शेअरबाजारः रोटी,कपडा,ईक्विटी’..और मकान !!!
रोमन कॅथलिक चर्चच्या मान्यतेनुसार सात पापांची गणना महत् पापे (Cardinal Sins) म्हणुन होते...आपल्या कडील षड्रिपुंसारखीच, मात्र गंमतीचा आणि वेगळा भाग हा, की बायबल काळापासुन चालत आलेली ही सात पापांच्या मुळ यादी तशी लवचिक स्वरुपाची आहे. पोप ग्रेगरी यांनी त्यात प्रथम बदल केला आणि नंतर ही त्यांत क्वचित,कालपरत्वे बदल होत असतो.'The Only Thing That Is Constant...Is Change' ही उक्ती मला मनापासुन पटते आणि म्हणुनच मनोजकुमारादी मान्यवरांची क्षमा मानुन लेखाचे शीर्षक थोडेसे बदलले आहे.
अब्राहम मास्लो या मानस शास्त्रज्ञाने प्रथमतः मानवी गरजांचे पृथक्करण केले. त्यात सर्वप्रथम अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभुत 'गरजा' भागविल्यानंतर मनुष्य हा 'ईच्छापुर्ति'च्या दिशेने धावु लागतो असे त्यांचे सर्वसाधारण प्रतिपादन आहे. ह्या वेगवेगळ्या भौतिक, सामाजिक वा मानसिक सुखांची उतर्ंड सर करावयाच्या प्रयत्नांना वास्तवात आणण्यासाठी काय केले पाहिजे?? याचा मी स्वांतःसुखाय, स्वतःसाठी म्हणुन केलेल्या चिंतनाचा सारांश म्हणजे मुळ उक्तीत केलेला बदल आहे असे आपण म्हणु शकता.
माझा एक जवळचा मित्र श्री.श्रीकांतने बरेच दिवसांपासुन मारुतिची 'स्वीफ्ट' गाडी घ्यायचा घाट घातला होता. कर्ज काढणार नाही..ह्या सर्वपरिचित मध्यमवर्गीय बाणेदार खाक्याला अनुसरुन गाडीखरेदीसाठी आवश्यक असणारे पैसे तो निकराने जमवित होता.आता येत्या महिन्यांत गाडी बुक करणार एवढ्यात बादशहा अकबराच्या काळापासुन जगातील सर्वश्रेष्ठ म्हणुन गणल्या जाणारया पुरुषाचा,म्हणजेच त्याच्या एकुलत्या एक मेहुण्याचा त्याला फोन आला. साहेबांना म्हणे त्यांच्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्करिता भांडवल म्हणुन तातडीने 5/6 लाख रुपयांची आवश्यकता होती. झाले,...’तोड दाबुन बुक्क्यांचा मार, सहनही होत नाही...’वगैरे स्थिती म्हणजे काय, याचे प्रत्यंतर माझ्या मित्राला आले. पण काय करणार??..शेवटी "आपण नाही मदत करायची तर कोणी?? आणि तो देणारच आहे नं एफ.डी एवढे व्याज..." मा.सुप्रीम कोर्टाच्या घरगुती पुर्णपीठाने दिलेल्या काहीशा अशा सुचनेवजा आदेशाने श्रीकांतरावांनी चेकवर मारुतिच्या डीलर ऐवजी आपल्या मेहुण्याचे नाव टाकले.
परमेश्वर कृपेने सर्वकाही व्यवस्थित पार पडेल आणि माझ्या मित्राला दिलेले मुद्दल अगदी व्याजासह (अर्थात एफ.डीच्या दराने) तीन वर्षांनी परत मिळेल असा मला विश्वास आहे. पण तरीही तेंव्हा, 03 वर्षांनी ही रक्कम श्रीकांतची पुर्वनियोजित 'स्वीफ्ट' घ्यायला पुरेशी ठरेल का?? तुम्हाला काय वाटते??
