✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पापाची भागीदारी

ग
गंगाधर मुटे यांनी
Wed, 02/16/2011 - 22:41  ·  लेख
लेख
प्रिय ग्राहक मित्रहो, यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला. उत्पादनखर्च वाढीची कारणे: १) वाढलेले डिझेलचे भाव २) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती ३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर. ४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च. खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला. * मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली. * पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत. * आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. * प्रिय ग्राहक मित्रहो, आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना. पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्‍याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या. * भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या. * हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्‍याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा. तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर "बुडत्याला लुटण्याच्या" पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल. गंगाधर मुटे *******
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13165 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

अनेकांना प्रश्न पडतो की शेती

गंगाधर मुटे
Wed, 02/16/2011 - 22:46 नवीन
अनेकांना प्रश्न पडतो की शेती परवडत नाही मग शेती का करतात. एकेकाळी मलाही हाच प्रश्न पडला होता. आता मात्र उत्तर गवसले. आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण तो शेती करायचे सोडू शकत नाही. कारण, शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत नाही. उदा. मुलगा मोठा झाल्यावर तुला लाथा घालेल असे कितीही मातृत्वाला समजावून सांगीतले तरी मातृत्वाची प्रसवण्याची प्रेरणा जशी कमी होत नाही, तसेच परिणाम काहीही होवोत शेतकर्‍यांची उत्पादन करण्याची प्रेरणा काही कमी होत नाही. पण "जालिम जमाना" हे काही लक्षात घेत नाही. २ रुपयात किलोभर कांदा मिळतो म्हटल्यावर तो जाम खुष आहे.
  • Log in or register to post comments

होय ! चांगला विचार मांडला आहे

माझीही शॅम्पेन
Wed, 02/16/2011 - 23:03 नवीन
होय ! चांगला विचार मांडला आहे ,पण थेट शेतकर्यणा फायदा होणार असेल तर काहीच प्रश्न नाही , मधले दलाल गब्बर होतात आणि ग्राहक आणि शेतकरी दोघही पिडले जातात त्याच काय ?
  • Log in or register to post comments

कांदा वाढत वाढत जेव्हा ५०

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/16/2011 - 23:04 नवीन
कांदा वाढत वाढत जेव्हा ५० च्या आसपास जाऊन टेकला होता तेव्हा लोकसत्ता मध्ये आलेल्या बातमीनुसार वाशीच्या (किंवा इतर कुठल्याशा) घाऊक बाजारात शेतकऱ्यांना अवघे ७ रु प्रती किलो मिळत होते आणि शेतकऱ्यांचा प्रवासखर्च जेमतेम सुटला होता असे त्या बातमीत लिहिले होते. तुम्ही हा जो ४० चा उत्पादनखर्च सांगत आहात, तो खरा असेल तर शेतकरी तेव्हाही कांदा ३३ रु तोट्यात विकत होता? अजून एक प्रश्न पडला, गेल्या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती होता?
  • Log in or register to post comments

प्रति किलो ४० रुपये शेतकर्‍याचा उत्पादन खर्च?

नेत्रेश
गुरुवार, 02/17/2011 - 01:59 नवीन
प्रति किलो ४० रुपये हा शेतकर्‍याचा उत्पादन खर्च खुपच फुगवलेला वाटतो. प्रति क्विंटल ४० रुपये हा भाव बरोबर वाटतो. शेतातुन नुकताच बाजारात आलेला कांदा हा ओला असतो. त्यामुळे त्याचे वजनही जास्त असते. तो कांदा सुखल्यावर, ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे वजन ३० ते ४०% कमी होते (कांदा सुखल्यामुळे, सडका कांदा काढुन टाकल्या मुळे, इत्यादी). शेतकर्‍यालाही नफा व्हायला हवा, म्हणुन त्याला मिळणारा दर ३ ते ६ रुपये प्रति कीलो (ही रेंज एकरी उत्पादन, अवेळी पावसामुळे सडणारा कांदा, ईत्यादी मुळे आहे) बरोबर वाटतो. तेवढाच खर्च व्यापारी, दलाल, अडते यांना पॅकिंक, वहातुक, जकात, हमाली आणी स्टोअरेज यांचा येतो. कांदा हा नाशवंत माल आहे. वहातुक आणी साठवणुकीत तो खराब होतो. दुकानदारांनाही दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार, सरकारी टॅक्स, हप्ते आणी त्यांचा नफा वसुल करायचा असतो. या सगळ्याचा परीणाम म्हणुनच जेव्हा शेतकर्‍याला किलोमागे ३ ते ५ रुपये मीळतात तेव्हा ग्राहक त्या कांद्याला १५ ते २० रुपये मोजतो.
  • Log in or register to post comments

सहमत आहे पण मग कांदा खायचाच

रेवती
गुरुवार, 02/17/2011 - 03:01 नवीन
सहमत आहे पण मग कांदा खायचाच नाही का? खरंतर मलाही शेती करायची भारी हौस आहे. तसेही दलाल रोजच फसवत असतात. शेतकर्‍याला फसवतात तसे ग्राहकालाही फसवत असतात. मग आता काय करायचे? भाजी खायचीच नाही का? नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तरी काय करणार? शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्यांनी बरे वाटणारे फारसे कोणी असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

+४९,९९९

कुंदन
गुरुवार, 02/17/2011 - 05:11 नवीन
>>>तसेही दलाल रोजच फसवत असतात. +४९,९९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा

स्वाती२
गुरुवार, 02/17/2011 - 05:04 नवीन
हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा विकू शकत नाहीत का? माझा प्रश्न तुम्हाला कदाचित अगदी अडाणीपणाचा वाटेल पण शेतकरी आणि ग्राहक दोघांना लुटणारे दलाल या सगळ्या व्यवहारातून बाजूला नाही का करता येणार? बाकी शेतकरी लुबाडला जातो याचे ग्राहकालाही वाईट वाटते पण हळहळण्यापलिकडे फारसे काही त्याच्याही हातात नसते.
  • Log in or register to post comments

शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा

शिल्पा ब
गुरुवार, 02/17/2011 - 08:38 नवीन
शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा काही उपक्रम राबवला तर जमेल....म्हणजे शेतकऱ्यांच्याच घरचे लोक , एखादी सोसायटी काढून असे करू शकतील....लोकांनाही ताज्या भाज्या, फळे इ. माफक किमतीत मिळतील. मुटेसाहेब, तुम्ही याबाबतीत विचार करून काही पुढाकार घेऊ शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

अव्यवहार्य.

