✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुसरे घर (सेकंड होम) घेताय ? तेही कर्ज काढून ? एकदा हे वाचाच !

K
kvponkshe यांनी
Sun, 07/18/2021 - 16:51  ·  लेख
लेख
मला मान्य आहे की ही पोस्ट वाचून तुम्हास मी शेखचिल्ली आहे की काय अशी शंका येईल. पण जे घडलाय ते मी इथे सांगितलंय. मला तुम्ही क्रिटिसिझ करू शकता. पण ते करताना , मी या प्रकरणात खूप मनस्ताप भोगलाय हे समजून घ्या. मी घेतलेला निर्णय कदाचित तुम्हास पटणार नाही , पण मी तो घेतलाय, कारण मी त्या निर्णयाबाबत कन्व्हिन्स्ड आहे. पण मी तुमच्या मताचा सन्मान करतो. मी केलेल्या चुका दुसर्याने करू नये इतकाच माझा उद्देश आहे. कर्ज काढून फ्लॅट घेऊन तो भाड्याने देऊन काही वर्षांनी तो ३ पट किमतीस विकून मालामाल होण्याचे अनेक किस्से मी कैक वर्षे ऐकत आलेलो होतो. इतर नातेवाईक, मित्र मंडळी बिनधास्त फ्लॅट खरेदी करत असल्याचे मी पाहत होतो. स्वतःचा दुसरा एक फ्लॅट असावा, जिथे स्वतःचे कार पार्किंग असावे, गेटेड सोसायटी असावी आमची खुप वर्षांपासूनची इच्छा होती. कर्ज काढून फ्लॅट घ्यावा, तो भाड्याने देऊन काही वर्षांनी विकून आपण ही मालामाल व्हावे म्हणून मी पुण्यात धायरी येथे एका मोठ्या सोसायटीत १ BHK फ्लॅट कर्ज काढून घेतला. त्याची ही गोष्ट. एक दिवस फेसबुक वर मी संबंधित फ्लॅट ची जाहिरात पहिली. फोटो पाहून फ्लॅट आवडला. मग फ्लॅट मालकाशी संपर्क करून मी आणि कुटुंबीय तो फ्लॅट पाहून आलो. फ्लॅट चांगलाच होता. पण मालक त्या फ्लॅट चे ४३ लाख सांगत होते. फ्लॅट आम्हास इतका आवडला होता, की मी तिथेच ४० लाख रुपयास तो व्यवहार पक्का करून आलो. त्याच दिवशी त्यांना टोकन म्हणून ५०,०००/- ट्रान्सफर केले. २०१९ मध्ये खरंतर धायरीत १ BHK ५०९ स्के. फु. चा ४० लाखास घेणे हा मूर्खपणा होता. मी आजूबाजूस जरा चौकशी केली असती तर मला ४२ लाखात धायरीत २ BHK तोही नवा कोरा मिळाला असता. माझ्या बायकोच्या बहिणीस मी नंतर दुसऱ्या दिवशी तो फ्लॅट दाखवला. तिला फ्लॅट आवडला पण, मी फार महागात तो फ्लॅट घेत आहे हे तिला जाणवत होते. तिने अप्रत्यक्ष पणे मला तसे सांगून ही पहिले. पण दुर्दैवाने मला तिच्या "इन बिटवीन द लाईन्स" मधला अर्थ कळाला नाही. किंवा मी तो कळून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो म्हणा. मग तिने मला माझ्या फिनान्शियल सल्लागाराशी एकदा बोलून घ्या असे सांगितले. सल्लागाराने हा व्यवहार निव्वळ मूर्खपणाचा आहे असे मला स्पष्ट सांगीतले. पण मी फ्लॅट मालकास ५००००/- टोकन आणि शब्द देऊन बसलो होतो. आता बॅक ऑफ करणे मला योग्य वाटेना. सल्लागाराने मला ५०,०००/- अक्कलखाती गेले असे समज आणि मोठे नुकसान टाळ असे सुचवले. पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. दिलेला शद्ब मोडणे माझ्यासाठी फार लज्जास्पद होते. शेवटी मी ऐकत नाही असे पाहून माझ्या बायकोच्या बहिणीने आणि सल्लागाराने नाद सोडून दिला. मी बाकी कोणा नातेवाईकांचा सल्ला पण घेतला नाही. कारण मला त्यांना "सरप्राईझ" द्यायचे होते. आता ४० लाखाचा फ्लॅट घेण्यासाठी मला स्वतःचे भांडवल उभे करावे लागणार होते. कारण बँक कर्ज ९० टक्के देणार होती. म्हणजे ३६ रुपये मला कर्ज मिळणार होते. उरलेले ४ लाख +स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन + वकील फीज + सोसायटी ट्रान्स्फर असे मिळून जवळपास ७ लाख रुपये मला जमवायचे होते. हे पैसे मी माझी म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट मोडून, मागे मी चांदी ५६००० रु असतांना घेतलेली ती ३६००० रुपयास विकून, काही पैसे बाबांकडून घेऊन ७००००० रु उभे केले. HDFC मधून ३६,००,०००/- मला कर्ज १९ वर्षांसाठी ८.७५ टक्के व्याजाने मंजूर झाले. आणि मी तो फ्लॅट घेतला. मला ३२४४० रुपये EMI पडणार होता. असे ३२४४०/- रुपये ११० महिने न चुकता भरले आणि काही व्याज भरले की मी कर्ज मुक्त होईन असा मला मूर्खासारखा भ्रम होता. मी अमोर्टिझशन चा अभ्यास केला असता तर अशा मूर्ख भ्रमात मी राहिलो नसतो. असो. मला पहिला झटका बसला ते माझा पहिला हप्ता कट झाल्यावर. हफ्ता आणि माझे नेहमीचे SIP कट झाल्यावर फारच कमी रक्कम मला वापरायला मिळाली. त्यावर आता महिना भागवणे भाग होते. मी फटाफट माझे सगळे सिप बंद करून टाकले. निदान पुढील महिन्यात जास्त पैसे वापरायला मिळतील या उद्देशाने. पहिला हफ्ता कट झाल्यावर मी एकदा सहज माझे कर्ज अकाऊंट स्टेटमेंट पहिले. माझ्या अपेक्षेनुसार आता कर्ज रक्कम ३५,६७,५६० रुपये इतकी बाकी हवी होती. प्रत्यक्षात 3593810.08 रुपये इतका कर्ज बॅलन्स दाखवत होता. मी hdfc ला भेट देऊन हा काय प्रकार आहे ते विचारले. त्यांनी मला मी सही केलेला अमोर्टिझशन चा चार्ट दाखवला. त्या नुसार बँकेने 26250.00 रुपये व्याज कापून घेतले होते आणि 6189.92 रुपये मूळ मुद्दलातुन कापले होते. मी चुपचाप घरी आलो. गुगल करून अमोर्टिझशन चार्ट्स डाउनलोड केले. त्यात माझे संबंधित आकडे टाकून पहिले आणि मी हाललोच. पुढील १९ वर्षात मी hdfc ला व्याज + मुद्दल धरून एकूण 73,96, 300/- रुपये देणार होतो. म्हणजे सोप्या शब्दात तो फ्लॅट मला जवळपास ७४ लाखास पडणार होता. शिवाय वीज बिल, सोसायटी, वार्षिक मालमत्ता कर वगैरे इतर वेगळाच. मी काय मूर्खपणा करून बसलोय हे मला पहिल्यांदा कळले. आता १९ वर्षांनी या फ्लॅट ची किमंत जर ८० लाख जर आली तर मी फायद्यात राहणार होतो. शिवाय ही कर्ज हफ्ते फेडून मी बाकीचे काहीच इन्व्हेस्ट करू शकत नव्हतो. म्हणजे हा फ्लॅट सोडला तर माझी काहीच पुंजी नसणार होती. मी माझ्या धायरीतील काही मित्रांना फोन करून परिस्थिती बाबत चर्चा केली. (जी मी खरंतर हा व्यवहार करण्या पूर्वी करायला हवी होती.) त्यांनी पहिले तर मला शिव्या घातल्या. मी जो फ्लॅट घेतला होता, त्याची जास्तीत जास्त किमंत ३६,००,०००/- होती. तो मी ४०,००,००० ला घेतला होता. मनसोक्त शिव्या देऊन झाल्यावर मित्रांनी मला आता तो फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून मासिक हप्ताचा भर कमी करण्यास सुचवले. पुढे रियल इस्टेट जोमात आल्यावर विकून