----------------
पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
प्रतिक्रिया
15 Jun 2013 - 5:40 pm | यशोधरा
सुरुवात पसायदानाने करुयात.
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे ||
तोषोनी मज द्यावे | पसायदान हे ||
जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मी रति वाढो ||
भुतां परस्परे पडो | मैत्र जीवांचे ||
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांच्छील तो ते लाहो | प्राणिजात ||
वर्षत सकळमंगळी | ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां ||
चला कल्पतरुंचे आरव | चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयुषांचे ||
चंद्रमे जे अलांच्छन | मार्तंड जे तापहीन ||
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु ||
किंबहुना सर्वसुखी | पूर्ण होऊनी तिही लोकीं ||
भजि जो आदिपुरुखी | अखंडित ||
आणि ग्रंथोपजीविये | विषेशी लोकी इये |
दृष्टादृष्टविजये || होआवे जी ||
येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ | आ होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञानदेवो | सुखियां जाला ||
- ज्ञानेश्वरमहाराज
15 Jun 2013 - 6:03 pm | पैसा
छान सुरुवात! अशीच समर्थ रामदासांची करुणाष्टके आठवतात. माझी आजी रोज संध्याकाळी आरती करायची. तेव्हा आरती संपताना ही करुणाष्टके म्हणायची. आपोआप पाठ झाली होती.
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया |
परम दीन दयाळा नीरसी मोह माया ||
अचपळ मन माझे नावरे अवरीतां |
तुजविण शीण होतो धाव रे धाव आता ||१||
भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला |
स्वजनजन धनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ||
रघुपति मति माझी आपुलीशी करावी |
सकळ त्यजुनि भावे कास तुझी धरावी ||२||
विषय जनित सुखे सौख्य होणार नाही |
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही ||
रवि कुळ टिळका रे हीत माझे करावे |
दुरीत दुरी हरावे स्वस्वरुपी भरावे ||३||
तनु मनु धनु माझे राघवा रुप तूझे |
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे ||
प्रचलित न करावी सर्वथा बुध्दि माझी |
अचल भजन लीला लागली आस तूझी ||४||
चपळ पण मनाचे मोडितां मोडवेना |
सकळ स्वजन माया तोडविता तोडवेना ||
घडि -घडि विघडे निश्चय अंतरीचा |
म्हणुनि करुणा हे बोलतो दीन वाचा ||५||
जळत ह्रदय माझे जन्म कोट्यानुकोटि |
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी ||
तळ मळ निववी रे राम कारुण्य सिंधू |
षडरिपू कुळ माझे तोडि याचा समंधु || ६||
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी |
सिणत -सिणत पोटी पाहिली वाट तुझी ||
झडकरी झड घाली धांव पंचानना रे |
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ||७||
सबळ जनक माझा लावण्य पेटी |
म्हणौनि मज पोटी लागली आस मोठी ||
दिवस गणित बोटी प्राण ठेवुनि कंठी |
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ||८||
जननि जनक माया लेकरु काय जाणे |
पय न लगत मूखे हाणतां वत्स नेणे ||
जळधर कण आशा लागली चातकासी |
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ||९||
तूजविण मज तैसे जाहले देवराया |
विलग विषम काळी तूटली सर्व माया |
सकळ जन सखा तू स्वामि आणीक नाही |
वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही ||१०||
स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे |
रघुपति आतां चित्त कोठे न राहे |
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती |
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ||११||
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे |
जिवलग मग कैचे चालते हेचि साचे ||
विलग विषम काळी सांडिती सर्व माळी |
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ||१२||
सुख-सुख म्हणता दु:ख ठाकुनि आले |
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ||
भ्रमित मन वळेना हीत ते आकळेना |
परम कठिण देही देह बुध्दि गळेना ||१३||
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी |
सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी ||
घडि-घडि मन आतां राम रुपी भरावे |
रविकुळटिळका रे आपुलेसे करावे ||१४||
जळचर जळ वासी नेणती त्या जळासी |
निसिदिन तुजपासी चूकलो गूणरासी ||
भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी |
सकल भुवनवासी भेटि दे रामदासी ||१५||
16 Jun 2013 - 10:59 pm | रेवती
mast aaThavaN!maazyaa aajeenMtar aataa vaDeel he roj mhaNataat. AthavaNee......
15 Jun 2013 - 11:13 pm | आदूबाळ
मिपावरील अध्यात्मपटूंसाठी
लटिके हासे लटिके रडे। लटिके उडे लटिक्यापे।।
लटिके माझे लटिके तुझे। लटिके ओझे लटिक्याचे।।
लटिके गाये लटिके ध्याये। लटिके जाये लटिक्याचे।।
लटिका भोगी लटिका त्यागी। लटिका जोगी जग माया।।
लटिका तुका लटिक्या भावे। लटिका बोले लटिक्यांसवे।।
- तुकाराम
16 Jun 2013 - 10:55 pm | लॉरी टांगटूंगकर
पु.लं.
पुलंचे एक पत्र
पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.
त्यास पु लं. नी दिलेलं उत्तर -
१० जुलै १९५७,
प्रिय चंदू
तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?
पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.
तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.
पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?
तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!
तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.
तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.
तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.
My dear boy, whose deaths are justifiable?
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.
भाई.
17 Jun 2013 - 12:00 am | आदूबाळ
वा! वा!
हे वाक्य भिडून गेलं अगदी...
19 Jun 2013 - 7:39 pm | बहुगुणी
अप्रतिम!
मनःपूर्वक धन्यवाद, मन्द्या, एक लखलखता हिरा हातात आणून दिलात!
12 Jul 2013 - 10:20 pm | सखी
लखलखता हिरा हातात आणून दिलात! अनेक धन्यवाद. पुलंच इतक लेखन वाचलं असं वाटतं आणि कधीतरी असा लेख वाचल्यावर खजिना सापडल्याचे सुख मिळते. अनेक धन्यवाद मन्द्या.आणि परत एकदा मोदक यांचेही आभार.
22 Jun 2013 - 10:37 pm | शिल्पा ब
पु.ल. आवडतात ते अशाच मनोवृत्तीमुळे. असे लोकं खरंच मनाला उभारी देउन जातात.
हे पत्र मी माझ्या ब्लॉगवर पण टाकतेय.
25 Jun 2013 - 11:13 am | चौकटराजा
प्यीयेल यांच्या लेखन संसारावर , त्यांच्या काही स्वभाव विशेषांवर टीका करणारे लोकही आहेत. पण मी तरी त्याना माझ्या निवडक अध्यात्मिक गुरूंपैकी मानतो. ( त्यांचाच व्यक्तिपूजेला विरोध असल्याने नमस्कार , स्वाक्षरी यासाठी मी त्याना पुर्या जिंदगीत कधीही भेटलो नाही. हे पत्र वाचून आपली निवड चुकली नाही याची खात्री पटली.
12 Jul 2013 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू.
हे वाक्य म्हणजे केवळ पुल, बस !17 Jun 2013 - 12:58 am | मोदक
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ, नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र.
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता.
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी.
आयुष्य म्हणजे जीवधनचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वत:च्या हातावर पेललेला तुमचा भार.
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर.
आयुष्य म्हणजे पावनखिंड, हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा.
आयुष्य म्हणजे एक रात्र, चार मित्र , नाणेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी.
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ, कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास.
आयुष्य म्हणजे नळीची वाट, कोकणकडा आणि तारामती मंदिर.
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली " क्षत्रियकुलावतंस....." आरोळी.
आयुष्य म्हणजे वासोटा, चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य.
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज.
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड.
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री....
(जालावरच्या माझ्या आवडत्या फोटोसह आवडत्या ओळी..)
17 Jun 2013 - 1:01 am | मोदक
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||
वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||
खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||
तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||
श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||
सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||
केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला!
17 Jun 2013 - 1:08 am | मोदक
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा
रानफुलें लेऊन सजल्या, या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी, मला जाऊ दे रे
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झर्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारें
तुझे प्रेम घेऊन येती गंध धूंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या, तुला वाहू दे रे!
---मंगेश पाडगांवकर.