गंगाधर मुटे
गुरुवार, 02/17/2011 - 14:18 नवीन
शेतकरी दलालाशिवाय कांदा विकू शकत नाहीत का? डिलर नेटवर्क किंवा दलाल यांना टाळून शेतमाल विकायचा म्हटले तर दोन पर्याय आहेत. १) शेतकर्‍याने ग्राहकाच्या घरापर्यंत जाणे किंवा २) ग्राहकाने शेतकर्‍याच्या घरापर्यंत जाणे तुम्ही ग्राहक नक्कीच आहात, तेव्हा विचार करा की तुम्हाला तरी २-४ किलो कांदा घ्यायला शेतकर्‍यांच्या घरापर्यंत जाणे शक्य आहे काय? तसा प्रयत्न केलाच तर मुंबई पुण्यावरून नाशिकला जाऊन कांदा खरेदी केला तर तो तुम्हाला काय भाव पडेल. हेच सुत्र शेतकर्‍यालाही लागू पडते. त्यामुळे ही कल्पना व्यवहार्य नाही. सोसायटी बद्दल म्हणाल तर दलाल परवडले पण सोसायट्या/सहकार नकोरे बाबा अशी स्थिती आहे. खाजगी दलालांना जेवढी माया जमवता आली नाही त्याच्या हजारपट माया सहकारमहर्षींनी जमविली आहे. ......... सरकार या शब्दाची आज व्याख्याच बदलली. प्रशासन,पुढारी,दलाल आणि व्यापार हे आज सरकार झालेत तर शेतकरी आणि असंघटीत कामगार हे प्रजा म्हणून शिल्लक उरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

राज्याची ५० भरली त्याचीच ही फळ !!! बोला जय महाराष्ट्र :(

मदनबाण
गुरुवार, 02/17/2011 - 06:56 नवीन
हिंदुस्थानात शेतकरी फक्त आत्महत्या करुन घेण्यासाठीच जन्माला येतो काय ? असा मला प्रश्न पडला आहे. त्यातही महाराष्ट्र या बाबतीत आघाडीवर आहे.काय गंमत आहे ना ? प्रगतीची आघाडी घ्यायची सोडुन अधोगती आणि अधोगतीच दिसते... :( देशातील सर्व शेतकरी मंडळी नष्ट होवुन, सर्व गोष्टी आयात करायला लावाव्या हे धोरण मंत्री-संत्री लोकांचे असेल काय ? नाही असे विचारतोय कारण आत्महत्यांचे सत्र काही थांबतच नाहीये... कोणाला त्याची फिकीर सुद्धा दिसत नाही, शेतकरी मित्र मात्र रोज आयुष्याला कंटाळुन स्वतःची प्राण ज्योत मालवुन घेण्यास बैचेन होत चालला आहे. :( जाता जाता :--- कांदा मुळा भाजी अवघी महागाई साची, इथे दारु होईल स्वस्त आणि दुध होते महाग... अवघा झाला बट्याबोळ !!! :( नवे घोष वाक्य :--- गर्व से कहो हमारे यहा किसान आत्महत्या करते है...:(
  • Log in or register to post comments

तथाकथित फक्त व्यापारावर

अवलिया
गुरुवार, 02/17/2011 - 08:57 नवीन
तथाकथित फक्त व्यापारावर जगणार्‍या अर्थव्यवस्थेशी संबंधित तज्ज्ञ लोकांचे विचार वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

सगळं समजतय हो लोकांना. काय

रेवती
गुरुवार, 02/17/2011 - 21:23 नवीन
सगळं समजतय हो लोकांना. काय करायचं त्याबद्दल तुमची मतं सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अरण्यरूदन ..

सातबारा
गुरुवार, 02/17/2011 - 11:55 नवीन
- मुटे साहेब, चुकीच्या लोकांसमोर मांडलेले विचार म्हणजे अरण्यरुदनच होणार. - @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का? रात्री १२ वाजता लाइट आल्यानंतर कांद्याची बारी दिली म्हणजे अर्थशास्त्र कळेल. एसीत बसून शेतकर्‍याच्या जखमांवर मीठ चोळणे सोपे आहे. - जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु. बिल करता , तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे? परवडत नसेल तर कांदा घेवू नका ना! तसेही कित्येक लोक कांदा खात नाहीत. कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीच मुळी. त्यामुळे चैनीची वस्तू महाग झाली तर बरेच झाले, शेतकर्‍याला दोन पैसे जास्त मिळतील. - मधले दलाल व तसेच शेतकरी का डायरेक्ट विकू शकत नाही इ. गोष्टी बोलणे ही हल्लीची लोकप्रिय फॅशन आहे. टाटा बजाज सुद्धा एवढे ताकदवान असून त्यांना डिलर नेटवर्क लागते. उत्पादक व वितरक वेगवेगळे असतात. मात्र टाटा बजाज च्या गाड्या २ रु. ला घेवून २५ रु ला ते विकू शकत नाहीत (गुणोत्तर) , मात्र शेतकर्‍याच्या माला बाबत असे केलेले चालते ही शोकांतीका आहे. - मला तर वाटते कांदा ५०० रु. किलो व्हावा.
  • Log in or register to post comments

आपल्या विचाराशी सहमत आहे पण

सुकामेवा
गुरुवार, 02/17/2011 - 12:41 नवीन
सामान्य लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे कि, आय टि वाले घेतील हो जास्त पैसे देऊन कांदा, पण ज्यांचे पोट हातावर आहे ज्यांचा महिन्याचा पगार ३००० ते ४००० आहे त्यातले घराचे भाडे जाऊन ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही, आय टि मध्ये जे काम करतात ते आगोदरच सगळे कर ज्यात आयकर, सेवा कर इ. कर देतातच कि, आणि जसे शेतकऱ्यांचे जसे पावसावर आवलंबून नुकसान आणि फायदा आहे तसाच आय टि वाल्यांचे मंदीच्या काळात झाले होते. राहिला प्रश्न गाड्या फिरवायचा ज्या लोकांकडे चांगली शेती आहे व उत्पन चांगले आहे ते लोक काय गाड्या फिरवत नाहीत काय ते लोक काय बाकीचे ऐश आराम भोगत नाहीत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

जळजळ पोहोचली.