टाक असे सुचवले. मग मी सोसायटीत भाडे किती मिळेल याचा अंदाज घेतला. जास्तीत जास्त ६००० रुपये इतकेच भाडे मला मिळणार होते. म्हणजे फार काही विशेष फरक पडणार नव्हता. मग मी काही मित्रांना जे रियल इस्टेट मध्ये काम करतात त्यांना फोन केला आणि धायरीत पुढे कितपत फ्लॅटला ऍप्रिसिएशन मिळेल याचा अंदाज घेतला. असा अंदाज देणे कठीण आहे असे सगळ्यांनी मला सांगितले, पण एकुणात मला कळले की १९ वर्षानी माझ्या फ्लॅटची किमंत साधारण ९० लाख येईल. हा सुद्धा अंदाजच. कदाचित धायरीत काही आमूलाग्र बदल पुढे झाला तर कदाचित अजून किंमत येईलही, पण या सगळ्या जरतर च्या गोष्टी झाल्या. आज फॅक्ट अशी होती की मी चुकीच्या ठिकाणी हात घातला होता. मी माझ्या फिनान्शियल सल्लागाराला शरण गेलो आणि आता काय करू असे विचारले. त्याने मला झाप झाप झापले आणि तो फ्लॅट आता अक्कलखाती अंगावर घेऊन बस असे सुनावले. माझ्या बायकोच्या बहिणीने पण मला झापून तो फ्लॅट भाड्याने देऊन आहे तसाच ठेऊन मग रियल इस्टेट जोमात आल्यावर विकायचा सल्ला दिला. मी खूप खजील झालेलो होतो. नातेवाईक , मित्र मंडळी जे मला पूर्वी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक कर म्हणून मागे लागले होते ते आज मला क्रिटिसिझ करत होते. त्यांना सरप्राईझ द्यायच्या नादात मी डिसास्टर ओढवून घेतले होते. मित्रांत, नात्यात माझ्या शेखचिल्ली पणाची थट्टा चाललेली मला कळत होती. आता एकतर मला तो फ्लॅट गळ्यात घेऊन बसावे लागणार होते, किंवा विकून नुकसान सोसून त्यातून बाहेर पडावे लागणार होते. मी शांतपणे काही गणिते मांडली. जर फ्लॅट ठेवला तर वरील अंदाजानुसार साधारण पणे (९० लाख ही १९ वर्षानंतर ची फ्लॅटची किंमत - मी फेडलेले कर्ज 7४ लाख ) = १६ लाख फायदा.(बाकी येणारे भाडे + अन्य खर्च - टॅक्स फायदा हा भाग अलहिदा !) दुसऱ्या पर्यायात : आता तो फ्लॅट समजा विकला तरी जास्तीत जास्त ३६००००० ला विकला जाणार होता. म्हणजे ४ लाख + स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन + इतर खर्च + गेलेले आणि जाणारे हफ्ते असा एकूण जवळपास १० लाखाचा फटका. पण मी यातून काय मिळवणार होतो? माझ्या हफ्त्याचे जे ३२४४० रुपये होते ते मी अगदी ७ टक्के या अपेक्षित दराने योग्य फंडांत गुंतवले, तरी मला १९ वर्षांनी १ कोटी . ५३ लाख रु मिळणार होते. आता तुम्ही म्हणाल की ७ टक्के मिळतीलच असे कशावरून? कदाचित ५ टक्केच मिळतील? पण मग हा नियम वरील सिनॅरिओत पण आहे ना? ९० लाखच कशावरून मिळतील? ७० लाख च मिळाले तर? किंवा अगदी उलट बोलले तरी सुद्धा हेच लागू होते. म्हणजे ९० लाख च का धरले? १ कोटी १० लाख पण फ्लॅट विकून मिळतील. मग ७ टक्केच का धरायचे? इक्विटीत १५ टक्के पण मिळतात. असो. मी वरील गणिते माझ्या पत्नीशी, मित्रांशी, नात्यात बोललो. पण नुकसानीत फ्लॅट विकायला कोणीच मानेना. फक्त एका मैत्रिणीने माझ्या वरील कॅल्क्युलेशन्सला सपोर्ट केला. शेवटी मी निर्णय घेतला. जवळपास ६ महिने यत्न करून तो फ्लॅट मी ३६ लाख रु. ला विकला. जवळपास १० लाखाचे नुकसान झाले. पण मी लगेच माझे ३५००० चे सिप चालू केले. याला आता २ वर्षे होतील. आज माझी गुंतवणूक वाढताना दिसत आहे. आणि रियल इस्टेट मध्ये काय परिस्थिती आहे हे मी तुम्हास सांगायला नको. यातून मी खूप काही शिकलो, पण त्याची फी १० लाख आहे. मी तुम्हास मात्र ते फुकट सांगणार आहे: • मुळात हा व्यवहार करताना गुंतवणुकीच्या काही मूलभूत नियमांना मी फाटा दिला होता. त्यातील सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये हा होय. • आपल्याला tangible (स्पर्श करता येऊ शकणारी) असेट चे फार आकर्षण असते. जसे फ्लॅट, प्लॉट, दागिने, रोख रक्कम. पण नॉन tangible मालमत्ता सुद्धा खूप फायदा करून देतात. • कर्ज काढताना अमोर्टिझशन चा अभ्यास जरूर जरूर करा. तुमचे मुद्दल किती आहे, त्यावर व्याज किती जाणार आहे हे अभ्यासा. आणि त्यातून किती परतावा मिळणार आहे हे पहा. कागदावर आकडे मांडा. • माध्यम वर्गीयानी सेकंड होम मध्ये गुंतवणूक करताना दहादा विचार करा. आणि कर्ज काढून सेकंड होम घेताना तर २० वेळा. • रियल इस्टेट हाच गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे हा मुद्दाम पसरवलेला गैर समज आहे. तसेच रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवणे आणि त्यातून भरपूर रिटर्न मिळवणे याला रिस्क घेण्याची इच्छा, तुमची लिक्विडीटी ची गरज, patience लागतात त्याच बरोबर कुठे,कधी आणि किती इन्व्हेस्ट करायची याची correct इन्फॉर्मेशन पाहिजे. • गुंतवणूक करताना तुमच्या सल्लागाराशी मसलत करून ऑलोकेशन ठरवा. एखाद प्रकारची गुंतवणूक एखाद्यासाठी योग्य आहे म्हणून तुम्हास पण ती योग्य असेलच असे नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि त्यानुसार गुंतवणुकीचे प्रकार बदलतात. • व्यवहारात भावनेस स्थान देऊ नका. आततायी पणे कोणास शब्द, टोकन देऊ नका. वेळ पडल्यास नुकसान टाळण्यासाठी शब्द मागे घ्यायला लागला तरी त्यात काही वाईट किंवा लाज वाटून घेऊ नका. • मोठे नुकसान टाळण्यासाठी थोडे नुकसान सहन करा. • तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक एखादी गोष्ट करतायत म्हणून तुम्ही पण करायला जाऊ नका. रॅट रेस तर नकोच नको. तुमची इतरांविषयी असलेली जेलसी आणि तुलना तुम्हासच गाळात घालते. • फ्लॅट, प्लॉट अशी मोठी गुंतवणूक करताना खूप चौकशी करा. हे व्यवहार म्हणजे एखादा फोन घेणे नाही की आवडला की घेतला आणि हुक्की आली कि विकला. चांगले चांगले फ्लॅट्स, प्लॉट्स २ - २ वर्षे विकले जात नाहीत. शिवाय सध्या मागणीपेक्षा उपलब्धता खूप आहे हे लक्षात घ्या. किमंत नीट घासाघीस करून कमी करून घ्या. • सेकंड होम च्या नादापायी कर्ज घेताना त्यामुळे आपली इतर महत्वाची उद्दिष्टे बाधित होणार नाही ना हे नक्की तपासा. • हव्यास आणि गरज यातील फरक नीट समजून घ्या. तसेच गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून घ्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52056 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

