'आयटी'तल्या मोरूची कवने
गगनचुंबी चकचकीत इमारतीतल्या
आरस्पानी स्वागतिकेच्या डोक्यामागे
तेजोवलयासारख्या लकाकणार्या
भल्यामोठ्या टी व्ही संचावर
हसर्या गण्याचा फोटू पाहून
मोरू क्षणभर थबकला ...
जाड भिंगाच्या चष्म्यामागचे बोलके डोळे
चेहर्यावर स्पष्ट दिसणारे बुद्धीचे तेज
नखशिखांत उंची वस्त्रप्रावरणे ल्यालेल्या
जेमेतेम चाळीशीत कैलासवासी झालेल्या
गण्याच्या फोटूमागचा शोकसंदेश वाचला
अन मोरूच्या पायातले त्राणच गेले ...
अमुकचा मुलगा सोळा तास अभ्यास करतो
आपला सगळा आनंदच आहे
कामचोर कारकुंड्या तीर्थरूपांच्या आवाजातला उपहास
कितीही काम केले तरी त्याने कोणी मरतो का?
काय धाड भरली आहे तुला?
मॅनेजरच्या आवाजातली चीड
सरकारी नोकरीवाला शेजारणीचा नवरा
रोज रोमँटिक मूडमधे परततो
मुलाचा तास दोन तास अभ्यास घेतो
किमान व्हॉट्सअॅप केलेल्या यादीप्रमाणे
दूध, भाजी तरी आणत जा येताना
बायकोच्या बोलण्यातले वैफल्य
वॅगनरच्या सिंफनीतल्या स्वरमेळासारखे
सगळे आवाज मोरूच्या कानात घुमायला लागले
मोरू मटकन समोरच्या गुबगुबीत सोफ्यावर विसावला ...
आत्ताच्या आत्ता तडक परत फिरावे
लिफ्टने तिसर्या मजल्यावर जावे
ऑफिसातच घर थाटलेल्या
माजुरड्या घटस्फोटित मॅनेजरच्या
कानाखाळी जाळ काढत बोलावे
होय कामच्या अतिताणाने माणूस मरतो
आमचा गण्या हकनाक गेला
त्याचा खून झाला, तूच हा खून केला!
प्रद्युमन, दया, फ्रेडी. अभिजीत
कुणालाही सिद्ध नाही करता येणार कदाचित
तेव्हा उगाच बसची वेळ चुकायला नको
अशा हिशेबानी मोरू मेट्रोलिंकच्या थांब्याकडे निघाला...
रोजच्याप्रमाणेच ट्रॅफिक जाममधे अडकून पडलेल्या बसमधे
मोरूच्या इवल्याश्या मेंदूतला विचारांचा प्रवाहदेखील जाम झाला होता
कुंपणीने जॉइन होताना फुकट दिलेल्या टुकार सॅकमधून
मोरूने पाण्याची बाटली काढली आणि भसकन तोंडाला लावली
थोडे ताजेतवाने वाटल्यावर मोरू विचार करायला लागला
आतल्या आत काहीतरी तुटले आहे, निखळले आहे
काहीतरी सलते आहे अशी पुसटशी जाणीव झाली
आणि मोरूने अस्वथ होउन कपाळावरचा घाम पुसला ...
खोलवर कुठेतरी एक हंबरडा फुटतो आहे
काहीशा साहित्यिक भाषेत सांगायचे
तर या हुंदक्याला अभिव्यक्त केलेच पाहिजे
हे मोरूला अगदी तीव्रतेने जाणवले
मन मोकळे करावे तरी कोठे
मग मोरूला अविमामा आठवले
सतत यश मिळाल्याने मुर्दाड झालेले
एकाच कंपनीत टाचा घासत
उच्चपदस्थ होउन निवृत्त झालेले मामा
यांना काही सांगायला जावे
तर पानीपत ते कारगिलचे दाखले देतील
मिळाली संधी की उपदेशामृत पाजतील
देशासाठी काही करणे वेगळे
लार्जर दॅन लाईफ मिशनसाठी झिजणे वेगळे
आणि बिनलायकीच्या उच्चपदस्थांच्या
नाकर्तेपणा आणि हेकटपणामुळे
दिवसरात्र एक करून कष्ट करत
चडफडत हेलपाटणे वेगळे
इतका साधा फरक
या गलेलठ्ठ बुडाच्या आणि थुलथुलीत देहाच्या
विश्ववंदनीय निवृत्त व्हाईस प्रेसिडेंटला कळू नये?
