Skip to main content

ऐवढे रक्त आटवायची गरज आहे काय?

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 28/11/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या लोकसभेतील जागांची संख्या वाढवणे आणि तिथे महिला आरक्षण यासाठी विद्यमान सरकारकडून प्रयत्न चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच यासाठी सरकारडून अन्य पक्षांतील खासदार विविध मार्गानी आपल्याकडे वळवण्याचे आणि पक्षांचा पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे मला प्रश्न पडला आहे की एवढे प्रयत्न करण्याइतके हे मुद्दे महत्वाचे आहेत का आणि त्यातून आपले हित साधले जाईल काय याबद्दल मला शंका आहे.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आपली लोकसंख्या सुमारे ४ पट झालेली आहे. सुरुवातीच्या काळात लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना या वाढीला पुढे ढकलण्यात आले आणि अजून संख्या वाढवण्यात आलेली नाही. संविधानाने लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या वाढवण्यास सांगितले आहे, प्रत्येक मताची किंमत समान असली पाहिजे हे मुद्दे मी ऐकले आहेत. संविधानाने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या बऱ्याचदा त्याचे उल्लंघन करून पालन केले जाते (more honored in the breach than the observance) त्यामुळे तो बचाव मला अजिबात मान्य नाही. महिला आरक्षणासाठी जागा वाढवाव्यात हे कारण सुद्धा कारण पुरेसे नाही. महिला किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे सक्षमीकरण करायचे असेल तर आजवर आरक्षण या सोप्या उपायाच्या पलीकडे उपाय सापडलेला नाही हे दुर्दैवी आहे. त्यातही आरक्षण द्यायचे असेल तर आजही मंत्रिमंडळात, उमेदवार यादीत महिलांना पुरेशा जागा देणे असे उपाय सहज शक्य आहेत. 

दर एका लोकसभा मतदारसंघामागे लोकसंख्या वाढली आहे हे सत्य आहे मात्र मुळात देश पातळी सोडून लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आणि त्याही खाली स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि खासदारांनी सारी जबाबदारी आपल्या अंगावर घेण्याची काहीही आवश्यकता नाही. शिक्षण, आरोग्य, जमिन वापर-खरेदी-विक्री-नोंदणी अशा मूलभूत गोष्टीत कायदे करण्याचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी राज्यांवर आहे. आपल्याला खरी गरज आहे ती या स्थानिक पातळीवरील अधिक लोकप्रतिनिधींची आणि त्यांना अधिक सक्षम करण्याची. एखाद्या सेवेसाठी पैसे देणारे, त्याचा विनियोग कसा करावा हे ठरवणारे, आणि त्याचा लाभ घेणारे हे जितके जवळ जवळ असतील तेवढा सेवेचा दर्जा सुधारतो. उदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बरेच कर्मचारी  आणि अन्यही जिल्हा पातळीवरील कर्मचारी हे राज्य सरकार किंवा अगदी थेट केंद्र सरकार नियुक्त करते त्यामुळे स्थानिक जनतेशी उत्तरदायित्व क्षीण होते. यालाही काही ऐतिहासिक कारणे आहेत आणि स्थानिक संस्थांचा आजवरचा कारभारही आपल्याला खूप आशा देणारा आहे असे वाटत नाही. बेंगळुरू, मुंबई आणि अनेक महानगरात पाच-पाच वर्ष निवडणूक घेण्यात आल्या नाहीत त्यातून वरच्या पातळीवरील नेतृत्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कसे पाहते ते कळते. राज्यातील राजकारणाचा आणखी एक आखाडा म्हणून आमदार त्याकडे पाहतात असे अरविंद सुब्रमणियन आणि देवेश कपूर यांनी त्यांच्या Sixth of Humanity पुस्तकात म्हटले आहे. यात सुधारणा करायची असेल तर दीड-दोन दशकांचा कार्यक्रम आखावा लागेल. अशा घाईगडबडीतून काहीही साध्य होणार नाही. ३० जुलै २०२६ रोजी Indian Express मध्ये आलेला शशी थरूर यांचा यावरील लेख वाचनीय आहे. अगदी एका सभागृहात ८००+ सदस्य हजर राहून चर्चा कशी करू शकतात असा साधा प्रश्न त्यांनी विचारला आहे (अन्यही महत्वाचे मुद्दे आहेत). तसेच समप्रमाणात सर्व राज्यांच्या जागा वाढवण्यासाठी पाठींबा देणारे प्रादेशिक पक्षही लबाड आहेत. आजच्या ४० च्या जागी ६० मतदारसंघ झाले तर आणखी २-४ आपले खासदार वाढले, एखादं जातीसमूहाचं समीकरण साधलं तर त्यांनाही तेच हवय. अगदी त्यांच्या प्रदेशातील जनतेचे हित त्यात आहे म्हणून ते पाठींबा देत आहेत असे अजिबात नाही. तसेच आपापल्या राज्यातील खालच्या पातळीवरील नेतृत्व सक्षम करणे, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे या बाबतीत त्यांचीही वागणूक केंद्रीकरण करणारीच आहे.

 

रक्त आटवायची खूप इच्छा असेल तर ज्याकारता रक्त आटवावे लागेल पण जनतेचा खरोखर फायदा होईल असे ५ कार्यक्रम आणि त्यांचे फायदे  मी माझ्या अल्पबुद्धीनुसार सुचवतो.

  1. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण - गुंवतवलेले भांडवल, जमिन यांचा पुनर्वापर होऊन वाढलेल्या उत्पादनातून कराच्या रूपाने सरकारला अधिक उत्पन्न मिळेल आणि या उद्योगांना वाचवण्यासाठी वारंवार भांडवल गुंवतणूक करायची गरज सरकारला पडणार नाही.
  2. वीज वितरण क्षेत्रात स्पर्धा - हा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. सरकारी कंपन्यांच्या मक्तेदारीतून निर्माण झालेली अकार्यक्षमता आणि निव्वळ मतांसाठी जिथे तिथे स्वस्त फुकट वीज यांचा अंत करून वीज वितरण क्षेत्रात आणखी स्पर्धा आणली तर आपल्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढून अधिक रोजगार निर्माण होतील. 
  3. शेती क्षेत्र - पूर्वीचे शेती कायदे राज्यपातळीवर अमलात आणल्यास शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य वाढायला मदत होईल तसेच अन्यही जुनाट नियंत्रणे बाजूला सरल्यास जीएम बियाणी, मोठ्या जमिनी, साठवणुकीत गुंतवणूक, वायदे बाजार यांची सुरुवात आपल्या देशात होईल.
  4. छोटी राज्ये - भारतातील राज्यांचा आकार हा जगातील काही देशांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्या पातळीवरसुद्धा छोटी राज्ये करण्याची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू ही तोडून छोटी राज्ये करणे आवश्यक आहे. भाषेचा अडसर त्यात येण्याचे कारण नाही, तामिळ भाषक ३ राज्ये झाली तरी तामिळ भाषेला काही धोका उत्पन्न होणार नाही. उलट चेन्नई विद्यापीठाचा तामिळ विभाग आणि कोईम्बतूर विदयापीठाचा तामिळ विभाग यांच्यात उत्तम तामिळ प्राध्यापक येण्यासाठी स्पर्धा लागली पाहिजे, चांगले तामिळ कलाकार उत्तम नाट्यगृहे, उत्तम वाचनालये, आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य आपल्या राज्यात देऊन  कलाकार आपल्या याकरता स्पर्धा लागली पाहिजे. मात्र निव्वळ भाषेवर आक्रमण होण्याचा बागुलबुवा उभा करून सर्व कुटुंबवादी प्रायव्हेट लिमिटेड पक्ष प्रचंड अडथळा आणतील हे मात्र नक्की.
  5. संकीर्ण - सर्व क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न आणि त्यातील जमतील तेवढे अडथळे दूर करणे जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन आणि तिथला अनुभव भारतात उपलब्ध होऊन भारतीय उद्योजकही शिकतील आणि भारतीय कामगारांनाही रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध होतील. उद्योगांना छोटे राहण्यासाठी कारणीभूत ठरलेले कामगार कायदे बदलणे. यातील काही गोष्टी परत एकदा राज्यांच्या अखत्यारीत आहेत त्याकरता राज्यांच्या मागे लागून, त्यांना समजावून, आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात सुधारणा करून उदाहरण दाखवणे असे उपाय करता येतील.

    अमुक लाख लोकांमागे काही खासदार असल्याने काही लाख लोकांशी खासदारांना हस्तांदोलन करणेही शक्य नाही असेही म्हटले जाते पण मला मुळात हस्तांदोलन करायचेच नाही. ऍडम स्मिथ, स्टीव्ह जॉब्स, नानी पालखीवाला, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मॉन्टेकसिंग अहलुवालिया   यांच्याशी मी कधीही हस्तांदोलन केलेले नाही आणि करण्याची शक्यताही नाही. तरीही त्यांच्या कर्तृत्वाची, कामाची फळे मी आणि करोडो लोक चाखत आहेत. त्यामुळे देश खरोखर प्रगत, बलवान करायचा असेल तर हस्तांदोलनापेक्षा मान मोडून अध्ययन, त्यातील निष्कर्षांचे सामान्य जनतेशी उत्तम संदेशवहन याची गरज आहे.  

अर्थात हे लिहिण्याला आता फार उशीर झालेला आहे याची जाणीव मला आहे पण तरीही लिहिले आहे.


वाचने 122
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुम्ही दोन वेगळेच मुद्दे एकत्र केले आहेत. आर्थिक मुद्द्यांविषयी पूर्ण सहमती. पण त्याचा डिलिमिटेशन आणि लोकसभेतील जागा वाढविण्याशी काय संबंध? लोकसभेत आता आहेत त्यापेक्षा थोड्या जागा कमी असताना बॅंकांचे राष्ट्रीयीकरण हा तुघलकी निर्णय घेतला गेला होता आणि आता आहेत तितक्याच जागा असताना खुल्या आर्थिक धोरणासंबंधीचे निर्णयही घेतले गेले होते. मग त्या आर्थिक धोरणांचा लोकसभेत किती जागा आहेत त्याच्याशी काय संबंध?

 

अगदी एका सभागृहात ८००+ सदस्य हजर राहून चर्चा कशी करू शकतात असा साधा प्रश्न त्यांनी विचारला आहे

हे समजले नाही. का नाही करू शकणार? जसे ५४५ + राष्ट्रपती नियुक्त २ असे ५४७ सदस्य हजर राहून चर्चा (किंवा जे काही करतात ते) करू शकत असतील तर मग ८००+ सदस्य तेच करू शकणार नाहीत याला आधार काय? शशी थरूर यांच्या मते सभागृहात किती सदस्य असतील तर ते चर्चा करू शकतील? ते ठरवायचा मापदंड कोणता? त्यासाठी कोणता गणिती फॉर्म्युला वगैरे आहे का की शशी थरूर यांचे ते सब्जेक्टिव्ह मत?  

 

तसेच समप्रमाणात सर्व राज्यांच्या जागा वाढवण्यासाठी पाठींबा देणारे प्रादेशिक पक्षही लबाड आहेत. आजच्या ४० च्या जागी ६० मतदारसंघ झाले तर आणखी २-४ आपले खासदार वाढले, एखादं जातीसमूहाचं समीकरण साधलं तर त्यांनाही तेच हवय.

याचे कारण भारतीय मतदारच लबाड आहेत आणि ते लबाड लोकांना निवडून देतात. तसे वाटत असेल तर मग लोकशाहीच रद्दबादल करा आणि मग कोणाला निवडून द्यायचे ही कटकटच कायमची बंद करा. तसे करायचे नसेल तर मात्र आपण जी पध्दत अंगिकारली आहे त्या पध्दतीत जे अपेक्षित आहे ते करायला हवे. 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

1) दोन मुद्दे एकत्र केले आहेत हे मान्य आहे. याचे कारण लोकसभेच्या जागा वाढवणारे विधेयक पास व्हावे याकरता जेवढे प्रयत्न विद्यमान सत्ताधारी करत आहेत तेव्हढेच प्रयत्न जर आर्थिक आणि अन्य सुधारणा करण्यास केले तर आपला खरोखर फायदा होईल, त्यामुळे तशी यादी मी दिली आहे.

2)   An oversized legislature where the vast majority of members have no voice suits an executive that prefers compliance over scrutiny. When a Parliament becomes too large to debate, it naturally cedes its oversight power to the executive cabinet. The individual lawmaker loses leverage, and the House is reduced to a notice-board and a rubber-stamp. शशी थरूर

 सभागृहात किती सदस्य असावेत याचा objective criterion नाही हे मान्य आहे पण म्हणुन आहेत त्यापेक्षा वाढवायचा आग्रह कशाकरता. विद्यमान नेतृत्वाला एक मोठा दणदणीत गाजावाजा करणारा पण फार काही करणाया कायदा आणायची सवय लागली आहे असे वाटत आहे.

3) भारतीय  मतदार लबाड आहे आणि त्यातुन एक दुष्टचक्र सुरु झाले आहे हे सत्य आहे. या खुळ्यांच्या बाजारात मला तरी काही स्थान नाही हे पण मला मान्य आहे. 


In reply to by केदार भिडे

लोकसभेच्या जागा वाढवणारे विधेयक पास व्हावे याकरता जेवढे प्रयत्न विद्यमान सत्ताधारी करत आहेत तेव्हढेच प्रयत्न जर आर्थिक आणि अन्य सुधारणा करण्यास केले तर आपला खरोखर फायदा होईल, त्यामुळे तशी यादी मी दिली आहे.

मी पण मिल्टन फ्रीडमन, हायेक, व्हॉन मिजस वगैरे उजव्या बाजूच्या विचारांचाच आहे. हा मुद्दा अगदी पूर्ण मान्य. पण लोकशाही पध्दतीत निर्णय घेताना काही मर्यादा येतात. आर्थिक सुधारणा करायच्या म्हणजे सगळ्या सबसिड्या काढायच्या, कर कमी करायचे, सगळ्या पी.एस.यू मधून डिसइन्व्हेस्टमेंट करायचे आणि सरकारने सगळ्या प्रकारच्या अर्थकारणातून अंग काढून घ्यायचे हेच अभिप्रेत आहे ना? पण लोकशाही पध्दतीत ते कसे करणार? आतापर्यंत सवय झालेली आहे त्या सबसिड्या काढल्या तर देशभर आंदोलने होतील आणि हिंसाचार होईल. मग आपल्याच लोकांवर गोळ्या घालणार आहोत का आपण?काही ठिकाणी ते केले जाईलही पण सरसकट घाऊक प्रकारे तसे करायला आपण चीन नाही. इतकी टोकाची प्रतिक्रिया उमटली नाही तरी मग पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष 'आम्ही सबसिड्या परत देऊ' हे आश्वासन घेऊन आला की मग सगळेच ओम फस होणार. मग आर्थिक सुधारणाही नाही आणि सत्ताही नाही. 

अटलबिहारी वाजपेयींनी ती चूक केली. त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक धोरणे नक्कीच चांगली अवलंबली होती आणि देशाचे हित कशात आहे याचाच विचार करून निर्णय घेतले. पण त्यातून झाले काय? देशासाठी हिताची धोरणे ही लोकप्रिय असतीलच असे नाही- बहुतेक वेळा नसतातच. मग त्यातून झाले काय? तर २००४ ते २०१४ मध्ये झालेला सावळागोंधळ डोक्यावर बसला. 

मग यातून मार्ग कसा काढायचा? भारतासारख्या देशात सबसिड्या, गरीबी निर्मूलन वगैरे वगैरे प्रकार निदान आपल्या जन्मात तरी जाणार नाहीत. मग त्यातल्या त्यात काय करता येईल ते बघायचे. मग डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर करून मध्यस्थ काढून लोकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करणे हा त्याचाच भाग. मग त्यातून मधल्या मधे पैसे हडप केले जायचे ते निदान काही प्रमाणात तरी कमी झाले? जी.एस.टी हा पण क्रांतिकारी बदल नाही का? आय.बी.सी हा पण क्रांतिकारी बदल नाही का? चाचा चौधरींसारखे लोक काहीही बोलू देत की ९०% हेअरकट घेऊन १०% च कर्ज वसूल झाले. पण आधी मुळात कर्ज ज्यांना द्यायला नको होते त्यांनाच दिले असेल तर मग सगळे बुडीतखाती जाऊन ०% मिळण्यापेक्षा १०% तर १०% मिळतील तितके घेतले तर त्यात काय वाईट? हे सगळे करताना मतदारांना खूष ठेवणेही गरजेचे आहे. कारण परत २००४ सारखे झाले तर मग सगळेच मुसळ केरात. 

भराभर आर्थिक सुधारणा व्हाव्यात असे मलाही वाटते. पण ते आपल्यासारख्या देशात होणे नाही. त्यातही सत्ताधारी आणि विरोधी दोघेही अशा सुधारणा करायच्या बाजूचे असतील तर मग हे सगळे करणे त्यामानाने बरेच सोपे. पण तसे आपल्याकडे आहे का? मग काय करायचे? आर्थिक सुधारणा करायच्या मागे जायचे आणि सत्ता गमावून जी काही प्रगती केली आहे ती सगळी नलीफाय होऊन आणखी अधोगती होत असलेली हतबलपणे बघायची की आर्थिक सुधारणा करायच्या पण त्या ब्रेक लाऊन आणि त्याचबरोबर मतदारांनाही खूष ठेवायचे?

 


उत्तम लेख. महिलांना राखीव जागा ठेवण्याचे निमित्त करून वर्तमान मतदारसंघांची पुनर्रचना करून स्वपक्षाला अनुकूल असे नवीन मतदारसंघ निर्माण करणे हा हेतू दिसतो. २०२४ मध्ये अनपेक्षित धक्का बसल्याने भविष्यात असे धक्के टाळण्यासाठी हा खटाटोप आहे. यासाठी करदात्यांच्या पैशांची नासाडी होणार. 

 

जर महिलांना राखीव जागा ठेवण्याचा प्रामाणिक हेतू असेल तर आहे त्या संख्येतच महिला राखीव मतदारसंघ ठेवता आले असते. लोकसंख्या वाढीमुळे मतदारसंघ वाढवायचे या कारणात काहीही अर्थ नाही कारण लोकप्रतिनिधी वाढवून जनतेला कणभरही लाभ होणार नाही. किंबहुना आहेत ते मतदारसंघ कमी केले तरीही जनतेचे कणभरही नुकसान होणार नाही.

 

आज द्रमुक, शप गट इ. या विधेयकाला पाठिंबा द्यायला निघालेत. पुढील निवडणुकीपासून त्यांची संख्या संकुचित होईल तेव्हा डोळे उघडतील, पण त्यावेळी उपयोग होणार नाही. दिडपट लोकप्रतिनिधी झाले तर जनतेला होणारा त्रासही दिडपट होईल हे नक्की. नवीन लोकप्रतिनिधी होणाऱ्या बहुसंख्य महिला वर्तमान नेत्यांच्याच कुटुंबातील असणार.


In reply to by श्रीगुरुजी

सरकारची अशी योजना आहे असे मी म्हटलेलो नाही आणि  मला तसे शक्य आहे हे वाटत नाही. लोकसभा मतदारसंघ मोठ्या भुभागावर पसरलेले आणि मोठ्या लोकसंख्येचे आहेत. त्यात जाती, व्यवसाय, अशा कितीतरी छेद देणाऱ्या विविधता आहेत. विरोधासाठी विरोध करणाऱ्यानी हा एक बागुलबुवा उभा केलेला आहे पण मी निव्वळ विरोधासाठी विरोधी करणाऱ्यात नाही. 


In reply to by केदार भिडे

पुनर्रचना करून आपल्याला सोयीचे मतदारसंघ निर्माण करणे शक्य असते. भूतकाळात अशी उदाहरणे आहेत.

 

२००९ मध्ये खेड मतदारसंघातील काही भाग व आजूबाजूचे इतर कही भाग गुहागरला जोडले. २००४ मध्ये खेडमधून शिवसेनेचे रामदास कदम व गुहागरमधून भाजपचे डॉक्टर सुहास नातू आमदार झाले होते. गुहागर तर सलग ५-६ वेळा भाजपने जिंकला होता. आता पुनर्रचनेनंतरच्या गुहागरवर शिवसेना व भाजप या दोघांनीही दावा केला. परंतु २००९ पासून आजपर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीत गेलेल्या भास्कर जाधवांनी जिंकला. जाधव नंतर शिवसेनेचेत परतले, परंतु भाजपला आजतागायत हा मतदारसंघ जिंकता आला नाही.

 

आसाममधील बारपेटा लोकसभा मतदारसंघ २०१९ मध्ये कॉंग्रेसने जिंकला होता. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी बारपेटातील ३ मुस्लिम बहुसंख्य विधानसभा मतदारसंघ धुब्री लोकसभा मतदारसंघाला जोडल्याने बारपेटातील मुस्लिम मतदार ६०% वरून ३५% झाले व परिणामी तेथे कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन आसाम गण परिषद जिंकली.  पण २००९ पासून सातत्याने धुब्री जिंकणारा स्थानिक मुस्लिम पक्ष हरला व कॉंग्रेस जिंकली कारण कॉंग्रेस समर्थक मुस्लिम मतदार बारपेटातून धुब्रीत आले. 

 

२००८ मध्ये अनेक लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली व कॉंग्रेसची संख्या १४५ वरून २०६ झाली हा योगायोग नाही. 

 

२००८ मध्येच कर्नाटकात चामुंडेश्वरी व नरसिपूर मतदारसंघातील काही भाग घेऊन वरूणा नावाचा नवीन मतदारसंघ निर्माण केला ज्यातून सिद्धरामय्या सातत्याने निवडून येत आहेत. 

 

२०२३ मध्ये आसामात अनेक विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करून ३ नवीन आदिवासी मतदारसंघ व १ नवीन अनुसूचित जाती मतदारसंघ निर्माण केला. २०२६ विधानसभा निवडणुकीत भाजपची संख्या ६० वरून ८२ झाली.

 

इतर राज्यातही अशी अनेक उदाहरणे आहेत.