आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?
— सध्याचे आपले राहते घर आणि त्याबद्दलची आसक्ती, मोह, सवय (तसेच ते सोडण्यातून कदाचित होणारा पश्चात्ताप, असुरक्षिततेची भावना वगैरे)
— दीर्घकाळापासून आपण रहात असलेला परिसर, त्याचेशी जडलेले भावनिक नाते, तिथे राहण्यातील सोयी - सवयी, तसेच तिथले रहिवासी, मित्र - परिचित इत्यादींशी निर्माण झालेले भावनिक बंध आणि त्यांचेशी आता ताटातूट होणार हा विचार.
— वर्षानुवर्षे खरेदी करून साठलेले सामान : कपडे, अंथरूण - पांघरुणे, फर्निचर, फ्रीज, टीव्ही, पंखे, कूलर, एसी, अलमाऱ्या, ट्रंका, सूटकेसा, स्वयंपाकघरातले सामान, वेळोवेळी मिळालेल्या (- निरुपयोगी असूनही आजवर टाकल्या न गेलेल्या -) भेटवस्तू तसेच आपल्या संसाराच्या अगदी सुरुवातीच्या काळात महत्प्रयासाने बचत करून विकत आणलेल्या पण आता जुनाट झालेल्या विविध वस्तू तसेच खलबत्ता, अडकित्ता, पाटा-वरवंटा, सोरये, विळी, ओगराळे, माठाचे तिकाटणे, चौरंग, कडीच्या झाकणाचा मोठा पितळी कूकर, डबे वगैरे वापराच्या दृष्टीने आता कालबाह्य झालेल्या वस्तू.
— आठवण म्हणून जपलेल्या वस्तू : आजवर जपून ठेवलेली वडिलांची लोखंडी ट्रंक आणि त्यांची डायरी, चित्रकलेतील गुरूंची पत्रे, आपण वीसेक वर्षाचे असताना आईने तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी लिहून ठेवाव्यात असा आग्रह धरून त्यासाठी मुद्दाम आणून दिलेल्या आणि तिने भरून काढलेल्या वह्या, आपल्या लहानपणीचे चांदोबाचे अंक, सातवीत असताना पहिला नंबर आला म्हणून मिळालेला - आणि त्याकाळी आई ज्याला त्याला कौतुकाने दाखवायची तो करंडक, आता मोठे होऊन परदेशी गेलेल्या मुलांची शाळेतली प्रगतीपुस्तके, त्यांनी साठवलेली कॉमिकं, क्रिकेटची बॅट, खेळात वगैरे मिळवलेली पदके, मुलाचा कुठल्याश्या प्रसिद्ध कंपनीचा स्टेथोस्कोप … आणि अलिकडे नातवंडे येतील तेंव्हा त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम आणून ठेवलेली खेळणी, पुस्तके वगैरे, असे चार पिढ्यांचे सामान.
— जुन्या हिशेबाच्या वह्या, पत्रे, रोजनिश्या, दिवाळी अंक, त्या त्या काळात आवश्यक असलेली विविध कागदपत्रे, डिग्र्या, डिप्लोमे, सर्टिफिकेटे, बँकांची पासबुके वगैरे असंख्य कागद आणि कधीकाळी हौसेने जमवलेली, पण आता आपण यापुढे ती वाचू शकणार नाही याची खात्री पटलेली अनेक पुस्तके.
— कधीतरी कामास येतील म्हणून साठवून ठेवलेले सुतळ्यांचे, लाकडांचे, टाईल्सचे तुकडे, वायरची भेंडोळी, खिळे, स्क्रू, नटबोल्ट, तोट्या, बिजागऱ्या, हातोडी, पक्कड, पटाशी, स्क्रू ड्रायव्हर, करवत, हॅकसॉ, पाने, बागकामाची अवजारे, कुंड्या वगैरे वगैरे …
— अश्या असंख्य वस्तूंनी खच्चून भरलेले दोन मजली घर रिकामे करत अगदी गरजेच्या वस्तूच तेवढ्या राहू देणे हे फार मोठे आव्हानच. त्यातून माझ्या चित्रकलेच्या छंदामुळे तर यात आणखी प्रचंड भर पडलेली. कागदावर आणि कॅनव्हासवर केलेली शेकडो रंग - रेखाचित्रे, स्केचबुके, विविध प्रकारचे कागद, कॅनव्हासचे रोल, माउंट बोर्ड, लाकडी फ्रेमा, मुद्दाम बनवून घेतलेले दहा फूट लांबीचे टेबल, ईझल, गेल्या पन्नास वर्षात साठलेले असंख्य ब्रश, रंगांच्या ट्युबा, बाटल्या, पेस्टल, पेन्सिली आणि काय काय.
