मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
पूर सकाळची वेळ . संततधार पाऊस . पावसाला कंटाळलेलं धुरकट आकाश. उदास ! पण खाली नदीला पूर आला होता . धरणांमधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता . मुठेला उधाण आलं होतं . पूर बघायला हे गर्दी ! शनिवारवाड्याच्या समोर कट्टयावर ओळीने बसलेली माणसं . अनेक प्रकारची . अनेक ठिकाणची . भुकेलेली . काही कामाच्या शोधातली . काही थेट भिकारी . जगाने नाकारलेली सगळी फौजच जणू .त्यांचा तो रोजचाच अड्डा . कोरोना काळापासूनचा . पावसाने हवेत गारवा आणला असला तरी त्याने पोटातली आग काही विझत नाही . तीच आग विझवण्याच्या विवंचनेत असलेली ती गरीब बिचारी माणसं . पाऊस चालूच होता . नशीब त्याने थोडा जोर कमी केला होता . त्यातले काही जण फाटक्या छत्र्या घेऊन होते . काही फाटके रेनकोट ; तर काही तसेच भिजत . मळकट कपड्यांमध्ये. हरवलेल्या नजरेने इकडे तिकडे पहात . त्यांच्यामध्ये एक भिवा होता . तिशीतला असला तरी चाळिशीतला वाटणारा . तो खुरटी पांढरी दाढी खाजवत पाण्याकडे पहात होता . पुराच्या गढूळ पाण्याकडे पहात त्याच्या डोक्यात काहीतरी घोळत होतं .... शेजारी त्याचा मित्र होता . म्हातारा नाना . ' नाना , काय करायचं रे ? हे पोट कसं भरायचं ? ' भिवा त्याला म्हणाला . त्याचा हा रोजचाच सवाल . नाना तरी काय करणार ? तो गप्प बघत बसला . ' चल - जरा पलीकडे जाऊ , ' नाना म्हणाला . दोघे उठले आणि त्या दगडी, जुन्या पुलाच्या मध्यभागी पोचले . भिवा म्हणाला , ' नाना , जीवच द्यावा रे . नाहीतरी नदीला पाणी आलंय . ' नानाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं . तो म्हणाला , ' हं ! खरंय . खायला आज हाय तर उद्या नाय . ' ‘ नाही रे नाना , आज मी खरंच उडी टाकणारे ! नदीत - पुराच्या पाण्यात . ' आता मात्र नाना चमकला . 'काहीतरी बोलू नगं भिवा ! ' त्याला एकदम कसंसंच झालं . भिकारी असला तरी त्यालाही मन होतंच कि. त्यात त्याची ह्या भिव्याशी नुकतीच गट्टी जमलेली. . त्यांचं तोंड ओंकारेश्वराच्या पुलाच्या दिशेने होतं . भिवाने एकदम हातातली प्लॅस्टिकची पिशवी खाली टाकली आणि तो पुलाच्या कठडयावर चढला . कठडयावरून तो चालत पलीकडे जाऊ लागला . बस स्टँडच्या दिशेने . नाना ओरडला , ' ए , साल्या ! खाली उतर भोxxx ! लोकांचं लक्ष एकदम तिकडे गेलं आणि - भिवाने पाण्यात उडी टाकली की ! नाना ओरडला - ' भिवा ! .... अरे उडी टाकली उडी टाकली ! ' आणि तिथे गर्दी जमा झाली . त्या सगळ्या भिकाऱ्यांची . पुलावरून बस धरायला चाललेल्या माणसांची . आणि रस्त्यावरून बेभान चाललेल्या वाहतुकीचीही . कोणीतरी पाण्यात उडी टाकली होती आणि - आणि अर्थातच जीवाला कंटाळून . त्यात पुराचं पाणी . भिडे पूल पाण्यात गेला तरी लोकांसाठी बातमी होते ; तो जातोच . पण महापालिकेसमोरचा छोटा पूल जेव्हा पाण्यात जातो जेव्हा नदीला खूप पाणी सोडलेलं असतं . ज्याचा इशारा दिला जातो . नाहीतर नदीकाठाला बोंब ठरलेली . अशा त्या खतरनाक , गढूळ ,स्वतःशी वेटोळं घेत , स्वतःच्या नादात चाललेल्या पाण्यात उडी टाकायची म्हणजे ... भिवा जो पाण्याखाली गेला तो वर आलाच नाही . नाना पळत पुलाच्या पलीकडे गेला . तो वर आलाच नाही ! गेला ? ... लोक पाण्याकडे पहात होते . काळजीने , बेफिकिरीने . नानाच्या डोळ्यांत मात्र पाणी आलं - काय केलं या पोराने ! काही जण मात्र त्याही परिस्थितीत व्हिडिओ काढत होते . अन थोडा पुढे- भिवा वर आला . नानाला आशा वाटली - आला , आला वर . तो ओरडला ' अरे , त्याला कोणी घ्या रे वर ! काढा - वाचवा !' आणि गंमत ! ... भिवा छान वर आला आणि आत्मविश्वासाने हातपाय मारू लागला . तो पट्टीचा पोहणारा होता . पुरात पोहणं त्याला काही नवीन नव्हतं . गावाकडे तर तो यासाठी हिरोच होता . त्याने जरा गंमत केली होती . थोडंसं वेडंसं धाडस ! तो पोहत पुढे गेला आणि पाण्यात बुडालेल्या घोरपडे घाटापाशी जाऊन एका झाडाला धरून थांबला . आनंदाने . एखाद्या विजयी वीराच्या आवेशात . लोकांनी टाळ्या वाजवल्या . लोक जोमाने व्हिडिओ घेऊ लागले . तोही खूष लोकही खूष अन नानाही . मग एक दोर टाकण्यात आला आणि त्याला धरून तो पुढे बाहेर आला . अन वर परत पुलावर . लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं . एका माणसाने त्याला पाचशेची नोट दिली . ते बघून तो आणि नाना डबल खूष . आज खायची चंगळ होती ! त्यांनी त्या दिवशी ऐश केली . खाऊन पिऊन मजा . नाना म्हणाला , ' भिव्या , लय भारी केलंस गड्या ! ... मंग आता उद्या पण ? ' भिवाने छाती थोपटली , ' आपुन है ना यार ! ' दुसऱ्या दिवशी ती बेकारांची फौज रोजच्यासारखी जमलेली होती . पण आज पाऊस थांबला होता . पूर ओसरला होता आणि गर्दीही ! ...

वाचने 2136 वाचनखूण प्रतिक्रिया 6

माफ करा पण कथा कळली नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ? मुख्य म्हणजे त्याला कोणीही ५०० ची नोट का देईल ? बरं दिली तर दिली, मग भिवा काय तो त्याचा नित्यनेम व्यवसाय करणार होता का ? काहीच कळलं नाही. असो. पुर आहे काळजी घ्या.

गवि Mon, 08/05/2024 - 10:30
कथा आवडली.
पण आज पाऊस थांबला होता . पूर ओसरला होता आणि गर्दीही ! ...
या शेवटच्या ओळी भारीच. चांगल्या कथेचा शेवट उत्तम होणे तुम्ही अगदी योग्य साधले.