Skip to main content

विवाहबाह्य अनैतिक संबंध: गुन्हेगारी अपराध की केवळ वैयक्तिक बाब?

लेखक Ashish Raju Dutonde यांनी शनिवार, 28/11/2026 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

फोटो AI च्या मदतीने बनवलेला आहेकाही वर्षांपूर्वी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा वसलेला संसार उद्ध्वस्त झाला. त्यांच्यात कोणतेही भांडण नव्हते, ना कोणती मारहाण होती. फक्त पती-पत्नीच्या नात्यात एक तिसरी व्यक्ती आली, आणि हळूहळू एक हसता-खेळता परिवार विखुरला गेला. जेव्हा ती पीडित व्यक्ती न्यायासाठी दारोदारी भटकली, तेव्हा तिला एकच उत्तर मिळाले— 'आता हा कोणताही गुन्हा उरलेला नाही, ही तुमची वैयक्तिक बाब आहे. हवे असल्यास तुम्ही घटस्फोट घेऊ शकता.' मी विचार करत राहिलो... घटस्फोट हाच न्याय आहे का? नाही, घटस्फोट म्हणजे तर नाते संपल्याची केवळ एक अधिकृत घोषणा आहे. मग जो संसार मोडला, जी बालके पोरकी झाली, जो असह्य मानसिक त्रास झाला त्याचे काय?

सन २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'जोसेफ शाइन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' खटल्यात भारतीय दंड संहितेचे (IPC) कलम ४९७ रद्दबातल ठरवले. न्यायालयाचा युक्तिवाद योग्य होता— 'पत्नी ही पतीची मालमत्ता नाही, स्त्रीला तिची स्वायत्तता आहे.' या ऐतिहासिक निकालाचे समाज आणि कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले. परंतु, या निकालानंतर कायद्यामध्ये एक मोठी आणि धोकादायक पोकळी निर्माण झाली. वसाहतकालीन भेदभावपूर्ण कायदा हटवून त्यातील लैंगिक असमानता संपवणे अत्यंत गरजेचे होते; परंतु दंडात्मक तरतूद पूर्णपणे रद्द करण्याऐवजी तिला 'लिंग-निरपेक्ष' (Gender-Neutral) बनवून विवाह संस्थेचे रक्षण करणे अधिक न्यायसंगत ठरले असते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की अनैतिक संबंध हा गुन्हा नाही, पण तो घटस्फोटाचा आधार ठरू शकतो. पण त्यानंतर काय झाले? समानता आली का? होय, समानता तर आली, कारण आता स्त्री आणि पुरुष दोघेही समान प्रमाणात अनैतिक संबंधांत गुंतून विवाहाचे पावित्र्य आणि एकमेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आणत आहेत— ज्याला कोणताही कायदेशीर दंड किंवा परिणाम उरलेला नाही.

आजची शोकांतिका अशी आहे की, विवाहासारख्या पवित्र, सामाजिक आणि वैधानिक संस्थेला आतून पोकळ करणाऱ्या किंवा संसार मोडणाऱ्या व्यक्तीवर कोणतेही फौजदारी किंवा वैधानिक उत्तरदायित्व नसते. दुसरीकडे, निष्ठावान जीवनसाथी आणि निष्पाप बालकांना असह्य मानसिक छळ, सामाजिक अपमान आणि कौटुंबिक विघटनाचा सामना करावा लागतो. केवळ घटस्फोटाची तरतूद असणे ही कोणतीही शिक्षा नाही, तर ती केवळ कायदेशीररीत्या वेगळे होण्याची प्रक्रिया आहे, जी दोषी व्यक्तीसाठी सोयीची आणि पीडित व्यक्तीसाठी अत्यंत वेदनादायी ठरते.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) ची अधिकृत आकडेवारी हे सिद्ध करते की विवाहबाह्य अनैतिक संबंध ही केवळ 'खासगी बाब' किंवा 'वैयक्तिक पसंती' नाही, तर ते भारतीय समाजात गंभीर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार आणि हिंसक घटनांचे मुख्य कारण बनत आहेत. NCRB च्या 'मोटिव्ह्ज ऑफ मर्डर' (हत्यांची कारणे) तक्ता २A.२ नुसार, २०२१ मध्ये देशात 'अवैध संबंधां'मुळे १५५९ हत्यांची नोंद झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रात २३२, आंध्र प्रदेशात १८६, मध्य प्रदेशात १६१, उत्तर प्रदेशात ७२ आणि कर्नाटकात १५२ प्रकरणांचा समावेश होता. २०२२ मध्ये या कारणाने १४२० हत्या तर २०२३ मध्ये  १३८९ हत्यांची नोंद झाली. याशिवाय, NCRB च्या आत्महत्यांसंबंधी तक्ता २E (२०१८-२४) दर्शवतो की दरवर्षी १,२०० हून अधिक व्यक्ती विवाहबाह्य संबंधांच्या मानसिक आघातामुळे आत्महत्या करतात. जेव्हा एखादे कृत्य दरवर्षी १,४०० हून अधिक हत्या आणि १,२०० हून अधिक आत्महत्यांना कारणीभूत ठरत असेल, तेव्हा त्याला 'वैयक्तिक बाब' म्हणून सोडून देणे हे कायदा, नैतिकता आणि प्रशासकीय व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.

