ही आडनावामुळे झालेली एक गंमतीदार सरमिसळ आहे.
मी १९८९ साली दोन महिने - १ जानेवारी ते १ मार्च असा लखनऊ येथे मेडिकल ऑफिसर्स बेसिक कोर्स (MOBC) यासाठी दाखल झालो होतो. आपले एमबीबीएस पूर्ण झाल्यावर इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर हा कोर्स असतो.
यात नवीन डॉक्टरांना लष्करी तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे, युद्धाचा सराव, लष्करी वैद्यकीय सेवेचे प्रारूप, भारतभर आणि भारताच्या बाहेर त्याचे काम कसे चालते याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय तेथे परेड, शारीरिक शिक्षण, विविध खेळ, लष्करी परंपरा आणि शिष्टाचार, विविध गणवेश आणि ते घालण्याचे प्रसंग या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. अगदी काट्या-चमच्याने कसे जेवावेपासून रुबाबदार दिसण्यासाठी चालावे कसे, विविध प्रसंगात वागावे कसे असा भरगच्च कार्यक्रम होता.
त्यातून आम्ही ९ जण नौदलात,- १७ जण वायुदलात आणि ७० जण भूदलात भरती होऊन आमच्या इंटर्नशिपसाठी भारतभर विविध लष्करी रुग्णालयात काम करत होतो. बाकी काही जण बाहेरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करून आलेले होते. एक कॅप्टन चिंतामणी तर एमएस सर्जन होता आणि भरती झाल्यावर त्याला थेट श्रीलंकेत पाठवण्यात आले होते. त्यामुळे त्याचा कोर्स करायचा राहून गेला होता.
नौदलात भरती झालेल्या ९ जणांपैकी आम्ही पाच जण मुंबईत कुलाब्याला अश्विनी या ८२५ खाटांच्या मोठ्या रुग्णालयात काम करून आलो होतो. एक वर्ष इंटर्नशिपनंतर आमचे सर्व वर्गमित्र परत भेटणार होते, यामुळे आम्ही सर्व फार आनंदात होतो. पण कोर्स सुरू झाला, तेव्हा 'घी देखा पर बडगा नही देखा' अशी स्थिती झाली. ज्यांनी 'प्रहार' हा सिनेमा पाहिलेला आहे, त्यांना याची थोडीफार कल्पना येईल.
आमचा कोर्स कमांडो कोर्सइतका कठीण नव्हता. पण ३० मिनिटांत ५ कि.मी. धावणे फार कठीण जात असे. अर्थात आमच्या वर्गात उत्तम धावणारे पंचवीस मिनिटांत हे पूर्ण करत असत. याशिवाय स्टँडिंग ब्रॉड जम्प, ९ फीट डिच (हे म्हणजे ९ फूट लांबीचा खंदक खणून त्यात वाळू भरलेली असते, या वाळूची पातळी एक फूट खाली असते आणि त्याच्या काठाने घट्ट लाकडाचा सांगाडा असतो आणि लांबून धावून ९ फूट पार करताना थोडी चूक झाली, तर पायाच्या नडगीवर त्या लाकडाचा ओंडका लागून मस्तकात कळ जाते. दोरावर इकडे चढून आडवे जाऊन तिकडन खाली उतरायचे असे.)
ज्या मित्रांनी एक वर्ष इंटर्नशिपमध्ये अंगावर 'चरबी' चढवून घेतली होती, त्यांचे सुरुवातीला फार हाल झाले. बिअर पिऊन पोट वाढलेल्यांचेही फार हाल झाले. कारण पोट वाढल्यामुळे दोरावर चढून पाय 'वर' घेऊन आडवे होण्यासाठी त्यांना फार त्रास होत असे.
आमच्या वर्गातील २२ मुलीसुद्धा या कोर्समध्ये होत्या. त्यांच्या धावण्याच्या वेळात किंवा इतर शारीरिक स्पर्धात वेळाची झालेली वाढ याकडे तेथील उस्ताद कानाडोळा करत असत. अर्थात याबद्दल कुणी वाईट वाटूनही घेतले नाही. पण कोर्सच्या शेवटी या सर्व मुली अंगावर वाढलेली सर्व चरबी झडून जास्त आकर्षक दिसू लागल्या होत्या, हे मान्य करावे लागेल. या सर्व मुली आमच्याबरोबर एमबीबीएस केलेल्या होत्या. त्यातून काही मुलामुलींची वर्गातच कॉलेजपासून प्रेमप्रकरणे होती. त्यापैकी काहींची लग्नेही झाली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर एक तऱ्हेचा मोकळेपणा होता.
