मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानी मिरची वडा

सानिकास्वप्निल · · अन्न हे पूर्णब्रह्म
साहित्यः ५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,) २-३ बटाटे उकडून, किसून घेणे दीड-दोन वाट्या बेसन २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १/४ टीस्पून हिंग १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून बडीशेप पावडर १ टेस्पून जीरेपूड १ टेस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) बारीक चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: किसलेल्या बटाट्याच्या मिश्रणात लाल तिखट, हिरव्या मिरच्या, जीरेपूड, बडीशेप पावडर, चिरलेली कोथींबीर, अनारदाना पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे. मिरच्यांना मध्यभागी चिर द्या. वरील बटाट्याचे सारण मिरच्यांमध्ये नीट भरुन घ्या. बेसनमध्ये लाल तिखट, हिंग व मीठ घालून एकत्र करा. त्यात थोडे पाणी घालून मिश्रण भज्यांच्या पीठासारखे तयार करुन घ्या. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. तयार केलेल्या मिरच्या बेसनात घोळवून गरम तेलात अलगद सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या. . गरमा - गरम राजस्थानी मिरची वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. . .

वाचने 90380 वाचनखूण प्रतिक्रिया 56

रेवती Wed, 07/17/2013 - 04:06
जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ आणि खतरनाक फोटू देताना तुला आमची दया कशी आली नाही! ;) हा प्रकार कधी खाऊन बघितला नाहीये पण भारी असणारच! साहित्यामधील पाच ते सहा भावनगरी मिरच्या कितीजणांना पुरतात?

In reply to by स्पंदना

मदनबाण Wed, 07/17/2013 - 12:04
आहाहा... पावसाळ्यात असे पदार्थ पाहुन अंमळ जळजळ झाली. ;) आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली? ऑ? हॅ हॅ हॅ! आज्जे ये गट्टा पुलाव का परिणाम हयं क्या ? ;) (मश्रुम स्टार्टर्स प्रेमी);)

In reply to by रेवती

अगं इथे मिळाल्या ह्या मिरच्या आकाराने खुपचं मोठ्या होत्या (cubanelle pepper) असाव्यात असा अंदाज आहे, त्यामुळे पाच ते सहा मिरच्या दोन माणसांना आरामात पुरतात :)

In reply to by रेवती

सुबोध खरे गुरुवार, 07/18/2013 - 12:56
हा राजस्थानी मिरची वडा मी जोधपूरला असताना खाल्ला होता. हा मिरची वडा आणि माव्याची कचोरी ( गुलाबजामचा खवा मोठ्या कचोरीत भरून ती शुद्ध तुपात तळून देतात. मी आणि आमचा आर्मीचा सर्जन असे दोघे एक मिरची वडा आणि एका कचोरीत ( दोघात मिळून) गार झालो. अतिशय स्वादिष्ट अश या दोन्ही पाककृती आहेत. त्यातून हे असे फोटो फारच जळजळ निर्माण करतात. आता असा मिरची वडा मुंबईत कुठे मिळतो हे शोधायला पाहिजे

In reply to by सुबोध खरे

माव्याची कचोरी मात्र कोणत्याही मारवाडी किंवा राजस्थानी हलवायाकडे मुंबईच्या मिळते. एवढी उत्कृष्ट असून तिला मुंबईत लोकप्रियता का लाभली नाही हे एक कोडेच आहे

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित Fri, 05/09/2014 - 01:22
जोधपूरला नई सडक वर नॅशनल हँड्लूम हाउस आहे.त्याच्या बाजूलाच एक खूप मोठे मिठाईचे दुकान आहे.तेथे हा चवदार मिराचीवडा गरमागरम तयार करून मिळतो.खूप मोठ्ठ असतो आणि काजू घालून फारच अप्रतिम बनवतात.

जुइ Wed, 07/17/2013 - 08:16
छान दिसत आहे एकदम! यावरुन चेन्नईला मरिना बीच वर खाल्लेली मिरची भजी आठवली :)

चिंतामणी Wed, 07/17/2013 - 09:33
मिरची खायची भिती वाटते. पण शेवटचा फटु पाहून खल्लास. आणि सुरवातीलाच दिलासा दिला आहेस
५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,)
त्यामुळे खाउन बघायला हरकत नाही. ;)

प्रभाकर पेठकर Wed, 07/17/2013 - 09:51
झकास..! सध्या रमझानचा महिना सुरु आहे. त्या मुळे रोझा सोडणार्‍यांसाठी, सूर्यास्तासमयी, आमच्या उपहारगृही कांदा, बटाटा आणि मिरची भजी दरवर्षी केली जातात. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही. गरमागरम, मस्त भजी अजिबात तिखट लागत नाहीत. अर्थात आम्ही एवढे सारण वगैरे भरण्याचे कष्ट घेत नाही. मिरच्या उभ्या चिरून मसाले, तिखट, हळद, मीठ घातलेल्या चण्याच्या पीठाच्या आवरणात बुडवून तळल्या जातात.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्रिवेणी Wed, 07/17/2013 - 09:57
"मिरच्या उभ्या चिरून मसाले, तिखट, हळद, मीठ घातलेल्या चण्याच्या पीठाच्या आवरणात बुडवून तळल्या जातात." पडत्या पावसात अशा मिरच्या खाण्याची मजा दुपटीने वाढते.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Wed, 07/17/2013 - 13:45
. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही.
अगदी अगदी. महिनाभर 'हाफ डे'ची मज्जा आणि संध्याकाळी चहा भरोबर गरमा गरम भज्या. कसली आठवण करुन दिलीत पेठकरकाका.

कपिलमुनी Wed, 07/17/2013 - 09:55
फोटू एकदम कातिल !! पूर्वी असाच एक प्रयोग सिमला मिरची सोबत केला होता ..तेव्हा तिचे आवरण जाड असल्याने फसला होता ..आता हे करून बघेन

रुमानी Wed, 07/17/2013 - 10:20
बाहेर पाउस पड्तोय आणी ईथे ही पाक्रु नेहमिप्रमाने मस्तच........ आत नुस्ते भजी तरी मागवुन खाने आले. :)

नक्शत्त्रा Wed, 07/17/2013 - 11:28
फक्त ५ मिरच्या ....आमच्याकडे नवरोबा १०-१५ भजी एकटा संपवतो ... ह्या िमरच्या ितखट नसतात आणि िमरची भाजी आणि भजी दोन्हीही अप्रतिम होतात. सानिका ला खरंच मानालायला हवे…खुप कलात्मक फोटो आणि पाकृ ि दल्याबद्दल एकदम जबरदस्त.

In reply to by नक्शत्त्रा

सखी Wed, 07/17/2013 - 19:51
हेच म्हणते. सानिका ला खरंच मानालायला हवे…खुप कलात्मक फोटो आणि पाकृ दिल्याबद्दल. नेहमीनेहमी कसं जमतं इतकं छान सादर करायला हाच प्रश्न मला नेहमी पडतो.

दिपक.कुवेत Wed, 07/17/2013 - 11:39
फोटो फारच टेम्प्टिंग आलेत. स्ट्फ प्रकार आवडला. काका म्हणतात त्या प्रमाणे ईकडे सुद्धा मिरच्या विधाउट स्टफिंग नुसत्या बेसनाच्या पिठात तळलेल्या देतात.

भावना कल्लोळ Wed, 07/17/2013 - 15:05
कालच केल्या होत्या भावनगरी मिरच्या. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते अश्या मिरच्या घरी, त्या बेसनाच्या पिठात घोळवून नाही करत. किसलेले खोबरे, थोडी हळद आणि मीठ, भावनगरी मिरच्या ना मध्ये चीर देऊन त्या मध्ये भरते आणि डायरेक्ट तेलात खरपूस तळते. वरण भात, वाटाणा बटाटाची भाजी, आणि या मिरच्या. मस्त जेवण होते, आमच्या नवरदेवाक लय आवडतो हा बेत.

In reply to by भावना कल्लोळ

हो माझ्या आजीची हीच पद्धत आहे , ती जीरे + सुके खोबरे+ मीठ+ हळद भरुन ह्या मिरच्या बनवायची, त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद :) वरील पद्धत ही राजस्थानी आहे :)

In reply to by सानिकास्वप्निल

किलमाऊस्की गुरुवार, 07/18/2013 - 22:39
आमच्याकडेही अशाच करतात, हे पण भारी दिसतय. मई मिरच्या खात नाही. पण कधीतरी करेन बाकीच्यांसाठी.

सौंदाळा Wed, 07/17/2013 - 17:38
ऑफीस बाहेरचा चहावाला अधुन मधुन मिरची भजी बनवत असतो. (अर्थात सारण न घालता) आम्हीसुद्धा घरी दोन्-चारदा केली आहेत. शिवाय मिरची भजी गोव्यातील बर्‍याच पारंपारीक उपहारग्रुहांमध्ये नाष्त्यासाठी असते. चहा, उसळ-पाव (ब्रुन), मिरची भजी वाह मज्जा येते.

तुमचा अभिषेक गुरुवार, 07/18/2013 - 13:13
हा एकंदरीत प्रकारच माझ्या आवडीचा मग आतले सारण असो वा नसो.. पण याचे इतके सुंदर रुप पहिल्यांदा बघतोय.. चवीलाही फोटोच्या तोडीस तोड असणारच यात शंका नाही..

चिगो गुरुवार, 07/18/2013 - 18:51
सगळ्या लग्न झालेल्या मिपाकरांच्या बायका, 'सानिकातैला मिपावर पाकृ टाकणे बॅन करा' ह्या मागणीसाठी मिपा सर्व्हरवर मोर्चा काढणार आहेत, असे विश्वसनीय सुत्रांकडून कळते. अधेमधे मिपा सर्व्हरचे गोठणे, हे ह्या महीलामंडळाच्या हालचालींमुळेच घडले, असेही ह्या सुत्रांकडून कळते. "काय शिंचा त्रास आहे? तिथे मिपावर त्या सानिकाच्या पाकृ बघतात, आणि आम्हाला छळतात ! एवढंच होतं तर 'मास्टर शेफ'शी लग्न करायचं..” ही खाजगीतली खळखळही कळली.. ताई, डोळे निवण्याची आणि जीभ खवळण्याची तुझी किमया गजब आहे.. अशीच कृपा ठेव..

इशा१२३ Sat, 05/10/2014 - 14:57
अप्रतिम....सानिका नेहेमीप्रमाणे सुंदर फोटो...लेकाला आवडते म्हणून पनीरही खिसून घालते मी सारणात.आवडता पदार्थ आहे.

एस Mon, 11/17/2014 - 23:18
वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा
घ्या, इथल्या चिंच-खजुराच्या चटणीबद्दल कोणी काही बोललं नाही. आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर धागाच हायजॅक केला! असो, असो. तूर्तास आपली पाककृती (नेहमीप्रमाणेच नेहमीइतकीच) आवडण्यात आली आहे असे नमूद करतो. वीकांताला करून (इतरांना खायला देऊन) पाहण्यात येईल.

In reply to by एस

सूड Mon, 11/17/2014 - 23:21
>> आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर धागाच हायजॅक केला! काही वेळा, काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हे महत्त्वाचं असतं. ;)

In reply to by सूड

एस Mon, 11/17/2014 - 23:29
कंपूबाजी असे त्याचे दुसरे नाव आहे. अर्थात तो मनुष्यस्वभाव आहे आणि विषयवस्तूचे मूल्यांकन आपण इतर घटकांचा आधार घेऊन ठरवत असतो. उदा. स्वस्त बाटलीतून आणि महागड्या बाटलीतूनही तीच वाईन चषकात ओतून प्यायला दिली तर चव वेगवेगळी लागते, तसं काहीसं. ग्रुप-सायकॉल्जीच्या दृष्टीने रोचक विषय. :-)

In reply to by एस

ते सगळं बरोबर आहे पण तुमच्या धाग्यावर धुमाकुळ घालणार्‍यांपैकी मी नाही हे सांगू इच्छिते ;) प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद :)

In reply to by एस

प्यारे१ Tue, 11/18/2014 - 16:47
मिरची वडा असल्यानं थोडंफार तिखट लागलं तर गोडाची चटणी काम करेल असा विचार असेल हो! तुमचा वडा साधा वडा होता ना? मिर्ची वडा नव्हता. समझा करो जी!