गणपा
गुरुवार, 02/17/2011 - 13:37 नवीन
जळजळ पोहोचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकामेवा

कांदा जीवनावश्यक वस्तू या

गंगाधर मुटे
गुरुवार, 02/17/2011 - 13:59 नवीन
कांदा जीवनावश्यक वस्तू या मुद्यावर एका महापंडीताने "कांदा खाल्ल्याशिवाय पुरुषाच्या शरीरात पुरूषार्थ जागविणारे हार्मोन्स तयार होत नाही" असा युक्तिवाद केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

ते सांगणार...

पंगा
Fri, 02/18/2011 - 10:42 नवीन
...आणि तुम्ही ऐकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

- @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का?

नेत्रेश
Fri, 02/18/2011 - 01:19 नवीन
हो. माझी १० एकर शेती तसेच किराणा दुकान आहे (आजोबांच्या काळापासुन). तसेच केंद्र् सरकारच्या सेवेत प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) म्हणुन काम केले आहे. व सध्या आय टी मध्ये काम करत आहे. त्यामुळे दोन्ही बाजु माहीत आहेत. तुमचा नक्की काय व्यवसाय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

हो. माझी १० एकर शेती तसेच

गंगाधर मुटे
Fri, 02/18/2011 - 09:13 नवीन
हो. माझी १० एकर शेती तसेच किराणा दुकान आहे (आजोबांच्या काळापासुन). तसेच केंद्र् सरकारच्या सेवेत प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) म्हणुन काम केले आहे. व सध्या आय टी मध्ये काम करत आहे. त्यामुळे दोन्ही बाजु माहीत आहेत. म्हणजे प्रथम तुमच्याकडे शेती असणार, त्यात कमाई नसेल म्हणून किराणा उद्योग सुरू केला असणार. मग त्याहीपेक्षा सोईची नोकरी वाटली असेल म्हणून राजपत्रीत अधिकारी असा प्रवास झाला असणार. शेती होती तेव्हा मालक होता. मालकी व्यवसाय सोडून आपला कल चाकरीकडे झुकला, खरे तर यातच सर्व आले. एखाद्या टाटा-बिर्ला समान उत्पादकाने उत्पादनाचा उद्योग सोडून "किराणा" दुकान किंवा प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) असा प्रवास केला आहे काय? ज्याला आपण (class 1 gazetted officer) म्हणून अभिमानाने उल्लेखतो/ समजतो, अशा अधिकार्‍यापेक्षा जास्त पगाराचे/ रुतब्याचे अधिकारी टाटा - बिर्ला नावाच्या कारखान्यात काम करतात. टाटा - बिर्ला उत्पादक आहेत आणि या देशातला शेतकरीही उत्पादक आहे. शेतीला प्रतिष्टा मिळवून, शेतीवरच class 1 gazetted officer समान जीवनमान जगण्याचे स्वप्न तुम्हाला आयुष्यातही पडलेले दिसत नाही. दोन्ही बाजु माहीत आहेत, असे म्हणणे सोपे आहे. लाथ मारा त्या class 1 gazetted officer च्या नोकरीला. शेतीत या, कांदा पिकवा. आणि विकून दाखवा ४० रू. प्रती क्विंटल या दराने. निखळ शेतीच्या बळावर तुम्हाला जगताच आले नाही हे तुमचाच जीवन इतिहास सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

भले ..

सातबारा
Fri, 02/18/2011 - 12:08 नवीन
हे सर्व मी म्हणणार होतोच तेव्हढ्यात मुटेजी तुमचा प्रतिसाद आला. मी ही हेच म्हणेन. अर्थात नेत्रेश यांना जरी मी उध्द्टपणे प्रश्न विचारला तरी त्यांचा व्यक्तीगत अधीक्षेप हा हेतू नाही तर आपण ते मुद्दे मांडताना खरेच शेतीशी संबधीत आहात येवढेच जाणायचे होते. कारण शेती स्वत: न करणार्‍या लोकांना हे प्रॉब्लेम्स समजतच नाहीत असा अनुभव आहे. माझा प्रवास आपल्या पेक्षा उलटा आहे. पुण्यात आयटी शी संबंधीत व्यवसाय करीत होतो. डॉटकॉम बस्ट नंतर (माझ्यावर परीणाम झाला नव्हता त्याचा तरी) (आणि बायकोची चांगली नोकरी पण) सर्व सोडून आम्ही दोन छोट्या मुलांसह शेतावर स्थायीक होण्याचा निर्णय घेतला व गेली १४ वर्षे , या क्षणापर्यंत रानातच आहोत. दोन्ही बाजूंचा अनुभव व त्यातील टोकाचा विरोधाभास प्रत्यक्ष अनुभवीत असल्याने शेतकरी या विषयावर माझ्या साहजिकच थोड्या तीव्र प्रतिक्रीया आहेत. जरतर शब्द वापरले तर, जर त्यावेळी इकडे आलो नसतो तर कदाचित आज आम्हीही उसात असतो. ही तक्रार नसून फक्त पोटेन्शियल सांगणे आहे. इथे येवून अर्थिक प्रॉब्लेम्सशी जरी झुंजलो तरी समृध्द नक्कीच झालो. आणि जो निर्णय उघड्या डोळ्यांनी घेतला त्याबद्द्ल कधीच पश्चात्ताप झाला नाही. पुन्हा ही हाच निर्णय घेईन. हल्ली तर एक रात्र पुण्यात मुक्काम करवत नाही येव्हढे इथे झोपडीत सुख आहे. जसे गविंनी सांगीतले तसे, मला स्वतःला आयटी ची बॅकग्राउंड आहे म्हणून या अन्याय कारक सिस्टीम मध्ये स्वतः पुरते मिळवत आहे (जोडधंदा). जे शेतकरी असे काही करु शकत नाहीत त्यांना कर्जात बुडून नंतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. हे सर्व जवळून पहात अनुभवीत असल्याने हे प्रतिसाद, अन्यथा आपला आवाज ऐकला जात नाही ही शेतकर्‍याची हताशा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