तुम्ही तुमचा अनुभव (पुढच्यास

आंद्रे वडापाव
Wed, 07/21/2021 - 10:58 नवीन
तुम्ही तुमचा अनुभव (पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या मदतीच्या भावनेतून ) इथे मांडला, त्याबद्दल धन्यवाद. मला नाही वाटत मिपाकर तुम्हाला नावं ठेवतील/जज करतील, त्यामुळे त्याबद्दल निश्चिन्त असा.. उलट असे तुमच्या लेखासारखे लेख हाच मिपा चा यूएसपी पाहिजे ... नाहीतर आजकाल मिपा उकिरड्या सारखे "चालू चिखलफेक" धाग्यात बरबटला आहे..
  • Log in or register to post comments

यात काही मुद्दे राहून गेलेले

सुबोध खरे
Wed, 07/21/2021 - 11:19 नवीन
यात काही मुद्दे राहून गेलेले आहेत. १) आपल्या ३२४४० रुपये इ एम आय मधून दरमहा ५ हजार रुपये आयकराची बचत होते २) कधीही घराचे भाडे हे साधारण २-३ % च्या वर जात नाही. त्यामुळे केवळ भाड्यातुन होणारे उत्पन्न हे इतर उत्पन्नाशी तुलना करता येणार नाही.यात काही वर्षांनी घर विकल्यावर येणार भांडवली नफा याची बेरीज करून येणारे उत्पन्न किती टक्क्याने आले हा हिशेब लावणे आवश्यक आहे. जर घराची किंमत ९ वर्षात दुप्पट झाली तर ८% व्याजाने पैसे मिळाले आणि वर २ % भाडे म्हणजे १० % परतावा मिळाला असे गृहीत धरणे आवश्यक आहे. ३) दुसरे घर घेताना त्याचा भांडवली परतावा चांगला मिळेल अशा तर्हेने गुंतवणूक आवश्यक आहे. अन्यथा हा व्यवहार सुद्धा चुकीच्या समभागात गुंतवून बुडण्यासारखा व्यवहार होऊ शकतो. ४) सदा सर्व काळ स्थावर गुंतवणूक( real estate) हि आतबट्टयाची असते हे आपलें गृहीतक चुकीचे आहे. ५) समभाग किंवा म्युच्युअल फंडाचे "अधिवक्ते" सध्या बाजार उच्चीत आहे म्हणून त्याचे गोडवे गात आहेत. परंतु ज्यांना मार्च २०२० मध्ये पैशाची गरज पडली त्यांना आपले समभाग किंवा म्युच्युअल फंड हे केवळ व्याज बुडाले असे नव्हे तर भांडवली नुकसानीत विकायला लागलेले आहेत. सर्व पंटर आज गेल्या ३-४-५ वर्षात किती परतावा मिळाला म्हणत आहेत, त्यांना त्याच समभाग किंवा म्युच्युअल फंडा चा परतावा मार्च २०२० मध्ये किती टक्के होता हे विचारून पहा. ६) उगवत्या सूर्याला सर्वजण नमन करतात, सध्या बाजार तेजीत असल्याने सर्व हौशे नवशे त्याबद्दल उच्च रवात ओरडत आहेत. हेच भंपक लोक बाजाराची सूज उतरली कि नाहीसे होतील. ७) भांडवल सुरक्षा हा एक मोठा घटक बाजाराबद्दल बोलणारे लोक बोलत नाहीत. सोने किंवा स्थावर मालमत्ता यांचे मूल्य कधीही १० % पेक्षा खाली गेलेले नाही. याउलट १००० रुपयाला घेतलेला समभाग सतत खालचे सर्किट लागून शेवटी बाजारातून डीलीस्ट होतो आणि व्याज तर सोडाच मुद्दल सुद्धा नष्ट होताना हताश होऊन पाहावे लागते. अशा वेळेस स्टॉप लॉस सुद्धा काम करत नाही ८) मी आजपर्यंत ५ गृह कर्जे आणि एक व्यापारी कर्ज घेऊन त्यात पूर्ण नफा कमावलेला आहे तसेच बाजारातील माझी गुंतवणूक आज विकल्यास साधारण ५० % परतावा देईल. याचा अर्थ असा आहे कि किमतीच्या s आकाराच्या आलेखात आपण जर खालच्या किमतीला मालमत्ता घेतलीत (आलेखाच्या बुडाशी) आणि वरच्या किमतीला विक्लीत (आलेखाच्या शीर्ष जागी) तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. ९) आपण १०% नुकसान करून आपली मालमत्ता विकलीत हा एक धडा म्हणून पुढे लक्षात ठेवा. बाजारात फक्त नफा मिळवणारे उच्च रवाने ओरडत असतात. कारण आपण नुकसान केले( मी मूर्ख ठरलो) हे सांगण्याचा प्रामाणिकपणा बहुसंख्य लोकांमध्ये नसतो. या आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आपले अभिनंदन आहे. १०) बाजारात मी गुंतवलेले सर्व पैसे काही उत्तम परतावा देऊन गेलेले नाहीत. कित्येक समभाग पार बुडीतही गेलेले आहेत. मागच्या अनुभवातून आपण शहाणे होणे आवश्यक असते.
  • Log in or register to post comments

डॉक्टर साहेब ..

अमर विश्वास
Wed, 07/21/2021 - 16:29 नवीन
डॉक्टर साहेब .. तुमचे घराबद्दलच्या मुद्द्यांशी एकदम सहमत ... बाकी तुमचा चवथा मुद्दा : सदा सर्व काळ स्थावर गुंतवणूक( real estate) हि आतबट्टयाची असते हे आपलें गृहीतक चुकीचे आहे. तेच लॉजिक तुम्ही समभाग गुंतवणुकीला का लावत नाही ? तुम्हाला समभाग गुंतवणूक आवडत नाही .. या धाग्याचा विषय नसताना तुम्ही इथे समभाग गुंतवणुकीवर घसरलात ... बाकी समभाग गुंतवणुकीबद्दल मी अनेक धाग्यात स्पष्ट लिहिले आहे ... अधिक काय लिहू ... तुमच्याच शब्दात सांगतो ... सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक हि आतबट्टयाची असते हे आपलें गृहीतक चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

५) समभाग किंवा म्युच्युअल

चौथा कोनाडा
Wed, 07/21/2021 - 17:35 नवीन
५) समभाग किंवा म्युच्युअल फंडाचे "अधिवक्ते" सध्या बाजार उच्चीत आहे म्हणून त्याचे गोडवे गात आहेत. परंतु ज्यांना मार्च २०२० मध्ये पैशाची गरज पडली त्यांना आपले समभाग किंवा म्युच्युअल फंड हे केवळ व्याज बुडाले असे नव्हे तर भांडवली नुकसानीत विकायला लागलेले आहेत.
इथे सुबोध खरे यांनी "सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक हि आतबट्टयाची असते" असे कुठेच विधान केलेले नाही. फक्त उच्चरव "अधिवक्ते" आणि "मार्च २०२० " ची स्थिती नमुद केलेली आहे.
सर्व पंटर आज गेल्या ३-४-५ वर्षात किती परतावा मिळाला म्हणत आहेत, त्यांना त्याच समभाग किंवा म्युच्युअल फंडा चा परतावा मार्च २०२० मध्ये किती टक्के होता हे विचारून पहा.
याचे उत्तर मिळाले तर नक्कीच शंका निरसन होईल. बाकी मला तरी सुबोध खरे यांचा प्रतिसाद "गुंतवणुकी" संदर्भात सतर्क रहाण्याविषयी वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

चौ का जी

अमर विश्वास
Wed, 07/21/2021 - 22:38 नवीन
चौ का जी मी गेली बारा-तेरा वर्षे सातत्याने समभागात गुंतवणूक करीत आहे ... त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे मी याआधीही लेखमालेत लिहिले होते. प्रत्येकजण उतसाहाने मार्च २०२० चा उल्लेख करतात ... याचे उत्तर मी याआधीही दिले आहे ... मार्च २०२० मध्ये माझ्या पोर्टफोलिओ चे XIRR % रिटर्न्स ६.५% पर्यंत खाली आले होते. (जानेवारी २०२० ला १३% होते) त्याचबरोबर पुढच्या ३ महिन्यात जुन २०२० ला पुन्हा १२% ला रिकव्हर झाले होते. आणि आज दीड वर्षांननंतर १४% XIRR % रिटर्न्स आहेत ... तेंव्हा जर होल्ड करायची तयारी / धमक असेल (मी SIP तशाच चालू ठेवल्यात) तर मार्च २०२० सारख्या गोष्टींचा बाऊ करण्याची काहीही गरज नाही ... SIP / म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मर्म समजावून घ्या ही नम्र विनंती,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कधीही घराचे भाडे हे साधारण २

चेतन सुभाष गुगळे
Wed, 07/21/2021 - 18:29 नवीन
कधीही घराचे भाडे हे साधारण

२-३ %

च्या वर जात नाही.
पुण्याकरिता तरी हे आकडे सपशेल चूक आहेत. माझ्यामते फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने दिल्यास गुंतवणूकीच्या केवळ पाव टक्के रक्कम इतकीच दरमहा भाडे म्हणून मिळू शकते. जसे की लेखातला फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला आहे तर त्याला जास्तीत जास्त दरमहा भाडे हे रुपये दहा हजार मिळू शकेल (धागालेखक तर सहा हजारच लिहित आहेत). यात दरवर्षी ५ टक्के वाढ झाली तरी दहा हजारचे पुढील वर्षी दहा पाचशे होतील, पण या दराने चाळीस हजार व्हायला कित्येक वर्षे लागतील. म्हणजे गुंतवणूकीच्या एक टक्का देखील दरमहा भाडे स्वरुपात मिळणार नाहीतच. दोन ते तीन टक्के फारच दूरची गोष्ट. फ्लॅटच्या वाढणार्‍या किंमती हेच काय ते आकर्षण. तेही चलन बदलानंतर जवळपास संपुष्टात आले आहे. (म्हणजे किंमती वाढतात, नाही असे नाही पण त्या प्रमाणात महागाई देखील वाढतच असते त्यामुळे फ्लॅटच्या किंमती वाढणे हा काही गुंतवणू़कीवरील फायदा म्हणता येणार नाही. २०१६ पेट्रोलची किंमत काय होती? आता ती ज्या प्रमाणात वाढली आहे, त्या प्रमाणात २०१६ साली खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत वाढली असेल काय?) लोकांनी फ्लॅटकडे गुंतवणूक / आर्थिक लाभ म्हणून पाहू नये व फक्त स्वतःची राहण्याची गरज याच दृष्टीने पाहावे. तरच घरांच्या किंमती आवाक्यात राहतील आणि प्रत्येक बेघर स्वतःचे घर विकत घेऊ शकेल. अन्यथा काही लोकांकडे पाच पाच फ्लॅट आहेत आणि उरलेले इतर आयुष्यभर भाड्याच्या घरातच जीवन व्यतीत (आणि व्यथित देखील) करीत आहेत हेच चित्र दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला

सुबोध खरे
Wed, 07/21/2021 - 19:37 नवीन
फ्लॅट चाळीस लाखात घेतला गेला आहे तर त्याला जास्तीत जास्त दरमहा भाडे हे रुपये दहा हजार मिळू शकेल आपला काही तरी गैरसमज झाला आहे किंवा हिशेबात गल्लत झाली आहे. २-३ टक्के हे वर्षाला आहे महिन्याला नाही. आपल्याच हिशेबाने दहा हजार महिना भाडे मिळत असेल तर ते वर्षाला १ लाख वीस हजार म्हणजेच ३ % होईल मी तेच लिहिले आहे. कधीही घराचे भाडे हे साधारण २-३ % च्या वर जात नाही.
  • Log in or register to post comments

सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक

सुबोध खरे
Wed, 07/21/2021 - 19:58 नवीन
सदा सर्व काळ समभाग गुंतवणूक हि आतबट्टयाची असते हे आपलें गृहीतक चुकीचे आहे. आपण काढलेला हा "व्यत्यास"/ अर्थ चुकीचा आहे. आपला काही तरी मोठा गैरसमज झाला आहे. माझे म्हणणे एवढेच आहे कि समभाग गुंतवणूक सदा सर्व काळ फायद्यातच असते असे काही गुंतवणूक सल्लागार आणि चढत्या बाजारात भूछत्रासारखे उगवलेले व्हाट्सअँप विद्यापिठाचे पी एच डी लोक सांगत असतात ते चूक आहे. उलट समभागातील गुंतवणूक हि दीर्घ मुदतीत सर्वात फायद्याची ठरते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु शहाण्या माणसाने बाजार चढत असताना गुंतवणूक करताना जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि पडत्या बाजारात घेतलेले उत्तम समभाग स्थावर मालमत्तेपेक्षा जास्त नफा देऊन जातात असा सार्वत्रीक ( आणि माझा वैयक्तिक) अनुभव आहे. स्थावर मालमत्ता किंवा मुदत ठेवी यात संपूर्ण भांडवल गमावण्याची भीती खूपच कमी असते. याउलट बाजारात चुकीच्या वेळेस आणि चुकीची गुंतवणूक केल्यास फटका जास्त बसण्याची (व्याजच नव्हे तर भांडवल गमावण्याची भीती) शक्यता असते. दोन्ही गुंतवणुकीचे आपले फायदे आणि तोटे आहेत. माझ्या बद्दल म्हणाल तर माझी दोन घरे विकून मी तिसरे मोठे घर घेत आहे. त्यात मिळालेला नफा हा समभागातील नफ्यापेक्षा जास्त आहे. कारण मी चांगल्या आणि खात्रीच्या विकासकाकडे इमारत उभी करण्याच्या अगोदर बुकिंग मध्ये घर घेतले आणि निश्चलनीकरणाच्या अगोदर विकली त्यामुळे मूळ किमतीच्या तिप्पट साडे (नऊ लाखाचे ३२ लाख) आणि चौपट ( १५ लाखाचे ६८ लाख) किंमत मिळाली. शिवाय व्याजावर कर वजावट आणि साधारण ३ % भाडे मिळाले ते वेगळेच. माझे राहते घर २००४ मध्ये १८ लाख रुपयात घेतले होते. त्याची किंमत निश्चलनीकरणाच्या अगोदर दीड कोटी पर्यंत गेली होती. म्हणजे १२ वर्षात ८ पट अर्थात गेली ४ वर्षे हि किंमत वाढली तर नाहीच उलट १. ३० कोटी पर्यंत खाली आली आहे. पण राहते घर हि गुंतवणूक मी मानत नाही. गेली ४ -५ वर्षे स्थावर मालमत्ता बऱ्यापैकी साचली( STAGNANT) आहे. माझ्या अनेक चांगल्या समभागात गुंतवणूक काढून मी माझा व्यवसाय उभा केला आहे तसेच त्या नफ्यातून मी बरीच कर्जे फेडून टाकली आहेत. त्यामुळे बाजारातील गुंतवणूक हि आतबट्ट्याचा व्यवहार आहे असे माझे मत आहे असा आपला काही तरी गैरसमज झाला आहे किंवा माझी आपल्याला समजावून देण्यात त्रुटी राहिली आहे असे मी समजतो.
  • Log in or register to post comments

समतोल राखणे

चौकस२१२
गुरुवार, 07/22/2021 - 10:29 नवीन
मला वाटते डॉक्तरांच्या या प्रतिसादवरुन असे धरायला हरकत नाही कि अमर विश्वास आणि डॉक्टर यां दोघांचाट काही गैरसमज झाला असेल तर तो दूर झाला असावा बूम ( तेजी) मार्किएट मध्ये मग ते घरांची गुंतवणूक असो नाही तर समभाग अनेक लोक फसवतात आणि फसतात हि हे सत्य आहे ... ताक फुकून प्यावे पण त्याच बरोबर ताक पिण्याच्या वाटेसच जाऊ नये असेहि टोकाला जाऊ नये कोणत्याही गुंतवणुकीत समतोल राखणे हे महत्वाचे हेच खरे अर्थात हे बोलणे सोप्पे आहे , माहिती ची कमतरता , सुसूत्रीकरण नसणे आणि मनुष्याची हाव किंवा ओढ या पुढे हे असे कारेन कधी कधी कठीण होते या लेखातून चांगले अनुभव लोकांपर्यंत पोचले हेच मिपाचे श्रेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाकी 2/3 गोष्टी.

आनन्दा
Wed, 07/21/2021 - 23:11 नवीन
बाकी 2/3 गोष्टी. मी 2/3 वर्षांपूर्वी 2nd होम घेतले. माझ्या घराच्या जवळच आहे. Stagnancy असल्यामुळे ते मला स्वस्त पडले, साधारण 50लाख. मी ते भाड्याने दिलेले नाही, कारण मला ते वैयक्तिक वापरासाठी हवे आहे.. जर दिले असते तर 1. भाडे आहे महिना 15000 ते जाणार बायकोच्या नावावर 2. हप्ता आहे 30000 3. हप्त्यामध्ये व्याजावर पूर्ण वजावट मिळणार. म्हणजे साधारण 8-9000 महिना अधिक भरून मला त्यात पाहिले पैसे वाढवले तर साधारण 20000 रु महिना अधिक भरून मला 50लाखाचे घर मिळाले. त्यात जर 3-4 वर्षांनी वाढणारे दर गृहीत धरता मला तरी हा व्यवहार फायद्यातच पडला..
  • Log in or register to post comments

भाडे आहे महिना 15000 ते जाणार

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 07/22/2021 - 08:10 नवीन
भाडे आहे महिना 15000 ते जाणार बायकोच्या नावावर
भाडे बायकोच्या नावावर जात असले तरी त्यावर टॅक्स तुम्हालाच भरायचा असतो. 30% टॅक्स असेल तर ते 5000 वजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

असे का बरे होत असावे?

आनन्दा
गुरुवार, 07/22/2021 - 12:49 नवीन
असे का बरे होत असावे? थोडा प्रकाश टाकलात तर बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

लपवणे

चौकस२१२
गुरुवार, 07/22/2021 - 14:25 नवीन
मला भारतीय नियम माहित नाहीत पण येथील स्पष्ट नियमनप्रमाणे आणि एक साधे कारण म्हणजे घर कोणाच्या नावावर आहे ( मग ते १०० % तुमचं , ५०/५० ९९/१ कसे हि असेल) तसे ते उतप्पान त्या त्या व्यकिच्या आयकर हिशेबत धरले जाते तुम्ही ते जर तसे दाखवले नाहीत तर ते चकंक लपवणे होईल हे झाले भाडे उत्पनाचे त्याची दुसरी बाजू म्हणजे गुंतवणूक घरामध्ये होणार खर्च मुख्यत्वे कर्जवर भरलेले वय्याज हे सुद्धा त्याच प्रमाणात विभागाने तुमच्याच फायद्याचे असते साधारण येथे असे केलं जाते ते असे ( गुंतवणुकीचे घर) - घर दोघांच्या नावावर घेणे जेणे करून एकाचा मृत्यू झाल्यास दुसर्यास नाव लावणे सोप्पे जावे - कर्ज जास्त % ज्याचे उत्पन्न आहे त्याचे नावावर जेणे करून आयकर कपातीत जास्त फायदा उठवणे ( भारतासारखे २ लाखा पर्यंत फक्त वय्याज धरेल जाते असा नियम नाही एकूण वय्याज जे भरलं ते % वारी प्रमाणे आयकर हिशोबात धरू शकता हा हि फायदा ) श्रोयामांचे उतप्पान ४०% टॅक्स पातळी आणि श्रीमंतीचे जर ३०% असेल त्या प्रमाणे कर्ज आणि नाव आणि उत्पन्न हे विभागले जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

लपवणे

चौकस२१२
गुरुवार, 07/22/2021 - 14:36 नवीन
मला भारतीय नियम माहित नाहीत पण येथील स्पष्ट नियमनप्रमाणे आणि एक साधे कारण म्हणजे घर कोणाच्या नावावर आहे ( मग ते १०० % तुमचं , ५०/५० ९९/१ कसे हि असेल) तसे ते उतप्पान त्या त्या व्यकिच्या आयकर हिशेबत धरले जाते तुम्ही ते जर तसे दाखवले नाहीत तर ते चकंक लपवणे होईल हे झाले भाडे उत्पनाचे त्याची दुसरी बाजू म्हणजे गुंतवणूक घरामध्ये होणार खर्च मुख्यत्वे कर्जवर भरलेले वय्याज हे सुद्धा त्याच प्रमाणात विभागने तुमच्याच फायद्याचे असते साधारण येथे असे केलं जाते ते असे ( गुंतवणुकीचे घर) - घर दोघांच्या नावावर घेणे जेणे करून एकाचा मृत्यू झाल्यास दुसर्यास नाव लावणे सोप्पे जावे - कर्ज जास्त % ज्याचे उत्पन्न आहे त्याचे नावावर जेणे करून आयकर कपातीत जास्त फायदा उठवणे ( भारतासारखे २ लाखा पर्यंत फक्त वय्याज धरेल जाते असा नियम नाही एकूण वय्याज जे भरलं ते % वारी प्रमाणे आयकर हिशोबात धरू शकता हा हि फायदा ) श्रोयामांचे उतप्पान ४०% टॅक्स पातळी आणि श्रीमंतीचे जर ३०% असेल त्या प्रमाणे कर्ज आणि नाव आणि उत्पन्न हे विभागले जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

