Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Wed, 07/06/2016 - 19:52
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
  • 129479 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Fri, 07/08/2016 - 16:20

In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय

Permalink

धागा भरकटू न देणे महत्त्वाचे

धागा भरकटू न देणे महत्त्वाचे आहे हे सर्वांनी समजुन घ्या.
Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 07/08/2016 - 16:35

In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय

Permalink

=))

=))
प्रतिजैविके बदद्ल अनेक शंका दूर झाल्या आहेत.
आपल्याला या विषयाबाबात काही शंका होत्या असं वाटलं नवतं आपला लेख वाचताना ....
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Fri, 07/08/2016 - 17:00

In reply to =)) by असंका

Permalink

त्या लेखातली मते काही

त्या लेखातली मते काही आयुर्वेदीक आणि होमिओपाथिक वैद्यांच्या माहितिवरुन बनवण्यात आली होती. कबुल!
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Fri, 07/08/2016 - 16:23

Permalink

अतिशय सुंदर माहिती आहे.

अतिशय सुंदर माहिती आहे. यासाठी शतःश धन्यवाद डॉ. साहेब. माझी एक विनंती आहे. "आयुर्वेदाचे साईड ईफेक्ट नाही" या "शुद्ध मुर्खपणा" बद्दल कृपया लिहा (e. g., severe side effects of ayurvedic medicines having heavy metals on kidneys, use of high potassium medicines in kidney diseases, etc). --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 07/08/2016 - 16:30

In reply to अतिशय सुंदर माहिती आहे. by कानडा

Permalink

आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू

आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू असतात हे आजच कळले मला. माझ्या मनात आयुर्वेदिक औषधे = झाडपाला हेच समिकरण होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Fri, 07/08/2016 - 16:36

In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे

Permalink

कशा कशाचे भस्म नाही ऐकले का?

कशा कशाचे भस्म नाही ऐकले का? --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 07/08/2016 - 20:11

In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे

Permalink

सुवर्ण भस्म असतं की. पारा

सुवर्ण भस्म असतं की. पारा देखील वापरतात. याशिवाय काही औषधांमध्ये चुकून आलेलं आर्सेनिकवगैरे देखील अढळल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Fri, 07/08/2016 - 16:40

Permalink

"झाडपाला" चे साईड ईफेक्ट नाही हे सुद्धा खोटे आहे.

"झाडपाला" चे साईड ईफेक्ट नाही हे सुद्धा खोटे आहे. किडनीच्या रोगावर Parsley चा काढा सुचवला होता एका BAMS ने. (ना रहेगा बास ना बजेगी बासरी असे वाटले असेल त्याला कदाचित). --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 07/08/2016 - 18:02

Permalink

अतिशय उपयोगी माहिती

अतिशय उपयोगी माहिती. नेहमीप्रमाणे सहज सोपे करून सांगितले आहे. धन्यवाद डॉक्टर!
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/08/2016 - 19:34

Permalink

फारच सरसकटीकरण करणारे

फारच सरसकटीकरण करणारे प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटते आहे. माझा एक मित्र आयुर्वेदिक डॉक्टर असून देसाई गाव इथे तो रुग्णालय चालवतो. रुग्ण आणि रोग पाहून जे सर्वात अचूक वाटेल ते (मॉडर्न किंवा आयुर्वेदिक) औषध तो देत असतो. अवघी ३ वर्षे झाली. त्याच्या हातगुणाची साक्ष तिथली झुंबड गर्दी तर देतेच. या माणसाने माझ्या बायकोचा डेंग्यूसारखा रोग मॉडर्न मेडिसीनने बरा केला. हे सांगण्यात त्याला कोणाताच कमीपणा वाटत नाही. याच माणसाने माझी लिगामेंट इंजुरी एका आयुर्वेदिक तेलाने बरी केली ( आणि त्यावेळी इंटर्नल ब्लीडींग होऊन साकळलेले रक्त जळू लावून काढले). आता यावर देखील हा तुमचा वैयक्तिक अनुभव वगैरे म्हणून दुगाण्या झाडल्या जातील. पण वर काहीजणांनी आयुर्वेदाला 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' लावा वगैरे निरर्थक विधाने केली आहेत. म्हणून हे लिहिले. बाकी आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे आमचे ते वैयक्तिक अनुभव आणि हेच जर एखाद्या डॉक्टरने लिहिले तर ती शास्त्रकाट्याची कसोटी असे असेल तर विषयच संपला.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय_आंग्रे on Fri, 07/08/2016 - 20:07

In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर

Permalink

Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho

Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho? Desai gavan kuthe aah रुग्णालय?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/08/2016 - 22:33

In reply to Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho by विजय_आंग्रे

Permalink

जिवदानी हॉस्पिटल, देसाई गाव.