शेती मी विकत घेतलेली आहे

नेत्रेश
Fri, 02/18/2011 - 22:52 नवीन
किराणा दुकान आजोबांच्या काळापासुन आहे. थोडी शेती तेव्हा होती बाकी शेती मी आय टी मध्ये सेटल झाल्यावर घेतली आहे. बाकी नातेवाईकही शेतीत आहेत. माझा पोल्ट्रीचा व्यवसायही करुन झाला आहे. अर्थात शेतीवर / पोल्ट्रीवर माझे जीवन अवलंबुन नाही. हे फक्त येवढ्यासाठीच सांगीतले की तुम्ही "@ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का?" असे विचारले आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की कांदा ५०० रुपये कीलो व्हावा या सारख्या गोष्टी बोलायला बर्‍या वाटल्या तरी व्यवहार्य नाहीत. उलट मागणी कमी होउन शेतकर्‍याच्या हाती काहीही येणार नाही. शेतकर्‍याला चांगला पैसा मिळायला हवा यात वादच नाही. पण तो ग्राहकांना लुटुन नव्हे, तर होणारे मालाचे नुकसान वाचउन. कांदा हा ईतर शेतमालाच्या तुलनेत लवकर खराब होणारा माल आहे. शेतकर्‍यांकडे तो साठवायला काहीच सोय नसते. त्यामुळे मिळेल त्या भावात तो विकावाच लागतो. जर कांद्याला चांगले स्टोअरेज ऑप्शन असेल, त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी लागणार्‍या सोई (रॅडीएशन, ईत्यादी ज्यामुळे कांदा ६ महीन्यांपर्यंत सहज टीकतो) शेतकर्‍याला उपलब्ध करुन दिल्या तर कांदा सडणे वगैरे कमी होईल. नुसते व्यापारी, दलाल, अडते व ग्राहकांना शिव्या देऊन शेतकर्‍याचे काय भले होणार ? ही सा़खळी नसेल तर सध्या पर्याई वितरण व्यवस्था काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

कांद्याला स्टोअरेज ऑप्शन

गंगाधर मुटे
Fri, 02/18/2011 - 23:14 नवीन
कांद्याला स्टोअरेज ऑप्शन वापरायचे,त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी रॅडीएशन सारखा पर्याय वापरून कांदा ६ महीन्यांपर्यंत जतन करायचा. म्हणजे स्टोअरेज करण्याचा खर्च, रॅडीएशन वरील खर्च, सहा महिने साठवणूक करण्यासाठी गोदामाचा खर्च, सहा महिने माल न विकल्यामुळे व्याजाने पैसा काढावा लागेल त्याचे व्याज, आद्रता घटल्यामुळे वजनात येणारी घट, सहा महिन्याच्या साठवणूकीमुळे मध्येमध्ये त्याची करावी लागणारी देखभाल एवढे सर्व खर्च केल्यानंतर कांदा ४० रू प्रति क्विंटल या दराने विकायचा म्हणता. शेतकर्‍याला पार नागवेच करायचा विचार दिसतो तुमचा. ग्राहकांना शिव्या देऊन शेतकर्‍याचे काय भले होणार ? माझ्या वरील पोष्टमध्ये मी शेतकर्‍याच्या दुर्दशेला ग्राहकाला जबाबदार धरलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

४० रुपये क्विंटल

नेत्रेश
Sat, 02/19/2011 - 00:53 नवीन
४० रुपये क्विंटल हा खर्च विकायचा नसुन पिकवायचा आहे. शेतकर्‍याने ४० रुपये क्वींटल ने कांदा विकावा असे मी म्हटलेले नाही. ४० रुपये कीलो हा कांदा पिकवायचा खर्च अवास्तव आहे, ४० रुपये क्विंटल असावा असे म्हटलेले आहे. कृपया प्रतिसाद देण्याआधी नीट वाचा. शेतकर्‍याला त्याला पाहीजे त्या दरात तेव्हाच कांदा विकता येईल जेव्हा त्याचाकडे तो त्याला पाहीजे तेव्हा विकण्याचा पर्याय असेल. कांद्याचे आयुष्य ६ महीन्यानी वाढवले म्हणजे तो विकायला ६ महीने थांबावे असे म्हटलेले नाही. जेव्हा दर योग्य मीळेल तेव्हा तो विकता येईल. कांदा सडेल या भितीने पडलेल्या दरात विकावा लागणार नाही. स्टोअरेज साठी फक्त टेंपरेचर कंट्रोल्ड गोदामाची गरज असते. रॅडेएशन आणी स्टोअरेज यांचा सर्च फक्त एकदाच भारणीचा वेळी येतो. त्यांची ऑपतेटिंग कॉस्ट नगण्य असते. उभारणीचा खर्च सरकारने उचलला तर शेतकर्‍याना चांगला पर्याय मिळेल. पण राजकारणी लोक त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी हे होउ देणार नाहीत. > शेतकर्‍याला पार नागवेच करायचा विचार दिसतो तुमचा ज्या देशाचा शेतकरी बुडाला तो देश बुडाला (आखाती देश सोडुन. तीथे तेलाची शेती होते). माझे म्हणणे एवढेच आहे की ग्राहकांना न लुबाडता शेतकर्‍याचे भले करता येऊ शकते. आणी कांदा 'पिकवायला' ४० रुपये कीलो खर्च येत नाही. तेवढा खर्च द्राक्षे पिकवायला सुद्धा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कच्चा दुवा

पंगा
Fri, 02/18/2011 - 10:37 नवीन
जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे? परवडत नसेल तर कांदा घेवू नका ना! तसेही कित्येक लोक कांदा खात नाहीत. कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीच मुळी. त्यामुळे चैनीची वस्तू महाग झाली तर बरेच झाले, शेतकर्‍याला दोन पैसे जास्त मिळतील.
खरे आहे. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा नाही खाल्ला तर कोणाचे काही बिघडत नाही. त्यामुळे परवडत नसल्यास विकत न घेणे हे सयुक्तिकच आहे. पण समजा लोकांनी कांदा विकतच घेतला नाही, तर मग शेतकर्‍याला पैसा मिळणार कोठून, हे समजत नाही. अगोदरच पैसा मिळतो तो खूपच कमी असताना असे सल्ले देऊन अशी वेळ ओढवून आणणे हे आत्मघातकी नव्हे काय?
मला तर वाटते कांदा ५०० रु. किलो व्हावा.
पुन्हा तेच! कांदा ५०० रुपये किलो झाला, तर आजच्या तुलनेने खूपच कमी लोक तो विकत घेण्याची शक्यता आहे.* त्यामुळे ५०० रुपये किलोने कांदा विकून शेतकर्‍याचा काहीच फायदा नाही. उलट शहरी ग्राहकाची जी काही उरलीसुरली सहानुभूती असेल (जिचा तसाही काही उपयोग नसतो म्हणा!), तीही नष्ट होईल. (तरी 'कांदा ही जीवनावश्यक वस्तू आहे' या भ्रामक समजुतीखाली काही जण तरीही विकत घेतीलही. सांगवत नाही. पण फार जण नाही घेणार.) त्या मानाने जरा परवडण्यासारख्या किमतीला जास्त गिर्‍हाइकांना विकणे कदाचित फायद्याचे ठरू शकेल. पहा विचार करून. (* माझ्यावर जर ५०० रुपये किलोने कांदा विकत घेण्याची वेळ आली, तर माझ्या डोक्यात "एवढे पैसे देणे एक तर मला परवडत नाही, आणि परवडले तरी पाचशेबिचशे देऊन मी काही घेणार नाही. मग शेतकरी मरेना का! अशाने मी कंगाल होईन. मी कंगाल होण्यापेक्षा शेतकरी मेलेला परवडला," असाच विचार येणार, हे साहजिक आहे. शेवटी मलाही माझ्या मर्यादित उत्पन्नात माझी आणि माझ्या बायकापोरांची पोटे भरायची असतात. दुसर्‍याबद्दल सहानुभूती वगैरे सगळे भरल्या पोटी ठीक असते. मला जर माझीच चिंता असेल, तर मी दुसर्‍याचा विचार कशाला करेन? पण जरा मला परवडण्यासारख्या किमतीला कांदा मिळाला, तर माझ्यासारखे शंभर लोक कांदा विकत घेतील.) बाकी,
जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , ...
असे किती टक्के जण करतात / करू शकतात असे वाटते?
... तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे?
जे पंधरा लाखाच्या गाड्या घेऊ शकतात, त्यांची ही रड नसावी बहुधा. पण असे तुलनेने फार थोडे असावेत. बहुतांश लोक साठ रुपयांना कांदा परवडण्यास कठीण जाणारेच असावेत, असे वाटते. शहरात राहणारे असले, तरीही. (चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

