संज्जीं नां

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
1 Oct 2016 - 9:32 pm

संज्जीं नां

"बाबा संज्जीं नां"
"काय?"
"संज्जीं नां"
"काय ? नीट स्पष्ट बोल , काहीही कळत नाहीये"
"संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां"
"अगं हा काय म्हणतोय , काही कळत नाहीये "
"संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां ...संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां " (आंवं आंवं आंवं SSS )
______________________________________________________

ऑफिसातुन घरी आलो की कपडे बदलायचे अन टीव्ही समोर येवुन बसायचे. सौ चहा आणुन देई पर्यंत साहेबांकडुन फर्माईशी सुरु होतात अन चहा येई पर्यंत आपला युट्युब जॉकी झालेला असतो... हे आपले रुटीन! आमच्या साहेबांना अजुन अख्खी गाणी म्हणता येत नाहीत, शब्दावरुन गाणे ओळखा ही आमची एक परीक्षा असते म्हणजे हे असे ...

"बाबा इन्झी"

"इन्सी विन्सी स्पायडर, क्लायंबिंग वॉटर स्पाऊट, ऑट केम द रेन अ‍ॅन्ड वॉश द स्पायडर ऑऊट |
ऑट केम द सन अ‍ॅन्ड ड्रायडप ऑल द रेन , सो इन्सी विन्सी स्पायडर क्लाईंब द स्पाऊट अगेन || "

"बाबा बोल्नाथ "

"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल का, सांग सांग भोलानाथ "

"बाबा शेप्टी"

"शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा "
"पण पोपट नेहमी उभा का असतो ? , तेही मधोमध ??, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " मी उगाचच फालतु जोक मारला सवयी नुसार...

"ए ए ए ए ए ए " स्वयंपाक घरातुन अन्नपुर्णा हातात लाटणे घेवुन कणीकमर्दिनी रुपात प्रकटली...
"आपण हॉस्टेल वर रहात नाही, घरात रहातो , हॉस्टेल सोडुन ८ वर्ष झाली . आपले लग्न होवुन अर्ध तप झाले आपण गृहस्थ आहोत, ते समोर बसलेत ना ते आगाऊ महाराज वाट्टेल ते ऐकतात अन लक्षात ठेवतात अन नंतर कधीतरी कुठीही ते रीपीट करतात ह्याची जरा तरी फिकीर करा."

"ह्यॅ ह्यॅ ह्यॅ , त्याला काय शष्प कळतंय ह्यॅ "

अन्नपुर्णा आता चंडिका बनायला लागली ... काहीही म्हणा पण बायको रागावल्यावर सुंदर दिसत असेल तर बायकोला चिडवण्यात जी काही मजा येते ती खासच !

"ओके ओके महामाये, नाही काही आगाऊ बोलत. जा तु ." ह्यॅ ह्यॅ ह्यॅ हसत हसत बोललो. दुर्गेने सौम्य रुप धारण केले अन स्वयंपाक घरात जायला वळाली ... हे पाहुन पोरानेही खिदळण्यात त्यांचे हसणे मिसळले
" खॅ ख्यॅ ख्यॅ "

एका मागुन एक एक गाणी परत सुरु झाली ... हिकरी डिकरी डॉक ... फाईव्ह लिटल मंकीज जंपींग ऑन द बेड... ससा तो ससा...नानी तेरी मोरनी को मोर ले गये ... रो रो रो युवर बोट जेन्टली डाऊन द स्ट्रीम...
मध्येच अचानक ही रीक्वेस्ट आली :

"बाबा संज्जीं नां"
"बाबा संज्जीं नां"
"काय?"
"संज्जीं नां"
"काय ? नीट स्पष्ट बोल, काही ही कळत नाहीये"
"संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां"
"अगं हा काय म्हणतोय , काही कळत नाहीये "
"संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां ...संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां " (आंवं आंवं आंवं SSS )

"त्याला काही कळात नाही म्हणत होतास ना , हां आता बोला" दुर्गा हसत हसत किचन मधुन बाहेर येत म्हणाली.
"मला काही एक कळत नाहीये तो कोणते गाणे लाव म्हणतोय ते"
तिकडुन संजीं नां संज्जीं नां अखंड जप चालु होताच.
" अरे तो संजीवन नाम म्हणतोय .... "समाधी साधन संजीवन नाम" हे गाणं लाव म्हणतोय बाबुजींच्या आवाजातले ...कधी तरी रात्री झोपायच्या आधी ऐकलेले हे गाणं!"
मी आश्चर्यचकित होवुन आ वासुन पोराकडे पहातच राहिलो.
पोरगा आता हसत हसत संज्जीं नां संज्जीं नां म्हणत होता...

