"देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"
शीर्षकातील वाक्य.... हे आहे दोन दिवसापूर्वीच दुनळी बंदूक आपल्या नरड्याला लाऊन घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्याने चाप ओढून स्वत:च्या जीवाची अखेर करून घेतलेल्या श्री. रामचंद्र गिरी या फौजदाराच्या चिठ्ठीतील एक वाक्य !
वय वर्षे ५४... "गोसावी" अशा भटक्या (अनुसूचित) जमातीमधील व्यक्ती.... पहिलवानासारखी देहयष्टी... प्रथम पोलीस म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात भरती आणि दहा वर्षाच्या कालावधीतच एक अत्यंत कार्यक्षम आणि कामातील तडफ पाहून वरिष्ठांच्या मर्जीत बसलेले पोलीस अशी ख्याती... शहर, तालुका आणि ग्रामीण भागात सर्वत्रच आपल्या हसर्या चेहर्याने वावरून भोवतालच्या लोकांची मने जिंकण्याची किमया साधलेली.... खात्याच्या परीक्षा एका मागोमाग देऊन.... प्रथम नाईक, नंतर हवालदार आणि २००४ मध्ये फौजदार अशा वरच्या पदावर बढत्या मिळत गेल्या. दरम्यान करूळ घाट (गगनबावडा) येथील सदैव अपघातग्रस्त भागात काम करी असताना "पोलीस" खात्यापलीकडेही जाऊन एक "माणूस" या नात्याने केलेले कार्य शासन दरबारी नोंद झाले... एकदा तर मुंबईहून गोव्याला चाललेल्या एका कारचालकाची रात्रीच्यावेळी गगनबावडा येथे आडबाजूच्या चहाच्या टपरीत विसरलेली बॅग त्यातील कागद्पत्रांच्या आधारे त्याचा मुंबईतील पत्ता, फोन क्रमांक शोधून काढून, त्यांच्या तेथील नातेवाईकांना बॅगेसंबंधी माहिती देऊन ती बॅग, त्यातील कागदपत्रे अन महत्वाचे म्हणजे त्यातील एक लाख साठ हजार जसेच्या तसे परत केल्याची नोंद त्यावेळी वर्तमानपत्रांनी घेतली आणि २००८ साली या अन अशाच प्रामाणिक सेवेबद्दल त्यांना २६ जानेवारी रोजी जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते "पोलीस पदक"ने सार्थ गौरविण्यात आले. पत्नी, मुलगा इंजिनिअर, मुलगी वाणिज्य पदवीधर, .... असे सुखी चौकोनी कुटुंब.
माझ्या ग्रुपची आणि श्री. गिरी यांची ओळख म्हणजे कोल्हापुरच्या रंकाळा तलाव परिसरात "पोहोण्यासाठी" प्रसिद्ध असलेली "खणेश्वर जलविहार" जागा. येथील मंडळाचे ते सक्रीय सदस्य, आणि पोहोणार्यामध्ये त्यांनी आपली ओळख "त्यांच्यातील एक" अशी केली होती... इतकेच काय त्यांना पहाटेच्या पोहोण्याच्या वेळी "फौजदार" म्हणून कुणी हाक मारलेले आवडत नसे. ते म्हणत "इथ आपण स्वीमिंगला येतो आणि तीच आपली खरी ओळख...". माझा ग्रुप पट्टीचे पोहणारे अशा विशेषणाने ओळखला जातो म्हणून त्यांनी आपल्या मुलाला आमच्यात सामील केले होते. हनुमान जयंती, रंकाळा केंदाळ मुक्त मोहीम, "रस्सा मंडळ" या खास कोल्हापुरी नावाने प्रसिद्ध असलेल्या सहभोजनाच्या रात्रीत इतरांच्या समवेत घेतलेला सहभाग, परिसर स्वच्छता आदी उपक्रमातून त्यांचा लक्षणीय सहभाग.
....आणि अशा अत्यंत कार्यरत माणसाला "रक्तदाबा" ने गाठले. कामातील वेळेचा अनियमितपणा, जागरण, वेगवेगळ्या ठिकाणाचे खाणे, "पोलीस मुख्यालय ड्युटी" चा सदैव ताणतणाव..... आणि त्यामुळे नियमित औषधाकडे नकळत दुर्लक्ष... यामुळे बी. पी. आटोक्यात येत नव्हता. बढती मिळूनदेखील चित्त थार्यावर राहत नव्हते. अधेमध्ये त्यांच्या मुलाच्या निमित्ताने कधी घरी गेलो तर ते घरी असले तर हसतमुखाने स्वागत होई.... पण दोन चार मिनिटाच्या पुढे आता बोलणे होत नव्हते. अर्थात आम्ही कधीही त्यांच्यासमोर त्यांच्या वाढत्या रक्तदाबाचे परिणाए या विषयावर बोलणे काढत नसू... कारण काढून काय फायदा? आम्ही त्यांना काय आणि कसला सल्ला देणार? हल्लीहल्ली तर त्यांनी भीतीपोटी पोहणेही बंद केले होते व जमले तर सकाळी रंकाळा पदपथावर फिरायला तेवढे यायचे. जिल्हाभर ओळखी असल्याने तसेच जनसंपर्कही चांगला असल्याने रक्तदाबावर वेगवेगळी (अगदी जडीबुटीपासून...ते नामवंत डॉक्टर्स) औषधे आणून देणार्यांचीही संख्या काय कमी नव्हती.
पण या सार्या त्रासाला अखेर कंटाळून श्री. रामचंद्र गिरी यांनी आपल्या जीवनाचा अघोर रीतीने शेवट करून घेतला.
"रक्तदाब....!!!!" इतका भयावह रोग आहे हा? आम्ही याच्या परिणामाबद्दल ऐकतो, वाचतो, पाहतो देखील.... पण आटोक्यात आणण्यासाठी नेमकी उपाय योजना कुणाकडेच कशी काय नाही? एक म्हणतो... "अमुक एक खा... तमुक एक खाऊ नका..." दुसरा म्हणतो, "हे पथ्य पाळ, ते पदार्थ त्याज्य माना...." तिसरा सुचवितो, "टेन्शन कमी करा..." म्हणजे नेमके काय करा? ब्लड प्रेशर आणि टेन्शन या दोघात बरेच सख्य असावे असे दिसते कारण या क्षेत्रातील "स्पेशालीस्ट" डॉक्टरदेखील "तुम्ही टेन्शनलेस राहा, म्हणजे बी. पी. कंट्रोल मध्ये राहतो...!" अरे पण कंट्रोलअगोदर तो वाढूच नये यावर मीठ अजिबात न घालता केलेल्या अमुकतमुक भाजीपाल्याव्यतिरिक्त दुसरे काय उपाय असतील तर ते सांगा ना? वाढते वजन हा एक बी.पी.चा मोठा मित्र मानला जातो. वजन वाढत चालले की बी.पी.राव यांनी आपल्या आयुष्यात बैठक मारलीच असे म्हणतात....(नक्की माहित नाही... पण बर्याच ठिकाणी असे वाचले आहे.).
पोलीस खात्यातील अवेळेच्या "ड्युटीज" हा एक फार मोठा, या आत्महत्ये प्रकारानंतर, चर्चेचा विषय झाला. कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलातील "पोलीस, नाईक आणि हवालदार" पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची नुकतीच शासन नियुक्त डॉक्टर पॅनेलने सलग एक आठवडा "फुल चेक अप" पद्धतीने जी तपासणी केली तिचा काहीसा धक्कादायक अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आला... तो त्रोटक स्वरूपात खालील प्रमाणे :
१. कोल्हापूर पोलिस दलातील 123 जणांना मधुमेह, 71 जणांना उच्च रक्तदाब, 113 जणांना हृदयाचा त्रास, 122 जणांना डोळ्यांचे विकार आणि 62 जणांना मूत्राशयाचे विकार जडल्याचे पोलिसांच्या आरोग्य तपासणीतूनच स्पष्ट झाले आहे. वजन, उंची व पोटाचा घेर याच्या तुलनेनुसार शरीराची जी ठेवण आवश्यक असते तशी ठेवण 622 पोलिसांची नसल्याचेही या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. ड्युटीची अनियमित वेळ, अनियमित जेवण, कामाचा ताण आणि नित्य व्यायामाचा अभाव हीच कारणे या विकारामागे आहेत.
२. लोटस मेडिकल फाऊंडेशनने केलेल्या या अधिकृत शासकीय योजनेनुसारच्या तपासणीत 1562 पोलिसांची तपासणी करण्यात आली. बॉडी मास इंडेक्स म्हणजे वजन, उंची व पोटाचा घेर याची आवश्यक सरासरी घेण्यात आली. या अधिकृत सरासरीत केवळ 1.66 टक्के पोलिस पात्र ठरले, तर 622 पोलिसांची शरीररचना आदर्श रचनेपेक्षा जास्त आढळून आली. त्यात बहुतेकांचा पोटाचा घेर वाढलेला होता व त्यामुळेच शरीरात आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या.....
("१.६६ टक्के पोलीस चाचणीत फीट ठरले" हा आकडा निश्चितच काळजीची परिस्थिती आहे हेच दर्शवितो.)
३. कामावर हजार असलेल्या पैकी 123 जणांना मधुमेह, 71 जणांना उच्च रक्तदाब, 48 जणांना अतिरिक्त चरबी (कोलॅस्टरॉल), 113 जणांना हृदयविकार, 112 जणांना डोळ्यांचे विकार आढळून आले आणि 39 जणांना तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, डोळ्यांचे विकार अशा सर्व आजारांनी घेरल्याचे स्पष्ट झाले.
४. डॉ. निरंजन शहा, डॉ. एम. आर. पाटील व डॉ. शर्मिला गायकवाड यांनी ही तपासणी केली होती. त्यांच्या मते पोलिसांच्या या सर्व आजाराचे कारण कामाचा ताण, अनियमित जेवण व पुरेशा विश्रांतीचा अभाव हे आहे. डॉ. शहा म्हणाले, 'तपासणीसाठी जे निकष वापरले गेले त्यात पोलिसांचे वय, वजन, उंची याचा विचार केला गेला. अवेळी जेवण, कामाचा ताण केवळ या दोन कारणांमुळे पोलिसांना मधुमेह व रक्तदाबाने ग्रासले गेले आहे. त्यांच्या कामाची रचनाच अशी आहे की, प्रसंगी हे आजार बाजूला ठेवून ड्यूटी करणेच भाग आहे. त्यामुळे वेळेवर औषध व इतर पथ्यपाणी पाळणेही अनेक पोलिसांना आवश्यक आहे.''
5. ते म्हणाले, 'रक्तदाब, मधुमेह या आजाराने आपण ग्रासलो आहोत हे अनेक पोलिसांना तपासणी करेपर्यंत माहीतही नव्हते. किरकोळ त्रास झाला की हे पोलिस औषधाच्या दुकानातून किरकोळ एखादे औषध घेऊन दिवस काढत होते. या पोलिसांना आधी विश्रांतीचा सल्ला दिला पण त्यांना ते रजा, सुट्ट्याच्या अडचणीमुळे शक्य झाले नाही. अर्थातच त्यांचा विकार कमी झाला नाही.'' रक्तदाब, मधुमेह असताना बारा ते चोवीस तास बंदोबस्त या शिवाय कामाचा ताण व हे करत असताना योग्य आहार व औषधाचा अभाव हे शरीराला अतिशय घातक अशीच परिस्थिती असल्याचे डॉक्टर शहा यांनी सांगितले.
६. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या दहा पोलिसांची तपासणी करतानाच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची वेळ आली होती; मात्र ते त्याही स्थितीत ड्युटीवर होते.
७. जिल्ह्यातील पोलिस रात्रपाळी व फुकटच्या नको त्या समारंभाच्या, निदर्शनाच्या, मोर्चाच्या बंदोबस्ताला अक्षरशः वैतागले आहेत. कोणीही उठतो मोर्चा काढण्याचा इशारा देतो. इशारा दिला की 100 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्ताला दिला जातो. मोर्चात मात्र 20 ते 30 जणांचा सहभाग असतो. फोटो काढून झाले की मोर्चा संपतो पण अशा मोर्चात पोलिसांचा दिवस वाया जातो. पुन्हा रात्रपाळीच्या बंदोबस्ताला त्यातल्याच पोलिसांना नेमले जाते. जरा कुठे खुट्ट झाले की सुट्टी, रजा रद्द केली जाते. अशा परिस्थितीत आरोग्य कसे राखायचे हा पोलिसांच्या मनात खदखदणारा प्रश्न आहे.
तर असे आहे हे सगळे.... रक्तदाब आणि मधुमेह पिडीत पोलीस दल !! आपल्या शहरातील, गावातील, भागातील पोलीस दलातील कर्मचार्यांची प्रक्रतीविषयीची अशीच तक्रार असल्याचे आपणास आढळले काय ?
प्रतिक्रिया
अतिशय
उदासिनता.....
चांगला लेख
काळजी....!
:-)
चांगला
सर्व
वेगवेगळ्या आजारांचे बळी .... !
आज त्यांनी
प्रतिमा....!
+ १/ -१
पदवीधर पोलिस....!!
मग अशा
पोलिस दलात
काटा.....!!!
माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा सुरु आहे....
चांगला लेख
अरेरे!!!
योग्य मापन...!
अर्धसत्य