वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Dec 2018 - 8:19 am

आभासी कर्तव्य आणि खर्‍याखुर्‍या भावना यात मी आभासी जगाला महत्व देत गेलो
लोक काय म्हणतील या इतकं आभासी जगात काहीच नसतं. त्या भयामुळे आपल्याच लोकाना आपण जाळत असतो. मी तुला थेट आगीत ढकललं होतं आणि स्वतःही आत जळत गेलो.

मागील दुवा : https://www.misalpav.com/node/43750

माता कैकयीने मागितलेला वनवास केवळ रामासाठी होता. तो तू ही स्वीकारलास . आनंदाने. तुझा काहीच दोष नसताना तू लंकेत जावून पडलीस. कष्टात राहीलीस. ..... दोष असेल तर तो एकच तू माझ्याशी लग्न केले होतेस. मला वरले होतेस त्या वर मालेने माझे प्राक्तन तुझ्याशी जोडले गेले.
लंकेहून येताना आपण पुष्पक विमानातून आलो. इतक्या दिवासांचा विरह. काय बोलू आणि काय नको ठरवता येत नव्हते. तुला माझ्याशी खूप काही बोलावेसे वाटत असावे. मी मात्र गप्पच होतो. वरवर दाखवत नसलो तरी त्या अग्निदिव्याच्या प्रसंगामुळे मी आतून पुरता कोलमडून गेलो होतो.
खाली पाचूसारखा हिरवनिसर्गदिसणारा निसर्ग , मधूनच चमकणार्‍या नद्यांच्या रेषा , चिमुकले डोंगर, आणि त्याला निळ्याशार समुद्राची किनार. नयन मनोहर होते दृष्य ते. सृष्टीने आपलं सगळं वैभव या पाचूच्या बेटांवर मनसोक्त उधळलं होतं.कुणालाही मोह पडावा असे.
मी मात्र विरक्त होतो. एका विलक्षण अपराधी भावनेने ग्रासलेला. हात हातात घेवून तुझ्याशी खूप बोलावसं वाटत होतं. पण तुला अग्निदिव्य करायला लावलं होतं तुझा काहीच दोष नसताना. तो अग्निदिव्याचा आदेशही थेट देवू शकलो नव्हतो.
तुझा शतशः अपराधी होतो. नजरेला नजरही देवू शकत नव्हतो.... काय बोलणार होतो मी? तू कशी आहेस हे तरी कसा विचारणार होतो?
तुला कदाचित ते माझं अवघडलेपण जाणवलं असावं. तू माझा हात हातात घेतलास आणि बोट दाखवत काहितरी दाखवू लागलीस.
त्या एका साध्याशा कृतीने सगळं मळभ नाहीसे झाले.मनावरचा ताण नाहीसा झाला. मी तुझ्याकडे पाहिलं . जणु काही हे सगळं घडलंच नव्हतं इतक्या निरागसपणे तू त्या निसर्गाचा आनंद घेत होतीस. किती सहजपणे तु मला क्षमा केली होतीस.
अयोध्येत गुढ्या तोरणं उभारून आपलं स्वागत झालं. रस्त्यारस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या आपल्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. त्या माझ्यापेक्षाही तुझ्यासाठी जास्त होत्या. प्रजाजन तुला आनंदाने शुभेच्छा देत होते. तू ही सहजपणे स्वीकारत होतीस. अगदी घरातलेच कोणी काका मामा भावंडे असावीत इतक्या आपुलकीने तू त्यांच्याशी बोलत होतीस. त्यांच्यात मिसळत होतीस.
