बेंगलोर आख्यान : भाग २ - आम्ही पण मराठी ....

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
13 Mar 2008 - 5:40 pm

बेंगलोरला आल्यावर व काही दिवस इथे मुक्त हुंदडल्यावर एक गोष्ट लक्षात आली की येथे "मराठी भाषा" जास्त कुणाला गम्य नाही. कशी असणार हो, इथे पहायला गेलात तर हिंदीचीच बोंबाबोंब आहे तर मग मराठी कोण बोलणार ? ह्या गोष्टीचा फायदा असा होतो की बाहेर फिरताना एखादी गोष्ट [ जनरली सुंदर कन्या ] आपल्याला आवडली किंवा दिसली तर आपण लगेच आपल्या भावना [ म्हणजे आपले जनरल, दिसायला अशी काटा आहे, फटाका आहे, कामाची नाही, काकूबाई आहे इ.इ...] आपल्या मित्रांना आपल्या मातृभाषेत सांगू शकतो व सगळे मिळून त्या गोष्टीवर डिस्कस करून अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकतात. याचा दुसरा फायदा असा की समजा एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली म्हणजे हॉटेलची सर्वीस, रिक्षावाल्याचे अथवा बसकंडक्टरचे मुजोर वागणे, इथल्या काही लोकांचे प्रादेशिकपणे वागणे व मुद्दामुन बाहेरच्या लोकांना त्रास देणे तर अशा गोष्टींवरच्या आपल्या रागाचा कढ आपण आपल्या मातृभाषेत मनोसक्त शिव्या देउन काढू शकतो कारण समोरच्याला आपण काय बोलतो हे घंटा कळत नाही. [ मला वाटते की ते पण हाच मार्ग अवलंबत असावे. असो.] बरोबर आहे ना, कारण त्यांना कळेल अशा भाषेत आपण असे काही विवादास्पद बोललो तर फटके पडतील. म्हणून आम्ही अशा गोष्टीसाठी मराठीची कास पकडली. आमच्या तिथे आधिच २ वर्षापासून राहणाऱ्या मित्रांनी आम्हाला "जपून " असा सल्ला दिला पण ऐकेल ते आम्ही कसले ? आमचे हे प्रयोग चालूच होते पण एके दिवशी आमची मस्त लागली.... [ खूष होउ नका लगेच, मार वगैरे खाण्याची पाळी नाही आली ...]
साधारणता बेंगलोरला येउन १ महिना झाला असावा . एके दिवशी सुट्टीच्या दिवशी माझ्या एका मित्राला त्याच्या "व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरिक्षेचे फॉर्म्स [ त्यापेक्षा एम बी ए एंट्रन्स म्हतलेले काय वाईट ? ] " आणायचे होते. ते फॉर्म्स साधारणता सरकारी बँकांच्या शाखात मिळतात. तसा आमचा "शनिवारचा " काही खास प्रोग्राम नसल्यामुळे त्याने मला "चल तुला बेंगलोर दाखवतो !" असे लालूच दाखवले. मला पण तसे बोअर झाले होते म्हटले चला मस्त फूक़टचे फिरायला मिळेल [ कारण मधल्या सर्व वाहतूक, चहा-पाणी-बिडी इ. खर्चाची जबाबदारी त्याने उचलली होती.] व तो म्हणतोय त्याप्रमाणे बेंगलोरही पाहणे होईल म्हणून मी तयार झालो. आता ती बँक एका "हाय-प्रोफाईल रोड ज्याला ब्रिगेड रोड" म्हणतात येथे येत असल्यामुळे तेथे मस्त सुंदर मुलींचा ताटवा फुललेला असतो अशी एक नवीन माहिती एका मित्राने दिली. बहूतेक यामुळेच का काय आमचा अजून मित्र बरोबर यायला तयार झाला...
तर अशी मजलदरमजल [ म्हणॅजे नक्के काय कोणाला माहित ? व ती कशी करतात हे उपरवाला जाने ] करत आमची स्वारी त्या बँकेत साधारणता १०.३०-११ ला पोहचली. अजून फॉर्म्सची मुदत बरीच असल्याने बँकेत जास्त गर्दी नव्हती कशाला आम्ही तिघेच कडमडलो होतो. साधारणता बँकेचे सर्वेक्षण केल्यावर आमच्या असे लक्षात आले की ही बँक जास्त काही बिसी वाटत नाही व त्यामुळेच तिथले कर्मचारीही आम्हाला एकदम निवांत वाटले. आमच्या कामाच्या मित्राला "तू तेरा रास्ता नाप " असे सांगून आम्ही दोघांनी कोपऱ्यातला एक रिकामा [ तसे सगळेच रिकामे होते ] कोच पकडला व त्याच्या आसपास पडलेली बँकेची कागदपत्रे वाच, पेपर चाळ, कन्नडमध्ये लिहलेल्या अगम्य सुचनांचा अर्थ लावण्याचा निष्फळ प्रयत्न कर असे कुटाणे करत बसलो. व त्याच्याबरोबरच आमच्या निर्धास्तपणे " मराठीतून बँकेच्या सद्यस्थितीबद्दल कमेंट्स" चालूच होत्या .
आता तुम्हाला सांगायचेच म्हटले तर
" च्यायला बँकेचे दुकान काय जास्त चालत नाही असे दिसतेय ?"
"हा ना, बघ सगळे कसे निवांत पडले आहेत "
"आत्ताच पोतभरून इडली-डोसा हादडून झाला आसेल , मस्त आत एसी चालू आहे , द्या ताणून तिच्यायला ...."
"खरच राव, आपण गेल्यावर पुन्हा एकदा राईस हाणतील आणि खरच टेबलं जोडून झोपतील राव ..."
" खी खी खी ..."
"ह्या ह्या ह्या "

