माझे व्यायामाचे फंडे - २
(कृपया वाचकांनी लेखाच्या तांत्रिक बाबींकडे न पाहता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा, ही विनंती आहे.)
आमच्याच शहरातील महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ही योगासने शिकवली जात होती. योगासनासारख्या आरोग्याशी निगडित गोष्टीसाठी नेमका महानगरपालिकेचा हॉल कसा काय मिळतो कुणास ठाऊक? त्यात भरीस भर म्हणून नेमका हा योगासनाचा वर्ग भाजी मंडईत होता. तिथे असणारी स्वच्छतागॄहे खूपच अस्वच्छ होती. योगासने करताना कधी कांद्याचा तर कधी ढब्बू मिरचीचा, कधी आंब्याचा तर कधी फणसाचा.. सीझनप्रमाणे वेगवेगळे वास येत होते. घाणीच्या, स्वच्छतागॄहाच्या व मंडईतील भाजीपाल्याच्या संमिश्र वासामुळे, प्राणायाम केल्यावर रक्त शुद्ध होण्याऐवजी अशुद्ध होण्याची फार भीती वाटत होती. त्यात आंबा-फणसाच्या वासामुळे पटकन बाहेर जाऊन तो खाण्यासाठी मन उत्तेजित होत होते. त्या हॉलच्या बाहेर काही उत्साही भक्तांनी देवाची मूर्ती बसवली होती व सकाळ संध्याकाळ काही मंडळी जमून नित्यनियमाने तिची पूजा-आरती करीत होते. योगासने शिकवणार्या सरांचा व देवांच्या आरतीसाठी लागणारा स्पीकर (कर्णा) तेवढे भिन्न होते, मात्र त्याची इतर यंत्रणा कॉमनच होती. वेळेनुसार वायरीचे कनेक्शन बदलून कधी गरजेनुसार सरांचा स्पीकर चालू केला जात असे, तर कधी देवाच्या आरतीसाठी गरजेनुसार मंडईतील बाहेरील स्पीकर चालू केला जात होता. म्हणजे थोडक्यात टू-इन-वन अशी व्यवस्था केली होती. गणेश नावाच्या एका जुन्या शिष्यावर या वायर बदलण्याची विशेष जबाबदारी टाकण्यात आली होती. तो अगदी बिनचूक, वेळेनुसार ती स्पीकर व्यवस्था योग्य रीतीने, रोजच्या रोज हाताळीत असे. ते वायरिंग प्रकरण इतर लोकांच्या लक्षात येत नसे.
योगासने करताना प्रत्येकाने एक विशिष्ट आशी फुग्याची चड्डी व वरती उघडाबंब राहण्याचा नियम होता. पुरुषांनी फुग्याची चड्डी घातलेली पाहून मला फारच गंमतशीर वाटत होते. यापूर्वी फुग्याची चड्डी घातलेले पुरुष मी कधी चित्रपटातदेखील पाहिलेले नव्हते. विशेषतः काही वयस्कर लोक चड्डी घातलेले, ढेरी सुटलेले व वरती उघडेबंब बघून फारच विचित्र वाटत होते.
काही शिष्य वेळाने येऊन मागील बाजूस चक्क शवासन घालून पडून राहत होते. वर्ग संपल्यावर त्यांची समाधी भंग करून त्यांना "आता उठा आणि घरी जा" असे सांगावे लागत होते. एका थोर नेत्याने सांगितले आहे, "आपल्याला एक वेळ इतिहास बदलता येईल, मात्र भूगोल बदलता येणार नाही." थोडक्यात शेजारी बदलता येणार नाही. माझ्या बाबतीत नेमके असेच काहीतरी झाले. माझ्याच बाबतीत नेहमी असे का होते कुणास ठाऊक? कारण माझ्या शेजारी ज्या गॄहस्थांची जागा ठरवून दिली होती, ते अंगाने फारच जाडजूड होते. तरी त्यांची उंची सहा फूट तरी असेल व वजन जवळजवळ १२५ किलोच्या दरम्यान होते. ज्या वेळी ते योगासने करीत असत, त्या वेळी होणार्या शारीरिक कष्टामुळे ते उ ss उ ,पू ss पू असा काहीतरी चमत्कारिक आवाज काढीत होते. त्यामुळे माझी एकाग्रता भंग होऊन मला या गोष्टीचे जोरात हसू येत होते. अचानक फुटलेल्या या हसण्यामुळे आजूबाजूचे इतरही लोक हसू लागत व ही हसण्याची लागण सर्व वर्गभर पसरत होती. शेवटी ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, नेमकी तीच गोष्ट एक दिवस घडली. सरांनी सर्वाना सर्वांगासन करण्यास सांगितले होते. पाय वर करण्याच्या नादात हे भलेमोठे ग्रहस्थ नेमके माझ्याच अंगावर पडले. माझाही तोल गेला व मी पुढच्या शिष्याच्या अंगावर पडलो. पत्त्याचा एखादा बंगला कोसळावा तसे प्रत्येक जण एकमेकाच्या अंगावर पडू लागले. जे आगदीच पुढे बसलेले होते, त्यांनी भिंतीचा आश्रय घेतल्यामुळे ते नुसते नौकासन करून थांबले. या घटनेमुळे मला पाठदुखी थांबण्यासाठी किमान पंधरा दिवस सुट्टी घ्यावी लागली.
एकदा तर फार मोठा कहरच झाला. आमचे मुख्य शिक्षक काही कामानिमित्त परगावी गेले होते. जाताना सदानंद नावाच्या एका नवीन शिष्यावर ह्या वर्गाची सर्व जबाबदारी टाकण्यात आली होती. नियमित येणार्या व रोज स्पीकरच्या वायरी बदलणार्या गणेश नावाच्या शिष्याला या खेपेस डावलण्यात आले होते. गणेशने त्याचा राग मनात ठेवला होता. ह्या रागामुळे त्याने सरांच्या माईकला मुद्दाम वर्गातील स्पीकर जोडण्याऐवजी बाहेरील मंडइतील स्पीकर जोडून ठेवला. सदानंदाने जशी बोलण्यास सुरवात केली, तसा त्याचा आवाज आम्हाला ऐकू येण्याऐवजी मंडइतील लोकांना ऐकू येऊ लागला. सदानंदाने बोलण्यास सुरवात केली, "आता सर्वांनी खाली वाकायचे आहे व दोन्ही पायाचे आंगठे धरायचे आहेत." हे ऐकल्यावर बाहेर मंडइत बसलेले भाजीवाले, फळविक्रेते, देवाचा भक्तगण यांना काही कळेनासे झाले. "ग़ेली अनेक वर्षे आम्ही इथे व्यवसाय करतो, पण आम्हाला कधीच कुणी पायाचे आंगठे धरा असे सांगितले नाही!! मंडइत भाजी विकतो म्हणजे आम्ही काय गुन्हा केला आहे काय? कुठे आहे ते गुरुजी? म्हणत त्या भाजीवाल्यांनी जाब विचारण्यासाठी वर्गावरच चाल केली. नेहमीचे घालण्याचे कपडे हातात घेऊन मंडईतून पळता पळता आम्हा शिष्यांना भुई थोडी झाली.
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 10:02 am | टवाळ कार्टा
खी खी खी =))
10 Aug 2015 - 10:58 am | जडभरत
मस्तंय! अगदी फर्मास!!!
10 Aug 2015 - 11:05 am | एस
खी: खी: खू: खू:!
10 Aug 2015 - 11:29 am | सुधांशुनूलकर
लगे रहो..
मस्तय.
उगाच लांबण न लावता प्रसंग खुलवत नेला आहे.
10 Aug 2015 - 1:38 pm | अजया
धमाल =))
10 Aug 2015 - 2:06 pm | प्रियाजी
खूप हसले. अजून येउतेत की पुढचे फंडे. मस्त मजा.
10 Aug 2015 - 2:49 pm | gogglya
__/\__
10 Aug 2015 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
17 Aug 2015 - 8:51 am | श्रीरंग_जोशी
एकदम धमाल किस्सा.
वर्णनशैली आवडली. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
17 Aug 2015 - 10:57 am | उगा काहितरीच
+१
17 Aug 2015 - 11:09 pm | राघवेंद्र
+१
17 Aug 2015 - 11:24 pm | एक एकटा एकटाच
ही ही ही
18 Aug 2015 - 6:40 pm | मनोज श्रीनिवास जोशी
मस्त - लेखन आवडले.
18 Aug 2015 - 7:26 pm | विवेकपटाईत
मस्त आवडले.