ओ भौ

पैसा
Fri, 02/18/2011 - 23:23 नवीन
६० रुपयातले शेतकर्‍याच्या हातात फक्त ६रुपये जातात. बाकीचे दलालांच्या घशात ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

भिकारी चोर

गंगाधर मुटे
गुरुवार, 02/17/2011 - 13:22 नवीन
ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही, भिकार्‍याच्या घरी भिकारचोर गेला कमरेचा दुपट्टा तोही सोडून नेला. एका गरीबाला कांदा खाऊ घालण्यासाठी दुसर्‍या गरीबाचा संसार उध्वस्त करणे अपरीहार्य आहे, असे तुम्हाला म्हणायचे काय?
  • Log in or register to post comments

या बाबतीतला अनुभव नाही

गवि
गुरुवार, 02/17/2011 - 14:30 नवीन
या बाबतीतला अनुभव नाही पण मुटेजींचे म्हणणे १०० टक्के पटते. शेती करणे म्हणजे काय हे आजोबांसोबत लहानपणापासून बघितले. आजोबांचे वय झाले तेव्हापासून कोणाकडूनतरी करुन घेतलेली आणि बदल्यात धान्य येऊन पडणारी असं तिचं स्वरुप झालं. माझ्या वडिलांनी चार वर्षं शेती केली आणि नंतर नोकरी धरली. त्याचं कारण मला कळायचं नाही. एवढी मोठी शेती (म्हणजे शेतजमीन) पडलेली असताना नोकरी कशाला? कारण माझ्यामते शेती म्हणजे मस्त बैलगाडीत बसून शेतावरच्या घरात जायचे, विहीरीचे पाणी काढायचे, बैलांशी मस्ती करायची, सर्व मजुरांनी "छोटे मालक आले"म्हणून कौतुक करायचं अशी कन्सेप्ट होती. नंतर वडीलही गेले आणि अवचित जमीन हाती लागली तेव्हा मनापासून शेती अ‍ॅज बिझनेस म्हणून वर्कआउट केलं. ते सर्व इथे देऊ शकत नाही पण इतकंच सांगतो. मुटेजींनी सांगितलंय त्याहून अधिक भयंकर आणि आतबट्याचा धंदा झालेला आहे तो. नोकरी करुन विना रिस्क मी जे कमावतो त्याच्या एक दशांशही शेतीत (जबरी रिस्क घेऊनही) कमावू शकत नाही, त्याची खात्री नाही. शेतीला काही फार खर्च लागत नाही अशी माझी अत्यंत गोड गैरसमजूत होती. पण प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तपास केल्यावर कळलं की शेती, पोल्ट्री, प्रक्रिया असे सर्व शेतीआधारित धंदे अत्यंत व्यवस्थित मोठे भांडवल घालून करावे लागतात. आणि आउटपुट सर्वच लेव्हलवर अनिश्चित आहे. तोटा डिफॉल्ट आहे आणि मोठा फायदा हा अपघात आहे. मी त्यामुळे सर्व जमीन (अर्थात मातीच्या भावाने) विकून टाकण्याचे ठरवले आहे. माझ्यासमोर इतर पर्याय असताना शेतीचा विचार करणे म्हणजे स्वहस्ते जीव देणे असं माझं मत झालं आहे. मी पर्याय उपलब्ध असलेला नशीबवान आहे.. पण अशा स्थितीत परंपरागत शेतकरी खरेच किती दिवस शेती करत राहतील आणि त्यांनी का करावी हा मोठा भयानक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. आत्ताच्या पिढीला पर्याय नसेल तरी पुढची पिढी अशीच आधीच त्यातून बाहेर पडेल.. त्यांनी पिकवायचे बंद केले तर आपली सर्वांचीच जी अन्नान्न दशा होईल ती वर्णनापलीकडली असेल. आणि हे होणे अशक्य नाही. एक कोटी रुपये प्रतिमहिना घेणारा नोकरदार अन्नासाठी रांगा लावेल. शेतकर्‍याला प्रीमियम / सर्वोच्च स्थान आणि वागणूक दिली पाहिजे, तरच टिकाव धरता येईल..
  • Log in or register to post comments

शेतकर्‍याला सर्वोच्च स्थान

रेवती
गुरुवार, 02/17/2011 - 21:30 नवीन
शेतकर्‍याला सर्वोच्च स्थान द्यायला कोण नाही म्हणतोय? सरकारने जे काही करायला हवे (मला अजिबात त्यातले काही कळत नाही) त्यासाठी सामान्य माणूस कसा जबाबदार असू शकतो? उलट दलाल किंवा सहकारी संस्था ग्राहकांना लुटताहेत. ग्राहकांना योग्य दरात भाजीपाला मिळावा तसेच शेतकर्‍यांनाही योग्य भाव मिळावा असे वाटते आहे तर त्याबद्दल माहिती असणार्‍यांनी मिपावर एखाली लेखनमाला सुरु करावी. आम्हालाही माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ही पापाची भागीदारी होउ नये

