भळभळती हृदये
काही महिन्यांपूर्वी 'न्यूयॉर्क टाईम्स' मधे संपादकीय पानावर 'बोको हराम' ह्या नायजेरीयातील दहशतवादी संघटनेवर, न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीतील इतिहासाच्या एका प्राध्यापिकेचा लेख वाचनात आला. सदर प्राध्यापिका नायजेरियन राजकारणात पारंगत आहे, असे लेखाखाली म्हटले आहे. बाईंच्या लेखाचा मतितार्थ असा की ह्या दहशतवादी संघटनेच्या नावाखाली इतरच कुणीतरी (प्रामुख्याने, सत्तेवर असलेले ख्रिश्चन पुढारीच), कत्तली, बाँबस्फोट वगैरे अमानुष कृत्ये घडवून आणत आहेत.
ह्यानंतर काहीच दिवसांनी बोको हरामच्या एका नेत्याने स्वतःच दहशती कृत्ये आपण घडवून आणतो आहोत, असी जाहीर कबुली दिली. ह्यानंतर त्यांचे हल्ले-- प्रामुख्याने उत्तर नायजेरियामधे (जिथे ख्रिश्चन लोकसंख्या प्रामुख्याने आहे) -- वाढत्या क्रमाने होत राहिले आहेत.
बुद्धिवादी जाणकारांच्या हृदयांचे हे भळभळणे तसे नवे नाही. अलिकडेच डॅनियल यर्गिन ह्या तेलसंशोधकाचे, जगाच्या तेल- इतिहासावरील 'द प्राईझ' हे पुस्तक वाचतांना असाच एक मजेशीर उल्लेख वाचनात आला. १९७८-७९ च्या सुमारास इराणमधे शहाच्या विरूद्ध, मुस्लिम धर्ममार्तंडाच्या नेतृत्वाखाली जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याचे नेतृत्व होते अयातुल्ला खोमेनीकडे. धर्मांध नेहमी करतात तसली दुष्कृत्ये ह्याच्या आदेशाने इराणभर होऊ लागली होती. दुर्दैवाने अमेरिकन सरकारला ह्या उठावाचे गांभिर्य वेळीच लक्षात आले नाही. अमेरिकन सरकार गाफिल राहिलेच, पण यर्गिन नमूद करतात की 'The efforts to construct hastily some new American position were complicated by the fact that the Shah was an object of dislike and criticism in the media in the United States and elswhere, which resulted in a familiar pattern- moralistic criticism of U.S. policy combined with the projection by some of a romantic and unrealistic view of the Ayatollah Khomeini and his objectives'. [अमेरिकन सरकारचे धोरण ठरवण्याच्या कामात जी हयगय झाली त्यात, इराणच्या शहाविरूद्ध तेव्हा अमेरिकन लोकमत बिथरलेले होते, त्याची भर पडली. त्यात, यर्गिन ह्यांच्या म्हणण्यानुसार, तेथील माध्यमांचा बराच हातभार होता. व ह्यातून, अशा प्रसंगी नेहमी दिसून येणारा अनुभव येऊ लागला. तो म्हणजे अयातुल्ला खोमेनींच्या चळवळीविषयींच्या रोमँटिक व अवास्तव कल्पनांवर आधारलेला, अमेरिकन सरकारी धोरणांचा,नैतिक विरोध टोकदार होऊ लागला].
यर्गिन ह्याचे एक उदाहरणच पुढे देतातः 'A prominent professor wrote in the New York Times of Khoemeni's tolerence, of how "his entourage of close advisers is uniformly composed of moderate, progressive individuals," and of how Khomeini would provide "a desperately needed model of human governance for a third world country". ' [ न्यूयॉर्क टाईम्समध्ये एका नामांकित प्रोफेसरांनी, खोमेनीच्या सहिष्णूत्वाची ग्वाही देत म्हटले की त्याच्या निकट वर्तुळांमध्ये मध्यममार्गी, सहिष्णू, व प्रागतिक विचारांच्या व्यक्तिंचा समावेश आहे, व म्हणून खोमेनी हे 'तिसर्या जगातील देशास अत्यावश्यक असलेले, मानवतावादी 'नेतृत्व आहे].
यर्गिन ह्यापुढे नोंदवतात, की अँड्र्यू यंग हे अमेरिकेचे युनोतील राजदूत ह्याहीपुढे गेले. 'खोमेनी हे साक्षात संतच आहेत' ( Khomeini would eventually be hailed as "a saint")! ह्या वक्तव्यामुळे ओशाळलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्टर ह्यांनी ह्यावर ' एक राष्टृ म्हणून अमेरिका संतपदांच्या शोधांत नाही' अशी जाहीर टिपण्णी केली .
आपल्याकडे वर्षांनुवर्षे पाकिस्तानचे उमाळे येणारे अनेक बुद्धिजीवी आहेत. वाघा सीमेवर मेणबत्या पेटवून पलिकडच्या देशास सद्गगतीत हाक घालणारे कुलदीप नय्यर ह्यांसारखे लोक त्यांतीलच. 'दोन देशांमधील वाद हा निव्वळ राजकीय कारणांतून निर्माण झाला असून राजकारणी त्यास खतपाणी घालतात, अन्यथा दोन देशांतील जनतेमध्ये काहीच वाद नाही, अगदी सलोख्याचे संबंध आहेत आमचे' असे काहीसे ह्या मंडळीचे प्रतिपादन असते. मग, शेरोशायरी, गझला, उर्दूची नजाकत, कुणी पाकिस्तानांत गेलेले असतांना तेथील लोकांनी त्यांचे केलेले कौतुक, प्रेमाने खाऊ घातलेली बिर्याणी वगैरे सगळे उजळवले जाते. व्यक्तिगत संबंध वेगळे व सामाजिक वेगळे. माणसे व्यक्तिशः कितीही आपुलकीने वागत असली (पाकिस्तांन्यांबद्दल माझा स्वतःचा अनुभव अगदी छान आहे, सौहार्दाचा, शालीन मित्रत्वाचा आहे), तरीही त्यापलिकडे सामाजिक पातळीवर त्यांच्यात व आपणात एक प्रकारची दरी आहे, ह्या वास्तवाचे भान ह्या मंडळीस नसते. खरे तर हे अनेकदा लख्ख दिसून येते, पण ते नजरेआड करायचे. ह्यात ते स्वतःची, व त्याबरोबर इतरांचीही प्रतारणा करत असतात. ह्यांची अजून एक गंमत आहे. आपल्या अवतीभोवती, आपल्याच संकृतिशी साधर्म्य असलेले इतरही काही देश आहेत, त्यांविषयी ह्यांना अजिबात आस्था नसते. श्रीलंका घ्या, नेपाळ घ्या, म्यानमार घ्या-- ह्यांच्याशी आपले सामाजिक व राजकीय संबंध सुधारावेत अशी ह्यांना कधीच निकड भासत नाही. ह्यामागे काय कारणे असावीत बरे? हे इतर देशवासी, पाकिस्तान्यांच्या मानाने 'मवाळ' आहेत हे? आपल्यावर कसली ना कसली कुरघोडी करत बसण्याच्या उद्योगात ते नाहीत हे? मग, जे आपल्याशी सामाजिक व राजकीय पातळीवर डाफरून असतात, त्यांची मनधरणी करायची, हे मॅसोचिझम झाले, म्हणायचे?
गेल्या वर्षी अरब जगतात बरीच उलथापालथ झाली. ट्यूनिशियापासून सुरू झालेली वावटळ, इजिप्त, लिबीया, बहरीन अशा अनेक देशांत गेली. हे होत असतांनाही काही गोष्टी अगदी सहज लक्षात येण्यासारख्या होत्या. एकतर, इजिप्तसारख्या मोठ्या देशात सुरू झालेली चळवळ, उत्फूर्त होती, पण अगदी संपूर्ण बेबंद होती, तिला कुठलेही नेतृत्व नव्हते. चळवळ सुरू असतांना जगभरच्या भळभळत्या हृदयांना आशेची नवी पालवी फुटत होती. आता काहीतरी सुंदर, मंगल वगैरे त्या देशात घडणार, तेथे 'नवी पहाट' येणार असा एकंदरीत सूर होता. पण अर्थात पुढे तसे काही झाले नाही. बेबंद चळवळीपुढे नमते घेणे भाग झाल्याने मुबारक पदच्युत झाले खरे, पण चळवळ रीतसर जहाल मुस्लिम धर्ममार्तंडांच्या हाती सुपूर्द झाली. लिबीयात तर खरे तर अगदी टोळीयुद्धच होते (यर्गिन ह्यांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकात, स्वतः गद्दाफीच कसा अशाच टोळीयुद्धातून साठीच्या दशकात सत्तेवर आला ह्याची थोडक्यात माहिती आहे). व भळभळती हृदये तिथे डो़ळे लावून बसली होती. ती बिच्चारी अजूनही इजिप्त, लिबीया इत्यादी ठिकाणांच्या 'नव्या पहाटे' च्या प्रतिक्षेत असतील.
ती तशी असतील तर असोत बिचारी. पण आमच्यासारख्या सामान्यांनी मात्र आपापल्या माहितीची परिसीमा शक्यतोंवर वाढवून घेत, स्वतः डोळस, व प्रॅग्मॅटिक राहून, आपापली मते बनवणे जरूरी आहे.
प्रतिक्रिया
>>"ह्यांची अजून एक गंमत आहे.
>>>एकतर, इजिप्तसारख्या मोठ्या
आयातुल्ला...
+१
मि.पा. वर ही काही कमे नाहित अशी हृदये !
>> पाकिस्तांन्यांबद्दल माझा
लेख आवडला. अशा भळभळणार्या
विषय,मुद्दे आणी
उत्तम लेख
समता-विषमता
लेख आवडला
प्रतिसाद
२ र्या व ३र्या अनुभवाचा
१००० वेळा सहमत.
मौशमी नावामुळे फसुन एकदा अशीच
लेख छान
+१००००
+१
वा! लय भारी
अ ' अल्लाह ' चा ब ' बंदूकी '
क काफरांचा.
पुरोगामी झोपले का ?