रुई माछ भापे - (वाफवलेला रोहु मासा)
साहित्यः * कोणत्याहि मोठ्या माशाचे ६-८ तुकडे (रोहु, कतला, सुरमई...मी रोहु आणि हलवा वापरला आहे) * ४ मोठे चमचे पिवळी मोहरी * ८-१० हिरव्या मिरच्या * ४ मोठे चमचे मोहरीचे तेल * मीठ * केळिची पाने
कृती: १. मोहरी आणि मिरचीचे बारिक वाटण करुन घ्यावे २. वाटणामधे मोहरीचे तेल घालुन हलवुन घ्यावे
३. हे मिश्रण आणि मीठ माश्याच्या तुकड्यांना लावुन अर्धा तास मुरत ठेवावे
४. एकेक तुकडा केळिच्या कापुन घेतलेल्या पानात गुंडाळुन लवंग लावुन बंद करावा
५. हे तुकडे स्टीमर मधे साधारणपणे २० मिनीटांकरता वाफवुन घ्यावेत
६. गरमागरम भाताबरोबर वाढावेत.
---
ताटात वाढलेला एकेक तुकडा हलकेच उघडावा. मनभरुन हुंगुन घ्यावा. मोहोरीच्या विशीष्ट वासात मिसळलेला केळिच्या पानाचा वास ह्यातुन एक अफलातुन सुगंध निर्माण होतो. त्याच नशेमधे एक तुकडा तोडुन वाफाळणार्या भाताबरोबर तोंडात टाकावा आणि मगाशी हुंगलेल्या सुगंधाची जादु जिभेवर अनुभवावी. अहाहा. तर मंडळी, ताजा ताजा बाजार घेउन या आणि 'अपना हाथ जगन्नाथ' ह्या नियमाने लागा कामाला. मात्र तुमचे अनुभव कळविण्यास विसरु नका.
(बंगाली मासे आणि मत्स्यकन्या यांचा चाहता) पांथस्थ...
वाचन
19991
प्रतिक्रिया
0