Skip to main content

तू गंध फुलांचा...

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 20/11/2026 10:16 या दिवशी प्रकाशित केले.


तू गंध फुलांचा 
मनात माझ्या दरवळशी 
तू थेंब सरींचा 
मनात माझ्या झरझरशी.

भिरभिर का हे
वाऱ्यावर मन 
का मनी सारखी 
तुझी आठवण 
भान हरपते
स्वप्नात नांदते 
चाहूल तशी तू 
मनात माझ्या सळसळशी.

तू तुझ्या कुंतला 
सोडता मोकळे 
अंबरी वाटते 
हे मेघ दाटले 
काजळ लाली 
भरून आली 
तू रंग नभीचा 
मनात माझ्या पाझरशी.

 

https://youtu.be/SQZ6abjlfAs

 

काव्यरस
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 161
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता आणि गाणं मस्त जमून आलंय. 

सुरु ठेवा

 

-दिलीप बिरुटे


कविता वाचायला फार आवडली, पुन्हा पुन्हा वाचली. 

या कवितेवरील विडियो पण बघितला (तुमचे तिथले अन्य विडियोपण बघितले) परंतु मला तरी  ते  फार उथळ/बेगडी, पटापट बदलणाऱ्या विविध प्रतिमांची उगाचच केलेली भरमार असलेले वाटले. त्यातले गीत - संगीत सुद्धा अगदी सामान्य भासले. ते सर्व कृबु रचित आहेसे दिसते. 

कोणत्याही गीताला उत्तम संगीतकाराने दिलेली चाल, उत्तम वाद्यवृंद आणि उत्तम गायक याशिवाय तरणोपाय नाही, हे यातून समजते. तसेच अश्या चांगल्या गाण्यांचाही विडियो बनवणे हे त्याच तोडीच्या व्यक्तिने केले तर ठीक अन्यथा जे चांगले आहे, त्याचीही वाट लावणारे विडियोच हल्ली फार बनवले जात आहेत. 

याबद्दल धागाकर्त्याचे काय मत आहे, हे जाणून घ्यायला आवडेल.

तसेच आपल्या कवितांवर असे विडियो बनवण्यामागे हेतु काय आहे, याबद्दलही प्रांजळपणे लिहावे, असे सुचवतो.


अडीच मिनिटाच्या या विडियोत खूप दृष्ये पटापट बदलताना, कोसळून पडताना, फाटताना, चित्रविचित्र तऱ्हेने बदलताना  दिसतात. त्या दृष्यांचा त्या त्या  वेळच्या गीताच्या ओळींशी काही संबंध असलेला दिसत नाही. गायनात उगाचच कुठे सूर उंच चढवणे, कुठे खाली आणणे या खेळांचा शब्दातल्या भावनांशी कोणताही संबंध असलेला दिसत नाही. 

माफ करा, 'लाईक' करणे, वाहवा करणे अगदी सोपे असते, त्याला काहीच प्रयास (आणि अक्कलसुद्धा) लागत नाही. मला स्वत:ला माझ्या  चित्रांची तारीफ करणारांपेक्षा समीक्षा, टीका करणारे जास्त मोलाचे वाटतात, म्हणून हे लिहीण्याचा खटाटोप करतो आहे. घाईघाईने अनेक विडियो बनवून तूनळीवर टाकण्यापेक्षा एकाच विडियोत पुन्हा पुन्हा बदल करत, त्यात परिपूर्णता येईपर्यंत सातत्याने प्रयत्न करण्यातूनच एक उंची गाठली जाते. तसा प्रयत्न करावा असे सुचवतो. काही दर्जेदार विडियो हुडकून त्यांचा अभ्यास करावा. (अर्थात हल्ली ते दुर्मिळच आहे म्हणा) जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी दिग्दर्शकाने कशी चित्रित केली आहेत, त्याचा अभ्यास शकता. तसे केले तर मला कळवा.

कदाचित तुमच्या ओळखीचे लोक, मित्र यांचे शेकडो 'लाईक्स' मिळतील, पण समीक्षा करणारा एकादाच मिळतो, याचे महत्त्व तुम्हाला पटेल, अशी आशा करतो. 

बाकी कविता उत्तम आहेत, आणि त्या फक्त 'वाचण्यातच' त्यांची गोडी आणि सौंदर्य आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. 


In reply to by चित्रगुप्त

चुका दाखवणारं कुणी असेल तरच आपण सुधारणा करू शकतो. तुम्ही स्पष्ट मत मांडलेत त्याबद्दल मन:पूर्वक आभार.