हे चीटींग आहे राव, एकदम काय रो रो रो युवर बोट वरुन संजीवन नाम ! हे चीटींग आहे !!
युट्युबवर "समाधी साधन संजीवन नाम" शोधुन सुरु केले तेव्हा कुठे महाराज जप करायचे थांबले.
_________________________________________________________________________________________

"पण नाना , संजीवन म्हणजे नक्की काय ?"

साधारण अनंतचतुर्दशी पासुन नवरात्री पर्यंतचे दिवस. पक्ष असल्याने कोणताही मोठ्ठा उत्सव नाही की कार्यक्रम नाही . पावसाळा नुकताच थांबलेला. अन घरातुन कोणत्याही दिशेला पाहिले तरी हिरवेगर्द डोंगर दिसावेत अशी काही निसर्गाने किमया केलेली! आम्ही मात्र सुर्योदय व्हायच्या आधीच अगदी तांबंड फुटायच्याचा वेळेलाच उठुन अजिंक्यतार्‍यावर जायला निघायचो. आम्ही म्हणजे मी नाना आणि मोत्या! मोत्या म्हणजे आमचा पांढरा शुभ्र कुत्रा. गावठीच होता, पण महाआगाऊ. डोंगराच्या पायथ्याशी असलेला शंकराचार्यांचा मठ ओलांडुन अजिंक्यतार्‍याच्या पायर्‍या दिसायला लागल्या की लगेच ह्याचे भो भो सुरु व्हायचे.
" जाऊन दे रे सोड त्याला" नाना म्हणायचे. मग एकदा का त्याला मोकळा सोडला की काय तो आनंद! सुसाट अगदी वरच्या मारुतीच्या मंदिरापाशीच थांबायचा! आम्ही मात्र निवांत गप्पा मारत गाणी गुणगुणत पायर्‍याचढत वर जायचो. ना तेव्हा खिशात घेवुन फिरता येणारे ट्रान्सिस्टर होते, ना कर्णककर्श हॉर्नच्या गाड्या. अजिंक्यतार्‍यावरची ती निरव शांतता, अन हिरव्यागर्द झाडीचा तो आसंमंतात भरुन राहिलेला तो ओलसर सुगंध, सारं कसं अगदी स्वर्गीय वाटायचं!

"समाधी साधन संजीवन नाम"

आम्ही काल रात्री झोपताना ऐकलेला अभंग नानांनी गुणगुणायला सुरुवात केली.

समाधी साधन संजीवन नाम | शांती दयासम सर्वांभूती || १ ||
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारू दिधला तेणें || २ ||
शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनि अज्ञान न ये घरा || ३ ||
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट | भक्तीमार्ग नीट हरिपंथी || ४ ||

नानांचा आवाज काही खुप गोड होता असे काही नाही, पण नाना इतक्या तल्लीनतेने गायचे की ऐकत रहावेसे वाटायचे.

"पण नाना , संजीवन म्हणजे नक्की काय ?"

नाना गाता गाता थांबले, हलकेसेच हसले अन पाठीवर थाप देत म्हणाले - "चला बोलुयात"

"खरंतर कित्ती सोप्पं आहे हे सगळे. लोकं उगाचच अवघड करुन टाकतात. आता बघ ना माऊलींचा इतका सोप्पा अभंग. एकेक शब्द सुटासुटा करुन अर्थ लावत गेले की कळतेच की!
समाधी म्हणजे उगाच कोठेतरी ध्यान लाऊन डोळे बंद करुन बसणे असले काही नसते रे.
समाधी म्हणजे सम+ धी , सम बुध्दी . दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ... "

नानांना एकदम चितळे मास्तरांसारखी सवय होती , श्लोकाचा अर्धाच चरण ते म्हणायचे पुढचा तुम्ही म्हणणे अपेक्षित असायचे.

" वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६ ॥"-

नाना - "यः सर्वत्रानभिस्‍नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । ..."

" नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥" -

" करेक्ट ! ही ही समाधीची अवस्था आहे, ती प्राप्त करायचे साधन काय तर नामस्मरण! शांती, दयाबुध्दी आणि सर्वांप्रती समभाव ! कित्ती सोप्पं आहे हे !
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । ..."

" शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥"

" शब्बास. माऊली काय म्हणतात -
उत्तमा ते धरिजे | अधमा ते अव्हेरिजे | ऐसे काहीच नेणीजे | वसुधा जेवी ||
गाईची तृषा हरु | अन व्याघ्रा विष होवुनि मारु | ऐसे नेणीजे करु | तोय जैसे ||"
एकदा असा समभाव निर्माण झाला की जी अवस्था आहे ती समाधीच की ! किती खोल शांतीची ही अवस्था आहे ही !!

... शांतीची पै शांती ...

अहाहा !
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥ "

नाना अगदी सहजपणे ज्ञानेश्वरी, गाथा दासबोधातील श्लोक उधृत करायचे ...नानांना अख्खी ज्ञानेश्वरी पाठ होती की काय कोणास ठाऊक! एकेक पायरी चढत मारुतीपाशी पोहचलो , मोत्या मंदिराच्या बाहेर शेपटी हालवत उभा होताच, मारुतीला मंदिरा बाहेरुनच नमस्कार करुन आम्ही पुढे निघालो...

" नाना शम दम कळा म्हणजे काय ? विज्ञान सज्ञान म्हणजे काय? आणि परतोनि अज्ञान न ये घरा म्हणजे काय ?"

नाना हसत म्हणाले " हे हे अवघड आहे, हे कळायला वेळ लागेल,"
" सांगा ना "
"हा हा हा . ऐक -शम म्हणजे अंतःकरणाची उपरती, दम म्हणजे मनाचे आकलन, क्षमा धैर्य अहिंसा समता सत्य सरलता इंद्रियजय मृदुता शांतवृत्ती औदार्य क्रोध रहित्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वृत्तींमध्ये उमटणार्‍या वासेनेच्या तरंगाचे दमन. विज्ञान म्हणजे सायन्स ह्या अर्थाने नव्हे तर विशेषत्वाने जाणणे, सखोल जाणणे ह्या अर्थाने आणि सज्ञान म्हणजे जे काही जाणले आचरणात आणणे"

शब्द न शब्द डोक्यावरुन गेला होता , जिथे होतो तिथेच आ वासुन उभा राहिलो. नानांनी वळुन पाहिलं , हसत म्हणाले "असु दे अवघड आहे हे वेळ लागेल कळायला , पण हे एक सोप्पे आहे 'परतोनि अज्ञान न ये घरा' एकदा का हे कळाले की आत्ता जे काही अज्ञान आहे, अजाणतेपण आहे ते परत येणार नाही, एकदा कळाले की "सुटलो" !

त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला । संसारखेद तो उडाला ।
देह प्रारब्धीं टाकिला । सावकाश ॥ ४२॥ !

अहाहा काय अवस्था आहे ही ! अनुर्वाच्च्य केवळ अनुर्वाच्च्य!

अजुनही काहीही कळाले नव्हते, पण नाना इतके तल्लीन होवुन बोलत राहिले की केवळ ऐकत रहावेसे वाटायचे !

" आणि माऊली शेवटी काय म्हणतात , ज्ञानदेवा सिध्दी साधन अवीट , साधन अवीटपणे करत रहाणे हीच सिध्दी !
जन साधन तन सिध्दी !!

संदेह हेचिं बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ॥
निःसंदेही समाधान । होये आपैसें ॥१५॥

संदेहरहित साधन हीच सिध्दी!

भक्तीमार्ग नीट हरी पंथी ! माऊली माऊली !!"

नाना आवाज गहिवरला त्यांनी क्षणमात्र डोळे मिटुन घेतले, शब्दच संपुन गेले होते जणु.