कोविड काळात आणि नंतर हा सगळा पसारा कमी करायचा, बत्तीस वर्षांपूर्वी प्लॉट घेऊन हौसेने बांधलेले दिल्ली परिसरातले घर विकायचे आणि सध्यापुरते तरी ‘आपुले गाव’ - म्हणजे जिथे जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे घालवली त्या इंदौर शहरात स्थानांतरित व्हायचे असे ठरवले असले, तरी आमचा हा बेत कळल्यावर तिच्या लहानपणापासून एक घर सोडून पलीकडे रहाणारी, आम्हाला भैय्या-भाभी म्हणणारी, ‘पडोसन’ हिच्या गळ्यात पडून रड रड रडली. ‘क्या जरुरत है ये सब करनेकी ? वगैरे नाराजीने म्हणत रोज सांजसकाळ येऊन आमचे मन वळवण्याच्या प्रयत्नाला लागली. तिचा नवरा शर्माजी पण मला विविध उदाहरणे देऊन आमचा हा निर्णय कसा ‘गैरजरूरी’ आणि ‘गलत’ आहे, ‘बाद मे पछताना पडेगा' वगैरे कसोशीने पटवून देण्याच्या प्रयत्नाला लागला.
या आणि अशा अन्य काही कारणांमुळे पुढल्या पाच-सहा महिन्यात आमचा घर विकण्याचा बेत वेळोवेळी बदलत गेला. ‘विकायचे नाही’ या दिशेला लंबक गेला, की घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन ग्रील वगैरे बसवणे, गळणाऱ्या टाक्या दुरुस्त करणे, विजेचे काम, अशा अनेक भानगडीत अगदी कावून जाऊ लागलो. मधूनच मनाचा लंबक ‘विकावे’ च्या दिशेने झुकला प्रॉपर्टी डीलरना भेटणे, येणाऱ्या संभावित ग्राहकांना घर दाखवणे, नो ब्रोकर, मॅजिक ब्रिक्स वगैरेंवर जाहिरात- फोटो टाकणे, वगैरेत सगळा वेळ जाऊ लागला.
-- मी जरी ‘विकावे’ या मताचा असलो, तरी बायकोचे तसे नव्हते. त्यातच तिची तब्येत अचानक बिघडून काही दिवस तिला इस्पितळ-निवासी व्हावे लागले. मदतीसाठी अमेरिकेतून मुलगा सून नातवंडे आल्यावर तिला जरा बरे वाटू लागले. आमची एकंदरीत परिस्थिती बघून मुलाने आता उगाच जास्त घोळ न घालता घर विकायला काढावे, आणि सामान अगदी कमी करावे हे कसेबसे तिला पटवून दिले आणि आम्ही त्यामागे लागलो.
एक दिवस घरातली सगळी क्रॉकरी बाहेर काढली. त्यातली अत्यावश्यक बाजूला काढून इतर सगळी घरात झाडू-पोछासाठी येणाऱ्या मुलीला देऊन टाकली. मोठमोठे पितळी डबे, तोट्या, तांब्याच्या कळश्या, लोखंडी खुर्च्या, पलंग वगैरे मोडीत दिले. खूपसे सामान गाडीत भरून अनेक खेपा करून फेकून आलो. कॅनव्हासवरील मोठमोठी चित्रे लाकडी स्ट्रेचर्स वरून उतरवून रोल करून ठेवली आणि उत्तम लाकडाचे ते शंभरएक स्ट्रेचर्स फुकट सुद्धा घेणारे कोणी मिळाले नाही म्हणून तोडून फेकले. एवढेच काय पण दोन-अडीचशे कॅन्व्हासवरील चित्रे पण फेकली. यात एक गम्मत झाली. सुमारे चार फूट रुंदीच्या त्या वजनदार गुंडाळ्या टाकायला एका निर्जन जागी घेऊन गेलो आणि गाडीतून त्या काढणार, तेवढ्यात माझ्या नजरेसमोर एक ‘क्राईम-पॅट्रोल’ छाप दृश्य तरळले…
एक ‘पुळीसवाळा’ त्या जागी उभा राहून आपल्या बॉसला फोन लावत होता - “ जनाब, यां पर मोट्टे कपडे मे लिपटी हुई एक लाश पडी हुई है जी. कपडे पे नाम पता भी लिख्या है जनाब "
च्यामारी आपण टाकलेल्या कॅनव्हासात नंतर असलं कोणी काही गुंडाळलं तर ????