यावर आमच्या समोरच बसलेल्या एका पोक्त बाईने डोळे वटारून आमच्याकडे पाहिले व हातानेच "शूउउउउ" अशी खूण केली .
यावर माझा मित्र " गप ना भो *** [ आता याला पर्याय नाही. पटकथेची गरज म्हणून आम्हाला असे शब्द टाकावेच लागतील. हे एकदा म्हतले की झाले तुम्ही बोकळे कसे पण **नाच घलायला. तर असो....], झोप मोडलीना त्यांची ..."
"सॉरी मॅडम , झोपा तुम्ही निवांत [हे हळू आवाजात ...]
"खी खी खी !!!!"
त्यातूनच आमच्या एका मित्राचे त्या पोक्त बाई शेजारी बसलेल्या एका तरूण व सुस्वरूप म्हणाव्या अशा कन्येवर "टप्पे टाकणे " चालू होते. मीच त्याला "गप ना भा ***" म्हणून दटावले.

तेवढ्यात आमच्या कामाच्या मित्राला खिशात आवश्यक पैसे नसल्याचा साक्षात्कार झाला. यावर "भाड्या, तुला आधी अक्कल नव्हती का ? करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही " अशी मुक्ताफळे ऐकल्यावर तो बँकेच्या तळमजल्यावर असणाऱ्या त्याच "बँकेच्या ए टी एम " मध्ये गेला. आम्ही आपले तो गेल्यावर "ए टी एम" किती जूने असेल, त्यावर किती धूळ बसली असेल, त्यामुळे मित्राला चक्कर येउन तो बेशूद्ध पडेलि इ.इ. लांबड लावायला सूरवात केली. आमचा आवाज थोडा वाढल्याने व कदाचित त्यांची झोप मोडल्याने बँकेचे कर्मचारी उठून आमच्याकडे पहायला लागले. मग मात्र आम्ही आवरते घेतले. ५ च मिनिटात खाली गेलेला आमचा दोस्त "मशिनमध्ये कार्ड अडकल्याची तक्रार" घेउन आला....
पुन्हा एकदा जोरदार हास्याचा बहर ओसरल्यावर व " माझ्या मित्राची व बँकेच्या जुन्या सिस्टीमची व्यवस्थीत काढून झाल्यावर " मी व माझा मित्र ते कार्ड परत मिळवून देण्याची जबाबदारी असलेया माणसाच्या शोधाला लागलो. त्या महाभागाने आम्हाला " कोण ? कुठले? कसे काय कार्ड अडकले ? कोणाकडून आडकले ? कुणाचे आहे ? कोठे काम करता ? काय काम करता ? कोठे राहता ? फुकट राहता की विकत राहता ? वापरता येते का नाही ? पुन्हा अडकल्यास काय करायचे? आम्हाला तेवढ़ेच काम आहे का ? " अशा अनेक सरकारी व असंबद्ध प्रश्नाची फैरी झाडल्यानंतर कार्ड काढून देण्याची तयारी दाखवली. आम्ही तो म्हणतोय ते सगळे कबूल असल्याचे व पुन्हा असे करणार नाही अशी ग्वाही दिल्यावर त्याने कार्ड काढून दिले. आमचा मित्र ते घेउन पुन्हा पैसे आणायला गेल्यावर मी तिथे बसलेल्या माझ्या मित्राला ही हकिकत ऐकवली व आम्ही दोघे पोट धरून हसलो.
हे सर्व चालू असताना तेथील कर्मचारी आमच्याकडे थोडे रागाने पहात असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही शांत बसलो. मित्र पैसे घेउन आल्यावर व आवश्यक ती कागदं भरून झ्याल्यावर ज्या ठिकाणी पैसे भरायचे आहेत तो "कॅशिअर" जागेवर नसल्याचे लक्षात आले. यावर " तो झोपला असेल, चहा पित असेल, घरी गेला असेल, भाजी निवडत असेल, भांडी घासत असेल , पोराला आंघोळ घालत असेल , चौकात बिड्या फुंकत बसला असेल " असे तर्क लढवून झाल्यावर १० मिनीटांनी तो 'सद्ग्रहस्थ' आला. माझ्या मित्राने सर्व सोपस्कार पूर्ण करून फॉर्म्स ताब्यात घेतले व आम्ही निघण्याची तयारी केली.