म्हणूनच म्हणालो मी,

आनन्दा
गुरुवार, 07/22/2021 - 16:15 नवीन
म्हणूनच म्हणालो मी, माझी पत्नी पण कर भरते, आणि घर आम्हा दोघांच्या नावावर आहे. मग मला टॅक्स वाचवता येईल की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मी असं गृहीत धरतोय की तुमच्या

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 07/22/2021 - 23:40 नवीन
मी असं गृहीत धरतोय की तुमच्या पत्नीला नोकरी नाही आणि पैसे फक्त तुम्ही कमावता. घर कुणाच्या पैशातून घेतले आहे आणि त्याच्या इ एम आय चे हप्ते कोण भरते या दोन गोष्टी इथे महत्वाच्या ठरतात. असं पहा, की टॅक्स जो आपण भरतो तो खरोखरच तितका असायला हवा का हे पहायला कुणी येत नाही. सरकार त्या बाबतीत तुमच्यावर विश्वास ठेवतं. आणि त्यामुळे tax compliance should not only be in letter, it must also be in spirit हा tax compliance चा मूळ गाभा आहे. जिथून संपत्ती चा उगम होतो त्या ठिकाणी टॅक्स ची जबाबदारी टाकली जाते. थोडक्यात सांगायचे तर बायका मुलांच्या नावे कितीही आणि कुठेही इन्व्हेस्टमेंट करा, त्या संपत्ती चा उगम जर तुमच्या कडून असेल तर त्याच्या टॅक्स ची जबाबदारी तुमचीच. हे फिक्स्ड deposits ना सुद्धा लागू आहे. बायकोच्या नावे असणाऱ्या FD वर 15G किंवा 10% टॅक्स भरत असाल तर ते चुकीचे आहे. ते तुमचे उत्पन्न मानून तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार त्यावर टॅक्स calculate करायला हवा. जर तुमच्या पत्नीला stable income source नसेल तर तिने EMI चा अर्धा हप्ता भरला तरी उपयोग नाही कारण तिने तुमच्याकडून पैसे घेऊन भरले हे सहज सिद्ध होईल. तेव्हा घर जरी दोघांच्या नावावर असेल तरी ते तसे असणे हा तुमची tax liability निम्मी करण्याचा कायदेशीर उपाय नाही. तुमची पत्नी कमावती असेल तर मात्र तुम्ही टॅक्स वाचवण्याचा फायदा घेऊ शकता. टीप: आता हे सगळं केव्हा महत्वाचं? तर IT ने फाईल काढली तर. ते काढतील की नाही याचा काहीच भरवसा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जमा + खर्च

चौकस२१२
Fri, 07/23/2021 - 04:32 नवीन
जमेची बाजू: घर जर तुमचं दोघांच्या नव्वर असेल तर त्या त्या % प्रमाणे मिळालेले भाडे हि दोघाचे नावावर "प्राप्ती" म्हणून जमा दाखवावे लागणार , एककाच्याच नावावर दाखवून कसे चालेले? खर्चाची बाजू कर्ज कोणाच्या नावावर किती प्रमाणात आहे त्या प्रमाणे त्यावरील वय्याज आणि इतर खर्च तुम्ही खर्चाकडे धरू शकता हे तत्व मला वाटते जगभर सारखेच लागू असावे गुंतवणुकीचे घर असणे म्हणजे जणू एक वयवसाय चालवणे असे सरकार धरते आणि त्याचा वाषिर्क ताळेबंद करून त्यावर टॅक्स आहे नाही ते ठरवते + व्याजतीक उत्पन्न याची सांगड घातली जाते आणि सरते शेवटी कर बहर कि नाही ते ठरणार आणि जर ऑडिट निघाले तर सोप्पे व्हावे म्हणून एकाच अकौंट मध्ये हे सर्व नीट केले म्हणजे " कशी फ्लो " कसा झाला हे सिद्ध कार्याला सोप्पे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

या लेखनासाठी धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/22/2021 - 09:34 नवीन
काहीच निर्णय न घेण्यापेक्षा धडाडीने निर्णय घेणे व तो चुकल्यास, चूक स्वीकारुन ती सुधारणे व त्याची किंमत चुकवणे हे केव्हाही उत्तम. यातून जे शिकायला मिळते ते आयुष्यभर उपयोगी ठरते. तुम्ही चूक झाल्याचे लक्षात आल्यावर वेळकाढू करण्यापेक्षा आर्थिक तोटा स्वीकारुन चूक सुधारली हे अभिनंदनीय आहे. अन इतरांच्या भल्यासाठी मोकळेपणाने इथे अनुभवकथन केल्याबद्दल खूप धन्यवाद. कितीही चिकित्सक राहिले तरी कधी ना कधी अपुरी माहिती असल्याने, अनुभव नसल्याने किंवा पुरेसा वेळ नसल्याने माझेही आर्थिक नुकसान होत असते. त्यातून शिकत राहून पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक काळजी घेत असतो. आपल्या आयुष्यभराच्या उत्पन्नाच्या हिशेबाने या चुकांमूळे झालेला तोटा फारसा नसतो. परंतु यातून शिकून टळलेला तोटा अन काळजीपूर्वक केलेल्या गुंतवणूकीतून मिळणारे लाभ त्याची भरपाई नक्कीच करतात. बादवे मी अमेरिकेत राहत असल्याने मला माहित असलेला अमेरिकन प्राप्तिकराबाबतचा नियम इथे लिहितो. अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्य सुरु झाले की परदेशातले कुठलेही उत्पन्न (त्या देशात भरलेला कर वजा करुन) स्वतःच्या वार्षिक उत्पन्नात जोडायचे असते अन त्यावर प्राप्तिकर भरायचा असतो. मी दर वर्षी एनाआरओ खात्यात मिळणार्‍या व्याजाची रक्कम डॉलरमधे मोजून ती अमेरिकेतल्या वार्षिक उत्पन्नाला जोडत असतो व अमेरिकेत कर भरत असतो. माझ्यासारख्या कुणी भारतातले घर अथवा प्लॉट विकून आर्थिक लाभ मिळवल्यास लाभाची रक्कम वजा भारतात त्यावर भरलेला कर, या रकमेवर अमेरिकेतही प्राप्तिकर भरावा लागतो. प्रत्येक जण हे नियम पाळत नसावा पण ज्यांना पाळायचे असतात त्यांनी हा घटक जरुर लक्षात ठेवावा.
  • Log in or register to post comments

भारतातले घर अथवा प्लॉट विकून

अभिजीत अवलिया
गुरुवार, 07/22/2021 - 10:45 नवीन
भारतातले घर अथवा प्लॉट विकून आर्थिक लाभ मिळवल्यास लाभाची रक्कम वजा भारतात त्यावर भरलेला कर, या रकमेवर अमेरिकेतही प्राप्तिकर भरावा लागतो.
हे एक प्रकारे डबल टॅक्सेशनच झाले की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नाही, भारतात भरलेला आयकर

मनो
गुरुवार, 07/22/2021 - 11:27 नवीन
नाही, भारतात भरलेला आयकर इथल्या करातून वजा करता येतो. भारत आणि अमेरिका यांचा double tax avoidance treaty नावाचा करार आहे, त्याचा फायदा मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

डबल टॅक्सेशन

चौकस२१२
गुरुवार, 07/22/2021 - 14:00 नवीन
दोन देशांचा जर "डबल टॅक्सेशन ट्रीटी " करार असेल तर प्रश्न नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

नेमकी व्याख्या

श्रीरंग_जोशी
Fri, 07/23/2021 - 03:45 नवीन
डबल टॅक्सेशनची नेमकी व्याख्या मला माहित नाही. पण एखाद्या माणसाची अमेरिकेत येण्यापूर्वीची स्थावर मालमत्ता अमेरिकेत राहू लागल्यावर विकून त्यात लाभ झाला म्हणून अमेरिकेत त्यावर कर भरावा लागणे (जिथे विकली गेली तिथे भरलेल्या कराची रक्कम वजा करुनही) मला तरी न्याय्य वाटत नाही. मी स्वतः या करनियमांचे पालन आजवर करत आलेलो आहे. हा मुद्दा मूळ प्रतिसादात लिहिण्याचा उद्देश हाच होता की भविष्यात अमेरिकेत स्थायी होण्याचा विचार संधी असेल तर गुंतवणुकीवर भविष्यात मिळणार्‍या लाभाच्या लोण्यामधे सॅमकाका या बोक्यालाही वाटा द्यावा लागणार हे ध्यानात ठेवावे ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

स्विस!!!