आकडेवारी सांगते,गेल्या 05 वर्षांत की मारुति सुझुकी या कंपनीच्या विक्रीमध्ये प्रतिवर्षी (चक्रवाढ्दराने) अदमासे 16% आणि नफ्यांत 17.60% वाढ झाली आहे. सहाजिकच असा अंदाज बांधता येतो की कंपनीच्या उत्पादनांच्या किंमतीही एवढ्याच प्रमाणांत वाढत असणार. मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की श्री.श्रीकांत काय किंवा आपण, आपल्या एफ.डीज (किंवा आपला मेव्हणा) आपल्याला कधी 16/18% व्याज देतात का?? उलट नफ्याच्या वर्षप्रतिवर्षीच्या अशा पौष्टीक खुराकाने या कपनीचा शेअ्ररच्या भावाने मात्र मारुतीरायांसारखेच उड्डाण केले आहे. सुरवातीस फक्त 125,होय फक्त सव्वाशे रुपयांत मिळालेला हा शेअर बरोब्बर दोन वर्षांपुर्वी (01ऑगस्ट 2013ला) 1350 रुपयांना मिळत होता,आज तो 4200 रुपयांना मिळतोय. सहाजिकच माझ्यासारख्याला त्याचे चारचाकीचे स्वप्न गंगाजळीच्या माध्यामातुन लवकर साकार करावयाचे असेल तर मी R.Ds, F.Ds च्या फंदात न पडता मारुती-सुझुकी (वा अशाच एखाद्या अन्य ब्लुय-चीप कंपनीचे) शेअर्स जमविण्यास सुरवात करणे,वा त्याही पेक्षा सोपे म्हणजे एखाद्या प्रथम दर्जाच्या ईक्विटी फंडांत SIP सुरु करणेच बरे नाही का??
SIP म्हणजे्च Systamatic Investment Planचा विषय निघालाच आहे, तो एका आघाडीच्या फंडाने केलेले एक उत्तम सादरीकरण मला आठवले.त्याचा गोषवारा सांगतो.
समजा तुम्ही नवीन घर विकत घेतले असुन त्यासाठी रु.20 लाखांचे गृहकर्ज 15 वर्षे मुदतीने घेण्याची आपली योजना आहे. आजच्या दराने आपणास या कर्जावर रु.21,676 एवढा मासिक हप्ता पडेल आणि 15 वर्षे मुदतीअखेर आपण मुळ कर्जाबरोबरच रु.19,01,682 एवढे व्याज अशी एकुण रु.39,01,682 ची परतफेड कराल.(http://www.sbi.co.in/portal/web/home/emi-calculator)
आता येथे मांडलेली कल्पना नक्कीच लक्षवेधी आहे, जरुर पहा. फंड सुचवितो की आपण आपली कर्जाची मुदत 15 ऐवजी 20 वर्षे करा. यामुळे आपला मासिक हप्ता रु.19,500 म्हणजे दरमहा साधारणतः रु.1200 ने कमी होईल आणि मुदतीअखेर आपण मुळ कर्जाबरोबरच रु. 26,80,000 एवढे व्याज अशी एकुण रु. 46,80,000 ची परतफेड कराल.
महत्वाची, खरी म्हणजे निर्णायक बाब म्हणजे, कर्जफेडीच्या सुरवातीबरोबरच आता आपण ह्या, बचत केलेल्या हप्त्याची, म्हणजेच रु.1200ची SIP सुरु करावयाची आहे. नुकताच 20 वर्षाचा कालावधी पुर्ण करणा-या ‘HDFC Equity Fund’ या योजनेचा संदर्भ घेतला (http://www.hdfcfund.com/CMT/Upload/Attachments/HDFC_Equity_Fund_Leaflet_June%20_2015_1.pdf) तर प्रतिवर्षी 25% पेक्षा अधिक परतावा देणा-या या योजनेत एखाद्याने रु.1200ची SIP 20 वर्षे ईमाने ईतबारे भरल्यास शेवटी गुंतवणुकीचे मुल्य रु.60,50,000 म्हणजेच आपल्या अपेक्षित एकुण परतफेडीपेक्षा पेक्षा कितीतरी अधिक झाले आहे!!!
