मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच. चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !! स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :- १) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल. २) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे. ३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील. ४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे. ५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.

वाचने 278203 वाचनखूण प्रतिक्रिया 138

garava Mon, 09/09/2013 - 18:04
अ‍ॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे टाकावेत' चा धागा टाकाना वर हेडर मधे. म्हणजे कोणाला अडचण आल्यास आधी ते इथे बघतील आणि नाहीच जमल तर तुम्ही आहातच.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Tue, 09/10/2013 - 10:43
त्या फोटोला बक्षीस मिळालंच तर पुस्तक पाठवण्यासाठी त्या सदस्याने आपलं नाव पत्ता संपादक मंडळापैकी कोणालातरी कळवावं लागेल. बक्षीस न मिळाल्यास प्रश्नच येणार नाही. सदस्यांच्या प्रामाणिकपणावर आम्ही विश्वास ठेवत आहोत. यासाठी सुरुवातीला फोटो देताना नाव द्यावे अशी कल्पना आली होती पण सदस्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी ती अट काढून टाकली. घरातली सजावट आणि एखाद्या मंडळातली सजावट यात फरक नक्कीच असतो आणि एखाद्या मंडळाच्या गणपतीचा फोटो कोणी आपल्या घरचा म्हणून दिला तर नक्कीच लक्षात येईल. कोणाची समजा २ घरे असतील आणि दोन्हीकडे गणपती आणत असाल तर म्हणून प्रत्येकाला २ फोटो देण्याची मुभा दिली आहे. ते असो. तुमच्या घरचे फोटो कुठे आहेत?

In reply to by पैसा

अभ्या.. Tue, 09/10/2013 - 11:44
आमच्या घरी सोवळ्यातला बाप्पा असतो. देवघरात असल्याने सजावटीला वाव नाही. माझ्या कलेला ही :( . आमच्या नशीबी दिवाळीत तुळशीवॄंदावनावर श्री राधा दामोदर प्रसन्न एवढेच लिहिणे. :( मी ती हौस मित्राच्या घरी सजावट करुन भागवतो. तेथील फोटो दिले तर चालतील काय ? ;)

मीनल Tue, 09/10/2013 - 19:26
गेल्या उन्हाळाच्या सुट्टीत भारत भेट धावती झाली. त्या कमी वेळात ही माहिम बस डेपो जवळ असलेल्या जब्बर भाईंच्या लाकडी कोरीवकामाच्या वस्तूंच्या दुकानातून हा लाकडी देव्हारा बनवून घेतला. ह्या भाद्रपद चतुर्थीला त्याचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईतल्या दादरच्या किर्तीकर मार्केटमधून मोत्यांच्या माळा आणल्या होत्या. (अविश्वासनीय वाटेल म्हणून आई शपथ घेऊन सांगते- एकूण ६ माळा, प्रत्येकी लांबी ६ ईंच, भारतीय रुपये ३०/- फक्त) प्लास्टिक मोत्यांचा दर्जा अतिनिम्न असला तरी अश्या सजावटीसाठी अतिउत्तम आहे. दादरच्या रानडे रोड येथिल सौभाग्य वस्तू भांडार मधून श्री मूर्तीच्या वर लावायला एक छोटी छत्री आणि नैवेद्याच्या ताटाभोवती लावायला मोत्याच्या दोन महिरपीही घेतल्या होत्या. इथे घरात ही हस्तकलेच्या वापरातले लहान /मोठे आणि शुभ्र पांढ-या ते गडद पिवळ्या रंगाच्या मधल्या विविध छटांचे बरेच मोती होते. ह्य सर्व मोत्यांचा वापर करून सजावट करण्याची कल्पना हाती घेतली. आधी छ्त्रीला धाग्याने मोती शिवून काढले. श्री गणरायांसाठी बारीक मोत्याचे दागिने ही तयार केले. ते काम जरा नाजूक वाटत होते. ते जमल्यावर इतर सर्व मोत्यांचा वापर करून देव्हारा सजवला. त्या समोर मोती लावलेल्या हळद, कुंडाच्या वाट्या ठेवल्या. समई, निरांजन वगैरे इतर मांडणी केली. त्या सजावटीचा फोटो- !! श्री गणेश !! आणि हा आहे पूजा,आरती,नैवेद्यार्पण झाल्यानंतरचा फोटो - पूजा  झाल्यानंतर खिर,पुरण,चटणी, कोशिंबीर, साधे वरण, भात, दहीभात, आमटी, पोळी, बटाटा भाजी आणि कलाकंद बर्फी (सर्व घरी केलेला) असा नैवेद्य आमच्या बाप्पाला आवडला असेल अशी आशा वाटते. तो सुख कर्ता, दु:ख हर्ता असाच पाठीशी राहो आणि आमची सेवा मान्य करून घेवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया.

