प्रवास करताना सावधानता बाळगा !

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
20 Jun 2016 - 11:02 am

प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे, बस किंवा विमानाचा प्रवास आपल्याला करावा लागतो. प्रवासी हा ग्राहक आहे. त्याला मिळणा-या सेवेत हलगर्जीपणा झाल्यास ग्राहकांनी त्याबाबत आवाज उठवायला हवा. त्यासाठी ग्राहकांनी तिकिटांसंबंधीच्या नियमांचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपला हक्क बजावायला हवा.
airline
दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण स्वत:ची सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ही सुरक्षितता जेव्हा आपल्या हातात नसून इतर काही बाबींवर अवलंबून असते तेव्हा ब-याच वेळेला मन:स्ताप सहन करावा लागतो. तसेच यात शारीरिक व आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता असते. बी. बालाजी यांना नवीन नोकरीवर रुजू होण्यासाठी अहमदबादला जाणे गरजेचे होते. त्यासाठी ते चेन्नई-अहमदाबाद ‘ई-२३७’ या क्रमांकाच्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बसले.
अहमदाबाद येथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचे ‘चेक इन’ केलेले सामान आलेले नाही. त्यांनी विमानतळावरील अधिका-यांकडे लगेच तक्रार केली. त्यांच्या सामानामध्ये त्यांच्या नवीन रुजू होणा-या नवीन नोकरीसंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे होती. संध्याकाळी पाच वाजता विमानतळावर पोहोचलेले बालाजी सामानाचा शोध घेण्यासाठी रात्रीचे आठ वाजेपर्यंत तिथेच होते.
मात्र सामानाचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर फार मोठया प्रयत्नाने ते इंडिगोच्या दिल्ली येथील आफिसमध्ये संपर्क करू शकले. त्याना तिथून असे सांगण्यात आले की, त्यांचे सामान चुकून जयपूर येथे गेले आहे. आणि दुस-याच दिवशी त्यांच्या घरी सामान पोहोचवण्यात येईल. दुस-या दिवशी बालाजी यांना कळवण्यात आले की त्यांचे सामान जामनगरला जाणा-या बसमध्ये घालण्यात आले आहे.
ते त्यांनी त्या बस स्टॅण्डला जाऊन घ्यावे. यामध्ये दोन दिवस उलटून गेले होते पहाटे तीन वाजता पोहोचणा-या बसमधून आपले सामान उतरवून घेण्यासाठी त्यांना जामनगर बस स्टॅण्डवर जावे लागले आणि प्रत्यक्षात सामान साडेसात वाजता मिळाले. बालाजींना झालेल्या या मन:स्तापाबद्दल व नुकसानीबद्दल विमान कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करणारा फोन व मेल येणे गरजेचे होते. तसे न होता आठ दिवसांनी त्यांना मेल आला की तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे.
आता मनीषाच्या बाबतीत काय झाले ते पाहू. दोन महिने अगोदर त्रिवेंद्रम-दिल्ली असे परतीचे तिकीट इंडिगो या विमान कंपनीचे आरक्षित केले होते. दिल्लीला पोहोचल्यावर परतीच्या प्रवासाचे नियोजन बदलले आणि तिने रिफंडसाठी विचारणा केली. तिला सांगण्यात आले की तिचे तिकीट सवलतीच्या दरात काढण्यात आल्याकारणाने रिफंडच्या ऐवजी तिला ३१ मार्च २०१३ पर्यंत कधीही प्रवास करता येईल.
३ नोव्हेंबर २०१२ रोजी मनीषाने परतीच्या प्रवासाची तारीख निश्चित केली. व तसे तिने विमान कंपनीला कळवले. परंतु प्रत्यक्षात त्या दिवशी विमानतळावर पोहोचल्यावर तिला ‘नो शो’ असे मार्क केल्याचे दाखवण्यात आले. ‘नो शो’ म्हणजे तिकीट आरक्षित करूनही जर प्रवासी योग्य वेळेत हजर नसेल तर ते तिकीट ‘नो शो’ असे ठरवून त्यावर तसा शिक्का दिला जातो.
मनीषाच्या बाबतीत हा शिक्का तिच्या अगोदर काढलेल्या परतीच्या प्रवासाच्या तारखेच्या तिकिटावर म्हणजेच ३० जुलै २०१२ रोजीच्या तिकिटावर देण्यात आला होता. म्हणजेच मनीषा तिकीट काढूनही वेळेवर हजर नव्हती, असा त्याचा अर्थ झाला आणि त्यामुळेच ३ नोव्हेंबर रोजी ती प्रवास करू शकली नाही.
वरील दोन्ही प्रसंगावरून आपल्या लक्षात आले असेल की विमान सेवा घेताना बालाजी आणि मनीषा यांना सेवेतील त्रुटीमुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासांना सामोरे जावे लागले.
अशा सेवा घेताना ग्राहकांनी जागरूक राहून सर्व माहिती मिळवली पाहिजे. ब-याचदा कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वत:च्या क्रेडिट कार्डवरून कुटुंबातील इतर सदस्यांसाठी तिकीट ऑनलाईन आरक्षित करते. अशावेळी या सदस्यांनी स्वत:च्या तिकिटाबरोबरच त्या कार्डची दोन्ही बाजूची फोटोकॉपी तसेच त्या कार्डधारकाच्या सहीचे पत्र आणि त्या पत्रात प्रवाशांचे नाव, प्रवासाची तारीख व कोणत्या विमान कंपनीची सेवा घेत आहोत, याचा तपशील देणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षिततेसाठी त्या कार्डवरचा सीव्हीव्ही क्रमांक फोटो कॉपीमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
सवलतीच्या दरात तिकीट आरक्षित करताना प्रत्येक विमान कंपनीचे स्वत:चे नियम असतात. जर तिकीट रद्द करावे लागले किंवा बदलून हवे असेल तर ते नियम लागू पडतात. त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढताना त्या त्या विमान कंपनीच्या ‘view fare rules ’ या लिंकवर जाऊन जाणून घ्यावे.
तिकीट आरक्षित, रद्द किंवा त्यात कोणताही बदल करताना प्रत्येक विमान कंपनीचे जे नियम आहेत त्याची माहिती आधीच मिळवली तर नंतरचे नुकसान टळू शकते. शिवाय कंपनीकडून एखाद्या उड्डाणास विलंब झाला किंवा ते रद्द झाले, सामान वेळेवर आले नाही, बॅग फाटून आली, चोरीला गेली असे प्रकार झाल्यास देशाअंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नुकसानभरपाईचे नियम आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विकल्याने जर प्रवासाची वेळ/दिवस बदलले, तर त्यासाठी आर्थिक परताव्याचे नियम आहेत. त्यानुसार पैसे मिळण्याबाबत ग्राहकांनी आग्रही राहायला हवे. तसेच ‘नॅशनल कझ्युमर हेल्पलाईन’ या सेवेकडे तक्रार नोंदवावी आणि या पलीकडे आपले अनुभव वर्ल्ड वाईड वेब या माध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावे. त्यातून आपोआप ग्राहक प्रबोधन होत राहील.