आम्ही आता निघाणार तेवढ्यात समोर बसलेली ती पोक्त बाई [ हो तीच आम्हाला शूउउउउ करणारी ] चक्क मराठीत माझ्या मित्राला म्हणाली " बाळ, फॉर्म्स व्यवस्थीत चेक करून घे . नाहितर पुन्हा घोळ करशिल..... " आमचा पार फ्युज उडला. माझा दुसरा मित्र तर चक्क बाहेर पळून गेला. मग उरलेल्या आम्ही दोघांनी आपले " आपण मराठी का ? कुठल्या ? मग इथे कशा ?" असे पांचट व सावरासावरी करणारे प्रश्न विचारले व बाजू संभाळायचा प्रयत्न केला. त्यावर ती बाई मुळची "पुण्याची" [ कळले ना, आत्तापर्यंत गप्प का होती ते ?] असल्याची माहिती दिली. आम्ही मग " बरं आहे, अच्छा मग, येतो " मह्णून तिथून काढता पाय घेतला. बाहेर पडताना चोरून वळून पाहिले तर ती पोक्त बाई व ती सुस्वरूप कन्या काहितर गुलुगुलु बोलत हसत होत्या, मग मात्र आम्ही जोराने धूम ठोकली
बाहेर आलो तर आमचा पळालेला मित्र बँकेच्या १०० पाउले दूर जाउन कोपऱ्यात उभा होता. आमच्या पळालेल्या मित्राला बाहेर आल्यावर तो "गुलुगुलु गप्पांचा " किस्सा सांगितल्यवर तो एकदम दिगमुढ का काय म्हणतात तसा झाला व म्हणाला "च्यायला, म्हणूनच एवढ़्या खुन्नस ने बघत होती ...."
मग पून्हा आम्ही "खदाखदा हासून घेतले" व वाटेस लागलो [ कसले, आमचीच वाट लागली म्हणा ना ]...
त्यानंतर आम्ही बरेच इकडे तिकडे हिंडलो, बरेच काही पोटात ढकलले व पोट व डोळे अगदी मनोसोक्त भरल्यावर आम्ही रूम वर परत निघालो. जाताना रिक्षाने जायचे ठरवले. रिक्षात बसल्यावर सकाळची घटना आठवून व दिवसभरात दिसलेल्या काही प्रेक्षणीय गोष्टींविषयी आमची चर्चा आपल्या "मायमराठीतून" चालूच होती. आमच्या असे लक्षात आले की रिक्षावाला आम्ही काहि विनोदी बोललो की हसत आहे व सारखे सारखे आरशातून मागे वळून पहात आहे. मला तो मराठी असल्याचा संशय आल्याने मी मित्रांना "जपून" अशी खूण केली. त्यावर आम्ही बोलण्यातून सगळे "हिंदी व इंग्रजी शब्द वगळून" शुद्ध मराठीत बोलणे सुरु केले. आमचा मित्र त्यावर म्हणालासुद्धा " ऐक आता, घंटा कळणार नाही तुला ".
या गोष्टीमुळे आमचा थोडा चर्चेचा ट्रॅक बदलून तो "रिक्षावाला" यावर केंद्रित झाला.
मग नेहमीप्रमाणे
"त्याला म्हणावं समोर बघून चालव"
"च्यायला बघतय एकीकडे, ऐकतय एकीकडे , चालवतयं तिसरीकडे "
"नाही पण, चालवतोय चांगलं, एकदम निवांत चालू आहे"
"त्याला वॉर्निंग आहे, कुठल्याही परिस्थितीत ओव्हरटेक करायचा नाही व स्पीड ४० च्या वर न्यायचा नाही "
"बहूतेक नवीन असावा ...."
"तो नवीन नाही , रिक्षा नवीन आहे ...."
"नवीन म्हणजे सेकंडहॅन्ड नवीन आहे असे तुला म्हणायचे आहे का ?"
"जावू दे, मी झोपतो, घर आले की उठव मला "
"भा ** , झोपतो काय ? तो बघ पडीकडच्या गाडीवरचा माल .... "
अशी आमची मुक्तफळे चालू होती. शेवटी घर आल्यावर आम्ही उतरलो, जेवढे झाले तेवढे पैसे दिले व आता निघणार तेवढ़्यात तो मला म्हणाला "भाउ, किती वाजले रे ?" आता मात्र एक सेकंद न थांबता माझे दोन्ही मित्र पळाले, माझ्याजवळ तोही ऑप्शन नव्हता. मग मी आपले " नमस्कार, मराठी का ? कुठले ? आमचे बोलणे समजले का ? तुमच्याविषयी बोललेल्याचा राग नाही ना आला ? सॉरी " अशी सावरासावर केली . त्यावर तो म्हणाला "मला आधेच कळले होते पण म्हणले बघु काय बोलतात ते, राग नाही आला पण लै मज्जा वाटली " मी आपले " बरयं , ठिक आहे ..." म्हणून रूमवर गेलो व पाहतो तर काय "रूमवरचे सगळे चांडाळं चांगले गडाबडा लोळत हसत आहेत. मग काय करता , मी पण त्यांच्यात सामील झालो ....

