आनंद - टोपालोव : सामना ३
आनंद - टोपालोव : सामना १
आनंद - टोपालोव : सामना २
------------------------------------------------------------------------
सोमवार दि. २६ एप्रिलच्या एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दोघे खेळाडू एकमेकाला भिडण्यासाठी आसुसले असणार हे गृहित होते. गमावलेली आघाडी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी टोपा निकराचे प्रयत्न करणार हे सांगायची आवश्यकताच नव्हती त्यात त्याची बाजू पांढरी. आनंद आज बरोबरीसाठी जाण्याची शक्यता बरीच मोठी होती. झालंही तसंच डाव बरोबरी झाला.
खरंतर बरोबरीत सुटलेल्या ह्या सामन्यात असं काय थरारक असणार असं वाटेल पण टोपा हल्ल्यामागून हल्ले कसे चढवतो आणि आनंद अभेद्य बचाव कसा करतो हे पाहूयात. अत्यंत थंड डोक्याने प्रतिस्पर्ध्याचा एकेक हल्ला कसा परतवून लावावा याचं हा डाव म्हणजे प्रात्यक्षिक आहे. पाहूयात डाव ३ -
खाली दिलेल्या दुव्यावरील डाव एका खिडकीत उघडा आणि एकेक खेळी करुन त्याचवेळी रसग्रहण वाचा आणि डावाचा लुत्फ घ्या! ;)
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581334
पुन्हा एकदा वजिराचे प्यादे २ घरे पुढे आलं आणि डावाला सुरुवात झाली. (टोपालोव 'क्लोज्ड गेम्स' प्रकारानेच खेळत आहे. वजीरापुढचे प्यादे सरकवणे म्हणजे क्लोज्ड गेम. सर्वसाधारणपणे ह्या दर्जाच्या सामन्यात राजाचे प्यादे सरकवून खेळला जाणारा ओपन गेम खेळला जात नाही, त्या प्याद्याला लगेच जोर नसतो, उलट वजिराच्या प्याद्याला वजिराचा जोर असतो इ..).
1. डी ४, डी५
2.सी ४
डाव क्वीन्स गँबिटकडे गेला. (हे ओपनिंग १९२०-१९३० च्या दरम्यान अतिशय विकसित झालं. होजे राऊल कापाब्लांका आणि अलेक्झांडर अलेखाईन (ह्या अलेखाईनबद्दल लिहायचंय एकदा) ह्या दोन महारथींच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३४ पैकी तब्बल ३२ डाव ह्या प्रकाराने खेळले गेले!!)
सी ६ खेळी करुन आनंदने स्लाव बचाव स्वीकारला. (ह्या बचावाला स्लाव बचाव म्हणायचे कारण असे की इंडो-यूरोपिअन भाषिक आणि वांशिक धाग्यातून उदयाला आलेल्या काही महान स्लाविक खेळाडूंनी हा बचाव विकसित केला होता. ह्यात अलेखाईन सुद्धा होता!) असो.
डाव पुस्तकाप्रमाणे चालला होता. (इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आनंद, कास्पारोव, कारपोव अशा महान खेळाडूंचे डोके हे महासंगणक असते. हजारो, अक्षरशः हजारो डाव त्यातल्या प्रत्येक चाल आणि त्यातली वेरिएशन्स सकट त्यांच्या लक्षात असतात आणि ऐन सामन्यात त्यातली कित्येक वेरिएशन्स ते डाव चालू असताना पटावर विज्युअलाईज करत असतात!)
तर सहाव्या खेळी आनंदने ई६ अशी वेगळी खेळी केली (सामान्यपणे इथे वजिराचा घोडा पुढे येतो). नंतरच्या तीन खेळ्या ह्या पटाचा मध्य बळकावण्यासाठी झाल्या. पांढर्याच्या अकराव्या खेळी अखेरची स्थिती अशी - वजिरावजिरी झालेली आहे. टोपालोवचा उंट आणी दोन घोडे डावाच्या मध्यात विराजमान झाले आहेत दुसरा उंटही विकसित झालेला आहे. त्याच्याकडे एक प्यादं कमी आहे. उलट एक उंट आणि घोडा सोडता आनंदची बाकी मोहरी विकसित नाहीत. सी ५ वरचं प्यादंही बिनजोराचं बसलंय.
आता डावाचा मध्य आलाय. मोहोर्यांची प्रगती आणि पटाच्या मध्यावरचे वर्चस्व ह्या दोन हेतूंनी पुढल्या चाली झाल्या. १६ व्या खेळी अखेर पटाच्या मध्यावर दोन प्रभावी उंट, एक घोडा, सी स्तंभात आलेला एक हत्ती - समन्वयातला दुसरा हत्ती, राजाच्या बाजूची सुरक्षित प्यादे साखळी अशी स्थिती पांढर्याची आहे. आनंदचा डावही बर्यापैकी विकसित आहे. त्याच्या मुख्य अडचणी दोन - एक म्हणजे फक्त तिसर्या पट्टीपर्यंत सीमित असलेली प्रगती आणि दुसरी फारशी हालचाल करु न शकणारा पांढरा उंट आहेत. त्याचाच फायदा टोपाने घेतला
एच ५!, बी एच ७
पांढरा उंट नाईलाजाने अतिशय विचित्र अवस्थेत कोपर्यात ढकलला गेला.
ए ५ प्यादे पुढे ढकलून टोपाने पाचव्या पट्टीत आता दोन प्यादी केली. वजिराच्या बाजूला आता हल्ल्याची तयारी सुरु आहे. काळ्याने जर वेळेत त्याचा कोपर्यात गेलेला पांढरा उंट प्रबळ अवस्थेत आणला तरच त्याला बरोबरीचा उजेड दिसेल अन्यथा परिस्थिती हळूहळू अवघड होत जाईल!
पुढच्या दोन खेळ्यात घोडा ए ४ मधे पुढे दामटणे, बी ४ असे प्यादे दामटणे असे पांढर्याने केले आणि ई ५ अशी पांढर्या प्याद्याची आगेकूच रोखण्यासाठी एफ ३ अशी खेळी आणि हत्ती सी स्तंभात नेऊन बसवणे ही दोन कामे काळ्याने केली. (इथे पांढर्याचे बी ४ चे प्यादे बिनजोराचे दिसते आहे पण ते विषारी प्यादे आहे कारण डी ६ मधल्या उंटाने ते खाल्ले तर पांढरा हत्ती बी स्तंभातून सातव्या पट्टीत मुसंडी मारतो आणि काळ्याचा डाव खिळखिळा करतो.)
२४ व्या खेळीअखेरीस दोघांचे काळे उंट आणि राहिलेले घोडे मारामारी झाले होते. पांढर्याची तीन प्यादी पाचव्या पट्टीत सरकली होती.
२५ व्या खेळीला आनंद बी जी ८ असा खेळला. (जालावर चालींचे विश्लेषण सुरु असताना अनेकांना प्रश्न पडला की आनंदने हत्तीला डी ४ घरात मुसंडी मारायला का पाठवले नाही? त्याचे कारण, पांढर्याचे उंट - हत्ती ही प्रबळ युती आणी 'ए' व 'सी' स्तंभातली पाचव्या पट्टीतली प्यादी हे आहे.)
बीज़ी ८ ही खेळी किती महत्त्वाची होती हे थोड्या वेळात कळेलच.
टोपालोव एक सुंदर खेळी खेळला सी ६! प्यादे पुढे ढकलले. (ह्या प्याद्याला सहज गिळंकृत करता येऊ शकते कारण त्याल एकच जोर आहे पण त्यानंतर काही चालीत काळ्याचा डाव जातो. एक चुणूक बघा - काळ्याची खेळी आर x सी६, आर x सी६, बी x सी६ आता लगेच पांढरा त्याचा हत्ती बी १ मधे आणतो! पुढच्या खेळीत हत्ती बी ६ आणि त्याच्या पुढच्या खेळीत ए ६ चे काळे प्यादे पडते. पांढर्याचे ए ५ वरचे प्यादे मुक्त प्यादे झाले त्याचा वजीर कोणीही रोखू शकत नाही. काळ्याचा उंट कोपर्यात खितपत पडलाय!) आनंदचा संयम बघा किती वाखाणण्याजोगा आहे. पांढर्याची सारी आमिषे, हल्ले तो स्थितप्रज्ञपणे हाताळतो आहे. अजूनही तो नाजूक अवस्थेतून बाहेर पडलेला नाही पण तरीही तो दडपणाला समर्थपणे तोंड देतो आहे!
आर डी ६ आनंदची अतिशय चांगली खेळी. पास्ड पॉन (मुक्त प्यादे) आणि पांढर्या हत्तीची घुसखोरी दोन्ही एकाच खेळीत रोखले. सत्तावीस खेळ्यात बी ७ आणि सी ६ अशी प्याद्यांची मारामारी झाली. आता पांढरा हत्ती सी ३ असा सरकला - एच स्तंभातला हत्ती सी स्तंभात आणून दुहेरी करायचा घाट घातला जातोय!
बी एफ ७ आनंदच्या उंटाने त्या खेळीला चाप लावला!! हत्तीने एच स्तंभ सोडला तर त्याचे प्यादे धोक्यात येते. (समजले आधीच्या बी जी ८ खेळीचे महत्त्व?)
टोपाला झकत वाट बघणे आले. संभाव्य शह टाळण्यासाठी तो राजा ई ३ मधे घेऊन गेला. ह्या पुढची आनंदची खेळी सुद्धा सुरेख आहे बी ई ८! किती गोष्टी साध्य झाल्या आहेत बघा - उंटाच्या शक्तीचा पूर्ण वापर एका ऐवजी दोन कर्ण धरुन ठेवले, पांढर्या एच ५ प्याद्यावरची धमकी अजून टिकवून आहे, जर पांढरा हत्ती मुसंडी मारुन आलाच तर उंटाच्या मागे लपायला राजाला एक जागा झाली, ही एक वाट बघणारी खेळी सुद्धा आहे कारण पांढरा नेमका काय खेळणार आहे त्यानुसार दोन्ही हत्ती हवे तिथे जाउ शकतात. (ज्या वेळी परिस्थिती अशी तरल असते त्यावेळी समोरच्याला आधी कमिट करायला लावायचे हा दोघांचा उद्देश असतो. कोणत्याही एका चालीने डावाचे पारडे अचानक झुकू शकते. हे मानसिक आणि पटावरचे द्वंद्व एकाच वेळी सुरु असते! क्या बात है!! अंगावर शहारे येतात अशावेळी!!)
जी ४ प्यादे पुढे सरकले कारण एच ५ मधे जोर देऊन हत्ती तिथून हलवणे पांढर्याला भाग आहे. ई ५ पांढर्या राजाची एफ ४ मधली संभाव्य आगेकूच थांबवली. आर सी १ पांढर्याने हत्ती दुहेरी केले. उंटाचं एच ५ प्याद्यावर लक्ष द्यायचे काम संपलेच होते, आनंदची अप्रतिम खेळी बी डी ७!! एच ७ ह्या कोपर्यातल्या घरात अडकलेला उंट चार खेळ्यात नागमोडी हलवत त्याने डी ७ मधे आणून डावाच्या महत्त्वाच्या क्षणी हवा तिथे विराजमान केला, तोही संपूर्ण डावाचा तोल कुठेही जाऊ न देता. काय कमालीचं कौशल्य आहे!! (सच्यानं ब्रेट ली च्या १५० किमि वेगाने येणार्या चेंडूला स्ट्रेट ड्राईवचा 'तडका' मारुन चौकाराची वाट पकडायला लावावी तसंच आहे हे!!).
आता स्थिती बघा - काळा राजा सुरक्षित आहे, सगळी प्यादी ही काळ्या घरात आहेत त्यामुळे पांढरा उंट त्यांचं काहीही वाकडं करु शकत नाही. प्याद्यांची साखळी तोडायला पांढरा राजा पुढे घुसु शकत नाही, इतकंच काय तो डी स्तंभातच पाऊल टाकू शकत नाही कारण काळा हत्ती! पांढर्याचं पोझीशनल अॅडवांटेज संपूर्णपणे संपलं आहे. डाव बरोबरीत सुटणार हे नक्की! टोपालोव चडफडत होता. त्याच्या अस्वस्थ हालचालींवरुन हे समजत होतं. तितकाच आनंद शांत होता.
आर सी ५, बी बी ५ - पांढर्या उंटावर हल्ला.
बी xबी ५
ए x बी ५
पुढच्या खेळ्यात ए स्तंभातली प्यादी आणि दोन हत्ती ह्यांची मारामारी होते.
चाळिसाव्या खेळी अखेर दोघांकडे ४ -४ प्यादी आणि एकेक हत्ती आहे. आनंद पांढर्या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार किंवा टोपालोव काळ्या राजाला चेक देणार आणि आनंद एफ्७-एफ८ असा घोटाळणार. प्याद्यांची खेळी कोणी खेळणार नाही.
दहा सेकंद विचार करुन टोपालोवने निराशेने मान हलवली आणि आर्बिटरना (सामना नियंत्रक) बोलावून घेवून सामना बरोबरीची मागणी केली. आनंद तयारच होता. बरोबरी झाली पण खिलाडूपणाला गालबोट लागेल अशा प्रकारे टोपालोव वागला - आनंदशी हस्तांदोलनही न करता तो तडक पटावरुन उठून चालायला लागला!! नुसतेच मोठे खेळाडू आणी असामान्य खेळाडू ह्यातला हाच फरक आहे. असामान्य खेळाडू माणूस म्हणून मोठे असतात आणि म्हणूनच ते रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. (हस्तांदोलन न करण्याच्या प्रकारावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला - टोपालोव लोकांच्या मनातून उतरला.)
(पुढच्या चौथ्या सामन्यात आनंदने जो काही खेळ दाखवला आहे त्याने त्या सामन्याची गणना आनंदच्या ऑल टाईम ग्रेट सामन्यात व्हावी पण ते उद्या!!)
-चतुरंग
प्रतिक्रिया
वाचतो आहे
+१ बर्याचश
बर्याचशा गोष्टी डोक्यावरुन जात आहेत!
नक्को...
असेच
हा खेळ समजून घ्यायचा प्रयत्न करतोच आहे.
अतिशय रंजक विषय काढल्याबद्दल धन्यवाद!
हे पटले ...
बरोब्बर..
मस्त!
सर्वसाधारणपणे ओपनिंग
आजचा
या सामन्यांच्या
+१
+१
झ क्का स
रंगासेठ
मजा येते
तरीहि मला असे
अरेच्चा!
व्वा...!