निःसंदेह जालें अंतर्याम । सद्‌गुरुचरणीं ॥

आता काहीच न बोलता आम्ही चालत राहिलो . नुकत्याच नटलेल्या हिरव्यागर्द पानांची मंद सळसळ आणि असंख्य पक्षांचा किलबिलाट वगळता आता त्या शांततेला भेदेल असं काहीच नव्हतं तिथे !

________________________________/\_________________________________________

एक एक पायरी चढत शेवटापर्यंत कधी पोहचलो कळालेच नाही !

धुक्याच्या घनदाट दुलई खाली सातारा अजुन पेंगुळलेलाच होता अन पाठीशी उभा असलेला यवतेश्वर त्याच्या हिरव्यागर्द पांघरुणातुन धुक्याबाहेर डोके काढुन डोकावत होता. त्याच्या पाठीमागील दुरवर दिसणार्‍या सज्जनगडाच्या शिखराला नेहमीप्रमाणेच नमस्कार करुन आम्ही " समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडळी कोण आहे " चा घोष केला !
नंतर खिंडीतल्या गणपतीला नमस्कार करुन आम्ही मागे वळालो.

"पण नाना, संजीवन म्हणजे नक्की काय ?"

नाना हसले "सगळ्या गोष्टी सांगुन समजतात का रे दादा? नाही ना! यु हॅव टू युज युवर ग्रे मॅटर!" नाना माझ्या डोक्यावर टपली मारत डोक्याकडे निर्देश करत म्हणाले " तुझे तुलाच शोधुन काढावे लागेल..."

" घालुन अकलेचा पवाड| व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड| तेथे कैचे आणले द्वाड | करंटपण || श्रीराम || "

विचार करत रहा, चिंतन करत रहा, अभ्यास करत रहा ! ' योग्य वेळ आली अन साधन सुदृढ झाले, नि:संदेह झाले कळेल हे मात्र नक्की!

भक्तां नारायणा नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले ||

तोपर्यंत चरैवति चरैवति ! उपासकासी सूचना , उपासना उपासना !"

पुर्वेच्या क्षितीजावरुन उगवणार्‍या मित्राला हात जोडुन नमस्कार केला अन आम्ही उतरायला सुरुवात केली...
नानांनी परत त्यांच्या खर्जातल्या आवाजात समाधी साधन म्हणायला सुरुवात केली. ह्यावेळेला मात्र प्रश्न मनातल्या मनातच फिरत राहिले.
______________________________________________________________________________
" बाबा आधिक आधिक आधिक बाबा आधिक "

गाणं बंद पडलं तेव्हा साहेबांचा दंगा परत सुरु झाला. त्याच्या दंग्याने विचारांची तंद्री भंगली. डोंगरावरल्या मारुतीपासुन निमिषार्धात नदीकाठीच्या गणपतीपाशी पोहचलो. नानांच्या आठवणींनी डोळे भरुन आले,

भक्तां नारायणा नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले || पांडुरंग पांडुरंग !!

"ह्म्म्म , चला आता बाबाला अभ्यास करायचा, आपण जेवण करुन घेवु " अन्नपुर्णेने अलगद पोराला उचलुन कडेवर घेतले अन एक घास चिऊचा एक घास काऊचा सुरु केले.

" नै नको.... बाबा ..... गाणी .... युटुब .... आंवं आंवं आंवं SSS "

" हं, हे घ्या, आधी भात भरवा कानसेन रावांना आणि मग ऐका गाणी" पोराच्या चेहर्‍यावर एकदम हसु फुललं पण आता मी एक घास चिऊचा एक घास काऊचा सुरु केले.

" नै नको.... बाबा ..... गाणी ..."

"बरं बाबा , कोणतं गाणं लावायचं बोला महाराज"

" बाबा आधिक आधिक आधिक बाबा आधिक " परत एकदा महाराजांनी जप सुरु केला.