गणेशा
गुरुवार, 02/17/2011 - 14:34 नवीन
ही पापाची भागीदारी होउ नये असे मनापासुन वाटते.. कांद्याचे २ रुपये ही बातमी ऐकुन शेतकर्‍याबद्दल कळकळ वाटली होती. गावाकडची शेतावरची मआणसे जवळुन पाहिली आहेत .. त्यामुळे त्यांचे हाल पाहिले असल्याने ते जास्तच टोचले होते. --- मला तर वाटते प्रत्येक गावात जसे सरपंच असतात.. ग्रामसेवक असतात ( हे सरकारी आहेत पण) तसेच प्रत्येक गावात हक्काचे व्यापारी तयार करावेत ( स्वता ते गावा बद्दल सहानभुती असणारे आणि शेतकर्‍यांमधीलच असावेत.. स्त्रीया असतील तरी छान).. या व्यापार्‍यांचे काम असे असावे की स्वताच्या गावातील शेतकर्याला योग्य भाव मिळावा ..आणि त्या भावाचेच जेव्हडा खर्च नंतर जास्त होयील तेव्हडाच फक्त ग्राहकाला अ‍ॅड करुन तो माल विकावा.. त्या व्यापार्‍यांचा खर्च हे शेतकरी आपल्या मालाला आलेल्या जास्त किंमतीमधुन ठरवुन ठेवतील कीती द्यायचे ते. अशी साखळी प्रत्येक गावात उभी करायची.. सरकारी व्यापारी प्रथा बंद करावी .. त्याने फक्त महागाई वाढते .. ग्राहक आणि शेतकरी दोघे ही भरडले जात आहेत ... मी जर कोणॅए अधीकारी असतो तर ही पद्धत नक्कीच आणली असती.. निदान अश्या पद्धती किंवा ह्या पेक्षा ही सोपस्कर मार्ग नक्कीच अवलंबले पाहिजेत असे वाटते .. ( आपण काहीच जास्त करु शकत नसलो तरी मार्ग तर सुचवु शकतो .. मार्ग सुचवा .. न जाणो तो उद्याच्या महामार्ग ही होउ शकतो )
  • Log in or register to post comments

जळजळ अजिबात नाही ..

सातबारा
गुरुवार, 02/17/2011 - 14:42 नवीन
- शेतकर्‍याला कधी नव्हे तो भाव मिळाला तर सर्वांना पोटदुखी होते ती चालते का ? - @ गणपा - आयटीचा मुद्दा माझा नाही. मला जळजळ नाही. फक्त आयटी वाल्यांसारखीच उन्नती भारतीय शेतकर्‍याची व्हावी ही शुभेच्छा तुमचीही असेलच. पण तो पर्यंत जर मधून मधून जरी थोडा चांगला बाजारभाव मिळाला तर पोटदुखी तरी होवू नये. ( बाय द वे, तुमच्या पाक्रु चे आम्ही ही फॅन आहोत. कांद्याच्या भावामुळे त्यात बाधा येणे समजू शकतो.) - @ पंकजप - शेतकरी सामान्य माणसात मोडत नाही ( कि आधीच मोडलेला आहे म्हणून सामान्य नाही ?), तसेच तो कर भरीतच नाही असे आपल्याला वाटते का ? ( आयकर हा आय वर असतो - आय नाही म्हणून आयकर नाही ). इतर अप्रत्यक्ष कर शेतकरी पण देतोच. >>ज्यांचा महिन्याचा पगार ३००० ते ४००० आहे त्यातले घराचे भाडे जाऊन ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही - याच न्यायाने मग महागड्या गाडयांच्या किंमती कमी व्हाव्यात (असेच इतर वस्तू व सेवांबाबत ) असे म्हणू शकता का ? >>राहिला प्रश्न गाड्या फिरवायचा ज्या लोकांकडे चांगली शेती आहे व उत्पन चांगले आहे ते लोक काय गाड्या फिरवत नाहीत काय ते लोक काय बाकीचे ऐश आराम भोगत नाहीत काय? - म्हणजे सुदैवाने जे थोडे शेतकरी गाड्या फिरवीतात त्यांनीही ऐश करु नये काय ? ( आणि खेड्यात गाड्या फिरविणारे कोण आहेत हे तर उघड गुपित आहे. ) >>कांदा जीवनावश्यक वस्तू या मुद्यावर एका महापंडीताने "कांदा खाल्ल्याशिवाय पुरुषाच्या शरीरात पुरूषार्थ जागविणारे हार्मोन्स तयार होत नाही" असा युक्तिवाद केला होता. - कांदा लसूण न खाणार्‍या जैन बांधवांचे मत ऐकण्यास उत्सुक. म्हणूनच पुन्हा विचारतो - स्वतः शेती केली आहे का? रात्री १२ वाजता लाइट आल्यानंतर कांद्याची बारी दिली म्हणजे अर्थशास्त्र कळेल. एसीत बसून शेतकर्‍याच्या जखमांवर मीठ चोळणे सोपे आहे. ( हाच प्रश्न आयटी वाले मला विचारु शकतात, की आयटी त काम केले आहे का ? - तर त्यांच्या व माझ्या प्रश्नांचे माझ्यापुरते उत्तर - हो.) आणि पुन्हा म्हणतो की कांदा ५०० रु. किलो व्हावा.
  • Log in or register to post comments

सर्व मुद्दे पटत आहेत .. परंतु

गणेशा
गुरुवार, 02/17/2011 - 14:51 नवीन
सर्व मुद्दे पटत आहेत .. परंतु कांदा ५०० रु किलो व्हावा.. हे चुकीचे आहे. शेतकर्याला नफा व्हावा .. आणि ग्राहकाला ही अति रक्कम मोजावी लागु नये हे दोन्ही मुद्दे एकत्र गुंफले जावेत असे वाटते .. (वरती रिप्लाय दिला आहेच ) जणतेचे राज्य यावे .. तेथे दलाल - ढोंगी- स्वार्थी राजकारण्यांना थारा नसावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