In reply to by मीनल

विटेकर Wed, 09/11/2013 - 15:51
साधी पण मनोहारी सजावट आहे ,, मला ही अशीच साधी सजावट आवडते उगाच् लायटींग केले की बाप्पा लांअब जाऊन बसलेत असे वाटते.

पैसा Tue, 09/10/2013 - 20:06
बुवांची रांगोळी आणि आतापर्यंत आलेले सगळे गणपतीबाप्पा मस्तच! मीनल, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीच्या सजावटीबद्दल एक खास धागा वाचायला आवडेल!

In reply to by मुक्त विहारि

मीनल Tue, 09/10/2013 - 20:53
सजावटी मुळे घरात उत्सवाचे वातावरण निश्चितच तयार होते. सुपारीची आरास कशी करणार? पण सजावटीची हौस असते. म्हणून आम्ही ही एकरंगी मूर्ती दरवर्षी केवळ दर्शनीय रूप म्हणून ठेवतो. तिथेच सजावट करतो. समोर सुपारी मांडून तोच गणपती मानून त्याची यथासांग पूजा करतो. आता पर्यंत विसर्जन ही केवळ सुपारीचे करत होतो. परंतु आता जवळच्या वाहत्या नदीत विसर्जन कठिण होत आहे. सतत पहारा करणारी पोलिसांची गाडी, आजूबाजूचे कॅमेरा आणि कायदा भंगाच्या दंडाच्या सूचना या मुळे ह्या वर्षी पासून बादलीतील पाण्यात सुपारीचे विसर्जन होईल. आणि मग ती सुपारी तुळशीच्या कुंडीत ठेऊ.

In reply to by मीनल

रेवती Wed, 09/11/2013 - 02:59
हेच म्हणते मीनलताई, मीही बादलीतील पाण्यात विसर्जन करणार आहे. आमच्याकडे दीड दिवसांचे गणपती असतात. लगेच बादलीत ठेवायला वाईट वाटत असल्याने जागेवरून थोडे हलवून तसेच ठेवलेत. मनाची तयारी झाल्यावर विसर्जन करणार.

In reply to by रेवती

केदार-मिसळपाव Wed, 09/11/2013 - 18:13
आम्ही दर वर्षी लाकडी गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करतो त्यामुळे पाण्यात विसर्जनाचा प्रश्णच येत नाही. विसर्जन करायचे म्हणजे गणपती आसनावरुन उचलुन त्याच्या नेहमीच्या जागी (एक छोटे मंदिर केले आहे) नेउन ठेवायचा...पुढ्च्या वर्षापर्यंत.

तुमचा अभिषेक Tue, 09/10/2013 - 21:39
आतापर्यंतचे सारेच बाप्पा छान.. :) थर्माकोलच्या मकरापेक्षा फुलाफुलांची सजावट नेहमीच भावते.. हे वैयक्तिक मत, अन्यथा आमच्याकडेही जेव्हा बाप्पा असायचे तेव्हा बरेचदा थर्माकोलचे जोडलेले तुकडेच असायचे.. बाकी आता या स्पर्धेसाठी एलिजिबल नाही याचे खूप वाईट वाटतेय.. :(

sneharani Wed, 09/11/2013 - 15:08
आमच्या घरचा खराखुरा मातीचा गणपती अन त्याची साधीशी त्याला साजेल अशी सजावट ga1 ga2

अभ्या.. Wed, 09/11/2013 - 15:23
मला एक शंकाय. परीक्षक कोण आहेत? म्हणजे निकष काय आहेत सजावट सुन्दर म्हणायला? इको फ्रेंडली की फ़क्त बाजारु चान चान? की फ़क्त फोटोजेनिक? कुणाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण स्पर्धा आहे म्हणून इचारले ;-)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे गुरुवार, 09/12/2013 - 12:07
अभ्या, स्पर्धेसाठीचे निकष हे फक्त तू सजावट कशी केलीयेस याच्यावर आहेत, मग ती इकोफ्रेंडली असो किंवा आणखी वेगळ्या तर्‍हेची. गणपतीभोवती कलात्मकतेने केलेल्या सजावटी बरोबर घरी बनवलेल्या सुंदर आणि कलात्मक मखरांचाही या स्पर्धेसाठी विचार केलाही जाईल. परिक्षणाची जबाबदारी काही जेष्ठ मिपाकर पाहत आहेत.

चौकटराजा Wed, 09/11/2013 - 18:55
. . यावर्षी देशाची आर्थिक घसरण होत असल्याने काटकसरीचा मेसेज आमच्या पुढच्या पिढीला देण्यासाठी वरील प्रकारे सजावट केलीय. मखरासाठी जुन्या लग्न पत्रिकांचा वापर केला आहे. मागचा गुलाबी पडदा हा जुन्या तलम ओढणीतून विरळ झालेला भाग बाजूला करून उरलेला भाग वापरलेला आहे. तो ज्याच्यात अडकविला आहे ती धातूची नळी जुन्या वाकलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या हँगर पासून बनविली आहे. बाप्पाचा मुकुट त्यावरील चमकते खडे सर्व जुन्या वापरलेल्या वस्तूंपासून मिळवले आहेत.लोडात दोरा संपलेली रिळे टाकून त्यावर कापूस गुंडाळला आहे. व जुन्या जॅकॉर्ड साडीचा तुकडा खोळीसाठी वापरला आहे. बाप्पाचा प्रसाद मात्र ताज्या मालापासून बनविला आहे.

मदनबाण Wed, 09/11/2013 - 20:42
सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले ! :) @आत्माराव :- रांगोळी लयं भारी ! @मृत्युन्जय :- मोराची आणि कोयरीची नक्षी सुरेख आहे. :) @जय - गणेश :- काळ्या पार्श्वभुमीवर फिरणारे रंग सुंदर दिसत आहेत. @केदार-मिसळपाव :- अशी समई पहिल्यांदाच पाहिली. @अनन्न्या@:- दुसरा फोटो आवडला,बाप्पा आणि मखर दोन्ही गोड. @मीनल :- देव्हार्‍याची नाजुक सजावट आवडली. बाप्पा समोरची उदबत्ती "मसाला" श्रेणीतली वाटते. मला स्वतःला मसला उदबत्तीच आवडते,आणि सेंटेड मी कधीच घेत नाही. उदबत्यांमधे मला म्हैसुर किंग आणि वुड्स फार आवडते. @आश :- जबराट ! :) @gaikiakash :- मस्त. @sneharani :- फुलचामधला छोटासा बाप्पा आवडला. :) चौकटराजा :- खरयं ! मंदीचा परिणाम जाणवण्या इतपत वातवरण आहे खरे. बाप्पाची मूर्ती आवडली.

प्यारे१ गुरुवार, 09/12/2013 - 03:40
छान उपक्रम. सग्गळेच 'गणपती' आवडले, सजावटींसकट! (आशचा गणपती डाएटवर नि स्नेहाराणी चा गणपती फुलांनी झाकला गेला असल्याने 'गुप्त' दिसतोय. उसेन बोल्टला सोंड नसल्यानं त्याला गणपती मानत नाहीये. ;) सग्गळ्या फोटोंचा विचार केल्या गेला आहे. :) )

दीपा माने गुरुवार, 09/12/2013 - 04:09
सर्वच गणपती सुंदर आणि सजीव वाटतात. आपल्या मनातल्या भावाप्रमाणे ते आपल्याला दिसतात. माझ्यामते सर्वच स्पर्धक विजयी आहेत.

जोशी 'ले' गुरुवार, 09/12/2013 - 09:40
माझा बाप्पा... a a a a थर्माकोल वापरुन हि बाप्पा ची सजावट केलीय व मेटॅलीक पेस्टल कलर्स वापरलेत :-) बाप्पा मात्र इकोफ्रेंडली आहेत :-)

In reply to by जोशी 'ले'

केदार-मिसळपाव गुरुवार, 09/12/2013 - 13:08
छान आकार दिलाय..प्रत्यक्ष बघतांना अधिक सुंदर दिसत असेल फोटोत दिसतोय त्याच्यापेक्षा हे मात्र नक्की सांगु शकतो.

सुमीत भातखंडे गुरुवार, 09/12/2013 - 09:52
आहेत सजावटी. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!!

विटेकर गुरुवार, 09/12/2013 - 15:31
Sajaavat 2013 Varad Murti सारी सजावट घरीच केली आहे. मगचे मोर थर्माकोलचे विकत आणले आहेत. माझ्यापेक्षा सहधर्मचारिणीचा सहभाग जास्त आहे.. माझा आपला खारिचा वाटा !

दादा कोंडके गुरुवार, 09/12/2013 - 16:22
असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या संपादक मंडळाचा निषेध!

In reply to by दादा कोंडके

पैसा गुरुवार, 09/12/2013 - 19:56
गणपतीबाप्पा मोरया!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास गुरुवार, 09/12/2013 - 19:20
१००% सहमत! खुपच सुंदर! सर्वांचेच (त्यात असे उत्साही भक्त मिळाले म्हणून बाप्पा पण आले :) ) अभिनंदन!

In reply to by मानस्

मानस् गुरुवार, 09/12/2013 - 19:26
या वर्षी घरी काही बनवायला वेळच नाही झाला. मग बाहेरून तयार मखर आणले. गणपती बाप्पा सधिभोळी भक्ती मानून घेओत ही प्रार्थना.

अजया गुरुवार, 09/12/2013 - 22:53
आमच्याकडे मखर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे साधीशीच सजावट आणि लायटींग केले जाते!.

नानबा Fri, 09/13/2013 - 09:53
आमचे बाप्पा, गौरी आणि त्यांची सजावट संपूर्णपणे इको फ्रेंडली असते. बाप्पांची मूर्ती संगमरवरी असल्यामुळे विसर्जन केलं जात नाही. उत्तरपूजेनंतर स्वच्छ करून झाकून ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीच बाहेर निघते. गौरींच्या बाबतीत तेच. पितळी मुखवटे आणि मातीची सुगडं यापैकी कशाचंही विसर्जन होत नाही. प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा सजावटीत वापर शून्य. या दिवसांत जमा होणारं निर्माल्य एकत्र करून घरातल्याच एका मोठ्या कुंडीत मातीत दाबून टाकतो. काही महिन्यांत त्याचं खत बनतं जे गॅलरीतल्या झाडांमध्ये टाकतो... पर्यावरणाचा कमीत कमी र्‍हास होईल याची काळजी घेतली जाते.. :)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. Sat, 09/14/2013 - 01:38
आभारी आहे किसना. नेट चा थोड़ा प्रॉब्लम असल्यान इमेज अपलोड करता येत नव्हती. :-( हे फ्लेक्स प्रिंट्स मधील वेस्ट वापरून केले आहे. श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे. मागील प्रभावल अशाच एका फ्लेक्स मधील तुकडा वापरून केली आहे. बॉक्स आहेत ते रद्दी कंटेनर वापरून त्यावर जादा झालेली फ्लेक्सची इंक रंग म्हणून वापरली आहे. आवश्यक तिथे प्रिंट मतेरिअलचा वापर केलाय जे मला सहज उपलब्ध असते.