✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अ हेरिटेज वॉक..

म
मस्त कलंदर यांनी
Wed, 02/15/2012 - 20:29  ·  लेख
लेख
खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!! हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. रस्त्याच्या दुतर्फा ताशीव दगडांच्या, मजबूत आणि प्रशस्त इमारती. प्रत्येक इमारतीची स्वतःची एक कहाणी. ती कुणी बांधली, त्या मूळ मालक कंपनीचं पुढं काय झालं, तिची किती, कशी आणि कोणत्या कारणाने हस्तांतरे झाली, हा सगळा इतिहास सांगायला रामदासच हवेत. देशेदेशीच्या वास्तुशिल्पकलेचे नमुने इथल्या इमारतींमध्ये साकारले आहेत. या पहा रोमन शैलीतले खांब मिरवणार्‍या इमारती: इतरांच्या हातचं पाणी न चालणार्‍या भटांसाठी राजस्थानी ब्राह्मणांनी चालवलेलं चहाचं दुकान. पाटीचं स्वरूपच दुकान किती जुनं असेल हे सांगायला पुरेसं आहे. ही आहे पारशी लोकांची विहीर. काळाच्या ओघात तिची देखभाल होत नाहीय, पाणी दूषित होतं आहे आणि आजूबाजूलाही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. साहजिकच त्यामुळं ती सध्या बंद अवस्थेत आहे. विहीरीचा दुरून काढलेला फोटो: विहिरीवरची भित्तीशिल्पे: विहिरीवरचा फारसी/इराणी मजकूरः ग्रीक शैलीतली (बहुधा मार्शल & मार्शलची) इमारतः मोडकांनी उल्लेखलेलं इटालियन मार्बलः थोडंसं दुरून पाहिलं की दुरवस्था लक्षात येते: या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भित्तीशिल्पं आहेत. मी फक्त पहिल्या मजल्यावरच्या शिल्पाचा फोटो घेतला आहे. लढवय्या पुरूष, त्याची लेकुरवाळी स्त्री आणि ड्रॅगनशी झुंजतानाचा त्याचा अविर्भाव अगदी प्रेमात पडावं असाच!! प्रसिद्ध स्ट्रँड बुक स्टॉल आणि दारातून बाहेर पडताहेत ते श्री. अशोक शहाणे(संदर्भः मोडकांचा प्रतिसाद): सगळ्या विलायती शैलींमधून आपलं वेगळेपण दाखवणार्‍या इमारतीवरची ही लक्ष्मीची मूर्ती: काळाच्या ओघासोबत न बदललेली आणि अजूनही लाकडावर चालणार्‍या भट्टीची बेकरी: बेकरीवरच्या पाट्याही तितक्याच जुन्या आहेत. इथली खारी, मावा केक आणि बन मस्का इतका रूचकर होता की फोटो काढण्याचं लक्षातच आलं नाही. खास यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं कितीही वेळा जाण्याची माझी तयारी आहे. :-) हे रेमण्डसचं दुकान, पण इतर दुकानांहून जास्त महत्त्व मिळालेलं. शपथविधीपूर्वीचे मंत्र्यासंत्र्यांचे कपडे इथेच शिवले जातात म्हणे. (आर आर आबांनी मात्र ही परंपरा मोडली. शपथेपूर्वी की नंतर हे माहित नाही) ही देखणी इमारत इथे मुंबईतच आहे असं कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता. तिच्या शेजारची ही दुसरी इमारतः या दोन इमारतींसमोरच हे शांत, धीरगंभीरसं चर्च. याची बहुधा पुर्नबांधणी झाली असावी. ही त्याच चर्चची मागील बाजू. पारशांची विहीर बुजवली असली तरी एशियाटिक सोसायटी समोरील ही १८७३ साली बांधलेली विहीर वापरात आहे. तिच्यावरची कोनशिला: तिथेच असलेला हंडा: यानंतर एशियाटिकसमोर काळाघोडा संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. ऐकू येणार्‍या तबल्यावरच्या खड्या बोलांनी जागीच थांबवलं. तालबद्ध लयीत सहजगत्या एकेक बोल लीलया निघत होते. माईक टेस्टिंगसाठी असा काही तुकडा वाजवला गेला की यंव रे यंव!! हाती थोडका वेळ असल्याने इच्छा असूनही काढता पाय घ्यावा लागला. मोडकांनी यांना नांव दिलंय, टिपकागद! मी कधी अशी होईन, माहित नाही!! निघताना मोडकांनी या फोटोंवरती कधी लिहितेयस असं विचारलं, आणि 'बंदा आणि खुर्दा' वाचल्याना मी आळस केल्याचं सार्थक झालं!! :-) (हे लेखन क्रमशः असावं हीच मनोमन इच्छा आहे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
12408 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