मग आल्या चाकी परत फिरून घरी येऊन प्रत्येक चित्रामागे लिख्या हुवा ‘नाम - पता’ कापून काढून त्या चित्रांचे ‘लाश’च काय, ‘ताश’ पण गुंडाळता येणार नाहीत असे असंख्य लहान तुकडे करून मगच ते टाकले. हां, बाद मे लफडा नई मंगता अपुनको. 'सावधपण सर्वविषयी’.
बाकी असंख्य कागद, माऊंट बोर्ड वगैरे वगैरे सामान कुणा कुणाला दिले/फेकले आणि परिचितांना बोलावू बोलावू खूपशी चित्रे पण दिली.
गेली पन्नास वर्षे जपलेली वडिलांची लोखंडी ट्रंक पण मी फेकायला घेऊन गेलो होतो, पण मुलगा म्हणाला “ बघा हं बाबा, वडिलांची आठवण आहे, परत एकदा विचार करा” - मला अगदी भरून आलं आणि मी ती परत घरी घेऊन आलो.
अशा विविध भानगडीत काही काळ व्यतीत झाल्यावर शेवटी जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.
घर विकल्यावर मला काही लोक आता अमुक म्यूचुअल फण्डात पैसा गुंतवला तर एवढा वाढेल वगैरे सांगू लागले, त्यांना मी म्हणायचो - बाबांनो, आता मला पैसा वाढवायचा नाही, तर मनमुराद भटकंती आणि छंद पुरे करण्यात खर्च करायचा आहे. उभा जन्म काटकसरीत घालवलेला आहे, आता तरी त्यातून मुक्ती हवी.
– याची सुरुवात म्हणून युरोपातील विविध जागांचा प्रवास करायचा असे ठरवून सप्टेंबरात पॅरीस गाठले, आणि आता सर्वात आधी कुठे जावे याचा शोध घेऊ लागलो….
क्रमशः
आगामी भाग२ : 'रोम' रंगी रंगले मन ...
वाचने
14075
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
वाचत आहे..
वाचत आहे..
वाचला जात आहे
वाचतोय
In reply to वाचतोय by चांदणे संदीप
@चांदणे संदीपः का बरे कठीण आहे ?
In reply to @चांदणे संदीपः का बरे कठीण आहे ? by चित्रगुप्त
वाचणेही कठीण आणि डोक्यातून बाहेर काढणेही कठीण
In reply to वाचणेही कठीण आणि डोक्यातून बाहेर काढणेही कठीण by चांदणे संदीप
लेखाएव्हढाच प्रतिसाद प्रचंड आवडला आहे.
In reply to वाचणेही कठीण आणि डोक्यातून बाहेर काढणेही कठीण by चांदणे संदीप
मृत्यू
In reply to मृत्यू by सस्नेह
तरुणपणी मृत्यू हे सुंदर काव्य
In reply to वाचणेही कठीण आणि डोक्यातून बाहेर काढणेही कठीण by चांदणे संदीप
@ संदीप- ताबडतोब मावशीला भेटायला जावे, मित्रालाही सांगा भौ.
अरे वा!!
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
@ राजेन्द्र मेहेंदळे: पसारा आवरला गेला पंत. मुक्त झालो.
असा पसारा आवरणं हे कठीण काम
भावना समजू शकतो.
वाचत आहे..
व्याप आवरता घेणे: काही लॉजिस्टिकल सूचना
In reply to व्याप आवरता घेणे: काही लॉजिस्टिकल सूचना by हणमंतअण्णा शंक…
@हणमंतअण्णा: उपयुक्त आणि मौल्यवान सूचना
सहमत.
In reply to सहमत. by कंजूस
@ कंजूसः छंदापायी जमवलेलं सामान बघायची इच्छा आहे
व्याप आवरते घेणे
In reply to व्याप आवरते घेणे by सुबोध खरे
@ डॉ.सुबोध खरे- वृद्धत्व आणि मृत्यु यांचे अनेकरंगी पदर
मानसिकता कशी बदलते वयोमानानुसार...
दोन विचार...
ही एक वैयक्तिक लेखमाला न पाहता . . .
आम्हांसाठीही मार्गदर्शक असा
लेख उत्कृष्ट, प्रतिसादही
In reply to लेख उत्कृष्ट, प्रतिसादही by गवि
पुन्हा वाचल्यावर एक विचार
आम्हीपण आनंदयात्रीच की....
उत्तम संकल्प केलात आणि तो
लेख आवडला! अशाच विषयावर मागे
येईल तेव्हा येईल पण बोलायचे नाही.
ही दिल्लीत राहणार्या 60 च्या
मिपाबाहेरील जगातही ....
फाफट पसारा
सगळी व्यवस्था करत राहायची पण . . . .
सुंदर.
"आवरते व्हा" विषयी सुंदर लेख
निरोप घेणे खुपच सुंदर !