निदान नमस्कार तर कराल?
लेखनप्रकार
काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो. त्याही माझी खूप काळजी घेतात, मला प्रेमाने 'अरे-तुरे' करतात, कधी रागावल्या तर मात्र 'अहो' वर उतरतात!
मी घाईत बूट घालून किल्ल्या हातात घेतल्या आणि गाडीकडे जायला निघालो. आतल्या खोलीतून बाहेर येत आईंनी भिंतीवर असलेल्या फोटोकडे हनुवटी दर्शवली आणि विचारलं, "नमस्कार केलास?" मी म्हणालो, "Sorry! राहिलं..." मी बूट-मोजे काढले आणि आत वळलो. "अहो काय हे? साधा नमस्कार लक्षात रहात नाही? वडील माणसं तुमच्या कडे काही मागायला येत नाहीत, उलट देण्यासारखं आहे ते आयुष्यभर त्यांनीच तुम्हाला दिलंय, तुमच्या कडे देण्यासारखं आहेच काय? निदान नमस्कार तर कराल?" सकाळी सकाळी कानाखाली शाब्दिक जाळ निघाला!
माझी आई १९९७ मध्ये गेली. COPD (chronic obstructive pulmonary disease) ची पेशंट असलेली आई त्या आधी दोनच दिवस आजारी होती, पण अखेरीला अंत ओढवला तो तिला ज्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं तिथे वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर मिळालं नाही म्हणून. मी परदेशी होतो, वेळेवर पोहोचायची खूप धडपड करूनही नाही पोहोचू शकलो, खूप तडफड झाली जीवाची. आई एका मोठ्या हॉस्पिटल मधून मेट्रन म्हणून निवृत्त झालेली, अनेक नामवंत शल्यचिकित्सक, तिने आपल्या सर्जरी मध्ये असिस्ट करावं म्हणून आग्रह धरून बोलवायचे, तिने जन्मभर इतरांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केलेली. तिचा असा केवळ गलथानपणामुळे झालेला मृत्यू पाहून स्वत: डॉक्टर असलेल्या माझ्या वडिलांनी केलेला आक्रोश मला हजारो मैलांवरून ऐकवत नव्हता. नंतर अंत्यसंस्कारांच्या वेळी गेल्यावर आईला पाहिलं ते फोटोतच, तशीच होती जशी मला आठवत होती, हसरी, असं वाटलं म्हणेल, "आलास दादा? ये, कसा आहेस रे बाळा?"
परतल्यानंतर खूप महिने मी स्वत:ला कामात झोकून दिलं होतं, पत्नी सतत आईविषयी बोलायची, माझी आई तिचा आदर्श होती, म्हणायची "बोल रे, मन मोकळं होईल," पण मी फारसा भाग घेत नसे. आई आता अस्तित्वात नाही हेच मला उमजत नव्हतं, मन जणू बधीर झालं होतं.
आई गेल्यानंतर पुढे कधीतरी २००० च्या सुमारास एकदा बस मधून प्रवास करतांना एका नियतकालिकाच्या फाटक्या पानावर छापलेली एक कविता सापडली, कवीचं नाव होतं पीटर डेव्हिडसन, पण इतर काही माहिती नव्हती. मला आठवतंय त्या कवितेने मला हलवून टाकलं होतं. मी ती कविता जपून ठेवली, आणि आयुष्य चालू राहिलं.
परवा महिन्यापूर्वी, आईनंतर १४ वर्षांनी, वडील गेले. हसते-खेळते, हिंडते-फिरते वडील हृदयविकाराच्या झटक्याने गेले. १३ वर्षांपूर्वी angioplasty होऊन गेल्यावरही रोज ३-४ मैल चालणारे, आठवड्यातून दोनदा तास-तास भर badminton खेळणारे, charity हॉस्पिटलमध्ये नियमाने अजूनही पेशंट्स तपासणारे ७६ वर्षांचे वडील असे अचानक जातील याची कुणाला शंकादेखील आली नव्हती. माझी परिस्थिती जशी आईच्या वेळी होती तशीच. पुन्हा मी दहा हजार मैल लांब. कळल्यावर दोनच तासांत तिकीट काढून निघालो, २५ तासांच्या विमानप्रवासात उण्या-पुऱ्या ५० वर्षांचं आयुष्य डोळ्यांपुढून सरकत होतं. आई गेल्यावरही स्वत:चा एकटेपणा खूप खोलवर खोचून ठेवून, मुला- नातवंडामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामात स्वत:ला पूर्णपणे गुंतवून घेणारे, आमच्या सर्वांच्या गरजा अजूनही भागवण्याची हिंमत ठेवणारे वडील चटकन, आळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे निघून गेले. आपल्यावरची जी काही थोडी फार उरली-सुरली छपरं आहेत त्यातलं एक फार मोठं छप्पर निघून गेलं आहे ही जाणीव भयानक होती. ग्रेसच्या कवितेमधल्या "अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे" या ओळी सरसरून अंगावर आल्या! वडिलांचाही फोटोच वाट पहात होता.
मी आणखी एक अंत्यविधी पार पाडून परत आलो, आणि आयुष्याला लागलो. काल आईच्या फोटोला नमस्कार करून निघाल्यावर जुनी खपली निघाली, ती कविता शोधून काढली, आणि मग शब्द सापडल्यावर आंतर्जालावर शोध घेतला, The Atlantic मधील मूळ कविता या दुव्यावर सापडली. त्या कवितेचं हे मुक्त रुपांतर:
आठवणींच्या किनार्यापलीकडून
तू जणू मला नजरेने गुंडाळलं, उचललंस
मला हृदयाशी धरलं, पाजलं, शुद्ध केलंस
अस्थिर पायांवर मी हेलकावत उभा राहिलो
तुझ्या हास्याने मला चालायला लावलं
तुझ्या शब्दांनी मला शब्द दिले
तुझ्या धाकाने मला घाबरवलं, माझं रक्षणही केलं
तू शिकवलंस, शिक्षा दिलीस, नजरेत ठेवलंस
आणि आता, तू नाहिशी झालीस
कुठल्या अंधार्या समुद्रांचं मी मंथन करू
तुला शोधण्यासाठी?
किती दूरवर गेलीयेस तू, एकटीच?
मी वेध घेतो अथांग सागराचा
तुझ्या आठवणीतल्या गंधाच्या आशेने
मंद झुळुकेतून तुझी उबदार मिठी यावी
तुझ्या बोलण्याची गुणगुण
तुझं हलक्या आवाजातलं अंगाईगीत
आणि तू घेतलेले असंख्य मुके
मी वाट पहात राहतो
कुणाला वाटलं होतं
की तू अशी नि:संगपणे निघून जाशील?
कल्पना तरी होती का
की मी कितीही ओढीने खेचला
तुझ्या-माझ्यातल्या बंधनाचा तो चिवट धागा, तरी
तू कधीच परतणार नाहीस,
कधी बोलणार नाहीस,
कधी प्रतिसाद देणार नाहीस,
जशी मला जाणतच नाहीस?
अशी कशी तू नाहिशी झालीस?
*****************
वडील गेल्यावर आईच्या वियोगाचं दु:ख आज बाहेर पडतंय, वडील असतांना त्यांच्यावर लिहिलेली कविता त्यांना दाखवायची राहूनच गेली.
वाचने
18778
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
खुप जवळची व्यक्ती अशी निघुन
In reply to खुप जवळची व्यक्ती अशी निघुन by शिल्पा ब
+१
कोणाच्या तरी धाग्यावर
हृदयस्पर्शी
अभिनिवेशविरहीत
लेखन खूपच हृदयस्पर्शी
चटका लावणारे लिखाण!
In reply to चटका लावणारे लिखाण! by चतुरंग
हेच आलं मनात!! लेखन आवडलं.
हृदयस्पर्शी लेख.
In reply to हृदयस्पर्शी लेख. by राघव
भावस्पर्शी लेख... दया करी
+१ टु रेवतीतै, परवाच
खरंच आहे,
...
In reply to ... by विकास
अत्रे? की कवी यशवंत? मलाही
.
.
..
.
...
फारच हृदयस्पर्शी लेख
..............
रामकृष्णहरि. कुणाला आई
In reply to रामकृष्णहरि. कुणाला आई by प्यारे१
हे वाक्य ह्रदय चिरत चिरत कोठे
In reply to रामकृष्णहरि. कुणाला आई by प्यारे१
.
" ममा......................................
In reply to " ममा...................................... by जयंत कुलकर्णी
ऐकले! _/\_
पितॄछत्र हरपल्याचे दु:ख सहन
+
In reply to + by नंदन
+१
आई-वडिलांबद्दल सर्वांच्याच
In reply to आई-वडिलांबद्दल सर्वांच्याच by प्रभाकर पेठकर
>>पण आपल्या भावना शब्दांत
नाळ तुटल्यासारखे वाटले.
अतिशय सुरेख लेख !!
शब्द नाहीत बोलायला.
काय लिहू?
माझ्या एका मित्राच्या इमेलची आठवण आली. पूर्ण वाचावे ही विनंती
मनाला भिडणारे लेखन! अगदी
>> >>
नि:शब्द
... :-(
निशब्द
हृदयस्पर्शी
उत्कट!
उत्कट लेख आणि कविता... वर
नि:शब्द!
.....................
.
फार चान्ग्ल वाटल
पुन्हा एकदा चान्ग्ल वाटल
नि:शब्द
हृदयस्पर्शी लेख !