-- रंजना मंत्री, मुंबई ग्राहक पंचायत

दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

प्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

20 Jun 2016 - 11:36 am | गामा पैलवान

श्री बालाजी यांना झालेला त्रास निषेधार्ह आहेच. मात्र जर त्यांनी कागदपत्रे स्वत:सोबत ठेवली असती तर हा त्रास निश्चित कमी होऊ शकला असता. विमानप्रवासात महत्त्वाची कागदपत्रे असल्यास परोक्ष सामानात ( = चेक्ड इन लगेज) टाकू नयेत. अंगावर बाळगावीत.

-गा.पै.

आधीच्या प्रश्नांची उत्तरं कधी देणार?

नॅशनल कंझ्यूमर हेल्पलाईन काय आहे?

पुणे मुंग्रापं's picture

21 Jun 2016 - 6:26 pm | पुणे मुंग्रापं

नॅशनल कंझुमर हेल्पलाईन ही केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने ग्राहक मार्गदर्शन, ग्राहक शिक्षण व तक्रार निवारण यासाठी केलेली व्यवस्था आहे. ग्राहक आपल्या शंका, तक्रारी इ. १८००-११-४००० या टोल फ्री क्रमांकावर विचारु / करु शकतात. ( सोम ते शनि ९.३० ते ५.३०) किंवा ९१८१३०००९८०९ या क्रमांकावर वर एस.एम.एस. करून कळवू शकतात. web@nationalconsumerhelpline.in येथे मेल करण्याचाही पर्याय आहे . त्यांच्या www.nationalconsumerhelpline.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. शक्यतो महाराष्ट्राबाहेरील उत्पादक, सेवा देणारे इ. विरुद्धच्या तक्रारींसाठी ही मदतवाहिनी वापरावी .
महाराष्ट्रासाठी राज्य शासनाची १८००-२२-२२६२ ही मदतवाहिनी उपयोगी पडेल. mah.helpline@gmail.com येथे मेल पाठवूनही तक्रार करता येते. ही व्यवस्था विनामूल्य आहे.

आधीच्या प्रश्नांची उत्तरं कधी देणार?

नमकिन's picture

24 Jun 2016 - 9:03 am | नमकिन

मागचं सपाट!