17 Jun 2013 - 1:18 am | मोदक
दासबोधातील मूर्खांची लक्षणे ;-)
______________________________________________
परस्त्रीसीं प्रेमा धरी| श्वशुरगृही वास करी |
कुळेंविण कन्या वरी| तो येक मूर्ख ||
आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||
अकारण हास्य करी| विवेक सांगतां न धरी |
जो बहुतांचा वैरी| तो येक मूर्ख ||
बहुत जागते जन| तयांमध्यें करी शयन |
परस्थळीं बहु भोजन- | करी, तो येक मूर्ख ||
औषध न घे असोन वेथा| पथ्य न करी सर्वथा |
न मिळे आलिया पदार्था| तो येक मूर्ख ||
आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें| तो येक मूर्ख ||
दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें| तो येक मूर्ख ||
कळह पाहात उभा राहे| तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे| तो येक मूर्ख ||
लक्ष्मी आलियावरी| जो मागील वोळखी न धरी |
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी| तो येक मूर्ख ||
आपलें काज होये तंवरी| बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी| तो येक मूर्ख ||
______________________________________________
प्यारे, यशोधरा व अन्य वाचकगण - दासबोधातील तुमच्या आवडीच्या ओळी वाचायला आवडतील.
______________________________________________
17 Jun 2013 - 9:31 am | यशोधरा
दशक २० समास १०
॥श्रीराम॥ धरूं जातां धरितां नये | टाकूं जातां
टाकितां नये | जेथें तेथें आहेच आहे | परब्रह्म तें ||१||
जिकडे तिकडे जेथें तेथें | विन्मुख होतां सन्मुख
होतें | सन्मुखपण चुकेना तें | कांहीं केल्या ||२||
बैसलें माणुस उठोन गेलें | तेथें आकाशचि राहिलें |
आकाश चहुंकडे पाहिलें | तरी सन्मुखचि आहे ||३||
जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें | तिकडे आकाशचि
भोवतें | बळें आकाशाबाहेर ते | कैसें जावें ||४||
जिकडेतिकडे प्राणी पाहे | तिकडे तें*सन्मुखचि आहे |
समस्तांचें मस्तकीं राहे | माध्यानीं मार्तंड जैसा ||५||
परी तो आहे येकदेसी | दृष्टांत न घडे वस्तुसी |
कांहीं येक चमत्कारासी | देउनी पाहिलें ||६||
नाना तीर्थें नाना देसीं | कष्टत जावें पाहाव्यासी |
तैसें नलगे परब्रह्मासी | बैसलें ठाईं ||७||
प्राणी बैसोनीच राहातां | अथवा बहुत पळोन
जातां | परब्रह्म तें तत्वतां | समागमें ||८||
पक्षी अंतराळीं गेलां | भोवतें आकाशचि तयाला |
तैसे ब्रह्म प्राणीयांला | व्यापून आहे ||९||
परब्रह्म पोकळ घनदाट | ब्रह्म सेवटाचा सेवट |
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्वकाळ ||१०||
दृश्या सबाहे अंतरीं | ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं |
आरे त्या विमळाची सरी | कोणास द्यावी ||११||
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं | इंद्रलोकीं चौदा लोकीं |
पन्नगादिक पाताळलोकीं | तेथेंहि आहे ||१२||
कासीपासून रामेश्वर | आवघें दाटलें अपार |
परता परता पारावार | त्यास नाहीं ||१३||
परब्रह्म तें येकलें | येकदांचि सकळांसी व्यापिले |
सकळांस स्पर्शोन राहिलें | सकळां ठाईं ||१४||
परब्रह्म पाउसें भिजेना | अथवा चिखलानें भरेना |
पुरामधें परी वाहेना | पुरासमागमें ||१५||
येकसरें सन्मुक विमुख | वाम सव्य दोहिंकडे येक |
आर्धऊर्ध प्राणी सकळीक | व्यापून आहे ||१६||
आकाशाचा डोहो भरला | कदापी नाहीं उचंबळला |
असंभाव्य पसरला | जिकडे तिकडे ||१७||
येकजिनसि गगन उदास | जेथें नाहीं दृश्यभास |
भासेंविण निराभास | परब्रह्म जाणावें ||१८||
संतसाधु माहानुभावां | देवदानव मानवां |
ब्रह्म सकळांसी विसांवा | विश्रांतिठाव ||१९||
कोणेकडे सेवटा जावें | कोणेकडे काये पाहावें |
असंभाव्य तें नेमावें | काये म्हणोनी ||२०||
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे | कांहीं येकासारिखें
नव्हे | ज्ञानदृष्टीविण नव्हे समाधान ||२१||
पिंडब्रह्मांडनिरास | मग तें ब्रह्म निराभास |
येथून तेथवरी अवकास | भकासरूप ||२२||
ब्रह्म व्यापक हें तो खरें | दृश्य आहे तों हें उत्तरें |
व्यापेंविण कोण्या प्रकारें | व्यापक म्हणावें ||२३||
ब्रह्मासी शब्दचि लागेना | कल्पना कल्पूं शकेना |
कल्पनेतीत निरंजना | विवेकें वोळखावें ||२४||
शुद्ध सार श्रवण | शुद्ध प्रत्ययाचें मनन |
विज्ञानी पावतां उन्मन | सहजचि होतें ||२५||
जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ |
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें ||२६||
हिसेब जाला मायेचा | जाला निवाडा तत्वांचा |
साध्य होतां साधनाचा | ठाव नाहीं ||२७||
स्वप्नीं जें जें देखिलें | तें तें जागृतीस उडालें |
सहजचि अनुर्वाच्य जालें | बोलतां नये ||२८||
ऐसें हें विवेकें जाणावें | प्रत्ययें खुणेंसी
बाणावें | जन्ममृत्याच्या नावें | सुन्याकार ||२९||
भक्तांचेनि साभिमानें | कृपा केली दाशरथीनें |
समर्थकृपेचीं वचनें | तो हा दासबोध ||३०||
वीस दशक दासबोध | श्रवणद्वारें घेतां शोध |
मननकर्त्यास विशद | परमार्थ होतो ||३१||
वीस दशक दोनीसें समास | साधकें पाहावें
सावकास | विवरतां विशेषाविशेष | कळों लागे ||३२||
ग्रंथाचें करावें स्तवन | स्तवनाचें काये प्रयोजन |
येथें प्रत्ययास कारण | प्रत्ययो पाहावा ||३३||
देहे तंव पांचा भूतांचा | कर्ता आत्मा तेथींचा |
आणी कवित्वप्रकार मनुशाचा | काशावरुनी ||३४||
सकळ करणें जगदीशाचें | आणी कवित्वचि काय
मानुशाचें | ऐशा अप्रमाण बोलण्याचें | काये घ्यावें ||३५||
सकळ देह्याचा झाडा केला | तत्वसमुदाव उडाला |
तेथें कोण्या पदार्थाला | आपुलें म्हणावें ||३६||
ऐसीं हें विचाराचीं कामें | उगेंच भ्रमों नये
भ्रमें | जगदेश्वरें अनुक्रमें | सकळ केलें ||३७||
19 Jun 2013 - 11:27 pm | प्यारे१
दासबोध वाचताना रोजचा/चे १/२ समास वाचून संपल्यावर
>>>>जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ
ह्या ओवीपासून शेवटपर्यंतच्या १३ ओव्या म्हणण्याची प्रथा आहे. आक्खा ७७५९ ओव्यांचा ग्रंथ लिहून झाल्यावर
>>>>सकळ करणें जगदीशाचें | आणी कवित्वचि काय मानुशाचें | ऐशा अप्रमाण बोलण्याचें | काये घ्यावें
म्हणणारे समर्थ रामदास आमच्यासाठी एक आदर्श ठेवतात.
(आम्ही एक लेखमाला लिहीली की 'फुगतो')
17 Jun 2013 - 1:52 am | मोदक
इयत्ता सहावी किंवा सातवी मध्ये असताना एका काव्यगायन स्पर्धेसाठी हे संपूर्ण गीत तोंडपाठ केले होते..
_________________________________________________________
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला
19 Jun 2013 - 9:36 pm | यशोधरा
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
-स्वातंत्र्यवीर सावरकर
19 Jun 2013 - 10:38 pm | पैसा
निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे
जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर
तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला
उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून जाले ओले-ओले
कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे
फुलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे
कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे
घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करिते दिडदा दिडदा
---बा.भ.बोरकर---
19 Jun 2013 - 10:57 pm | मोदक
हा धागा बहुदा "कविता स्पेशल" होणार!!!! :-)
19 Jun 2013 - 11:50 pm | मोदक
वेडात मराठे वीर दौडले सात.. ऐकले की न चुकता हे ही आठवले जाते..
********************************************************
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती
आईच्या गर्भात उमगली झूंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घे़ईल अशी पहाडी छाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती
झुंजाव वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी इसरू माया, ममता नाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती...
--- शांता शेळके
20 Jun 2013 - 6:15 am | स्पंदना
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको
मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी होउनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको
विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको
दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको
आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको
सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको
-अनंत फंदी
21 Jun 2013 - 11:45 pm | पैसा
श्रीमद्वल्लभाचार्यांचे मधुराष्टक पूर्वी रेडिओवर ऐकून फार आवडते झाले होते.
-------------------
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। १ ।।
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम्
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। २ ।।
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ३ ।।
गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ४ ।।
करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ५ ।।
गुञ्जा मधुरा बाला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ६ ।।
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ७ ।।
गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ।। ८ ।।
22 Jun 2013 - 12:12 am | मोदक
एकात्मता स्तोत्र...
ॐ नमः सच्चिदानंद रूपाय परमात्मने
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमंगल्यमूर्तये || १ ||
प्रकृतिः पंचाभूतानि ग्रहा लोकाः स्वरास्तथा
दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मंगलम्।। २।।
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारत मातरम् || 3 ||
महेन्द्रो मलयःसह्यो देवतात्मा हिमालयः
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा || ४ ||
गंगा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी || ५ ||
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवन्तिका
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया || ६ ||
प्रयागः पाटलिपुत्रं विजयानगरं महत्
इन्द्रप्रस्थं सोमनाथस्तथामृतसरः प्रियम् || ७ ||
चतुर्वेदाः पुराणानि सर्वोपनिषदस्तथा
रामायणं भारतं च गीता षड्दर्शनानि च ॥८॥
जैनागमास्त्रिपिटकः गुरुग्रन्थः सतां गिरः
एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदि सर्वदा ॥९॥
अरुन्धत्यनसूय च सावित्री जानकी सती
द्रौपदी कन्नगे गार्गी मीरा दुर्गावती तथा ॥१०॥
लक्ष्मी अहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा
निवेदिता सारदा च प्रणम्य मातृ देवताः ॥११॥
श्री रामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः
मार्कंडेयो हरिश्चन्द्र प्रह्लादो नारदो ध्रुवः ॥१२॥
हनुमान् जनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः
दधीचि विश्वकर्माणौ पृथु वाल्मीकि भार्गवः ॥१३॥
भगीरथश्चैकलव्यो मनुर्धन्वन्तरिस्तथा
शिबिश्च रन्तिदेवश्च पुराणोद्गीतकीर्तयः ॥१४॥
बुद्ध जिनेन्द्र गोरक्शः पाणिनिश्च पतंजलिः
शंकरो मध्व निंबार्कौ श्री रामानुज वल्लभौ ॥१५॥
झूलेलालोथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा
नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥१६॥
देवलो रविदासश्च कबीरो गुरु नानकः
नरसी तुलसीदासो दशमेषो दृढव्रतः ॥१७॥
श्रीमच्छङ्करदेवश्च बंधू सायन माधवौ
ज्ञानेश्वरस्तुकाराम रामदासः पुरन्दरः ॥१८॥
बिरसा सहजानन्दो रमानन्दस्तथा महान्
वितरन्तु सदैवैते दैवीं षड्गुणसंपदम् ॥१९॥
रविवर्मा भातखंडे भाग्यचन्द्रः स भोपतिः
कलावंतश्च विख्याताः स्मरणीया निरंतरम् ॥२०॥
भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जनकस्तथा
सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥२१॥
अगस्त्यः कंबु कौन्डिण्यौ राजेन्द्रश्चोल वंशजः
अशोकः पुश्य मित्रश्च खारवेलः सुनीतिमान् ॥२२॥
चाणक्य चन्द्रगुप्तौ च विक्रमः शालिवाहनः
समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावलः ॥२३॥
लाचिद्भास्कर वर्मा च यशोधर्मा च हूणजित्
श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥२४॥
मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिव भूपतिः
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यात विक्रमाः ॥२५॥
वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः शुश्रुतस्तथा
चरको भास्कराचार्यो वराहमिहिर सुधीः ॥२६॥
नागार्जुन भरद्वाज आर्यभट्टो वसुर्बुधः
ध्येयो वेंकट रामश्च विज्ञा रामानुजायः ॥२७॥
रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशः ॥२८॥
दादाभाई गोपबंधुः टिळको गांधी रादृताः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्य भारती ॥२९॥
सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥
संघशक्ति प्रणेतारौ केशवो माधवस्तथा
स्मरणीय सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥३१॥
अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरण संसक्तहृदयाः
अनिर्दिष्टाः वीराः अधिसमरमुद्ध्वस्तरि पवः
समाजोद्धर्तारः सुहितकर विज्ञान निपुणाः
नमस्तेभ्यो भूयात्सकल सुजनेभ्यः प्रतिदिनम् ॥ ३२॥
इदमेकात्मता स्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत्
स राष्ट्रधर्म निष्ठावानखंडं भारतं स्मरेत् ॥३३॥
|| भारत माता की जय ||
22 Jun 2013 - 10:57 pm | प्यारे१
सकाळी सकाळी काळी टोपी, पांढरा बाह्या दुमडलेला शर्ट, खाकी तरंगती हाप्पॅन्ट, ब्रासच्या बक्कलचा रुंद ब्राऊन पट्टा, खाकी मोजे, काळे लेदर बूट मध्ये गळ्यात शिट्टी अडकवून एकात्मता स्तोत्र म्हणणारा मोदक डोळ्यासमोर उभा राहिला.
वाह! ;)
25 Jul 2013 - 7:50 pm | अनिरुद्ध प
नव्हे सदरा आणि आता चामड्याचा पट्टा जावुन नायलोनचा झाला आहे.
17 Jul 2013 - 10:35 pm | पिशी अबोली
याची पहिली ओळ बदलून 'ओम् सच्चिदानंद रुपाय' अशी केल्याचे ऐकले होते..
25 Jul 2013 - 7:52 pm | अनिरुद्ध प
नाही त्यान्नी प्रात्स्मरण शिर्षक बदलुन लिहिले आहे.
25 Jul 2013 - 11:10 pm | पिशी अबोली
प्रातःस्मरण म्हणूनच म्हटले जाते एकात्मता स्तोत्र..
पहिली ओळ अशीच म्हटली जायची. पण संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने ते जरा चुकीचे वाटत असल्याने ती ओळ बदलली होती काही वर्षांपूर्वी.
26 Jul 2013 - 6:21 pm | अनिरुद्ध प
माझा एकत्मता स्तोत्र आणि मन्त्र यात गोन्धळ झाला,आपले म्हणणे बरोबर आहे.
25 Jul 2013 - 7:47 pm | अनिरुद्ध प
नमस्ते सदा वत्सले मात्रुभूमे.
22 Jun 2013 - 10:24 pm | यशोधरा
" आपल्या आयुष्यात इसेन्शिअल्स असतात, तशीच नॉन - इसेन्शिअल्स असतात. पैकी, आयुष्यातल्या उच्च बाबींबर तडजोड करु नये. मामुली बाबींबर तडजोड केल्यामुळं काही बिघडत नाही. शुद्ध अभिजात कविता हे माझ्या आयुष्यातलं प्रधान अंग आहे. तिथं मी कालत्रयी तडजोड करणार नाही; कधी केलेलीही नाही. अभिजात कविता साहित्यात मोडते.
माणसाने प्रथम इसेन्शिअल्स कुठली, ती ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत नाही. ज्यामुळे तुमचा विकास होईल, तिथे तडजोड नसावी. तसा मी फार सोवळा नाही. नीतीग्रस्त व्यक्तिमत्वाने पछाडलेला नाही. भीतीच्या पोटी जन्मलेली नीतीमत्ता मला नामंजूर आहे. माणसाकडे स्वतःची म्हणून चिंतनसिद्ध, अनुभवसिद्ध अशी नैतिक मूल्यं असावीत आणि ती त्याने स्वतःला आणि इतरांना समदृष्टीने लावावीत. जे स्वातंत्र्य मी भोगलं, ते मी इतरांनाही लुटू देईन. पर्सनल गॉडवर माझी श्रद्धा नाही, पण देव आहे. दैव आहे. पावलोपावली मला त्याचा प्रत्यय येतो."
- कवी बोरकर (रवींद्र पिंगे ह्यांच्याशी गप्पा मारताना.)
25 Jun 2013 - 9:50 am | दिपक
--डॉ. मिलिंद कुलकर्णी
http://www.lokprabha.com/20120210/kokancho-doctor.htm
25 Jun 2013 - 10:57 am | यशोधरा
रात्र-उत्तररात्र मधल्या रॉय किणीकरांच्या सगळ्या कविता. अख्खं पुस्तक इथे लिहावं लागेल!
25 Jun 2013 - 11:58 am | सुहास..
अपर्णा ताईने रंगवलेली कोल्हापुरची नवरात्र !! आजच आणि कालच चित्र !! ....http://www.misalpav.in/node/14920
या माळेच्या साथीन आणखी एक माळ सुरु असायची 'हादग्याची'. तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.आमच नात 'हस्त' नक्षत्राशी म्हणून हादगा. तर पहिल्या दिवशी फक्त एक गाण, मग दुसऱ्या दिवशी दोन असं करत नवव्या दिवशी नऊ गाणी म्हंटली जायची. छोटी मोठी खिरापत वाटली जायची.
नवमीला शस्त्र पूजा. घराच्या भिंतीत एक माणूस चालत आत जाईल अश्या कपाटातून , तलवारी, भाले, जंबिया , दांडपट्टा, अन दोघं दोघं मिळून उचलाव्या लागणाऱ्या ढाली! अशी शस्त्र बाहेर काढून, स्वच्छ केली जायची. ढाली भरपूर तेल घालून अन वरचे पितळी छाप उजळवून घ्यायच्या. तलवारी पण अश्याच स्वच्छ करून हे सार सतरंजीवर मांडायचं. त्यात मग आमची पुस्तक पण ठेवली जायची. गुलाल उधळून मग या शस्त्रांना कोंबडा कापला जायचा.
दसऱ्या दिवशी मात्र सकाळी पोळ्या अन दुपारी बळी पडून संध्याकाळी ते मटण असायचं.
संध्याकाळी एकच गडबड उडायची. सारेजण शिलंगण करून मग थोड्या अंतरावरच्या निर्जन माळावर असलेल्या भैरीच्या देवळाला जायला निघत. गावातून दोन चार बैल गाड्या जुंपून ही मंडळी तुफान उधळत रात्री मंदिर गाठत. वाटेवर अजूनही असलेला चिख्खल, बाजूच्या शिवारातून उचललेल्या कोवळ्या भुईमुगाचे वेल, अन तशीच दुध कोवळी कणस, हे सार 'सोन' म्हणून वाटलं जायचं. घरात येणारा प्रत्येक जण चिखलाचे पाय घेऊनच घरात शिरत असे. लहाण थोर सारे एकमेकांना थोडीफार शमीची पान नाहीतर, हे बाकीचच कौतूकान देत घेत असत. शेवटी भावनेला महत्व नाही का?
उनक ( उपेक्षित नवरे कमीटी) चे संस्थापक अध्यक्ष व लेखणीतुन हळुच गुदगुल्या करणारा लेखक आदिजोशी ने दिलेल्या निर्लज्जपणा च्या टिपा ... ;)
http://www.misalpav.in/node/14656
घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन
स्थळ - अर्थातच ऑफिस
वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.
पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.
बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?
तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.
तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.
लिखाळ गुर्जींनी कमीत कमी शब्दात मुक्तपिठीय लेखनाला मारलेला टोमणा ( लिंक नको कारण लेख च ईतकाच आहे. )
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात.
झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. अपमान गिळून मी कसाबसा चेहरा लपवत जागेवरून उठलो तरी त्या बाईंचे शिव्याशाप चालूच होते. लग्गेच बसमधून उतरावे असे मनात येत होते पण काय करणार.. इलाजच नव्हता.
पुढल्या एका बाकावर एक आज्जी बसल्या होत्या. त्या सर्व प्रकार पाहत होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून एक हलकेसे स्मितहास्य केले आणि म्हणाल्या 'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' त्यांच्या त्या दिलासा देणार्या हास्याने मला फार फार बरे वाटले. फार गोड आज्जी होत्या. पुढचा प्रवास माझा एकदम हलक्या मनाने झाला. स्मितहास्याची जादू होती. उतरताना मी त्या रागावणार्या काकूंकडे हसून बघितले. त्यांना माझे वागणे एकदम आश्चर्याचेच वाटले. त्या खजिल झाल्या. बाकावरल्या आज्जी हे पाहत होत्या. उतरताना नुसती आमची नजरानजर झाली. आणि त्यांच्या चेहर्यावरचे ते स्मित मी पुन्हा एकदा जपून ठेवले माझ्या मनाच्या कुपीत.
कुणीतरी हवं असतं
स्मितहास्य करणारं
हलकेच हसून आपले
आसू पुसणारं.
25 Jun 2013 - 12:06 pm | चौकटराजा
हा धागा म्हणजे साहित्य प्रेमींसाठी पर्वणीच ठरावी. सबब 'पर्वणी' नावाचीच एक कविता सादर आहे.
कवि- वि वा तथा तात्यासाहेब शिरवाडकर - कुसुमाग्रज- पुस्तक- छंदोमयी
पर्वणी ...
व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर |
संताचे पुकार वांझ झाले ||
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग |
दंभ शिगोशीग तुडुंबला ||
बँड वाजविती सैंया पिया धून |
गजाचे आसन महंतासि ||
भाले खडग हाती नाचती गोसावी |
वाट या पुसावी अध्यात्माची ||
कोणी एक उभा एका पायावरी |
कोणास पथारी कंटकाची ||
असे जपीतपी प्रेक्षकांची आस |
रुपयांची रास पडे पुढे ||
जटा कौपिनाची क्रीडा साहे जळ |
त्यात होत तुंबळ भाविकांची ||
क्रमांकात होता गफलत काही |
जुंपली लढाई गोसाव्यांची ||
साधु नाहतात साधु जेवतात |
साधु विष्ठतात रस्त्यावरी ||
येथे येती ट्रक तूपसाखरेचे |
टॅकर दुधाचे रिक्त होती ||
यांच्या लंगोटीला झालर मोत्याची |
चिलिम सोन्याची ज्यांच्यापाशी ||
येथे शंभराला लाभतो प्रवेश |
तेथे लक्षाधीश फक्त जातो ||
अशी झाली सारी कौतुकाची मात |
गांजाची आयात टनावारी ||
तुका म्हणे ऐसे मायेचे मईंद |
त्यापाशी गोविंद नाही नाही ||
वरील कवितेत कवि कल्पना वगैरे काही नाही. हात चांदण्याचे वगैरे काही नाही. आयुष्याचा उतरार्धात कुसुमाग्राजांच्या मनाने काव्यरूपात समाजातील उदेकांचा, विसंगतिचा, दैन्याचा, ढोंगाचा ठाव घेण्याच्या प्रयत्न केलेला दिसतो. कुंभमेळ्यात हवशे नवशे गवशे सगळेच गर्दी करतात .गोविंदाच्या दशेनाची खरोखरची आस घेऊन किती येत असतील ?
याचा शोध त्यांच्या या विदारक वर्णनात आढळतो. तात्यासाहेंबांना कोणत्याही शब्दाचे काव्यासाठी वावडे नाही.याचा प्रत्यय या कवितेतील काही शब्दाकडे लक्ष दिल्यास येईल.
25 Jun 2013 - 12:11 pm | यशोधरा
वा! नेमकी आणि सुरेख.
25 Jun 2013 - 12:28 pm | दिपक
ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्या बर्फाच्या चुर्यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन... आपलीच पाऊलनक्षी बघत गिरकी घेतं मन..पनगळ बघताना सुन्नाट झालेलं मन हरवतंच मग नकळत..
त्या पाऊलनक्षीचं एवढं वेड लागतं की तिथे एक पायवाटच बनते..मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !
अचानक त्याच्या लक्षात येतं, सूर्य हरवलाय ! म्हणून सावलीही ! हळुहळू काळोखाची चादर सवयीची होते. मऊ भासते. ओळखीच्या गंधात आपल्यातच घुटमळत रहातं मन...
रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..
आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....
ओह्ह..अंधाराचं पांघरूण विरतंय नि नवनवे गंध पसरतायत अवतीभवती..सावली परतली..म्हणजे सूर्यही...
मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..आणि सज्ज होतं हळुच फुलणार्या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी..
ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही....सापडतातही !
:-)
लेखिका - मितान
http://www.misalpav.com/node/16561
25 Jun 2013 - 12:37 pm | सुहास..
रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..
आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....
क्या बात है ! मितानची लेखणी...व्वा !! लिंकबद्दल धन्स ...
25 Jun 2013 - 1:04 pm | येडगावकर
आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे
श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे
हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे
पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें
नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें
गदिमा...
साधे सुंदर शब्द...
25 Jun 2013 - 1:08 pm | येडगावकर
भुई भेगाळली खोल, वल्लं र्हाईली न कुटं
पाल्या-पाचोळयाचा जीव वहाटुईशी घुस्मटं
उभ्या दस्कटाचं रान आयुष्याला भिंगुळवानं
मुक्या जात्याच्या बाळूशी ओवी गाते जिवातून
सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट
दाट दु:खाचं गाठुडं, शब्द उचलंना वटं
माय सुगरनी बाई, देई घरट्याशी थारा
असं बेवारशी जीनं सोसवेना उन्हं-वारा
26 Jun 2013 - 9:05 am | आदूबाळ
"अंताजीची बखर" या कादंबरीची प्रस्तावना. लेखकः नंदा खरे
26 Jun 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
अंताजीची बखर एक सर्वार्थाने वेगळी कादंबरी म्हणून नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पण मराठी समाजाचा भूतकाळ काही वर्षांसाठी तरी नक्कीच देदीप्यमान होता-गर्व से कहो म्हणण्यासारखा होता हे तर ढळढळीत सत्यच आहे. वर्तमानकाळ गंडला आहे सबब कैकदा स्मरणरंजन ही भावनिक गरज होते हे मान्य असलं तरी वरच्या परिच्छेदातून "खरं तर तसं काही नव्हतं पण गरज आहे म्हणून, बाकी काय...." असा सूर जाणवतोय आणि तो चुकीचा आहे. असो.
27 Jun 2013 - 12:29 am | आदूबाळ
तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे. खरंच आभाळाएवढी माणसं आपल्याकडे होऊन गेली. पण काही गटारतुल्य माणसंही झाली. एक परिपक्व समाज म्हणून थोरांची स्तोत्रं गाण्याबरोबरच चोरांची कृष्णकृत्यंही आहे त्या पद्धतीने मांडली गेली पाहिजेत. आपल्याकडे दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. "इतिहास न जाणणार्यांच्या नशिबी त्याची पुनरावृत्ती करणं लिहिलेलं असतं."* असं एक बुवा म्हणून गेलेले आहेत. मराठी समाज त्याच दिशेने चाललाय. अशा वेळेला "अंताजीची बखर" सारखी डायरेक मुद्याला हात घालणारी कादंबरी मोलाची वाटली.
अवांतरः अंताजी पार्ट २ "बखर अंतकाळाची" कशी आहे? हे संपल्यावर ते वाचीन म्हंटो...
*"Those who don't know history are destined to repeat it." - Edmund Burke
10 Jul 2013 - 5:56 pm | बॅटमॅन
अर्थातच-पूर्ण सहमत!
अंताजी पार्ट २ वाचली नै, वाचणा मंगताय...
30 Aug 2013 - 12:44 pm | शिवोऽहम्
इंग्रज आजचे नाडलेल्यांस झुकतें माप देईल,
की त्यास आजचे राजासरजांस मोडणे आहे.
तो कलागती लावेल, की एका एकजूट शंभरांस
सांभाळणेपेक्षा शंभर अलगविलगांस राखणें सोपें.
तर तो हरावा कसा? सोपें!
तो हरेल, इथले काळे एकमेकांस धरून
बाहेरच्यांस परास्त करतील, तेव्हा!
परंतु तो हरावा तरी कशासाठी?
जर इंग्रज रुपयांत बारा, चौदा आण्यांस नीट राखेल,
तर बाकी दोचार आण्यांस कोण आईकणार?
तर इंग्रजास पुणें शहर, पेशवाई, मराठशाई,
कोणी नाकारणार नाहीत! बलावून घेतील!
मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी आहे ही. बखर अंतकाळाची.
26 Jun 2013 - 9:49 pm | रामपुरी
इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
27 Jun 2013 - 3:04 pm | यशोधरा
माऊलींनी अत्यंत चपखल आणि समर्पक उदाहरणे देऊन समजावलेली सात्विक ज्ञानाची महती.
तरी अर्जुना गा ते फुडे | सात्विक ज्ञान चोखडे | जयाचा उदयी ज्ञेय बुडे |ज्ञातेनिसी ||
जैसा सूर्य न देखे अंधारे| सरिता नेणि़जती सागरे | का कवळिलिया न धरे | आत्मछाया ||
तयापरी जया ज्ञाना | शिवादि तृणावसाना | इया भूतव्यक्ती भिन्ना | नाडळती ||
जैसे हाते चित्र पाहाता | होय पाणिये मीठ धुता |का चेवोनि स्वप्ना येता |जैसे होय ||
तैसे ज्ञाने जेणे |करिता ज्ञातव्याते पाहाणे | जाणता ना जाणणे | जाणावे उरे ||
पैं सोने आटूनि लेणी | न काढती आपुलिया आयणी | का तरंग न घेपणी पाणी |गाळूनी जैसे||
तैसी तया ज्ञानाचिया हाता| ल लगेची दृश्यकथा | ते ज्ञान जाण सर्वथा | सात्विक गा ||
आरिसा पाहो जाता कोडे | जैसे पाहातेचि का रिगे पुढे |तैसे ज्ञेय लोटोनी पडे| ज्ञाताचि ते ||
पुढती तेचि सात्विक ज्ञान | जे मोक्षलक्ष्मीचे भुवन | हे असो ऐक चिन्ह | राजसाचे ||
आणि पुढे माऊली राजस ज्ञानाची लक्षणे सांगतात.
27 Jun 2013 - 3:40 pm | चौकटराजा
चित्रपट प्रपंच - दिग्दर्शक- मधुकर पाठक. गीतकार - ग दि माडगूळकर , संगीत -व गायक - सुधीर फडके
चित्रपटात - एक याचक रस्त्याने याचना करीत काही मागत चालला आहे. लोक यशाशक्ती त्याला काही देत आहेत.अशी
सिच्वेशन आहे. अण्णा माडगूळकरानी मात्र ही संधी साधून सामान्य माणूस ईशवराकडे काय मागतो ते मागंणे अध्यात्मिक रित्या किती सहज व योग्य आहे ते पहा-
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
हवाच तितुका पाडी पाउस देवा वेळो वेळी
चोची पुरता देवो दाणा माय माउली काळी
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी १
महाला माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजे पुरती देई वसने जतन कराया काया
एकवितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी २
सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दु:ख ईश्वरा रंक करी वा राजा
अपुरे पण हे नलगे मजला पस्तावाची पाळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ३
आजच्या सेकंड होम, थर्ड होम , पंचवीस पन्नास साड्या, अंग झाकून टाकतील ( अन चोरांच्या नजरेत आपसुक भरतील) एवढे दागदागिने, गाड्यांचा ताफा, दहा दहा स्वेटर. पाच पाच बेल्ट, वाढदिवसांची, पार्ट्यांची रेलचेल या जमान्यात बेसिक जीवन जगणे किती सोपे होते व असते . याचा पाठ इथे मिळावा या काव्यात. शबदकळा ही पहा- चोच आली की दाणा आला घास नाही. देवा, नाथा, ईशवरा ई सवेशाची नामाभिधाने किती चपखल पणे येतात !
27 Jun 2013 - 5:39 pm | रंगोजी
किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे.
कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे
कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे.
कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं -
मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे.
ते असो -
पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला.
आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो.
-गोपाल नीलकण्ठ दांडेकर
30 Jun 2013 - 7:51 pm | मोदक
10 Jul 2013 - 6:10 pm | बॅटमॅन
गोनीदा द ग्रेट!!!!!!!!!!!!
शब्द फारच अपुरे आहेत गोनीदांची जादू वर्णावयाला :( ती नेमकी शब्दकळा पकडणे कुणाच्या बापाला नाही जमायचे.
10 Jul 2013 - 6:27 pm | मोदक
***************************
बॅटम्यानाने लिहिलेले गोनिदा. गोनिदांच्याच शैलीमध्ये.
***************************
गोनीदांचे वाचून हे सुचले.
गोनीदांची पुस्तकं वाचणं म्हणजे तच्चिंतनं, तत्कथनं, तत्प्रबोधनं होऊन जातं. तो रस कितीही वेळेस चाखला तरी कंटाळा कसा ठावकीं नाही.
कुठे शितूस साद घालत खाडीवर विसूसवे भटकतो आहे. कुठे झाडाच्या बेचक्यात बसून बुधासवे "इवायन" न्याहाळतो आहे तर कुठे पवनाकाठी धोंडीसवे फिरतो आहे. कधी पडघवलीच्या अंबूवहिनीचे शौर्य पाहोन नतमस्तक होतो आहे तर कधी शिवछत्रपतींच्या मावळ्यांची आभाळाएवढी कर्तुकं आठवीत दातांतळी आंगुळी घालतो आहे. कधी माळव्यात यशोदेसवे फिरतो आहे तर कधी मांडवगडी मैतरांसवे हुंदाडताना रूपमती-बाजबहाद्दुरास आठवितो आहे. कधी आळंदीस सोनूमामा दांडेकरांसवे ज्ञानेश्वरी अनुभविताना थक्कीत होतो आहे तर कधी बाबासवे रायगडाची परिक्रमा करताना त्या द्रष्ट्या श्रीमंत योगियाचे रूप आठविताना सैराट हिंडतो आहे. कधी पैठणास ज्ञानोबासवे विद्वत्सभेत बसून राहतो आहे. कितीकदा एकुटवाणा तासंतास गोनीदा बनून बसतो आहे.
थोडकी वर्षे उलटोन गेली, परी दिठीस गोनीदा आझून आकळले नाहीत. आयुष्याची सकाळ फुलविणार्या या जादुगारासवे थोडका बसेन म्हणतो.
14 Jul 2013 - 3:27 pm | चौकटराजा
आप्पाना न घाबरता त्यांचा सहवास काही काळ लुटला ! त्यांच्या बरोबर दुर्ग भ्रमण करता आले नाही याची मोठी खंत आहे.
एक विशिष्ट स्वर लावलेले त्यांचे बोलणे असे ! वाणीत रसरसलेपण नि कांतितही !
30 Jun 2013 - 9:47 pm | मोदक
पुनश्चः गोनीदा, दुर्गभ्रमणगाथेतून. उत्तरेकडील किल्ले आणि आपले गिरीदुर्ग यांची तुलना करताना..
*************
महाराष्ट्रांतले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हिंडत होतों. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मजबरोबर होता. किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दाण्डेकरजी, एक सवाल पूछूँ?"
"जी हाँ, विना संकोचके!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे हैं| यह हमारा किला भी आपने देखा| क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यौं नहीं?"
"तब फिर शुरू किजीये!"
"पहले आपके इस किले के बारे में बता | जैसा कोई अमीर - हाथोंमें चमेलीकी मालाएं पहने, आँखोंमे सूरमा लगाएं, तकियेसे सटकर किसी तवायफका मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका किला वैसा सुहावना हैं|"
प्रसन्न होवून तो म्हणाला,
"क्या कही दाण्डेकरजी! वाकई आप उपन्यासकार हैं| जी अब इसके साथ आपके किलोंके बारेमें - - "
त्याला थांबवीत म्हटलं,
"अजी जाने दीजिये| मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नहीं की जा सकती|"
"भई, क्यों?"
"सारे बदनमें अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमें वज्रमुष्टि लिये एक एकके साथ जूंझ रहे हों, सारा बदन लहुलुहान हो गया हों, मेरे देशके गिरीदुर्ग देखनेपर इस दृष्यकाही स्मरण होता है!"
1 Jul 2013 - 1:39 am | यशोधरा
श्रम - सरितेच्या तीरावर
वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.
निळ्या नदीच्या किनार्यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोण उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्यांच्या फटीफटीतून निःशब्द चिणले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!
चौदा प्रेमांचा चोथा करणार्या सम्राटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!
संथ नाजूक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे,
मस्तकावर पाट्या वाहणार्या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे
भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत
भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!
खपणार्यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!
- बाबा आमटे
10 Jul 2013 - 5:54 pm | यशोधरा
नाळ तोडली तरीही
पुन्हा पुन्हा गुंते पायी
देहातल्या रक्तकणा
मूळ शोधायाची घाई
सात पिढ्यांच्या आडून
उतू येता गुणदोष
रुते कंठात हुंदका
पडे गळ्याखाली शोष
मागे पुढे दूरवर
अनाद्यनंत साखळी
नाही वृक्ष, नाही फांदी
मी तो नगण्य पाकळी
करकचून बांधता
असा भूतांचा वारसा
अमझे मलाच कळेना
बिंब किंवा मी आरसा?
- शांता शेळके
10 Jul 2013 - 8:55 pm | यशोधरा
शब्दांचे देठ खुडता
वळून नये पाहू
गढूळलेल्या पाण्यात पुन्हा
पाय नये देऊ.
फुलपाखरांचे झगमग पंख
- नंतर होतो चुरा
कुठला रंग खोटा म्हणशील?
कुठला म्हणशील खरा?
निग्रहाच्या नकाराची
ठाम इतकी ग्वाही
खुडल्या शब्दामधून पुन्हा
कविता फुटत नाही!
- शांता शेळके
11 Jul 2013 - 9:01 am | मोदक
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षॊभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा
--- बाकीबाब.
11 Jul 2013 - 10:47 am | गवि
कुठल्या धाग्यात हा प्रश्न विचारावा हे समजत नसल्याने त्यातल्यात्यात हा धागा योग्य वाटून इथे लिहीतोय.
"मी हाय कोली" या कोळीगीतामधे (हो.हो. बराक आणि मिशेल ओबामा मुंबईत ज्यावर नाचले तेच) .. पहिल्या काही ओळींमधे " मारतीन कोली, हानल्यान गोली, गो चल जाऊ बाजारी" असे शब्द आहेत.
याचा अर्थ काय?
संदर्भासाठी त्याआधीची ओळ:
मी हाय कोली, सोरिल्या डोली, मुंबईच्या / वसईच्या किनारी
मारतीन कोली हानल्यान गोली गो चल जाऊ बाजारी.
हे गाणं आगरी बोलीभाषेत आहे का?
सोरिल्या डोली म्हणजे होड्या सोडल्या असंच ना?
मुळात "मारतीन कोली, हानल्यान गोली" याचा अर्थ जालावर कुठेच सापडत नाही. नुसत्या तर्कानेही लावता येत नाहीये.
(अधिक अवांतर: एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी" इतकीच ओळ पूर्वी पुन्हापुन्हा ऐकली जाऊन देवीची नजर कोल्ह्यावर आहे अशी समजूत होती.. कोल्हा हा एकतर कोणा असुराचे रुप किंवा देवीचे वाहन असावे काय अशी शंका यायची. नंतर पूर्ण गाणं ऐकल्यावर मच्छीमार कोळ्यावर कृपादृष्टी आहे असा साक्षात्कार झाला. असो.)
11 Jul 2013 - 8:56 pm | मोदक
सोरिल्या डोली म्हणजे होड्या सोडल्या असंच ना?
(खात्री नाही पण जितके अल्पज्ञान आहे त्यानुसार) हो!
11 Jul 2013 - 7:18 pm | यशोधरा
समझ देख मन मीत पियरवा
आशिक होकर सोना क्या रे
रुखा सुखा गम का तुकडा
फीका और सलोना क्या रे
जब अखिंयोंमें नींद घनेरी
तकिया और बिछौना क्या रे
कहत कबीर प्रेम का मारग
सर देना तो रोना क्या रे
11 Jul 2013 - 7:23 pm | यशोधरा
कधी माझी कधी त्याचीही सावुली
रेंगाळे माझ्या चोरट्या पाऊली
कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा
कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा
चारी डोळ्यांतून दोघेही जागतो
दारी तोही कधी पणत लावतो
ऊन मीठपाणी काजळाच्या मागे
भिजे माझा पीळ; त्याचे धागे धागे
वाळू घातलेले माझे पांघरुण
कैसे ओढू? त्याचे मावळेल ऊन
एकाच घनाच्या दोन आम्ही सरी
प्राणावर एक, दुजी अंगावरी
गहाण शेताचे दोन आम्ही धनी
दूध दाण्यातले राखतो इमानी
मनाची गोफण तरी फिरताहे
कधी तो कधी मी उडू ऊडू पाहें..
- आरती प्रभू
11 Jul 2013 - 9:11 pm | पैसा
यशो, खूपच छान उतारे आणि कविता देते आहेस!
असाच एक उतारा रवींद्रनाथ ठाकुरांच्या पु लं नी भाषांतरित केलेया 'पोरवय' मधून.
आमच्या वडाच्या झाडावर एखाद्या वर्षी अचानक परदेशी पाखरं येऊन घरटी बांधतात. त्यांच्या पंखांचा नाच ओळखेओळखेपर्यंत पाहावं तर ती निघूनही गेलेली. ती दूरच्या रानातले अनोळखी सूर घेऊन यायची. तसंच आयुष्याच्या प्रवासात मधूनमधून जगाच्या अनोळखी प्रदेशातून आपल्या माणसांच्या दूती येतात आणि अंतःकरणाच्या सीमा विस्तारून जातात. न बोलावताच येतात. सरतेशेवटी एक दिवस बोलावूनसुद्धा भेटत नाहीत. निघून जाता जाता आयुष्याच्या पटाला वेलबुट्टीची किनार जोडून देतात. दिवसांरात्रीचं मोल कायमचं वाढवून जातात.
11 Jul 2013 - 10:14 pm | यशोधरा
सुरेख.
!
12 Jul 2013 - 9:41 pm | मूकवाचक
ज्ञानेश्वरीचे लाडके नाव आहे 'भावार्थदीपिका'. या अभिधानात तिचे कार्य व तिचा अंतरंगीय सोहळा प्रकट होतो. ज्ञानाची स्वामिनीच भक्ती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानविलासिनी असेलहि, पण ती भक्तीची अभिमानी आहे. श्रांतास छाया, दुखि:तास माया व पतितास दया अशी करूणामूर्ति म्हणजे ज्ञानेश्वरी. तत्वज्ञान व काव्य, जीवन व साक्षात्कार, अर्थ व संवेदना, साहित्य व चमत्कृती, दिव्यता व रसोन्मेष ज्या तर्हेने ज्ञानेश्वरीत क्रीडले आहेत, त्या तर्हेने मराठी साहित्यप्रांगणात अद्याप तरी अविष्कृत झालेले नाहीत.
ज्ञानदेवीचा मौलिक सिद्धांत अद्वैतवाद नव्हे तर द्वैताद्वैतविलक्षण भक्ती हाच होय. यालाच सामरस्य सिद्धांतही म्हणतात. विश्वात्मदेवाच्या पूजनार्थ ज्ञानदेवांच्या तबकात कर्म, ज्ञान, योग, मंत्र व तंत्र या पंचज्योतींचा भक्तीमयी प्रकाश आहे. ज्ञानेश्वरीचा भक्तीपंथ हा मोक्षाच्या वाटेवरून वैकुंठपीठास जाणारा नव्हे, तर मोक्षाचा अधिपति भगवंत हा वैराण वाळवंटात सवंगड्यांसमवेत नाचण्यास येण्यासाठी आखलेला तो 'पंथराज' आहे. ज्ञानेशांनी संपूर्ण महाराष्ट्रदेश परिशुद्ध जीवनधर्माने सचेत करून ओजस्वी व तेजस्वी धर्मपरंपरा निर्माण केली.
ज्ञान, कर्म वा योग हे भक्तीवाचून शून्य होत. भक्तीतूनच ते उगवतात व भक्तीरूप होऊन अंती भक्तविलासात प्रकट होतात हे मर्म जाणावे. आजच्या काळास योग्य वळण देण्यास भक्तीपंथाचा राजमार्गच संतांना रूचला आणि तोच त्यांनी विशेषे गौरवला. देवतेची कल्पना केवळ जीवदशेसाठीच ते मानतात, नाहीतर त्यांची देवता लागलीच 'विश्वात्मक रूप' धारण करते. ज्ञानेश हे सर्व संप्रदाय आपलेच मानीत आहेत, म्हणूनच की काय आज ज्ञानेशांनी दिग्दर्शित केलेल्या भगवान विठ्ठलाच्या नगरीत, संतांचे माहेरी सर्व संप्रदाय एकत्र होऊन 'वारकरी' म्हणून पंढरीच्या वाळवंटात निर्मळपणे व एकोप्याने वावरताना दिसतात. त्यांचे भक्तीमत ही एका विशाल व करूणामयी भावदशेचीच अखंड भारतवर्षास मिळालेली देणगी आहे.
ज्ञानेशप्रणित भक्ती पूर्ण वेदप्रणित आहे पण याहीपुढे तिच्या उदारतेने जीवनपद्धतीतली मोठीच उणीव भरून निघाली आहे. वर्णरहित आराधना व जीवनरचना ही त्यांच्या भक्तीची महानता व विशेषता होय. गुरूतत्वाचेच ईश्वरसंज्ञक पूजन त्यांच्या भक्तीत आहे. चार वर्णांच्या कर्मकांडी बेबंद धार्मिकशाहीला आलेले ढोंग वा दंभ हे स्वरूप मोडून त्यांनी सर्वांस जीवनकल्याणाची 'राजमार्गी' वाट प्रशस्त केली आहे. तसेच त्यांनी जातीपातीपेक्षा गुरूंच्या स्थितीचा विचार केला आहे. अहो! गुरूंची जात पाहणारे वेडेच नव्हेत का? ब्रह्म कोणत्या जातीचे असे विचारणे म्हणजे ब्रह्मताच सोवळ्यात बांधणे होय. अज्ञानाची परिसीमा आहे, हा गुरूंच्या ज्ञातीवैशिष्ट्यांचा विचार! व्यवहाराच्या कडीकुलुपात ब्रह्मता ओवळी म्हणून बांधू नका. ज्ञानेशांनी सर्वप्रथम हा आवाज उठविला. तुकोबा-रामेश्वर, चोखोबा-गिरधरपंत अशा गुरूशिष्य जोड्या यातूनच उदयाला आल्या. असा कोण मूर्ख शिष्य आहे की जो गिरिकंदरी भ्रमण करणार्या सिद्ध पुरूषास प्रथम जात विचारील? त्याची जातपात सारे हरवलेले असते. ज्ञानेश म्हणतात - यातिकुळ माझे गेले हरपून, वेदसंपन्नु होय ठायी, परि कृपणु ऐसा आणु नाही. नाथसंप्रदायाचे ते तत्व आहे. जीव वा हंस हीच जात, ब्रह्म हे त्याचे स्थान, बस एवढेच जाणले व तसा आदेश प्रसृत केला. उदारता, सामरस्यबोध, व्यापकता व सहजता यामुळे ज्ञानेशप्रणित भक्तीसिद्धांत आपल्या आगळ्या वैशिष्ट्याने आजही भारतवर्षात नांदत आहे.
- श्री संत बाबामहाराज आर्वीकरकृत 'दिव्यामृतधारा' ग्रंथातून
12 Jul 2013 - 10:03 pm | यशोधरा
अतिशय सुंदर उतारा. धन्यवाद.
15 Jul 2013 - 9:32 pm | यशोधरा
कवितेचं शीर्षक आठवत नाही..
राग नाही, रोष नाही, खोल थोडा आहे विषाद
या देहाची मातीच अशी!.. प्रेमासंगे जमतो प्रमाद
पाण्याखाली गाळ जसा, ज्योतीखाली छाया जशी
प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी
पण असा अकस्मात आपलाच आपणां लागता तळ
वरची ज्योत उजळ होऊन खालचे पाणी होते निवळ
कळ्ले मोकळ्या हवेत उन्हांत फुलासारखा फुलतो प्राण
मूळचा मळ गिळता गिळताच आतून निर्मळ मिळते त्राण
वार्या उन्हासारख्या तुला मोकळ्या आहेत दाही दिशा
मुक्तीसाठीच जखमी उरांत फुलत असतात उषा निशा
वाटल्यास खरेच विसर मला... पण सतत फुलत रहा
व्यथा माझी स्मरलीच तर.. तिच्यांत नवे क्षितीज पहा
करु नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद
पूजा खरी असॆल तर त्याचा देखील होईल प्रसाद
- बा भ बोरकर
16 Jul 2013 - 6:20 pm | चौकटराजा
बोरकर व गदिमा दोघेही शब्दस्वामी व दोघांचीही काव्याची अशी वेगळी भाषा नसे. आपण जसे बोलतो ते काहीशा लयीत
बोलावयाचे हा त्यांचा फंडा असावा ! ही व बोरकरांच्या येथील कविता फारच क्लास !
15 Jul 2013 - 10:00 pm | यशोधरा
वह अपने अकेलेपनसे भी पैदा हुई हैं
और कविता की जाई भी हैं
उसका अकेलापन उसकी परवरिश करता हैं
और कविता उसको पढती भी हैं
पढाती भी हैं
अकेली होकर भी वो कभी अकेली नहीं हुईं
कविता उसके अंदर भी हैं
और बाहर भी
कविता उसकी जमीन भी हैं
और कविता उसका आसमान भी हैं
हालात रुकावटें बनतेही रहे हैं
पर वह दरिया की तरह
कोई रुकावट कुबूल नहीं करती
चुपचाप सब पार कर लेती हैं
वह सब फिक्रोंमें भी बेफिक्र होकर
चुपचाप मनचाहा लिखती आ रही हैं
और मनचाहा जीती भी आ रहीं हैं
जिंदगी कभी दूर खडी
कभी पास खडी
उसको देख- देख
कभी आँखे पौंछती हैं
और कभी गर्वसे भर जाती नजर आती हैं..
- इमरोज
15 Jul 2013 - 10:01 pm | यशोधरा
तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू?
माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू?
आले गगन भरुन तसे मन आसवांनी
तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी
पक्षी भाळला आभाळा, वाट मागची विसरे
मौन तुझे तीरसे गे मात्र काळजात शिरे
सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करु?
कसे पिसावले चित्त आता मुठीत आवरु?
- बा भ बोरकर
15 Jul 2013 - 10:08 pm | यशोधरा
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरल्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल,
विलग पंखांचे मिटते मन
एखाद्या प्राणाचे विजनपण,
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण
गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां,
प्रजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण,
एखाद्या प्राणाची मल्हार धून
एखाद्या प्राणाचे सनईसूर,
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण.
- आरती प्रभू
16 Jul 2013 - 2:13 am | यशोधरा
आकाशतळी फुललेली
मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी?
तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय ऩक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती
सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधूनी
गीतांचे गेंद उदेले
पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदण होते
त्या विराट शून्यामधली
ती एक वसहत होती
शून्यात प्रसवली शून्ये
शून्यांची रंगीत नाती
त्या शून्यामधली यात्रा
वार्यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यांत कशाला पाणी?
- कुसुमाग्रज
16 Jul 2013 - 9:13 pm | यशोधरा
अरे लिहा की इथे! कोणी लिहित का नाही आवडते उतारे/ कविता वगैरे! :(
16 Jul 2013 - 9:55 pm | पैसा
डुमडुमत डमरु ये, खण्खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा !
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ! ध्रु०
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ! १
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्खट् तुझें खड्ग क्षुद्रां ! २
जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ! ३
पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ! ४
--भा.रा.तांबे--
16 Jul 2013 - 10:45 pm | मोदक
त्या दिसा वडाकडेन गडद तिन्साना
मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां
मौन पडले सगळ्या राना, शिरशिरुन थाम्ली पाना
कवळी जाग आय्ली तणा झेम्ता झेम्ताना
मंद मंद वाजत आय्लीं......
पय्सुल्यान वाजली घांट , दाट्लो न्हय्चो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा
मंद मंद वाजत आय्लीं.......
फुलल्यो वयर चंद्रज्योती रंध्रांनी लागल्यो वाती'
नवलाची जांवक सांगली शकुन लक्षणां
मंद मंद वाजत आय्लीं......
गळ्या सुखां दोळ्यां दुखां लकलकली जावन थिका
नकळ्ताना एक जाली आमी दोघांजाणा
मंद मंद वाजत आय्लीं.....
कान्सुलांनी भोवती भोवर , आंगार दाट फुलता चवर
पड्टी केन्ना सपना, तीच घडटी जागरणा
मंद मंद वाजत आय्लीं......
बाकीबाब!
17 Jul 2013 - 12:23 am | पिशी अबोली
हे मी 'तुजे विणे' अल्बममधे गाणं म्हणूनच ऐकलं होतं...
17 Jul 2013 - 12:28 am | मोदक
तूनळीवरती आहे का ते गाणे..?
लिंक मिळेल..?
17 Jul 2013 - 11:54 am | पिशी अबोली
कठीण आहे.. कोंकणी गाणी फारशी सापडत नाहीत नेटवर.. :(
17 Jul 2013 - 12:01 pm | पिशी अबोली
लयवेल्हाळ
किती उंचावरून-पानाफुलांमधून
आकाशातून...बकुळीचे हे ओघळणे
किती लडिवाळ, लोभसवाणे!
झुंझुक मुंझुक वार्याच्या अलवार लयीवर
हिचे हळुवार हिनकळणे...की कुणाच्या मनोमनीचे
मंद्रसुवासी सरगमणे...!
पिवळ्या पिसोळीने अलगद सोनकीवर उतरावे
तसे हिने तळीच्या गवतपात्यावर हलकेच समेवर यावे!
किंचित रेलून...त्या हिरव्या-निळ्या कोवळ्या उन्हात
या गौरांग कवडुसलीने
किती म्हणून लाडके दिसावे...!
हे बकुळीच्या त्या अधुर्या अवतरणाचे
लयवेल्हाळ मंत्रमोहन...की मेघदूताला सुखी भ्रमणाचा आशीर्वाद देताना
यक्षाच्या कमळाक्षात लहरलेले रंगबावरे मनभावन...!
इंदिरा संत
17 Jul 2013 - 1:15 pm | मोदक
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे!
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे!
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे!
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे!
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे!
तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे!
बाकीबाब!
17 Jul 2013 - 1:44 pm | अक्षया
अप्रतिम कविता.. :)
27 Jul 2013 - 5:36 am | मोदक
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे
तेथ जाया वेगवेडी पारजाची* वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे
वृक्षशाखेला युगांच्या मंगलाची घांट* आहे
बुद्धदेवाच्या तळाशी हस्तीदंती पाट आहे
सत्यवानाच्या सखीच्या अंतरीचा दीप आहे
ख्रिस्त-मीरा-मोहनाच्या जीवनाचा धूप आहे
ज्ञानीयाच्या माऊलीची नित्य ओवी एक आहे
कान्हयाच्या गाऊलीचा दुग्धगंगा सेक* आहे
कोवळ्यां ज्वाळादळांचे भारताचें फूल आहे
हांसरे तेथें उद्याच्या मानवाचें मूल आहे
त्याजल्या मी चुंबिल्याने आंतही ते झाड आहे
अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे
बाकीबाब!
*
पारजाची = पार्याची
घांट = घंटा
सेक = शिडकाव
17 Jul 2013 - 1:42 pm | दिपक
ती - किती उशीर?
तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.
ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.
तो - बरं.
ती - फक्त बरं?
तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.
ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?
तो - म्हणजे कसा?
ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.
तो - डोकं फिरलंय त्याचं?
ती - त्याचं की तुझं?
तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?
ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?
तो - नाही.
ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.
तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.
ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.
तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.
ती - अरे देवा
तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.
ती - बरं
तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?
ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.
तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.
ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.
तो - आता?
ती - हं आता.
तो - बरं जातो.
ती - ए काऊ थांब रे.
तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.
ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.
तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.
ती - काऊ तू मला खूप आवडतोस.
तो - मला माहितेय.
ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.
तो - बरं.
ती - अरे आता म्हण.
तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.
ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.
तो - बरं.
ती - ...
तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.
ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.
तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.
ती - चल. :-)
-- निलेश गद्रे
http://nileshgadre.blogspot.in/2008/09/blog-post.html
17 Jul 2013 - 1:51 pm | मोदक
पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या एका वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी. (महाराष्ट्र टाइम्स)
****************************************
..तुला सार्वजनिक 'आपण' प्रिय, तर वैयक्तिक 'मी' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू 'दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.
तूही जर इतर चारचौघांसारख़ाच 'एख़ादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मुल' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत, लिख़ाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?
कवी ग्रेसच्या ओळी आहेत, 'क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे। बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे'. तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास, तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे, त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.
ती तुझी सहज प्रवृत्तीच होती, प्रकृती होती. मराठी 'विश्वकोषा' त किंवा 'हूज हू' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच 'विचारवंत' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे, तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात, त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी, स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण, मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते? हक्काची बायकोच ना तुझी!
तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही, 'तुला' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.
तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना?
थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की, सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये, एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास, तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.
मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे, पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे, असं थोडंच आहे? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे? या संदर्भात सत्य एकच आहे, ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन) सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.
-सुनीता देशपांडे.
17 Jul 2013 - 6:40 pm | यशोधरा
:(
17 Jul 2013 - 10:22 pm | अर्धवटराव
मी पु.ल. नाहि, पण आमची सौ. बरीचशी सुनीताबाईंसारखी आहे. तिच्या भरवश्यावर उडाणाटप्पु जींदगी एंजोय करणं हाच माझ्या लाईफचा एकमेव अजेंडा... आता तर ज्यु. अर्धवटराव देखील माझ्याच पाऊलावर पाऊल ठेऊन चालणार असे लक्षण आहे. डब्बल परिक्षा आमच्या सौ. ची.
अर्धवटराव
17 Jul 2013 - 10:31 pm | लॉरी टांगटूंगकर
_/\_
17 Jul 2013 - 10:23 pm | यशोधरा
पहिल्या धाग्यावर आधीच ही कविता दिली गेली असल्यास क्षमस्व.
पारवा
भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.
कवी - बालकवी