वाईट झालं
लेखनप्रकार
स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची. भला मोठा गोठा उरकून आलेल्या श्रवणच्या चहाच्या वेळीच घरातलं दूध संपलेलं असायचं. त्याने तेव्हापासून जो चहा बंद केला तो आजतागायत. आजही, हिवाळ्यात सुद्धा तो फरशीवर अंथरून पांघरून न घेता तो निवांत झोपू शकतो. कधी मिळायचं कधी नाही. त्याने अंगाचे चोचले पुरवणं कधीच सोडलं, साधी उशी देखील नको असते त्याला. दमायचाच इतका कि पाठ टेकली कि झोप. त्यानेच बाजारातून किलोभर आणलेल्या मटणातुन त्याला रस्साच मिळायचा. आता म्हणतो "रस्श्यातच खरी मजा" आणि स्वतःच्या ताटातले पीस सर्वांना हक्काने देत राहतो. अपमान, टोमणे त्याला कळायचे पण ते गिळण्याची कला त्याने लहानपणीच आत्मसात केली होती. 'तरुण पोरगी जीवाला घोर.' म्हणून मामांनी श्रवण च्या थोरल्या बहिणीसाठी 'उचित' स्थळ शोधलं. सगळं लग्न मामा-मामींनी उरकल्याचा थाट मिरवला, कर्ज श्रवण फेडत राहिला.
कालचक्र फिरलं. वाट्याला आलेल्या जमिनी विकल्या गेल्या. श्रवणने स्वतःसाठी एका इलेक्ट्रिकल होलसेलर कडे नोकरी शोधली, प्रामाणीकपणाला फळ मिळालं आणि योग्यवेळी स्वतःचे छोटेखानी इलेक्ट्रिकलस चे दुकान त्याने काढले. आज शहरातल्या सर्वात मोठ्या डीलर्स पैकी एक म्हणून नाव कमावलंय.
मला फोन आला तोपर्यंत उशीर झाला होता. मामा मामीने कॅन्सर विषयी नातेवाईकांना सांगितलंच न्हवत. खरंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी प्रेमविवाह केल्यापासून त्यांनी माणसांत जाणं कमी केलं होतं. शिवाय कॅन्सर विषयी गैरसमजुती पोटी ते लपवलं व नको ते इलाज करत राहिले.
श्रवण काल रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. मामींनी शेवटचं त्याला पाहिलं, आसवं पडली आणि त्यांनी डोळे मिटले.
स्मशानातून सगळे आता घरी गेले होते. गाडीत फक्त श्रवण आणि मी. शेवटी त्याच्या पाठीवर हात ठेवला तसं त्याने डोळे पुसले आणि म्हणाला 'लय वाईट झालं रे.'
वाचने
4222
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
बिलंदर शेठ
In reply to बिलंदर शेठ by कर्नलतपस्वी
कथेचा निवेदक "मी" आणि श्रवण
In reply to कथेचा निवेदक "मी" आणि श्रवण by विजुभाऊ
पहीले वाक्य<<माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा>>
छान
प्राक्तन. बाकी समजायचं
दुर्दैवी.
कथा आवडली
कळलं नाही
कथा आवडली
कोण मेलं? मामा की श्रावण?
In reply to कोण मेलं? मामा की श्रावण? by अमरेंद्र बाहुबली
साॅरी मामा गेलाय.
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.
In reply to प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. by म्हया बिलंदर
आता
छान कथा . निरागस श्रवण चे