मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
5 Jan 2014 - 11:28 pm

यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १)

नारदमुनी उवाच:
गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला.

तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे. तिला तेथील विलासी जीवनाचे फार आकर्षण वाटायचे, आणि आपणही तसेच भोगविलासाचे नागरी जीवन जगावे, असे वाटायचे. एकदा तिने मिरवणुकीतून थाटामाटात जात असलेली शंतनु राजाची स्वारी बघितली. त्याचा तो डामडौल, छत्रचामरे, सुवर्णाभूषणमंडित हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेली राजाची स्वारी वगैरे बघून ती थक्क झाली, आणि त्यानंतर दिवस-रात्र तिला हस्तिनापुराची राणी बनण्याचीच स्वप्ने दिसू लागली.

.

शंतनु राजा नजरेस पडावा, यासाठी ती घटका घटका राजप्रासादाबाहेर घुटमळू लागली. एकदा प्रासादात शिरण्याचा प्रयत्न करताना तेथील प्रहरींनी तिला हाकलून लावले, आणि तिच्या शरीरास येणार्‍या मासोळीच्या दुर्गंधीमुळे ‘मत्स्यगंधा’ म्हणून तिची कुचेष्टा केली.
या सर्व प्रकारामुळे काली फार अपमानित झाली आणि तिने प्रतिज्ञा केली, की एक दिवस मी शंतनु राजाची राणी म्हणून या प्रासादात वास्तव्य करेन … परंतु हे व्हावे कसे?

शंतनुची राणी झालेली गंगा ज्या किरात जातीची होती, त्या किरातांचे वर्चस्व कुरुराज्यात वाढत असलेले बघून धीवर आणि अन्य काही जातीचे लोक अस्वस्थ झाले. वन्यसंघाची आवळ्या-भोपळ्याची मोट खिळखिळी होऊ लागली. धीवरांना सुद्धा आपल्यातली एकादी युवती शंतनुची राणी व्हायला हवी, असे वाटू लागले. ही गोष्ट कालीला समजताच तिने आपली प्रतिज्ञा धीवरांच्या सभेत सांगितली. ते ऐकून सर्व धीवर प्रसन्न झाले, आणि त्यांनी अप्सरांकडून शिक्षण घेण्यासाठी कालीला पाठवले. अप्सरांकडून नृत्य, कामकला इ. बरोबरच तिने सुंदर कसे दिसावे, सुवासिक उटणी, लेप, पुष्पमाला इत्यादिंच्या योगाने आपले शरीर सदोदित सुवासाने दरवळत कसे ठेवायचे, वगैरे विद्याही आत्मसात केली. प्रासादात जाणे तर तिला शक्य नव्हते, मृगयेसाठी कधीतरी शंतनु इकडे येईल, आणि नदी पार करण्यासाठी आपल्या नौकेत स्वार होईल, या आशेने ती दररोज नौका चालवू लागली.

अप्सरांकडून शिकलेल्या विद्येचे प्रात्यक्षिक करून बघावे, म्हणून एक दिवस पाराशर नामक ऋषी नदी पार करण्यासाठी आलेले असता कालीने त्यांच्यावर आपले मोहजाल पसरले. पाराशरांपासून तिला जे अपत्य झाले, तेच पुढे कृष्णद्वैपायन व्यास म्हणून विख्यात ऋषि झाले.

शेवटी एक दिवस शंतनुचे आगमान झाले. नाना प्रकारची सुगंधी उटणी, कस्तुरी, चंदनादिचे सुवासिक लेप आणि पुष्पमाला यांच्या योगाने दूरवर कालीच्या शरीराचा सुगंध पसरला होता. त्या सुवासाने, आणि तिच्या सौंदर्याने धुंद झालेल्या शंतनुने काममोहित होऊन तिजकडे समागमाची मागणी केली.
.