राज्य कारभार करताना राजाला प्रजेचा पालक व्हावं लागतं त्याम्च्या बारीकसारीक अडचणी पटकन सोडवाव्या लागतात. सर्वांना न्यायानं वागवताना बारीकशा कुरबुरीच्या ठिणगीचं रुपांतर वणव्यात होणार नाही ना हे पहावं लागतं. हे करत असताना शेजारील राज्यांसोबत असलेल्या संबंधांकडे लक्ष्य द्यावे लागते. शेतीकडे , उत्पादनाकडे लक्ष्य द्यावे लागते.यात मला तुझी साथ लाभत होती. तुझ्यातला पूर्वीचा अल्लडपणा जावून एक छान पोक्तपणा आला होता. माझ्यातही बदल होत होते. दिवसभर राजसभेत मंत्र्यांबरोबर विचार विनीमय करताना वेळ कधी संपायचा ते कळायचे नाही आता काही चुकले तर सांभाळून घ्यायला तात दशरथ महाराजंचे छत्र नाही या जाणीवेने मी थोडा अधीकच गंभीरपणे वागत होतो.
दिवसभराचे काही वाटत नसे. प्ण रात्री तुझ्याशी बोलण्याचे दडपण यायचे. तुझा आनंदी चेहेरा पाहून मला तुला अग्निदिव्य करायला लावले हा सल असह्य व्हायचा. अपराधीपणाची जाणीव अधीकच गडद व्हायची. तुला स्पर्ष करताना त्या अपराधीपणाच्या आगीत जळून जाईन असे वाटायचे. माझ्यासाठी ते अग्निदिव्यच होते.
त्या अपराधाला तु किती सहजपणे क्षमा केलीस आणि विसरूनही गेलीस. तुझ्यासाठी ती घटना कधी घडलीच नव्हती.
एक स्त्री पुरुषाला किती सहज क्षमा करु शकते आणि एक पुरुष एका स्त्रीला किती सहज कठोर परीक्षेला उतरवतो ना.!
मग ती घटना घडली. राज्यात एका ब्राम्हणपुत्राचा अकाली म्रूत्यू झाला.त्यासाठी कोणताही गुन्हा न केलेल्या शंबूक नावाच्या एका शूद्राला राजसभेत त्याच्या कानात तप्त शिसे ओतायची शिक्षा ठोठावली. त्याचा गुन्हा इतकाच की त्याने त्या कानाने वेदाध्ययन ऐकले होते. तुला हा अन्याय वाटला. तू तसे म्हणालीसही. पण राज्य चालवायचे तर न्यायनिष्ठुरतेची धास्ती बसवावीच लागते.
तुझे म्हणणे होते की न्याय सर्वानां समान असावा. त्याची निष्ठुरता सर्वांंच्या बाबतीच सारखीच असावी. सधन आणि निर्धन या दोन्हीनाही .
आपल्यात झालेला तो पहिला मतभेद. मी अयोग्य न्याय केला होता. तू मला अपराधी म्हणालीस. मला मी जे केले ते योग्यच वाटत होते. लोकानुनयी राजा या पेक्षा एक आदर्श राजा होतो मी.
वेळ जात होता तसे आपण दोघेही पोक्त होत होतो. राज्याची घडी बसत होती. नागरीक आनंदात होते. एका आदर्श राज्यपद्धतीला आकार येत होता.
सगळं कसं छान चाललं होतं. नियतीच्या मनात काही वेगळंच चाललं होतं.
तो दिवस उगवला . एका धोब्याने त्याच्या पत्नीचा ती रात्रभर घराबाहेर राहिली म्हणून त्याग केला होत. त्याचे म्हणणे होते की पतीशिवाय घराबाहेर रात्र व्यतीत केलेल्या पत्नीला घरात पुन्हा घ्यायला तो काही राम नाही.
एक साधंसं वाक्य माझ्या मनातलं चांदणं उध्वस्त करून गेलं. एका आदर्श राजावर हे आरोप? लोक काय म्हणतील हा विचार जावून लोक काय म्हणायला लागले आहेत या विचारभयाने मी विचलीत झालो.
लंकेत राहूनही तू शुद्ध आहेस हा विश्वास होता. तरीही तुला अग्निदिव्य करायला लावले होते. तू माझ्यासमोर अग्निदिव्य केले होतेस . हे प्रजाजनांनाही माहीत होते.
एका यःकश्चित धोब्याने घरगुती भांडणात थेट राजाचे उदाहरण देत त्याला चूक ठरवावे?... एका आदर्श राजाचा वस्तुपाठ ठरावा म्हणून मी तुझा त्याग करायचे ठरवले.
कर्तव्य आणि भावना यात कर्तव्याला नेहमीच झुकते माप मिळते. भावनेचा बळी जातो. जे दिसते त्याला प्राधान्य मिळते. जे दिसत नाही त्याच्यावर अन्यायच होतो.
तुला बोलावणं धाडलं. तुझा चेहेरा थकलेला दिसत होता पण तरीही आनंदी होता. डोळे इतके टप्पोरे पाणीदार दिसत होते. खूप काहीतरी सांगायचं होतं त्याना. तुझ्या नजरेला नजर भिडवण्याचं माझं धाडस होत नव्हतं. तो निर्णय सांगायचं तर त्याहून नव्हतं तो निर्णय सांगायला मी लक्ष्मणाला पाठवलं. तो ही अवाक झाला. त्याने एका दासीकरवी तो निरोप तुला दिला. थेट बोलायचं त्याचंही धाडस नव्हतं. हा न्याय नाही हे सगळ्यांनाच कळत होतं.
एखाद्यावर अन्याय करायचा असेल तर त्याला नजरेआड करणं हा सर्वात सोप्पा मार्ग मी तोच अवलंबला.
काळजावर दगड ठेवून दुसर्‍या दिवशी सकाळी लक्ष्मण स्वतः रथ हाकत तुला घेवून गेला. अरण्याच्या दिशेने. त्या रथाची उडलेली धूळ कितीतरी वेळ मी पहात होतो.उगाचंच. तो परत येईल या आशेने. ते होणार नव्हतं. धनुष्यातून सुटलेला बाण होता तो .
किती वेळ गेला असेल कोण जाणे , मी गवाक्षासमोरच होतो.आअमात्यानी भानावर आणले. अश्वशाळेत नव्या अश्वांची पारख करायला जायचे होते.
दिवस कामात गेला. संध्याकाळ खायला उठली. खूप रडावेसे वाटत होते. शयनगृहात गेलो तर तिथली एक अन एक वस्तु तुझ्या आठवणीनी भरलेली होती. मंचकावरच्या उशा , शेजारी चौरंगावर पडलेले तुझे उत्तरीय , आरशासमोरची तुझी फणी , कुंकवाचा करंडा, मला गदगदून आले. हुंदके देत ढसाढसा रडत राहीलो. माझं शरयू नदीतलं चांदनं मी मोडून टाकलं होतं.
दोन दिवसानी लक्ष्मण आला. त्यानं मला आणि मी त्याला सामोरं जायचं टाळलं. पुढचा आठवडाभर आम्ही तेच करत होतो.
खरा न्यायन, निवाडा करण्या अगोदर अट्टल गुन्हेगाराला ही त्याची बाजू मांडायची एक संधी देतो. इथे तुझा कोणताच गुन्हा नव्हता. तुझ्यावर आरोपही नव्हता. पण निवाडा करुन न्याय मात्र केला गेला होता. न्याय कसला.... अन्यायच होता तो.
राजा कालस्य कारणम , राजा इतिहास घडवतो. या वाक्याची मोहिनी माझ्यावर पडली. एका आदर्श राजाचे उदाहरण घडवायच्या नादात मी तुझे आयुष्य उध्वस्त केले होते. त्या बरोबर माझे ही....
लक्ष्मण तुला सोडून आल्या नंतर त्याने तुला कुठे सोडले याची विचारपुसही मी केली नाही. मुद्दाम होऊनच. न जानो तुला भेटायचा मोह व्हायचा आणि आदर्श न्यायप्रिय राजा निश्चय विरघळायचा. माझ्या लौकीकाला बाध येईल असे काहीच करायचे नव्हते .
"काल" हा सर्व दु:खांवर औषध ठरतो. मी अहोरात्र कामात बुडवून घेतले. गोशाळा , अश्वशाळा , गजशाळा, पणनव्यवस्था शस्त्रागार अद्ययावत करून घेतले.
सुरक्षा दलांना मार्गदर्शन करु लागलो. एकच गोष्ट कटाक्षाने टाळली .ती म्हणजे न्यायदान.......
क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

13 Dec 2018 - 6:56 pm | श्वेता२४

.........