✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

च
चतुरंग यांनी
Mon, 10/21/2013 - 11:34  ·  लेख
लेख
जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला! 1 ६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन! हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे. आधीच्या गेल्फंड्-विशी सामन्याचं ठिकाण ऐनवेळी चेन्नैहून मॉस्कोला हलवलं गेलं होतं. तो अपमान भारतीय बुद्धीबळ महासंघाला चांगलाच सलत होता. त्यामुळे गेली दोन वर्षे अथक प्रयत्न करुन शेवटी हा सामना चेन्नैला खेचून आणण्यात त्यांना अखेर यश मिळालं. 'विशी'नं तीन वर्षांपूर्वीच चाळिशी पार केलीये ;)आणि कार्लसन आहे २२ वर्षांचा (अजून गद्धेपंचविशीतच आहे म्हणाना), म्ह्णजे जवळपास एका पिढीचे अंतर आहे दोघांच्या वयात! जगज्जेतेपदाच्या सामन्यात खेळाडूंच्या वयात इतकं अंतर असलेली ही दुसरीच वेळ आहे (याआधी कोर्चनॉय - कार्पोव यांच्या वयातही २० वर्षांचं अंतर होतं). गॅरी कास्पारोवने निवृत्त होताना आनंदला उद्देशून पुढील मुक्ताफळे उधळली होती त्याची मला याठिकाणी प्रकर्षाने आठवण झाली - I’m out, now you’re the oldest! You’re the dinosaur now! - (comments upon his own retirement) - Garry Kasparov Vishy is a brilliant player. But it is very difficult to compete at 40. He is up against people half his age. I will be surprised if he can go on any longer. He can fight against anyone but time. - Garry Kasparov गॅरीने हे दिवे लावल्यानंतर आनंदने दोनदा विजेतेपद पटकावले आहे! (गॅरीला बहुदा आता रिटायरमेंटचा पश्चात्ताप होत असावा! ;) ) आनंदचा एकूण अनुभव, त्याचा केवळ जगज्जेतेपदाच्या सामन्यांमधला प्रचंड अनुभव (आनंद हा जगातला एकमेव खेळाडू आहे की ज्याने, बाद फेरी, साखळी फेर्‍या आणि एकासएक लढत या तीनही प्रकाराने झालेल्या जगज्जेतेपदाच्या सामन्यात जेतेपद पटकावले आहे) याविरुद्ध कार्लसनचे तरुण रक्त आणि पहिल्यावहिल्या जेतेपदाची भूक असा हा अफलातून सामना होणार आहे! शिवाय या सामन्यात कार्लसनने पहिल्यांदाच 'इलनेस क्लॉज' समाविष्ट करायला भारतीय बुद्धीबळ महासंघाला भाग पाडले. या क्लॉज अंतर्गत खेळाडू काही कारणाने आजारी पडला तर त्याला दोन दिवसांपर्यंत सुटी घेता येऊ शकेल. भारतातले हवामान, पाणी आणि खाणे या गोष्टींची धास्ती घेऊन कार्लसनने हा क्लॉज घातलाय असं समजतं. हाएट रीजन्सीने परोपरीने समजावले की आम्ही तुझ्या आहाराची सगळी काळजी घेऊ, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही याची ग्वाही देतो परंतु हा क्लॉज आलाच! (शिवाय कार्लसन स्वतःचा खानसामा देखील घेऊन येणार आहे!) आनंदची प्रतिक्रिया सावध होती "मॅग्नुस एक जबाबदार खेळाडू आहे आणि या क्लॉजचा गैरवापर होणार नाही अशी मला आशा आहे!" आता जरा या दोन्ही खेळाडूंची ओळख विश्वविजेतेपदाच्या सामन्याच्या दृष्टिकोनातून करुन घेऊयात. मॅग्नुस कार्लसन - 2 १९९० साली जन्मलेला नॉर्वेचा हा तरुण पोरगा गेल्या दहा वर्षात बुद्धीबळाच्या नकाशावर एखाद्या धूमकेतूसारखा उगवला आणि झपाट्याने त्याने बुद्धीबळाचे अवकाश व्यापून टाकले. वयाच्या तेराव्या वर्षी जगज्जेत्या गॅरी कास्पारोवला बरोबरीत रोखायची अचाट कामगिरी याने केली आहे (यू ट्यूब दुवा या सामन्यात गॅरीची एका १३ वर्षाच्या पोरासमोरची उद्धट देहबोली तिडीक आणते. विशेषतः सामना सुरु होताना डाव्या हाताने बोर्डावरची धूळ झटकल्यासारखे हात करणे. अँड ही पेड फुल प्राईस. मॅच ड्रॉ झाली). साडेतेरा वर्षांचा असताना हा ग्रँडमास्टर झाला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी याचे एलो रेटिंग होतं २८०१! नुकतंच मार्च २०१३ मधे त्याने आतापर्यंतचं सर्वोच्च एलो रेटींग २८७२ मिळवलं आहे. चेस प्रॉडिजी असं याचं वर्णन केलं जातं. सॅवॉय