मला स्पष्ट केले पाहिजे की लेखांतेल कंपनी वा फंडांचे उल्लेख हे शिफारस म्हणुन केलेले नसुन केवळ प्रातिनिधिक व आकलन सुलभतेकरिता आहेत. ‘HDFC Equity Fund’ या योजनेच्यासारखाच उत्तम परतावा देणा-या किमान २/३ अन्य योजनाही मी सांगु शकेन. महत्वाचे हे आहे की 'उद्या हा आज किंवा कालसारखाच असेल' ह्या सर्वमान्य गृहितकावर विश्वास ठेवुन अशा पद्ध्तीने आपण बॅंकेला केलेल्या एकुण परतफेडीपेक्षा कितीतरी अधिक पैसे विनासायास मिळवणे अगदी शक्य आहे.!!!........एका अर्थाने 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' ठेवुन मिळणारे असे बोनस आपण कितीवेळा मिळवतो??
परवाच वाचनात आले, स्व. राजेश खन्नांचा कार्टर रोडस्थित 'आशिर्वाद' बंगला तब्बल 85 कोटी रुपयांत विकला गेला. स्व.काकानी 1970मध्ये ही मिळकत 3.5 लाखांना विकत घेतली होती म्हणे, म्हणजेच गेल्या 45 वर्षांत ही गुंतवणुक 2428 पट झाली आणि टक्केवारीत बोलावयाचे तर हा दर चक्रवाढीने 19.38% पडला.
प्रसिद्ध गोदरेज समुहाचे व्यवस्थापकिय संचालक् श्री. आदि गोदरेज यांनी त्यांचे पहिले घर सन 1963 मध्ये दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा ‘उषाकिरण’ या ईमारतीत एक लाख रुपयांत घेतले…. पुढे 2011मध्ये 2500 पट जास्त किंमतीला म्हणजेच रु. 25 कोटींना, त्यांनी ते विकले. नफ्याच हा दर 17.70% पडतो.
"आता ह्या लक्ष्मीपुत्रांच्या कथा आम्हाला कशाला ऐकवतोय हा माणुस??"… ही आपल्या मनांत आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असणार हे मी जाणतो. ह्या अशा प्रकारच्या मिळकती घेणे येड्या-गबाळ्याचे काम नव्हे, ही ही मला माहित आहे. पण असेच कल्पनातीत 'रिटर्न्स' देणा-या आणखी एका ईमारतीबद्दल मला आपणाला सांगावयाचे आहे. आणि हो, ती ही अशी, की जेथे आपण कोणीही मालकी मिळवु शकतो बरं का...1980 साली 100रु स्क्वे. फुटांनी उपलब्ध असलेल्या या जागेचा आजचा भाव आहे रु.27000 स्क्वे. फुट!!!. ही जागा म्हणजे (एव्हांना काही चाणाक्ष वाचकांनी ओळखले्ही असेल) आपले 'दलाल स्ट्रीट'!!!,मित्र हो, स्क्वे. फुट हे एक रुपक आहे एका युनिट्साठी. मला आपल्याला आवर्जुन सांगावयाचे आहे की आपल्या बाजारानेही गेले 34 वर्षे 20% हुन अधिक परतावा दिलेला आहे.सबब आपण भलेही नसु उद्योगपती, नसु सेलिब्रिटी,पण हा शेअर बाजार आपल्या हक्काचा आहे. आवश्यकता फक्त विचार बदलण्याची आहे.
लो. टिळक एकदा त्यांच्या सहका-यांबरोबर काही महत्वाचा विचार-विनिमय करीत बसले असतानाच दोन होतकरु (आमच्या गावी येणारे किर्तनकार बुवा या वर्गातील लोकांची 'होईल तितकेच करु' अशी व्याख्या करायचे) तरुण तेथे आले आणि त्यांनी थेट लोकमान्यांना "सांगा, देशासाठी काय करु शकतो आम्ही??" असा प्रश्न केला. लोकमान्यांनी "बाळांनो, प्रपंच नीट करा, संसार सांभाळा" असा 'जनरल' सल्ला देवुन त्यांची बोळ्वण केली. तेंव्हा टिळकांबरोबर बरोबर असलेले सहकारी त्यांना म्हणाले "अहो, का नाराज केलेत तुम्ही त्यांना?? किती उत्साहाने आले होते ते तुमच्याकडे...." लोकमान्य उत्तरले "हे पहा, ज्याला काही खरेच करावयाचे असते, तो विचारायला येत नाही, मी देशासाठी काय करु म्हणुन..तो करुन दाखवतो. मी केले हे योग्यच केले असे माझे मत आहे." अशी कथा मी कोठेतरी वाचली होती. मला काय म्हणावयाचे आहे हे एव्हाना स्पष्ट झाले असावे. आता 'माझ्या उद्दीष्ट्पुर्तीसाठी मी काय करावसाय हवे??'..हा प्रश्न मला तुम्ही बहुधा विचारणार नाही.
लक्षांत घेण्याची गोष्ट ही आहे की आपल्याला काही एखादा मोठ डोंगर एका दिवसांत उलथुन टाकावयाचा नाही. महानदीचा उगमही एक क्षींण प्रवाहच असतो आणि मोहिम कितीही महान असो, सुरवातीचे पाउल हे नेहमीप्रमाणेच फुट दीड्फुट अंतराचेच असते. स्मरणात असलेला आणखी एक किस्सा सांगतो, 'टुर दी फ्रान्स' (Tour de France) ही युरोपांतील एक अतिशय प्रतिष्ठेची सायकल शर्यत आहे. 21 दिवस चालणारी आणि जवळजवळ 3500कि,मी अंतराची ही स्पर्धा जिंकावी यासाठी अनेक संघ अहममिकेने प्रयत्न करतात. प्रसिद्ध सायकलिंग कोच डेव्ह ब्रेल्स्फोर्ड यांच्यावर एकदा ब्रिटीश संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यांत आली. या,इतक्या उच्च पातळीवर दैनंदिन सराव, व्यायाम, शारिरिक तंदुरुस्ती या गोष्टी तर आधीपासुन होत्याच, पण ब्रेल्स्फोर्ड सरांचे वेगळेपण हे, की त्यांनी दैनंदिन बाबींत किरकोळ दिसणारे, अगदी साधे सोपे बदल केले उदा. झोप चांगली लागावी यासाठी आरामदायी उशा वापरणे, पोट बिघडु नये यासाठी सॅनिटायझर शिवाय हात न धुणे....अशा बाबींना त्यांनी त्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमांत प्राधान्य दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच त्यांच्या संघाचे 05 वर्षांत 'टुर दी फ्रान्स' जिंकण्याचे स्वप्न साकार होणार होते. अर्थात पुढे त्यांचा अंदाज चुकला.....त्यांच्या संघाने 05व्या नव्हे तर 03-याच वर्षी ही स्पर्धा जिंकली.!!! अतिशय माहितीपुर्ण व रंजक असा हा किस्सा तपशीलांत वाचावयाचा असल्यास http://jamesclear.com/marginal-gains या दुव्यावर जावुन वाचावा.
...तेंव्हा, पुन्हा एकदा धृवपदाकडे येतो ते हे, की या इहलोकातील तुम्हा आम्हा पामरांना आपली लौकिकार्थातील इप्सिते साध्य करावयाची असतील तर 'इक्विटी' ला पर्याय नाही. 'इक्विटीय नमस्तस्मै एस.आय.पी. ब्रह्मा रुपिणे । आर्थिक क्लेष नाशाय, बाजारायः नमो नमः' हा आधुनिक जगातील मुलमंत्र हवा. अर्थात खरेदी वा विक्रीचा आंघळा साहसवाद केंव्हाही घातकच. गुंतवणुकदाराची भुमिका ऑलिम्पिक मधील नेमबाजासारखी, एकाग्र चित्ताने लक्षवेधाचा प्रयत्न करणारी असावी, हिंदी मारधाड चित्रपटांतील व्हिलनसारखी, अंधाधुंद गोळीबार करणारी नसावी, या माझ्या भुमिकेचा पुनरुच्चार करणे हे हे मी महत्वाचे समजतो.