भारतीय समाजाचा पाया भक्कम कौटुंबिक व्यवस्था, सामायिक सांस्कृतिक मूल्ये आणि परस्परांवरील विश्वासावर टिकून आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुट्टास्वामी खटल्यात मांडलेली निजतेची (Privacy) संकल्पना अमर्याद (Absolute) नाही. विवाह हा एक वैधानिक आणि सामाजिक करार आहे, ज्यामध्ये प्रवेश करताच दोन्ही पक्ष परस्परांशी निष्ठा राखण्याचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य स्वीकारतात. या पवित्र कर्तव्याचा जाणूनबुजून भंग करणे निजतेच्या अधिकारात येऊ शकत नाही. जर कोणाला कोणत्याही सामाजिक व नैतिक जबाबदारीशिवाय पूर्ण अनियंत्रित स्वातंत्र्य हवे असेल, तर त्यांनी विवाह संस्थेत प्रवेश करू नये. परंतु एकदा विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर जोडीदाराचा विश्वासघात करण्याच्या सुटीला निजतेच्या नावाखाली संरक्षण दिले जाऊ शकत नाही.

या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर संविधानाच्या अनुच्छेद ३५० अंतर्गत पाठवलेल्या नागरिक याचिकेची दखल घेत, विधी व न्याय मंत्रालयाने कायदे आयोगाकडे (Law Commission of India) अधिकृत संदर्भ (F. No. 27(09)/2026-Leg. III) वर्ग केला आहे. सध्या जेव्हा देशात कौटुंबिक कायदे आणि समान नागरी संहितेवर (UCC) विचारमंथन सुरू आहे, तेव्हा विवाह संस्थेची प्रतिष्ठा, सामाजिक स्थैर्य आणि नैतिक मूल्यांच्या रक्षणासाठी एक कठोर व लिंग-निरपेक्ष (Gender-Neutral) दंडात्मक कायदा पुन्हा तयार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. केवळ घटस्फोटामुळे समाज आणि कुटुंबे वाचणार नाहीत, तर त्यासाठी कठोर दंडात्मक कायद्याची नितांत गरज आहे. कारण आज जर समाजाचे रक्षण केले नाही तर उद्या समाजच राहणार नाही. 

वाचक मंडळ येथे क्लिक करून माझे x account follow करू शकतात :

येथे


वाचने 93
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अशी परिस्थिती निर्माण होण्यात सिनेमा, निर्बुद्ध सिरीयली, एकूणच विविध माध्यमातून केली जाणारी 'बाजारा' ची अनिर्बंध  जहिरातबाजी, अशी कारणेही आहेत. (उदहरणार्थ नवरा बायको विभक्त झाले की एका ऐवजी दोन घरे, दोन गाड्या, आणि घरातल्या सर्व वस्तूंसाठी दुप्पट गिऱ्हाईक आपसूकच निर्माण होत असते.) 

गंमत अशी, की मला हे १९९७ साली अमेरिकेला गेलेलो असताना तिथून MBA केलेल्या माझ्या एका मित्राने भारतात बोकाळलेल्या  TV serials चा विषय गप्पात निघाला, तेंव्हा   सांगितले होते. ते आता भारतात मोठ्या प्रमाणावर घडून येत आहे. 

मलासे वाटते आपल्यापैकी अनेकांना आता अशी प्रत्यक्ष उदाहरणे ठाऊक असतील.


In reply to by चित्रगुप्त

हो नक्कीच हे कारण असू शकते परंतु विवाहबाह्य अनैतिक संबधा विषयीच्या कायदा IPC कलम 497 रद्द झाल्याने नागरिकांना कायद्याची भीती वाटत नाही म्हणून असे प्रकार मिळतात अनुभवायला, ज्यामुळे नंतर खून, आत्महत्या वाढत आहेत, परंतु भारतीय विधी आयोगाने नागरिक निवेदनाच्या अनुषंगाने या विषयावर मंथन सुरू केले आहे. तरी आपण माझ्या X account वर जाऊन विवाहबाह्य अनैतिकसंबंधा विषयावर कायदा करवा यासाठी support करू शकता बायो मध्ये ईमेल तयार करून दिला आहे आपण येथे क्लिक करा आणि support करा कायदा बनू शकतो फक्त जानशक्ति ची गरज आहे .