तर तात्पर्य काय ? बचके रहना रे बाबा . आपल्या माउलींची मराठी पार कानाकोपऱ्यात पोहचली आहे आणि ती केव्हा तुमचा कान पकडेल याचा काही नेम नाही .....

हे ठिकाण

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

13 Mar 2008 - 5:43 pm | छोटा डॉन

हे एकदा म्हतले की झाले तुम्ही बोकळे कसे पण **नाच घलायला"

हे,
"हे एकदा म्हटले की झाले तुम्ही मोकळे कसे पण **नाच घालायला"
असे वाचावे ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 6:01 pm | धमाल मुलगा

हाण... हाण तिच्याआयला !!!!!

एकदम जबरा शॉट रे भाऊ :-) एकच न॑बर !

मज्जा आली बॉ वाचायला. वातावरणनिर्मीती एकदम फाकडू...वर्णन तर लैच जबरा....
आणि दोन-दोनदा झालेला 'हत्ती' खल्ल्ल्लास रे..............

करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही
ह.ह.पो.दु.वे.आ.
बाहेरपण ? चा॑गला शब्द घावला. बाहेरख्या*पणा (आवर धम्या आवर स्वतःला...जीभ फार सैल सुटत चाललीये) ठाऊक होता..हे बाहेरपण काय आहे? बाहेरवासासारख॑ काही?

चला, काहीतरी मौलिक वाचून दिवस सत्कारणी लागला.
च्यायला डॉन्या, आज साला त्या वि॑ग्रजान॑ लय खोलून घेतला होता मला...डोस्क॑ पार औट झाल॑ होत॑ पण आता घरी जाताना एकदम हल्लक॑-फुल्लक॑ वाटत॑य. धन्यवाद्स !!!!

अवा॑तर : कर्नाटकाच्या खुद्द राजधानीत माय मराठी रुजु लागलेली पाहून जीव गलबलून आला रे. जगद॑ब..जगद॑ब !!!! आई अशीच कृपा राहू दे ग॑ .

व्यंकट's picture

13 Mar 2008 - 7:10 pm | व्यंकट

अशी मजा झाली काय.

व्यंकट

लिखाळ's picture

13 Mar 2008 - 9:07 pm | लिखाळ

मजा आली .. असेच येवूद्या :)
आम्ही सुद्धा असेच मराठीचे प्रयोग करत असतो. पण इकडे कुणाला मराठी येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आम्ही समोरच्या माणसा देखत सुद्धा काही वेळा भलते बोलू शकतो :)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

एक's picture

13 Mar 2008 - 10:29 pm | एक

ने कुठल "सर्वनाम" सुरू होतं कळलं नाही..
माझा डेटाबेस उघडून बघितला पण "भा**" ला मॅचींग डेटा मिळाला नाही.. भ** किंवा भा*** आहे..

च्यायला पुण्यात एकदा चक्कर मारली पाहिजे डेटा अपडेट करायला..

मजा आली पण वाचायला..

परवा आमची (मी आणि बायको) पण अशीच गोची झाली. बेएरिया तल्या एका पंजाबी-पाकिस्तानी हॉटेल मधला माणूस मराठी बोलेल आम्हाला कसं कळावं?

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Mar 2008 - 11:56 pm | llपुण्याचे पेशवेll

ती ३ वेगळी अक्षरे नसून भा नंतर ते जोडाक्षर आहे :) आता कळले असेल नक्की! कारण पेरूगेट मधला तो एक कॉमन शब्द होता.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 10:58 pm | विसोबा खेचर

छोट्या डॉना,

मस्तच लिहिलं आहेस रे! अजूनही येऊ द्या.......

तात्या.

आपला आभि's picture

14 Mar 2008 - 9:34 am | आपला आभि

छान लिहल आहेस....
अरे बेन्गलोरला जाऊन शाना झालास की...
मग पुण्यात अस का येड्यासारख करायचा ?

छोटा डॉन's picture

14 Mar 2008 - 6:31 pm | छोटा डॉन

"मग पुण्यात अस का येड्यासारख करायचा ?"
च्यायला, मला पुण्यात येवढं चांगलं ओळखणारा कोण रे तु ?
आता चांगलं ओळखत होता म्हणजे मी पुण्यात येड्यासारखं वागत होतो आणि आता शहाणा झालो आहे असे पण नाही....
कारण मी पुण्यातच शान्यासारखं वागत असल्यामुळे इथे बेंगलोरला येऊन अधिक शहाणे म्हणाजे "दिडशाणे " होण्यात काय मतलब ?

तुझ्याकडे बघायला पाहिले लेका , थांब तुला "किवा लाऊंज" मध्येच सर्फबरोबर पार्टी देतो ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

तर तात्पर्य काय ? बचके रहना रे बाबा . आपल्या माउलींची मराठी पार कानाकोपऱ्यात पोहचली आहे आणि ती केव्हा तुमचा कान पकडेल याचा काही नेम नाही

लि़खाण ऊत्तम झाले आहे. रिक्षावाल्याचे मुजोर वागणे - हा जागतिक गुणधर्म आहे. मग ते पुण असो अ थवा बेंगळुरु......
बेंगलोर मधे मल्लेश्वरम् ते सदाशिव नगर ५० रु घेतात आणि पुण्यात शनिवार वाड्यापासुन सदाशिव पेठेत (स्वगॄही) जायला सुध्दा ५० रु धेतात. (आमचा दोष इतकाच की आम्ही दोन्ही कडे परप्रांतीय गाड्यांतुन उतरतो.)

सावधान - पुर्वी पासुनच ईकडे मराठी भाषीक बहूत आहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचे तिर्थरुप शहाजी महाराज जवळपास २० वर्ष बेंगळुरु मुक्कामी होते. महाराजांचा पहिला विवाह बेंगलोर मुक्कमी झाला आहे. श्रीमंत पेशव्यांचे ही अनेकदा येणे होते. त्यामुळे जवळ पास सर्व जून्या मंदिरात आणि मल्लेश्वरम्, सदाशिव नगर , राजाजीनगर, बसवण गूडी (बुल टेम्पल), इस्कॉन, यशवंतपुर या भागातील लोकांना मराठी समखास येते. (ही मराठी काळानूरुप न बदलल्याने टिपीकल जुने ठेवणीतले शब्द इथे सापड्तील)

याच प्रमाणे तंजाऊर, हैदराबाद, मेंगलोर या प्रांतात मुबलक मराठी बोलणारे लो़क आहेत.
(पुर्‍याव्या दाखाल भारत सरकारचा भाषा जनगणना अहवाल पहावा)

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 2:00 pm | मनस्वी

तुम्ही शनिवारवाडा ते सदाशिव पेठ ५० रु दिले यात तुमचीच चूक आहे. फार फार तर १५ डोक्यावरून पाणी २० रु होतात.

मनस्वी

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 2:03 pm | मनस्वी

मी आणि सहकारी कोरमंगलातून होसुररोडच्या ऑफीसला जाताना रिक्षा पकडली.
रिक्षावाल्याने नेहेमीप्रमाणे २० रु जास्त मागितले. उशीर झालेला म्हणून काही न बोलता बसलो.
पाचच मिनिटांत लक्षात आले की मीटर जरा जास्तच जोरात फिरतंय...
आम्ही त्याला बोललो तर म्हणाला की बरोबर आहे म्हणून!
आता आम्ही रोज जायचो रिक्षेनेच.. त्याच रस्त्यावरून.. लगेच कळले की आपण गंडले गेलो..

आम्ही जी बडबड सुरु केली मराठीत.. हे बँगलोरचे रिक्षावाले नालायकच आहेत.. आपलं पुणंच छान आहे.. रिक्षावाले गंडवत तरी नाहीत.. कशाला आलोय बँगलोरमध्ये काय माहित.. पुन्हा चुकूनपण येणार नाही.. यांना लाजा कशा नाही वाटत.. मी याचा नंबर पोलिसालाच देणार आहे.. पण काय उपयोग.. ते पण तसेच.. नालायक.. माकडछाप.. असे फसवा आम्हाला आणि आयुष्यभर रिक्षाच चालवत बसा.......... ऑफीस येइपर्यंत पट्टा चालू होता..

नेहेमी रिक्षेचे ४० रु व्हायचे.. आता ५० झालेले.. आणि वरून याला २० रु एक्स्ट्रॉ द्या..

त्याला ६० रु दिले आणि सांगितले, आम्ही रोज येतो आणि रोज ३० रुपयेच होतात...

त्याने १० रुपये परत केले आणि म्हणाला (मराठीत) "मी १० वर्ष मुंबईत होतो!"

आम्हाला हसायला आलं.. पण त्याला बोलून घेतल्याचा अजिबात पश्चाताप नाही झाला.

मनस्वी

अभिज्ञ's picture

15 Mar 2008 - 7:17 pm | अभिज्ञ

नमस्कार डॉन साहेब,
लेख चान्गलाच रंगला आहे.
असे काहि अनुभव माझ्या वाट्याला पण आले आहेत.ते तुमच्याकडून वाचून मजा आलि.
असेच चान्गले लेख येउद्यात.

अबब

माझा भ्रमणध्वनि-९९८०१३७४६४.
जाता जाता.....
सध्या हैदराबादला आहे,पुढच्या आठवड्यात बंगळूर ला परत येणार आहे.
जमले तर नक्कि भेटुयात.
तुम्हि शासकिय अभियान्त्रिकि महाविद्यालयातून पास आउट आहात का?
असे असेल तर क्या बात है.मग एकदा आपल्याला "बसावेच" लागेल असे दिसतेय.
(आपला "गोट्याबाज") अबब.

प्राजु's picture

15 Mar 2008 - 7:40 pm | प्राजु

असं म्हणतात की दिल वालोंकी दिल्ली, बॉम्ब वालों का बॉम्बे,और बंगले वालोंका बंगलोर...

बंगलोर खरंच सुंदर आहे. मी बर्‍याच वेळेला बंगलोरला जाऊन आले आहे. त्यातला ब्रिगेड रोड आणि एम्.जी. रोड ही आवडती ठिकाणे. किड्स केंप मध्येही हिंडाअयला आवडते. खास करून तिथे अखंड चालू असलेला फॅशन शो.
आपले वर्णन खासच. पण पुढे हिंडताना खरबरदारी घ्यावी.

- (सर्वव्यापी)प्राजु

काळूराम's picture

16 Mar 2008 - 5:00 am | काळूराम

हो ना, अगदी खरे आहे. अहो भारतात सोडा अगदी परदेशात सुध्दा मराठीतून मनमोकळ्या शिव्या देणे अवघड जाते आहे. दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, मी बसमध्ये प्रवास करीत होतो. जिभेला सडकून मराठी बोलायची जोरदार तल्लफ आल्यामूळे जून्या मित्रांना फोन लावत होतो. एका मित्राचे नुकतेच लग्न झाले होते, त्याला फोनवरच मधुचंद्रापासून ते मुलाच्या बारस्यापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन सुरु होते (बरेचशे शहाणे आमच्या भाषेला अर्वाच्च भाषा म्हणतील) तेवढ्यात एका बसस्टॉपवर पाठीवर जोरदार थाप पडली व एक मध्यमवयीन गॄहस्थ म्हनतात कसे "बाळा सार्वजनीक ठिकाणी अशा गोष्टी बोलू नयेत." वाटले होते इकडे आल्यावर तरी पाहिजे तसे वागता बोलता येईल, पण कसले काय...........