मोरूने अविमामांच्या नावावर फुली मारली ...
नवी कामवाली बाई मिळेपर्यंत बायको समोर अभिव्यक्त वगैरे होंणे
या नुसत्या विचारानेच मोरूचा थरकाप उडाला
विचारांच्या वांझोट्या तंद्रीतच मोरू बसमधून उतरला
खाली मान घालून लांब लांब ढांगा टाकत घराकडे जाताना
मोरूची खात्री झाली कि अभिव्यक्त होण्याजोगे कुणी माणूस
आपल्या परिचितांमधे तरी अगदी नक्की नाही
एकाकीपणाच्या त्या उदास जाणिवेने
मोरू आतल्या आत कळवळला ...
कपाळावर आठ्या घालतच बायकोने सदनिकेचे दार उघडले
मोरू हातात रिमोट घेत कोपर्यातल्या नेहमीच्या खुर्चीत विसावला
इतक्यात आपले भुंडे शेपूट हलवत दुडक्या चालीने पळत
छोट्या 'मायलो'ने आनंदाने मोरूच्या दिशेने झेप घेतली
मोरूच्या मांडीवर बस्तान बसवत तो मोरूचे गाल चाटायला लागला
मोरूने त्याला अलगद कडेवर घेतले
रिमोटचे बटन कचकन दाबत टीव्ही बंद केला
आणि दहा मिनीटात येतो ग अशी साद देत
मोरू सोसायटीमधल्या बगिचाकडे निघाला ...
जन्मोजन्मी जिची आस असते
अशी सहवेदना की सहभावना
एकटक मोरूच्या क्लांत चेहर्याकडे बघणार्या
मायलोच्या डोळ्यात मोरूला दिसली
आपल्यासारखा बिनकण्याचा टुकार चिडचिडा मालक
त्याची कजाग आणि तुसडी बायको
कुत्र्याला खेळणे समजणारा त्याचा छळवादी मुलगा
रोज मिळणार्या काही मिलीग्रॅम पेडिग्रीसाठी
या सगळ्यांसमोर शेपूट हलवणारा मायलो
कुठेतरी त्याचे आणि आपले प्राक्तन सारखेच आहे
तेव्हा आपल्याबद्दल खरी कणव असेल तर यालाच
असे असणे अगदी साहजिक आहे असा विचार करत
मोरू कडेवर बसलेल्या मायलोसमोर अभिव्यक्त व्हायला लागला ...
'पग'चे आयुष्य दहा वर्षे असते की पंधरा
मोरूला नेमके आठवेना
पण बॉर्डरलाईनच्या बरेच वरती गेलेली कोलेस्टेरॉल
अधून मधून वाढणारा रक्तदाब
दिवसरात्र एक करून छळणारा मॅनेजर
अजाईलच्या नावाखाली लादलेले
रोज नव्याने थकवणारे 'जुगाड' काम
हे सगळे झेलताना
आपल्या गण्या होणे चुकणार नाही
तो दिवस येईपर्यंत
रोज 'अभिव्यक्त' होण्यासाठी
देवा, 'मायलो' ला दीर्घायुष्य दे
गण्याच्या आत्म्याला सद्वति दे
अशी मनातल्या मनात प्रार्थना करत
डोक्यावरचे ओझे बरेच हलका झालेला मोरू
खांदे पाडून घराकडे परत निघाला ...
(No subject)
:(
त्याने कामाचा उत्सव करायला
कामाचा उत्सव करण्यासाठी
ऐपत नसताना २ बीएचके घेऊन
भारीच !!!! आवडले !
(No subject)
एक कैफियत म्हणून पोस्ट ठीके पण
मला आवडत असून साहिर लुधियानवी प्रचंड
......
वा! काय लिहिलंय! एक नंबर!
+१ एक नंबर!
छान लिहिलय
ओहोहोहोहो,
भन्नाट लिहीलेय.
मस्तच
व्वा...मस्त लिहिलंय
लैच भारी!!!!
मस्तच लिहिलय. मला पटकन
धन्यवाद
हे असं असतं खरं