सकाळची कामं आटोपून, मस्त आल्याच्या चहाचे घोट घेत, वर्तमानपत्र हातात घेतलं. आजचच आहे ना बघण्यासाठी तारीख बघितली, १३ जानेवारी २०१७ (आम्ही इतके शिस्तीचे नाही बरं, कुठल्याही तारखेचं वर्तमानपत्र हाती येऊ शकतं) अरे बापरे! म्हणजे उद्या १४ जानेवारी, मकर संक्रांत! तिळगुळ करायचा राहुनच गेलाय अजून. आळस झटकून मी उठले. तिळगुळाचं साहित्य साटपपणे कध्धीच आणुन ठेवलं होतं पण परिक्षेचा अभ्यास कसा आदल्या दिवशी, ताजा ताजा करायचा असतो, मी तिळगुळही तसाच करते, अगदी ताजा ताजा.
तर मग मी तयारी सुरू केली. साहित्याची मांडामांड केली. एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली, उलथणं काढुन ठेवलं, पाव किलो पॉलिश तीळ एका भांड्यात ओतले.