एक बिचारी दंतवैद्यक करून आली होती. नवीन असल्यामुळे तिला जास्त चिडवाचिडवीला सामोरे जावे लागे. कुणी वर्गात मस्ती केली किंवा चावटपणा केला किंवा नियमबाह्य काही केले की आमचे इन्स्ट्रक्टर कोणी मस्ती केली विचारत असत की हमखास कुणीतरी "८४ नंबरने" म्हणून सांगत असे. हा तिचा अनुक्रमांक होता.
एक उदाहरण देतो. आमचे एक निरीक्षक कर्नल ओ' लिअरी यांनी एकदा परेडच्या सुरुवातीला आम्हाला सांगितले, "You have come to the apex institute of AMC (Army medical corps). Your "turn out" has to be exemplary. your shoes should be shining. I want to see my face in it."
आमच्या गटात एक कॅप्टन चलपती राव म्हणून होता, तो मागच्या रांगेतून हळूच म्हणाला, "But I dont want to see your face in my shoe."
कर्नल ओ" लिअरी चा चेहरा लाल झाला. त्यांनी कडक आवाजात विचारले, "who said that?" परत मागून हळूच आवाज आला, "रोल नंबर ८४."
त्यांनी परत विचारले, "रोल नंबर ८४ कोण आहे?" तर त्या दंतवैद्य मुलीने हात वर केला.
कर्नल ओ' लिअरी यांच्या लक्षात आले की हा सगळा चावटपणा आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मुळात मुंबईच्या गुलाबी थंडीतून लखनऊच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत जाणे जिकिरीचे होते. त्यातून सकाळी ६ वाजता शारीरिक शिक्षणासाठी लखनऊच्या थंडीत आपल्या स्कूटरने परेड ग्राउंडवर जावे लागे. ज्यांनी स्कूटर आणली नव्हती, त्यांच्यासाठी बसची सोय होती. पण बस साडेपाच वाजता हजर होत असे आणि बरोबर पाच चाळीसला निघत असे. एवढ्या थंडीत पहाटेची पंधरा-वीस मिनिटे झोपेची फार मूल्यवान असत. मी माझी स्कूटर रेल्वेत टाकून नेलेली होती, त्यामुळे या छोट्याशा झोपेचा आस्वाद घेता येत असे.
तेथून सात वाजता परत येऊन स्नान, नाश्ता उरकून परेडसाठीचा गणवेश घालून आठ ते दहा परेड ग्राउंडवर 'एक दो एक दो' करत परेड करणे, बंदूक चालवणे, बंदुकीची सफाई करण्यापासून बंदूक घेऊन परेड करण्याचा सराव, लष्करी अधिकारी किंवा पोलीस हातात काठी घेऊन चालतात, ती काठी घेऊन त्याच्यासकट सॅल्यूट करणे, परेड करणे इ. सर्व समारंभाच्या परेडचा सराव इ. सर्व चालत असे.
हे झाल्यावर १० वाजता परत येऊन गणवेश बदलून चहा पिऊन १०.३० ते १ वर उल्लेख केलेल्या विविध विषयांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने होत असत. एक वाजता परत येऊन जेवण असे. २ ते ४ परत अशीच व्याख्याने असत, जेव्हा भयानक झोप येत असे. चार वाजता परत येऊन चहा पिऊन पाच ते सहा खेळासाठी जात असू. अर्थात यात आपल्या आवडीच्या कोणत्याही खेळात भाग घेता येत असे. साडेसहा वाजेपर्यंत परत येऊन सात वाजता मेसमध्ये सर्व जमत असू. तेव्हा बार उघडत असे, त्यामुळे सर्व जण श्रमपरिहार करण्यासाठी आपआपले ग्लास घेऊन बाहेरच्या हिरवळीवर बसत असू. आठ-साडेआठवाजेपर्यंत जेवणे उरकून सगळे नऊपर्यंत निद्रेच्या अधीन होत असत.