जिवदानी हॉस्पिटल, देसाई गाव. डॉ. दरे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 07/08/2016 - 20:12

In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर

Permalink

डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की

डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की एकच?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/08/2016 - 22:36

In reply to डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की by अनुप ढेरे

Permalink

आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न

आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न मेडिसीनची औषधे देण्याची परवानगी असते हो. रच्याकने, बी.ए.एम.एस ला ही असते. म्हणजे एम.डी. ला नक्कीच असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 12:57

In reply to आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न by अप्पा जोगळेकर

Permalink

अप्पासाहेब

अप्पासाहेब In June last year, the Maharashtra Government had given its approval to the bill that allowed homeopaths and ayush doctors to practice allopathy after a one-year bridge course in pharmacology.हा कोर्स अजून चालू झालेला नाही त्यामुळे आजमितीस ही औषधे देणारे व्यावसायिक बेकायदेशीर पणे देत आहेत. दिल्लीत जर आयुष व्यावसायिकांनी आधुनिक औषधे दिली तर त्यांना ३ वर्षे तुरुंगवास आणि २००००/- दंड केला जाईल. http://medicaldialogues.in/3-years-jail-rs-20000-fine-if-ayush-practioners-practise-allopathy/
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 15:04

In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे

Permalink

...

तो कोर्स सुरु झालेला आहे. ... भरपुर लिहायचे आहे. एक दोन दिबसात लिहिन
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 07/12/2016 - 16:59

In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे

Permalink

दिल्लीत जर आयुष

दिल्लीत जर आयुष व्यावसायिकांनी आधुनिक औषधे दिली तर त्यांना ३ वर्षे तुरुंगवास आणि २००००/- दंड केला जाईल. म्हणजे काय ? दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध दिले तर तुरुंगवास नाही का ? शिवाय हा लेटेस्ट अपडेट दिसतो. मी ज्या रुग्णालयाचा संदर्भ दिला ते अधिक्रूतरीत्या नोंद झालेले आयुरेव्द रुग्णालय आहे. तसेच तेथे अनेक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर येऊन मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट देखील देत असतात. शल्यक्रियाही करत असतात. एकंदर वैद्यक क्षेत्रात जात व्यवस्था बोकाळली आहे असे दिसते. प्रत्येक पॅथीचे डॉक्टर दुसर्‍या पॅथीवर चिखल फेकताना दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 07/12/2016 - 17:03

In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर

Permalink

आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन

आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन हेच हंतिम सत्य असे तुम्ही ठरवून टाकले आहे असे वाटते. या संदर्भात हा माझा शेवटचा प्रतिसाद. तुमच्या ज्ञानाबद्दल आदर आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 07/12/2016 - 17:08

In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर

Permalink

मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी

मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी खोटं असं नसून बाकी सर्व पॅथींमधे कोणतंही तथ्य आढळलं तर ते स्टँडर्डाईझ करुन स्वीकारणं आणि मुख्य प्रवाहात काटेकोरपणे आणणं हे म्हणजेच मॉडर्न मेडिसिन. कितीतरी मॉडर्न मेडिसिनची औषधं मुळात काष्ठौषधी किंवा पारंपरिक औषधांतला मूळ उपयुक्त घटक वेगळा करुन, चाचण्या करुन आणि डोस वगैरे प्रमाणित करुन घेतली गेली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 07/12/2016 - 17:22

In reply to मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी by गवि

Permalink

+१

गेल्यावर्षी चायनीज हर्बल औषधांचा अभ्यास करून मलेरिआच्या नवीन औषधाबद्दल संशोधन करणार्‍या बाईंना औषधशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. आयुर्वेदातून देखील असं काही मिळू शकेल. पण हे संशोधन कोणी करतं का हे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गंम्बा on Tue, 07/12/2016 - 17:30

In reply to +१ by अनुप ढेरे

Permalink

बेसिकली कुठल्याही पॅथीचे

बेसिकली कुठल्याही पॅथीचे किंवा देशातले औषध शास्त्राप्रमणे टेस्ट आणि ट्रायल घेऊन सिद्ध केले की ते मॉडर्न मेडिसिनचे औषध बनते. मॉडर्न मेडिसिन हा कुठलाही विषेश धर्म , पंथ नाहीये. जर कोणी केले तर आयुर्वेदातील सर्वच्या सर्व औषधे मॉडर्न मेडिसिन मधे येऊ शकतील की.
गेल्यावर्षी चायनीज हर्बल औषधांचा अभ्यास करून मलेरिआच्या नवीन औषधाबद्दल संशोधन करणार्‍या बाईंना औषधशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
त्यानी मॉडर्न मेडिसिन ची शास्त्रीय पद्धत वापरली होती. आमच्या ग्रंथात २००० वर्षापूर्वी असे लिहुन ठेवले आहे म्हणुन ते बरोबरच आहे असा त्याने सिद्धांत मांडला नव्हता. त्यानी अजुन हा पण सिद्धांत मांडला नाही की - हे मलेरीयाचे औषध सिद्ध केले म्हणजे सर्वच चिनी औषधे बाय डीफॉल्ट सिद्ध झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 19:01

In reply to बेसिकली कुठल्याही पॅथीचे by गंम्बा

Permalink

वरिल तिन्हि प्रतिसादाना बाडिस

वरिल तिन्हि प्रतिसादाना बाडिस सर्पगंधा या वनस्पती पासून तयार केलेले रेसरपाईन हे औषध रक्तदाबाचा अनेक वर्षे प्रचलित होते. ( त्यातील अजून सुधारित औषधे आल्यावर ते औषध मागे पडले). अफू पासून वेगवेगळी द्रव्ये शुद्ध करून त्यांचे वेगळ्या गुणधर्मासाठी उपयोग करू लागले. केवळ अफूचा काढा किंवा अर्क काढला तर त्याची नशा येते. परंतु कोडीन हे द्रव्य शुद्ध स्वरूपात दिले तर कोरडी ढास लागणाऱ्या खोकल्यावर ते अतिशय गुणकारी आहे आणि त्याने नशा अजिबात येत नाही त्यामुळे ग्लायकोडीन सारखे औषध केमिस्टकडे सहज मिळते. मॉर्फिनसारखे द्रव्य सुद्धा दिले तर जीव वाचवते. कोणत्याही द्रव्याचा मग ते प्राणिजन्य वनस्पिजन्य असो किंवा खनिज संपूर्ण अभ्यास करून त्याचे रासायनिक शुद्धीकरण करून पृथक्करण करून त्याचा प्रथम प्रयोगशाळेत, मग प्राण्यांच्या शरीरावर आणि नंतर मानवी शरीरावर होणार्या परिणामांचा पूर्ण अभ्यास केल्यावरच त्याला आधुनिक औषधात मान्यता मिळते. यांनंतरही कोणत्याही औषधात जर नको असलेले परिणाम आढळले तर असे औषध त्याज्य ठरवले जाते. आणि ही उपचार पद्धती भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांप्रमाणे चालते. स्वतः ठरवलेल्या तत्वज्ञानाने किंवा तर्कशास्त्राने नव्हे. इतकी काटेकोर अभ्यास पद्धती असल्यामुळे आधुनिक उपचार पद्धती ही जगमान्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 22:39

In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर

Permalink

व्हय जी!

आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन हेच हंतिम सत्य असे तुम्ही ठरवून टाकले आहे असे वाटते.
तेच खरे व अंतीम सत्य आहे, (हंतीम नव्हे) ही कडू गोळी कृपया गिळायचा प्रयत्न करा. मॉडर्न मेडिसीन हे मानवी इतिहासातल्या सर्व साडेतीन लाख वर्षांच्या इतिहासातून आलेल्या अनुभवसिद्ध वैद्यकाचा अर्क आहे. अमुक उपचाराने जर रुग्णास खरेच बरे वाटत असेल, तर त्यावर संशोधन करून, त्या क्ष झाडपाला/प्राण्याची आतडी/धातूभस्माचा नक्की कोणता घटक, कोणत्या प्रमाणात सर्व ज्ञाति वंशाच्या, स्त्री पुरुष लहानमोट्यांस, किती मात्रेत कसा फायदेशीर ठरेल, याचा साधकबाधक अभ्यास करून, 'रिस्क वि. बेनिफिट' रेशो हा रुग्णाच्या बाजूने 'सिग्निफिकंटली' झुकत असल्यास, अंतर्भूत करून, त्या उपचारास समाविष्ट करून घेणार्‍या उपचारपद्धतीस "मॉडर्न" मेडिसीन म्हणतात. याचे प्रॅक्टिशनर्स (म्हणजे, ही पद्धती वापरात आणणारे. तिची सवय करण्याचा परयत्न करणारे नव्हेत) यांना झालेला बोध, नव्या उपचार पद्धती, एकमेकांना फुकट सांगतात, त्या नव्या पद्धती वापरून पाहताना आलेल्या अडथळ्यांची, दुष्परिणामांची, निष्पक्ष चर्चा करतात, दुष्परिणाम असतील तर त्याबद्दल जनतेस चटकन साम्गतात, व त्यावर इलाज शोधतात. होम्योपदी ही तद्दन भंकस आहे, हे सिद्ध झालेले आहेच. इतर "प्याथी"त, अनुभवसिद्ध ज्ञान आहे, व त्यातील बरेचसे ऑलरेडी मॉडर्न मेडिसिनमधे सामावले गेलेल आहे. प्ण त्या आधारावर या प्याथीवाल्यांनी पब्लिकला चुतिया बनविणे थांबवावे, असे माझे स्पष्ट मत आहे. भारतातील सर्व होम्योपदी, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध व इतर बिण्डोक तथाकथित उपचारपद्धतींच्या "कॉलेजेस"चे संपूर्ण मॉडर्न मेडिसिन कॉलेजांत रूपांतर करून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यावे. त्यांना "अ‍ॅलोपॅथी" डॉक्टरांकडे कंपाऊंडरकी करत "तापाला प्यारासिटामॉल" या हिशोबाने मॉडर्न मेडिसिन शिकायला भाग पाडू नये, असे माझे विनम्र मत आहे. "मेडिकल" कालेज काढून पब्लिककडून पैसे उपटण्यासाठी उभ्या राहिलेल्या या उपटसुंभ भारतीय राजकारण्यांच्या बिनडोकपणाचा, व तिथे अ‍ॅडमिशन घ्यावी लागल्यने फ्रस्ट्रेशन आलेल्या हुशार परंतु संतप्त लोकांनी य देशावर उगवलेल्या सूडाचा प्रवास कुठेतरी थांबावा, ही सदिच्छा..
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Wed, 07/13/2016 - 00:58

In reply to व्हय जी! by आनंदी गोपाळ

Permalink

एकाच प्रतिसादात भंकस, चुतिया

एकाच प्रतिसादात भंकस, चुतिया,बिण्डोक, उपटसुंभ, बिनडोकपणाचा, कंपाउंडरकी इतके तुच्छतादर्शक शब्द वाचून धन्य झालो. शिवाय ते कडू गोळी वगैरे काय झेपले नाही. मी डॉक्टर नाही ना कंपाउंडर ना फार्मसिस्ट. उद्या आयुर्वेद/होमिओपथी/मॉडर्न यापैकी कायबी ग्रेट आहे हे सिद्ध झाल्याने माझे काय जाते. ती चिंता किंवा आक्रस्ताळेपणा ज्यांच्या 'कट' वर परिणाम होतो त्यांनी करावी. माझ्यापुरते म्हणायचे तर सहसा आजारी पडतच नाही अन पडलो तर ज्याने लवकर बरे वाटते असे औषध एखाद्या विनयशील डॉक्टरच्या सल्ल्याने घेतो. रच्याकने, तुमची खड्डा कोंबडीची रेसिपी प्रचंड आवडल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गंम्बा on Tue, 07/12/2016 - 17:25

In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर

Permalink

दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध

दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध दिले तर तुरुंगवास नाही का ?तसेच तेथे अनेक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर येऊन मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट देखील देत असतात.
अहो आप्पा - नॉन मॉडर्न मेडिसिन वाल्यानी मॉडर्न मेडिसिनचे औषध द्यायला बंदी आहे फक्त. माझ्या माहीतीत आयुर्वेदीक किंवा होमिओपाथी औषध द्यायला सर्व जनतेला परवानगी आहे ( डीग्रीची जरुरत नाही ). अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या ह्या औषधे म्हणुन मानली जात नसल्यामुळे ती ओव्हर द काउंटर मिळु शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 07/12/2016 - 22:07

In reply to दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध by गंम्बा

Permalink

>> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या

>> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या ह्या औषधे म्हणुन मानली जात नसल्यामुळे ती ओव्हर द काउंटर मिळु शकतात. पुण्यातही मिळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 22:20

In reply to >> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या by सतिश गावडे

Permalink

हो,

हो, पण पुण्यात त्यांना औषधी "मानले" जाते, व धोकादायक औषधेही ओवर द काउंटर निर्विकारपणे विकली जातात..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/08/2016 - 21:29

In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर

Permalink

अप्पासाहेब

अप्पासाहेब हैदराबादी माशाची गोळी अत्यंत लोक प्रिय आहे म्हणून तिला पण उत्तम वैद्यकीय इलाज म्हणणार काय ? बाकी आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे आमचे ते वैयक्तिक अनुभव आणि हेच जर एखाद्या डॉक्टरने लिहिले तर ती शास्त्रकाट्याची कसोटी असे असेल तर विषयच संपला. मी जे काही लिहिले आहे त्याचे सर्व दुवे मी दिले आहेत. कुठेही केवळ मी म्हणतो किंवा मी पाहिले म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असे मी अजिबात म्हणत नाही. ऐकीव गोष्टी( ANECDOTES) वर इतर पॅथीवाले चालतात. मला गोमेद किंवा नीलमणी या खड्याच्या उत्तम अनुभव आला आणि माझा व्यवसाय चालू झाला. यात आणि शास्त्रीय कसोटी यात काय फरक आहे? शास्त्रीय कसोटी ही अनुमानधपका किंवा काकतालीय न्यायाच्या पलीकडे असावी लागते. आणि ती पुराव्यानिशी सिद्ध करावी लागते. २०c पेक्षा जास्त विरळ केलेल्या द्रव्यात त्या द्रव्याचा एकही रेणू नसतो हे रसायनशास्त्राने सिद्ध करता येतं. यावर होमियोपॅथी वाले पाण्यात त्या द्रव्याचे गुण उतरतात असा दावा करतात. कोणतेही द्रव्य विरळ केले की ते जास्त परिणामकारक होते हा त्यांचा सिद्धांत. SARS (FLUE) हा श्वसनाचा आजार झाला असताना मुंबईतील काही होमियोपॅथनी आय एम ए ( इंडियन मेडिकल असो.)च्या व्हॉट्स अँप वर "ब्रायोनिया की कोणतेतरी" औषध २००X मात्रेत घेतले तर SARS होणार नाही असा दावा केला होता त्यावर मी त्यांना म्हटले होते की असे जर असेल तर तुम्ही मुंबईची लोकसंख्या किती आहे त्याप्रमाणे हे औषध तुळशी किंवा भातसाच्या पाण्यात टाका म्हणजे सर्व मुंबईचे लोक ते पाणी पिऊन त्यांची प्रतिकारशक्ती इतकी वाढेल की कुणालाच हा आजार होणार नाही SARS पासून संरक्षण होईल. यावर या सर्व दावा करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आणि ते करीत असलेल्या दाव्याचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला असावा.( निदान यावर कोणी पुढे चर्चा करण्याची हिम्मत दाखवली नाही).
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/08/2016 - 23:26

In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे

Permalink

वर एका महाशयांनी आयुर्वेदाला

वर एका महाशयांनी आयुर्वेदाला 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' लावा वगैरे तारे तोडले आहेत. त्यापुढे जाउन त्यांचा वैद्यक क्षेत्राशी संबंध नाही आणि पटत नसेल तर सोडून द्या असे म्हणणे आहे. आधी पुरावा नसताना बदनामी करायची आणि नंतर पटत नसल्यास दुर्लक्ष करा असे म्हणायचे असा हा उफराटा प्रकार आहे. जर आयुर्वेद अंधश्रद्धा आहे तर प.य.खडीवालेंपासून ते टिळक आयुर्वेद रुग्णालय या सगळ्यांना सत्य साईबाबाच्या रांगेत बसवणार का ? बाकी तुमच्या धाग्याबद्दल, ज्ञानाबद्दल आणि अनुभवांबद्दल संदेह नाहीच. पण प्रत्येकाने स्वतःला डॉ. खरे समजून एखाद्या वैद्यक क्षेत्राबद्दल पिंका टाकणे कितपत योग्य आहे ? होमिओपाथी बद्दल माहिती नाही त्यामुळे पास. अवांतर - क्लिनिकल डायग्नोसिस करणारे साधे डॉक्टर कमी होत जाऊन सगळीकडे स्पेशालिस्ट्च दिसतात ही काळजी करण्याची बाब वाटते. स्टेथास्कोप हातात न घेताच अमकी टेस्ट करा आणि रिपोर्ट दाखवा असे सांगणार्‍या मॉडर्न मेडिसीनच्या डॉक्टरांबद्दल तरी काय बोलणार ? अलीकडे पेशंटसुद्धा मी डायरेक्ट स्पेशालिस्ट कडे जातो असे ऐटीत सांगतात. स्पेशलायझेशन करता अमक्या वर्षांची प्रॅक्टिस असावी असा काही नियम नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:32

In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर

Permalink

आधी पुरावा नसताना बदनामी

आधी पुरावा नसताना बदनामी करायची आणि नंतर पटत नसल्यास दुर्लक्ष करा असे म्हणायचे असा हा उफराटा प्रकार आहे.
डॉक्टरांच्या 'हलगर्जीपणाच्या' केसेस रिपोर्ट करताना तुम्हीआम्ही किंवा पॉप्युलर मेडिया काय करीत असतो म्हणता? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:35

In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर

Permalink

स्पेशलायझेशन करता अमक्या

स्पेशलायझेशन करता अमक्या वर्षांची प्रॅक्टिस असावी असा काही नियम नाही का ?
साहेब, नक्कीच आहे. उदा. एम्बीबीएसनंतर ३ वर्षे एमएस करता, अन त्यापुढे ३ वर्षे एमसीएचकरता लागतात. हे किमान अभ्यास केल्यानंतर "सरकारमान्य" अर्हताप्राप्तीसाठी लागणार्‍या किमान कालावधीचे वर्णन आहे. या ३ वर्षांत (हजार दिवसांत) किमान १००० मेजर व ४-६ हजार तरी मायनर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 07/10/2016 - 06:27

In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे

Permalink

अर्धवट ज्ञान !

पोटंटायझेशन म्हणजे नुसते पाणी घालून विरळ करणे नव्हे . त्याला ट्रिचुरेशन / खलणे याची जोडही असावी लागते. हे बेसिकही तुम्हाला माहीत नसल्याने तो होमिओपथईवाला बिचारा गप्प बसला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/11/2016 - 14:30

In reply to अर्धवट ज्ञान ! by चंपाबाई

Permalink

चंपाबाई / मोगा

चंपाबाई / मोगा ट्रिचुरेशन ही पद्धत घन पदार्थांच्या पोटंटायझेशन साठी वापरतात आणि सक्सेशन ही पद्धत द्रव पदार्थांच्या पोटंटायझेशन साठी वापरतात. हे असाच खलायचं आणि तशीच बाटली हलवायची इ तर्हेची अजब कर्मकांडे आहेत. दोन्ही पद्धती कर्मकांडे आहेत आणि त्या आधुनिक भौतिक आणि रसायनशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहेत. http://homeopathyplus.com/trituration-making-insoluble-substances-soluble/ http://homeopathycommunity.com/TriturationandSuccussion.asp हे एकदा जिज्ञासूंनी वाचूनही घ्यावे उदा. दोन एकमेकांत विरघळणारे द्रव पदार्थ कसेही ठेवा. त्याचे रेणू इतस्ततः हालचाली मुळे (random motion) एकमेकांत मिसळणारंच. औषध कसे आणि कुठे वापरायचे हे मी त्या होमियोपॅथ वरच सोडले होते मी काही त्या औषधाला हातही लावणार नव्हतो. त्या होमियोपॅथ चे होमियोपॅथी तील ज्ञान माझ्यापेक्षा जास्तच असणार यात शंका नाही पण मूलभूत वैद्यकशास्त्राचे मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे तेंव्हा तुमच्यासारखे हे फालतू वाद त्यांना माझ्याशी घालणे शक्य नव्हते म्हणून एक दोन नव्हे डझनांनी होमियोपॅथ गप्प बसले.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 07/08/2016 - 20:02

Permalink

होमिपदीचा अनुभव वाईट आहे.

होमिपदीचा अनुभव वाईट आहे. आयुर्वेदाचा अगदी उत्तम! अ‍ॅलोपथी शक्यतो टाळते आणि ताप, सर्दी इ आपोआप बरे होतील असा शरीराला वेळ देते. पण खरे काकांनी इतकं सोप्पं करुन लिहीलय की आपल्या शरीरात नक्की घडते काय हे आज पहिल्यांदाच समजले. काका, खुप छान लेख आणि प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 07/08/2016 - 20:05

In reply to होमिपदीचा अनुभव वाईट आहे. by पिलीयन रायडर

Permalink

हो पण हे ही महत्वाचं आहे की

हो पण हे ही महत्वाचं आहे की आयुष्यात सर्दी तापाहुन कित्येक पटींनी जास्त गुंतागुंत असलेले त्रास झाले तेव्हा अ‍ॅलोपथीच कामास आली. तेव्हा इतर कोणत्याही पॅथीच्या नादी लागणे शक्यच नव्हते. जीवन मरणाचा प्रश्न असताना अ‍ॅलोपथीच मदतीला आली आणि तिने जीव वाचवला. बाकी पॅथींनी पुरक गोष्टी झाल्या (ताकद वाढणे, पित्त उठलेलं कमी होणे इ.) पण जीव मॉडर्न मेडिसिनच वाचवु शकले.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 07/09/2016 - 14:14

Permalink

हा लेख लिहिल्याबद्दल

हा लेख लिहिल्याबद्दल डॉक्टरसाहेबांचे आभार. बर्‍याच लोकांना सगळं चमच्याने भरवावं लागतं याचं हे मस्त उदाहरण आहे. सामान्य लोकांना विषाणू आणि जीवाणूतला फरक कळत नाही असं कोणीतरी वर म्हटलंय. खरंच? पाचवी-सहावीच्या जीवशास्त्रातच विषाणू आणि जीवाणू हे शब्द येतात. पेनिसिलिनबद्दलही लिहिलेले आढळते. शिवाय आता इंटरनेटमुळे ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना प्रत्येकाच्या अक्षरशः हातात असतो. थोडंसं शोधलं तरी प्रतिजैविकांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रतिजैविकांची कार्यपद्धती, कोणत्या प्रोटीनफॉर्मेशनवर काय परिणाम होतो वगैरे सगळं डिट्टेलवार माहिती मिळू शकते. पण सामान्यपणे मूर्खच राहण्यात धन्यता मानणार्‍यांना काय त्याचे? लोकांना ऑनलाईन शॉपिंग, चोरुन चित्रपट डाऊनलोड करणे, पॉर्न पाहणे वगैरे गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत; पण ह्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींची गंधवार्ताही नसते. दारात ज्ञानाची गंगा आली तरी कोरडेठाक राहणार्‍यांइतके दुर्दैवी तेच.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 07/09/2016 - 15:02

In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन

Permalink

नगरीनिरंजन ह्यांच्या

नगरीनिरंजन ह्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 07/09/2016 - 20:49

In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन

Permalink

मला वाटते की

सामान्य लोकांना विषाणू आणि जीवाणूतला फरक कळत नाही असं कोणीतरी वर म्हटलंय. खरंच? पाचवी-सहावीच्या जीवशास्त्रातच विषाणू आणि जीवाणू हे शब्द येतात. पेनिसिलिनबद्दलही लिहिलेले आढळते. १९८१ चे सुमारास प्रसिद्ध हॉलिवूड नट रॉक हडसन हा एडस ने मरण पावला. त्यावेळी एम बी बी एस , डी ए एस एफ व बी ए एम एस ( त्यावेळी बहुदा बी ए एम एस झाल्यावर एम बी बी एस करता येत असे) अशा तीन डीग्र्या असलेल्या माझ्या डॉक्टर मित्राला एडस म्हणजे काय हे माहीत नव्हते. सबब पाचवीच्या॑ मुलाला जरी अभ्यासाला व्हायरस व जिवाणू हे असले तरी त्यांची वर्तणूक माहिती असण्याची शक्यता कमी. उदा विषाणू आपल्या खास आवडत्या पेशीत शिरून तिला "मला" बनव असे सांगतो व आपली पुनरूत्पती करतो सबब डॉ खरे यानी म्हटल्या प्रमाणे त्याचे काम हे पेशीच्या आत गेल्यावरच चालते.हे पाचवीच्या मुलाला काय नर्सेसना तरी माहिती असते काय याची शंका आहे. आय सी यू त रात्रपाळीला नोकरीवर असलेल्या एका डॉ ने अ‍ॅन्जिओ प्लास्टी झाली की डेब्री ब्ल्ड सर्क्युलेशन च्या बाहेर काढली जाते का ? या माझ्या प्रश्नाला उत्तर " होय " असे दिले होते. आता बोला ! तेंव्हा व्यासंग किती आहे हे महत्वाचे. करीक्युलम सर्व पूर्ण करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 07/09/2016 - 22:28

In reply to मला वाटते की by चौकटराजा

Permalink

१९८१ चे सुमारास प्रसिद्ध

१९८१ चे सुमारास प्रसिद्ध हॉलिवूड नट रॉक हडसन हा एडस ने मरण पावला.
१९८१ मध्ये न्युयॉर्कमध्ये एड्सने म्रुत्यु पावलेला पहिला रुग्ण निक रॉक होता. हॉलिवूड नट रॉक हडसन हा १९८५ ला मरण पावला. मला नाही वाटत त्यावेळच्या एम बी बी एसच्या अभ्यासक्रमात एड्सबद्दल शिकवले जात असेल. त्यामुळे कदाचीत तुमच्या तीन डीग्र्या असलेल्या मित्राला एड्सबद्दल माहीती नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 07/10/2016 - 08:34

In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे

Permalink

आभार पण.....

१९८१ चे ऐवजी १९८५ हा फरक इतक्या वर्षानंतर मी विसरलो असेन पण माझ्या मित्राला एडस् बद्द्ल माहिती नसताना ती मला माहिती होती हे विशेष. कारण त्या दरम्यान काही ठिकाणी या बद्दल मी वाचले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडा on Mon, 07/11/2016 - 09:00

In reply to आभार पण..... by चौकटराजा

Permalink

शिकले सवरलेले लोक

शिकले सवरलेले लोकही (उ.दा. ३ डिग्रीज असलेला डॉक्टर) किती अपडेटेड (न)असतात हेच तर वर म्हटले आहे ना? --- कानडा
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sun, 07/10/2016 - 10:08

In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे

Permalink

१९८३ मध्ये वैज्ञानीक HIV ला

१९८३ मध्ये वैज्ञानीक HIV ला HTLV ह्या व्हायरसचाच प्रकार समजत होते. गूगलवरील माहीतीप्रमाणे रॉक हडसनच्या मृत्युनंतरच अमेरिकेत सर्वसामान्य लोकांना एड्सबद्दल माहीत झाले. त्याकाळी भारतात इंटरनेटसारखी माध्यमे उपलब्ध नव्हती, माहीतीचे स्त्रोत मर्यादीत होते, त्यामुळे एखाद्याचे अवांतर वाचन नसेल तर असे होऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sat, 07/09/2016 - 14:15

Permalink

अतिशय उपयुक्त माहिती. वाचनखूण

अतिशय उपयुक्त माहिती. वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 07/10/2016 - 09:28

Permalink

आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक

आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक इमेजिंग अर्थात एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय वापरू नये त्यास सरकार ने इमेजिंग वापरण्यापासून थांबवावे म्हणून अलोपॅथीक लोकांनी एक केस केलेली असून ती न्यायप्रविष्ट होती असे ऐकिवात होते, डॉक्टरसाहेब, ह्यावर माहिती दिलीत तर आनंद होईल, (तुम्ही स्वतः अलोपॅथ तर आहातच, शिवाय रॅडिओलॉजिस्ट सुद्धा आहात म्हणून तुमचे मत ऐकायची इच्छा आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/11/2016 - 20:38

In reply to आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापूसाहेब

बापूसाहेब आपण एक गहन प्रश्न विचारला आहे यावर मी "माझे" मत मांडत आहे. इतर पॅथी मध्ये आधुनिक शास्त्रांचा किती अभ्यास होतो हे मला माहीत नाही. परंतु आधुनिक निदान तंत्रे ही भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राच्या पायावरच उभी आहेत आणि इतर पॅथीचे आपले "तत्वज्ञान" आहे आणि त्यात (शास्त्र आणि तत्वज्ञान) एकवाक्यता नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे त्या पॅथीच्या व्यावसायिकांना आधुनिक निदान तंत्रांबद्दल कितपत माहिती आहे( असायला पाहिजे) हा एक संदिग्ध मुद्दा आहे. दुर्दैवाने त्या पॅथीच्या "मूळ" अभ्यासाच्या वेळेस ही निदान तंत्रे नव्हती आणि नंतर त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांचा अंतर्भाव आणि त्याचे एकात्मीकरण त्यांना किती झेपणारे आहे हे ही मला माहीत नाही. यामुळे तांत्रिक कारणासाठी त्यांना ही तंत्रे वापरू द्यावी की नाही यावर टिप्पणी करणे कठीण आहे. राहिली गोष्ट रुग्णांच्या हिताची.. -- याबाबत मी असे म्हणेन की इतर पॅथीच्या व्यावसायिकांना आधुनिक तंत्रे वापरू द्यावी याचे साधे कारण आहे की केवळ लक्षणांवर या पॅथी रुग्णांवर उपचार करीत असतात आणि आमची पद्धती "सावकाश पण गुणकारी आहे" या दाव्यात अमूल्य असा वेळ फुकट गेलेला कित्येक रुग्णाबाबत दिसून येतो. एक अलीकडचेच उदाहरण देतो आहे. दीड महिन्यापूर्वी एक ७५ वर्षांच्या बाई माझ्याकडे बद्धकोष्ठाच्या आजारासाठी सोनोग्राफीसाठी आल्या. त्यांना हा त्रास सहा महिन्यापासून होत होता.त्यावर त्यांचा आयुर्वेदिक इलाज चालू होता. परंतु त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे आणि आता त्यांना उलट्या होऊ लागल्या मुळे त्यांच्या मुलीने त्यांच्या डॉक्टरकडे आपण सोनोग्राफी करू म्हणून मागणी केली. माझ्याकडे सोनोग्राफी केल्यावर पोटात नाभीच्या डावीकडे एक मोठा गोळा (८ x ९ सेमी) तयार झालेला दिसला.त्यांच्या मुलीला तो मी हाताला "लागतो" आहे हेही दाखवून दिले. अर्थात मला कर्करोगाची दाट शंका आल्याने मी ताबडतोब त्यांना सीटी स्कॅन करून त्याची खात्री करण्यास सांगितले. सीटी स्कॅन मध्ये माझ्या शंकेची पुष्टी झाली परंतु दुर्दैवाने हा रोग बऱ्यापैकी पसरलेला आढळला आणि आता शल्यक्रियेने पूर्ण बरा होण्याच्या पलीकडे गेलेला होता. यानंतर त्यांच्या बाबतीत बऱ्याच गुंतागुंती झाल्या( तो आत्ताच विषय नाही) आणि आज सकाळीच त्या बाईंना दुर्दैवाने देवाज्ञा झाली असे माझ्या स्वागत सहायिकेने सांगितले. जर आधुनिक तंत्रज्ञानाची अगोदर मदत घेतली गेली असती तर "कदाचित" त्यांचे आयुष्य अजून वाढले"ही" असते. त्यांच्या दैवात किंवा नशीबात काय आहे/होते ते मी सांगू शकत नाही. कित्येक वेळेस पोटात दुखत असेल तर त्याचे निदान झाल्याशिवाय उपचार कसे करणार. पोटाला हात लावून १००% निदान करणारे डॉक्टर इतिहासात नव्हते आणि पुढेही होणार नाहीत. असे असंख्य वेळेस माझ्या सारख्या रोग निदान तज्ज्ञांना आढळून आले असल्याने तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर "रुग्णांना" आधुनिक तंत्राचा फायदा द्यावा असेच मला वाटते. निदान झाल्यानंतर त्यांनी कुठे इलाज करून घ्यावा आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे.( जसे सिगरेट प्यायल्यामुळे आर्थिक आणि शारीरिक नुकसानच होते हे माहीत असूनही लोक ती पितातच). जाता जाता -- जुन्या पिढीतील फॅमिली डॉक्टरांचे निदान अचूक असे हा एक गैरसमज आहे कारण त्यांना निदान होईपर्यंत रोग बहुसंख्य वेळेस बराच "पुढे" गेलेला असे. आज मूत्रात रक्त पडत असेल तर आज तुमच्या मूत्रपिंडात एक सेमीच्या कर्करोगाचे सुद्धा सहज निदान होते जेंव्हा तो स्टेज १ किंवा २ असतो. हाच कर्करोग सरासरी ४-५ सेमी होईपर्यंत (जोवर तो बहुधा चौथ्या स्टेजला पोहोचलेला असतो) हाताला जाणवत नसल्याने पूर्वीचे फॅमिली डॉक्टर "परफेक्ट" निदान करेपर्यंत रोग हाताबाहेर गेलेला असे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 07/11/2016 - 20:55

In reply to बापूसाहेब by सुबोध खरे

Permalink

उत्तर अतिशय आवडले डॉक्टर

उत्तर अतिशय आवडले डॉक्टर साहेब, ह्याहून चांगले समजवले नसते कोणी, परत एकदा आभार
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 07/10/2016 - 09:46

Permalink

कदाचित असे असेल.....

मी राहात असलेल्या जागी शेजारी होमिऑपाथी मधे वैद्यकाचे पदवी शिक्षण घेणारे काही विद्यार्थी होते. त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ इटरनल मेडिसिन, किवा ग्रेज अनॉटोमी ही पुस्तके पाहिली आहेत. माझा असा कयास आहे की त्यानाही इमेजेस त्याचा अर्थ असे काही भाग अभ्यासासाठी असावेत. फक्त फार्मसी हा विषय वेगवेगळा असावा. जर त्याना एक्स रे, एम आर आय ई ई चे ज्ञान मिळत असेल तर अलोपथी वाल्यांचा वरील दावा कोर्टात टिकणार नाही. अर्थात एखादे अप्लीकेशन कायद्याने रेडिओलॉजि चे खास शिक्षण घेणार्‍यानीच वापरायचे असेल व त्यानी हा दावा टाकला असेल तर..... त्याचे उत्तर पुन्हा "शेवटी सर्व देव शंकराना शरण गेले " या चालीवर डॉ खरे........
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 07/10/2016 - 21:54

In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा

Permalink

बी जे मेडिकल कॉलेजच्या

बी जे मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमधे, काही मुलांकडे, हरजाई, कली अशा नावांची पुस्तके असत. त्याचप्रमाणे काही मुलांकडे नाटकाची किंवा इतिहासाचीही पुस्तके असत. त्याचा अर्थ, असे भाग अभ्यासासाठी असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 07/11/2016 - 06:38

In reply to बी जे मेडिकल कॉलेजच्या by आनंदी गोपाळ

Permalink

आता बघा...

आता बघा... होमिओपॅथ अभ्यास करतात अ‍ॅनाटोमीचा आणि बीजे वाले हरजाई / कली / नाटक किंवा इतिहास यांचा.... नॉट वेरी कॉन्फिडन्स इन्स्पायरींग....इज इट?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 14:22

In reply to आता बघा... by असंका

Permalink

वा! काय कन्क्लूजन आहे. शाब्बास्स!

आता, तुमच्या प्रगल्भ बुद्धीला समजेल अशा भाषेत मी काय म्हटलंय ते परत सांगतो.
तुमच्या घरात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरील पुस्तके सापडलीत, व तुम्ही कॉलेजात बी.ए. करीत आहात, याचा अर्थ, तुमच्या बीएच्या अभ्यासक्रमात ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय आहे, असा होतो का?
पहा, समजतंय का. नसेल तर पुन्हा इच्चारा. माझ्या भाषेत पुन्हा समझवून सांगायचा प्रेत्न करीन.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com