वरील प्रतिसाद तुम्हाला

गणपा
गुरुवार, 02/17/2011 - 21:20 नवीन
वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हताच मुळी. तो पंकजप यांना होता. चांगली चर्चा चालु असताना विनाकारण धागा भरकटायला नको. पण तुमचा गैरसमज झाला म्हणुन हा प्रतिसाद. माझे आजी-आजोबाही शेतीच करायचे. बाबांनी ही नोकरी सांभाळुन त्यांना हातभार लावला. पण आता आजीआजोबा गेले. शिवाय शेतमजुरी, खतांच्या-बियाण्यांच्या वाढत्या किंमती आणि वीज, पाणी टंचाई या घटकांमुळे हा व्यवसाय आतबट्याचा होऊ लागला आहे. यातुन थोड फार पीक हाताशी येत असतानाच नैसर्गिक प्रकोप झाला की हाती पडणार उत्पंन्न हे मुळ खर्चाहुन कमीच. यासर्वांमुळे शेतकर्‍यांच्या भावना आणि व्यथा यांची पुरेपुर जाण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

कांदा ५०० रु. किलो व्हावा हे मुर्खपणाचे विधान आहे

नेत्रेश
Fri, 02/18/2011 - 01:34 नवीन
५०० रुपये कीलो झाल्यावर लोक कांदे खाणे सोडतील. कांदा सडु लागल्यावर त्याचे ५ रुपयेही शेतकर्‍याला मिळणार नाहीत. कांद्याचा भाव, दलाल, अडते, व्यापारी हे शेतकर्‍याच्या प्रश्णांना जबाबदार नाहीत. त्यांच्या शीवाय लहान शेतकर्‍याला सध्या पर्याय सुद्धा नाही. सहाकारी संघ हा पर्याय होउ शकतो. पण ५०० रुपये कीलो कांदा म्हणजे शेतकर्‍याचेच मरण आहे. (उद्या सगळे डॉक्टर म्हणतील आम्ही २० लाखाचे कर्ज काढुन डॉक्टर झालो, प्रत्येक पेशंट मागे कमीत कमी १००० रुपये घेणार. ईतर जीवनावश्यक सेवा पुरवणारे सुद्धा अशीच अडवणुक करु शकतील.)
  • Log in or register to post comments

सहकारी संघ आणि सहकारी संस्था

शिल्पा ब
Fri, 02/18/2011 - 02:21 नवीन
सहकारी संघ आणि सहकारी संस्था यात काय फरक असतो? आणि शेतकरीच छोटी दुकाने काढून का नाही विकू शकत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

कांदा गावातील शेतात पिकतो

नेत्रेश
Fri, 02/18/2011 - 04:08 नवीन
कांदा गावातील शेतात पिकतो, ग्राहक शहरात असतात. शेतकरी दुकान कुठे काढणार? गावात १०० शेतकरी कांदा लावत असतील तर गावात दुकान काढुन उपयोग काय? शहरात दुकानासाठी लागणाती जागा, पैसा, मनुश्यबळ लहान शेतकरी आणणार कुठुन? शेती हा फुलटाईम जॉब आहे, तसेच दुकानदारी हा सुद्धा फुलटाईम जॉब आहे. 'शेतकरीच छोटी दुकाने काढून का नाही विकू शकत' असा प्रश्न करणे म्हणजे प्रत्येक डेव्हलपर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा कोड स्वतःच क्लायंटसना का विकत नाही असे विचारण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र

शिल्पा ब
Fri, 02/18/2011 - 07:54 नवीन
एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा माल जवळच्या आणि शक्य असेल तर थोड्या दूरच्या गावात विकायला प्रयत्न करायला काय हरकत आहे....घरात त्यांची बायका , मुले असतातच ना...कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा काहीजण ते दुकान चालवू शकतात...सगळ्याच गोष्टी अशा उडवून दिल्या तर आहे ते सोसा...दुध उत्पादकांनी नाही का सोसायट्या काढल्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

समजा असे केलेही,तरी फक्त

गवि
Fri, 02/18/2011 - 08:57 नवीन
समजा असे केलेही,तरी फक्त ज्वारी किंवा फक्त कांदे मिळणारे दुकान शहरात काढणे परवडेल का अशी शंका येते.मुटेजींनी असे हिशोब ढोबळपणे मांडून दाखवले तर खूप उलगडा अन उपयोग होईल.मला वाटते सूचना चांगली आहे,पण तिचा विचार नक्कीच कोणीतरी केला असेल आणि त्यात काही issue , problem असेल.मुटेजी सांगा please.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे

शिल्पा ब
Fri, 02/18/2011 - 10:29 नवीन
अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे नाही तर जे जे काही पिकवतात ते ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एकेक दोन दोन

गवि
Fri, 02/18/2011 - 11:27 नवीन
एकेक दोन दोन शेतकर्‍यांनी स्वतःची दुकाने काढायची ("बायको, मुले दुकानात" मॉडेलवर) तर तिथे त्या त्या वर्षी / मोसमात पिकवलेली लिमिटेड उत्पादनेच असणार हो. दुकान "काढणे" तेव्हा परवडते जेव्हा तिथे धान्य, कडधान्य, तेल, नारळ, झाडू, टिकलीपाकिटे, साखर वगैरे अशा अनेकविध गृहोपयोगी वस्तू मिळतात. आणि ग्राहक म्हणूनही पाहिलं तर, फक्त ज्वारी घ्यायला एका दुकानात, मग केळ्यांसाठी दूर कुठे दुसरे दुकान आणि वांग्यासाठी तिसरे, असे तिरगांव करत आपण तर फिरणार नाही बुवा, कितीही स्वस्त पडला प्रत्येक जिन्नस तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आता काय करावं!!! एकेक दोनदोन

शिल्पा ब
Fri, 02/18/2011 - 11:58 नवीन
आता काय करावं!!! एकेक दोनदोन कशाला गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून...कधी गावाकडचा आठवडी बाजार पहिला आहे का? सगळ्या प्रकारच्या भाज्या, बरीच फळे, धान्ये वगैरे असते...त्याच धर्तीवर त्यांनी एकत्र येऊन एखादं दुकान शहरात चालवावं असा माझा विचार लिहिला मी....आता यापेक्षा खुलवून सांगता येणं मलातरी अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तीच तर

गवि
Fri, 02/18/2011 - 12:47 नवीन
तीच कल्पना चांगली आहे म्हणालो आणि मुटेजींना विनंती केली की यात काय अडचणी येतात ते सांगितले तर बरे होईल. उत्सुकता आहे. सहकारी सोसायटी पेक्षा दलाल परवडले असे ते म्हणताहेतच. म्हणजे चार जणांनी एकत्र येऊन काही करणं वाटतं तेवढं सरळ सोपं नाहीये. (आठवा गणेशोत्सव मंडळ.. ---- दोन मराठी माणसे एकत्र आली की सुरु करतात एक गणेश मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणेशमंडळे - इति बहुधा पु.लं.) :) म्हणजेच सोसायटी / सामाजिक एकत्रीकरणापेक्षा इन्डिव्हिजुअल फॅमिली बिझनेस अश्याच स्वरुपात ते विश्वासार्ह ठरेल असं वाटतंय. मग त्यात हिशोब कसा तोट्यात जात असावा ते विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