एक राहून गेलं. यजदानी

मस्त कलंदर
Wed, 02/15/2012 - 20:44 नवीन
एक राहून गेलं. यजदानी बेकरीसमोरच्या फोटोत दिसणारी चौथी व्यक्ती, रामदासांच्या ऑफिसमधले श्री. रघू सावंत यांचाही या सफरीत वाटा आहे. प्रत्येक ठिकाणी कुठून, कसा फोटो चांगला येईल याची माझ्याहून त्यांनाच अधिक काळजी होती. लोकांच्या गर्दीत, कुणाला बाजूला होण्याची विनंती करत प्रत्येक क्लिक चांगला यावा म्हणून त्यांची जाम धडपड चालली होती. ड्रॅगनशी लढणार्‍या पुरूषाचं भित्तीशिल्प आत आहे हे त्यांनीच सांगितलं, आणि "खूप वर जाऊ नकोस, खाली यावंसं वाटणार नाही. एवढाच फोटो काढून निघूयात" हे ही वर ठेवून दिलं.
  • Log in or register to post comments

झालं...!

श्रावण मोडक
Wed, 02/15/2012 - 20:45 नवीन
झालं? फोटो काढले, काम झालं? लिही, त्यांनी सांगितलेली स्टोरी सगळी.
  • Log in or register to post comments

हेच मनात आलं.रामदासांनी

गणपा
Wed, 02/15/2012 - 20:58 नवीन
हेच मनात आलं. रामदासांनी नक्कीच इतिहास वर्णन केला असणार नी ही बया निव्वळ फोटोंवर बोळवण करतेय. इ ना चॉलबे. माहितीही येउद्या संगटीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मी तुला व्य. नि.तून

रेवती
Wed, 02/15/2012 - 20:48 नवीन
मी तुला व्य. नि.तून लिहिण्याबद्दल विचारणारच होते. सगळी छायाचित्रे छान. एचेसबीसी ब्यांकेची इमारत फारच आवडली. क्रोमाचीही मस्त आहे.
  • Log in or register to post comments

सेंट्रल बस स्टेशन समोर

वपाडाव
Wed, 02/15/2012 - 21:21 नवीन
एचेसबीसी ब्यांकेची इमारत फारच आवडली. क्रोमाचीही मस्त आहे.
आज्जे... याच प्रकारची एक बिल्डिंग/इमारत/चाळ सेंट्रल बस स्टेशनच्या समोर आहे. हुंबैकरांनी प्रकाश टाकावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

इ है मुंबई नगरिया!

पैसा
Wed, 02/15/2012 - 20:50 नवीन
मस्त मस्त मस्त गो! या मुंबईच्या दर्शनासाठी ट्रेनच्या कितीही "सफरी" करायची तयारी आहे! विहिरी बुजवून टाकायचा सर्कारी प्रोग्राम मात्र आपल्याला नाय आवडला. :(
  • Log in or register to post comments

वर्णन/स्टोरी येऊ द्या अजून

प्रभो
Wed, 02/15/2012 - 20:50 नवीन
ह्म्म्म...मकमावशे, कधी गेलेलात म्हणे? वर्णन/स्टोरी येऊ द्या अजून श्रामोंनी म्हटल्याप्रमाणे.
  • Log in or register to post comments

