मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोवन थाळी

प्रभाकर पेठकर · · अन्न हे पूर्णब्रह्म
'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या सदरास सुरुवात करून आज १ वर्ष झाले. ह्या वर्षभरात अनेक पाककृती सादरकरण्याची मला मिपाने संधी दिली, मिपा सदस्यांनी कौतुक केले. भरून पावलो. आजच्या ह्या वर्धापनदिनानिमित्त ही 'गोवन थाळी' सादर करताना आनंद होतो आहे. स्विकार व्हावा.

Thali

थाळीतील पदार्थ आणि त्यांची पाककृती. समोर भात आणि तांदूळाच्या भाकरी. भाकरीला लागून कुर्ल्या मसाला. मधली वाटी करंदीची चटणी/भाजी. त्याच्या बाजूला सोलकढी आणि सोलकढीला लागून कांदा-टोमॅटो कोशिंबीर. भाकरी आणि कुर्ल्या मसाला ह्यांच्या मधे लिंबू.

कुर्ल्या मसाला.

साहित्यः कुर्ल्या (खेकडे) - ३ नग. नारळ - अर्धा. सुक्या मिरच्या - ८ नग. धणे - ४ लहान चमचे (टि स्पून) काळीमिरी - ८ दाणे. लवंग - ५ नग. दालचिनी १ इंच. जायपत्री - १ फुल. जायफळ - १/८ कांदे - २ मध्यम. तेल - ४ मोठे चमचे (टेबल स्पून) हळद - १ चमचा. तिखट - २ चमचे. मीठ - चवीनुसार. तयारी: कुर्ल्या साफ करून धुवून घ्या. त्यांचे लहान पाय, पाण्याबरोबर, मिक्सरमध्ये फिरवून पाणी गाळून घ्या. मुख्य नांगे किंचीत ठेचून (तडा जाईल इतपतच) घ्या. मुख्य धडाचे मधून चिरून दोन भाग करून घ्या. कांदे उभे चिरून घ्या. कृती: सुक्या मिरच्या, धणे, काळीमिरी, लवंग, दालचिनी, जायपत्री, जायफळ तेलावर खमंग परतून घ्या. त्यावर उभे चिरलेले कांदे परतून घ्या. शेवटी त्यातच नारळ घालून लालसर रंगावर परतून घ्या. आता हा सर्व मसाला बाजूला काढून थंड होऊ द्या. थंड झाला की मिक्सरवर मुलायम वाटून घ्या. आता ह्या मसाल्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून उकळण्यास ठेवा. त्यात हळद, तिखट घालून मिसळून घ्या. मसाला उकळला की त्यात लहान पाय वाटून, गाळून घेतलेले पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला. आता ठेचलेले नांगे आणि चिरलेले खेकडे घालून शिजवा.

करंदीची चटणी/भाजी.

साहित्य: करंदी - १ वाटी. कांदा - १ मध्यम. टोमॅटो - १ मध्यम. आमसुलं - ४ नग. हळद - अर्धा लहान चमचा (टी स्पून) तिखट - १ लहान चमचा. तेल - २ मोठे चमचे (टेबल स्पून) कोथिंबीर. तयारी: करंदी वाहत्या नळाखाली धुवून घ्या. भिजत ठेवू नका. आता करंदी निथळत ठेवा. कांदा आणि टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या. कृती: करंदी कोरडीच भाजून घ्या. बाजूला ठेवा. तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या. त्यावर टोमॅटो टाकून परता. टोमॅटो शिजला की त्यात भाजलेली करंदी, मीठ, हळद, तिखट, आमसुल घालून परता. किचिंत पाणी घालून करंदी शिजवून घ्या. पाणी आटे पर्यंत परतत राहून करंदी कोरडी करा. कोरडी झाली की कोथिंबीर घालून सजवा.

सुरमई फ्राय.

साहित्यः सुरमई - १ तुकडा. आलं-लसूण पेस्ट - अर्धा लहान चमचा. हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून) तिखट - १ लहान चमचा. चिंचेचा कोळ - १ मोठा चमचा. मीठ - चवीनुसार. तांदूळाचे पीठ - वरून लावण्यासाठी. तेल - तळण्यासाठी. कृती: सुरमई तुकडी धुवून एखाद्या फडक्यामध्ये हलक्या हाताने दाबून कोरडी करून घ्या. सुरमईला आल-लसूण पेस्ट, हळद, मीठ चोळून घ्या. नंतर तिखट आणि चिंचेचा कोळ लावून अर्धातास, मुरण्यासाठी, बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर, फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवून, सुरमईला तांदूळाच्या पिठात घोळून, मध्यम आंचेवर, दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.

तांदूळाची भाकरी.

साहित्यः तांदूळाचे पीठ - १ कप. पाणी - १ कप. मीठ - चवीनुसार. तेल - १ मोठा चमचा (टेबल स्पून). पाणी उकळण्यास ठेवा. पाणी उकळताना त्यात मीठ आणि तेल घाला. पाणी उकळले की त्यात पीठ मिसळून कलथ्याच्या दांड्याने ढवळत राहा. पीठाचा गोळा झाला की झाकण ठेवून मंद आंचेवर एक वाफ येऊ द्या. गॅसवरून उतरवून पीठाचा गोळा परातीत काढून घ्या. जरा थंड झाल्यावर पण अजून सहन होईल इतका गरम असतानाच भरपूर मळून मऊ करून घ्या. मध्यम आकारांचे गोळे करून, लाटून भाकरी तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरम गरम वाढा.

सोलकढी:

साहित्यः नारळ - अर्धा. लसूण - ४ पाकळ्या. हिरव्या मिरच्या - ३ नग. मीठ - चवी नुसार. बीट रुट - सुपारी एवढे. आमसुलं - ७-८ नग. कोथिंबीर - सजावटीसाठी. तयारी: आमसुलं अर्ध्या तासाकरीता पाण्यात भिजत घाला. पिळून त्यांचा रस काढून घ्या. कृती: नारळ, लसूण, मिरच्या, मीठ, बीट रूट मिक्सर मध्ये पाणीघालून एकदम बारीक वाटून घ्या. हे मिश्रण पातळ कपड्यातून गाळून/पिळून त्याचा रस काढून घ्या त्यात आमसुलाचा रस मिसळा आणि कोथिंबीर घालून सजवा. बाकी भात, कांदा-टोमॅटो कोशिंबीर ह्यांची कृती सर्वांना माहित असतेच. शुभेच्छा...!

वाचन 104628 प्रतिक्रिया 0