समरस व्हावे ऐसे
थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा
दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा
शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता
मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे
परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी
मी स्वत:स विसरून जावे
तू असे मला निरखावे
डोळ्यांनी तन्मयतेने
मग युगल गीत गावे
संकोच मनी, भारल्या क्षणी
ना स्पर्शे उभय चित्तांशी
तू अवघी तुला, मीही मजला
जोडतो समर्पणभावाशी
वेडेपण अन् आंधळेपण
असेल उरात जे काही
निथळूदे सारे सारे उत्कट
न राहो मागे उरले जराही
थिजूदे भौतिकता भवती
वा, उधळूदे जीवन वाटांतून
देऊ झोकून दोघांना दोघे
निळ्या गगनाच्या काठांतून
- संदीप चांदणे
___/\___
सुरेख,
मस्तच रे सँडीबाबा,
-
कविता आवडली!
सैराट कविता! खूप आवडली.
अप्रतिम.