टाकलीत काडी?? आता क्रमशः

अन्या दातार
Wed, 02/15/2012 - 21:09 नवीन
टाकलीत काडी?? आता क्रमशः सीरिजमधले खेळाडू होऊ नका. जाता जाता: पारशी अग्यारीबद्दल कुणी सांगेल काय? काही फोटोज आहेत माझ्याकडचे. ते याच धाग्यात डकवू कि वेगळा धागा काढू??
  • Log in or register to post comments

मस्त कलन्दर'जी... खूप मस्त

मृगनयनी
Wed, 02/15/2012 - 21:43 नवीन
मस्त कलन्दर'जी... खूप मस्त !!!!! तिथल्या मस्का पावची आठवण करून दिल्याबद्दल शतशः आभार्र!!!! लक्ष्मी मातेची रक्तकमळातली उभी मूर्ती देखील खूप सुन्दर.. पवित्र!!!! :) फोर्ट एरिया' तल्या ब्रिटीशकालीन स्मृती टिपल्याबद्दल धन्यु!!! एक विचारणा:- इथल्या पारशी विहिरीचा उपयोग अजूनही त्या समाजातल्या मृतांच्या अन्त्यसन्स्कारासाठी होतो का? की ती विहीर अशीच पडीक बिनकामाची झालीये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ही

रामदास
Wed, 02/15/2012 - 22:00 नवीन
पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. तुम्ही म्हणता ती विहीर डुंगरशी वाडी म्हणजे मलबार हिल वर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ही पिण्याच्या पाण्याची विहीर

मृगनयनी
Wed, 02/15/2012 - 22:08 नवीन
ही पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. तुम्ही म्हणता ती विहीर डुंगरशी वाडी म्हणजे मलबार हिल वर आहे.
अस्सं. अस्सं... मला वाटलं... ही 'पारश्यांची" विहीर.. म्हणजे.. "तशी" आहे!!! ;) बाकी मुम्बईला पारशी'ज जास्त असल्याने "तश्या" विहिरीदेखील मलबार हिलव्यतिरिक्त इतर असतीलच ना!!!.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हेरीटेज वॉक आवडला. आता जायलाच

प्रचेतस
Wed, 02/15/2012 - 21:44 नवीन
हेरीटेज वॉक आवडला. आता जायलाच पाहिजे परत अनुभवायला.
  • Log in or register to post comments

निसतेच फटू??? ष्टोरी कुट्टे

प्राजु
Wed, 02/15/2012 - 21:58 नवीन
निसतेच फटू??? ष्टोरी कुट्टे गं बाय??
  • Log in or register to post comments

पारशी अग्यारीवरून सुरुवात करतो.

रामदास
Wed, 02/15/2012 - 21:58 नवीन
पारशी समाज मुंबईत फोर्ट आणि आसपासच्या भागातील रहीवासी असल्याने फोर्टमध्ये बर्‍याच ठिकाणी अग्यार्‍या आहेत. त्यापैकी मेट्रोजवळ-पारशी डेअरी समोर एक मोठी अग्यारी आहे. त्यानंतर दादाभाई नौरोजी रस्त्यावर दोन आणि पीएम रोड आणि बोराबाजारात एकेक अशा अग्यार्‍या आहेत. प्रत्येक अग्यारीसोबत एक सुखडीचे म्हणजे चंदनांच्या झिलप्यांचे एक दुकान असतेच. मी बराच वशीला लावून बघीतला पण अजूनही अग्यारीच्या आत जाता आले नाही. ह्या अग्यारीच्या बाहेर अनेक सुंदर शिल्पे बघायला मिळतात. मकताईनी जो विहीरीचा फोटो डकवला आहे तो बोरा बाजारातल्या अग्यारीच्या समोरचा आहे. मकताईच्या इतर फोटोत थोडी भर घालतो. पहीला फोटो रहीमतुल्ला मॅन्शनचा आहे. या इमारतीच्या बाजूला बीएनपी पारीबाची फेमस फ्रेंच बँक बिल्डींग आहे. त्यानंतरचा फोटो ग्रेशमचा आहे. फोटोत जेथे स्टेट बँक दिसते तेथे आधी ग्रिंडलेज बॅक होती. (या बॅंकेत मी काय केले ते दलाल स्ट्रीटच्या सहाव्या धाग्यात आहे.)मार्शल बिल्डींग समोरच्या कोनात आहे. हाँगकाँग बॅक जेथे दिसते ती इमारत आधी ब्रिटीश बॅंक ऑफ मिडल इस्टची होती. त्याच्या बाजूला आहे ते ब्रॅडी हाऊस. एलफिस्टन बिल्डींग आणि एलफिस्टन सर्कल अशा या सगळ्या इमारती हॉर्नीमन सर्कलच्या सभोवताली आहेत. या सगळ्या इमारती अजूनही बर्‍याचशा चांगल्या अवस्थेत आहेत याचे कारण म्हणजे सेव्ह बॉंम्बे नावाच्या संस्थेने अथक प्रयत्न करून या इमारती हेरीटेज म्हणून जतन करण्याचे आदेश सरकारतर्फे करवले आहेत. त्यामुळे टाईम्स ऑफ इंडीयाच्या इमारतीपासून जवळ जवळ एक मैलाच्या परीसरातल्या बर्‍याचशा इमारतींवरचे जाहीरात फलक काढले गेले आहेत. दुरुस्ती करण्यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयमच्या कस्टोडीयनची परवानगी घ्यावी लागते. प्रेमरतन व्होरा नावाच्या गृहस्थांनी या कामात मोलाची भर घातली आहे. उद्या आणखी माहीती विहीरींबद्दल टाकतो.
  • Log in or register to post comments

हां, लिहा, आम्ही वाट पाहतो.

रेवती
गुरुवार, 02/16/2012 - 03:01 नवीन
हां, लिहा, आम्ही वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

नंदन
गुरुवार, 02/16/2012 - 06:21 नवीन
हां, लिहा, आम्ही वाट पाहतो.
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+ २

मेघवेडा
गुरुवार, 02/16/2012 - 18:46 नवीन
लवकर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

विहीरी

रामदास
Fri, 02/17/2012 - 11:20 नवीन
माझ्या बघण्यात ज्या विहीरी आहेत त्यापैकी महत्वाची म्हणजे भुखा बेहेरामची विहीर. पारशी लोकांची पवित्र विहीर असल्याने विहीर अजूनही वापरात आहे. समुद्र किनार्‍यापासून जेमतेम अर्ध्या मैलावर असूनही पाणी गोड आहे. बिझीबींच्या अनेक लेखात या विहीरीचा उल्लेख आहे. राजाबाई टॉवरच्या (मुंबई विद्यापिठ) तळाशी एक अशीच विहीर आहे जी अजूनही वापरात आहे. फार पूर्वीपासून *गुडघ्यापर्यंत धोतर नेसणारे मारवाडी आणि गुजराती ब्राह्मण* लाकडी व्हॅटमधून पाणी फेरीवाल्यांना पुरवायचे. एक विहीर बॅकबेला राम महल (गोविंदराव तळवलकर राहतात ती इमारत) समोर होती. रस्त्याच्या मधोमध असल्याने बुजवली गेली. विहीरीच्या जागी आता एक हिरवळीचे बेट आहे. कुलाब्यात अनेक विहीरी होत्या पण आता एकही दिसत नाही. व्हिटी स्टेशन समोर मल्होत्रा हाउसच्या आतल्या चौकात एक मोठी विहीर आहे. बाकी माहीती मकताईंच्या लेखात आली आहेच. * आखूड धोतर नेसणारे आणि लांब धोतर नेसणारे अशी ब्राह्मणातली वर्गवारी अजूनही गुजराथी समाजात आहे. आखूड धोतीवाले पाणके आणि सैपाकी आणि लांब धोतरवाले हुच्चभ्रू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

सीटीओ....

कुंदन
Wed, 02/15/2012 - 22:17 नवीन
सीटीओच्या इतक्या जवळ गेल्ता होय? अन मग तिथला वडापाव बद्दल काहीच उल्लेख नाही. :-( अजुनही मिळतात का हो काका तिथे वडापाव ?
  • Log in or register to post comments

वडापाव

रामदास
Fri, 02/17/2012 - 11:22 नवीन
अजूनही मिळतो . त्याच तिखट चवीचा आणि भरपूर कोथींबीर घातलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

_/\_ मला माझ्याच गावाची सफर

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/15/2012 - 22:56 नवीन
_/\_ मला माझ्याच गावाची सफर घडली! हा भाग अक्षरशः पालथा घातलाय एके काळी! दिवसचे दिवस भटकलो आहे या भागात. अक्षरशः पडिक. या सगळ्याच इमारती बघितल्याही आहेत. सोनेरी दिवस होते ते. पण आज त्या सोन्याला परत झळाळी चढली. रामदासांमुळे. नवीन ओळख घडली माझ्याच गावाची. रामदास / मकी, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिनी युरोप

स्मिता.
गुरुवार, 02/16/2012 - 00:03 नवीन
मके, फोटो मस्तच पण सोबतच वर्णन त्रोटक झालंय... जरा टायपायचा आळस दूर कर ;) मुंबईमधे फारच कमी वेळा जाणं झालंय आणि त्यामु़ळेच तिथल्या भागांची जास्त माहिती नाहिच. पण हे फोटो बघून फोर्ट भाग मिनी युरोप असल्यासारखं वाटतंय :) HSBC ची इमारत तर अगदी इथल्या HSBC च्या इमारतीसारखीच दिसतेय आणि चर्चची मागची बाजूसुद्धा! रामदास काका / श्रामो / मकी, कुणीतरी या भागाच्या इतिहासावर लेख येवू द्या.
  • Log in or register to post comments

महाजनो येन गत: स पन्था

नंदन
गुरुवार, 02/16/2012 - 06:20 नवीन
रामदासांबरोबर मुंबैची सैर (उपनगरातले लोक अजूनही खाडीपलीकडे जाताना 'मुंबैला चाललो'च म्हणतात) हे म्हणजे (पुलंची उपमा उसनी घेऊन सांगायचं तर) जवळजवळ डायरेक्ट कृष्णाच्या* तोंडून गीता ऐकण्यासारखंच :). पूर्वी नवलकरांचे लेख वाचून जसं मुंबैतल्या परिचित जागांबद्दल नव्याने माहिती मिळायची, तेच बिवलकरांच्या लेखांबद्दलही म्हणावे लागेल. बाकी याझदानी बेकरीचे फोटू पाहून अं.ह. झालो. मावा केकचे फोटू न टाकल्याबद्दल मकामावशींचे (आणि त्यांना 'ब्रिटानिया'त न घेऊन गेल्याबद्दल रामदासांचे आभार - नाही तर इनोचा स्टॉक कमी पडला असता :)). *किंवा द्वारकानाथ
  • Log in or register to post comments

छान पण ही तर फोर्टची उडती झलक

दीपा माने
गुरुवार, 02/16/2012 - 07:20 नवीन
छान पण ही तर फोर्टची उडती झलक झाली. आमची कॉलेजेस आणि युनिव्हरसिटी, पीड्ब्युडीची इमारत, स्कुल ऑफ आरकीटेक्चर आणि इतर बर्‍याच सुंदर इमारती आणि स्मारकं तुमच्या सुंदर फोटोग्राफीची शिवाय राहीली आहेत. भारतात गेल्यावर फोर्टमधली फेरी न चुकता केवळ जुन्या आठवणींसाठीच असते. जुन्या आठवणी आल्या म्हणुन लिहीते, कॉलेजला असताना उपवासाच्या दिवशी फोर्ट मधल्या केळकर उपहारगृहातला साबुदाणा वडा आणि इतर दिवशी हायकोर्टाच्या इमारतीजवळच्या मिल्कबार मधल्या खिमा पॅटिसची चव अजुन आठवते. आता ही दोन्हीही ठिकाणं त्यांच्या पुर्वीच्या ठिकाणी नव्हती. परंतु ह्या किल्यांसारख्या अजस्र इमारतींना मरण नाही. आणखी फोटो आणि दुर्मिळ माहीती येत राहो.
  • Log in or register to post comments

केळकर उपहारगृहातला साबुदाणा वडा

रामदास
Fri, 02/17/2012 - 11:08 नवीन
आता मिळणार नाही. केळकरांचे हॉटेल बंद होऊन आता चार पाच वर्षे झाली. मालकांची उदासीनता हे एक मुख्य कारण . फोर्टमधे सगळ्यात मोठी जागा केळकरांची होती. आता ती जागा विक्रीस काढली आहे पण काही वितुष्टामुळे विकली जात नाही आहे. मराठी माणसाचे दुसरे फेमस हॉटेल व्हीटी स्टेशनसमोर आहे ते तांब्यांचे . त्यांनी वडा पावाचा वेगळा काउंटर सुरु केला आहे. बोरा बाजारात पूर्वी ताले यांचे विश्रांतीगृह होते. ताल्यांकडे बटाटवडा फार सुंदर मिळायचा . बेडेकर अजूनही आपले दुकान टिकवून आहेत. त्यांच्या कडे गुरुवारी (फक्त गुरुवारीच मिळेल) मिळणारा साबुदाणा वडा म्हणजे उपास करण्याचे सबळ कारण आहे. इतर दिवशी गुलकंदांच्या वड्या आणायला म्हणून जावे आणि ब्यांकेत आणि सरकारी नोकरीत असणारी आपली एखादी जुनी मैत्रीण भेटते का ते बघावे इतकेच स्थानमहात्म्य. हाय कोर्टाच्या बाजूला म्हणजे वॉटसन हॉटेलच्या बाजूला इराणी आहे तेथे तुम्ही म्हणता तो खिमा मिळतो. या वॉटसन हॉटेलमध्ये पहील्यांदा चलत चित्रपट दाखवला गेला. ह्याच हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे जमसेटजी टाटांनी ताजची निर्मीती केली असे म्हणतात. या बिल्डींगचे वैशिष्ट्य असे की बिम आणि कॉलम मध्ये सिमेंटचा वापर न करता केवळ पोलादी सांगाड्यावर ही इमारत बांधली गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

धन्स मकीकाकू, श्रा. मों.च्या

प्यारे१
गुरुवार, 02/16/2012 - 09:47 नवीन
धन्स मकीकाकू, श्रा. मों.च्या लेखावर रामदासकाकांची पोतडी म्हणालो ते काही खोटं नाहीये....! कुणीतरी म्हटल्याप्रमाणं प्रत्येक माणसामध्ये असलेलं लहान मूल त्याचं कुतूहल जागं ठेवत असतं. प्रत्येक गोष्टीमागचा इतिहास जाणून घ्यायची ओढ असते पण ती दबली जाते, दबवली जाते. काय करायच्यात नस्त्या चौकश्या? चला पळा, वेळ कमी पडतोय, ऑफिस गाठायचंय, घर गाठायचंय, पैसा मिळवायचाय ... इ.इ. एक ना अनेक गोष्टी. या कुतरओढीत सगळं संपतं. काही थोडेच लोक्स हे सगळं जाणून भूतकाळ नुसता जाणूनच घेत नाहीत तर तो जपतात देखील आणि नुसता जपत नाहीत लोकांसमोर पेश करतात एखाद्या जादुगारासारखा. रामदास काका त्या फार थोड्या लोकांतलेच एक. येर्‍हवी कबूतर किंवा ससा आपण बघतोच की, जादुगाराच्या टोपीतून आला की वेगळा वाटतो ना? तस्संच आहे हे प्रकरण!
  • Log in or register to post comments

मुंबई दर्शन मधे हे सगळे

अमोल केळकर
गुरुवार, 02/16/2012 - 09:53 नवीन
मुंबई दर्शन मधे हे सगळे दाखवतात क ? :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