ह्या वेळेला गाणं ओळखणं मला अवघड गेलं नाही.
_______________________________________________________________________________________

धर्मविचार

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा

मस्तय :)

पैसा's picture

1 Oct 2016 - 10:33 pm | पैसा

आवडले

प्रचेतस's picture

2 Oct 2016 - 1:41 pm | प्रचेतस

:)

आता वर जे प्रचेतस यांनी टाकलेल आहे जे चिन्ह आहे ते मला फक्त असेच दिसते.
:)
आता असे तर नक्कीच अपेक्षीत नसणार ती स्मायली वा तसे काहीतरी असणार पण मला नेहमीच
:)

अभ्या..'s picture

2 Oct 2016 - 1:58 pm | अभ्या..

अप्रतिम लेखन रे मार्कसा.
तुझ्या भात्यात असलेल्या एकेक बाणांचा हेवा वाटतो कधीकधी.

पद्मावति's picture

2 Oct 2016 - 2:04 pm | पद्मावति

सुरेख!

यशोधरा's picture

2 Oct 2016 - 2:43 pm | यशोधरा

सुरेख. कधीतरी अभंगांवरचे निरुपण विस्ताराने लिहा.

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2016 - 3:14 pm | बोका-ए-आझम

चिरंजीवांची आवड चांगली आहे!

नाखु's picture

3 Oct 2016 - 8:58 am | नाखु

बेटा सवाई.

लेखात नवरात्राचा उल्लेख खुबीने आला आहे आणि आम्ही तो सूक्ष्म नजरेने टिप्ला आहे..

मोरया गोस्वामी शप्पथ

नीलमोहर's picture

3 Oct 2016 - 3:36 pm | नीलमोहर

पूर्वी फक्त विविधभारती होतं ते छान होतं, आता विस्मरणात गेलेली ही सर्व गाणी नेहमी ऐकायला मिळायची.

आंवं आंवं आंवं SSS करणारं आणि संजीवन नाम आवडणारं पोरगं भारी आहे :)
बाकी ३६०° मध्ये फिरणारा आपला लेखनप्रवास प्रशंसनीय आहे.

सस्नेह's picture

4 Oct 2016 - 1:36 pm | सस्नेह

'कणिकमर्दिनी' हे जबरदस्त आवडल्या गेले आहे..!

अजया's picture

3 Oct 2016 - 4:07 pm | अजया

अप्रतिम!

रातराणी's picture

4 Oct 2016 - 8:37 am | रातराणी

गोडय :)

किसन शिंदे's picture

4 Oct 2016 - 2:16 pm | किसन शिंदे

जबराट लिहीलंय बे गिर्जा. आधी मलाही कळालं नाही ते संज्जीं नां.. =))

धुक्याच्या घनदाट दुलई खाली सातारा अजुन पेंगुळलेलाच होता अन पाठीशी उभा असलेला यवतेश्वर त्याच्या हिरव्यागर्द पांघरुणातुन धुक्याबाहेर डोके काढुन डोकावत होता. त्याच्या पाठीमागील दुरवर दिसणार्‍या सज्जनगडाच्या शिखराला नेहमीप्रमाणेच नमस्कार करुन आम्ही " समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडळी कोण आहे " चा घोष केला !
नंतर खिंडीतल्या गणपतीला नमस्कार करुन आम्ही मागे वळालो.

तू अजून सातार्‍याला नेतोयस आम्हाला. :(

पूर्वीच सातारा राहील नाही आता

मनमेघ's picture

4 Oct 2016 - 3:52 pm | मनमेघ

केवळ अप्रतिम लिहिलं आहेस मित्रा! लिहीत रहा एवढेच म्हणतो.
अंतरस्थितीचिये खुणा । अंतर्निष्ठ जाणती ।।

सई कोडोलीकर's picture

5 Oct 2016 - 10:56 am | सई कोडोलीकर

खुप सुरेख लिहिलंय. पिढ्यांतलं संक्रमण किती अप्रतिम आहे. आता अभंगही ऐकलाच पाहिजे.

सूड's picture

5 Oct 2016 - 11:23 am | सूड

भारीच!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Oct 2016 - 12:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फार सुरेख. लेक छोटी असताना नेहमी 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' ऐकायची, म्हणायची वाडीला ने. नेले तर तिथली गर्दी बघून म्हणे ही वाडी नाही. गाण्यातली वाडी वेगळी आहे. मुलंही गाणी फिल करतात.हे जाणवले. सुंदर लिखाण.