या सर्व अभ्यासक्रमात एक कर्नल जोहरी म्हणून अत्यंत खडूस चेहऱ्याचा इन्स्ट्रक्टर होता. मंगेश पाडगावकरांच्या भाषेत 'तिकडे' जावे लागणार म्हणून हातात तांब्या धरून तिष्ठत उभा असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जसा त्रासिक भाव असतो, तसा या माणसाच्या चेहऱ्यावर भाव होता. पूर्ण कोर्समध्ये या माणसाला मी कधी हसताना पाहिले नव्हते.
एक दिवस सकाळी आठ वाजता परेडला आल्यावर मला एक चिठ्ठी आली की आपल्याला कर्नल जोहरी यांच्या कार्यालयात दहा वाजता बोलावले आहे. मी बराच वेळ विचार करत होतो की अशी 'पेशगी' होण्यासाठी मी काही गडबड केल्याचे मला आठवत नव्हते. दोन तास विचार करून डोक्याचा भुगा झाला. शेवटी 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने मी तयार झालो आणि नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हजर झालो.
हे कार्यालय लखनौच्या ए एम सी सेंटरच्या कमांडंटच्या कार्यालयाला लागूनच होते. लष्करात बहुसंख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सहा फुटी आरसा लावलेला असतो. कमांड हॉस्पिटल पुणे येथे त्या आरशाखाली लिहिलेले होते - AM I LOOKING SMART? यामुळे काय होते की घराबाहेर पडताना आपला गणवेश व्यवस्थित आहे ना, हे पाहण्याची सवय लागते. ती सवय आजतागायत आहे.
असो. मी आपल्या नौदलाच्या पांढऱ्यास्वच्छ गणवेशात टोपी घालून उभा होतो. वय चोवीस, पाच फूट साडेदहा इंच उंची, वजन ५५ किलो, गोरा वर्ण, सडपातळ बांधा.
आजूबाजूच्या हिरव्या आणि खाकी गणवेशात नौदलाचा पांढराशुभ्र गणवेश नेहमीच उठून दिसत असे. आम्ही वायुदलाच्या आणि भूदलाच्या वर्गमित्र ऑफिसर्सना चिडवत असू. "To look smart" officers have to make efforts and some simply join Indian navy."
असो. आत्मप्रौढी बाजूला ठेवू.
ठीक दहा वाजता मी दार ठोठावून आत येण्याची परवानगी मागितली. आणि काय आश्चर्य! कर्नल जोहरी यांनी अगदी या कानापासून त्या कानापर्यंत हसत माझे स्वागत केले मला समोर बसण्यासाठी सांगितले. मला समजेना की हा माणूस हसू शकतो?
त्यांनी "चहा घेणार का?" विचारले. मी अर्थात चहा घेऊनच आलो होतो, त्यामुळे मी नकार दिला.
पाच मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कोर्स कसा चालू आहे, मेसमध्ये सोयी व्यवस्थित आहेत ना अशी जुजबी चौकशी झाली.
मग त्यांनी माझी चौकशी सुरू केली.
कर्नल - तू कुठला आहेस?
मी - मुंबईचा!
कर्नल - वडील कुठले आहेत?
मी - मुंबईचे!
कर्नल - आजोबा मूळचे कुठले आहेत?
मी - आमच्या आजोबांनी १९२५ साली मुंबइतून मॅट्रिकची परीक्षा पास केली होती.
काहीतरी चूक होते आहे, असे समजून त्यांनी परत विचारले, "तू उत्तर प्रदेशचा नाहीस?"
मी - नाही सर. आमचा उत्तर प्रदेशाशी काहीच संबंध नाही.
कर्नल - तू उत्तर प्रदेशचा कायस्थ नाहीस?
मी - नाही सर, मी मुंबईत स्थायिक असून महाराष्ट्रीयन आहे. आमचे मूळ गाव कोकणात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात गुहागर म्हणून, पण तेथे आमचे कुणीच नाही. आणि मी कायस्थ नसून कोकणस्थ ब्राह्मण आहे.
हे ऐकल्यावर त्यांनी "अच्छा, ठीक आहे, या आता" म्हणून माझी बोळवण केली.