प्लेस लंडन, इथे मार्च २०१३ मध्ये झालेल्या कँडिडेट सामन्यातल्या आठ खेळाडूंमधून हा आनंदचा आव्हानवीर म्हणून पुढे आला. अर्थात कँडिडेट स्पर्धेत गंमतच झाली होती. कार्लसन आणि क्रामनिक दोघेही अटीतटीने स्पर्धा खेळत होते. अर्ध्या गुणाचाही फरक नव्हता दोघांच्यात शेवटच्या सामन्यापर्यंत. दोघांपैकी कोण अंतिम विजेता होऊन विश्वचषकासाठी आव्हानवीर ठरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अशा निर्णायक क्षणी (अतीव ताणामुळे असेल कदाचित) दोघेही आपापले शेवटचे डाव चक्क हारले! (नाही, अजून बुद्धीबळात तरी फिक्सिंगची लागण झालेली नाही, त्यामुळे हे दोघे खरोखरंच सामना हारले होते हे नक्की!!) ८.५ गुणांसह बरोबरी झाली. संपूर्ण स्पर्धेत जो जास्त डाव जिंकलेला असेल तो निर्णायक विजेता या नियमाच्या आधारे कार्लसनने बाजी मारली! क्रामनिक फार दु:खी झाला होता, सरळ आहे, हातातोंडाशी आलेली संधी नियमावर आधारित निकषाने निसटून जावी हे दुर्दैवच! या स्पर्धेनंतर नियमांवरती सगळीकडून ताशेरे ओढले गेले. नोवेंबरमधल्या आनंद-कार्लसन सामन्याचं वातावरण असं मार्चपासून तापत आलं आहे. जून २०१३ मध्ये झालेल्या ताल मेमोरियल स्पर्धेत ४५ वर्षांच्या बोरिस गेल्फंडनं आपण अजूनही किती ताकदीचा खेळ करु शकतो हे दाखवत कार्लसनला दुसर्‍या क्रमांकावर ढकलून स्पर्धा जिंकली होती! याच स्पर्धेत कार्लसनने आनंदला जवळपास चिरडूनच हरवलं होतं! आनंदचा हा डाव आणि एकूण स्पर्धेतला खेळ खरोखरीच त्याच्यातलं बुद्धीबळ संपत आलं आहे की काय असं वाटावं इतका वाईट झाला होता (दहा खेळाडूंमधे आनंद आठव्या क्रमांकावर राहिला! :(). तर अशा सगळ्या उलथापालथीतून शेवटी कार्लसनची चेन्नै एक्सप्रेस मार्गाला लागली! हा कार्लसन आहे तरी कसा? बराचसा अबोल आहे. कास्पारोवसारखा माजोरडेपणा आणि उद्धटपणा त्याने अजूनतरी दाखवलेला नाही. तसा तो बहुरंगी आहे. २०१० मध्ये जी-स्टार या कपड्यांच्या कंपनीने त्याला पुरुष मॉडेल म्हणून करारबद्ध केलंय. 6 आणि 'लॉर्ड ऑफ दि रिंग्ज' फेम हॉलीवुड अभिनेत्री लिव टेलरसोबत त्याने या कंपनीसाठी मॉडेलिंग केलंय! :) 7 जगातला एक नंबरचा खेळाडू असला तरी याचे पाय बर्‍यापैकी जमिनीवर आहेत असे म्हणायला हरकत नाही. याच्या खेळाची शैली कशी आहे याबद्दल बरीच चर्चा होत असते. "Self-confidence is very important. If you don’t think you can win, you will take cowardly decisions in the crucial moments, out of sheer respect for your opponent. You see the opportunity but also greater limitations than you should. I have always believed in what I do on the chessboard, even when I had no objective reason to. It is better to overestimate your prospects than underestimate them." "Some people think that if their opponent plays a beautiful game, it’s OK to lose. I don’t. You have to be merciless." हे कार्लसनचे उद्गार वाचले की त्याची आक्रमकता ध्यानात यायला हरकत नाही! बर्‍याच जणांना त्यात कार्पोवच्या खेळाची सुधारित आवृत्ती दिसते. प्रतिस्पर्ध्याच्या खेळण्याच्या वाटा एकेक करुन बंद करत, फास आवळत नेणे हे साम्य दिसते. परंतु माझ्यामते कार्लसन कार्पोवपेक्षा आक्रमक आहे. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे तो बराचसा इंट्यूशनने खेळतो. प्रचंड विश्लेषणाने खेळी ठरवण्यापेक्षा अंतस्फूर्तीने खेळी ठरवून त्यात अगदी ढळढळीत तोटे किंवा चुका नाहीत ना इतके तपासून चाल करायची हा त्याचा विशेष. धोका पत्करण्याची त्याची तयारी असते, शिवाय त्याचा बचाव अतिशय कल्पक आहे. अगदी हाताबाहेर जात असलेल्या परिस्थितीतूनही थंड डोक्याने तो डाव बरोबरीत नेऊ शकतो. आनंद, क्रामनिक आणि गेल्फंड हे सध्याचे ओपनिंगमधले महारथी समजले जातात. त्यांच्या तुलनेत कार्लसनचे ओपनिंग दुबळे आहे, तो ओपनिंगची फारशी तयारी करत नाही अशी एक चर्चा ऐकू येत असते. त्यात थोडे तथ्य देखील आहे. त्याला स्वतःला ओपनिंग वरती फार वेळ घालवून अभ्यास केलेला पसंत नाहीये. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक खेळीला तो त्याची मोहोरी योग्य जागी ठेवली जातील याची काळजी घेतो आणि तेवढे पुरेसे आहे! डावाच्या मध्यात तणाव निर्माण करुन प्रतिस्पर्ध्याला चूक करायला भाग पाडणे आणि छोटीशी जरी चूक झाली तरी त्याचा फायदा उठवून डावाचा कब्जा घेणे अशी त्याची खेळाची पद्धत दिसते. डावाच्या मध्यात आणि अंतिम टप्प्यांवरती तो फारच चांगला खेळतो. मला जाणवलेली त्याची आणखीन एक खासियत म्हणजे पटावरची जास्तितजास्त जागा भराभर व्यापत जाणे. सर्वसाधारपणे राजा आणि वजीरासमोरची प्यादी सोडली तर इतर प्यादी डावाच्या सुरुवातीलाच फार चटकन पुढे ढकलू नयेत असा संकेत आहे परंतु कार्लसनच्या बर्‍याचशा डावात तो प्याद्यांनी चाल करुन अंगावर येतो आणि मागून मोहोरी सरकवत कब्जा घेत जातो. एकदा जागेची घुसमट सुरु झाली की प्रतिस्पर्ध्याच्या मोहोर्‍यांना हालचालीला वाव राहत नाही. डावाच्या मध्यात आवश्यक असणारी १०-१२ खेळ्यांचे वेरिएशन बघण्याची क्षमता, काही चांगल्या खेळ्यांमधून सर्वोत्तम खेळी हुडकणे हे त्याच्या इंट्यूशनमुळे शक्य होते. त्याची वेळावरतीही चांगलीच हुकुमत आहे. फार क्वचित तो टाईमट्रबलमधे सापडतो. प्रामुख्याने पोझीशनल खेळ असे त्याच्या खेळाचे वर्णन करता येईल. ऑगस्ट महिन्यात कार्लसनने चेन्नैला भेट देऊन सामन्याच्या ठिकाणाची पाहणी केली.चेन्नैवासियांनी त्याचे खास दक्षिण भारतीय पद्धतीने स्वागत केले. 2 त्याला बघायला भरपूर गर्दी लोटली होती. तो मॉडेलदेखील असल्याने प्रेक्षकांमध्ये सहाजिकच मुलींचा भरणा होता! 3 त्याची मुलाखत देखील झाली. ज्युनियर जागतिक विजेत्या, आशियाई स्पर्धा विजेत्या दहा खेळाडूंबरोबर तो एकावेळी दहा डाव खेळला आणि त्यातल्या चौघांनी त्याला चक्क हरवले देखील! 4 लहानग्यांच्या तडाखेबंद खेळानं तो अचंबित झालेला होता. (चेन्नैच्या कडक मसालेदार रस्समनं त्याला चांगलाच झटका दिला - ये बात कुछ अलग है - इतका धडा त्याने नक्कीच घेतला!) कार्लसनला मदत करणारी टीम म्हणजे त्याचे सेकंड्स. (कँडिडेट स्पर्धेत पीटर नील्सन हा त्याच्या टीममध्ये होता. जो आधी आनंदच्या सेकंड्स टीममध्ये होता, परंतु यावर्षी तो आनंदच्या टीममध्ये नाहीये. आता तो कार्लसनच्या टिममध्ये सुद्धा नाहीये कारण नैतिकदृष्ट्या ते बरोबर नाही. अजूनही हे संकेत प्रामाणिकपणे पाळले जातात याने बरे वाटते.) कास्पारोव कार्लसनला मदत करणार अशाही वावड्या उठल्या होत्या परंतु त्यात तथ्य नाही. २००९ दोघांनी काहीकाळ एकत्र काम केलंही होतं. परंतु ते फार चालू शकलं नाही. एकतर कास्पारोव भडक स्वभावाचा आणि अतिशय ईगोइस्टिक आहे. त्यामुळे ग्रँडमास्टर दर्जाला आवश्यक असा धीर आणि आपली मते दुसर्‍यावर न लादणे हे दोन्ही त्याला जमणे अवघड आहे. त्यामुळे सध्यातरी कार्लसनचे सेकंड्स कोण आहेत याची कल्पना येत नाहीये. उत्तम खेळासाठी कार्लसनला शुभेच्छा देऊयात! विश्वनाथन आनंद (विशी) - 1 लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आपला विशी जगज्जेता झाला तेव्हा 'दि मद्रास टायगर' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. स्वभावतः शांतपणा आणि सहजासहजी उत्तेजित न होणं ह्या वैशिष्ठ्यांमुळे आनंद एक आदरणीय जगज्जेता म्हणून नाव कमवू शकला यात शंका नाही. "There are some things we do much better than computers, but since most of chess is tactically based they do many things better than humans. And this imbalance remains. I no longer have any issues. It’s bit like asking an astronomer, does he mind that a telescope