चौकस२१२
गुरुवार, 07/22/2021 - 14:14 नवीन
परदेशातले कुठलेही उत्पन्न (त्या देशात भरलेला कर वजा करुन) स्वतःच्या वार्षिक उत्पन्नात जोडायचे असते हो ,जणू काळा पैसा स्विस बँकेत ठेवला जातो तसे ! यावरून एक गोष्ट आठवली जोशी साहेब अनेक अमेरिकेतील ( आणि इतर देशातील पण ) अनिवासी भारतीय आपले भारतातील उतप्पन अमेरिकेत कळवत नाहीत, हे तुमच्या आयकर विभागाला हळू हळू कळू लागले ( मला वाटते हेच एस बीसी बँके च्या खातेदारनमुळे म्हणे ) आय आर एस ने मग त्याच्या मागे लागायचे ठरववाले .. खरे का? बर एक या संबंधी एक उप प्रश्न जेवहा एखादा असा अमेरिकेतील "टॅक्स रहिवासी" काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या बाहेर अर्थार्जनासाठी जातो पण त्या काळात अमेरिकेतील घर आणि इतर गुंतवणूक हि तशीच ठेवतो तेव्हा काय होते? असाच नियम इकडे ऑस्ट्रेल्यात हि आहे ए, पूर्वी मला जेव्हा येथून आखाती देशात जायची संधी आली होती जिथे टॅक्स नव्हता तेव्हा आता मी "ऑस्ट्रेल्या चा टॅक्स रहिवासी नाही " हे येथील आयकर खात्याला पटवून द्यायला बऱ्याच गोष्टीत कराव्या लागल्या होत्या . करणं शून्य टॅक्स आणि ऑस्ट्रेलीतील ४५% पर्यंत जाणारा टॅक्स यात केवढा फरक ! पूर्ण पिळलेल्या लींबातून अजून रस कोण जर काढून दाखवेल तर ते आयकर खाते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शक्य आहे

श्रीरंग_जोशी
Fri, 07/23/2021 - 03:40 नवीन
यावरुन आठ-नऊ वर्षांपूर्वी अगोदर दाखवली जाणारी एक जाहिरात आठवली. ( एनआरआय मंडळींसाठी भारतीय टिव्ही वाहिन्यांची जी सेवा असते त्यात) एका तुरुंगात पंजाबी ढंगात हिंदी बोलणारे २ कैंदी प्रथम भेटीत चर्चा करत असतात. पहिला म्हणतो की, "दो को लुढकाके इधर आया हूं, तुने क्या किया?" तर दुसरा उत्तरतो, "मैने कुछ नही किया, मेरे सीपीए ने एफ बार फॉर्म मे गडबड की". माझ्या पाहण्यात असे भारतीय नक्कीच आहेत ज्यांचे कुटूंबिय पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी वापरून अमेरिकेतल्या कुटूंबियाच्या नावे स्थावर मालमत्तेचे मोठे व्यवहार करतात अन लक्षावधी किंवा काही वेळा कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळवतात. अन हा लाभ टॅक्स रिटर्न फॉर्म भरताना अमेरिकेतल्या उत्पन्नात जोडत नाही. >> जेवहा एखादा असा अमेरिकेतील "टॅक्स रहिवासी" काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या बाहेर अर्थार्जनासाठी जातो पण त्या काळात अमेरिकेतील घर आणि इतर गुंतवणूक हि तशीच ठेवतो तेव्हा काय होते? बहुधा आयआरएस च्या या दुव्यावर या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

भाड्याचे गणित जागेवरही

वगिश
गुरुवार, 07/22/2021 - 23:17 नवीन
भाड्याचे गणित जागेवरही अवलंबून आहे, मी 2018 मधे 30 लाखाला धानोरी पुणे येथे 1 bhk घेतला. आज कामासाठी ती जागा कमी पडते म्हणून त्या इमारतीतच 11000 भाडे देऊन अजून एक 1 bhk वापरतो आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत उपयुक्त माहिती आहे,

विकास...
Fri, 07/23/2021 - 07:15 नवीन
अत्यंत उपयुक्त माहिती आहे "दुसरा फ्लॅट घेऊ नका, दुकान गाळा घायचा विचार करा" असे मला काहींनी सुचवलंय * * * जाताजाता:- बँकेचे रुपये आपण २०-३० वर्ष वापरतो म्हणजे त्याचे व्याज द्यावेच लागणार नाही का जसे दहा लाख बँकेत ठेवले तर वार्षिक चाळीस ते साठ हजार व्याज घायला तयार (४-६% Interest rate PA) * * * माझं गणित One BHK १६ लाख किंमत (Incl All) = ३ लाख रोख (On Paper ) + १३ लाख कर्ज १००५० हप्ता X २० वर्षे दोन वर्षानंतर मुद्दल ७ लाखावर आणून पुढे हप्ता ७०००/- करून २० वर्ष Tax Benefit घायचा
  • Log in or register to post comments

व्याज द्यावेच लागणार

चौकस२१२
Fri, 07/23/2021 - 08:36 नवीन
बँकेचे रुपये आपण २०-३० वर्ष वापरतो म्हणजे त्याचे व्याज द्यावेच लागणार नाही का अगदी बरोबर , आणि पहिले बरिच वर्षे हप्त्यातील मुख्य भाग हा व्याजावरच जातो .. यात लोकांनां काहींना आश्चर्य का वाटते कोण जाणे ! किंवा याची जाण का नसते ? देशाचे आयकर नियमा प्रमाणे अश्या कर्जाला "चांगले कर्ज" किंवा "वाईट कर्ज" म्हणले जाते राहते घराचे कर्ज = वाईट कर्ज, कारण त्यावरील व्याजाचा कायकाय वाचवयाला उपयोग होत नाही ( हे मी मी माझ्या देशातील परिस्थिती चे गृहीत धरून म्हणतोय ) वाईट कर्ज असल्यामुळे जेवढे कमी असले तेवढे बरे + लवकर भरून टाकता येईल तेवढे चांगले आणि कमीत कमी दारात मिळत असेल तर बरे गुंतवणूक घराचे कर्ज = चांगले कर्ज = जास्तीत जास्त असावे ९०%/ १० % स्वतःचे असे , दार पण कमी असावाच , पण आयकरात उपयोग होत असेल तर ठीक आहे
  • Log in or register to post comments

बहुसंख्य लोकांची कर्जाच्या

सुबोध खरे
Fri, 07/23/2021 - 09:39 नवीन
बहुसंख्य लोकांची कर्जाच्या व्याजाच्या बाबत रडारड हि चुकीच्या गृहितकावर आधारित असते. ( यात मी पण होतोच) मी २००४ साली १८ लाख रुपयाला घर घेतले तेंव्हा ९% व्याजाने एच डी एफ सी कडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले तेंव्हा येणाऱ्या १२ हजार इ एम आय मध्ये पहील्या महिन्यात रुपये ११ २५०/- हे व्याज आणि रुपये ७५०/- हे मुद्दल होते. यावर मी माझ्या स्थापत्य अभियंता मित्राला सांगितले कि हि तर बँकेची लुटालूट आहे. त्यावर त्याने साधा हिशेब करून दाखवला कि ९ % दरानेवर्षाचे १ लाख ३५ हजार व्याज येते तर महिन्याचे व्याज ११२५०/- येते. तेंव्हा फक्त ७५० रुपये भरून तुला कोण एवढ्या घराची मालकी देणार आहे? आणि तुझी जर १५ लाख रुपये देण्याची लायकी असेल तर तू कर्ज कशाला उचलशील? बँक काही समाजसेवा करण्यासाठी बसलेली नाही. तुला तुझ्याकडे असलेल्या पैशाच्या( थोडक्यात तुझ्या लायकीपेक्षा) ६ पट किमतीचे घर घेता येते आहे तर त्याची किंमत द्यायला नको? जर तुला ५-६ टक्क्याने कर्ज द्यायचे असेल तर बँक तुला कर्ज देण्यापेक्षा पी पी एफ मध्ये पैसे टाकेल. त्यांना ८ % व्याज( त्यावेळचा दर) बसल्या जागी मिळेल. मध्यमवर्गीय माणसाने पैसे साचवून घर घेणे हि अशक्य गोष्ट असते कारण तेवढे पैसे जमेपर्यंत घराच्या किमती आवाक्याच्या बाहेरच जातात.
  • Log in or register to post comments

साधा हिशेब करून....