मला समजेना त्यांना नक्की काय हवे होते?
मी बाहेर आलो, तर बाहेर कॅप्टन शिशिर खरे नावाचा आमचा कोर्समेंट तेथे माझी वाट पाहत होता. त्याने आत काय झाले याचे साद्यन्त वर्णन अगदी खोदून खोदून विचारले. मी त्याला इत्थंभूत माहिती सांगितली आणि म्हणालो, "कशाला फुकटचे बोलावले होते, ते समजले नाही."
त्यावर शिशिर खरेने सांगितले की एका ब्रिगेडियर जोहरी (उत्तर प्रदेशचा कायस्थ) नावाच्या अधिकाऱ्याची मुलगी लग्नाची होती. त्यासाठी हे वरसंशोधन चालू होते. येथे आलेले सर्वच अधिकारी लष्करात डॉक्टर म्हणून रुजू झालेले होते. करियर नक्की होते. लग्न झालेले सोडून सर्वच 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' या श्रेणीतील होते. फक्त कायस्थ समाजातील मुले शोधणे (आडनावामुळे हे अगदीच सोपे होते), म्हणून आमच्या १०४ जणांच्या कोर्समध्ये लष्करात कॅप्टन हुद्द्यावर असलेल्या डॉक्टर मुलांमधील सक्सेना, जोहरी, खरे, माथुर, श्रीवास्तव, कुलश्रेष्ठ इ. समस्त कायस्थ लोकांमध्ये चौकशी चालू होती. त्यातील पात्र / लायक असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांशी नंतर संपर्क साधायचा, अशी ही योजना होती. आमच्या कोर्समध्ये दोन सक्सेना, एक जोहरी, दोन श्रीवास्तव, एक खरे (शिशिर खरे), एक माथुर आणि एक कुलश्रेष्ठ इतके 'कायस्थ' मोस्ट एलिजिबल बॅचलर' श्रेणीतील होते.
शिशिर खरेला या प्रकरणाचा 'वास' लागल्यामुळे त्याने 'कॅप्टन एस. (शिशिर) खरे'च्या जागी 'सर्जन लेफ्टनंट एस. (सुबोध) खरे'चे नाव घुसडले होते.
ते ऐकून मी कपाळाला हात लावला आणि शिशिरला शिव्याही दिल्या. त्याच्या या चावटपणापायी दोन तास माझ्या डोक्याचा भुगा झाला होता.
पुढे तीन वर्षांनी मी एमडी करायला एएफएमसीला गेलो, तोसुद्धा तेथे सर्जरीत एमएस करायला आलेला होता आणि याची आठवण काढून आम्ही परत एकदा हसलो.
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणूनच मला असे नेहमी वाटते…
म्हणूनच मला असे नेहमी वाटते की आपल्याकडे नोकरीसाठीच्या मुलाखती चुकीच्या घेतात.
उमेदवारांना एक क्रमांक, टोकन नं. द्यावा.
मुलाखतकार अन उमेदवार दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसवावे. माईक अन स्पिकर वर पहिले राऊंड घ्यावेत. मग शेवटची मुलाखत घ्यावी अन तिला अतिशय कमी मार्क असू द्यावेत.
जात, रंग, रूप, आवाज, वेशभुषा इत्यादी गोष्टी कामाच्या बाबतीत महत्वाच्या नाहीत. (काही पदे वगळता.)
अन तसेही आपण पाहतो की आहे त्या पदांना कित्येक विजोड माणसे कमाला असतात. काही गुण आवश्यक असतांनाही नसलेल्यांची वर्णी तेथे लागलेली असते.
ते कसे?
मजेशीर आठवणी! सैन्यात…
मजेशीर आठवणी! सैन्यात वेळप्रसंगी डॉक्टरांना सुद्धा हातात शस्त्र घेऊन लढावे लागते का?
प्रत्यक्ष लढावे लागले नाही…
In reply to मजेशीर आठवणी! सैन्यात… by श्रीगुरुजी
उत्तरेतही चित्पावन ज्ञातीची…
उत्तरेतही चित्पावन ज्ञातीची मंडळी कैक पिढ्यांपासून वास्तव्य करून आहेत. खरे हे कुलनाम उत्तरेतल्या कायस्थांमध्येही आढळते ही नवीन माहिती मिळाली. माजी सरन्यायाधीश खरे हे मूळचे मराठी असावेत असा आजपर्यंत माझा समज होता.