सिरुसेरि's picture

5 Oct 2016 - 3:46 pm | सिरुसेरि

सुरेख लेखन . सातारा ,अजिंक्यतारा , पोवई नाका , मंगळवार तळे , नटराज मंदिर , बॉम्बे रेस्टॉरंट , राजवाडा चौक , सातारा रेल्वे स्टेशन अशी अनेक ठिकाणे आठवली .

हे पहा ते बाकी लेखन ठीके पण अध्यात्मातलं काही शष्प कळले नाही ब्वॉ.. :-(
जाऊं देत.. आम्ही आपलं साधंसुधं नामच घेतो म्हंजे झालं! :-)

विंजिनेर's picture

19 Mar 2019 - 1:23 am | विंजिनेर

चांगलं लिहिलंय पण नमनाला अगदी घडाभर तेल लागलंय, शिवाय ते अस्थानी विनोद... त्यामुळे अंमळ बेरंग होतोय... प्रस्तावनेचं फुटेज कमी करता आलं तर बघा...

प्रसाद गोडबोले's picture

21 Mar 2019 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विजिनेर :)

मी कथा लिहित असताना त्यावर लघुपट बनवता येईल ह्या दृष्टीने लिहित असतो , बर्‍याचदा माझ्या डोळ्यांसमोर पात्रांचे चेहरे, त्यांचे कपडे, त्यांची बोलायची स्टाईल , इव्हन संपुर्ण सेट असतो, लाईट इफेक्ट्स , आणि बॅकग्राऊन्ड म्युझिकही असते !

ह्या कथेत सुरुवातीला उभा केलेला सीन एक सर्वसामान्य प्रापंचिक माणुस आहे, त्या आयुष्यात विशेष असं काही नाही सगळंच सर्वसाधारण चालु आहे असे दाखवण्या करता पहिला सीन / प्रस्तावना लिहिली आहे . त्यामुळे ते नमनला घडाभर तेल किंव्वा अस्थानी विनोद वाटले तरी पुढील भागातील एका वेगळ्याच लेव्हल वर आयुष्य जगणार्‍या माणासाच्या आयुष्यातील कॉन्ट्रास्ट ठळक पणे दाखवायला उपयोगी पडेल असे वाटले !
कदाचित कॅमेरा हातात असेल तर जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होता येईल असे वाटते कधी कधी आता!
असो.

मनःपुर्वक धन्यवाद !

शित्रेउमेश's picture

19 Mar 2019 - 9:08 am | शित्रेउमेश

खूप छान लिहिलयं.... मस्त...

समीरसूर's picture

19 Mar 2019 - 2:00 pm | समीरसूर

खूप मस्त लिहिलंय! :-)

माझ्या मुलाला मी कधी तरी 'तम्मा तम्मा लोगे' ऐकवलं होतं. सारखं सारखं 'नानी तेरी', 'लकडी की काठी', 'असावा सुंदर', 'छून छून करती आयी चिडिया', 'एका माकडाने', 'हम्प्टी डम्प्टी', 'हिकरी डिकरी' वगैरे ऐकून कंटाळा आला होता. एकदा 'तम्मा तम्मा' लावलं. साडे सात मिनिटांचं गाणं त्या दोन वर्षांच्या पिल्लाने पूर्ण पाहिलं. अगदी अनिमिष नेत्रांनी! आता मी घरी पोहोचलो की 'बाबा, तम्मा तम्मा लाव' ची डिमांड सुरु होते. 'तम्मा तम्मा' झालं की 'लडकी बडी अंजानी हैं' आणि मग 'मय से मीना से ना साकी से' मधले बीट्स ऐकतांना मुलगा हरखून जातो आणि मी नीलम किती मस्त होती हे न चुकता बायकोला ऐकवतो. एकदा असंच 'पुकार'मधलं 'बच के रहना रे बाबा' सुरु झालं आणि पोराला आवडलं. त्या गाण्याची टाईल खाली दिसली की 'हे लाव, हे लाव' असा आरडाओरडा सुरु होतो. सध्या 'दिल तो पागल है' च्या शीर्षक गीतामध्ये अडकलोय आम्ही. तो मेलडीमध्ये आणि मी माधुरीमध्ये!