चौकस२१२
Fri, 07/23/2021 - 12:39 नवीन
डॉक्टर अगदी बरोबर उलगडून सांगितले आहेत आपण "... गुगल करून अमोर्टिझशन चार्ट्स डाउनलोड केले. त्यात माझे संबंधित आकडे टाकून पहिले आणि मी हाललोच. " ह्या मूळ धागाकर्त्याचे विधान वाचून मी लिहिले कि "लोकांना याची जाण का नसते..? त्याचे कारण कदाचित असे असेल कि लोक फक्त महिन्याच्या हप्त्याकडे बघतात तो परडवतोय ना घ्या कर्ज , व्याजाच्या दराकडे फार लक्ष दिले जात नाही . मी तर सर्रास री फिनान्स करीत असतो .. या बरोबर काही बघ फिक्स्ड रेट आई काही फ्लोटिंग अशी सोया असेल तर त्याचा फायदा घेता येतो .. ?( अशी सोया देशात असले तर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Dsk

तनमयी
Fri, 07/23/2021 - 13:48 नवीन
Dsk madhye mine 57 lakh ghalun basliy Mi kay mhanave Nashib dusare kay 57 aka khatri case chaluy Kay karave
  • Log in or register to post comments

जर फ्लॅट ताब्यात आला नसेल तर

रावसाहेब चिंगभूतकर
Fri, 07/23/2021 - 14:34 नवीन
जर फ्लॅट ताब्यात आला नसेल तर 57 लाख कसे जातील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तनमयी

2 bhk hota

तनमयी
Sat, 07/24/2021 - 00:15 नवीन
2 bhk hota Dsk navache mothe prakran ahe 1000 lok tari budalet Case chalu ahe court madhye Sagal navavr ahe pan flat badhun tayar nahi Nusat frame ahe Punyala alo ki Nusat baghun asav galun jato
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

अहो, पण मला म्हणायचंय की

रावसाहेब चिंगभूतकर
Sat, 07/24/2021 - 08:40 नवीन
अहो, पण मला म्हणायचंय की १. फ्लॅट ची बिल्डिंग ज्या प्रमाणात बांधून होतो, त्या प्रमाणात बँक पैसे डेव्हलपर ला देते. तेव्हा तुमचे सगळे पैसे डेव्हलपर ला देणे बँक करत नाही. बँकेने दिलेली रक्कम कमी असणार. २. शिवाय कर्ज बँकेने दिलंय तुम्ही नव्हे. फ्लॅट हा तुम्ही बँकेला कोलॅटरल म्हणून दिलेला असतो. तो बँकेला परत करून या कर्जाला बंद करता येते का पहा. तुमची इन्व्हेस्टमेंट साधारण 15% असते ती मात्र बुडाली असे समजावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तनमयी

@चिंगु

गॉडजिला
Sat, 07/24/2021 - 09:06 नवीन
कोणाशी चर्चा करताय xD xD xD मानले बुवा तुम्हाला, जग खरोखर विचित्र झालं आहे हेच खरं _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

कर्ज " नॉन रिकोर्स "असते का

चौकस२१२
Sun, 07/25/2021 - 06:26 नवीन
हो ५७ लाख कसे जातील? ५७ लाख म्हणजे १५% + दिलेले वय्याज हे असेल तर मग मूळ वास्तू ची किंमत किती ? आपण म्हणततसे तसे १५% टक्के आणि अर्थात डोकेदुखी मात्र झाली हे खरे बर भारतीय नियमनप्रमे कर्ज " नॉन रिकोर्स "असते का ? म्हणजे बनलेली फ्लॅट चे खरेदीखत देऊन कर्जदार मोकळा होऊ शकतो का? " नॉन रिकोर्स " मग त्याची विक्री किंमत किती का असेना , आणि त्यातून बँकेला त्यांचे पैसे परत जरी पूर्ण नाही मिळाले तरी ते कर्जदाराचं मागे त्याचं इतर मालमत्ते मागे येऊ शकत नाही हे विचारायचा कारण असे कि असे " नॉन रिकोर्स " अमेरिकेत म्हणे आहे पण इतर देशात नाही त्यामुळे कर्जदार मोकळं होऊ शकत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

Akkal khati

तनमयी
Fri, 07/23/2021 - 13:49 नवीन
Akkal khati
  • Log in or register to post comments

चांगली चर्चा आहे.

कंजूस
Sat, 07/24/2021 - 12:02 नवीन
चांगले मुद्दे मांडले गेले आहेत. गुंतवणूक आणि ती घरामध्ये यावर काय काय विचारात घ्यायला पाहिजे ते कळलं. ------ १ बीएचकेचा मात्र बाजार उठलेला आहे ! समजा ते घर रेल्वे स्टेशनलगत असेल, चालण्याच्या अंतरात तर भाव आहे. गरजू लोक भाड्याने राहायला येतात. मध्यंतरी पेपरात सेकंड होम्सच्या जाहिराती ( मराठी पडद्यावरच्या कलाकारांच्या फोटोसह) येत होत्या. कर्जत, नेरळ मध्ये जागा. भटकंती दरम्यान दिसल्या. स्टेशनपासून २०-२५ किमी. एक विचार येऊन गेला की सेकंड होम घेणारे रेल्वेवर अवलंबून नसतात ते वाहनाने येणार. पण घर म्हणजे एका मोठ्या संकुलातील एक ब्लॉक( होम?) असणार, वेगळे स्वतंत्र घर नसणार मग त्यामध्ये सुटीला येऊन राहून काय आनंद मिळणार? राहयचे तर सर्व वस्तू आणून सजवायला हवे. ते घर वरती घाटमाथ्यावर असेल तर हवमानाची गंमत तरी मिळते. नेरळ कर्जतला काय? ( अशी घरे घेणारे कर्जवाले नक्कीच नसणार. तरीही रिटर्नस काय?)
  • Log in or register to post comments

१ बीएचकेचा मात्र बाजार उठलेला

चौथा कोनाडा
Sun, 07/25/2021 - 11:58 नवीन
१ बीएचकेचा मात्र बाजार उठलेला आहे !
समजा ते घर रेल्वे स्टेशनलगत असेल, चालण्याच्या अंतरात तर भाव आहे. गरजू लोक भाड्याने राहायला येतात.
साधारणपणे अश्या जागा आधीच गेलेल्या असतात ! आणि तिथले दर पण तसे चढेच असतात. मी बोललो ते सेकंड होम बद्दल जे बजेट मध्ये बसते (हो, प्रॉफिट हवे असेल तर गुंतवणुक कमी आणि परतावा जास्त असा) आणि मध्यवस्तीपासून (साधारणपणे) दुर असते, त्या बद्दल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आपण प्रामाणीकपणे लिहीले आपले

पाषाणभेद
Sat, 07/24/2021 - 19:45 नवीन
आपण प्रामाणीकपणे लिहीले आपले अभिनंदन. लेख डोळ्यात अंजन घालाणारा आहे.
  • Log in or register to post comments

बाकी सगळे ठीक आहे, पण तुमच्या

आनन्दा
Sun, 07/25/2021 - 10:54 नवीन
बाकी सगळे ठीक आहे, पण तुमच्या जागी मी असतो तर 10लाखाचा लॉस घेऊन बाहेर पडलो नसतो.. 10 लाखावर 6 टक्के व्याजाने 60000 मिळतात, तसेही इथे भाडे 6000 तरी मिळत होते.. म्हणजे आग मी ते पैसे सध्या अक्कलखती आहेत असे समजून हप्ता थोडा वाढवला असता, आणि योग्य भाव यायची वाट बघत बसून राहिलो असतो. 2-4 वर्षात पैसे काही प्रमाणात तरी वसूल झालेच असते. बाकी आयकर वजावट वगैरे विचार तुम्ही केला आहे की नाही याचा अंदाज नाही. पण जाता जाता एक शेरा - हा खरा अनुभव वाटत नाही, एकतर कोणताही माणूस इतक्या अविचाराने एव्हढे पैसे गुंतवणार नाही, आणि गुंतवले तर एव्हढ्या अविचाराने काढणार पण नाही. मला हा व्हाट्सअप्प विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेला धडा वाटत आहे.
  • Log in or register to post comments

अश्या परिस्थितीत काय करावे?

चौकस२१२
Mon, 07/26/2021 - 04:59 नवीन
झाले ते झाले... पण अश्या परिस्थितीत काय करावे? यावर आपण म्हणता तसा विचार करणे यौग्य आहे, मी हि एक ठिकाणी अश्याच परिस्थिती अडकलो , पण भाडे चांगले मिळत असल्यामुळे टॅग धरता येत आहे असा अनुभव आला ... त्यामुळे मुद्दलात तोटा सहन करून विकणे हे टाळले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मला हा व्हाट्सअप्प

शाम भागवत
Mon, 07/26/2021 - 07:56 नवीन
मला हा व्हाट्सअप्प विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिलेला धडा वाटत आहे.
तुम्हाला आता कोणितरी डबा खायला बोलवणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हा खरा अनुभव वाटत नाही,

kvponkshe
Fri, 08/20/2021 - 21:42 नवीन
आनद सर, हा अनुभव १०० % खरा आहे. माझा नम्बर देतो : ८००७६०५०८२. सर्व कागद पत्रे दाखवुन मी सिद्ध करु शक्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मला वाटते सुरक्षिता म्हणून

शाम भागवत
गुरुवार, 08/26/2021 - 13:29 नवीन
मला वाटते सुरक्षिता म्हणून फोन नंबर व्यनि करून कळवावा व त्याचा उल्लेख प्रतिसादात करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kvponkshe

स्वानुवभावातून शिकलेले काही

श्रीरंग_जोशी
Sun, 07/25/2021 - 23:41 नवीन
वरच्या चर्चेत दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड करताना सुरुवातीला मासिक हप्त्यांमधे व्याज अधिक अन मुद्दलाची रक्कम त्याप्रमाणात अगदीच किरकोळ अंरर्भूत असते असा मुद्दा आला आहे. यावरुनच मी स्वानुभावाने शिकलेली एक गोष्ट म्हणजे जर शक्य असल्यास दीर्घ मुदतीच्या कर्जांमधे सुरुवातीच्या काळात ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक परतफेड करता आली तर एकुण व्याजाची रक्कम घटण्यास हातभार लागतो. याऊलट कर्ज संपताना अधिक परतफेड केल्यास व्याजाची रक्कम अगदीच किरकोळ प्रमाणात कमी होते. बरेचदा गृहकर्ज वगैरे घेतल्यास पहिली काही वर्षे मासिक हप्त्यांपेक्षा अधिक रक्कम फेडणे आपल्याला शक्य होत नसते. गृहकर्जाच्या सुरुवातीच्या काळात कमी जोखमीच्या गुंतवणुक पर्यायात (जसे एफडी) पैसे गुंतवण्याऐवजी तेच पैसे गृहकर्जाची (इएमआयव्यतिरिक्त) परतफेड करण्यासाठी वापरावे. व्याजाची रक्कम जी वाचेल ती एफडी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा अधिक राहील. टीपा १. इथे एफडी राष्ट्रीयीकृत बँकाची गृहीत धरली आहे. २. जाणकार मंडळी यापेक्षाही अधिक उपयुक्त पर्याय सुचवू शकतील याची कल्पना आहे.
  • Log in or register to post comments

फिनान्शिअल इंजिनीरिंग!