शेवटी जाता जाता आणखी एक गमतीशीर सत्यघट्नेची माहिती देतो. आपल्या शेजारी राष्ट्राबरोबरील झालेल्या युद्धानंतर दोन्ही अनेक नागरिक आपापल्या मालमत्ता तेथेच टाकुन स्थलांतरीत झाले. भारतातील अनेकजणही शत्रुराष्ट्राचे नागरिक बनले. देश सोडुन गेलेल्या अशा नागरिकांच्या येथे राहिलेल्या मालमत्तांना शत्रु-मालमत्ता (Enemy Properties)असे संबोधले जाते व 'Enemy Property Act of 1968' या कायद्यान्वये गृहमंत्रालयातर्फे एक खास विभागामार्फत त्यांची देखरेख केली जाते. सांगावयाचे हे की सन 1965 व 71 च्या युद्धानंतर केलेल्या मोजणीनुसार भारत सरकारकडील शत्रु-मालमत्ता विभागाकडे अशा नागरिकांच्या नावावर असलेले 29 कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स होते. असे म्हणतात की यांत टाटा समुहांतील महत्वाच्या कंपन्या, युनिट ट्रस्ट, हिंदुस्थान लीव्हर, स्टेट बॅंक, अशिक ले-लॅंड, सिप्ला अशा एक सो एक ब्ल्यु चीप कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी, अधिकृत माहितीनुसार आलिकडेच,2015 साली केलेल्या मुल्यमापनानंतर त्यां शेअर्सचे बाजारमुल्य रुपये 10,000 कोटी एवढे आहे. बघा 345 पट वाढ्ले 45 वर्षांत...आहात कुठे?? अधिक कुतुहल असेल तर हा घ्या आंतरजालावरील दुवा - http://www.business-standard.com/article/markets/enemy-shares-to-be-dematerialised-115041700037_1.html
आता मला सांगा, आपला बाजार जर 'शत्रुची मालमत्ता अशी भरभक्कमपणे वाढवु शकतो, तर आपल्याला,या देशांच्या नागरिकांना हा फायदा का नाही मिळणार??
चीनी लोकांत एक म्हण आहे 'The best time to plant a tree was 20 years ago and The second best time is now.' शेअर्समध्ये करावयाच्या गुंतवणुकीबद्द्लही हेच तत्वज्ञान 100% लागु पडते. चला मग वाट कसली पहाताय ?? गुरु...हो जाओ शुरु!!!
Book traversal links for शेअरबाजारः रोटी,कपडा,ईक्विटी’..और मकान !!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा! छान लेख!
अनुमोदन ! खरंच येऊद्या अशी
लेख नाक्कीच छानआहे,परंतु
असहमत!
असहमत!
लेखाबद्दलची आपल्या सकारात्मक
@ दिवाकर कुलकर्णी
अप्रतिम लेख!
छान लेख!
समजेल असा चांगला लेख
लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
आपण भलेही नसु उद्योगपती
फायदा
असहमत .
सारीच रक्कम
कोणत्याही धंद्यात फुलटाईम
कोणत्याही धंद्यात फुलटाईम
कोणत्याही धंद्यात फुलटाईम
........ह्या व्यवसायतली 'छदाम
एखादा जाणकार पकडून
तुम्हाला उपरोध कळला नाही
TJराव, क्षमस्व. या मनमोकळ्या
छान माहिती. सध्या 1 SIP चालू
ठीक लिखाण.
वॉरन बफेटने कधीही त्याचा पैसा
आपल्याकडून आणखी ऐक छान लेखं !
शेअर्स मध्ये पैसे मिलवणं सोपं
व्याजात अर्धा टक्का कट
अतिशय छान लेख.long term साठी
छान प्रश्न. सर्वसाधारणतः मी
प्रतिसाद बद्धल धन्यवाद.
शेअरबाजारात नफा मिळविणे अवघड
चीनी बाजार
निदान मला तरी असे वाटत नाही.
थोडे विस्ताराने सांगला का? मी
मध्यंतरी चीनी शेअर बाजार कोसळला तेव्हा असे विशलेषण आले होते की त