यथावकाश

गंगाधर मुटे
Fri, 02/18/2011 - 22:14 नवीन
गगनविहारीजी, यथावकाश लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सहकारी संस्था

पैसा
Fri, 02/18/2011 - 23:39 नवीन
आमच्या इथे 'बागायतदार सहकारी संस्था' आहे. ती शेतकर्‍यांकडून शेतमाल योग्य भावात घेऊन ग्राहकाना वाजवी दरात, अल्प फायदा घेऊन विकते. संस्था तरीही फायद्यात आहे. त्यांच्या दुकानांमधून इतरही सगळ्या प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतात. मधे कोणीही दलाल नाहीत. सगळीकडे कांदा भडकला होता, तेव्हाही बागायतदार बाजार कांदे २० रुपयानी विकत होते. संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवलेली आहे. त्यात कोणत्याही मंत्र्याला प्रवेश दिला गेला नाही. खूपदा ही संस्था ताब्यात घ्यायचे प्रयत्न राजकारण्यानी केले, पण अयशस्वी झाले. गोव्यातल्या गावोगावी संस्थेच्या शाखा आहेत. संस्था निदान २५ वर्षांची तरी जुनी आहे. सगळ्यानी मनावर घेतलं तर असंही होऊ शकतं. सहकारी संस्था सगळीकडेच चराऊ कुरणं झालेली नाहीत. गोव्यात तरी हा एक सुखद अपवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

बागायतदार सहकारी संस्था'

गंगाधर मुटे
Sat, 02/19/2011 - 23:46 नवीन
गोव्यात तरी हा एक सुखद अपवाद आहे. तुम्ही केलेल्या वर्णनावरून ही संस्था चालविणारी मंडळी अद्वितिय सेवाभावी व्रुत्तीची माणसे आहेत. अशी माणसे समाजात असतात पण त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण नगण्य किंवा तुरळक असे असते. मग व्यापक प्रमाणावर हा प्रयोग राबवायचा म्हटले तर अशी निस्वार्थी सेवाभावी वृत्तीची माणसे कुठून आणायची? अशा निस्वार्थी सेवाभावी वृत्तीच्या माणसाची आयात करणे कांद्याच्या आयातीएवढे सोपे आहे काय? पाक मधून आयात करायला कांदा मिळाला, अशी माणसे त्या देशात तरी उपल्ब्ध आहेत काय? चर्चा करायला असा एखादा अपवाद सोयीचा असतो. पण कांद्याच्या भावाचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपले म्हनने कळते आहे.. पण

गणेशा
Mon, 02/21/2011 - 17:04 नवीन
आपले म्हनने कळते आहे.. पण पैसा यांच्या प्रतिक्रियेनंतर ही आपल्या नजरेत आशावाद दिसला नाही.. दिसली ती खंत आणि निगेटीव्ह शेडची सावली ... बाकी माझे मत वरती दिलेच आहे,..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

१.मी कधीकधी कांदा खातो.

भडकमकर मास्तर
Fri, 02/18/2011 - 02:50 नवीन
१.मी कधीकधी कांदा खातो. गिल्टी वाटते.. २.आमची तर नाहीच, आमच्या दूरदूरच्या कोणत्याही नातेवाईकांची थोडीही शेती नाही. ३. मी व्यवसायाने दंतवैद्य आहे. विषय संपला...
  • Log in or register to post comments

सामुदायीक शेति वा कोरपोरेट

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/18/2011 - 13:02 नवीन
सामुदायीक शेति वा कोरपोरेट शेति हा पर्याय होवु शकतो का?...... कुटुंबे विभक्त झाल्याने जमिनिचे तुकडे झाले त्या मुळे शेति फायद्याची नाहि असे वाचल्याचे आठवते.... बाजारी भिमुख व्यवस्था स्विकाराली त्या मुळे जर रोज भाव वर खाली होतअसर्तिल तर महागाई भता पण त्या प्रमाणक्म्कमी जादा करता येणे शक्य आहे का? इंडेक्स ३ दर ३महिन्यानी बदलतो तो दर महिना बदलावा....
  • Log in or register to post comments

योग्य विषय...

चिगो
Fri, 02/18/2011 - 13:04 नवीन
मुटेजी, अगदी योग्य विषयाला हात घातलात... पीक भरपुर आलं तर मालाचा भाव पडतो म्हणून कमी रिटर्न्स, आणि पीकबुडी झाली तर भाव वाढल्या वाढल्या सरकारी धोरणाचा दणका, अश्या चिमट्यात पिचतोय शेतकरी... आम्हाला पण कोरडी सहानुभूती, सरकार काहीच का करत नाही गरीब शेतकर्‍यांसाठी वगैरे म्हणतांना सगळ्या गोष्टी स्वस्तातच हव्या असतात... मला वाटत की उगाच अवाजवी किंमती देण्यापेक्षा किंवा एकदम निर्यातबंदी, भरपुर आयात करुन भाव पाडण्यापेक्षा मध्यम मार्ग चोखाळला पाहीजे (सरकार आणि जनतेनेही).. म्हणजे बघा, मला ६० रुपये किलोने कांदा परवडणार नाही समजा पण १५-१६ रुपये असला तर हरकत नाही, मग एकदम २ रुपयांवर आणून काय फायदा? शेवटी बॅलन्स तर साधायलाच लागेल ना राव... शेवटी कुठल्याही एका वर्गाला पुर्ण समाधानी करण्यासाठी टोकाचे निर्णय घेण्याऐवजी ज्यात सगळ्यांना थोडाफार फायदा होईल तेच करावं लागेल..
  • Log in or register to post comments

मी व्यवसायाने दंतवैद्य

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/18/2011 - 13:06 नवीन
मी व्यवसायाने दंतवैद्य आहे कांदा खा व कांदा शेतकर्यांच्या दाताच्या समस्या कमी फि मधे सोडवा.. गिल्टी वाटणे कमी होईल
  • Log in or register to post comments

सबसिडी हाच रामबाण उपाय आहे..

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/18/2011 - 13:07 नवीन
सबसिडी हाच रामबाण उपाय आहे..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा