महाभारतामधे एक संदर्भ सापडतो कि कौरवांशी युद्ध करण्यासाठी अर्जुन स्वतःची शक्ती वाढवण्याकरिता इंद्रदेवाच्या आमंत्रणानुसार दिव्यास्त्रांचे सखोल ज्ञान घेण्यासाठी इंद्रपुरीत गेला होता. तेथे उर्वशीचा स्वीकार न केल्यामुळे तिने अर्जुनाला शाप दिला होता की, एक वर्ष तू षंढ होशील. यावर 'बस्स एकच वर्ष?' असं म्हणत अर्जुन छद्मी हसला होता. मात्र तो शाप पुढे खरा ठरला. अज्ञातवासाचे वर्ष कुठे काढावे, ह्या जटिल प्रश्नावर यमधर्माने प्रत्यक्ष दर्शन देऊन पांडवांना आदेश दिला की, विराट राजाच्या नगरीत अज्ञातवास करा, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
अर्जुनाने 'बृहन्नडा' हे नाव धारण करत स्त्रीवेशात विराट राजाच्या नृत्यशाळेत राजकुलातील कन्यांना नृत्यगीत शिकवत राहिला. ओळख लपवणं ही अर्जुनाचीही त्यावेळची गरज होती. किन्नर म्हणून समाज आणि राजदरबारात वावरतांना त्याला खूप क्लेश झाल्याचे उल्लेख महाभारतात कुठे आढळत नाहीत. इनफॅक्ट राजदरबारी मानाची आचार्याची नोकरी आणि यथा राजा तथा प्रजा न्यायाने प्रजेतही सन्मान बाळगून होता. अर्जुन ते सोंग अगदी आनंदाने करत होता, कारण त्याला खात्री होती हे सगळं फक्त एकच वर्ष भोगायचं आहे, त्यापश्चात फक्त सुख आणि सुखच.
मात्र असाच शाप जर एखाद्याला तू यापुढे कायम षंढ राहशील असा मिळाला तर आनंद होईल? स्वतःची 'बृहन्नडा' ओळख लपवायची नसल्यास खरेपणाबद्दल नातलग पाठीशी उभे रहातील? समाज त्यांना स्वीकारून बरोबरीने वागवेल? उत्तर नाही असंच येईल. निरोगी समाजात मिसळण्याचा न्यूनगंड, निसर्गाने केलेल्या अन्यायाचं शल्य, समाजाकडून होणारे खच्चीकरण, डावलले जाणारे न्याय्य हक्क, होणाऱ्या मानसिक कोंडमार्यामुळे आलेले वैफल्य अश्या दुष्टचक्रात ज्ञात असलेले जवळपास ५ लाख आणि अगणित अज्ञात भारतीय आजमितीस अडकलेले आहेत. पण यात काही अपवाद असतात जे स्वतःच्या स्त्रीकायेचा आनंद व्यक्त करतात, सत्याचा स्वीकार करून स्वतःची ओळख जगापुढे मांडतात, संघर्ष करून स्वतःबरोबर आपल्या समदुःखी बांधवांनाही हक्क मिळवून देण्याचा, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात. "गौरी सावंत" ही त्यातील एक.
पांडवांचा "वनवास-अज्ञातवास-युद्ध आणि मग राज्याभिषेक" हा क्रम थोडासा बदलून "अज्ञातवास-वनवास-युद्ध आणि मग राज्याभिषेक" असा केल्यास ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्ट गौरी सावंत हिचा एकूण प्रवास सांगता येईल.
अज्ञातवास
हा अज्ञातवास खरं तिघांचाही होता/आहे. तिघे म्हणजे, गौरीचा स्वतःचा आयमीन तिला स्वतःतल्या स्त्रीत्वाची जाणीव होईपर्यंतचा काळ, सावंत-देसाई घराण्यांचा आणि वाचक या नात्याने तुमचा स्वतःचाही. आपण एखादी संघर्षमय बायोग्राफी वाचतो त्यात बरेचदा "घरच्यांनी हाकलून दिलं" असं एखादं वाक्य वाचलं की आपण घरच्यांबद्दल एक नकारात्मक प्रतिमा बनवतो, पांढरी साडी काळ्या बॉर्डरमुळेच उठून दिसते वगैरे मतं बनवतो, घरच्यांनीच जिथे झिडकारलं तिथे इतर समाजाने दिलेली वागणूक क्षम्य ठरते. पण हे घरचे कोण? का केलं असावं? याबद्दल सदर लेखात माहिती लिहिणं अप्रस्तुत होणार नाही किंबहुना स्वतःच्या हिमतीवर उभं राहणं आणि एक अॅक्टिविस्ट म्हणून मनात सेवाभाव उत्पन्न होण्यात सावंत-देसाई घराण्याचं सळसळणारं रक्त असावं असं माझं मत आहे. त्यामुळे गौरीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना होणाऱ्या अवांतराचा धोका मी पत्करून ती लिहितो. मी स्वतःही त्या कुटुंबातील एक भाग आहे हे विशेष.
छबी आत्या आणि सुरेश काका.. आम्हा सावंत-देसाई कुटुंबियातील प्रत्येकाला हेवा वाटावा असं एकमेकांना अनुरूप असलेलं सुखवस्तू जोडपं. काका डॅशिंग पोलीस सब-इन्स्पेक्टर तर प्रसन्न चेहऱ्याची आत्या हाऊसवाईफ. तीन चुणचुणीत मुलं आणि जोडीला सावंत-देसाई कुटुंबियांत आणि एकूण पंचक्रोशीत असलेला प्रचंड आदर जो पुढे जाऊन एक ओझं बनला. गौरी ज्या सावंत-देसाई आडनावाला रिप्रेझेन्ट करते त्याच्या महतीसाठी आमच्या आजोबांपासून सुरवात करावी लागेल. इंग्रजांच्या काळात पोलीस खात्यात असलेले आजोबा पुढे जमीनदारी आणि राजकारण करत रत्नागिरीचे उप-सभापती म्हणून नावारूपाला आले होते. आपल्या सगळ्या मुलींना तोडीचे जावई, मुलांना बसून खाल्लं तरी पुरेल इतकी प्रॉपर्टी आणि नातवंडांना खोत घराण्याचा जाज्वल्य अभिमान देऊन गेले होते. या घराण्यात फोरमन ग्रेडच्या खाली कुणीच नाही.. अर्धेअधिक पोलिसांत, सैन्यात, राजकारणात नाहीतर व्यवसायात, जवळपास सगळेच यशस्वी. इनफॅक्ट ज्यांनी गुंडगिरी आणि स्मगलिंग केली त्यांनीही नाव काढलं. सलूनमध्ये नाव्ह्याला दुसरा कट अगोदर नाही सांगितला तर तो बायडिफॉल्ट मिल्ट्री कट मारणार हे निश्चित. अश्या कुटुंबियांच्या समारंभात कायम शौर्याच्याच चर्चा झडायच्या. गुणसूत्रांच्या सदोष विभागणीमुळे होणारे टर्नर सिंड्रोम, क्लाईनफेल्टर सिंड्रोम असे दोष यांवर चर्चा केवळ अशक्य.
आपला जावई पोलिसातीलच असावा असा मानस असलेले सुरेशकाका आपल्या दोन मुलांच्याही बाबतीत त्यांनी पोलीस किंवा सैन्यात जावं यासाठी आग्रही होते. तसे संस्कार, ट्रेनिंग आणि खुराकही चालू होता. मोठा तर शरीर सौष्ठव स्पर्धेत नावही कमवत होता. "गौरी" म्हणजे पूर्वाश्रमीचा "गणेश" हे शेंडेफळ. इतर भावंडं वडिलांचा युनिफॉर्म घालून चोर-पोलीस खेळ खेळायचे त्या वयात गणेश आईची साडी घालून आरशासमोर रमू लागला. सुरवातीला दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र पुढेपुढे कॉन्व्हेंट शाळेच्या कोळी डान्समध्ये शिक्षकांनी तू कोळीण हो असं स्वतःहून सुचवणं यात गणेशची बायल्या म्हणून वाढत चाललेली ओळख आत्या आणि काकांच्या काळजीत भर घालत होती. सुरवातीला कौतुकाने घेतलेले मुलीसारखं वागणं पुढे पुढे राग, चिंता आणि त्रागाचं कारण बनलं.
ऐंशीच्या दशकात "गणपत पाटील" हे नाव काही आदराने घेतलं जात नव्हतं. चिडवले जाण्याऱ्या प्रत्येक क्षणाचा घाव दोघांवरही होत होता. घुसमट दोघांचीही होत होती. नैसर्गिक बदलापुढे गणेश हतबल होता तर अब्रू जाईल या भीतीने घरचे हतबल होते. नैसर्गिक बदल प्रथम पोलिसी टाचांखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक रोपट्याला कापून एकसारखी दिसणारी झुडपे करायच्या प्रयत्नात मातृप्रेमामुळे काही रोपे सुटतात. ही रोपे हवी तशी वेडीवाकडी वाढत जातात. अनेक फांद्यांनी पसरतात. सुरुवातीला वेडेवाकडे वाटणारे असे झाड नंतर काही वर्षांनी मात्र त्याच्या त्या वेगळेपणामुळेच लोकांचे लक्ष वेधून घेते, असंच काहीसं गणेशच्या बाबतीत झालं. पुण्याहून मुंबईत नोकरीत आणि गणेशच्या शाळा-कॉलेजांत बदल करवून घेऊनही परिस्थितीत फरक पडत नव्हता. त्या चिंतेने असेल कदाचित, आत्या हार्टअटॅकने गेली. गणेश ९-१० वर्षांचा असेल कदाचित. कोलमडलेले काका मला अजूनही आठवताहेत. गणेशमध्ये होणारे बदल, पौंगडावस्थेत येणारा बंडखोरपणा, लोकलज्जेमुळे अगतिक झालेले वडील, पोलिसी विचारसरणी या सगळ्यांचा परिपाक एके दिवशी गणेशला घराबाहेर काढण्यात झाला.. अगदी कायमचा. आमच्या निरोगी सावंत-देसाई कुटुंबात गणेशला कोणतंही स्थान नव्हतं. "किन्नर" म्हणजे फक्त हार्मोनल मिस मॅच आहे. यात त्या जीवाची काहीही चूक नाहीये हे समजून घेण्याची प्रगल्भता आमच्या कुटुंबियांत नव्हती. गणेशला एकानेही मदतीचा हात दिला नाही की त्याचं पुढे काय झालं हे जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. आमच्यासाठी तो अज्ञातवासात गेला आणि समाजासाठी त्याचा "गे" अज्ञातवास संपला होता.
वनवास
"मी" च्या शोधात घराबाहेर पडलेला गणेश आपण कोणत्या वाटेने गेल्यावर त्याला हवा असलेला “मी” समजेलच हे न कळून निरुद्देश भरकटण्याचे चान्सेस जास्त होते. तसं पहाता हा काळ स्वातंत्र्य उपभोगण्याचा होता. पण डोक्यावर छप्पर नाही, हातात पैसे नाही, निरोगी समाजात सामावून घेतले जाण्याची शक्यता नाही, नाकारले गेलेले सामाजिक हक्क आणि बापट म्हणून होणारी अवहेलना यातून आत्महत्या करू न शकणारे टिकून रहाण्यासाठी एकतर रस्त्यावर पथारी पसरून भीक मागून उदरनिर्वाह करतात किंवा हिजडा वस्तीत आश्रयाला जाऊन हिजडा बनून, देहविक्रय करत उदरनिर्वाह करण्याचा दुसरा मार्ग स्वीकारतात. हे दोनही मार्ग मान्य होण्याचे गणेशच्या रक्तात नव्हते.
एक संस्कृत वचन आहे की,
दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्त्व दर्शनम्।
दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना।।
नेमकी वाट न समजणाऱ्या अशा या अंधकारमय अवस्थेत आपल्याला “मी” चा मार्ग दाखवणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे “सद्गुरू”. मार्गात आलेल्या संकटांना तोंड द्यायला सक्षम आणि सिद्ध करणारा प्रत्येकाचा एक गुरु असतोच. मग तो भगवी वस्त्र घातलेला साधू असेल, एखादा शिक्षक असेल किंवा एखादा गे मित्रदेखील असू शकेल. घर सोडण्यापूर्वी गणेशने लपूनछपून मुंबई सेंट्रलच्या एमजी रोडवर जमवलेल्या गे मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून "अम्मा" उपाधी असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता. हे अम्मा म्हणजे प्रसिद्ध LGBTQ अॅक्टिविस्ट आणि 'हमसफर' ट्रस्टचे संस्थापक "अशोक राव कवी". ती रात्र गणेशने त्यांच्या घरीच काढली. याच अम्माने गणेशच्या निवाऱ्याचा प्रश्न आणि हमसफर ट्रस्टचं काम सोपवून पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवला. गणेशचं इंग्रजीवरील प्रभुत्व, झोकून काम करण्याची आवड आणि उत्तरोत्तर वाढत गेलेल्या कामातील सफाईदारपणामुळे गणेश अम्माचा लाडका सहकारी बनला.
आपल्या सामान्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या जगाच्या मॅपिंगचं काम गणेशकडे होतं. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत कोणत्या एरियात किती MSM (समलिंगी) किंवा हिजडे आहेत. कितीजण भीक मागतात आणि किती देहविक्रय करतात. अगदी कोणत्या मुतारीच्या जागी किती वाजता पिकअप पॉईंट असतात. सगळ्यांची नावं, गावं, पत्ता यांचा डाटाबेस बनवत असताना त्यांची दुःखं, समस्या, वैफल्य, मूलभूत हक्कांची वानवा याचीही नोंद गणेशच्या हृदयात होत होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याचं मनात घर करू लागलं. चांगल्या घरांतील हुशार पण गे मुलं समाजाने काहीच पर्याय न ठेवल्याने हिजडा बनून एकतर भीक किंवा देहविक्रय करत पत्र्यांच्या घरांत पाहताना यांचा वनवास कधीतरी संपला पाहिजे ही भावना गणेशच्या मनात रुजत होती. हा बदल नुसता विचारांत होत नव्हता तर शरीरातदेखील होत होता.
आपल्याकडे लीगल ऍग्रिमेंट पेपर्सवर साधारणपणे एक वाक्य असतं की "Hereinafter referred to as "Party X” तसं यापुढे लेखात "गणेश" हे नाव बदलून "गौरी" असं लिहीत जाईन. कारण हमसफर ट्रस्टचं काम करता-करता मधल्या काळात गणेशने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला, टेस्टिकल काढल्या, स्त्री हार्मोन्स वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या आणि पुढल्या तीन वर्षानी व्हॅजेनोप्लॅस्टी या मेडिकल सायन्सच्या आविष्काराने पूर्ण स्त्रीकाया असलेली गौरी झाला.
श्री दुर्गा सप्तशतीदेवीच्या एका माहात्म्यात एक ओळ आहे की,
"चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि"
या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे, गौरीला त्या काळात प्रारब्ध-नशीब मला फक्त निष्ठुर नाही तर "समरनिष्ठुर" भासायमान होत असे पण आता त्यातून पार पडल्यावर, कळते की मूळ गाभा हा कृपेचाच होता. जसं साडेसातीबद्दल ज्योतिषी म्हणतात, शनि माणसाला पराकोटीचे जेरीला आणतो पण त्याचे दोष जावेत, निदान कमी व्हावेत, जीवनात संतुलन यावे हाच हेतू त्यामागे असतो. NGO संस्थांचं विकेंद्रीकरण होऊन विशिष्ट विषयाला वाहिलेल्या जास्तीत जास्त मदत संस्था निघाव्यात या उद्देशाने अम्माने गौरीला स्वतःची संस्था काढण्याचा सल्ला दिला. दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु जसं शिष्याला उच्च पदावर नेतात आणि लागणारं सगळं पाठबळ पुरवतात तसं अम्माने गौरीला पुरवलं आणि "सखी चारचौघी" संस्था उदयाला आली.
युद्ध
सखी चारचौघी उदयास आल्यानंतर गौरीच्या संयमाचा, व्यवहार ज्ञानाचा, व्यक्ती-कौशल्याचा कस लागायला लागला. कारण एखाद्या संस्थेचा स्टाफ म्हणून काम करणं आणि एखादी संस्था स्वतः चालवणे यात जमीन अस्मानाचा फरक होता. सरकारदरबारी अवहेलना, सामाजिक बंधनं आणि याउपर संस्था ज्या पीडित तृतीयपंथीयांसाठी काढली होती ते स्वतः उदासीन होते. प्रलोभन दाखवून जमा करावं तर हाती पैसा असावा लागतो. बँकेत बसायला साधी खुर्चीही देत नव्हते तिथे आर्थिक पाठबळ फक्त उदार व्यक्तींच्या दान-धर्मावर अवलंबून होतं आणि ते पुरेसं नव्हतं. नाही म्हणायला NACO, MDACS, UNAIDS, DFID सारख्या संस्था होत्या पण त्यासाठी प्रोजेक्ट सादर करणं, डाटाबेस तयार करणं, संस्थेचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार करणं, काउंसेलर अपॉईंट करणं, ऑब्जेक्टिव्ह, व्हिजन, कायदेविषयक ज्ञान या सगळ्या गोष्टी धीराने, निश्चयाने त्यातील खाच-खळगे समजावून घेऊन करणं गौरीसाठी एखाद्या युद्धासमान होत्या. अर्थात ती जिंकली हे वेगळे सांगायला नको. गौरीला घडवण्यात INFOSEM (The India Network For Sexual Minorities) संस्थेचा मोठा हातभार लागला हे ती बरेचदा नमूद करते.
हिजड्यांसाठी फक्त विरंगुळ्याची आणि टीव्ही बघत आराम करायची जागा असं सुरुवातीला सखी चारचौघी ट्रस्टचं स्वरूप उत्तरोत्तर हिजड्यांचं समुपदेशन करणं, त्यांच्या समस्या, तंटे सोडवणे, HIV बद्दल जागरूकता पसरवणं असं होत-होत त्यांच्या मूलभूत न्याय्य हंक्कांसाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणारं हक्काचं माहेरघर झालं. हॉस्पिटलमधे या लोकांना नीट उपचार, वागणूक मिळावी, वॉर्डमध्ये एखादा बेड नाही निदान आडोसा तरी मिळावा यासाठी गौरीने कितीतरी इस्पितळांचे उंबरठे झिझवलेत.
एप्रिल २०१४, थर्ड जेंडर हि ओळख, त्यांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्या मूलभूत हक्कांना मान्यता देणारा सुप्रीमकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयासाठीची जनहित याचिका गौरी आणि तिची सहकारी मीरा हिने फाईल केली होती आणि निर्णय येईपर्यंत नेटाने लढवली. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या कितीतरी घटना यादरम्यान घडल्या पण त्या सगळ्यांना गौरी धाडसाने पुरून उरली. काही व्यक्तींमध्ये असा कमालीचा चिवटपणा कुठून येतो हे गूढच आहे.
राज्याभिषेक,
विक्सची
ट्रान्सजेंडर आईची जाहिरात बघितलीत का तुम्ही? मला वाटतं इतकी वर्षे गौरी वेगवेगळ्या मंचावर घसा फोडून जे सांगायचा प्रयत्न करतेय ते या तीन मिनिटांच्या जाहिरातीने न बोलता प्रभावीपणे पोहोचवले. की बाबांनो आम्हीही तुमच्यासारखीच हाडामासांची माणसं आहोत. नाही दिसायला सुंदर आम्ही पण आमच्या हृदयात निर्माण होणारी स्पंदनं, वेदना तुमच्यासारखीच पवित्र आणि अस्सल आहेत. गतिमंद, विकलांग, गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, रेपिस्ट, गुंड, मवाली या सगळ्यांना तुम्ही समाजात बरोबरोबरीने जगू देता. मात्र आमचा स्वतःचा कोणताही गुन्हा नसताना केवळ लिंग ठरवणारा अवयव बाद झाला म्हणून कस्पटासमान वागणूक देता. आमच्यातही हुशारी आहे. ती दाखवण्याची फक्त एक संधी द्या. तुमच्याबरोबर आम्हालाही काम करण्याची संधी द्या.
या जाहिरातीतून गौरीने समस्त ट्रॅन्सजेण्डर समाजाचा राज्याभिषेकच केलाय असं मला वाटतं. अर्थात अजून बराच पल्ला गाठायचा आहे. वृद्ध वेश्या आणि त्यांच्या अनौरस मुलांसाठी हक्काचं अनाथालय बांधायचा निर्णय तिने घेतलाय, त्यासाठी मिपाकडून हार्दिक शुभेच्छा.
नितळ सिनेमात सुनील सुकथनकरांचं एक
गीत आहे,
"अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार,
प्रकाश सगळा सोडून आला शांतशांत अंधार,
उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या,
अगणित चेहर्यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार...."
अश्या या निबिड अंधारात ढकलले गेलेल्या असंख्य तृतीयपंथियांसाठी "गौरी सावंत" एक कवडसा आहे. कवडसा म्हणजे अंधार्या जागी कुठूनतरी हळूवार शिरलेला प्रकाश-किरण, त्याच्या येण्याने अंधारही उजळून जातो. एक अनुभूती जी फक्त त्या अंधारालाच कळू शकते.. भरकटलेल्या जहाजांना दीपगृह बनून मार्ग दाखवणाऱ्या गौरी सावंत हिला मनाचा मुजरा. अजूनही नाराज असलेल्या वडिलांच्या शाब्बासकीसाठी आणि मायेचा हात डोक्यावरून फिरावा यासाठी आसुसलेल्या गौरीची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी असं सावंत-देसाई परिवाराचा एक भाग म्हणून मनापासून वाटतं.

दिवाळी अंकात शोभून दिसला असता
In reply to दिवाळी अंकात शोभून दिसला असता by एस
दिवाळी अंकासाठीच लिहिला होता....
In reply to दिवाळी अंकासाठीच लिहिला होता.... by बाजीप्रभू
हा लेख दिवाळी अंकात यावा...
एकदम
समाजाच्या खर्या विकासासाठी,
अतिशय उत्तम लेख आहे.
In reply to अतिशय उत्तम लेख आहे. by सुबोध खरे
डॉ. धन्यवाद नेहमी प्रमाणे...
फारच अप्रतिम लेख ! गौरी सावंत
गौरी सावंत यांना केवळ आणि
उत्तम!
या लेखाला दिवाळी अंकात आता
In reply to या लेखाला दिवाळी अंकात आता by टवाळ कार्टा
हेच म्हणायचे आहे. आपण काय
उत्तम ओळख!
सुंदर लेख. गौरी सावंत ह्यांना
खूप सुंदर असतात माणसे,
खूप सुंदर लेख..तुमचे आभार.
अप्रतिम लेख.
अतिशय सुंदर ओळख!! आणि गौरी
सुंदर ओळख
दुर्लक्षित विषयावर चा छान लेख
आॅस्सम...
मिपा व्यासपीठाचे विशेष धन्यवाद!!
खूप सुंदर लेख .
आपला दृष्टी़कोन
शब्द अपुरे आहेत. आपल्या पासुन
धन्यवाद बाजीप्रभूजी!
काय लिहावे कळत नाहीये...
फार सुंदर लेख.. धन्यवाद..
दुर्लक्षित विषय, त्यात टॅबू
सुरेख व्यक्तिओळख..
फार आनंद झाला हे वाचून -
संतुलित लेख
संतुलित आणि वेगळा लेख!
अप्रतिम लेख
लेख आवडला.
अप्रतिम लेख.
अप्रतिम आहे.
गौरी सावंत यांना केवळ आणि
डोळे
अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
अप्रतिम लेख _/\_
गौरीला _/\_ आणि पुढील
बादवे पहिला पूर्णपणे
अप्रतिम लिहिलंय.. या लेखासाठी
In reply to अप्रतिम लिहिलंय.. या लेखासाठी by रुपी
+11__/\__
वाचून डोळे पाणावले.
माबोवर हा एक चांगला लेख आला
http://www.aksharnama.com
In reply to http://www.aksharnama.com by एमी
खूप छान लिंक. शेअर