चौकस२१२
Mon, 07/26/2021 - 04:54 नवीन
गृहकर्जाच्या सुरुवातीच्या काळात कमी जोखमीच्या गुंतवणुक पर्यायात (जसे एफडी) पैसे गुंतवण्याऐवजी तेच पैसे गृहकर्जाची (इएमआयव्यतिरिक्त) परतफेड करण्यासाठी जोशी साहेब योग्य मुद्दा आहे ( पण राहत्या घराच्या कर्जाबाबत फक्त, गुंतवणूक घराची कर्जे हि "इंटरेस्ट ओन्ली " पद्धतीची घावी उपलब्ध असल्यास ... तिथे मुद्दल कमी नाही केली तरी चालू शकते ) आणि असे जे पैसे तुम्ही इतरात्र ना गुंतवता गृहकर्ज ( राहते घर फक्त, मी आधी म्हणलय प्रमाणे बॅड लोन प्रकार ) यात घातल्यास तुम्हाला आयकर हि वाचतो गृहकर्ज समजा ३% असेल तर हप्त्या व्यतिरिक्त पैसे इतर ठिकाणी ५% मिळत असतील तर त्यावर परत आयकर लागणार त्यापेक्षा ते ३% चे कर्ज कमी करण्यात घालवावे हि आपण मांडलेली कल्पना पण हि कल्पना कदाचित अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलिया सारखया ठिकाणी जिथे गृहकर्जाचे दर हि कमी आणि बाजारातील कमी जोखमीच्या इतर गुंतवणुकीतील परतवा हि कमी आणि ग्रोथ (वाढ ) कमी आहे तिथे उपयोगी असावी भारतात कदाचित अश्या इतर थोड्या जोखमीच्या गुंतवणुकी ( सरकारी रोखे ) यातून परतवा हा "गृहकर्ज कमी करणयातही ते पैसे वापरणे " यापेक्षा खूप अधिक मिळत असावा! किंवा लोक बहुतेकदा असा विचार न करता या इतर ठिकाणी जोखीम घेऊन गृहकर्जाच्या रकमेपेक्षा जास्त कमवत हि असतील ? म्हणून हि कल्पना कदाचित लागू होत नसावी या शिवाय ऑफसेट अकाउंट हि कल्पना पण आहे कि नाही माहित नाही असे फिनान्शिअल इंजिनीरिंग छोट्या प्रमाणात करून फायदा होतो हे नक्की याहून एक गोष्ट उपलब्ध असल्यास करावी ती म्हणजे - गृहकर्जाचा हप्ता साधारण मासिक असतो पण ज्या ठिकाणी मिळणार पगार आठवड्याला किंवा २ आठवड्यातून एकदा या पद्धतीने मिळत असले तर कर्ज भरणं महिन्यातून ४ किंवा २ वेळा करावा .. मुद्दल कमी होते आणि एकूण वयाज वाचते
  • Log in or register to post comments

जर शक्य असल्यास दीर्घ

सुबोध खरे
Mon, 07/26/2021 - 10:52 नवीन
जर शक्य असल्यास दीर्घ मुदतीच्या कर्जांमधे सुरुवातीच्या काळात ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक परतफेड करता आली तर एकुण व्याजाची रक्कम घटण्यास हातभार लागतो आपला मुद्दा सुयोग्य असला तरी साधारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात तसं होत नाही. कारण कर्ज जास्त मिळत असेल तर बिल्डर मध्यमवर्गीय माणसाला सांगतो, 'साहेब, पहा तुमचं बजेट थोडं वाढवता येत असेल तर एक बेडरूम ऐवजी तुम्हाला छानसा २ बेडरूमचा फ्लॅट घेता येईल. यामुळे मध्यमवर्गीय माणूस बहुसंख्य वेळेस आपले बजेट ताणून थोडा मोठा फ्लॅट घेतो. यामुळे ताबडतोब त्याच्या कडे फ्लॅट सजवण्यासाठी पैसे नसतात. यानंतर पुढची ३-४ वर्षे वाढलेल्या पगारात घराची सजावट हौस मौज करण्यात जातात. आणि मग ५ वर्षांनी वाटते कि नाही तरी व्याज जास्त फेडलंय तर आता हे स्वस्तातलं कर्ज कशाला फेडायचं? शिवाय त्यावर कर सवलत आहेच (गृहकर्ज हे इतर सर्व कर्जापेक्षा स्वस्त असते) यामुळे साधारण मध्यमवर्गाच्या आयुष्यात लवकर गृह कर्ज फेडणे कठीण होते असे मी अनेक लोक पाहिलेले आहेत.
  • Log in or register to post comments

शिवाय त्यावर कर सवलत आहेच...?

चौकस२१२
Mon, 07/26/2021 - 12:00 नवीन
शिवाय त्यावर कर सवलत आहेच...? राहत्या घरावर? कि गुंतवणुकीचं घरावर राहत्या घरावर कर सवलत अशी येथे नसते ( आणि विकल्यावर कॅपिटल गेन टॅक्स) पण नसतो ) , भारतात असेल तर गणित बदलते असे धरले कि येथील प्रमाणे राहते घरावर अशी सवलत नसेल तर सुरवातीला जास्त पैसे भरणे अवघड असते हे मान्य पण जण ठेवावी आणि इतर ठिकाणी पैसे गुंतवण्या वेळी ह्या "बॅड कर्ज " लवकर फेडता येईल का याचा विचार सोडू नये येथील उद्धरण देतो गृह कर्ज समजा ३% ने आहे आयकर दर सरासरी भारतासारखाच ३०% आहे इतर गुंतवणूक म्हणजे समजा बऱ्यापकी कमी धोका असलेला फंड ६ % देत आहे ( आयकारचं आधी ) कर्जदार कडे काही कारणाने नेहमी पेक्षा जास्त पैसे आले ( पगारवाढ वैगरे ) तर ते १) ६% साठी थोडा धोका घेऊन ठेवा कि २) ३% चे गृहकर्ज फेडण्यात कमी लावा ? १) ६ टाक्यवार ३०% आयकर म्हणजे मिळाले ४% म्हणजे फक्त एक टक्का जास्त असे असले तर ठीक आहे कि ६% मध्ये ठेवा पण त्या फंडाची धोका पातळी बघावी लागेल २) ३% फेडण्यात घातले तर ३% ते सुद्धा आयकर प्रत्यक्ष ना भरता मिळवण्यासारखेच आहेत ( ३% आयकरानंतर मिळवण्यासाठी त्या पैसाला आधी ४% मिळवावे लागतात तेव्हावा देशातील कर्जाचे दर + आयकर आणि गुंतवणुकीतील धोके यावर अवलंबून आहे माझे सविस्तर लिहिण्याचा उद्देश हाच कि असे फिनान्शिअल इंजिनीरिंग करताना जगात इतर ठिकाणी जी साधने सर्वसामान्याला उपलब्ध आहेत ती जर भारतात असतील तर त्याचा उपयोग करावा
  • Log in or register to post comments

अजून एक अपडेट

तुर्रमखान
Sun, 08/01/2021 - 16:04 नवीन
या पूर प्रकरणामुळे, "निसर्गरम्य ठिकाणी आपलं हक्काचं घर" घेउन ठेवलेल्यांची गोची झालेली आहे. काय आणि किती नुकसान झालंय ते ही कळलेलं नाहीये बर्‍याच लोकांना. (अर्थातच रहातं घर सोडून) रिअल इस्टेट मध्ये सगळ्या संपत्तीमध्ये ३०% पेक्षा जास्त गुंतवणुक असू नये. फारसा अभ्यास नसेल किंवा करायची इच्छा नसेल तर (दागिने, विमा ही गुंतवणुक नव्हे), इक्विटी-फिक्स्ड-रिअल इस्टेट या पैकी प्रत्येक ३०% च्या आसपास असावं. उरलेलं सोनं (बाँड्स, बिस्किटं वगैरे) घ्यावं.
  • Log in or register to post comments

हा खरा अनुभव वाटत नाही,

kvponkshe
Fri, 08/20/2021 - 21:45 नवीन
आनद सर, हा अनुभव १०० % खरा आहे. माझा नम्बर देतो : ८००७६०५०८२. सर्व कागद पत्रे दाखवुन मी सिद्ध करु शक्तो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा