नवी बाटली, जुनी दारु ...
एकदा एक कोंबडा उंच झाडावर आरामात शीळ घालत मजेत बसला होता. एक भुकेलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. आता ह्या कोंबड्याची शिकार करून टाकू असा विचार करीत कोल्हा त्याला म्हणाला, "मित्रा, तुला जंगलातला 'सर्वंकष शांती आणि एकोपा' हा नवा नियम कळला का? अरे, आता नव्या तहानुसार, कोणीही कोणाची शि़कार करणार नाही आणि या जंगलातील सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहतील. आता तू मला तुझा मित्रच मान आणि इथे खाली ये. आपण एकत्र इथेच गप्पा मारू."
कोंबडा यावर काहीच बोलला नाही. त्याला कोल्ह्याच्या लबाड स्वभावाची कल्पना होती. कोंबड्याने मान उंच करून दूरवर बघत असल्याचा बहाणा केला.
ते पाहताच कोल्हा म्हणाला, "तुला काय तिकडे काय दिसत आहे?"
यावर कोंबडा म्हणाला, "कोल्हेबुवा, ते पहा काही शिकारी कुत्री तिकडून येत आहेत. मला वाटते, ती टोळी इकडेच आपल्यालाच भेटायला येत आहे".
हे ऐकताच कोल्हा म्हणाला, "अरे बापरे,,मग मला आता निघायला हवं... पुन्हा भेटू!"
कोंबडा म्हणाला, "अहो हे काय? थोडे थांबा, मी खाली येतो, आपण दोघेही त्या टोळीची इथे वाट बघू आणि या शांतता-एकोप्याच्या नव्या तहावर गप्पा मारु .. "
कोल्हा त्यावर म्हणाला, "नको नको, मला जायलाच हवं, त्या कुत्र्यांच्या टोळीने या तहाबद्दल काहीच ऐकलेले नाही" आणि तो शक्य तितक्या वेगाने तिथून सटकला.
मोराल ऑफ द श्टोरी - अचानक उसळून आलेल्या मित्रप्रेमाला भुलून जावू नये.
इसापनीतीतली ही गोष्ट आठवली ती वॉल स्ट्रीट जर्नल मधे प्रसिद्ध झालेली ही मुलाखत वाचून ...
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे पती असिफ झरदारी हे सध्या फारच फॉर्मात आहेत. भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांची ख्याती आहे. बेनजीर भुट्टो पंतप्रधान असताना ह्या महाशयांनी भ्रष्टाचाराचे नवे नवे विक्रम प्रस्थापित केले. सध्या ते पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत.
या साहेबांना सध्या भारतप्रेमाचे भलतेच उमाळे फुटत आहेत.
भारताच्या विकासात ते हातभारही लावणार आहेत!
'पाकिस्तानी सिमेंटवर भारतीय लोक आपले रस्ते, पूल वगैरे बांधत आहे', 'पाकिस्तानच्या मिल्समधे बनलेले जीन्सचे कपडे भारतात वापरले जात आहे'; 'मुंबई, कांडला, कोची वगैरे पोर्ट वर जागा न मिळाल्या मुळे जहाजे कराचीच्या धक्क्याला लागत आहेत' वगैरे स्वप्नरंजन करून त्यांनी आपली अक्कल या मुलाखतीत पाजळली आहे.
तालिबानी दहशतीचा सामना करण्यासाठी अमेरिका आता पाकिस्तानात घुसून हल्ले करीत आहे आणि यातल्या बर्याचश्या हल्ल्यांची पाकिस्तानी सरकारला कल्पनाही दिली जात नाही हे आता उघड सत्य आहे. अशा नामूष्कीजनक स्थितीतही हे महाशय "आमचे अमेरिकेबरोबर मैत्रीचे संबंध आहेत" हे तुणतुणे वाजवत आहेत.
असो.
आता ही मुलाखत वाचून आपल्याकडे काही जणांना परत दिल्ली ते लाहोर-इस्लामाबाद--रेल्वे-विमान वगैरेची स्वप्ने पडू लागतील. पाकिस्तानात निवडून येणारा प्रत्येक पंतप्रधान/अध्यक्ष हे असे मनसुबे जाहीर करतो आणि नंतर ते फुसके बार आपल्याला महाग पडतात हा अनुभव लक्षात घेता या बडबडीकडे विश्वास ठेवणे शक्यच नाही हे नक्की...
मुलाखत वाचून तुम्हाला काय वाटतं?
वाचने
2804
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
सहमत!
तो ही एक कोल्हाच
In reply to तो ही एक कोल्हाच by भास्कर केन्डे
सहमत
राजकीय नेतृत्व
अभिजीत राव