लेख अर्थातच नेहमीप्रमाणे खुसखुशीत.
हा हा हा !! मजेदार किस्सा…
हा हा हा !! मजेदार किस्सा.
माझ्या बाबतीतही असा न खाल्लेला कांदेपोहे कार्यक्रम झाला होता. त्यावेळी मी झारखंड (नुकतेच बनले होते तसे पुर्वाश्रमीचे बिहार) मधे कार्यरत होतो. तिकडे तर तगडी सरकारी नोकरी असेल तर "पकडौवा ब्याह" सर्रास चालायचे. आता माहीत नाही. खाजगी संस्थानात नाही पण सरकारी / निमसरकारी व जुण्या मोठ्या कंपण्यांमधे उच्च पदावर कार्यरत असलेले नेहेमी असे होतकरु तरुण हेरत असतात.
आमच्या वर्गातील "भूमिहार"…
In reply to हा हा हा !! मजेदार किस्सा… by चबुगबाळे
आमच्या वर्गातील "भूमिहार" बिहारी मुलांना पटना एक्स्प्रेस किंवा कलकत्ता मेलने सुटीवर जाताना त्यांचे भाऊ किंवा वडील( बऱ्याचदा सशस्त्र) एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षानंतर मुघलसरायला "न्यायला" यायचे.
उगाच "उठवा दिया" व्हायला नको.
बऱ्याचशा बिहारी मुलांचे इंटर्नशिप होईपर्यंत विवाह झाले होते किंवा ठरले तरी होते. तिकडे विवाह फार लवकर होत असत अगदी बालविवाह सुद्धा. लग्न झाल्यावर मुलगी परत माहेरीच राहत असे. मुलगी मोठी झाली कि मग "गौना" करून मुलीला सासरी नांदायला पाठवायची पद्धत होती.
एवढेही नावाला जागू नये माणसानं
किस्से मजेदार आहेत. छान आठवणी जागवल्या पण
खरे साहेब इतकही खरं बोलण्याची गरज नव्हती हो.
कंदाचित मूुलगी आवडलीही असती......
खरं खरं सांगा
तेविसाव्या वर्षी ? ते सुद्धा…
In reply to एवढेही नावाला जागू नये माणसानं by मारवा
तेविसाव्या वर्षी ?
ते सुद्धा एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीसाठी?
उगाच विषाची परीक्षा कशाला घ्यायची?
कायम उपाशी असल्यासारखे वागायला आम्ही काय एन डी ए मधून पास झालेलो नव्हतो.
चांगला मेडिकल कॉलेजात मुलींच्या सहवासात छान काळ गेलेला होता.
माफ करा,स्वताला करारी......
In reply to तेविसाव्या वर्षी ? ते सुद्धा… by सुबोध खरे
माफ करा,स्वताला करारी सिद्ध करण्यासाठी दुसर्यांना
बेकरारीचे लेबल चिकटवणे उचित नाही असे वाटते.
एन डी ए मधले उपाशी मेडिकल काॅलेजातले पोट भरलेले विधान करून एन डी ए आणी मेडिकल काॅलेज मधल्या मुला मुलींचे चिरहरण करणे योग्य नाही.
आठवणी जागल्या...
आपण नामनिर्देशित केले अधिकार माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यावेळेस सेंटर मधेच कार्यरत होतो.
मस्त आठवण.
शिकार आणी शिकारी सर्वत्र हजर असतात. एवढेच म्हणतो.....
गमतीदार आठवण आवडली
नावाच्या सरमिसळीमुळे झालेला अप्रतिम किस्सा! लष्करी प्रशिक्षणाचा शिस्तबद्ध आणि भारदस्त माहोल, त्यात इन्स्पेक्टरचे अचानक बदललेले वागणे आणि शेवटी उलगडलेले गुपित सगळेच अगदी चित्रपटातील प्रसंगासारखे!
खुसखुशीत मजेदार. एक वेगळं जग…
खुसखुशीत मजेदार. एक वेगळं जग दाखवणारा लेख. मलाही मारवा यांच्यासारखंच वाटतं की एकदा बघून घ्यायला हवी होती मुलगी. ;-)
मजेशीर आठवणी... एकंदरीत…
मजेशीर आठवणी...
एकंदरीत कायस्थ नसल्याने वाचला म्हणायचं...
एकंदरीत कायस्थ नसल्याने…
In reply to मजेशीर आठवणी... एकंदरीत… by गणेशा
एकंदरीत कायस्थ नसल्याने वाचला म्हणायचं...
तेविसाव्या वर्षी अगदी माझ्या जातीचा असता तरी मी कशाला लग्नाचा विचार केला असता?
माझ्या इथलीच( मुंबई पुण्यातील) स्थळे काही कमी आलेली नव्हती. मुलगी आणि मुलीचा बाप डॉक्टर आहे आणि त्यांचे हॉस्पिटल आहे पासून मुलीचा बाप लष्करातच कर्नल आहे आणि मुलगी मेडिकल कॉलेजला आहे अशी स्थळे काही कमी आलेली नव्हती. कारण १९८९ साली कायम सरकारी नोकरी असणे हा मोठा मुद्दा होता.
त्याशिवाय मुलगा लष्करात आहे म्हणजे सासू सासरे जवळ राहणार नाहीत हा मुलींच्या दृष्टीने तेंव्हा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता हे प्रत्यक्ष जेंव्हा स्थळे पाहायला सुरुवात केली तेंव्हा समजून आले.
माझ्या विवाहाची कहाणी हि छोटीशी लेखमाला पण मिपावरच लिहिलेली आहे.
https://www.misalpav.com/story/30934
लगेच ते सर्व भाग वाचून काढले
In reply to एकंदरीत कायस्थ नसल्याने… by सुबोध खरे
लगेच ते सर्व भाग वाचून काढले
सैन्यातही जातीपातीचा पगडा आहे तर...
सैन्यात जात पात नसते असा एक भाबडा समज आहे, परंतु तिथेही कितीही शिकले सवरलेले लोक असले तरी त्यांच्या मनात जात पुरेपूर भिनलेली आहेच. अर्थात त्याचा पूर्ण दोष त्यांना देता येणार नाही, आपला समाज असाच आहे याची जाणीव झाली. बाकी किस्सा मजेदार वाटू शकतो.
परंतु तिथेही कितीही शिकले…
परंतु तिथेही कितीही शिकले सवरलेले लोक असले तरी त्यांच्या मनात जात पुरेपूर भिनलेली आहेच.
वैयक्तिक आयुष्यात जात न मानणारे लोक जगात कुठेही सापडणार नाहीत.
मग ती जात जन्माधारित असो कर्मधारीत असो किंवा प्रदेशाधारित.
हे वसुधैवकुटुम्बकम वगैरे सार्वजनिक आयुष्यात ठीक असतं.
जेंव्हा आपण आपल्या माणसांपासून लाम्ब असतो तेंव्हा आपली संस्कृती हि आपल्याला जास्त प्रकर्षाने आठवते.
महाराष्ट्राच्या बाहेर माणसं जास्त उत्साहाने मराठी सण साजरे करतात.
प्रेम विवाह झाला नाही तर मराठी माणूस कशाला मल्याळी किंवा पंजाबी मुलीशी लग्न करायला जाईल?
जाती/ धर्म / प्रदेशा बाहेर लग्न केले तर जास्त प्रमाणात तडजोड करावी लागते हि वस्तुस्थिती. यात शाकाहारी मांसाहारी यात पण वाद होऊ शकतो.
स्वतःच्या घरात माणसाने कसे वागावे याबद्दल कोणताही मापदंड नाही.
त्याला जातीयवादाची झालर देण्याची आवश्यकता नाही.
माझा मिश्र जातिविवाह (ठरवून) आहे. माझ्या मुलीने पंजाबी क्षत्रिय मुलाशी प्रेमविवाह केला आहे. त्यावर घरात एकदा सुद्धा वाद झाला नाही. मुलगा उत्तम शिकलेला आहे, मुलीला आवडला आहे एवढे पुरे आहे.
रशिया आणि युक्रेनची लढाई चालू आहे त्यात रशियाने युक्रेनच्या कोणत्या भागावर ताबा मिळवला आहे "रशियन वंशाचे" लोक बहुसंख्येने असलेल्या.
बेलारूस रशियाला बिनशर्त पाठिंबा का देतो. तेथील लोकसंख्या रशियन वंशाची आहे.
प्रत्येक ठिकाणी जातपात आणण्याची गरज नाही.
किस्साच मुळी जातीबाबतच्या घोटाळ्याबद्दल आहे.
In reply to परंतु तिथेही कितीही शिकले… by सुबोध खरे
किस्साच मुळी जातीबाबतच्या घोटाळ्याबद्दल आहे आणि आपण म्हणता:
>> प्रत्येक ठिकाणी जातपात आणण्याची गरज नाही.
अवघड आहे.
जात हे आपले वर्तमान वास्तव आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. आता कुठे उरली आहे जात आणि जातीभेद म्हणणाऱ्यांच्या हे लक्षात आले तरी खूप झाले.
किती निरागस गंमत
In reply to परंतु तिथेही कितीही शिकले… by सुबोध खरे
शिवाय हा प्रसंग गमतीदार म्हणून लिहिलेला आहे. तुंम्हाला प्रमोशनची गरज असती आणि तो कोणी अधिकारी जर निवड अधिकारी असता आणि जात विचारून 'आपल्यातला नाही' म्हणून मार्गी लावले असते, तर हा किस्सा किती 'गमतीदार' झाला असता.
कसं आहे ना, ज्याला गरज नाही, जे प्रिव्हिलेज्ड किंवा एकाच बाजूने संवेदनशील असतात, त्यांना यात 'निरागस गंमत' दिसते. चालू द्या.
लष्करात जाती वर आधारित बढती…
In reply to किती निरागस गंमत by स्वधर्म
लष्करात जाती वर आधारित बढती मिळाल्याचे १८ वर्षाच्या माझ्या मर्यादित अनुभवात मी कधीही पाहिलेले नाही.
बढतीचे निकष काटेकोर असतात आणि त्यात वरखाली झाले तर त्याविरुद्ध दाद मागण्याचे निकष आणि नियम सुद्धा स्पष्ट आहेत.
मी स्वतः लष्कराविरुद्ध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात साडे तीन वर्षे लढत दिली आहे पण त्यामुळे माझ्या वर अन्याय झाला/ केला गेला असे झाले नाही आणि मला व्हिक्टीम कार्ड खेळण्याची गरज वाटली नाही. नागरी जीवनापेक्षा लष्करात लोकशाही जास्त आहे असे मी ठामपणे म्हणेन.
लष्करात बढतीची प्रक्रिया कशी असते याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असे स्पष्ट दिसते आहे आणि आपला पूर्वग्रह सुद्धा दिसून येतो.
कुठेही जात आणणे हा आपला स्थायीभाव झालेला आहे त्याच बरोबर व्हिक्टीम कार्ड सुद्धा.
चालू द्या
तुंम्हाला प्रमोशनची गरज असती आणि तो कोणी अधिकारी जर निवड अधिकारी
In reply to किती निरागस गंमत by स्वधर्म
तुंम्हाला प्रमोशनची गरज असती आणि तो कोणी अधिकारी जर निवड अधिकारी असता आणि जात विचारून 'आपल्यातला नाही' म्हणून मार्गी लावले असते, तर हा किस्सा.....
सैन्यात जातच काय धर्म सुद्धा बढती किंवा अन्य गोष्टी जसे कमांड,गोपनीय कामगिरी, विदेशी असाईनमेन्ट देताना विचारात घेतला जात नाही.
युनिट मधील धार्मिक कार्यक्रमात सामील होताना सर्वधर्मीय,(लौकिक दृष्टीने), एकत्र येतात.
प्रस्तुत लेखात केलेला जाती चा उल्लेख हा सर्वस्वी व्यक्तिगत पातळीवरचा आहे व त्याचा सैन्याशी काही एक संबध नाही. आपापल्या जाती रिवाज प्रमाणे विवाहसंबध जुळवणे हा प्रत्येकाच मुलभूत अधिकार आहे. इथे नामसाधर्म्यामुळे थोडा गोंधळ उडाला एवढेच काय ते. असा गोंधळ कुठेही उडून शकतो. काही घटना मलाही माहिती आहेत पण लिहिण्याची गरज वाटत नाही.
सैन्याबद्दल आपले भाबडे विचार हे अज्ञानातून निर्माण झालेले आहेत.
विषय न समजता सैन्य, सैनिकाच्या धर्म,जात वगैरेवर चर्चा करणे निरर्थक आहे. कृपया असे करणे टाळावे.
प्रतिक्रियेऐवजी लेखावर
In reply to तुंम्हाला प्रमोशनची गरज असती आणि तो कोणी अधिकारी जर निवड अधिकारी by कर्नलतपस्वी
तुमचे विचार आदर्श आहेत. सर्वसाधारणपणे सैन्यात जात पात पाळली जात नाही असाच समज आहे. परंतु लेखच मुळी केवळ जातीमुळे एका अधिकाऱ्याकडून मिळालेली विशिष्ट वागणूक यावर आहे. कारण खाजगी आहे व त्याचा कार्यालयीन कामाशी संबंध नव्हता, हे मान्य. त्यामुळे आपला अभिप्राय हा माझ्या प्रतिक्रियेपेक्षा लेखावर जास्ती योग्य आहे, असे नम्रपणे नोंदवत आहे.
केवळ जातीमुळे एका…
In reply to प्रतिक्रियेऐवजी लेखावर by स्वधर्म
केवळ जातीमुळे एका अधिकाऱ्याकडून मिळालेली विशिष्ट वागणूक.
हे आपल्याला कुठे दिसले.
आपला पूर्वग्रह काही जाणार नाही.
केवळ आडनावात साधर्म्यामुळे मला तेथे बोलावले गेले. यातून निर्माण झालेला एक केवळ विनोदी किस्सा आहे.
तेथे मला कोणतीही वाईट वागणूक मिळाली नाही.
त्यात आपल्या मुलीसाठी उत्तम स्थळ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाची कहाणी आहे. त्यातून हि कहाणी ३५ वर्षापेक्षा मागची आहे.
कोल्हापुर ची एक बातमी आठवली दलित मुलाला कुत्रा चावला. आता कुत्रा काय दलित कि सवर्ण पाहून चावला का?
पण मनात किल्मिष असले कि असेच सर्वत्र दिसू लागते हेच खरे.
भारीच आहे किस्सा.
भारीच आहे किस्सा. किस्सा सांगण्याची तुमची शैलीपण खास आहे.
लेख आवडला
पण "रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात गुहागर"
- हे चुकिचे आहे. गुहागर चिपळुण तालुक्यात येत नाही. आपले गुहागर पण तालुकाच आहे, अगदी पहिल्यापासुन.
- गुहागरला खरेही भरपुर आहेत. या एकदा वेळ काढुन :)
गुहागर तालुका आहे हे माहितीच…
गुहागर तालुका आहे हे माहितीच नव्हते. धन्यवाद.
आम्ही पण मूळचे गुहागरचे परंतु आमच्या खापर पणजोबांची शेती वाडी दाभोळला होती. आमच्या आजोबांची आई (पणजी) एकुलती एक होती त्यातून आजोबांच्या जन्मानंतर दोन तीन वर्षातच तिला वैधव्य आले . त्यामुळे ती आमच्या आजोबाना घेऊन कायमची माहेरी श्री क्षेत्र परशुराम येथे आली. त्यामुळे आमचा गुहागरशी संपर्क निदान १२५ वर्षांपूर्वीच तुटला.
श्री क्षेत्र परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर अजूनही उत्तम स्थितीत आहे.
मजेशीर किस्सा आवडला. शिशिर…
मजेशीर किस्सा आवडला. शिशिर खरेंनी सुद्धा चांगलीच हुशारी केली :)
अवांतर
किस्सा गंमतीदार आहे. लेखक कायस्थ नसल्याचं कळल्यावर खडूसाच्या चेहऱ्यावर ते भाव परतले का? असल्यास ते कसं दिसलं असतं याची कल्पना केली. मजा वाटली.
अवांतर : उत्तरेत खरे हे आडनाव कायस्थांत असतं हे पाहून नवल वाटलं.
-गा.पै.