उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो.
उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल. बिगुलांच्या काळीज पिळवटुन टाकणार्या सुरावटी च्या तालावर कुणी वरिष्ठ अधिकारी आस्तेकदम जाऊन शहिदांना रिथ अर्पण करेल तेव्हा सलामी देणार्या पोलिसांच्या रायफलींच्या कडकडाट होईल, आपटलेल्या टाचांचा आवाज घुमेल. कवायत मैदानाच्या बाजुला उभारलेल्या शामीयान्यात आरामात बसुन वरिष्ठ अधिकारी ते पहातील तर धरुन आणलेले काही सेलिब्रिटीज कंटाळलेपणानं आपला `लुक' उन्हानं खराब होणार नाही याची काळजी घेत अर्धा चेहरा गॉगलनं झाकुन बसतील. अन ज्यांच्याकरता ते जवानमर्द वीर शहीद झाले ते आपण तेव्हा घरी बेड टी घेत असु किंवा ऑफिसला पळण्याच्या गडबडीत अन्हिकं उरकत असु. हेच तर या दिवशी देशभर गेली ५० वर्षे घडत आलंय ना?
पोलिस स्मृति दिन - आपण सर्वांनी कधीच विस्मृतिच्या गर्तेत भिरकावुन दिलेला अन सरकारकरता अनिवार्य उपचार उरलेला. कायम आपण त्यांना पांडु-सखाराम म्हणुन हिणवतो अन राजकारणी, वरिष्ठ अधिकारी ज्यांना रामा गड्याप्रमाणे राबवतात त्या मर्दांचा दिवस. एका अतुलनीय शौर्याची आठवण!
२१ ऑक्टोबर १९५९ या काळ्या दिवशीच्या पहाटे घडलेल्या एका अमानुष, राक्षसी घटनेत या दिनाची बीजं आहेत. सारे भारतवासी गाढ निद्रेत असताना त्या दिवशी अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज चीनी सैन्याच्या तुकड्यांनी अचानक आपल्या भारतभूच्या स्वातंत्र्यावर घाला घातला - लडाखमधे हॉटस्प्रिंग इथं अचानक घुसखोरी केली.
लडाख हे भारताचं उत्तर टोक, हिमालयाच्या कुशीतलं १८००० फूट उंचीवरचं ठिकाण! भारतभूच्या स्वातंत्र्यदेवीच्या मस्तकावरचा हिमाच्छादित किरिटच जणु. उंच ठिकाणी असल्यानं अन हाडं गोठवणारी थंडी असल्यानं निर्मनुष्य. वावर तिथं असणार तो फक्त सीमेवर गस्त घालणार्या अर्धसैनिक अन लष्करी दलांचाच, बाकी असणार ती नीरव शांतताच. त्यात पुन्हा असे आक्रमण होईल याचाच अंदाज नसल्यानं बहुधा पण गस्तीपथकातही मनुष्यबळ जेमतेमच. प्रचंड लोकसंख्या असणार्या चीनच्या युद्धपद्धतीची खासीतय म्हणजे ह्युमन वेव्ह (मानवी लाटा) पद्धत ज्यामधे चीनी सैन्याच्या एकामागोमाग एक अश्या लाटा समोरच्या सैन्यावर आदळत रहातात अगदी त्यातला शेवटचा सैनिक नामशेष होईपर्यंत. या आक्रमणातही हीच पद्धती वापरली गेली होती.
अन या चीनी सैन्याच्या समोर उभे रहायला होते कोण तर अगदी सीमेलगतच्या चौक्यांवर (बॉर्डर फॉरवर्ड पोस्टवर) तैनात केलेली केंद्रीय निमलष्करी दलाची तुटपुंची साधनसामुग्री अन डी वाय एस पी करमसिंग यांच्या नेतृत्वाखालचे वीस जणांचे गस्तपथक. (ही माहीती मिपाकर चेतन यांच्या सौजन्याने मिळाली. त्यांना अनेक धन्यवाद!) आणि हे आक्रमण तरी कसे लक्षात यावे तर गस्त घालत असताना ही तुकडी हॉट स्प्रिंगच्या पुर्वेस सहा मैलांवर पोहोचली तेव्हा त्यांना काही संशयित हालचाली दिसल्या. आपले जवान त्या हालचाली कोणाच्या आहेत याचा शोध घेत असतानाच अचानक त्याच्यावर बंदुकांच्या फैरींचा वर्षाव झाला.
एकुणच खचुन जावं अन पळ काढावा अशी परिस्थिती. पण नाही! केंद्रीय निमलष्करी दलाचे ते जवान भारताचे वीर सुपुत्र होते. त्यांनी हातपाय नाही गाळले. उपलब्ध साधनसामुग्रीच्या बळावर त्यांनी प्रतिकार सुरु केला अन पेटलं एक अनोखं रणकंदन. तो रणचंडीयाग संपला तो दहा जवामर्दांचा बळी घेऊनच. नऊ जण शत्रुच्या हाती लागले. एकानंही पळुन जाण्याच्या विचारसुद्धा मनी आणला नाही. मारीत मारीत धारातिर्थी पडले ते दहाजण. त्यांची नावं होती - पुरणसिंग, धरमसिंग, इंद्रजित, सुबा, नोरबु लामा, शिवनाथ प्रसाद, त्शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनसिंग, बेगराज अन माखनलाल.
त्यापैकी तीन जण प. बंगालचे, दोन जण हरियाणाचे, दोन जण पंजाबचे, दोन जण उत्तर प्रदेशचे तर एकजण हिमाचल प्रदेशचा रहिवासी होता. आक्रमकांचे फक्त त्यांच्या बलिदानानं समाधान झाले नाही तर त्यांनी या वीरांची पार्थिवेही आपल्याच ताब्यात ठेवली. ही बातमी वार्यासारखी पसरली अन देशभर खळबळ माजली. शेवटी १३ नोव्हेंबर १९५९ रोजी या अमर जवानांची पार्थिवे चीनने भारताच्या ताब्यात दिली अन १४ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांच्यावर हॉटस्प्रिंग इथं सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येक राज्यातुन पोलिस तुकड्या गेल्या.
त्यानंतर काही दिवसातच पाटणा इथं अखिल भारतीय पोलिस कर्तव्य स्पर्धा झाल्या. या स्पर्धा पोलिसांच्या कार्यक्षमतेची चाचणीच असते अन त्यात देशभरातुन पोलिस दलांची पथके सामील होतात. साहजिकच हॉटस्प्रिंग इथं झालेल्या ताज्या घटनेच्या स्मृति तिथं परत जागवल्या गेल्या अन भारतातील सर्व पोलिस दलांनी तिथुन पुढं दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलिस स्मृति दिन पाळण्याची शपथ घेतली.
तेव्हापासुन २१ ऑक्टोबरला त्या शहिदांना अन भारतातल्या जनतेला सुरक्षा देताना धारातिर्थी पडणार्या इतर पोलिस जवानांना मानवंदना देण्यासाठी हा दिन पाळला जातो.
१ सप्टेंबर २००८ ते ३१ ऑगस्ट २००९ या एका वर्षाच्या कालावधीत भारतभरात ज्या ज्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्यांना उद्या मानवंदना दिली जाईल. त्यात महाराष्ट्रातील एकुण ७२ जवान आहेत आणि त्यामधे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला परतवताना शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांचाही समावेश आहे.
या सर्व वीरांनी आपल्याला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठीच प्राण वेचले आहेत हे लक्षात घेता त्यांना आदरांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते. ही आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रत्यक्ष जाणे जरी आपल्याला शक्य झाले नाही तरी प्रत्येकाला किमान त्यांच्या बलिदानाची आठवण यावी यासाठीच हा लेखप्रपंच!
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 2:52 pm | विमुक्त
ह्या लेखाबद्दल धन्यवाद... मला माहीत नव्हतं हे...
20 Oct 2009 - 2:52 pm | गणपा
छान लेख पुनेरी.
त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली.
20 Oct 2009 - 5:18 pm | प्रभो
छान लेख प्रसनदा.
त्या वीर सुपुत्रांना नम्र आदरांजली.
--प्रभो
20 Oct 2009 - 3:37 pm | जे.पी.मॉर्गन
मलाही ठाऊक नव्हतं ! धन्यवाद !
20 Oct 2009 - 3:38 pm | जे.पी.मॉर्गन
मलाही ठाऊक नव्हतं ! धन्यवाद !
20 Oct 2009 - 5:09 pm | सहज
स्व:ताच जीवाला अजुनच त्रास करुन घ्यायचा.
:-(
20 Oct 2009 - 6:05 pm | चेतन
माझी ही त्यांना आदरांजली
चेतन
अवांतर: १९ नाही, बहुतेक २० जण होते
20 Oct 2009 - 6:16 pm | प्रसन्न केसकर
परंतु चुकभुल (असल्यास) देणे घेणे.
20 Oct 2009 - 6:05 pm | दशानन
माझी ही त्यांना आदरांजली
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
20 Oct 2009 - 6:36 pm | विकास
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली.
ह्या पोलिस स्मृति दिनाची माहीती करून दिल्याबद्दल आभार! पोलीसांच्या भ्रष्टाचाराबद्दल, मग्रुरीबद्दल, गुन्हेगारी जगताशी असलेल्या संगनमताबद्दल वगैरे आपण ऐकत असतोच पण त्यातही असे अनेक असतात जे कर्तव्यपुर्ती करत असतात. २६ नोव्हेंबर हे जसे ठळक उदाहरण या वर्षासाठी आहे, तसेच अनेक पोलीस जे नक्षलवाद्यांच्या मुळे धारातिर्थीपडले ते पण आहे.
मात्र या दिनाची ओळख सामान्यांप्रमाणेच पोलीसदलातील बहुतांशी कर्मचार्यांना पण करून देण्याची गरज आहे असे वाटते.
20 Oct 2009 - 6:55 pm | प्रसन्न केसकर
पोलीसदलातील कर्मचार्यांना असतेच पण दुर्दैवाने त्याच्याकडे राजकारणी आणि इतरांचे दुर्लक्ष होते.
20 Oct 2009 - 7:20 pm | प्रदीप
दिल्याबद्दल धन्यवाद. पोलिस दिनाविषयी काहीही माहिती नव्हते, ह्या लेखातून खूप चांगली माहिती समजली.
गेल्या नोव्हेंबरात मुंबईवर झालेल्या हल्य्यातही अत्यंत तुटपुंज्या सामग्रीनिशी लढणार्या मुंबई पोलिसांनी शौर्याने सामना केला, त्यात त्यातील काही शहीदही झाले. जो एकमेव दहशतवादी पकडला गेला आहे, तोही त्या पोलिसांमुळेच!
महाराष्ट्र पोलिसांच्या राहणीमानाविषयी एक खूप चांगला लेख, मला वाटते 'युनिक फीचर्स' ने सिंडिकेट केलेला, काही वषांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचावयास मिळाला होता. त्यात त्यांचे क्वार्टर्स किती जुनाट आहेत, त्यांचे कामाचे तास व कामाची ठिकाणे, त्यांना रोजच ज्या हालापेष्टांमधून जावे लागते, त्याविषयी उपयुक्त माहिती होती.
सर्वसाधारणपणे आपण मध्यम्वर्गीय माणसे पोलिसांवर टिकाच करत असतो. आपण सर्वांनीच कधी ना कधी तरी त्यांच्या मग्रूरीचा व 'खाबूगिरी'चा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असतो, अथवा त्याविषयी काहीतरी ऐकलेले असते. पण अनेकदा ते ज्या परिस्थितीत काम करत असतात, ते पाहिले की अत्यंत वाईट वाटते. उदा. धारावी ६० फूटी रस्त्यावर माहिम स्टेशनच्या क्रॉसिंगवर वाहतूकीचे नियंत्रण एक पोलिस मधोमध उभा राहून करत असतो. रोज सुमारे ४५ तास तसे केल्यावर त्याच्या शरिरावर काय परिणाम होत असेल? मुंबई- पुण्यातील किती पोलिस हृदयविकाराचे बळी झालेले आहेत? ह्याविषयी कुण्या जाणकाराने अवश्य लिहावे.
पुन्हा एकदा: पुनेरी ह्यांच्या आतापर्यंतच्या लौकिकास साजरा असा हा लेख आहे. माहितीपूर्ण व उगाच आक्रस्ताळी नाही. असेच लिहीत रहा.
20 Oct 2009 - 9:05 pm | संजय अभ्यंकर
पुनेरीसाहेबांनी एक ज्वलंत विषय मांडला.
त्याला प्रदिपजींचा योग्य प्रतिसाद.
१.
एकंदर मुंबई व पुण्या सारख्या शहरात पोलीस मरमर काम करताना आपण पहातो. रोज गाडी चालवताना वाहतुक पोलीसांना जेव्हा मी पहातो, तेव्हा त्यांच्या वरील ताणा बद्दल विचार करतो.
सर्व वाहन चालकांनी जर वाहतूकीचे नियम कसोशीने पाळले तर पोलिसांवरचा ताण बराच कमी होईल.
२.
हल्ली सतत येणार्या बातम्यां मधे माओवादी, नक्षलवादी आदिंच्या हल्ल्यात पोलीस मरले जात आहेत हे कळते. हे पोलीस मारले जात आहेत ते राजकारण्यांच्या मुर्दाडपणामुळे, ते घाबरट वा पळपुटे आहेत म्हणून नव्हे. आमचे राजकारणी मुठभर अतीरेक्यांना पाठीशी घालताना एका पोलीसाच्या कुटूंबाचा बळी दुर्लक्षीतात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
20 Oct 2009 - 6:43 pm | रेवती
शहिद पोलिसांना आदरांजली!
रेवती
20 Oct 2009 - 6:57 pm | श्रावण मोडक
सलाम!
20 Oct 2009 - 7:39 pm | धनंजय
आणि आदरांजली.
20 Oct 2009 - 7:56 pm | टुकुल
आदरांजली.
--टुकुल
20 Oct 2009 - 9:37 pm | संदीप चित्रे
ह्या लेखामुळे नवीन माहिती मिळाली पुनेरी !
धन्यवाद.
20 Oct 2009 - 9:39 pm | मदनबाण
माझी पण सर्व शहीद पोलीसांना आदरांजली...
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
20 Oct 2009 - 9:47 pm | सुधीर काळे
शहीद पोलिसांना, त्यातही कसाबला जिवंत पकडून देणारे कै. तुकाराम ओंबळे, धारातीर्थी पडलेले कै. करकरे व इतर पोलिसांना, खास श्रद्धांजली.
तिबेटच्या सीमेवर शहीद झालेले पोलीस CRP चे जवान होते. ही संस्था त्यामानाने राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असते. मी मुकुंदमध्ये काम करत असताना CRPच्या कांहीं तुकड्या कंपनीत संपकाळात तैनात होत्या. त्यांची रोजची कावाईत वगैरे पहाण्यासारखी होती. रोज दुपारी जवळ-जवळ तीन तास कवाईत चालायची व त्यांचा कमांडरही त्यांच्या बरोबर कवाईत करायचा.
CRP पोलीस दल केंद्रीय असल्यामुळे राज्य सरकाराच्या कक्षेबाहेर असतात व त्यामुळेच राजकारण्यांचे हात त्यांच्यापर्यंत पोचत नाहींत.
राजकारण्यांपासून पोलिसांना कसं संरक्षण मिळेल यावर वृत्तपत्रांनी एक भक्कम आघाडी उघडण्याची वळ आलेली आहे असे मला मनापासून वाटते.
सुधीर काळे
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
20 Oct 2009 - 11:52 pm | देवदत्त
माहितीबद्दल धन्यवाद.
आता थोड्या वेळापूर्वीच पोलिसखात्याकडून SMS आला. त्यात त्यांनी नायगाव पोलिस मुख्यालयात उद्या सकाळी ७:५० वा. संचालनाला हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
अशा प्रकारे लोकांना आवाहन करावे लागते का असे वाटले होते. पण ह्या दिनाची माहितीच माझ्याप्रमाणेच भरपूर लोकांना नाही त्यामुळे त्यांना असे सांगावे लागते हे कळले आणि स्वतःबद्दलच वाईट वाटले.
तेथे जाणे सध्या तरी शक्य नाही. :(
त्या ८३३ पोलिसांना माझी आदरांजली व सलाम.
20 Oct 2009 - 11:03 pm | वाटाड्या...
विनम्र श्रद्धांजली....
छान माहिती...
- वा
20 Oct 2009 - 11:46 pm | ऋषिकेश
इतक्या छान माहितीबद्दल अनेक आभार. पुनेरी यांचा लेख म्हणजे अनवट आणि विचार करायला लावणारे काहितरी मिळणार या अपेक्षेची पुर्तता करणारे लेखन.
सर्व शहिदांना आदरांजली व त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सलाम
ऋषिकेश
------------------