म्हणून असे कायम त्याग करतो...असो! )लग्नानंतर श्रावण,चतुर्थी, एकादशी गुरुवार कशशाकशाचा म्हणून तिला अडथळा उरला नाही, तिच्या माहेरी म्हणजे माझ्या मामाकडे ह्या गोष्टी अगदी काटेकोर पणे पाळल्या जात.म्हणजे श्रावणाचा अक्खा महिना मासे खायचे नाहीत. आता हे जरा अवघड व्हायचं म्हणून जेवताना शेगडीवर सुक्या बोम्बलाचा तुकडा जाळायचा आणि अख्ख घर त्या वासानं घमघमलं कि त्यासावर मेथीची भाजी नाहीतर शेपूची भाजी खायची असे आमचे आजोबा कट्टर(?)... तर ते एक असो, देवधरांनी जेवणावर चांगला अडवा हात मारल्यावर अगदी तुंदिल टन्नू (हा आईचाच शब्द !)झाल्यावर देशपांडे देवधरकाकूंना म्हणाले, “ वाहिनी आता पुढच्या रविवारी तुमच्याकडे अशीच पार्टी करूयात , काय म्हणताय , तुमचा नवरा हि परीक्षा पास झालाच आहे कि.“ त्यावर देवधर काकू म्हणाल्या, ”छे हो आम्हाला कुठे तुमच्या बायकोसारख मटण चिकन करायला जमणार? आमच्या घरी तर अंडही फुटलेलं चालत नाही. आणि आम्हाला हे मटण मासे करायला जमत हि नाही.” झालं देशपांड्यांचा फ्युज उडायाला एव्हढ पुरेसं होतं. म्हणजे एक तर माझ्या आई वडिलांचा आंतर जातीय विवाह, आई ब्राह्मण नाही ह्याची हेटाळणी आणि मटण मासे घरात शिजवण हि काही फार चांगली गोष्ट नाही(बाहेर, लोकांच्या घरी जाऊन खाण्याला काही हरकत नसावी बहुधा) असा एक सूर त्यात होता. (अर्थात हे मला नंतर कळलं)देशपांडे लगेच म्हणाले ,” त्यात काय एव्हढं! मटण, मासे करायला येत नसेल तर बासुंदी करा त्याला काही अक्कल लागत नाही.” देवधर गेल्यावर आईने बाबांची अशी झाडी केली म्हणता पण ती देवधरांकडची बासुंदी पार्टी अजूनही झाली नाही. --आदित्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7346 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

____/\____

जव्हेरगंज
Sun, 10/23/2016 - 23:09 नवीन
____/\____ जबरदस्त!!! जी.एं. च्या काही कथा याच धाटणीने गेल्या आहेत. अगदी जी.ए. वाचतोय असं वाटलं. सशक्त लेखन. या आठवणी जरी असल्या तरी यात कथाबीज घालून वाढवू शकता. उत्तम कथेची मांडणी यात नक्कीच आहे! बादवे, तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय. फार आवडले!
  • Log in or register to post comments

तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे

पिलीयन रायडर
Mon, 10/24/2016 - 19:18 नवीन
तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय.
अगदी.. अगदी..! तुंदिल टन्नु काय आणि सुक्का बोंबिल जाळुन त्याव्र मेथीची भाजी खाणे काय!! __/\__ फक्त माझं काही तरी हुकतंय, मला देशपांडेचा मुलगा "आदित्य कोरडे" कसा हे नाही कळालं अजुन! आईचं आडनाव लावलंय का? कारण "आम्ही देशपांडे-कोरडे" असे.. असा उल्लेख आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

माझा ह्या आधीचा लेख

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 16:34 नवीन
माझा ह्या आधीचा लेख "देशपांडे आमचे वडील"ह्यात ह्याचा खुलासा आहे. तुमच्या साठी परत देतो "देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझा ह्या आधीचा लेख

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 16:36 नवीन
माझा ह्या आधीचा लेख "देशपांडे आमचे वडील"ह्यात ह्याचा खुलासा आहे. तुमच्या साठी परत देतो "देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हाहाहाहा.. सही लिहीलंय !

स्रुजा
Mon, 10/24/2016 - 00:06 नवीन
हाहाहाहा.. सही लिहीलंय !
बादवे, तीर्थरुपांचा उल्लेख 'आमचे देशपांडे' असा केलाय. तो जाम भन्नाट झालाय. फार आवडले!
+ १११११ अजुन लिहा.
  • Log in or register to post comments

+१११ मस्त!

खेडूत
Mon, 10/24/2016 - 10:23 नवीन
+१११ मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

जबरदस्त! भन्नाट लिहिलंय!

एस
Mon, 10/24/2016 - 00:23 नवीन
जबरदस्त! भन्नाट लिहिलंय!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

रेवती
Mon, 10/24/2016 - 06:34 नवीन
लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

आवडले

नाखु
Mon, 10/24/2016 - 09:12 नवीन
आणि फटकेबाजीही फर्मास.
  • Log in or register to post comments

तीर्थरूपांना

चांदणे संदीप
Mon, 10/24/2016 - 09:17 नवीन
शि. सा. दंडवत! =)) अजून लिहा! sandy
  • Log in or register to post comments

आंतरजातीय प्रॉडक्टमधे स्वजाती

आशु जोग
Mon, 10/24/2016 - 10:43 नवीन
आंतरजातीय प्रॉडक्टमधे स्वजाती अभिमान जरा जास्तच दिसून येतो . .
  • Log in or register to post comments

म्हणजे काय?

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 07:20 नवीन
म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

आंतरजातीय प्रॉडक्टची जात

आदित्य कोरडे
Sat, 12/03/2016 - 06:41 नवीन
आंतरजातीय प्रॉडक्टची जात नक्की कोणती मानायची....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मस्त लिहिलंय.

साहेब..
Mon, 10/24/2016 - 11:49 नवीन
एवढं फटकून बोलणारे लोकं आजकाल कमी आहेत, पण जे काय बोलतात ते स्पष्ट असतं, लपवाछापवी नाही. आवडलं.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे! अजून लिहा!

अनुप ढेरे
Mon, 10/24/2016 - 11:52 नवीन
सुंदर लिहिलं आहे! अजून लिहा!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय.

कौशी
Mon, 10/24/2016 - 14:47 नवीन
आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Mon, 10/24/2016 - 18:54 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

मस्त....

महामाया
Mon, 10/24/2016 - 19:18 नवीन
लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

क्रुपया आपले लेख एका

मंदार कात्रे
Sat, 10/29/2016 - 08:17 नवीन
क्रुपया आपले लेख एका आठवड्याच्या अन्तराने टाका मिपाची ती अलिखित पॉलिसी आहे जुना जाणता मिपाकर म्हणुन सान्गतोय. राग नसावा . लेख चान्गले असतात तुमचे पण घाई करु नका टाकण्याची
  • Log in or register to post comments

पिटू लेख नुलकरकाकांच्या

यशोधरा
Sat, 10/29/2016 - 09:18 नवीन
पिटू लेख नुलकरकाकांच्या लेखाची कॉपी, हा लेख मूळ कोणाचा?
  • Log in or register to post comments

पिंटू हा आमचा कुत्रा होता. तो

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 16:48 नवीन
पिंटू हा आमचा कुत्रा होता. तो आमच्याकडे १९८९ मध्य आला आणि २००३ साली तो वारला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुमचा कुत्रा होता हे ठीक आहे

यशोधरा
Sat, 10/29/2016 - 17:33 नवीन
तुमचा कुत्रा होता हे ठीक आहे पण नूलकरकाकांच्या लेखमधून कॉपी पेस्ट का केले म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदित्य कोरडे

त्यांना शब्द सापडेल नसतील

प्रचेतस
Sat, 10/29/2016 - 17:38 नवीन
त्यांना शब्द सापडेल नसतील कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी काहीही कॉपी केलेले नाहीये.

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 18:00 नवीन
मी काहीही कॉपी केलेले नाहीये. कोण नूलकर? त्यांचा कोणताच लेख मी वाचला नाहीये, मी येथे हल्ली हल्ली लिहू लागलोय. पण नूलकरांच्या त्या लेखाचा धागा दिला तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

आणखी एक , हा लेख मिपा वरून

आदित्य कोरडे
Sat, 10/29/2016 - 18:01 नवीन
आणखी एक , हा लेख मिपा वरून उडवला आहे का? दिसत नाहीये....
  • Log in or register to post comments

छान लेख, बाकी बासूंदी बनवणार्

खटपट्या
Sun, 10/30/2016 - 12:58 नवीन
छान लेख, बाकी बासूंदी बनवणार्‍यांच्या भावना दुखावल्या नाहीत म्हणजे मिळवली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा