Skip to main content

जैसलमेरी चने आणी खोबा रोटी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/05/2013 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
द गोल्डन सिटी जैसलमेरची ही पाककृती आपण अन्न हे पूर्णब्रह्मच्या राजस्थानी पाककृती विशेषमध्ये पाहणार आहोत :) चला तर मग राजस्थानच्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात करुया. साहित्य जैसलमेरी चने: १ वाटी काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणे. सकाळी पाणी उपसून कुकरला बोटचेपे शिजवून घेणे. १ वाटी दही ३ टेस्पून बेसन २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या १/२ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हिंग १ टीस्पून हळद १-१/२ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून धणेपूड १ टेस्पून जीरेपूड १/२ टेस्पून आमचूर पावडर १ टीस्पून गरम मसाला मीठ चवीनुसार १ टेस्पून साजूक तूप . पाकृ: एका बाऊलमध्ये फेटलेले दही+ हळद+ लाल तिखट+ धणेपूड व थोडे पाणी घालून एकत्र करा. कढईत तूप गरम करून जीरे, हींग व हिरव्या मिरच्यांची फोडणी तयार करा. त्यात आता दह्याचे मिश्रण घालून सतत ढवळत रहा. गॅस मंदचं असू द्या नाहीतर दही फाटू शकतं. दह्याच्या मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात शिजवून घेतलेले काळे चणे घाला व ४-५ मिनिटे शिजवा. वेगळ्या बाऊअलमध्ये बेसन+ आमचूर पावडर+ जीरेपूड + हळद व थोडे पाणी घालून एकत्र करा. हे बेसनाचे मिश्रण आता उकळत्या ग्रेव्हीमध्ये घाला व सतत ढवळत रहा. ग्रेव्ही थोडी दाट होत आली व बेसन शिजले की त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. सगळ्यात शेवटी वरून गरम मसाला भुरभुरा. . गरमा-गरम जैसलमेरी चने तयार आहे, तुम्ही चपाती, पुर्‍यांबरोबर सर्व्ह करु शकता. आपण हे खोबा रोटी बरोबर सर्व्ह करणार आहोत. . साहित्य व पाकृ खोबा रोटी: नेहमी चपात्या/ पोळ्यांकरीता कणीक भिजवतो तशी मीठ व तेलाऐवजी तुप घालून घट्ट भिजवून घ्यावी. कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटावी. तवा मध्यम आचेवर तापत ठेवावा. जाडसर लाटलेली पोळी तव्यावर दोन्ही बाजूने जेमतेम शेकून घ्यावी. जेमतेम शेकलेल्या पोळी तव्यावरुन काढून घ्यावी व त्यावर एका बाजूने हलके चिमटे काढावे. पुन्हा पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यावी. शेवटी गॅसच्या विस्तवावर खुसखुशीत शेकावी व वरून तूप पसरवून घ्यावे. . जैसलमेरी चने खोबा रोटी व कांद्याबरोबर सर्व्ह करा :) .

वाचने 42454
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

एका बाजूने हलके चिमटे काढावे
. अगदी आनंदाने काढले जातील. चन्याची रेसीपी आवडली. रोटी सुद्धा आवडलीच पण हसवुन गेली.

रोटी लैच आवडेश. बाकी, पाककृती ते प्रेझेंटेशन आता कौतुक तरी किती वेळा करायचं. पण, कौतुक केलंही पाहिजे म्हणून ही केवळ पोच. :) -दिलीप बिरुटे

व्वा ... सुंदरच... काय रंग आहे त्या भाजीचा :)... अप्रतिम... पोळीचा हा प्रकार नवीनच कळाला आणि आवडला :) बाकी अन्नपूर्णे तुला साष्टांग नमस्कार!!!

व्व्वा,,! काळ्या चण्याचीही एवढी मस्तं पाककृती असू शकते ह्यावर विश्वासच नव्हता. चव झकास असणार ह्यात शंकाच नाही. 'चिमटापोळी' हा प्रकारही माझ्यासाठी नवीन आहे. करून पाहिला पाहिजे.

खपलो वारलो लै भारी खन्ग्री जबरी काय काय बोलु झालय. सगळ्याच पाककृती एकदम बैजवार असतात तुमच्या.

In reply to by आदूबाळ

थालीपिठाप्रमाणे भोकं नाही पाडत , फक्त चिमट्यांनी (पापड तळतो/ भाजतो तो चिमटा) किंवा बोटांनी हलके चिमटे काढायचे :) धन्यवाद.

सही.... काय मस्त दिसतीये ती रोटी... थोडेसे फोकासिया ब्रेड ला मधे खड्डे करतात, तसेच वाटले. आणि चणे पण मस्त.

In reply to by Mrunalini

फोकाचियाला बोटांनी खड्डे (डेंट्स) केले जातात ह्या पोळीला फक्त चिमटे काढायचे ;) धन्यवाद गं.

खोबा रोटी ला चिमटे काढण्याचा शोध एखाद्या 'प्रेमळ विरहवीरा'कडून लागलेला दिसतोय. कणकेमध्ये प्रेमिकेला शोधत असावा बिचारा. ;) बाकी सानिकाची पाकृ आवडली म्हणून वेगळं सांगणं म्हणजे ..... अरे कुणाला उपमा सुचतेय का?

काय हे ? पहिल्यांदा रोटीला अर्धवट भाजायचे, मग चिमटे काढायचे, मग परत भाजायचे आणि शेवटी चावे घेऊन खायचे ... छेछेछे किती हा क्रूरपणा ! पण फोटो बघितल्यावर फोटोलाच चावे घेऊन गट्ट्म करावेसेच वाटतेय ;) +D