तेवढ्यात तिचा धीवर पिता आणि त्याचे बलदंड सहकारी तिथे आले. त्यांनी शंतनुला अट घातली, की या संबंधातून जन्मणार्‍या मुलाला जर शंतनु आपला उत्तराधिकारी करणार असेल, तरच त्याने तिचे विधिवत पाणिग्रहण करून तिला राणी बनवावे, मगच समागम करावा. त्यावेळी शंतनुसोबत चारदोनच सैनिक होते, आणि पंधरा - वीस धटिंगण धीवरांपुढे त्यांची काहीच मात्रा चालणार नाही, असे बघून तो नाइलाजाने प्रासादात परतला. मात्र त्याला जळी काष्ठी पाषाणी केवळ ती सुंदर धीवरकन्याच दिसू लागून तो अगदी वेडापिसा झाला. त्याची ही स्थिती बघून देवव्रताने चवकशी केली, शंतनुला एकीकडे या सर्व प्रकाराची लज्जाही वाटत असल्याने, तो काही बोलेना. शेवटी शंतनुबरोबर वनात गेलेल्या सैनिकांकडून त्याला सर्व घटना समजल्यावर तो स्वत: धीवर वस्तीत गेला. तिथे कालीच्या पित्याने आपल्या सर्व अटी तर सांगितल्याच, शिवाय पुढे शंतनुपासून कालीला होणार्‍या संततीला, देवव्रताच्या भावी संततीकडून धोका निर्माण होण्याची भिती पण त्याने व्यक्त केली. देवव्रत मुळातच आपल्या उतारवयीन पित्याच्या कामांधतेमुळे वैतागलेला होता, त्यातून या सर्व प्रकारामुळे त्याच्या मनात फार घृणा दाटून आली. मुळातच स्त्रीसंगाविषयी असलेली त्याची वितृष्णा आणखीनच प्रखर झाली, आणि त्याने स्वत: आमरण अविवाहित राहण्याचे ठरवले. एवढेच नव्हे, तर त्याने आर्य आर्यांना त्यांची कामांधता, वृथा अभिमान, द्यूताचे व्यसन, मद्यपान, अन्य जमातीच्या स्त्रिया पळवून नेऊन त्यांना दासी बनवणे, वगैरे विषयी त्यांची समजूत घालून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन, आणि तरीही त्यांनी हे उद्योग सोडले नाहीत, तर समस्त आर्यांचा विनाश घडवून आणेन, अशी भीषण प्रतिज्ञा केली. या प्रसंगामुळे त्याचे भीषण, वा भीषम, भीष्म असेही नाव पडले.
धीवर मंडळींसह कालीला घेऊन भीष्म हस्तिनापुरास आला. लवकरच शंतनुचा विवाह कालीशी होऊन त्याने तिचे ‘सत्यवती’ असे नामकरण केले. यथावकाश सत्यवतीला दोन मुलगे झाले, त्यानंतर शंतनु मृत्यू पावला. चित्रांगद आणि चित्रवीर्य या दोन्ही मुलांची जबाबदारी सत्यवतीवर येऊन पडली. सत्यवतीने जरी आर्यांची जीवनपद्धती स्वीकारलेली असली, तरी तिचे स्वत:चे पूर्वायुष्य मात्र मासेमारी आणि नौका चालवणे, यातच गेलेले असल्याने आपल्या मुलांना ती चांगले संस्कार देऊ शकली नाही म्हणून म्हणा, किंवा उपजत गुणांमुळे म्हणा, ही दोन्ही मुलेही शंतनुप्रमाणेच फार हट्टी, दुराग्रही, तापट आणि कामासक्त अशी झाली. …

वयात आल्यावर चित्रांगदास स्त्रियांचा फार नाद लागला, नित्य नवीन स्त्रीच्या शोधात तो राहू लागला. मृगयेच्या मिषाने तो नेहमी ससैन्य फिरत राहून नवनवीन स्त्रिया मिळवण्याच्या खटपटीत असे. एकदा वनात काही अप्सरा त्याच्या नजरेस पडल्या.

.
चित्रांगद व त्याचे सैन्य बघून त्या घाबरून तातडीने गंधर्व वस्तीत परतल्या, परंतु चित्रांगदाने तिकडे ससैन्य प्रवेश करून त्या अप्सरांना बळजबरीने पकडून नेण्याचा प्रयत्न चालवला. गंधर्व प्रमुख चित्रसेनाला हे कळताच त्याने आपल्या सैन्यासह येऊन चित्रांगदावर हल्ला केला. चित्रांगद घाबरून पळत सुटला, परंतु गंधर्वांनी त्याचा पाठलाग करून हस्तिनापूरच्या बाहेरील अरण्यात त्याला ठार केले, आणि आपल्या अप्सरांची सुटका केली.

चित्रवीर्य देखील आपल्या भावाच्या वळणावरच गेला, परंतु चित्रांगदाच्या उदाहरणामुळे तो फार घाबरला, आणि त्याने प्रासादाबाहेर जाणेच सोडले. अर्थातच स्त्रिया पळवून आणणे वगैरे उद्योग त्याने केले नाहीत, मात्र प्रासादातच विपुल दासी असल्याने तो सदैव त्यांच्यातच रमू लागला.

(क्रमश:)

संस्कृतीकलावाङ्मयमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2014 - 12:03 am | संजय क्षीरसागर

मात्र प्रासादातच विपुल दासी असल्याने तो सदैव त्यांच्यातच रमू लागला.

हे येऊ द्या.

चित्रगुप्त,

हाही भाग नेहमीप्रमाणेच अगदी उत्तम. त्यावेळच्या त्या अप्सरांची ती जलक्रिडा ... काय लिहू ??? *crazy*

*yes3*

विनोद१८

चित्रगुप्त's picture

6 Jan 2014 - 8:39 am | चित्रगुप्त

मुळात 'चित्रवीर्य' असलेले नाव पुढे 'विचित्रवीर्य' का आणि कसे झाले असावे? या प्रश्नातून पुढील कथानक आकार घेऊ शकते.

अगदी हाच प्रश्न पडला ! पुढील भाग वाचण्यास उत्सुक !

जाता जाता :--- च्यामारी हल्ली अप्सरा नामक कंप्लीट पॅकेज ची वानवा झालीय की काय ? ;)

चित्रगुप्त's picture

6 Jan 2014 - 7:19 pm | चित्रगुप्त

हल्ली अप्सरा नामक कंप्लीट पॅकेज ची वानवा झालीय की काय ?

याचा जालीय शोध घेऊन तुम्हीच यावर एक लेख लिहावा, असे सुचवतो.

मदनबाण's picture

7 Jan 2014 - 1:50 pm | मदनबाण

हा.हा.हा... सध्या तरी या शोधाला मी पास म्हणतो ! ;)

जेपी's picture

6 Jan 2014 - 10:30 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

बर्फाळलांडगा's picture

6 Jan 2014 - 11:07 am | बर्फाळलांडगा

अन युगंधर वगैरे वाचले की आशा लिखाणाचा तूफान हुरूप येतो.

होऊ दे मनोरंजन!

पैसा's picture

6 Jan 2014 - 11:19 am | पैसा

तुम्ही महाभारत सगळं नव्याने लिहिताय की!

चित्रगुप्त's picture

7 Jan 2014 - 10:00 am | चित्रगुप्त

महाभारतावरचे एकादे अगदी बाळबोध पुस्तक वाचताना देखील काही प्रश्न मनात उभे रहातात. उदा. 'गंगा ही खरोखर कोण असावी? तिने आपली सात मुले नदीत का बुडवली? आठवा मुलगा झाल्यावर ती त्याला घेऊन का गेली? मत्स्यगंधेची योजनगंधा कशी झाली? 'विचित्रवीर्य' असे नाव का ठेवले? चित्रांगद गंधर्वांकडून मारला गेला, तो काय कारणाने ? विचित्रवीर्याने स्वतः पण जिंकून विवाह करण्या ऐवजी त्याच्यासाठी भीष्मालाच काशिराजाच्या मुली का पळवून आणाव्या लागल्या? द्रौपदीला पाच जणांची पत्नी का बनावे लागले? तसे अन्य स्त्रिया उदा. सुभद्रा, हिडिंबा, चित्रांगदा, उलूपी वगैरेंना का करावे लागले नाही ? पांडवांनी खांडववन का जाळले ? पुढे जनमेजयाने नागवंशाचा नायनाट करणे का सुरु केले ? वगैरे वगैरे.
या आणि अश्या प्रश्नांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
(या प्रश्नांची महाभारतातील उत्तरे, उदा.वर-शाप, चमत्कार इ.इ. आजच्या सुजाण वाचकाला पटण्यासारखी नाहीत).

पैसा's picture

7 Jan 2014 - 10:52 pm | पैसा

महाभारताकडे बर्‍याच कोनातून आणि चष्म्यांतून बघता येतं!

दृष्टिकोन अन शैली दोन्हीही जबराट आवडले. औ आंदो जल्दीच !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2014 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! लगे रहो !!

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Jan 2014 - 7:38 am | लॉरी टांगटूंगकर

हेच म्हणतो,
मस्त ! लगे रहो !!

प्रसाद गोडबोले's picture

7 Jan 2014 - 1:45 pm | प्रसाद गोडबोले

जहबहराट.

लईच भारी असे नाविन्यपुर्ण अँगल्ने महाभारताकडे पहायला मजा येतीये :)

महाभारत किती ई.स. पुर्व झाले असावे? मोहेजो दोडो व हडप्पा याचा महाभारताशी काही संबंध आहे का?

ईतिहास वेडी प्रिती

इतिहासाचार्य चिंतामणि वैद्य यांच्या १९१८ मधे प्रकाशित 'श्रीमहन्महाभारत-उपसंहार' या ग्रंथातील एका विस्तृत लेखात महाभारताचा काल या विषयाचा परामर्ष घेतलेला आहे. त्यानुसार खुद्द महाभारतात याविषयी परस्पर विरुद्ध उल्लेख सापडत असल्याने नेमका कालनिर्णय करणे अवघड असल्याचे सांगितले आहे. या लेखात मेग्यास्थिनीस, आर्यभट्ट, वराहमिहिर, मॅक्डोनाल्ड, वेबर, रावबहदुर दीक्षित, वेदांग ज्योतिष, गर्गसंहिता, पौराणिक वंशावळी, ऋग्वेद, वगैरेंचा उहापोह करत शेवटी मेग्यास्थनीस व शतपथ ब्राह्मणाचा पुरावा ग्राह्य धरत भारती युद्धाचा काळ इ.स. पूर्व ३१०१ असल्याचे प्रतिपादन केले आहे.

अर्थात हा लेख १९१८ चे असल्याने त्यानंतर या विषयावर अधिक संशोधन झाले असेलच, त्याविषयी आणि मेहेन्जादेडो, हडप्पा वगैरे बद्दल वल्ली, बॅटमॅन वगैरे सांगू शकतील, असे वाटते.

बॅटमॅन's picture

7 Jan 2014 - 6:42 pm | बॅटमॅन

वैद्य साहेबांचा लेख मी वाचलेला नाही. पण मागेच एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे इसपू ३१०१ हा काळ आहे अशा मान्यतेमागे बदामी येथील चालुक्य पुलिकेशीचा इ.स. ६३४ चा शिलालेख आणि कदाचित आर्यभटीय (इ.स.५०० च्या आसपास) या दोन ठिकाणी वगळता अन्यत्र कुठेही कलियुगाब्दाची गणना सापडत नाही. कुठेही म्हणजे त्यांआधीच्या कुठल्याही ग्रंथांत. यानंतरच्या ग्रंथांत बर्‍याचदा ही गणना दिसते, उदा. समर्थ रामदासांनी दासबोधाचा रचनाकाल सांगताना "चारी सहस्र सातसे साठी | इतकी कलियुगाची राहटी |" अशा भाषेत सांगितला आहे.

या मान्यतेला दुसरा कुठलाच पुरावा नाही. शिवाय इसपू ३००० काळात भारतात घोडे सापडत नाहीत, लोखंडकामदेखील तेव्हा नव्हते. तस्मात महाभारत युद्ध तेव्हा झालेले असणे संभव वाटत नाही. अतिशयोक्त भाग वगळून युद्धाची बेसिक कथा खरी आहे असे मान्य करावयास हरकत नसावी असे संशोधक मानतात. त्यानुसार अन अन्य उत्खननांनुसार इसपू १०००-१२०० च्या आसपास हा काळ होता म्हणता यावे.

पैसा's picture

7 Jan 2014 - 10:56 pm | पैसा

घोडे आर्यांनी भारतात आणले असं म्हणतात ना?

बॅटमॅन's picture

7 Jan 2014 - 11:22 pm | बॅटमॅन

होय म्हणतात तसं.

पण ते अर्ग्युमेंट अंमळ फसवं आहे. कारण वैदिक धर्माचे पालन करणारे आर्य हे एकदाच काय ते भारतात आले हे चूक आहे. शेकडो वर्षे त्या टोळ्या इकडे येतच होत्या. त्यांची भाषा संस्कृत किंवा त्याजवळची होती. अशा अनेक मायग्रेशनपैकी एक म्हणजे वैदिक आर्य. संस्कृतसदृश भाषा बोलणार्‍या टोळ्या या वैदिकांपूर्वीही भारतात आल्याच होत्या.
नॉट ओनली द्याट, वैदिक आर्य म्हणजेही एकच एक टोळी नव्हती. त्यांच्यातही किमान पाचदहा तरी मुख्य शाखा होत्या.

त्यामुळे घोडा आणणारे ते बहुतकरून आर्य असावेत पण घोड्यापूर्वीही 'आर्यसदृश' लोक भारतात असण्याची शक्यता आहे नव्हे, इनफॅक्ट ते होतेच. ऋग्वेदात अनार्य लोक सोडून अजून एक क्याटेगरी आहे. दास/दस्यू या नावाने ते वळखले जातात.

पैसा's picture

7 Jan 2014 - 11:27 pm | पैसा

त्याशिवाय भारतात लोक कसे कसे आले असावेत याबद्दल झालेल्या संशोधनाबद्दल इस्पीकचा एक्का यांच्या लेखमालिकेत उत्तम माहिती होती ती आठवली. घोडा हा भारतातला एतद्देशीय प्राणी आहे का? नसेल तर "कोणीतरी" (भटकत आलेल्या लोकांनी) घोडे भारतात आणले हे खरे असू शकेल.

एतद्देशीय नक्कीच नाही. जंगली घोडा हा कझाखस्तान आणि मंगोलिया येथील काही भागांतच आढळतो.

जर महाभारत काळात भारतात घोडे नव्हते तर रथाला काय जुंपत होते?

चित्रगुप्त's picture

9 Jan 2014 - 4:48 pm | चित्रगुप्त

राम-ल्क्ष्ममणाचा काळ तर महाभारताच्याही पूर्वीचा. तेंव्हा तर घोडे होते म्हणे. शिवाय महाभारतात घॉड्यांचे उल्लेख येतातच.
उत्खननात घोड्यांची हाडे सापडली नसावीत अजून.

आँ??? मी कधी म्हणालो महाभारत काळात घोडे नव्हते म्हणून????????

महाभारतात घोड्यांचे उल्लेख सापडतात म्हणून ज्या काळात घोड्यांचे पुरावे सापडतात त्या काळाच्या आधी महाभारत घडले असणे असंभव वाटते इतकेच म्हटले आहे.

आनंदी गोपाळ's picture

14 Jan 2014 - 11:59 pm | आनंदी गोपाळ

रथांना बैल जुंपण्याची देखिल सिस्टीम आहे.
वर बॅटम्यान यांनी बरोबर सांगितलेय. 'महाभारत काळी घोडे नव्हते..' हे वाक्य मुळात चूक आहे. 'घोडे नव्हते त्या काळी महाभारत घडलेले असू शकत नाही' हे बरोबर. म्हणजेच, अस्मितेचा चष्मा बाजूस ठेवून महाभारत जरा अधिक अर्वाचिन आहे, असे मान्य करावे, इतकाच याचा अर्थ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2014 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

आतापर्यंतच्या पुराव्यांप्रमाणे साधारण असे समज आहेत:

१. घोडा माणसाळवण्याचा काळ इ स पूर्वी ४,००० वर्षे (म्हणजे आजच्या ६००० वर्षे अगोदर) आणि जागा ब्लॅक सी च्या उत्तरेच्या स्टेपे. हे त्या जागी झाले याचे मुख्य कारण तेथिल माणसे जास्त हुशार होती हे नाही तर तेथिल प्राचीन जंगली घोड्यांच्या जाती माणसाळवयास योग्य होत्या हे आहे.

२. घोडे रथाला/गाडीला जुंपून वापरणे सुरू होण्याचा काळ साधारण इ पू १८०० वर्षे (म्हणजे आजच्या ३,८०० वर्षे अगोदर)

३. घोड्यावरून रपेट करणे हे जरी वर १ मघ्ये सांगितल्याप्रमाणे खूप अगोदर सुरू झाले असले तरी खोगीर,रिकीब, इ चे शोध रथ/गाडी यांच्या शोधानंतर लागले. त्यानंतर घोड्यावर आरोहण करून त्याला युद्धातले एक फार प्रभावी वाहन म्हणून वापरायला सुरूवात झाली: सर्वप्रकारच्या भूमीवर योग्य, सर्व ऋतूंत योग्य, योग्य दिशेला सहज वळवता येणारे, जलद गतीचे, पायदळाला तुडवत त्याच्यावर उंचावरून हल्ला करणे शक्य करणारे, इ (ऑल-टेरेन, ऑल-सीझन, मोस्ट मनुव्हरेबर, स्विफ्ट, ट्रॅम्पलर अँड एनेब्लर फॉर अटॅकिंग एनिमी फ्रॉम हायर पोझिशन, इ).

सर्वात महत्वाचे आक्रमक हत्यार म्हणून घोड्याची महती अगदी पहिल्या महायुद्धात (इ स १९१४-१८) मोटरवर चालणारे ट्रक आणि रणगाडे वापरायला सूरू होईपर्यंत कायम होती.

चित्रगुप्त's picture

7 Jan 2014 - 7:07 pm | चित्रगुप्त

वैद्यांचा लेख बराच किचकट आणि विद्वत्तापूर्ण असल्याने मीही अगदी तपशीलात जाऊन वाचलेला नाही. बाकी आमची रुचि आपल्या कल्पनेचे वारू भरधाव सोडण्यात आहे. काळ कोणताका असेना.

बॅटमॅन's picture

7 Jan 2014 - 11:15 pm | बॅटमॅन

बाकी आमची रुचि आपल्या कल्पनेचे वारू भरधाव सोडण्यात आहे. काळ कोणताका असेना.

हे आवडलं, आणि ते आपल्याला मस्त जमतंय हे ठाऊक असल्याने इतकेच म्हणेन

" भवतु प्रचुरो व्ययः , मिपा तु अस्माकमेव" ;)

सस्नेह's picture

7 Jan 2014 - 11:37 pm | सस्नेह

समांतर महाभारत म्हणू का याला ?

संजय क्षीरसागर's picture

8 Jan 2014 - 12:06 am | संजय क्षीरसागर

*secret*

मित्रांनो,
"महाभारताचा काल काय? अभिजित नक्षत्राची अनुपस्थिती" आदि किचकट व वादावादीला भरपूर वाव असलेल्या विषयावर अहमहमिकेने भाग घेणाऱ्यात ओक कुलातील कोणी नसणे शक्य आहे काय?
निलेश ओक यांनी अमेरिकेतून महाभारताचा काल विषयावर अभ्यास करून काढलेले निष्कर्षही धक्कादायक असणार!

निलेश ओक यांनी अमेरिकेतून महाभारताचा काल विषयावर अभ्यास करून काढलेले निष्कर्षही

मग कोणता काळ ठरतो म्हणे, महाभारत युद्धाचा?

शशिकांत ओक's picture

14 Jan 2014 - 11:53 pm | शशिकांत ओक

महाभारताचा काल वर धागा उपसता येईल.

आनंदी गोपाळ's picture

15 Jan 2014 - 12:03 am | आनंदी गोपाळ

बावीस हजार वर्षे जुना!
याला म्हंतात अस्मितेचा चष्मा ;)
नाडिपट्ट्या जास्त ल्ह्याव्या लागतील ना इक्तं जुनं जालं तं?

शाम भागवत's picture

9 Jul 2024 - 2:20 am | शाम भागवत

५ तासांपूर्वी निलेश ओक यांचा व्हिडिओ युट्युबवर आलाय.

खालील लिंक वेब ब्राउझरमधे उघडा.
https://youtu.be/GBxJxwekgmM?si=uRZQE1meAmP7zGly

शाम भागवत's picture

14 Jul 2024 - 12:13 pm | शाम भागवत

३ तासांपूर्वी निलेश ओक यांचा भाग दुसरा युट्युबवर आला आहे.

खालील लिंक वेब ब्राउझरमधे उघडा.
https://youtu.be/IpVXFhG18WQ?si=B9uGbpwwLfVWxjlG

४० मिनिटांपैकी ज्यातिषशास्त्रावर आधारित ३-४ मिनीटे फारसं काही कळत नाही. पण ते जे सांगतात ते खगोलशास्त्राचे सहाय्याने तपासून पाहता येणे शक्य आहे. पण बाकीची ३६ मिनीटांत कुतूहलजनक माहीती पुढे येते

शाम भागवत's picture

17 Jul 2024 - 6:42 pm | शाम भागवत

निलेश ओक हे केमिकल इंजिनिअर. गेली ३२ वर्षे अमेरिकेत राहतात. तिथे जनरल इलेक्ट्रीक नावाच्या कंपनीत २० वर्षे काम करत होते. एकीकडे महाभारताचा अभ्यास चालूच होता. त्यासाठी निरनिराळ्या विषयांचा अभ्यास चालूच होता.
मात्र या अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून त्यांनी नोकरी सोडली. आता ते Institute of Advance Science, Dartmouth, Massachusetts येथे अर्धवेळ प्रोफेसरची भूमिका निभावत आहेत.

सर्व पुरावे ते आधुनिक शास्त्राच्या आधारे देतात. माझं म्हणणं खोडून काढायला पुढे या असं म्हणतात. निरनिराळे शास्त्रीय पुरावे ते देतात. हे पुरावे महाभारत रामायण अजिबात माहीत नसलेल्या पाश्चात्य संशोधकांचे असतात.

इतकी वर्षे अमेरिकेत राहूनही त्यांच शुध्द मराठी ऐकल्यावर आश्चर्यचकित व्हायला होतं. मुख्य म्हणजे एखाद्या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द आठवला नाही तर ते त्याचं त्यांनाच खटकतं व ते मुलाखतकारीलाच प्रतिशब्द सुचावायला सांगतात. इथे तर त्यांची मराठी भाषा सखोल आत्मसात करण्याची इच्छा जाणवत राहाते.

मराठी बरोबरच त्यांचं हिन्दी व संस्कृत भाषेवर पण चांगलीच पकड आहे. बोलताना हसत हसत बोलण्याची व अवघड विषय समजावून सांगण्याची पध्दत चांगली आहे. त्यांना कोणताही हायपोसिस मांडण्यात रस नसून प्रत्यक्ष पुराव्यांद्वारे बोलायला आवडतं. त्यामुळे एखादं हायपोसिस मांडून त्याद्वारे मुद्दे मांडणाऱ्यांना ते चर्चेचं आवाहन करतात.
एकंदरीतच त्यांचा व्यासंग पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं.
असो.
_/\_

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2014 - 10:26 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम! :)

मुक्त विहारि's picture

10 Jan 2014 - 4:11 pm | मुक्त विहारि

मस्त...

हा पण भाग आवडला.

मुळ महाभारत कारांना का बरे सुचले नसावे ?

वडापाव's picture

14 Jan 2014 - 4:20 pm | वडापाव

पुढचा भाग कधी???

चित्रगुप्त's picture

16 Jan 2014 - 8:17 am | चित्रगुप्त

पुढचा भाग कधी???

लवकरचः "विचित्रवीर्याची विचित्र कहाणी"

लवकर येऊ द्या चित्रगुप्त जी ...

शंतनु आणि काली (सत्यवती)
.

कर्नलतपस्वी's picture

20 Jun 2024 - 8:53 am | कर्नलतपस्वी

-तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
निळा गर्द भासे नभाचा किनारा
जसे ऋतू संचिताचे मोकळे

अन मंग महाभारताचा लोचा झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2024 - 11:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय चांगला उपयोग करीत आहात. चित्र आवडलं. मगरींचं पाण्यातलं प्रमाण जरा संख्या जास्तच वाटतंय,
पण एवढं तेवढं चालायचंच. और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

20 Jun 2024 - 8:01 am | शशिकांत ओक

शंतनू राजा 'शिकार' करायला जाता जाता पाणवठ्यावर नौका विहारी ललना पाहून विरघळला!
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून महाभारत पुन्हा लिहायची, पहायची वेळ आली आहे असे वाटू लागले आहे.

शाम भागवत's picture

17 Jul 2024 - 6:41 pm | शाम भागवत

निलेश ओक हे केमिकल इंजिनिअर. गेली ३२ वर्षे अमेरिकेत राहतात. तिथे जनरल इलेक्ट्रीक नावाच्या कंपनीत २० वर्षे काम करत होते. एकीकडे महाभारताचा अभ्यास चालूच होता. त्यासाठी निरनिराळ्या विषयांचा अभ्यास चालूच होता.
मात्र या अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून त्यांनी नोकरी सोडली. आता ते Institute of Advance Science, Dartmouth, Massachusetts येथे अर्धवेळ प्रोफेसरची भूमिका निभावत आहेत.

सर्व पुरावे ते आधुनिक शास्त्राच्या आधारे देतात. माझं म्हणणं खोडून काढायला पुढे या असं म्हणतात. निरनिराळे शास्त्रीय पुरावे ते देतात. हे पुरावे महाभारत रामायण अजिबात माहीत नसलेल्या पाश्चात्य संशोधकांचे असतात.

इतकी वर्षे अमेरिकेत राहूनही त्यांच शुध्द मराठी ऐकल्यावर आश्चर्यचकित व्हायला होतं. मुख्य म्हणजे एखाद्या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द आठवला नाही तर ते त्याचं त्यांनाच खटकतं व ते मुलाखतकारीलाच प्रतिशब्द सुचावायला सांगतात. इथे तर त्यांची मराठी भाषा सखोल आत्मसात करण्याची इच्छा जाणवत राहाते.

मराठी बरोबरच त्यांचं हिन्दी व संस्कृत भाषेवर पण चांगलीच पकड आहे. बोलताना हसत हसत बोलण्याची व अवघड विषय समजावून सांगण्याची पध्दत चांगली आहे. त्यांना कोणताही हायपोसिस मांडण्यात रस नसून प्रत्यक्ष पुराव्यांद्वारे बोलायला आवडतं. त्यामुळे एखादं हायपोसिस मांडून त्याद्वारे मुद्दे मांडणाऱ्यांना ते चर्चेचं आवाहन करतात.
एकंदरीतच त्यांचा व्यासंग पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं.
असो.
_/\_

शाम भागवत's picture

20 Jul 2024 - 1:19 pm | शाम भागवत

आज ३ रा भाग प्रसिध्द झाला. पहिल्या दोन भागापेंक्षा हा आणखीनच जास्त आवडला. जास्त स्पष्ट करून सांगितलं आहे असं वाटलं
https://youtu.be/XN28vmSkhK0?si=up4Qu9Do9MIz1hyd