does all the work. He is used to it. It is just an incredible tool that you can use." "Just before a game, I try to keep a clear mind so that I can focus better. I'm the kind of person who plays fast and relies a lot on intuition, so being at peace with myself is vital. Saying my daily prayers helps me achieve this heightened state of mind." ही त्याची वाक्यं वाचली की त्याच्या विचारांमधलं वेगळेपण जाणवतं. त्याचा ओपनिंगचा प्रचंड अभ्यास हाच एक अभ्यासाचा विषय होईल! सिसिलियन डिफेन्स, किंग्ज इंडियन डिफेन्स, सेमी-स्लाव मेरान वेरिएशन अशा वेगवेगळ्या ओपनिंग्जमधे त्याची ताकद आहे. काळ्या आणि पांढर्‍या दोन्ही मोहोर्‍यांकडून खेळताना तो उत्तम खेळू शकतो. टॅक्टिकल खेळ हे त्याचे शक्तिस्थान. अतिशय कल्पक सापळे रचून प्रतिस्पर्ध्याला सुगावाही लागू न देता कचाट्यात पकडणे ही त्याची खासियत (आठवा गेल्या विश्वचषकात गेल्फंडविरुद्ध खेळलेला डाव क्र. ८) गुंतागुंतीच्या स्थितीतदेखील अतिशय वेगवान आणि तरीदेखील अचूक कॅलक्यूलेशन्स करु शकत असल्याने तो देखील घड्याळाच्या कचाट्यात कधी फारसा सापडत नाही. आणखी एक म्हणजे घोड्यावर त्याची मांड अतिशय पक्की आहे. घोड्याच्या कल्पक उड्या आणि त्याने बसणारे फोर्क्स याचा वापर तो हमखास करतो. गेल्या काही स्पर्धांमध्ये, जसे ताल मेमोरिअल, त्याची कामगिरी अतिशय खालच्या दर्जाची झाल्याने त्याच्यासाठी तो एक मोठा चिंतेचा विषय असणार आहे हे नक्की. त्या बॅड पॅचमधून लवकरात लवकर बाहेर पडणे आणि मानसिक तणावाखाली न येता खेळू शकणे हे त्याच्यासमोरचे आव्हान आहे. जगज्जेतेपदाची स्पर्धा फक्त १२ डावांची आहे आणि पहिल्यांदा जो बाजी मारेल तो विजेता ठरण्याची शक्यता फारच जास्त आहे. (गेल्या स्पर्धेत गेल्फंडने सातवा डाव जिंकला लगोलग पुढच्याच डावात आनंदने बरोबरी साधली हे जरी खरे असले तरी दरवेळी तसे होईलच असे सांगता येत नाही!) आनंदचे सेकंड्स - गेल्या विश्वचषकापर्यंत पीटर नील्सन, रुस्तम कासिमद्झानोव, सूर्यशेखर गांगुली आणि रादोस्लाव वोज्सेक हे चौघे त्याचे सहकारी होते. यापैकी पीटर नील्सन तर आनंदसोबत २००२ सालापासून काम करत होता. तो टीममध्ये असताना आनंदने एकूण ४ वेळा विश्वविजेतेपद पटकावले ही बाब उल्लेखनीय आहे. यावर्षी तो टीममध्ये नाहीये. इतक्या प्रदीर्घकाळ एकत्र काम करणारा सहकारी नसणे ही आनंदसाठी नक्कीच मोठी उणीव आहे. यावर्षी ग्रँडमास्टर सांदीपन चंदा याचा समावेश आनंदने त्याच्या टीममधे केलाय. 2 नव्या टीमची 'केमिस्ट्री' जमणे हे सुद्धा महत्त्वाचे. ही सगळी टीम यूरोपातल्या कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी गेल्या महिन्यापासून सरावात गुंतलेली आहे. आनंदचा दिवस सकाळी व्यायामाने सुरु होतो आणि त्यानंतर न्याहरी घेऊन तो आठ ते दहा तास सराव करतो (दुपारचे जेवण आणि एखादा छोटा ब्रेक वगळता). मागे एकदा मी या सरावाबद्दल लिहिले होते. ते पुन्हा एकदा लिहितो. सरावादरम्यान आनंदची संपूर्ण टीम कार्लसनच्या सगळ्या डावांची चिरफाड करत असते. तो जिंकलेले आणि हरलेले डाव कसून अभ्यासले जातात. खेळण्याची पद्धत, त्यातले कच्चे-पक्के दुवे, फसलेल्या चाली यांचे विश्लेषण केले जाते. तसेच आनंदच्या डावांचेही होते. या व्यतिरिक्त ऐनवेळी काही सरप्राईझ एलेमेंट असू शकेल काय? उदा. एकदम वेगळेच कधी न खेळलेले ओपनिंग प्रतिस्पर्ध्याकडून केले जाईल का? गेले तर कोणते असू शकेल? त्याची तयारी कशी करायची? शिवाय हे काळ्या आणि पांढर्‍या अशा दोन्ही बाजूकडून ठरवायला हवे. हे सगळे विश्लेषण आनंदला नुसते लक्षातच ठेवायचे नसते तर प्रत्यक्ष सामन्यात वापरायचे देखील असते! (अर्थात हे सगळे कार्लसनच्या तयारीलाही लागू आहे.) ऐन डावात यांना ७-८ वर्षांपूर्वीचे डाव आठवू शकतात (त्यांचेच नाही तर इतरांचेही!). कोण काय चाल खेळलं हेही आठवतं. स्मरणशक्तीच्या बाबतीत हे राक्षस असतात! सध्या आनंद जिथे गेलाय तिथून तो रोज स्काईपने घरी संवाद साधून असतो. अरुणा आणि त्याचा दीड वर्षाचा मुलगा अखिल यांच्याशी बोलून त्याला उत्साह येतो. त्याची मुलाखत मुळातून बघण्यासारखी आहे. 'तुझं विजेतेपद कधीतरी जाईल तेव्हा तुझ्या भावना कशा असतील?' ह्या खोचक प्रश्नाला दिलेलं उत्तरही बघण्यासारखं आहे! शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अरुणा आनंद ही त्याची मॅनेजर आहे! 3 कालिदासाच्या रघुवंशातली 'गृहिणी सचिवः सखी' हे ती प्रत्यक्ष जगते आहे. तिला विसरुन कसं चालेल? लिहीत राहिलो तर अजून पानेच्यापाने भरतील पण कुठेतरी थांबायला हवेच. तर असा हा आपला लाडका विशी. त्याला आपल्या सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो. आणि एक जबरदस्त रंगतदार सामना सर्व बुद्धीबळ रसिकांना बघायला मिळो अशी आशा व्यक्त करतो. आनंदने पुन्हा विजेतेपद राखले तर तो बहुदा विक्रम ठरावा. (सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.) ------------------------ विशेष सूचना - सामन्याची ऑफीशियल वेबसाईट तयार झाली आहे. तिथेच सामन्याचे ठिकाण, प्रत्येक डावाचे दिवस आणि वेळा अशी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. डाव थेट प्रक्षेपित होणार आहेत ते कुठे बघता येतील ते सुद्धा तिथेच दिले आहे. डाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होतील. दर दोन डावानंतर एक विश्रांतीचा दिवस आहे. गेल्फंड - विशी सामन्याच्या वेळी मिपाकर रमताराम यांच्यासोबत मी सामन्यांचे चालते वर्णन दिले होते. परंतु यावेळी वेळाच्या दृष्टीने कसे जमेल मला माहीत नाही कारण माझ्या क्यालीफोर्निया वेळेनुसार रात्री १.३० वाजता सामना सुरु होणार आहे. (आधी नजरचुकीने २.३० वाजता असे लिहिले होते परंतु डे लाईट टाईमसेविंगमुळे ३ नोवेंबरपासून घड्याळे १ तास मागे गेली आहेत!) :( टायमिंग जमवायचा माझा आटोकाट प्रयत्न असेलच. परंतु रमताराम यांनी (किंवा इतर कोणी) स्वतः धागा सुरु करुन चालते समालोचन केले तर मला आनंदच होईल. ------------------------ आणखीन एक आनंदाची बातमी - यावेळच्या सामन्यात प्रथमच अँड्रॉइड आणि आयोएस दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्ससाठी अ‍ॅप डेवलप केले गेले आहे जे १ नोवेंबरपासून उपलब्ध असेल. प्रत्येक खेळी केली गेली की एक विशिष्ठ टोन ऐकू येईल त्याने खेळीची सूचना मिळेल. शिवाय प्रत्येक डावादरम्यान टेक्स्टिंगद्वारे प्रत्यक्ष खेळाचे विश्लेषणही पुरवले जाईल. खेळादरम्यान ५ सर्वर्स आंतरजालासाठी ठेवले आहेत ज्याद्वारे आपण सामना बघू शकू (लंडनच्या कँडिडेट मॅचेस दरम्यान शेवटल्या सामन्याला जालावरच्या गर्दीमुळे एकमेव असलेला सर्वर कोलमडून लोकांची निराशा झाली होती.) शिवाय दूरदर्शनवरही सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. द हिंदू मधील बातमी - http://www.thehindu.com/sport/other-sports/novelties-for-anandcarlsen-match/article5261446.ece ही आपल्या सगळ्यांसाठी पर्वणीच आहे. तुम्ही कुठेही असलात तरी सामना बघता आला नाही असे यावेळी शक्यतोवर होणार नाही. बुद्धीबळाच्या प्रसारासाठी देखील ही सुवर्णसंधी आहे! :) --------------------------- बक्षीसाची रक्कम किती याबद्दल आधी कल्पना नव्हती त्यामुळे लेखात त्याचा उल्लेख आला नव्हता. तर एकूण बक्षीस १० लाख (यूरोज) (साधारणपणे ८.५ कोटी रुपये) आहे. १२ डावात विजेत्याचा निर्णय लागला तर रक्कम ६०% - ४०% अशी विभागली जाईल. जर सामना टायब्रेकर राऊंडमध्ये गेला तर ५५% - ४५% अशी विभागणी असेल. -(सामनोत्सुक)चतुरंग
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
16037 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

सुहासवदन तुमचं निरीक्षण योग्य आहे!

चतुरंग
Tue, 10/29/2013 - 22:24 नवीन
महिला बुद्धीबळाबद्दल मी अजून काही लिहिलं नाहीये ही खरी गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ त्या पिछाडीवर आहेत असा बिल्कुल नाही. ज्यूडिथ पोल्गर ही पहिली जगज्जेती महिला ठरली. खरेतर तिनेच महिलांच्या मोठ्या बुद्धीबळ प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली म्हटले तरी चालेल. आत्ताच्या चेन्नै सामन्याला ज्यूडीथ पोल्गर विशेष समालोचक म्हणून उपस्थित राहणार आहेच! त्यानंतर बर्‍याच महिला खेळाडू झाल्या. सध्या चीनची हाऊ यीफॅन ही जगज्जेती आहे. भारतातूनही सुरुवातीला सांगलीच्या वासंती, जयश्री आणि रोहिणी या तीघी बहिणींनी अतिशय जोमदार खेळ करुन महाराष्ट्राचे नाव मोठं केलंच होतं. शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते कै. भाऊसाहेब पडसलगीकरांचे मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. मला स्वतःला पडसलगीकरांचा खेळ बघायला मिळाला आहे. असो. मी महिला बुद्धीबळावरही एक लेख लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

हरिका द्रोणावल्ली आणि सौम्या

पद्मश्री चित्रे
Tue, 10/29/2013 - 20:47 नवीन
हरिका द्रोणावल्ली आणि सौम्या स्वामिनाथन पण आहेत भारतातुन.
  • Log in or register to post comments

विशीचे प्रायोजक एनायायटी (NIIT)

चतुरंग
Wed, 10/30/2013 - 00:28 नवीन
यांनी आनंदला शुभेच्छा देण्यासाठी एक वेबसाईट उघडलीये तिथे जाऊन तुम्हाला आनंदला शुभेच्छा देता येतील. तिथेच चेपु आणि ट्विटरच्या लिंक्ससुद्धा आहेत. http://www.wish4vishy.com/index.php
  • Log in or register to post comments

पहिला सामना सुरु व्हायला अजून ९ दिवस राहिले आहेत.

चतुरंग
Fri, 11/01/2013 - 02:30 नवीन
अखेर आज कार्लसनचा सेकंड कोण आहे ते समजले! जॉन लुडविग हॅमर हा कार्लसनचा मित्रच त्याचा एक सेकंड आहे हे पक्के. Image removed. दुसरा सेकंड (कदाचित असू शकेल) तो म्हणजे लोरँ फ्रेसने. Image removed. हा रॅपिड आणि ब्लिट्झ एक्स्पर्ट आहे. विशेषतः १२ मुख्य डावांनंतर सामना जर टायब्रेकर मध्ये गेला तर याची कार्लसनला मदत होऊ शकेल. कार्लसन आणि हे दोघे अशी सगळीच टीम एकदम तरुण आणि नवीन आहे त्यामुळे हे तिघे कोणते नवीन डावपेच लढवतात ते बघणे अत्यंत थरारक असणार. भरपूर आतषबाजी बघायला मिळेल अशी आशा आहे! (अधिर) रंगा
  • Log in or register to post comments

वाचतोय! धन्यवाद.

मोदक
Sat, 11/02/2013 - 09:59 नवीन
वाचतोय! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कांउंट डाऊन

प्रसाद गोडबोले
Sat, 11/02/2013 - 12:34 नवीन
मिपाने आता पाडव्या नंतर मुखपृष्ठावर काऊट डाऊन क्लॉक सुरु करावे अशी अ‍ॅडमीनला विनंती करीत आहे :)
  • Log in or register to post comments

काळ देहासी आला खाऊ …

सुहासदवन
Mon, 11/04/2013 - 09:59 नवीन
कार्लसन देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ एक मस्त गाणे होऊन जाऊ दे वाल्गुदेवा....
  • Log in or register to post comments

वरती लेखात उल्लेख केल्याप्रमाणे

चतुरंग
Tue, 11/05/2013 - 05:34 नवीन
अँड्रॉईड फोन्ससाठी अ‍ॅप्लिकेशन तयार झाले आहे आणि ते इथून उतरवून घेता येईल. माझ्या फोनवर मी घेतले आहे. चांगले वाटते आहे, अजून जास्त खेळून बघितले की जास्त समजेल. या बातमीनुसार कार्लसन आणि त्याचा गोतावळा चेन्नैला पोचला आहे! आता ७ नोवेंबरला तमिळनाडूच्या मुख्यमंत्री मा.जयललिता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल आणि त्यांच्याच हस्ते ड्रॉ निघेत त्यात पांढरे आणि काळे मोहोरे कोणाचे असेल ते ठरेल.
  • Log in or register to post comments

द हिंदूतल्या

चतुरंग
Tue, 11/05/2013 - 05:55 नवीन
बातमीनुसार माननीय श्री. गॅरी कास्पारोव हे देखील ११-१२ नोवेंबर रोजी चेन्नैला भेट देऊन तिसरा सामना बघणार आहेत! (कास्पारोवला प्रत्येक जगज्जेतेपदाच्या सामन्याला, खेळाडू म्हणून नसेना का पण प्रेक्षक म्हणून तरी, हजेरी लावल्याखेरीज चैन पडत नाही असं दिसतंय! ;) )
  • Log in or register to post comments

चार दिवस राहिले!!

चतुरंग
Tue, 11/05/2013 - 23:30 नवीन
महाबलीपुरम इथली छोटी सुट्टी संपवून काल सोमवारी आनंद चेन्नैत दाखल झाला. हाएटला भेट देऊन त्याने त्याच्या राहण्याच्या जागेची पाहणी केली. इंडियन एक्स्प्रेसमधला एक छोटेखानी लेख. आनंद आणि अरुणा एका प्रसन्न मुद्रेत. http://newindianexpress.com/sport/Anand-not-scared-assures-Aruna/2013/11/05/article1872745.ece -रंगा
  • Log in or register to post comments

NIIT चा लोगो

सुहासदवन
Wed, 11/06/2013 - 09:41 नवीन
विशीच्या शर्टवर NIIT चा लोगो का असतो बऱ्याच वेळेला? NIIT च्या branding ची एवढी गरज आहे का ?
  • Log in or register to post comments

ते प्रायोजक आहेत ना विशीचे म्हणून.

चतुरंग
Wed, 11/06/2013 - 11:27 नवीन
आणि त्यांच्या सहयोगाने विशी चेन्नैमधे चेस अ‍ॅक्टिविटीज घेतो असे माझ्या माहितीत आहे. त्यामुळे तो लोगो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

तीन माजी जगज्जेत्यांची आनंद-कार्लसन

चतुरंग
Wed, 11/06/2013 - 12:02 नवीन
सामन्याबद्दलची मते. रोचक. http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/kasparov-wants-carlsen-to-win-karpov.html
  • Log in or register to post comments

वाट बघतोय.. इथे लाईव्ह नाही

ऋषिकेश
Wed, 11/06/2013 - 12:31 नवीन
वाट बघतोय.. इथे लाईव्ह नाही तरी तुमच्या उपलब्ध वेळेनुसार सामन्यांचे विश्लेषण जरूर येऊ दे
  • Log in or register to post comments

स्पर्धेचे रीतसर उद्घाटन झाले काल.

चतुरंग
Fri, 11/08/2013 - 01:01 नवीन
मा. जयललिथा यांनी औपचारिक उद्घाटनानंतर ड्रॉ काढला त्यात कार्लसन पहिला डाव पांढर्‍या मोहोर्‍यांनी सुरु करेल. दोन्ही खेळाडूंची पत्रकार परिषद झाली त्याचा हा दुवा. http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/anand-vs-carlsen-official-video-of-full.html सामने जगभरातल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळेला दिसतील याबद्दल आणि थेट प्रक्षेपण/लाईव स्ट्रीमिंग कुठे बघता येईल अशा माहितीसाठी हा दुवा बघा. तू नळीवर स्ट्रीमिंग दिसणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे! :) http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/summary-of-anand-vs-carlsen-live-links.html कधी एकदा शनिवार उजाडतोय असं झालंय आता! :) -रंगा
  • Log in or register to post comments

अमूलचं नेहेमीप्रमाणे भन्नाट पोस्टर!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 06:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजून साडेतीन तासांनी पहिला सामना सुरु होतो आहे!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 11:27 नवीन
पहिला डाव कार्लसन पांढरी मोहोरी आणि आनंद काळी मोहोरी आहेत. मी पहिल्या डावासाठी अजून साधारण तीन तासांनी निराळा धागा सुरु करणार आहे.
  • Log in or register to post comments

लय भारी ! आता मजा येणार !!

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 13:00 नवीन
लय भारी ! आता मजा येणार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदला शुभेच्छा.

मृत्युन्जय
Sat, 11/09/2013 - 14:25 नवीन
आनंदला शुभेच्छा. कार्लसन जिंकला तर तो कास्पारॉव नाक उंच करुन सग्ळीकडे हिंडणार. ते नकोच म्हणुन कार्ल्सन हरु देत. एरवी त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही
  • Log in or register to post comments

मा. कास्पारोव चेन्नैत दाखल!

चतुरंग
Mon, 11/11/2013 - 23:05 नवीन
http://www.worldchesschampionship2013.com/2013/11/garry-kasparov-reaches-chennai-as-chess.html आपण 'चेस टूरिस्ट' म्हणून आलो असून फिडे प्रेसिडेंट निवडणुकीचा कुठल्याही प्रकारे प्रचार ४८ तास करणार नाही अशी ग्वाही त्याने दिली. कार्लसनला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलोय असे देखील तो म्हणाला. 'फिडे'चे अधिकारी किंवा भारतील चेस फेडरेशनच्या कुठल्याही पदाधिकार्‍याने त्याचे विशेष स्वागत केले नाही इतकेच नव्हे तर सामन्यानंतर होणार्‍या पत्रकारपरिषदेतही त्याला रीतसर बंदी आहे. एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणूनच त्याला तिथे वावरावे लागणार आहे. अर्थात त्याच्या नावाचा करिष्मा एवढा आहे की त्याला बघायला प्रचंड गर्दी होणार हे नक्की!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा