धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण.
देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात.