पंख
उडता उडता एकदा एक राघू
झाडाच्या एका फांदीवर येऊन बसतो
हिरवट पिवळ्या पिकल्या पेरूला
आपल्या लालबुंद चोचीने कोरु लागतो
तोच एक आवाज येतो, "सावध सावध
लबाड काळ्या बोक्यापासून जरा जपून रहा"
राघू पाहतो , अंगणातल्या पिंजऱ्यात पोपट दिसतो
म्हणतो "धन्यवाद मित्रा, आहेस तू कसा "
पोपट म्हणतो "एकदम झकास,
ताज्या हिरव्या मिरच्या, पेरूच्या गोड फोडी,
पिंजऱ्यातला या आयुष्याची तुला
काय म्हणून सांगू गोडी "
जो तो लाडाने मला मिठू मिठू म्हणतो
मीही त्यांना मग राम राम करतो
सध्या घेतोय जरा इंग्रजीचा लेसन
'गुड मोर्निंग, टाटा, थ्यांक यु, नो मेन्शन'
राघू म्हणतो "नशीबवान मोठा आहेस गड्या,
पिंजऱ्याचे भोवती तुला आहे सरंक्षण
खाण्या पिण्याचीही नाही काही चणचण
वेळेआधी तुला कधी यायचे नाही मरण
मी बापडा उडत असतो, पंख घेऊन आपले
पोटासाठी जिथे तिथे वणवण करत
आपले तर जगणे तेवढेच आहे जोवर
पंखांमध्ये दोन या आहे थोडी ताकद
तुला नाही वाटत कधी पिंजऱ्याबाहेर यावे,
पंखांमध्ये वारे भरून लांबवर उडावे?"
हळू आवाजात पोपट म्हणतो "मालकाने पंख कापले
पिंजऱ्यात राहतो त्याला, कशाला पंख हवे ?
तुटल्या पंखाकडे पाहत राघू पुढे बोलत नाही
जाताना फक्त म्हणतो 'मित्रा आता निघतो'
दूरवर त्याला जाताना पाहत पोपट मात्र
पिंजऱ्यातल्या झोक्यावर हळू झोके घेत राहतो
My Website http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
28 Feb 2010 - 6:46 am | मदनबाण
छान...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
28 Feb 2010 - 8:41 am | पाषाणभेद
शेवटल्या कडव्यात दोघांचा संघर्ष अजून परिणामकारक रंगवायचा होता.
बाकी मस्त.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
28 Feb 2010 - 11:34 am | राजेश घासकडवी
मला तो काळा बोका खरोखरच येणार की काय अशी शंका होती. तो आला असता तर कवितेला एक खोली आली असती असं वाटतं.
स्वातंत्र्य थोर, पिंजरा वाईट हे थोडं काळं पांढरं चित्रण झालं असं वाटलं. पंख हे स्वैरतेचं प्रतीक आहे. पिंजरा हे कैदेचं. प्रत्येक स्वातंत्र्याला आपले गज असतात, आणि प्रत्येक गजांमागे एक वेगळी मुक्तता असते. कधीकधी पिंजऱ्यातल्या पोपटाला मुक्त राघू आकर्षक वाटतो, तर त्याच वेळी मुक्त पक्ष्याला ते सुखकर, बोक्याचा धोका नसलेलं जीणं हवंसं वाटतं. हे द्वैत या कवितेत नीट आलेलं नाही. अर्थात ते आलं पाहिजे हा माझा हटवादीपणा असू शकेल. पण कवितेवरून कवीच्या मनात हा संघर्ष झाला का, हे कळत नाही. त्यामुळे ही भारत - ऑस्ट्रेलिया सारखी अटीतटीची न होता भारत विरुद्ध कासारवाडी इलेव्हन सारखी एकतर्फी वाटते.
राजेश
28 Feb 2010 - 8:16 pm | sur_nair
बोका आला असता तर कदाचित त्याने राघूला पकडले असते, कदाचित तो उडून गेला असता. ही कविता लिहिताना कुठलाही 'moral lesson' द्यावा हा हेतू नव्हता. एक प्रसंग फक्त रेखित केला आणि थोडासा 'open ended ' च ठेवला जेणेकरून वाचणार्याने काय तो अर्थ लावावा. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही आयुष्याचे pros and cons काहीसे दाखवले आहेत.
दोघांना एकमेकांचं आयुष्य सुखकर वाटतं हे बरोबर आहे. राघूला स्वातंत्र्य असले तरी त्या बोक्याचं भय आहे. स्वत त्याला याची जाणीव आहे म्हणूनच तो म्हणतो ' नशीबवान आहेस..., वेळेआधी तुला कधी यायचे नाही मरण'. पण सर्व सुखसोयी आणि सौरंक्षण असलेल्या पोपटालाही कधीतरी वाटतच असेल की बाहेर येऊन उडावे.
28 Feb 2010 - 8:44 pm | शुचि
>>तुटल्या पंखाकडे पाहत राघू पुढे बोलत नाही
जाताना फक्त म्हणतो 'मित्रा आता निघतो'>>
ते राघूचं पंखाकडे पहाणं आणि न बोलणं खूप काही सांगून जातं. असं म्हणतात खरच जेव्हा घाव वर्मी लागतो तेव्हा माणूस खरच काही बोलत नाही.
राघूचं मौन खूप काही सांगून गेलं. हळवं करून गेलं आणि नंतर पोपटचं हळूहळू झोके घेत रहाणं : (
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
5 Mar 2010 - 2:42 pm | स्मृती
छान विश्लेषण शुचि! कविताही चांगली!! :)
6 Mar 2010 - 8:00 pm | sur_nair
मला जो कवितेचा शेवट अभिप्रेत होता तो तुम्ही बरोबर हेरला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
6 Mar 2010 - 9:14 pm | मेघवेडा
सहमत! असंच म्हणतो!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!