रामदासांचं लेखन जसं निगुतीनं

मस्त कलंदर
गुरुवार, 02/16/2012 - 11:38 नवीन
रामदासांचं लेखन जसं निगुतीनं वाचायचं, तसंच त्यांच्याबरोबर फिरताना हे बघायचंय, ते पण बघायचंय अशी घाई उपयोगाची नाही. प्रत्येक इमारतीसमोर उभं राहाय्चं, गोष्ट ऐकायची, त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी शेंगदाणे खायचे, ताक प्यायचं, खारी-केक-बन मस्का खायचा आणि त्यांच्या सोबत आपण फक्त चालायचं. सगळी सूत्रं त्यांच्या हाती द्यायची. आम्ही फक्त निळ्या शाईनं रंगवलेला भाग फिरलो. Image removed. नकाशातला न रंगवलेला भागही असाच कधीमधी रंगून निघावा याच इच्छेने मी हे लेखन क्रमशः असावं म्हणतेय. बाकी इमारतींच्या कहाण्या मला जितक्या आठवताहेत त्या श्रामोंनी आधीच लिहिल्यात. तेव्हा हे सगळं रामदासांकडूनच ऐकण्यात खरी मजा आहे.
  • Log in or register to post comments

सिद्ध

श्रावण मोडक
गुरुवार, 02/16/2012 - 11:51 नवीन
इमारतींच्या कहाण्या मला जितक्या आठवताहेत त्या श्रामोंनी आधीच लिहिल्यात.
पुराव्यानिशी सिद्ध कर, सिद्ध होत नसल्यास लिहायला लाग. मी काय लिहू शकत नाही हे मला माहिती आहे. त्यामुळं मी त्या विषयात पडलोच नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

छान ! आयुष्यातील काही

गणेशा
गुरुवार, 02/16/2012 - 15:53 नवीन
छान ! आयुष्यातील काही दिवस/वर्ष या भागात घालवल्याने, त्या घटनेनांही उजाळा मिळाला .. धन्यवाद .. बोराबाजार मधील ती विहीर .. मला वाटते अजुन ही काहीतरी आहे तेथे थोडेसे आधी.. एकदम लक्षात येत नाहिये.. पुढील लेखनाला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

वा वा!

चतुरंग
गुरुवार, 02/16/2012 - 18:44 नवीन
या इमारतींचा इतिहास रामदासांकडून ऐकणं म्हणजे 'हरितात्यां'कडून शिवाजीचा इतिहास ऐकण्यासारखंच आहे! :) (पुराव्यानं शाबीत) रंगा
  • Log in or register to post comments

उगाच वाकडा रिप्लाय देवून

गणेशा
Fri, 02/17/2012 - 12:59 नवीन
उगाच वाकडा रिप्लाय देवून नक्कीच वाद करायचा नाही, पण येथे ( मिपावर) बर्याच दा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आढळतो आणि त्यामुळे खुप वाईट वाटते.. उदा. रामदासांकडून : आदरार्थी हरितात्यांकडून : आदरार्थी शिवाजीचा : ??? शिवाजींचा किंवा शिवाजी महाराजांचा असे लिहिण्यास काय हरकत असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/16/2012 - 22:04 नवीन
छान. रामदास साहेबांबरोबर मुंबै फिरायचा योग कधी येईल कोणास ठाऊक........! आमचे मित्र सहजराव यांनी अशाच काही इमारतीचा दुवा दिला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा वा वा

धनंजय
Fri, 02/17/2012 - 00:52 नवीन
वा वा वा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रा
Fri, 02/17/2012 - 04:29 नवीन
छान वृत्तांत. नॉस्टाल्जिक व्हायला झाले.
  • Log in or register to post comments

खजिना आहे हा खजिना...

गवि
Fri, 02/17/2012 - 13:23 नवीन
खजिना आहे हा खजिना... रामदासकाकांसोबत पहायला मिळणं म्हणजे उत्तम नशीबच.. इथे मुंबईत रोजच्या येण्याजाण्यात दिसणार्‍या या इमारती.. पण मान वर करुन खांद्याच्या पातळीच्या वरचं काही बघायला कोणाला वेळ आणि सुकून नसतो.. अद्भुत आहे हे सगळं... याझदानीची तर क्या बात.. लुसलुशीत ताजे बन लोणी फासून गरमागरम चहात बुडवून खावेत तर तिथेच... आता तिथे परत जाणं आलं... धाग्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

व्वा!!

प्रदीप
Fri, 02/17/2012 - 20:08 नवीन
माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावरील चांगला लेख, व प्रतिसादांतून रामदासांची माहितीपूर्ण टिपण्णी, दोन्ही आवडले. ही परिक्रमा हॉर्निमन सर्कलच्या परिसरात झाली आहे. आता ती डी. एन. रोड, पी. एम. रोड, व त्याच्या उत्तरेस (टाईम्स, जे. जे; व्ही. टी)., तसेच पश्चिमेलाही इंस्टिट्यूट ऑफ सायन्स इ. कडे सरकूदे. मग त्यात अनेकानेक छान बिल्डींग्स येतील, त्यांच्यावरील माहिती येईल. वाट पहातोय. काही वर्षांपूर्वी मटातून कुणीतरी माहितगार (बहुधा अरूण टिकेकर असावेत) मुंबईतील काही अनवट स्थळांविषयी सुंदर माहिती देणारे सदर चालवायचे. सध्या लोकसत्तेच्या पुरवणीतून अरूण पुराणिक हेही मुंबईच्या इतिहासाविषयी एक सदर चालवीत आहेत. सध्या मी एका पूर्वी ब्रिटीश वसाहत असलेल्या शहरात रहातो. अर्थात येथे अशाच अनेक वास्तू आहेत, व कुठल्याही संवेदनशील, विकासीत देशात होते त्याप्रमाणे ह्या वास्तूंची व्यवस्थित निगा राखली जाते; त्यात ऑफिसेस, रेस्टॉररंट्स वगैरे अनेक आस्थापने असतात तरीही त्या बकाल होऊ दिल्या जात नाहीत. आपल्या येथेही असा प्रयत्न आता केला जात आहे, हे वाचून बरे वाटले. कधीमधी मुंबईस जाणे झाले की हमखास वेळात वेळ काढून फोर्टात फेरी मारणे होतेच. तो आनंद वेगळाच आहे. त्याच्या तुलनेत खास आपण डेव्हलप केलेले नरिमन पाँईंट व बॅक बे वगैरे भाग तद्दन बकाल वाटतात.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Fri, 02/17/2012 - 20:24 नवीन
कधीमधी मुंबईस जाणे झाले की हमखास वेळात वेळ काढून फोर्टात फेरी मारणे होतेच. तो आनंद वेगळाच आहे. त्याच्या तुलनेत खास आपण डेव्हलप केलेले नरिमन पाँईंट व बॅक बे वगैरे भाग तद्दन बकाल वाटतात.
अगदी अगदी! मुंबैत (नंदन म्हणतो तसं केवळ खालीपलिकडेच) आजवर कित्येक वेळा हुंदडलोय, निरुद्देश भटकलोय. पण मके, तुम्हां सर्वांचा हेवा वाटतो आहे. :) नंदनच्याही शब्दाशब्दाशी सहमत आहे. यजदानीचा केवळ बाहेरूनच फोटो काढल्याबद्दल खूप धन्यवाद मके! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

छान माहिती

जाई.
Sat, 02/18/2012 - 00:05 नवीन
या भागातून अनेक वेळा जाण झालय पण हे माहित नव्हतं आता पुढच्या वेळी जाताना हा परिसर जीवंत वाटेल
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सर्वसाक्षी
Mon, 02/20/2012 - 10:28 नवीन
घडविलेल्या चित्रप्रवासासाठी आभार! पुढील खेपेसाठी रामदासशेठ कडे नंबर लावला आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा